रघुराम राजन : व्यवस्थेला न परवडणारा विचारवंत
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
अभय टिळक
  • रघुराम राजन यांची एक मुद्रा
  • Wed , 26 October 2016
  • अभय टिळक रघुराम राजन रिझर्व्ह बँक Abhay Tilak Raghuram rajan Reserve Bank

वडिलांचा वारसा या ना त्या स्वरूपात मुलाकडे येत असतोच, परंतु व्यवस्थानामक पोलादी चौकटीशी सूत न जुळण्याचं बापाचं भागधेय मुलाच्याही वाट्याला येण्याचे अनुभव व्यवहारात तसे अपवादानंच येतात. आर. गोविंदराजन आणि रघुराम राजन या पितापुत्रांची गणना अशा दुर्मीळांतच करावी लागेल. आर. गोविंदराजन म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३वे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचे तीर्थरूप. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून राजन यांची कारकिर्द लक्षणीय ठरलीच, परंतु त्याहीपेक्षा बहुचर्चित ठरला तो त्यांनी त्या पदाला केलेला अलविदा. गोविंदराजन यांच्याबाबतीत जवळपास तसंच काहीसं घडलं होतं. किंबहुना म्हणूनच, राजन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाल्याचं वृत्त समजताच गोविंदराजन यांच्या मुखातून भविष्यसूचक असे उदगार बाहेर पडले. ‘रघु कर्तृत्त्ववान आहे यात वादच नाही, परंतु त्याला मिळालेलं पद म्हणजे आगीशी खेळ आहे. तो खंबीर आहे आणि कोणताही प्रसंग तो निभावून नेईल, पण अनपेक्षितपणे हवेत जितकं उंच उचललं जावं तितक्याच अचानकपणे जमिनीवर आदळणं मग आपसूकच भाळी येत असतं,’ अशा आशयाचे उदगार गोविंदराजन यांनी त्या वेळी काढले होते.

त्याला कारणही तसंच असावं, कारण ‘रॉ’सारख्या (रीसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनलिसिस विंग) आपल्या देशाच्या गुप्तचर यंत्रणेतील एका अग्रगण्य संस्थेचं धुरीणपद हातातोंडाशी येऊनही केवळ व्यवस्थेतील उच्चपदस्थांच्या गैरमर्जीपायी त्या पदाला मुकावं लागण्याच्या प्रसंगाला गोविंदराजन यांनाही त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीच्या अंतिम पर्वात सामोरं जावं लागलं होतं. भारतीय पोलीस सेवा परीक्षेत १९५३ साली देशभरात पहिला क्रमांक पटकावून देशाच्या पोलीस सेवेत दाखल झालेले गोविंदराजन पुढे लौकरच त्या सेवेचा निरोप घेऊन गुप्तचर विभागात प्रवेशते झाले. १९६८ साली गुप्तचर विभागातून रॉ हा विभाग वेगळा केला गेल्यानंतर रॉचे सर्वेसर्वा गणले जाणारे आर. एन. राव यांचे विश्वासू उजवे हात या नात्यानं गोवंदराजन रॉच्या सचिवपदापर्यंत चढत गेले. रॉच्या प्रमुखपदी नियुक्ती केली जाण्याची सर्वांनाच अपेक्षा असताना, १९८७ साली, गोविंदराजन यांना अनपेक्षतरीत्या डावललं गेलं. त्या सगळ्या उलटापालटीला कारण ठरलं ते महावादग्रस्त असं बोफोर्स प्रकरण. त्या वेळी पंतप्रधान होते राजीव गांधी. गोविंदराजन यांना नेमकं कशामुळे डावललं गेलं हे आजवर गूढच आहे. खुद्द गोविंदराजन त्या सगळ्या भूतकाळाबद्दल बोलण्यास नाखूषच असतात. बोफोर्स तोफांच्या खरेदी प्रकरणात पैशांचं हस्तांतरण झाल्याच्या स्वीडिश आकाशवाणीवरून प्रसृत झालेल्या वृत्ताचं प्रक्षेपण भारतीय आकाशवाणीवरून केलं जाऊ नये याची खबरदारी घेण्यात गोविंदराजन कमी पडले आणि त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान त्यांच्यावर खप्पा झाले, असा एक प्रवाद आहे; तर, दुसऱ्या वदंतेनुसार, स्वीडिश आकाशवाणीवरून असं काही वृत्त प्रसृत झाल्याबाबत गोविंदराजन हे पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं पंतप्रधानांच्या ध्यानात आल्यानं त्या नाराजीचा फटका गोविंदराजन यांना बसला.

असं सांगितलं जातं की, स्वीडिश आकाशवाणीनं ते वृत्त प्रसारित केलं, त्या वेळी गोविंदराजन कार्यालयीन कामकाजासाठी परदेशी गेले होते आणि त्या बातमीबाबत विचारणा करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पाचारण केलं, त्यावेळी ते नुकतेच मायदेशी परतलेले होते. कारण काहीही असो, रॉच्या प्रमुखपदावरील हक्क डावलला गेल्यानंतर त्याविरुद्ध लवादाकडे दाद मागण्याच्या मन:स्थितीत गोविंदराजन काही काळ होते; परंतु, अन्य सहकाऱ्यांच्या सल्ल्यावरून पुढे त्यांनी तो विचार सोडून दला, असंही नमूद केलं जातं.

रघुराम राजन रिझर्व्ह बँकेतील कार्यालयात, पाठीमागे बँकेच्या माजी गव्हर्नरांची छायाचित्रं

व्यवस्थेशी सूत न जुळण्याची वडिलांची तीच परंपरा राजन यांच्याकडूनही जपली गेली. आई-वडिलांच्या कथनानुसार, लहानपणापासूनच रघुराम राजन हे कमालीचे निडर. त्यांच्या आईने कथन केलेली एक आठवण या संदर्भात विलक्षण बोलकी आहे. पंतप्रधानपदावर असताना श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली, त्या वेळी राजन यांचे आई-वडील दोघेही ब्रिटनमध्ये होते. नवी दिल्ली येथील त्यांच्या घरी राजन आणि त्यांचा भाऊ असे दोघंच होते. श्रीमती गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे अस्वस्थ झालेल्या राजन यांच्या आईने आपल्या बहिणीला त्या दोन भावांकडे जाण्याबाबत सांगितले. त्या वेळी त्या अशांत परिस्थितीतही आपल्या मावशीला रेल्वेस्टेशनवरून घरी आणायला राजनच गेले. त्या वेळी ते इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होते. मावशीला घरी आणून सोडल्या सोडल्या लगेचच ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या आपल्या हॉस्टेलवर परतले. कारण, हल्लेखोरांचं लक्ष्य झालेल्या शीख बांधवांना हॉस्टेलवर आसरा देण्याच्या कामात ते आणि त्यांचे मित्र त्या वेळी आघाडीवर होते.

अभ्यासात अफाट चमक असली तरी ‘पुस्तकातील किडा’ असा राजन यांचा लौकिक कधीच नव्हता. शाळेत काय वा कॉलेजमध्ये काय ऑल राउंडर म्हणूनच ते ओळखले जात. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे एका ठिकाणी एका शाळेत बिनबोभाट शालेय शिक्षण पूर्ण होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, त्याचा राजन यांच्या अभ्यासावर कधीच परिणाम झाला नाही. त्यांना रस नाही अथवा त्यांनी आपलं कौशल्य अजमावून बघितलं नाही असा बहुधा एकही खेळ नसावा. त्यातल्या त्यात राजन यांचं अधिक प्रेम बसलं ते टेनिस आणि स्क्वॉश या दोन वेगवान खेळांवर. शारीरिक तंदुरुस्तीबद्दलही तितकीच जागरूकता. शिकागो विद्यापीठातील बूथ स्कूलमध्ये फायनान्सचे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतरही स्क्वॉशचा त्यांचा छंद अंमळही ओसरला नाही. वयाच्या पन्नाशीला टेकल्यानंतरही स्क्वॉशच्या मैदानावर उतरलेल्या राजन यांच्याशी मॅच खेळायला ताज्या दमाचे तरुण विद्यार्थीही बिचकायचे, असं राजन यांचे मित्र आजही कौतुकानं सांगतात.

एकंदर चार भावंडांमध्ये राजन हे तिसरे. तीन भाऊ आणि एक बहीण. चारही भावंडं बुद्धिमान. योगायोग म्हणजे, तिन्ही भावांच्या व्यावसायिक कारकिर्दीचा प्रारंभ टाटा उद्योगसमूहातील नोकरीपासून झाला. दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी राजन यांनी सुवर्णपदकासह पदरात पाडून घेतली. पुढे, अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट या संस्थेतून व्यवस्थापनशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रमही त्यांनी सुवर्णपदक पटकावतच पूर्ण केला. मॅसेच्यूसेट्स् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून बँकिंगच्या क्षेत्रात डॉक्टरेट करून अखेर राजन अॅकेडमिक्समध्ये स्थिरावले. शिकागो विद्यापीठातच त्यांची उमेदवारी सुरू  झाली.

राजन हे नाव खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आलं ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून २००३ सालातील ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सूत्रं हाती घेतली तेव्हापासून. वयाच्या चाळीशीत प्रवेश करत असतानाच त्यांची त्या पदावर नियुक्ती झाली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून एवढ्या कमी वयात त्या पदावर अन्य कोणाचीही नेमणूक झालेली नव्हती. जगभरातील देशांच्या वित्तीय व्यवस्था, त्यांचं काम, देशोदेशींच्या वित्तीय धोरणनिर्मितीमधील खाचाखोचा, त्यांत अनुस्युत असणारं राजकारण, विकसित देश आणि विकसनशील देशांमधील आर्थिक संबंधांचे बारकावे... अशांसारख्या अनंत बाबींचा अत्यंत जवळून परिचय राजन यांना घडला, तो त्यांच्या त्या तीन वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान.

२००८ साली जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उद्भवलेल्या सघन मंदीनंतर उद्भवलेल्या अरिष्टाचा सामना करतेवेळी त्या सगळ्या अनुभवाची शिदोरी राजन यांच्या कामी आली. केवळ इतकंच नाही तर, आर्थिक मंदीमधून सुटका करून घेण्यासाठी धडपडणारं पाश्चिमात्य जग त्यासाठी अंगीकारत असलेल्या वित्तीय धोरणांपायी विकसनशील देशांच्या आर्थिक हितांची कशी सरसहा पायमल्ली होत आहे, याचं अतिशय नेमकं भान व आकलन राजन वेळोवेळी वैश्विक व्यासपीठांवरून मुखर करत राहिले, ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञाच्या पदावर असताना त्यांनी कमावलेल्या अंतर्दृष्टीमुळेच. जगात उद्भवलेल्या आर्थिक पेचप्रसंगांबाबत कसलेले अर्थतज्ज्ञ नेहमी केवळ पश्चातबुद्धीनं मल्लिनाथी करत राहतात; कोणत्याही वित्तीय वा आर्थिक संकटांची ना त्यांना पूर्वसूचना मिळते, ना त्या समस्येवरचा उपाय त्यांच्यापाशी असतो, अशी टीका नेहमीच केली जाते. परंतु, अमेरिकी अर्थव्यवस्थेमध्ये हातपाय पसरत असलेल्या सबप्राइम कर्जांच्या फैलावात कोणत्या अरिष्टाची गर्भधारणा घडते आहे, याचा अचूक वेध घेतलेल्या जगातील मोजक्या चार-पाच अर्थवेत्त्यांमध्ये राजन यांची गणना होते. अखेरीस १५ ऑक्टोबर २००८ रोजी अमेरिकी सबप्राइम कर्जांचा फुगा फुटला. मात्र, त्याच्या आधी तब्बल तीन वर्षं, म्हणजे २००५ सालीच, अमेरिकेतील कन्सास इथं आयोजित करण्यात आलेल्या एका परिषदेमध्ये सादर केलेल्या आपल्या संशोधनपर निबंधात राजन यांनी, सबप्राइम कर्जांच्या डोलाऱ्यातून जागतिक अर्थकारणात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य वित्तीय संकटाचं सूचन घडवलेलं होतं. त्यांच्या त्या निबंधानं अभ्यासक व धोरणकर्ते यांच्या विचारविश्वात तेव्हा प्रचंड घुसळण झाली. त्यांच्यावर काही गोटांतून टीकेचा भडिमारही झाला, परंतु ते अवचल राहिले. स्वत:वरील टीकेमुळे विचलित न होता अभ्यासांती पक्की झालेली आपली धारणा उचित अशा व्यासपीठावरून मांडत राहण्याचा हाच राजन यांचा बाणा ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाल्यानंतर पुढे वेळोवेळी प्रत्ययास आला.

शिकागो विद्यापीठातील कार्यालयात काम करताना

त्यानंतर लगेचच, म्हणजे, २००७ साली राजन यांचा भारतीय अर्थकारणाशी अर्थप्रशासक या नात्यानं संबंध प्रस्थापित झाला. देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा सुचवण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या एका उच्चस्तरीय अभ्याससमितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. पुढील चार वर्षं, म्हणजे, २००८ ते २०१२ या काळात तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे आर्थिक सल्लागार म्हणून राजन कार्यरत राहिले. केंद्रीय अर्थमंत्र्यांचे मुख्य अर्थसल्लागार म्हणून २०१२-१३ असं एक वर्ष काम केल्यानंतर ५ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३वे गव्हर्नर म्हणून राजन यांनी सूत्रं हाती घेतली. अतिशय लहान वयात त्या पदावर आरूढ होण्याचा मान त्यांच्या वाट्याला आला. २०१६ सालापर्यंतची तीन वर्षं त्यांनी त्या पदाची धुरा सांभाळली आणि त्या पदावर अधिक काळ काम करणं हे, आत्मसन्मान जागृत असणाऱ्या कोणाही व्यक्तीला अशक्य व्हावं अशा प्रकारचं वातावरण व परिस्थिती व्यवस्थेच्या धुरीणांनी निर्माण केल्यानंतर पुन्हा एकवार अ‍ॅकेडमिक्सकडे वळण्याचा निर्णय घेत ६ सप्टेंबर २०१६ रोजी त्या पदावरून पायउतार झाले.

अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ हा मूलत: सामाजिक वास्तवाचा अभ्यासक-विश्लेषक असतो, हे वास्तव अनेकदा नजरेआड केलं जातं. परिणामी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदासारख्या संवेदनशील खुर्चीवर आरूढ झालेल्या व्यक्तीनं केवळ वित्तीय धोरणविषयक बाबींसंदर्भातच आपली मतं नोंदवावीत अशी राजकीय व्यवस्थेतील धुरीणांची अपेक्षा असते. २०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या राजकीय व्यवस्थेचा राजन यांच्याबाबतचा अंदाज चुकला तो नेमका इथंच. राजन हे जागतिक लौकिक प्राप्त केलेले अव्वल अर्थतज्ज्ञ असले तरी ते पठडीबंद व झापडग्रस्त अर्थपंडित नाहीत, याचा अदमास कोणालाच नव्हता. रिझर्व्ह बँकेच्या थेट कार्यकक्षेत न बसणाऱ्या, परंतु व्यापक आर्थिक हिताच्या दृष्टीनं मोलाच्या ठरणाऱ्या केंद्र सरकारच्या काही धोरणांसंदर्भात राजन यांनी सडेतोड टिपण्या करताच, केवळ ‘मन की बात’च ऐकण्याची व ऐकवण्याची खोड जडलेल्यांच्या भुवया ताणल्या गेल्या. ताणतणाव आणि तणातणीची दरी वाढतच राहली आणि अखेर राजन यांनी पुन्हा अमेरिकेचा रस्ता धरला.

पुस्तकातील अर्थकारण जेव्हा व्यवहारात उतरतं, तेव्हा आधारासाठी त्याला राजकारणाचा पांगुळगाडा लागतोच. ते विशुद्ध इकॉनॉमिक्स नसतंच. त्या विषयाचं बारसं मग ‘पोलिटिकल इकॉनॉमी’ असंच केलं जातं. रघुराम राजन यांची पोलिटिकल इकॉनॉमीवर फार उत्तम पकड आहे. व्यवहारात ते खुल्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे खंदे समर्थक आहेत. परंतु, खऱ्या अर्थानं बाजारपेठा खुल्या होण्यात अगर करण्यात राजकीय व्यवस्थेतील धटिंगणांचे स्वार्थ कसे ठायीठायी आड येतात आणि परिणामी निखळ मुक्त बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे नव्हे, तर वस्तुत: भ्रष्ट व अकार्यक्षम आणि (वरकरणी) खुल्या बाजारपेठीय व्यवहारांच्या चलनवलनाचे आपण सगळेच कसे बळी ठरत असतो, याचं त्यांचं आकलन कमालीचं पायाशुद्ध आहे. निखळ स्पर्धेवर बेतलेल्या बाजारपेठीय व्यवहारांचे दूरगामी लाभ समाजातील सर्वच घटकांना कमी-अधिक प्रमाणात होतच असतात; परंतु, मुक्त स्पर्धेपायी आपल्या प्रस्थापित हितसंबंधांना बाधा निर्माण होण्याच्या भीतीपायी अर्थव्यवस्थेतील दांडगे प्रस्थापित खेळाडू राजकीय व्यवस्थेतील वजनदारांशी संगनमत करून शुद्ध स्पर्धेचा माहोल व्यवहारात कधीच उतरू नये याची तजवीज कशी करत असतात, याचा राजन यांनी अतिशय जवळून व बारकाईनं अभ्यास केलेला आहे. ‘सेव्हिंग कॅपिटॅलिझम फ्रॉम द कॅपिटलिस्टस्’ या पुस्तकात त्यांनी हाच सगळा कार्यकारणभाव उलगडून सांगितला आहे.

अर्थकारण आणि राजकारण या दोहोंत एक अतिशय मूलभूत असं द्वंद्व नांदतं. राजकारण हे तात्कालिकावर बेतलेलं असतं, तर अर्थकारणात लगोलग काहीच साध्य होत नाही. त्यामुळे ताबडतोबीच्या राजकीय लाभांपायी अर्थकारणाला वेठीस धरण्याचा मुजोरपणा राजकीय व्यवस्थेतील धुरीण सरसहा करत असतात. २००८ सालातील ऑक्टोबर महिन्यात अमेरिकी अर्थव्यवस्थेत फुटलेला सबप्राइम कर्जांचा फुगा हे अशाच राजकीय बेगुमानीचं फलित होतं, हे वास्तव राजन यांनी त्यांच्या ‘फॉल्ट लाइन्स’ या अलीकडील पुस्तकात अतिशय तपशीलवार, परंतु कमालीच्या वाचनीय शैलीमध्ये मांडलेलं आहे.

रघुराम राजन यांची दोन बहुचर्चित पुस्तकं

सबप्राइम कर्जांचं प्रकरण हे वरकरणी आर्थिक दिसत असलं तरी त्याची निपज शुद्ध राजकीय हाराकिरीमधून झालेली आहे, हे राजन बिनतोडपणे मांडतात. मुळात उच्च शिक्षणाच्या अमेरिकी व्यवस्थेतील संरचनात्मक पेचापायी श्रमांच्या अमेरिकी बाजारपेठेत उद्भवलेल्या असमतोलामुळे अमेरिकी मध्यमवर्गामध्ये प्रचंड प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली. ती अस्वस्थता शांतवण्यासाठी अमेरिकी शिक्षणव्यवस्थेत तसंच श्रमांच्या बाजारपेठेत कराव्या लागणाऱ्या संरचनात्मक सुधारणा वेळखाऊ ठरल्या असत्या. तेवढा संयम अमेरिकी राज्यकर्त्यांपाशी कुठला असायला? आर्थिक उन्नती साध्य करण्याबाबत अमेरिकी मध्यमवर्गाची झालेली कोंडी मतपेटीच्या माध्यमातून आपल्यावर शेकू नये यासाठी, कुंठत बनलेल्या मध्यमवर्गाची खर्चाळू उपभोगलालसा बेबंदपणे कर्जं वाटून शमवण्याचा जुगार अमेरिकी राज्यकर्ते व धोरणतज्ज्ञ खेळले. त्याच बेगुमानीची कडवट फळं उभी जागतिक अर्थव्यवस्था आज भोगते आहे. म्हणजे, अमेरिकी सबप्राइम कर्जांच्या फुग्याचं वरपंग आर्थिक भासत असलं तरी त्याची उत्पत्ती हस्व दृष्टीच्या राजकारणातून झालेली आहे, याचा उलगडा राजन यांनी सम्यकपणे पुस्तकरूपानं मांडलेला आहे.

अर्थकारण आणि राजकारण यांच्या आंतरसंबंधांची इतकी प्रगल्भ जाण असल्यामुळेच, राजकीय तसंच सामाजिक बाबतींतील असहिष्णुता व त्यातून जन्माला येणारा विद्वेष देशाच्या आर्थिक प्रगतीच्या मुळावर बेतेल, असा राजन यांनी दिल्लीश्वरांना दिलेला नि:संदिग्ध इशारा म्हणजे उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरली. समाजव्यवस्थेच्या या जबाबदार जागल्याला रोखण्यासाठी मग मोर्चेबंदी केली गेली. स्पष्टवक्ता आणि नि:स्पृह विचारवंत राजकीय व्यवस्थेला परवडणारा नसतो, हेच खरं!

 

लेखक पुण्यातील अर्थविज्ञानवर्धिनीचे संचालक आहेत.

agtilak@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख