रॉनी स्क्रूवाला नावाचा कल्ट
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • रॉनी स्क्रूवाला
  • Sat , 29 April 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar रॉनी स्क्रूवाला Ronnie Screwvala यू टीव्ही UTV

रॉनी स्क्रूवाला आणि आंधळ्यांच्या त्या सुप्रसिद्ध लोककथेतला हत्ती यांच्यात विलक्षण साम्य आहे. म्हणजे गोष्टीतल्या आंधळ्यांप्रमाणे काही लोकांना तो entrepreneur वाटतो, काही लोकांना तो यु टीव्हीजच्या माध्यमातून भारतीय मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकणारा माणूस म्हणून माहीत आहे. फार कमी लोक त्याला 'स्वदेस फाउंडेशन'च्या माध्यमातून अनेक भारतीय खेड्यांचा चेहरामोहरा बदलणारा माणूस म्हणून जाणतात. काही लोक त्याला अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या इंडियन कबड्डी लीगचा कर्ताधर्ता म्हणून ओळखतात. रॉनी स्क्रूवाला नावाचे जिगसॉ पझल आहे. सोडवायला अतिशय अवघड.

एकच माणूस एकाच आयुष्यात किती वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रॉनी स्क्रूवाला.

यु टीव्हीचा संस्थापक रॉनी हा अवलिया माणूस. त्याने १९९० मध्ये स्थापन केलेल्या यु टीव्ही ग्रुपने भारतीय मनोरंजन क्षेत्रात क्रांती केली. रॉनीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केबल टीव्ही ऑपरेटर म्हणून केली होती हे विशेष. 'शांती'सारखी मेगासिरियल तयार केली. भारतीय टेलिव्हिजनवरचा तो त्या प्रकारचा प्रयोग होता. चित्रपटनिर्मितीमध्ये भारतात स्टुडिओ कल्चरचं पुनरुज्जीवन करणारी जी मंडळी आहेत, त्यात रॉनीच नाव महत्त्वाचं आहे. ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’, ‘लाईफ इन अ मेट्रो’ अशा अनेक भारतीय चित्रपटांना वेगळं वळण देणाऱ्या चित्रपटांची निर्मिती त्याने केली. यु टीव्ही स्पॉटबॉय या कंपनीमार्फत कमी बजेटच्या पण आशयघन चित्रपटनिर्मितीला प्राधान्य दिल.

मोदी सरकारने स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यासाठी जी योजना तयार केली आहे, त्याचा चेहरा रॉनीला बनवायला पाहिजे. त्याने जागतिकीकरण भारतात येण्याच्या अगोदर आणि भारतात आल्यावर अनेक कंपन्या स्थापन केल्या, यशस्वीपणे चालवून दाखवल्या आणि योग्य वेळ येताच तो तिथून बाहेरही पडला. व्यावसायिक बांधीलकी नसणं हे रॉनीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य.

त्याची एक मुलाखत वाचली होती. त्यात तो म्हणाला आहे की, कुठलाही नवीन बिझनेस सुरू करण्यापूर्वीच मी माझी 'एक्झिट पॉलिसी' तयार करत असतो. यु टीव्ही मोठा ब्रँड झाल्यावर डिस्नेने जेव्हा टेक ओव्हर करण्याची तयारी दाखवली, तेव्हा हा भिडू घसघशीत मोबदला घेऊन लगेच तिथून बाहेर पडला. पण जे रॉनीला जमलं ते डिस्नेला जमलं नाही. त्यांना भारतीय मार्केटचा अंदाजच आला नाही. चार वर्षांतच त्यांची धूळधाण उडाली. त्यांचं जजमेंट किती चुकीचं होत याचं उदाहरण म्हणजे नुकताच बॉक्स ऑफिसवर माती खाल्लेला 'मोहेंजोदरो'. रॉनीने आशुतोष गोवारीकरसोबत चित्रपट बनवले होते, पण बजेट आटोक्यात ठेवून. डिस्नेवाल्याना ते जमलं नाही. रॉनीचा भर कमी बजेटमध्ये आशयघन चित्रपट देण्यावर होता. त्यासाठी त्याने 'यु टीव्ही स्पॉटबॉय' नावाची एक स्वतंत्र यंत्रणा सुरू केली होती. भारतीय चित्रपटसृष्टीतला हा पहिलावहिला प्रयोग होता. मग त्याची नक्कल बाकीच्या प्रोडक्शन हाऊसने केली.

यु टीव्ही मुव्हीजने नेहमीच बाजारपेठेत ट्रेंड तयार केले. 'स्वदेस', 'खोसला का घोसला', 'रंग दे बसंती', 'आमिर', 'उडान', 'देव डी' असे भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळे वळण देणारे चित्रपट त्यांनी तयार केले. डिस्ने इंडिया मात्र 'स्टार पॉवर'वर नको तितकी अवलंबून राहिली. 'कंटेंट'कडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष त्यांना भोवलं. जूनमध्ये प्रदर्शित होणारा रणबीर कपूरचा 'जग्गा जासूस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट असणार आहे. यापुढे डिस्ने इंडिया फक्त त्यांच्या हॉलिवुड चित्रपटांच्या भारतामधल्या वितरणावर लक्ष केंद्रित करणार आहे.

यु टीव्ही मुव्हीजवर टाळं लागणं हे फक्त एका स्टुडिओचं बंद होणं नाहीये. तो एका लिगसीचा शेवट आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा यु टीव्ही मूव्हीजचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. रॉनीच्या या प्रचंड व्यावसायिक अनुभवामुळे त्याला अनेक स्टार्ट अप सुरू करणाऱ्या होतकरूंच्या मेळाव्याला बोलावलं जातं. त्याची विधानं होतकरूंच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिरवली जातात. ज्याला स्टार्ट अप सुरू करायचं आहे, त्याने किंवा तिने या विषयावरची रॉनीची पुस्तकं जरूर वाचावीत. 

भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदकं मिळवून देणारा खेळ म्हणजे कबड्डी. पण आपल्या मातीतला खेळ असणारी कबड्डी सरकारी अनुत्साहामुळे गाळात जाऊ लागली होती. पण मागच्या वर्षांपासून या खेळाला हळूहळू जुनी लोकप्रियता प्राप्त होत आहे. याचं श्रेय आयपीएलच्या धर्तीवर चालवल्या जाणाऱ्या इंडियन कबड्डी लीगला आहे. याच्यामागचा ब्रेन रॉनी स्क्रूवालाच आहे. कालच्याच वर्तमानपत्रात रॉनीने शंभर कोटीच्या ऑनलाईन स्कॉलरशिप्स चालू केल्याची बातमी आहे. सध्या शिक्षण घेणाऱ्या तरुण मुलांनी लवकरात लवकर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्यासाठीच योग्य मार्गदर्शन त्यांना मिळावं असा स्कॉलरशिपचा उद्देश आहे. आशियातला हा असा पहिलाच प्रयोग आहे. 

वयाच्या पंचावनव्या वर्षांत रॉनीला रोज एक नवी ‘ब्रेन वेव्ह’ येते. मुख्य म्हणजे त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो त्याच जोमाने कार्यरत आहे. लोकांना रॉनी एक सक्सेसफुल निर्माता म्हणून माहीत असतो. पण तो त्यापलीकडे जाऊन कुठलाही गाजावाजा न करता समाजाचं देणं देत आहे, ते फारसं कुणाला माहीत नसतं.

रॉनी स्क्रूवाला हा खरंच एक कल्ट आहे!

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......