लहानपणी वाड्यातल्या पोरांबरोबर खेळताना एक ट्रिक करायचो आम्ही...
...कार्डबोर्डच्या तीन समान आकाराच्या पत्त्याच्या पानांसारख्या पानांवर अनुक्रमे अमर, अकबर, अँथनी असं लिहिलेलं असायचं. ते तिन्ही जुळवायचे, त्यांच्यातून ओवलेली दोरी विशिष्ट प्रकारे खेचली की, एकेक पान स्टायलीत तिरकं होऊन बाहेर पडायचं आणि त्यावरचं नाव दिसायचं... ‘अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी...’ असं गाणं गात शेवटच्या टप्प्याला बरोब्बर ही तीन नावं याच क्रमाने खेचायची, असा तो कौशल्याचा खेळ होता...
...त्या काळात सिनेमा सिनेमा खेळताना तोंडाने ‘ढिशुम ढिशुम’ असे आवाज काढत केलेलं फायटिंगही मस्ट होतं...
त्या फायटिंगच्या खेळात कोण अमर बनणार, कोण अँथनी बनणार, हेही त्या कार्डांच्या साहाय्यानेच ठरायचं... फायटिंगमध्ये अकबर अर्थातच कोणीही बनू इच्छित नसे... सगळ्यांना अँथनी बनायचं असायचं... पण, अमर बनायलाही तेवढीच मुलं उत्सुक असत...
लक्षात घ्या... अमिताभ बच्चनने अखिल भारतवर्षातल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या अंत:करणाला व्यापून टाकण्याची पल्स पोलिओ लसीकरणापेक्षाही प्रचंड मोठी अशी एक अद्भुत प्रक्रिया सुरू केलेली असताना अमर बनणाराही खूष असायचा, ही फारच भारी गोष्ट होती...
त्याला कारणही तसंच होतं... बोलबच्चन अँथनीने कितीही हुशाऱ्या केल्या, तरी फायटिंगमध्ये अमरच सरस ठरणार, याची अमर बनणाऱ्याला खात्री असायची... त्याला ‘अमर, अकबर, अँथनी’मधल्याच सुप्रसिद्ध मारामारीची साक्ष असायची. पिळदार देहयष्टीच्या विनोद खन्नाकडून सुकडा अमिताभ पिटला गेला, याचं काही आश्चर्य वाटायचं नाही...
...विनोद खन्नाच्या पर्सनॅलिटीला आणि डॅशिंग अॅटिट्यूडला ही सर्वांत मोठी दाद असेल... ज्या काळात अमिताभच्या झंझावाताने हिंदी सिनेमातला सगळ्यात मोठा सुपरस्टार बनलेल्या राजेश खन्नाचाही पालापाचोळा करून टाकला होता, त्या काळात अमिताभच्या बरोबरीने, त्याच्या सिनेमात, त्याच्यासमोर, त्याच्याबरोबरीच्या भूमिकेत उभं राहण्याचं डेअरिंग विनोद खन्नाने केलं होतं... शिवाय अमिताभसोबत आपलं अस्तित्त्वही दाखवून दिलं होतं...
अमिताभच्या बरोबरीची उंची, अमिताभपेक्षा कितीतरी पटींनी राजबिंडं आणि देखणं रूप, पिळदार शरीर आणि उत्तम अभिनयक्षमता लाभलेला विनोद खन्ना अचानक आचार्य रजनीशांच्या ‘नादी लागून’ संन्यास घेऊन गेला नसता तर अमिताभला भारी पडला असता, अमिताभ इतक्या सहज सुपरस्टार बनू शकला नसता, असं मानणारा एक मोठा वर्ग आहे... खरं तर त्या काळातल्या त्याच्या सिनेमांची यादी पाहता असं काहीही सूचित होत नाही... पण, एक ते दहा नंबरवर अमिताभ एके अमिताभ विराजमान होण्याची अभूतपूर्व घटना विनोद खन्नाच्या गैरहजेरीने सोपी केली, हे काही खोटं नाही...
... हा चमत्कार विनोद खन्ना घडवू शकला, हे फार आश्चर्यकारक आहे... त्यासाठी थोडं मागे जायला हवं...
विनोद खन्ना हे हिंदी सिनेमातलं एक न सुटलेलं कोडं म्हणायला हवं... हिंदी सिनेमातल्या कलावंतांना संघर्षाची एक हृदयद्रावक बॅक स्टोरी लागते. तशी त्याच्याकडे नव्हती. तो छान खात्यापित्या घरातून आला होता. सिनेमे मिळवण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला नाही... पहिल्या सिनेमापासूनच तो यशस्वी झाला... पुढच्या सगळ्या पायऱ्या झरझर चढला... तो सिनेमात का आला असावा, त्याने अभिनयाची कला कशी आत्मसात केली, त्याच्या अभिनयाच्या संदर्भातल्या कल्पना काय होत्या, याबद्दल फारसं काही वाचायला, पाहायला मिळत नाही... तो एक रिलक्टंट अभिनेता आणि त्याहून अधिक रिलक्टंट स्टार होता... महत्त्वाकांक्षेच्या अभावामुळेच की काय, त्याच्या सिनेमांच्या निवडीविषयी तर तो फारच बेफिकीर असावा, असं वाटतं... त्याने केलेल्या १४१ सिनेमांपैकी शंभरेक सिनेमे त्याने का म्हणून केले असतील, असा प्रश्न पडण्याजोगी रत्नं आहेत त्याच्या फिल्मोग्राफीत. करिअरच्या कोणत्या टप्प्यावर तो अभिनयाच्या, कारकीर्दीच्या बाबतीत सिरियस होता, असा प्रश्न पडतो. तरीही तो एवढा मोठा स्टार बनू शकला, हे खरोखरच आश्चर्य आहे.
त्याच्या यशाचं एक कारण होतं त्याचं पाहताक्षणी मोहित करणारं राजबिंडं रूप...
...हिंदी सिनेमाच्या पडद्यावरच्या मर्दानी सौंदर्याची संकल्पना धर्मेंद्रपाशी सुरू होते आणि विनोद खन्नापाशी संपते. फुलस्टॉप. साधा डेनिम शर्टमधला घोडेस्वारी करणारा आणि घोड्याबरोबर पळणारा सिंथॉलच्या जाहिरातीतला मॅनली विनोद खन्ना पाहिल्यावर आजचे तमाम देखणे स्टार जागेवरच गोठून जातील आणि आजच्या पिढीतल्या कोवळ्या पोरीही जागीच विरघळून जातील... हँडसम म्हणजे किती हँडसम असावं एखाद्या माणसाने... काही लिमिट!
...तरुण वयात त्याला मुंबईच्या उच्चभ्रू वर्तुळात वावरत असताना थेट सुनील दत्तकडून सिनेमाची ऑफर मिळाली, यात काहीच आश्चर्य नव्हतं... घरचा मोठा बिझनेस होता... त्याने तो सांभाळावा, अशी वडिलांची इच्छा असणं स्वाभाविक होतं... म्हणूनच त्याच्या वडिलांनी म्हणे त्याच्यावर बंदूक रोखून सिनेमात काम करायचं म्हणशील तर भेजा उडवेन अशी धमकी दिली होती... आईने मांडवळ केली आणि दोन वर्षांत सिनेमात यश नाही मिळालं तर ती लाइन सोडण्याचं वचन घेऊन मुलाचा सिनेमातला मार्ग सुकर केला...
...आईचा शब्द खोटा ठरला नाही... सुनील दत्तने आपला भाऊ सोमदत्त याला लाँच करण्यासाठी ‘मन का मीत’ काढला... त्यात खुनशी चेहऱ्याचा हा देखणा पोरगा व्हिलन म्हणून झळकला आणि तोच भाव खाऊन गेला... आज हा सिनेमा लीना चंदावरकर आणि विनोद खन्ना यांचा पहिला सिनेमा म्हणून ओळखला जातो, सोमदत्त नावाचा कोणी नट होता, हे संजय दत्तलाही माहिती असण्याची शक्यता कमी आहे.
त्यानंतर त्याच्याकडे खलभूमिकांची रांगच लागली. नायकाच्या बरोबरीचा आणि नायकाइतका किंवा नायकापेक्षाही जास्त हँडसम खलनायक पडद्यावर एक वेगळा करिश्मा निर्माण करतो. ती गरज विनोद खन्नाने चोख पूर्ण केली. पण, त्याने सुरुवातीच्या टप्प्यापासून कारकीर्दीची काही आखणी केली असावी का, याबद्दल शंका येते. आन मिलो सजना, मस्ताना, सच्चा झूठा, पूरब और पश्चिम, जाने अन्जाने, ऐलान, रेश्मा और शेरा, मेरा गाँव मेरा देश, रखवाला, हंगामा अशा सिनेमांमधून बागडत बागडत त्याने दोन वर्षं काढली. यात तो कुठे खलनायक होता, कुठे सहनायक, कुठे फुटकळ सिनेमाचा नायक... जे मिळेल ते काम करत गेला.
त्याच्यात काही वेगळा स्पार्क आहे, हे गुलजारच्या लक्षात आलं. गुलजारने ‘मेरे अपने’मध्ये श्याम बनवून त्याला शत्रुघ्न सिन्हाने साकारलेल्या डेडली छेनूच्या समोर उभं केलं आणि त्या काळातल्या बेरोजगार कॉलेजवयीन पोरांमधली खदखद दाखवणारं गँगवॉर पडद्यावर जिवंत झालं... ‘कोई होता जिसको अपना’ हे टायटल साँग विनोदच्या आर्त चेहऱ्यावर चित्रित झालं, तेव्हा हिंदी सिनेमाला खलनायकातला नायक गवसला. पाठोपाठ गुलजारनेच त्याला सनसनाटी नानावटी खटल्यावर आधारलेल्या ‘अचानक’मधून सिरियस सिनेमाच्या सिरियस नायकाची भूमिका दिली आणि त्याच्यातल्या अस्वस्थ अभिनयकौशल्यावर मान्यतेचं शिक्कामोर्तब झालं. हा धागा त्याने पुढे शक, लेकिन, रिहाई यांसारख्या सिनेमांमधून पुढे नेलेला दिसतो.
कोणत्याही टप्प्यावर यश मिळालं की, नायक मंडळी जास्तीत जास्त सोलो हिरो सिनेमे करून आपलं स्टारडम बळकट करण्याचा प्रयत्न करतात. पण, विनोद खन्नाने जवळपास संपूर्ण कारकीर्दीत सर्वाधिक मल्टिस्टारर सिनेमेच केले. एकट्याच्या बळावर काही सिनेमे खेचून आपला स्वतंत्र रुतबा निर्माण करण्याचा प्रयत्न ना त्याने फार केला, ना त्याच्या तशा सिनेमांना फारसं यश मिळालं. फक्त त्याच्या एकट्याच्या बळावर यशस्वी झाला, असा एक सिनेमा त्याच्या कारकीर्दीच्या पूर्वार्धात आठवणं मुश्कील जाईल... आप की खातिर आणि इम्तिहानसारखी तुरळक नावं आठवतील... मग ‘जंजीर’सारखं निवळशंख यश कुठून सापडणार? निव्वळ त्याच्या नावावर चाललेले दोनच सिनेमे सांगता येतील... त्याच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धातले ‘इन्साफ’ आणि ‘सत्यमेव जयते.’ हे दोन्ही त्याच्या पाच वर्षांनंतरच्या कमबॅकचे सिनेमे होते. अमिताभमय झालेला रूपेरी पडदा पाहून कंटाळलेले प्रेक्षक त्याला पर्याय ठरू शकणाऱ्या विनोदची वाट पाहात होते... त्यांनी या दोन सिनेमांनंतर तिसऱ्या ‘महादेव’ला थारा दिला नाही आणि अमिताभच्या अँग्री यंग मॅनचाही बाजार लवकरच उठवला.
सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धापासून ऐंशीच्या दशकभराचा काळ मल्टिस्टारर्सचा होताच. त्यात विनोद खन्ना हा भलताच अनाग्रही स्टार असावा. आपण कोणासमोर आहोत, आपल्याला अभिनेता म्हणून सोडा, आपल्या व्यक्तिरेखेला काही न्याय मिळतोय का, आपल्यावर कुरघोडी होते आहे का, आपल्याला छोटं करून कोणी मोठं होऊ पाहतंय का, यातलं काही त्याच्या डोक्यात येत नसावं. त्याने कारकीर्दीत ४७ मल्टिस्टारर सिनेमांमध्ये काम केलं. शशी कपूर, सुनील दत्त, राजेश खन्ना, जितेंद्र, धर्मेंद्र यांच्यापासून ते रणधीर कपूरपर्यंत अनेक नायकांबरोबर त्याने भूमिका केल्या. आपलं काम चोख बजावलं आणि त्याचे मोजून पैसे घेतले. १९७४ ते १९८२ या काळात शशी कपूर, सुनील दत्त, राजेश खन्ना आणि रणधीर कपूर यांचा अपवाद वगळता त्याच्याबरोबर काम केलेल्या प्रत्येक नायकापेक्षा, अगदी अमिताभपेक्षाही जास्त मानधन विनोदला मिळायचं. पण, तो त्यातच खूष होता की काय कोण जाणे! सिनेमातल्या आपल्या भूमिकेच्या प्रभावाविषयी त्याने फारसा व्यावहारिक विचार केलेला दिसत नाही. ‘अमर, अकबर, अँथनी’चंच उदाहरण घ्या. पार्श्वगायकांचा एक्का किशोर कुमार हा अमिताभचा आवाज, बादशहा रफी हा ऋषी कपूरचा आवाज आणि विनोदच्या वाट्याला मुकेश आणि महेंद्र कपूर! विनोदला कधी हे तपशील तपासावे वाटले नसतील का?
त्यातूनच अमिताभ बच्चन आपल्या गोटातल्या दिग्दर्शकांना (मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा) हाताशी धरून विनोदच्या भूमिका कापतो, त्यांना अन्याय्य डूब देतो, विनोदवर कुरघोड्या करणारे सीन रचतो आणि ही एकतर्फी फिक्सिंग केलेली नूरा कुस्ती जिंकून दाखवतो, अशा प्रकारच्या वावड्या उठू लागल्या होत्या. हे विनोदला त्या काळात समजतच नसेल का? त्याने हे दुय्यम स्थान का स्वीकारलं असेल? सुरुवात खलनायकी भूमिकांपासून केल्यामुळे आणि यश मल्टिस्टारर किंवा दोन नायकांच्या सिनेमांमध्ये मिळाल्यामुळे त्याला त्या सुरक्षित कोशाची सवय झाली असेल का? कारण काहीही असो, विनोद खन्ना हा फार सिनेमांमध्ये सोलो हीरो म्हणून सिनेमा खेचून नेण्याच्या जिगरबाज विश्वासाने उभा राहिलेला दिसत नाही.
देखणं रूप, अॅक्शन हीरोसाठी आवश्यक हाणामारीच्या अभिनयाचं कौशल्य, नाट्यमय प्रसंगांमध्ये योग्य भावदर्शन ही गुणवत्ता विनोदकडे ठासून भरलेली होती. पण, अमिताभने जेव्हा स्वत:ला, खासकरून ‘अमर अकबर अँथनी’नंतर ‘अभिनय-मॉल’मध्ये रूपांतरित करायला घेतलं, तेव्हा विनोदची आणि त्याच्यासारख्या अन्य सगळ्याच अभिनेत्यांची पंचाईत झाली. अमिताभने आता विनोदी अभिनेत्यांनाही काम ठेवलेलं नाही, असं साक्षात मेहमूद म्हणाला होता. विनोदी प्रसंगांमध्ये हलकाफुलका अभिनय, नृत्यकौशल्य, रोमँटिक गाणी सादर करणं, हे सगळे बाण नायकाच्या भात्यात असणं आवश्यक होतं. गाण्यांच्या बाबतीत स्वत: विनोदनेच आपलं अवघडलेपण मान्य केलं होतं. तो कारकीर्दीत कधीच गाण्यांच्या बाबतीत सहज नव्हता. असे काय लोक मध्येच गाऊबिऊ लागतात, असं त्याला स्वत:लाच वाटायचं. त्यामुळे, ‘प्रिये प्राणेश्वरी,’ ‘रुक जाना नहीं,’ ‘बंबई से आया मेरा दोस्त’, ‘चाहिए थोडा प्यार,’ ‘वादा करले साजना’, ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’, ‘हम तुम्हे चाहते हैं ऐसे’, ‘जब कोई बात बिगड जाए’ यांसारखी मोजकी गाणी सोडली, तर विनोद खन्नाची गाणी सांगता येत नाहीत. विनोदी भूमिकांच्या बाबतीतही तेच. तोही त्याचा प्रांत नव्हता. नाचाचं अंग त्याला नव्हतं. अमिताभने हे सगळं इंधन भरून रॉकेटसारखी सुसाट झेप घेतलेली असताना विनोद बराच मागे पडला होता. १९८२ साली त्याने आचार्य रजनीशांच्या प्रेरणेने संन्यास घेतला, तेव्हा तो जणू अमिताभच्या खांद्याला खांदा लावून उभा होता, असं वातावरण नंतरच्या काळात निर्माण केलं गेलं होतं. त्यात काही तथ्य दिसत नाही. त्याचा संन्यासाआधीचा सर्वात मोठा हिट होता कुर्बानी. (या थोर चित्रपटात झीनत अमान अमाप हँडसम दिसणाऱ्या विनोदऐवजी सोडून विदूषकी भासणाऱ्या फिरोझ खानच्या प्रेमात लट्टू आहे, हे पाहून प्रेम आंधळं असतं याची खात्री पटली होती आणि झीनत अमानच्या डोक्याला कधीतरी दुखापत झाली असणार, असा डाउट आला होता.) तो होता दोन वर्षं आधीचा, म्हणजे १९८०चा. त्यानंतर त्याने गरम खून, कुदरत, खुदा कसम, एक और एक ग्यारह, ताकत, दौलत, राजपूत, इन्सान, राज महल आणि दौलत के दुश्मन या सिनेमांमध्ये कामं केली होती. यांच्यातले राजपूत आणि कुदरत सोडले तर बाकीचे कुणाच्या खिजगणतीत तरी होते का? या काळात अमिताभ बच्चन शान, लावारिस, बरसात की एक रात, नसीब, सिलसिला, कालिया, सत्ते पे सत्ता, नमक हलाल, खुद्दार आणि शक्ती हे सिनेमे करत होता. या दोघांमध्ये तुलनेला समान जागा तरी होती का?
पण, त्या काळातही प्रेक्षकांच्या मनात ‘अमिताभला टफ देईल तर विनोद खन्नाच’ ही भावना प्रबळ होती. खुद्द विनोद मात्र व्यक्तिगत आयुष्यात भलत्याच वादळांमधून जात होता. सुबत्तेमधून येणारी विषण्णता आपल्या फारशा परिचयाची नसते. माणसाला प्रेयसापेक्षा श्रेयसाची ओढ लागू शकते, भौतिकापेक्षा आध्यात्मिकाची, बाह्यापेक्षा आंतरिकतेची ओळख करून घेण्याची अनिवार जिज्ञासा होऊ शकते, हे आजही आपल्या पचनी पडत नाही. त्यामुळे सगळं काही स्थिरस्थावर असताना विनोदसारख्या नियतीनेही लाडाकोडात वाढवलेल्या विनोदला सगळं त्यागून भगवी वस्त्रं का धारण करावीशी वाटली असतील, हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. त्यात तो ज्यांच्या ‘भजनी’ लागला होता, ते आचार्य रजनीश भलतेच वादग्रस्त होते. त्यांच्या आश्रमांविषयी, तिथल्या कथित मुक्त कामजीवनाविषयी भयंकर असूयामिश्रित कुतूहल आणि दुस्वास होता. सगळी सुखं ज्याच्या पायाशी लोळण घेत होती, तो जिच्याकडे पाहील ती स्त्री ज्याच्यावर सर्वस्व उधळून द्यायला तयार होत होती, आयुष्याचे हे सगळे रंगढंग ज्याने कोवळ्या वयापासूनच मन:पूत करून झाले होते, त्याला या उठवळ गोष्टींसाठी रजनीशांच्या आश्रमात यावंसं वाटलं नसणार, हे समजण्याइतकी प्रगल्भता त्या काळात नव्हती. प्रत्यक्षात विनोद तरुण वयापासूनच अस्वस्थ आत्मा होता. आयुष्याचा नेमका अर्थ काय, या प्रश्नाचा शोध घेत होता. परमहंस योगींच्या ‘बायोग्रॉफी ऑफ अ योगी’ या पुस्तकाने एकेकाळी झपाटून गेला होता. त्याचा मित्र, दिग्दर्शक महेश भट आणि विजय आनंद या दोघांनी त्याला रजनीशकडे नेलं. तिथं प्रवचन ऐकल्यावर त्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाल्यासारखं वाटलं. एका टप्प्यावर त्याने संन्यासदीक्षा घेतली. रजनीशांचा संन्यास हा सर्वसंगपरित्यागी संन्यास नव्हता, संसारात राहून साक्षी बनण्याचा संन्यास होता. तो रजनीशांची व्याख्यानं ऐकत असे, शूटिंगच्या मध्ये ध्यानधारणा करत असे. एका टप्प्यावर विनोदने सहा महिन्याच्या अंतरात आई आणि लाडक्या बहिणीसह चार जवळची माणसं गमावली. तेव्हा त्याला वाटू लागलं की, असाच मीही कधीतरी मरून जाईन, आयुष्याचं गूढ न उकलता. त्याआधी ती डुबकी मारणं आवश्यक आहे.
अशा डुबकीत नाकातोंडात पाणी जाणं साहजिकच होतं. तसं ते गेलंच. दोन मुलांचा सुटसुटीत संसार मोडला. बायको सोडून गेली. विनोद रजनीशांच्या सेवेत गेला. त्यांनी त्याला त्यांच्या व्यक्तिगत बागेचा माळी नेमला. त्याच्याकडून हलकीसलकी कामं करून घेतली. सर्व प्रकारचा अहंकार तोडण्याचे प्रयोग करून घेतले, त्याच्या मनातल्या मृत्यूच्या भीतीवर मात करण्याचे प्रयोग त्याच्यावर केले. या सगळ्यातून विनोदच्या आयुष्यात, मनात, प्रगल्भतेत अनेक आंतरिक स्थित्यंतरं घडत गेली. ती अर्थातच कोणाला दिसली नाहीत. उलट हिंदी सिनेमातला एक संभाव्य सुपरस्टार भिकेला लावल्याची टीका त्यांना सहन करावी लागली. खुद्द विनोद नंतर खेदाने सांगायचा की, माझ्या सद्गुरूंनी मला इतकं काही दिलं. माझ्याकडून मात्र त्यांना बदनामीशिवाय काही मिळालं नाही. रजनीशांची सर्वाधिक बदनामी माझ्यामुळे झाली. यथावकाश अमेरिकेतल्या रजनीशपूरममध्ये त्यांच्या सेवेत असताना विनोदला पुन्हा मुंबईला यावंसं वाटू लागलं. आपण आता समजून उमजून जगू शकतो, आपलं काम करू शकतो, असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. रजनीशांनीही ती परवानगी दिली आणि विनोद दुसऱ्या इनिंग्जसाठी सज्ज झाला.
ही इनिंग्ज सोपी नव्हती. अमिताभला उत्तर म्हणून विनोदला सादर करण्याची तयारी निर्मात्यांनी चालवली होती. खुद्द विनोद भयंकर मानसिक उलाघालींमधून जात होता. तो शूटिंग करायचा, आपल्या मेकअप रूममध्ये गेल्यावर ढसढसा रडायचा. आपण का रडतो आहोत, हेही त्याला कळायचं नाही. तो अभिनेता असल्यामुळे त्याचा संन्यास आणि त्याचं परतणं हे सगळंच मोठं ढोंग आहे, अशी टीकाही मोठ्या प्रमाणावर झाली होती. पण, तो मानसिकदृष्ट्या कणखर बनला होता. आपली लढाई आपण लढण्याची जिगर त्याच्यात होती. ‘इन्साफ’ या डिंपल कापडियाबरोबरच्या त्याच्या पुनरागमनाच्या सिनेमाने तुफान यश कमावलं. तसाच फायदा ‘सत्यमेव जयते’ला मिळाला. या दोन सिनेमांच्या यशाने विनोद व्यावसायिक पातळीवर पुन्हा उभा राहिला. त्याने जे जे गमावलं होतं, ते सगळं दुपटीने मिळालं. त्याच्या नावावर खास त्याच्यासाठी ओळखला जावा, असा एक सिनेमा ‘दयावान’च्या रूपाने जमा झाला. मणिरत्नमच्या ‘नायकन’च्या तुलनेत फिरोझ खानचा हा सिनेमा फिकुटलेला होता. त्यात कमल हासनसारख्या नाणावलेल्या अभिनेत्याने अजरामर केलेली व्यक्तिरेखा आपल्या ढंगात सादर करण्याची मोठी जबाबदारी विनोदवर होती. ती त्याने डौलात पार पाडली. मात्र, सिनेमा पडला आणि चर्चा माधुरीबरोबरच्या पारोशा चुंबनाची झाली. कारकीर्दीच्या या दुसऱ्या टप्प्यात त्याने नवा, मोठा बंगला घेतला. नुकसान भरून काढलं. दोनच वर्षांत पुन्हा लग्न केलं आणि चार-पाच वर्षांच्या नायकपदाच्या काळात माफक यश चाखून आपल्या मर्यादा ओळखून चरित्र अभिनयाकडे मोहरा वळवला.
यानंतरची कहाणी राजकारणात उतरलेल्या विनोदची आहे. त्याने अधूनमधून अभिनय केला. काही सिनेमांमध्ये काही वेगळ्या छटा दाखवल्या. पण, ती फावल्या वेळेतली कामगिरी होती. त्याची राजकीय कारकीर्द सिनेमातून राजकारणात गेलेल्या बहुतेकांसारखीच एकसाची आणि एकसुरी होती. त्याने काही फार मोठं परिवर्तन घडवून आणलं असं काही घडलं नाही.
छक्केपंजे न करणारा, विचारी, अंतर्मुख, समंजस माणूस ही त्याची नंतरच्या काळातली प्रतिमा राहिली. आधीच्या वाइल्ड विनोद खन्नाच्या एकदम विरोधी. त्याचा आत्मशोध एका समंजस टप्प्यापर्यंत पोहोचला असावा, आपुलेचि आपुणाशी जे वाद असतात, ते बऱ्यापैकी मिटले असावेत, असं त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धाकडे पाहून वाटतं. त्याने कविताशी लग्न केल्यानंतर त्याच्या नौकेला जणू नांगरच मिळाला.
अभिनेता म्हणून विनोदने स्वत:ला आणखी थोडं सिरियसली घेतल असतं तर काय झालं असतं? कल्पनारंजन ठीक आहे. पण, तो अभिनयाला बऱ्यापैकी विटला होता. त्यातल्या बऱ्याच गोष्टी त्याला ना आवडत होत्या, ना जमत होत्या, ना कराव्याशा वाटत होत्या. हा वेगळ्याच आंतरिक मार्गावरचा अंतर्मुख प्रवासी होता. तो योगायोगाने एका अत्यंत बहिर्मुख आणि ग्लॅमरस व्यवसायात आला आणि त्यामुळे आयुष्यभर लोकांना कोड्यात टाकून स्वत:वर नाना प्रकारचे प्रयोग करत गेला...
...आपल्या धाकट्या मुलाचं नाव त्याने साक्षी ठेवलंय...
...तो साक्षीभाव त्याने आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावर होतं नव्हतं, त्याची आहुती देऊन कमावला असेलच, तर त्याच्या निकषांवर तो कितीतरी यशस्वी झाला असणार... त्याचं श्रेयस त्याला गवसलं असणार... ...आयुष्याच्या शेवटी त्याने खेचलेली पानं त्याला अपेक्षित क्रमाने ओवून आली असतील तर त्यापुढे इथल्या कचकडी सुपरस्टारपदाची काय मातब्बरी?
……………………………………………………………………………………………
लेखक http://www.bigul.co.in या न्यूज पोर्टलचे संपादक आहेत.
mamanji@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment