अजूनकाही
१. दिल्लीत महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोदी लाटेमुळे नव्हे तर ईव्हीएम लाटेमुळे विजय मिळाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) मंत्री गोपाळ राय यांनी केला. गेल्या दहा वर्षांपासून या पालिकांमध्ये भाजप सत्तेत आहे. या ठिकाणी जनता अनेक समस्यांचा सामना करत आहे. मात्र, तरीदेखील जनता भाजपलाच निवडून देत आहे, ही गोष्ट न पटण्यासारखी आहे, असे सांगत गोपाळ राय यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात लोकशाहीच्या मार्गाने नव्हे तर ईव्हीएम मशिन्सद्वारे भवितव्य ठरवले जात आहे. मात्र, यापासून लोकशाही वाचवली पाहिजे, असे गोपाळ राय यांनी म्हटले.
असं म्हणतात की, जो पडतो तो अपयशी नसतो, तर कोणीतरी आपल्याला ढकललं म्हणून पडलो, असं सांगतो, तो अपयशी असतो. ईव्हीएम मशीन्सविषयी ठोस पुरावा देण्याची तयारी झाल्याशिवाय आपने या विषयावर बोलून उरलीसुरली पत घालवू नये. यापुढे ईव्हीएम मशीन्समध्ये खरोखरच गंभीर त्रुटी सापडल्या, तरी लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. पडलात तर पुन्हा उठून उभे राहा आणि कामाला लागा.
........................................................................................................
२. मांसाहार करणाऱ्यांना घर देण्यास नकार देणाऱ्या बिल्डरांवर कायद्यानेच जरब बसवण्याची गरज आहे. त्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल) बदल केला जावा, असा आग्रह शिवसेनेतर्फे सुधार समितीच्या बैठकीत धरण्यात आला. मात्र हा विषय पुनःपुन्हा येत असल्याने आता दप्तरी दाखल करावा, अशी भूमिका भाजपने घेतली. अखेर सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी हा प्रस्ताव फेरविचार करून सकारात्मक उत्तरासाठी पाठवण्यात यावा, असा निर्णय घेतला. सुधार समितीमध्ये चार वेळा हा प्रस्ताव आला होता, तथापि काही निर्णय न झाल्याने शाकाहारी आणि मांसाहारी यांच्यातील वाद कायमच आहे.
या प्रश्नाची लवकर तड लागली पाहिजे, नाहीतर मग शिवसेनेला नाईलाजाने शाकाहारी लॉबीविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसावं लागेल, ती मंडळी दोन तुकडे फेकतील, मग मांडवळ करावी लागेल, मांसाहारी मराठीजनांच्या तोंडाला अस्मितेची वेगळी पानं पुसून त्यांना शांत करावं लागेल, केवढा हा व्याप!
........................................................................................................
३. कमल हसनने गेल्या महिन्यात एका तमिळ वृत्तवाहिनीवर बोलताना महाभारतातील वस्त्रहरणाच्या प्रसंगावर बोट ठेवत टीका केली होती. एका महिलेवर जुगार खेळला जातो. तिचं भरसभेत वस्त्रहरण केलं जातं आणि हा प्रसंग ज्या ग्रंथात आहे त्याच ग्रंथाला आपल्या देशात मोठा मान दिला जातो, असे कमल हसन म्हणाला होता. कमल हसनच्या या विधानावर आक्षेप घेत हिंदू मक्कल कच्ची (एचकेएम) या संघटनेने तिरुनेल्वेली जिल्हा कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. कलम हसन यांचं विधान हिंदूविरोधी आहे. या विधानाने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आज कोर्टाने कमल हसनला समन्स बजावले असून ५ मे रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कमल हासन म्हणाला, त्यात त्याच्या पदरचं काय आहे? महाभारतात हा प्रसंग नाही का? पांडवांबद्दल ही भावना मनात आलेला तो काही पहिला माणूस आहे का? कोणत्याही संवेदनशील माणसाला हा प्रश्न पडतोच. महाकाव्यांमधल्या मानवी आणि मानीव व्यक्तिरेखांना देवत्व देण्याच्या विरोधातलं त्याचं वक्तव्य आहे. संबंधित संघटनेच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांनी पांडवांच्या आणि वेदव्यासांच्या विरोधात तक्रार नोंदवायला हवी आणि कोर्टाने त्यांच्यावर समन्स बजावायला हवं.
........................................................................................................
४. देशातील भाजपशासित राज्यांत करण्यात आलेली गोमांस बंदी हळूहळू सक्तीच्या शाकाहारापर्यंत येऊन पोहोचते की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातच्या काही शाळांच्या निर्णयावरून तरी तसे संकेत मिळत आहेत. अहमदाबाद शहरातील दहा शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना डब्यातून मांस, मासे व अंडी आणण्यास बंदी घातल्याचं समोर आलं आहे. तर, अन्य काही शाळांतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी भीतीपोटी स्वत:हूनच मुलांना डब्यात मांसाहारी पदार्थ देणं बंद केलं आहे.
काही दिवसांनी चोरून दारू प्यायला लागते, त्याप्रमाणे पापकर्म करत असल्याचा गंड मनात बाळगून मांसाहार करावा लागेल. म्हणजे मग तथाकथित शाकाहारी व्यापारी प्रचंड मोठ्या किनारपट्टीवरची मासळी आणि गोमांसासह सर्व प्रकारचं मांस निर्यात करून गब्बर होतील आणि त्यावर त्यांचे शाकाहारी चोचले पुरवले जातील.
........................................................................................................
५. राज्यात पेट्रोलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाल्याने आता देशात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. राज्य सरकारने व्हॅटसोबत तीन रुपयांचा दुष्काळ उपकर लावल्याने आता मुंबईत पेट्रोलचा दर ७७.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सध्याचे डॉलरचे मूल्य आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर लक्षात घेता तेल कंपन्यांना प्रति लीटर पेट्रोलसाठी २९.५४ रुपये मोजावे लागतात. मात्र मुंबईतील ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत पेट्रोलचा दर तब्बल ७७.५० रुपयांपर्यंत पोहोचतो. म्हणजेच ग्राहकांना तब्बल ४७.९६ रुपये कर म्हणून द्यावे लागतात.
आठवतात ना जाहिराती... पेट्रोलच्या भावांचा मार सहन करायचा नसेल, तर अब की बार भाजप सरकार निवडून द्या म्हणून. त्यांना भुलून लुटारू सरकार गळ्यात बांधून घेतलं आहे, अब भुगतो.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment