काँग्रेस नव्याने भरारी घेईल काय?
पडघम - देशकारण
कुमार केतकर
  • सोनिया आणि राहुल गांधी
  • Tue , 25 April 2017
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi काँग्रेस Congress संघ RSS भाजप BJP

काँग्रेस पक्षाची (कदाचित कायमच्याच) र्‍हासाकडे वाटचाल सुरू आहे, याविषयी राजकीय विश्‍लेषक आणि विचारवंतांमध्ये एकवाक्यता आहे. काँग्रेसच्या या स्थितीसाठी हे सर्व जण राहुल गांधी यांना जबाबदार धरत आहेत. (जरी सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी असल्या तरी) जोपर्यंत राहुल गांधींकडे काँग्रेस पक्षाची सूत्रे आहेत तोपर्यंत पक्षाचा र्‍हास असाच सुरू राहील, असे या सर्वांना वाटते. दोन वर्षांनी होणार्‍या २०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार, असा निष्कर्ष अनेक अभ्यासकांनी काढला आहे. मोदींना आव्हान देऊ शकेल असा नेता किंवा कार्यक्रम इतर कोणाकडेही नाहीये, असेही अनेकांचे मत आहे. अशी अवस्था असल्याने राहुल गांधी व पर्यायाने काँग्रेस पक्ष यांचा र्‍हास होणार, याविषयी या लोकांमध्ये एकमत झाले आहे.

मात्र महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे ताकदीचे नेते लाभलेला आणि स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रभागी असलेला काँग्रेस पक्ष असाच इतिहासजमा होणार नाही, असे काही जणांना वाटते. राहुल गांधी किंवा गांधी-नेहरू घराणे नेतेपदी असो अथवा नसो; आजच्या दयनीय अवस्थेतून पक्ष पुन्हा नव्याने उभारी घेईल, असा विेशास ज्यांना वाटतो, त्यांचे मत असे आहे की, काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए सारखाच आहे. मध्यममार्गी, सेक्युलर, उदारमतवादी, कल्याणकारी शासकीय व्यवस्थेचा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम देशाला बांधून ठेवणारा आहे. विविधतेत एकता हा केवळ काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम नाही, तर उलट तीच खरी ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. 

परंतु आजच्या घडीला असे दिसत आहे की, काँग्रेस पक्ष भाजपचा सामना करण्यात कमी पडत आहे. भाजपचा संदिग्ध आणि द्वेषमूलक असा हिंदुत्वाचा अजेंडा आहे. भाजपकडे संघाने गेली ९० वर्षे तयार केलेले प्रचंड मोठे असे नेटवर्क आहे. जरी गेल्या सत्तर वर्षांत बहुतांश काळ काँग्रेस पक्ष सत्तेत असला तरी संघाने प्रशासन, विद्यापीठे, प्रसारमाध्यमे, पोलीस, गुप्तहेर यंत्रणा, लष्कर आणि अगदी न्यायव्यवस्था इथे आपले लोक सातत्याने पेरले आहेत. त्यामुळे जरी अधिकृतपणे राज्यव्यवस्था उदारमतवादी आणि सेक्युलर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली होती, तरी तिचे खरे नियंत्रण हे विविध छटांच्या हिंदुत्ववादी गटांकडे राहिले. संघाचे छुपे हस्तक राज्यव्यवस्थेत सर्वत्र कायमच होते, फक्त संघाकडे आतापर्यंत राजकीय सत्तेची सूत्रे नव्हती.

संघाकडे जसे आपले निष्ठावान कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि अजेंडा आहे, तसा काँग्रेसचा स्वभाव नाही. सर्व विचारधारांचे लोक काँग्रेस पक्षात नेहमीच होते. मार्क्सवादी, समाजवादी, उजवे, भांडवलशाहीचा पुरस्कार करणारे, लोहियावादी, जातीयवादी, भाषिक अस्मितावादी आणि अगदी हिंदुत्ववादीसुद्धा. आधी नेहरू आणि मग इंदिरा गांधी यांनी या अंतर्गत विरोधाभासाचे नीट व्यवस्थापन करत काँग्रेसचे एका वटवृक्षाप्रमाणे असलेल्या छत्रधारी पक्षाचे स्वरूप कायम ठेवले.

परंतु जगभरात समाजवादाचा र्‍हास होणे आणि बाजारवादी प्रवृत्तींचा उदय होणे, जागतिकीकरण व तंत्रज्ञान (विशेषतः माहिती-तंत्रज्ञानक्षेत्रातील क्रांतीमुळे इंटरनेट आणि मोबाईल) यांचा प्रसार होणे यामुळे एक नवे सामाजिक-राजकीय वातावरण तयार झाले आहे. अशा या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात चंगळवाद, अतिरिक्त व्यक्तिवाद व सुखवाद यांचा उदय झाला आहे. सार्वजनिक स्वरूपाचे काम करण्याच्या कल्पना (उदा. कामगार चळवळ), साधी राहणी आणि काटकसर, दयाभाव आणि क्षमाशीलता (ही गांधीवादी मूल्ये ‘जागते रहो’ आणि ‘दो आँखे बारह हाथ’सारख्या चित्रपटांमधून दिसली होती), आदर्शवाद आणि चांगले काही घडू शकते यावरील श्रद्धा हे सर्व काळाच्या मागे पडले असल्याचे वातावरण तयार झाले आहे.

गांधीवाद किंवा समाजवाद यांचे पालन जरी काँग्रेस पक्ष करत नसला तरी त्यातील मूल्यांविषयी काँग्रेसला आदर होता. आताच्या मोबाईल फोनने चेतवलेल्या चंगळवादी भांडवलशाही युगापूर्वी साधे आणि सार्वजनिक आयुष्य जगणे शक्य होते. येऊ घातलेल्या नव्या जगाशी गेल्या जवळपास पाव शतकात काँग्रेसचा संबंध तुटल्यासारखा होता. उदारमतवाद आणि बहुविधतेच्या काँग्रेसच्या अजेंड्याला अस्मितावादी हिंदुत्वाने आव्हान दिले. तर त्यांच्या अर्ध-समाजवादाला खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण यांनी आव्हान दिले. खरे तर १९९१-९२ मध्ये ही धोरणे काँग्रेसनेच आणली होती. परंतु या धोरणांमुळे काँग्रेसच्या मूळ संस्कृतीला, परंपरेला आणि व्यापक वैचारिक चौकटीला धक्का बसेल याचा त्यांना तेव्हा अंदाज आला नाही. भाजपने एकाच वेळी उजवे अर्थकारण आणि कर्मठ हिंदुत्व यांची सांगड घातली. भाजपच्या या धोरणामुळे ज्याला ‘आयडिया ऑफ काँग्रेस’ मानले जाते, त्या मध्य केंद्राच्या डावीकडे झुकलेला आर्थिक कार्यक्रम आणि बहुसांस्कृतिक-सर्वधर्मसमभाव या प्रकारचा सेक्युलॅरिझम या दोन्ही कल्पनांच्या वर्मी घाव बसला.

त्यामुळे इथून पुढे काँग्रेस पक्षापुढे केवळ राहुल गांधींचे नेतृत्व किंवा घराणेशाहीचा पक्ष असे स्वरूप इतकेच मर्यादित आव्हान नाही. केवळ ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, कमलनाथ यांच्यासारखे नवे नेते आणून काँग्रेस पक्ष कम्युनिस्ट किंवा संघ यांच्याप्रमाणे निष्ठावान कार्यकर्ते तयार करू शकणार नाही. काँग्रेस पक्षाला आपले ‘मासबेस्ड’ स्वरूप सोडून चालणार नाही. शिस्तबद्धपणे आखलेली कोणतीही संघटना नसतानासुद्धा काँग्रेसने जनतेशी संवाद ठेवला होता. बहुविधता आणि सर्वसमावेशकता सोडून काँग्रेस पक्षाला चालणार नाही. हिंदुत्वाच्या प्रभावाखाली आलेल्या देशातील मध्यमवर्गाला किंवा देशाबाहेरील लोकांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसला सॉफ्ट हिंदुत्ववादी होता येणार नाही; तसे होऊदेखील नये. सामाजिक न्याय आणि कल्याणकारी योजनांना सोडूनसुद्धा काँग्रेसला चालणार नाही. काँग्रेसकडे आजसुद्धा देशभर पसरलेले नेटवर्क आहे. गेल्या दहा वर्षांत ते थोडे विस्कळीत झाले आहे. मात्र गांधीवाद, नेहरूवाद आणि स्वातंत्र्य चळवळ यांमध्ये पाळेमुळे असलेला हा वर्ग आहे. पक्षाने आतापर्यंत या लोकांकडे दुर्लक्ष केले होते. काँग्रेसला याचा आधार घेऊन आपली ध्येयधोरणे ठरवावी लागतील आणि त्यानुसार मोहिमा आखाव्या लागतील. केवळ भाजपला प्रतिक्रिया देणे आणि प्रश्‍न विचारणे असे प्रतिक्रियावादी असून काँग्रेसला चालणार नाही. असे प्रतिक्रियावादी होण्याने केवळ नरेंद्र मोदींचे हात बळकट होतात. मोदींवर काहीही आरोप केले तरी ते त्यांना चिकटत नाहीत, तसेच त्यांच्यासारख्या उन्मादी व्यक्तीला त्यांच्या ग्राउंडवर कधीही आव्हान देता येत नाही. राहुल गांधी/ गांधी-नेहरू घराणे असो की नसो, आपली स्वतःची राजकीय स्पेस काँग्रेसला तयार करावी लागेल.

मोदी हे एक तात्पुरते असलेले प्रकरण आहे. काँग्रेसचे मात्र तसे नाही. मोदी हे काही भाजपचे भविष्य नाही. मोदी किंवा संघ या अफाट, बहुसांस्कृतिक, बहुधर्मीय, विविधांगी भारताचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. आधुनिक असणे म्हणजे आधुनिक उपकरणे वापरणे असे मोदींना वाटते, मात्र तसे नाहीये. आधुनिकता ही तुमची मूल्यव्यवस्था आणि दृष्टिकोन यातून प्रतिबिंबित होते. मानवतावाद, शांततावाद, सर्व धर्मांचा व संस्कृतींचा आदर करणे, सर्व जगाच्या भल्यावर असलेला विेशास यात आधुनिकता सामावलेली आहे. महासत्ता होणे किंवा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत कायमचे सदस्यत्व मिळणे यात आधुनिकता सामावलेली नाही. असा विचार हा गांधीवादी चौकटीतला नेहरूवाद आहे. मोदींच्या नावाने आलेली लाट या मूल्यांची जागा घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे ती फार काळ टिकणार नाही. मोदीवाद आणि संघ यांना याच कारणामुळे फार भवितव्य नाही. याउलट काँग्रेस हा ‘लंबी रेस का घोडा’ आहे.

दुर्दैवाने काँग्रेसचा स्वतःवरील विश्वास आणि श्रद्धा हरवली आहे. एका विचित्र अशा अस्मितेच्या पेचप्रसंगात आणि गोंधळात काँग्रेस सापडली आहे. अशा अडचणीच्या वेळी पूर्ण र्‍हास होऊ न देता आपले अस्तित्व टिकवण्याच्या चिंतेत ती सापडली आहे. काँग्रेसमध्ये प्रथम क्रमांकावर असलेले गांधी-नेहरू घराणे हेसुद्धा तात्पुरते टिकणारे प्रकरण आहे. महात्मा गांधींच्या सेक्युलर धार्मिकतेवर, पंडित नेहरूंच्या आदर्शवादावर आणि स्वातंत्र्य चळवळीच्या वारशावर विश्वास असलेली प्रत्येक व्यक्ती काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करेल. या प्रक्रियेत काँग्रेसचे स्वरूप कदाचित बदलू शकते. अशा काँग्रेसचे नेमके स्वरूप काय असेल, यानुसार संघटन आणि नेतृत्व यात बदलसुद्धा होऊ शकतात!

(अनुवाद : गोविंद गोडबोले)

(‘साधना साप्ताहिका’च्या २२ एप्रिल २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेला हा मूळ इंग्रजी लेख ‘द हिंदू’ या दैनिकाच्या २५ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झाला होता.)

……………………………………………………………………………………………

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......