अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी लहानपणी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे, त्या गुजरातमधील वडनगर स्टेशनचं रूपडं आता पालटणार आहे. तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून या स्टेशनचा कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केली. २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारात चहा विकणाऱ्या मुलाला पंतप्रधान करण्याचं भावनिक आवाहन नरेंद्र मोदी यांनी अनेकदा केलं होतं. आपल्या बालपणी आपण वडनगर स्टेशनवर वडिलांसोबत चहा विकला आहे, असं ते सांगतात. वडनगर हे त्यांचं जन्मगाव आहे.
चला, ज्या स्टेशनात फक्त मालगाड्याच थांबत तिथे वाघिणींना (पक्षी : मालगाड्यांच्या वॅगन) चहा पाजण्याचा पराक्रम बालनरेंद्रांनी केला होता, हे आता इतिहासात नमूद होणार तर. लगेहाथ, त्या कुठल्याशा नदीत हजार-पाचशे करोड रुपये खर्च करून मगरीचा आणि तिचा ‘वध’ करणाऱ्या बालनरेंद्राचा पुतळाही उभा करायला काय हरकत आहे?
..............................................................................
२. मुस्लिम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असं त्यांनी निक्षून सांगितलं. देशातील १३ राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही देशाचा कारभारही चालवतोय. अशा वेळी, उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही मुस्लिम व्यक्तीला आम्ही त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना बडतर्फ केलं आहे का? आम्हाला मुस्लिम लोक मतं देत नाहीत, पण आम्ही त्यांना न्यायानंच वागवतोय की नाही? असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी केला.
असा प्रश्न सुचणं हेच मुळात एकसमयावच्छेदेकरून संतापजनक आणि हास्यास्पद आहे. तुम्ही काय उपकार करताय का रविशंकर प्रसाद? की एकचालकानुवर्ती कारभाराची सवय झाल्यामुळे लोकशाहीची मूल्यं अजून रुजलेली नाहीत तुमच्या रक्तात? तुम्हाला मतं न देणारे हिंदूही खूप आहेत की. लोकशाहीत मतं ही फक्त निवडून येण्याचं एक साधन आहेत. त्यानंतर सत्तेत आलेल्या प्रत्येकाला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा कारभार करावाच लागतो. ते कामच आहे तुमचं. त्यात खास कौतुकानं सांगण्यासारखं काही नाही.
..............................................................................
३. विद्यार्थांना शाळेत शिक्षणाची हमी असायला हवी. पुस्तके, गणवेश याच शाळेतून घ्या, असा आग्रह कोणतीच शाळा करू शकत नाही. शालेय साहित्यांची विक्री करणे हे शाळेचे काम नाही. असे प्रकार कोणती शाळा करत असेल तर ताबडतोब बंदची कारवाई करू, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे दिला.
विनोदजी, इशारा चांगला आहे. पण, असा प्रकार होतो आहे, हे कोणता पालक पुढे येऊन सांगू शकतो? त्याच्या पाल्याला शाळेत काय प्रकारच्या त्रासाला तोंड द्यायला लागेल, ते सांगता येत नाही. शिवाय, शहरांमधल्या बिझी पालकांना एक दिवस शाळेत गेलं की, सगळी कामं तिथेच होतात, हेच सोयीचं वाटतं. त्यातून शाळा नफा कमावतात, तो फायदा विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी काही करण्याची गरज आहे.
..............................................................................
४. माझ्या वक्तव्यामुळे बाबरी मशीद पाडली गेली, असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रामविलास वेदांती यांनी केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल, महंत अवैद्यनाथ आणि माझ्या सांगण्यावरूनच बाबरी मशीद पाडली गेली असे विधान वेदांती यांनी केले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी आम्ही तिघांनी बाबरी मशीद पाडा असे कारसेवकांना सांगितले होते, तर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे कारसेवकांना शांत व्हा असे समजावून सांगत होते असे वेदांती यांनी म्हटले आहे.
वेदांती यांची २५ वर्षांची झोप पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. त्यांनी मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा आदींचे चित्रपट पाहणं थोडं कमी करायला हवं. त्या सिनेमांमध्ये जसं शेवटच्या रिळात भरकोर्टात नायक-नायिका वगैरे कोणीतरी खुनाच्या गुन्ह्यात फासावर लटकणार असताना कोणीतरी त्यागमूर्ती अचानक उपटते आणि ‘मिलॉर्ड, असली कातिल तो मैं हूँ, मुझे सजा दीजिए’ असं केकाटते, त्यातलाच हा प्रकार दिसतो. नावात काय आहे, हे शेक्स्पिअर म्हणाला होता; तेच पुढे नेऊन आडनावही तेवढंच निरर्थक असतं, हे या वेदांतीबुवांनी सिद्ध करून दाखवलं आहे.
..............................................................................
५. नोटाबंदीच्या काळात २१ दिवस राज्यातील टोलनाके बंद केल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे १४२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. या कालावधीत कंत्राटदारांचे नुकसान भरून द्यायचे असून राज्य सरकारची परिस्थिती बिकट असल्याने केंद्र सरकारने नुकसानभरपाई द्यावी असे राज्य सरकारने म्हटले आहे. नऊ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी अंतर्गत येणारे ४१ टोलनाके बंद ठेवण्यात आले होते.
अगदीच योग्य मागणी आहे ही. फक्त ४१ टोलनाक्यांनी प्रत्येकी किती नुकसान झाल्याचा दावा केला आहे, ते सरासरी उत्पन्न मानून टोलनाके सुरू झाल्याच्या काळापासून किती वसुली झाली आहे, याचं गणित करायला पाहिजे; म्हणजे कोण कुणाला किती देणं आहे, तेही कळेल.
..................................................................................................................
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment