नवी दिल्लीत झालेल्या ९८व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू आणि श्रीमती नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी मी आणि राजीव खांडेकर (‘एबीपी माझा’) यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. ‘असे घडलो आम्ही’ असा मुलाखतींचा विषय होता. त्यातील माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांची ही मुलाखत…
.................................................................................................................................................................
प्रवीण बर्दापूरकर : नमस्कार! सुरेश प्रभूंविषयी माझ्या मनात थोडासा ‘समाजवादी बालराग’ आहे. तो त्यांच्याशी पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये मी बोलून दाखवला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आमचे नानासाहेब (मधू) दंडवते यांचा पराभव केला होता. तेव्हा मुंबईत पहिल्या पत्रकार परिषदेत मी प्रभू यांना विचारलं होतं की, ‘तुम्ही आमच्या नानासाहेबांचा पराभव का केला?,’ अर्थात, ही गोष्ट आता चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीची आहे. पण त्यांनी त्या प्रश्नाचा कधी राग मनात धरला नाही. …तर मला असं विचारायचं आहे की, तुमच्या स्वभावामध्ये हा ‘सोशीकपणा’ (मृदू स्वभाव) शिवसेनेत राहूनही कसा काय टिकला?
सुरेश प्रभू : स्वभाव कसा घडतो, हे सांगणं खरंच कठीण आहे. नाना दंडवते यांच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मीदेखील अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना जात असे. त्यांच्यासोबत असणारे बबन डिसुझा, सदानंद वर्दे, भाई वैद्य या सगळ्यांशी माझं खूप चांगलं आणि जवळचं नातं होतं. व्यक्ती म्हणून सर्वांबद्दल आदर होता. माझी कुठल्याच पक्षाशी त्या काळात बांधीलकी नव्हती. त्यामुळे कोणाबद्दल आदर किंवा अनादर ठेवायचा हा प्रश्नच नव्हता. नाना आमच्या घरी अनेकदा यायचे, पण दुर्दैवानं मला त्यांच्याच विरुद्ध निवडणूक लढवावी लागली.
बर्दापूरकर : तीही शिवसेनेकडून?
सुरेश प्रभू : खरं सांगायचं तर, मी शिवसेनेतही नव्हतो. बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावलं आणि सांगितलं, ‘निवडणुकीला उभा राहा’. बाळासाहेबांच्या सांगण्यावर मी निवडणूक लढवली. ती लोकसभा निवडणूक मला नानांविरुद्ध लढवावी लागली. त्याआधी नाना १९७१ ते १९९१पर्यंत पाच वेळा निवडून आले होते. त्यांचं काम खूप मोठं होतं आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व त्याहून मोठं होतं. त्यांच्याविरुद्ध लढणं मनाला खरंच खूप वाईट वाटलं होतं. नानांनी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. माझा तर प्रश्नच नव्हता. १९९६मध्ये मतमोजणी (काउंटिंग) मॅन्युअली होत असे. तेव्हा राजापूर मतदारसंघाचा निकाल पहिल्यांदा यायचा. ते कसं व्हायचं माहीत नाही.
राजीव खांडेकर : कोकणातले लोक एफिशिएंट आहेत.
सुरेश प्रभू : पहिल्या काही राऊंडमध्येच लक्षात आलं की, नानांचा विजय कठीण आहे. रात्रभर काउंटिंग सुरू होतं. पहिल्या काही राऊंडनंतर मी नानांना सांगितलं, ‘नाना, आता तुम्ही जाऊन आराम करा. निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे.’ पण नाना म्हणाले, ‘नाही, मी थांबणार’. मलाही कळत होतं की, आता नाना जिंकणं कठीण आहे.
पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं. नाना मला म्हणाले, ‘अरे, तुला माहिती आहे का? मला आश्चर्य वाटलं तू शिवसेनेतून निवडणूक लढवलीस म्हणून. काही काळानंतर मी निवडणूक लढवणार नव्हतो. त्यामुळे माझी इच्छा होती की, तू माझ्यानंतर निवडणूक लढवावीस’. मी त्यांना म्हणालो, ‘नाना, माझीही तशीच इच्छा होती. झालं ते दुर्दैवानंच झालं.’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
खांडेकर : राजापूर मतदारसंघाचं हे भाग्य की, त्यांना एक सो एक असे अत्यंत निस्पृह, अभ्यासू, संसदपटू त्या मतदारसंघाने दिले. १९९५-९६ जेव्हा वाजपेयींचं १३ दिवसांचं सरकार गेलं आणि देवेगौडा पंतप्रधान झाले, त्या वेळेला मी दिल्लीमध्येच होतो. जनता दलाचा पंतप्रधान होणार आणि आणखी कुणाचा? लोकांची इच्छा होती जनता दलातल्या व्ही.पी. सिंगांनी व्हावं. रामकृष्ण हेगडे यांची इच्छा होती त्यांनी स्वत: व्हावं आणि बाकीच्या मंडळींची इच्छा रामकृष्ण हेगडे यांना करायचं नाही अशी होती. व्ही. पी. सिंग व्हावेत असं त्यांना वाटत होतं. ज्या दिवशी मीटिंग होती, त्या दिवशी व्ही.पी. सिंग दिवसभर दिल्लीमध्ये रिंग रोडवर फिरत होते. त्या दिवशी मी नानांना भेटलो होतो. आपण हे मान्य करू की, जर त्या निवडणुकीमध्ये नाना निवडून आले असते, तर देशाचे पंतप्रधान देवेगौडा नाही, तर मधू दंडवते झाले असते.
सुरेश प्रभू : १०० टक्के खरी गोष्ट आहे आणि तुम्हाला त्या वेळची आणखीन एक गोष्ट सांगतो. नाना देशातल्या निवडणुकीचे ट्रेंड बघत होते. त्या वेळेला मला आठवतं, बहुतेक बबन डिसुझा म्हणाले, नाना बहुतेक आपलं सरकार येणार. म्हणजे सगळ्यांनाच माहीत होतं की अटल बिहारी सरकार राहणार नाही. राजू खांडेकर आता म्हणाले, ते शंभर टक्के खरं आहे की, कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते. माझी घोडचूक झाली. न विसरता येणारी, अशी माझ्याकडून एक चुकीची गोष्ट झाली.
खांडेकर : इथं पृथ्वीराज चव्हाण बसले आहेत. नि:स्पृह राजकारण, अभ्यासू राजकारणी असं म्हटलं, तर युपीए किंवा काँग्रेस ‘हा आमचा एक्का’ म्हणेल, तर एनडीएसाठी ‘हा आमचा एक्का’ म्हणून तुम्हाला समोर ठेवलं जाईल, असं अभ्यासू, सुसंस्कृत, स्वच्छ असं तुमचं आहे. किमान ५०० पानांचा तुमचा पासपोर्ट असेल इतके तुम्ही सतत फिरत असता. पण त्या सगळ्याकडे जाण्याच्या आधी तुम्ही राजकारणात मुळामध्ये आलात कसे? तुमच्यासारखा इतका सभ्य, सुसंस्कृत, मृदूभाषी माणूस राजकारणामध्ये आणि तेही शिवसेनेसारख्या पक्षातून कसा काय…
सुरेश प्रभू : हा एक खरोखरच एक इंटरेस्टिंग विषय आहे. माझी आणि उद्धव-राज ठाकरे दोघांशी वैयक्तिक स्तरावर मैत्री होती. खूप नाही, पण चांगली मैत्री होती. एकदा मी कुठे तरी परदेशी कार्यक्रमासाठी गेलो होतो. मी १६ जागतिक संस्थांवर काम करायचो. राज ठाकरे यांचा मला पहिल्यांदा फोन आला की, इकडे बाळासाहेबांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी डंकेल करारावर एक सभा चेंबूरला आयोजित केली आहे. तिथे डंकेलवर भाषण करायला ये. मला वाटलं, राज विनोद करण्यासाठी सांगतो की काय. पण खरोखर गंभीरपणे सांगतोय असे ते म्हणाले. थोड्या वेळानं उद्धव ठाकरे यांचा पण फोन आला आणि त्यांनीही तेच सांगितलं.
तेव्हा नुकतीच छगन भुजबळ वगैरे मंडळींनी शिवसेना सोडली होती. शिवसेनेमध्ये थोडीशी मरगळ आली होती. त्यामुळे बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी ती सभा घेतली होती. बाळासाहेबांनी भाषण केल्यावर माझं भाषण होतं. बाळासाहेब निघून जाणार होते. मला प्रेशर आलं होतं. राजकारणात नसलो तरी बाळासाहेब, अटलजी, जॉर्ज फर्नांडिस यांची भाषणं मी अनेकदा ऐकायला जायचो. बाळासाहेब भाषण केल्यावर जाण्याऐवजी खाली बसले आणि म्हणाले, ‘तुझं भाषण ऐकायला थांबतो.’ मी डोक्याला हात लावला. आता अजूनच अडचण.
माझं भाषण झालं. लहान सभा होती २००-४०० लोक असतील. माझं भाषण ऐकल्यानंतर बाळासाहेब स्टेजवर आले आणि म्हणाले, ‘विधानसभेवर आपला भगवा झेंडा लागणार आणि महाराष्ट्राचा अर्थमंत्री सुरेश प्रभू होणार!’ मी मनात म्हटलं की, माझ्यावर एवढा प्रचंडपणे अनर्थ का कोसळतोय. त्या वेळी शिवसेनेची सत्ता आली, पण अर्थखातं भाजपकडे गेलं. मग बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांना सांगितलं की, ‘यांना कोणतं तरी खातं द्या आणि मंत्री करा.’ ते म्हणाले की, ‘आपल्याकडची सगळी खाती संपली.’ मग मला बाळासाहेबांनी फायनान्स कमिशनचे अध्यक्ष केलं. ते संवैधानिक पद आहे. तेव्हा ‘तरुण भारत’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख माधव कदम यांनी लिहिलं की, ‘सुरेश प्रभू पुढचे खासदार’. माझा त्याच्याशी काही एक संबंध नव्हता.
पण त्याच्याआधी शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी मला ‘महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेच्या बोर्डा’वर त्यांचा नॉमिनी म्हणून नेमलं होतं. मी पवारांना भेटलोही नव्हतो. त्यांनी केवळ माझं एक भाषण ऐकलं होतं. तो पवारांचा खरोखर मोठेपणा आहे. त्या वेळी मी बँकेच्या बोर्डावर होतो आणि फायनान्स कमिशनमध्ये काम करत होतो. फायनान्स कमिशन काही मोठं पद नव्हतं, पण राज्यात अनेक ठिकाणी माझे सत्कार होत होते. प्रत्येक ठिकाणी कोणी तरी सांगायचं की, ‘पुढचे खासदार सुरेश प्रभू’. त्याचं काहीच कारण नव्हतं. पण कदाचित काँग्रेसमधून काही दबाव असावा. कारण पवारसाहेबांनी मला महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बोर्डावर नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे लोकांना तसा गैरसमज झाला असावा. पण मी पवारसाहेबांना कधीही भेटलो नव्हतो. त्यामुळे याचा काहीच संबंध नव्हता.
एकदा मी माझ्या चार्टर्ड अकाउंटन्सीच्या प्रॅक्टिससाठी इंडोनेशियाला गेलो होतो. त्या वेळी माझ्या पत्नीला, उमाला घरी फोन आला की, ‘त्यांचा नंबर द्या’. तेव्हा मोबाईल नव्हते. त्यामुळे तिने माझ्या हॉटेलचा नंबर दिला. नंतर मला बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं, ‘यायचं आणि निवडणुकीला उभं राहायचं’.
मी उमाला फोन केला. ती म्हणाली ‘मीच तो नंबर दिला, पण आपल्याला या भानगडीत पडायचं नाही’. माझ्या तीनही बहिणी आणि आई यांनी मिळून निर्णय घेतला की, ‘नाही’ म्हणायचं. मी विचार केला, असं सगळ्यांनीच का म्हणावं? बाळासाहेबांचा मोठेपणा म्हणजे शिवसेनेत नसतानाही त्यांनी मला बोलावलं आणि निवडणुकीला उभं केलं. मी निवडूनही आलो. त्याच दिवशी निकाल लागला आणि मला वाटतं की, १६ मे रोजी अटलजींनी शपथ घेतली. त्याआधी १५ तारखेला बाळासाहेबांचा फोन आला, ‘तुम्हाला उद्या शपथ घ्यायची आहे.’ मला वाटलं, ते विनोद करत आहेत. मी विचारलं, ‘शपथ कशासाठी?’. ते म्हणाले, ‘तुला केंद्रात मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे. अटलजींचा फोन आला. त्यांनी (बाळासाहेबांनी) एकच नाव सांगितलंय.’ मग बाळासाहेबांनी मला घरी बोलावलं. तिथे राजने आणि त्याच्या आईने मला ओवाळले. तेव्हा राज म्हणाला, ‘२५-३० तिकिटं आहेत जेट एअरवेजची. सगळ्यांना घेऊन जायचं.’ मी म्हणालो, ‘कोणाला?’ राज म्हणाला, ‘पत्नीला...वगैरे.’ माझी पत्नी उमा त्या वेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये काम करत होती, पण तिला वेळेत ट्रेन मिळणं कठीण होतं. त्यामुळे मी एकटाच जेट एअरवेजच्या फ्लाइटने दिल्लीला गेलो. किरीट सोमय्या आमचे जुने मित्र आम्हाला राष्ट्रपतीभवनात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उमा दिल्लीला पोहोचली. आम्ही मंत्रिपदाच्या शपथविधीला पोहोचलो. तिथे सुरक्षारक्षकाने विचारलं, ‘तुमच्याकडे पास आहे का?’ माझ्याकडे नव्हता. किरीट सोमय्या यांनी धावपळ करून पास मिळवून दिला. त्यानंतर आम्ही आत गेलो आणि शपथविधी झाला.
मी दोन-तीन वेळा बाळासाहेबांना सांगितलं, ‘मला पुन्हा मंत्री करू नका’. पण प्रत्येक वेळी, अटलजींनी जेव्हा तीन वेळा शपथ घेतली, त्या तीन वेळा बाळासाहेबांनी मला मंत्रिपद दिलं. ही घटना बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि राज यांचा मोठेपणा सांगणारी आहे.
बर्दापूरकर : गमतीनं म्हणतोय, तुम्ही खूप धाडसी आहात. किरीट सोमय्या तुमचे मित्र आहेत... म्हणजे तुमच्यातील धाडस मोठे आहे.
सुरेश प्रभू : मी खारचा, किरीटही. नंतर तो आमदार होण्यासाठी मुलुंडला राहायला गेला. आणीबाणीच्या काळात आम्ही ‘अँटी-इमर्जन्सी’साठी खूप काम केलं होतं. मी त्या वेळी सीए करत होतो. किरीट पण सीए आहे. माझ्यापेक्षा एक-दोन वर्षांनी लहान असेल. आम्ही तेव्हा सोबत काम करायचो. किरीट खरोखरच धाडसी आहे आणि त्याने खरोखरच खूप काम केलंय. त्या वेळी तो भाजपचा मुंबईचा अध्यक्ष होता. त्या काळात अटलजींचं नाव जाहीर झालं. अडवाणींनी सांगितलं की, ‘हे आमच्या एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.’ तो महाधिवेशनाचा कार्यक्रम महालक्ष्मीला होता आणि त्याचा अध्यक्ष किरीट सोमय्या होता. त्याच्या विचारांबद्दल मतभेद असू शकतात, पण त्याचं धाडस निर्विवाद आहे.
खांडेकर : तुमच्या राजकीय कारकीर्दीकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की, चांगुलपणाच्या आणि अभ्यासूपणाच्या जोरावर महाराष्ट्राचं राजकारण गेली ४०-५० वर्ष ज्यांच्याभोवती फिरत राहिलं, असे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन मोठ्या नेत्यांनी तुम्ही वयाने खूप लहान असताना तुमच्यावर विश्वास दाखवला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी तुम्हाला राजकीय जबाबदाऱ्या दिल्या. तुमच्या कुटुंबाचा तर राजकारणाशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. त्यांच्यावर तुमच्या अभ्यासूपणाचा प्रभाव कसा पडला? लहानपणी राजकारणात जायचं असा काही विचार होता का? किंबहुना तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचं होतं?
सुरेश प्रभू : खरं सांगायचं तर, मला लहानपणापासून राजकारणात जावं असं कधी वाटलं नव्हतं. माझ्या वडिलांनी मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायला सांगितलं होतं. माझी इच्छा होती की, मी वकील व्हावं. त्या वेळी मोठी नावं म्हणजे नाथ पै, नानी पालखीवाला. आम्ही त्यांची भाषणं ऐकायचो. एकदा माझे वडील मला एका ट्रायल कोर्टात घेऊन गेले. तिथं अशील पकडण्यासाठी वकिलांचं एकमेकांशी भांडण चालू होतं. तेव्हा वडिलांनी मला सांगितलं, ‘तू सीए कर आणि मग वकिली कर’. त्यामुळे मी सीए झालो. समाजात आणि सामाजिक कार्यात नेहमीच रस होता.
शरद पवारसाहेबांविषयी सांगायचं झालं तर... त्या वेळी शंकरराव कोल्हे महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री होते. मी त्या वेळी सारस्वत बँकेचा चेअरमन होतो. मी वयाच्या ३१-३२व्या वर्षी चेअरमन झालो होतो. (एक पॉज घेऊन) आतासुद्धा वयाने जास्त असून थोडा कमी वाटतो, त्या वेळी आणखी कमी वाटायचो. पवारसाहेबांनी साखर कारखान्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि डायरेक्टर्स यांचं एक संमेलन आयोजित केलं होतं. दत्त शिरोळ साखर कारखान्यात हे संमेलन होतं. आप्पासाहेब सा.रे. पाटील त्या कारखान्याचे चेअरमन होते. नरसोबाच्या वाडीला तो कार्यक्रम झाला. त्या वेळी शंकर कोल्हेसाहेब म्हणाले, ‘तू भाषण कर’. सहकार मंत्रीसाहेब म्हणत असल्याने मी भाषण केलं. पवारसाहेब बाजूला लोडावर बसले होते. अनेक लोक त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी कानगोष्टी करत होते. पण मी बोलताना पवारसाहेबांचे कान माझ्या भाषणाकडे लागले होते. भाषण झालं. मी स्टेजवरून खाली उतरलो आणि निघून गेलो. त्यानंतर पवारसाहेबांनी मोठेपण दाखवत मला ‘महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँके’त त्यांचा नॉमिनी म्हणून नेमलं. आमचे मित्र पृथ्वीराजजी तुम्हाला सांगतील की, त्या वेळी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजे ‘प्रतिसरकार’ असायचं. कलाप्पा अण्णा आवडे, रत्नाप्पा कुंभार आदी सगळी मोठी मंडळी त्याच्या बोर्डावर असायची. त्यामुळे पवारसाहेबांनी मला संधी देणं हा त्यांचा मोठेपणा होता. त्याच वेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचादेखील अध्यक्ष केलं होतं.
खांडेकर : पण आता बोलताना तुम्ही सांगितलंत की, सारस्वत बँक त्याही वेळेला खूप मोठी होती आणि जेमतेम तिशीमध्ये तुम्ही सारस्वत बँकेचे अध्यक्ष झालात. म्हणजे तुम्हाला राजकारण येत नव्हतं, असं तर म्हणता येणार नाही. नाहीतर इतक्या कमी वयात एवढ्या बँकेचा अध्यक्ष कसा कोणी होईल? आज तर तिशीमध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी लोक झटत असतात. तर इतक्या लहान वयामध्ये तुम्ही सारस्वत बँकेचे अध्यक्ष कसे झालात?
सुरेश प्रभू : तो खरंच एक मजेशीर प्रश्न आहे. रवींद्र पाटकर क्रिकेटवर लेख लिहायचे. माधव मंत्री त्या वेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष होते. रवींद्र पाटकर खारला राहायचे, मीही खारलाच राहायचो. एकदा त्यांनी मला सांगितलं, ‘मी सारस्वत बँकेच्या निवडणुकीला उभा राहणार आहे, तू मला मदत कर’. मी नुकताच सीए झालो होतो. मी त्यांना मदत केली. सगळीकडे जाऊन मतं गोळा केली. मग लक्षात आलं की, मतं दिली गेली, पण उमेदवार कोण आहे हे कोणी विचारलंच नाही! म्हटलं, ‘जर मी सांगून रवींद्र पाटकरांना मतं मिळवू शकतो, तर मी स्वतः का उभा राहू नये?’ पुढच्या निवडणुकीत मी उभा राहिलो. सुरुवातीला पराभव झाला, पण नंतर निवडून आलो. माधव मंत्री माझ्या वडिलांचे मित्र होते. डॉ. एस. पी. आडारकर म्हणून ‘मॉन्सेण्टो’चे अध्यक्ष होते, ते आमच्या बोर्डावर होते. प्रख्यात मॅनेजमेंट कंसल्टंट शरयू रांगणेकर, न्यू लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. पी. डब्ल्यू. रेगे, युडीसीटीचे संचालक डी. व्ही. रेगे ही सगळी मंडळी होती. या मंडळींना का कोण जाणे असं वाटलं की, याला आपल्या पॅनलमध्ये घेतलं पाहिजे. म्हणून मला त्यांनी त्यांच्या पॅनलमध्ये घेतलं. कॉपरेटिव्हमध्ये पॅनेलचं महत्त्व असतं. त्यामुळे मी खूप जास्त मतांनी निवडून आलो. पॅनेलवर निवडून गेल्यामुळे सामाजिक क्षेत्रात माझा वावर वाढला. कोणत्याही कार्यक्रमाला, सगळीकडे मला बोलवायचे. प्रॅक्टिस सोडता दुसरं काम असं नव्हतंच. त्यामुळे सामाजिक क्षेत्राशी जास्त संबंध आला. सारस्वत बँकेच्या बेळगाव, मराठवाडा, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा होत्या. त्यामुळे माझं फिरणं खूप वाढलं. मी सारस्वत बँकेचा अध्यक्ष झालो, हा खरोखरच योगायोग आहे. सुदैवाने ही बँक पुढे खूप मोठी झाली. मला त्याचा आनंद आहे.
खांडेकर : खरं तर राजकारणामध्ये अनेक मंत्री आणि राजकारणी असे असतात की, त्यांच्याबद्दल काही छोट्या-मोठ्या भानगडी झाल्या की, लगेच त्यांचे राजीनामे मागितले जातात. अनेकदा वर्तमानपत्रांत अग्रलेख लिहिले जातात. माझ्या आत्तापर्यंतच्या पत्रकारितेतील गेल्या ३०-३५ वर्षांमध्ये मी एकमेव उदाहरण पाहिलं आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी एका लहरीपणातून किंवा वेगळ्या विचारातून तुम्हाला खासदार केलं, केंद्रात मंत्री केलं आणि त्याच लहरीपणातून तुम्हाला मंत्रीपदावरून वगळावं असं अटलबिहारी वाजपेयींना सांगितलं. भारतातील प्रत्येक मोठ्या वर्तमानपत्रात तुम्हाला वगळल्याबद्दल हळहळ व्यक्त केली गेली. माझ्या मते असं भाग्य फार थोड्यांना लाभतं. वाजपेयींनाही त्या वेळी त्याचं फार दुःख झालं होतं. याचा परिणाम तुमच्या नंतरच्या घडण्यावर नक्कीच झाला असेल. आपल्याला का वगळण्यात आलं असेल, याचा तुम्हाला खूप त्रास झाला असेल. त्या विचारांचा सामना तुम्ही कसा केलात?
सुरेश प्रभू : आता मी त्याची पार्श्वभूमी सांगत नाही, थोडक्यात सांगतो. बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर लगेच मी अटलजींकडे गेलो. दुपारचा साधारण एक वाजला होता. अटलजींच्या पीएसने मला विचारलं, ‘काय काम आहे? एवढ्या अर्जंटली भेटायला का आलात?’ मी म्हटलं, ‘मी तुला सांगू शकत नाही, मला फक्त अटलजींना भेटायचं आहे.’ मी अटलजींना भेटायला गेलो. त्यांना पत्र दिलं. ते पत्र वाचून अटलजींनी बेल वाजवली आणि प्यूनला सांगितलं, ‘सूप आणा’. मी त्यांना म्हणालो, ‘सर, आय एम इन द सूप (मीच अडचणीत आहे) आणि तुम्ही मला सूप देताय?’ त्यावर अटलजी हसले आणि ते पत्र मला परत देत म्हणाले, ‘हे परत घेऊन जा. याचा काही संबंध नाही’. त्यांनी राजीनामा स्वीकारला नाही. अटलजींनी जवळजवळ दोन आठवडे माझा राजीनामा स्वीकारला नाही. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यावर लिहिलं गेलं. त्या काळात मी कोणालाही भेटलो नव्हतो. राजीनामा दिला होता, पण स्वीकारला गेला नव्हता.
या मधल्या काळातली बाळासाहेबांची एक वेगळीच मजा सांगतो. बाळासाहेब मला म्हणाले, ‘मला माहीत नव्हतं की, तुम्ही एवढं काम केलंय. तुमचं काम आता मला कळतंय. तुम्ही कधी सांगत नव्हतात’. बाळासाहेबांनी पुढे सांगितलं, ‘अटलजींचा तुमच्यावर एवढा विश्वास आहे, हे मला माहीत नव्हतं. कारण हे सरकार शिवसेनेच्या पाठिंब्यावर आहे, तरीसुद्धा त्यांनी तुमचा राजीनामा स्वीकारला नाही. त्यामुळे तुम्ही मंत्रीपदावर राहा.’ पण मी त्यांना सांगितलं, ‘नाही साहेब, आता मी राहणार नाही. कारण तुम्हीच सांगितलं होतं. तुम्ही मला मंत्री केलं, तेव्हा विचारलं नव्हतं. आता तुम्ही सांगितलं म्हणून मी राजीनामा दिला. तुम्ही जो निर्णय घेतला, तो तुमचा निर्णय आहे. मी त्याचा आदर करतो.’
मनावर परिणाम नक्कीच झाला. त्यानंतर मी असा विचार केला की, आता आपण पुन्हा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस सुरू करावी, पण याच दरम्यान बाळासाहेबांनी मला परत बोलावलं आणि म्हणाले, ‘तू एकदा निवडणुकीला उभा रहा’. मी उभा राहिलो आणि निवडूनही आलो. या घटनेचा परिणाम असा झाला की, मला राजकारणातली अनिश्चितता समजली. अर्ध्या तासापूर्वी मी केंद्रात ऊर्जा मंत्री होतो आणि अर्ध्या तासानंतर मी काहीच नव्हतो. तेव्हा मी स्वत:ला म्हणालो ‘ऊर्जा (शक्ती)ही गेली आणि मंत्रीपदही गेलं’.
खांडेकर : पण त्या वेळी तुमची सीए प्रॅक्टिस थांबलेली होती. मग मंत्रीपद गेल्यावर घराची जबाबदारी कशी सांभाळली? उमावहिनींच्या पत्रकारितेवर तुमचा संसार चालला?
सुरेश प्रभू : त्या काळात (माझी पत्नी) उमा ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये काम करत होती. माझं मंत्रीपद गेल्यावर तिनेच संसार सांभाळला. खरंच तिचं खूप मोठं योगदान आहे. तिने कधीही तक्रार केली नाही. किंबहुना माझ्यासारख्या नवऱ्याला एवढी वर्षं सांभाळलं हेच तिच्या मोठेपणाचं उदाहरण आहे.
त्याच काळात मला जर्मनीकडून एक बोलावणं आलं. तिथं मला ‘क्लायमेट चेंज’वर पीएच.डी. करण्याची संधी मिळाली. त्याच दरम्यान पुन्हा अटलजींचा फोन आला. ‘पुन्हा फोन’ हा प्रकार माझ्या आयुष्यात वारंवार घडला आहे. राजीनामा देण्यासाठी फोन, मंत्री करण्यासाठी फोन! – तर अटलजींनी मला बोलावलं आणि म्हणाले, ‘सब छोड दो, पीएच.डी. बाद में करना. माघारी वापस ये’. अटलजींच्या सांगण्यावरून मी परत आलो. मला नदी जोडणी प्रकल्पाचा अध्यक्ष केलं गेलं.
खांडेकर : पण नंतर असं झालं की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्या वेळी तुम्ही त्यांच्या मंत्रीमंडळात होतात. मोदीजी पंतप्रधान होण्याच्या आधीपासून तुमचे आणि त्यांचे फार जवळचे संबंध आहेत. तुम्ही रेल्वेमंत्री म्हणूनही उत्तम कामगिरी केलीत. मला आठवतंय की, त्या काळात लोकांनी ट्वीट केलं की, ‘आम्ही प्रवास करत आहोत, आमच्यासोबत छोटं बाळ आहे आणि त्याला दूध मिळत नाहीये’, तर पुढच्या स्टेशनवर कोणीतरी दूध घेऊन यायचं. रेल्वे खात्यानं कार्यक्षमतेचा जो परमोच्च बिंदू गाठला गेला, तो उल्लेखनीय होता. पण नंतर एक अपघात झाला आणि तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तुम्ही राजीनामा दिल्यानं अपघात होण्याचं काही थांबत नाहीये आणि तुमच्या नंतर राजीनामा देण्याचा कोणी विचारही करताना दिसत नाहीये. मग तुम्हाला असा राजीनामा द्यावा असं का वाटलं? अपघात तर होतच असतात.
सुरेश प्रभू : खरं म्हणजे हा एक कठीण निर्णय होता. मोदीजींनी मला हा प्रश्न विचारला होता, जेव्हा मी त्यांच्याकडे राजीनामा घेऊन गेलो होतो. त्यांनी तो परत दिला होता. मात्र त्या वेळी मला असं वाटत होतं की, एखादा माणूस अपघातात मरण पावतो, तेव्हा मी कुठेतरी जबाबदार आहे, असं वाटत राहायचं. माझी पत्नी उमा सांगेल तुम्हाला, त्या दिवशी आम्ही जेवणही केलं नव्हतं. दोन-तीन दिवस तरी आम्हाला जेवणच जात नव्हतं. मला सतत वाटत राहायचं की, काहीतरी चुकीचं आपल्या हातून घडलंय. म्हणून मग शेवटी वाटलं की, आपण काही करू शकत नाही, तर निदान मी बाजूला तरी होतो. मोदीजींनी मला तोच प्रश्न विचारला, त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही. उलट त्यांनी मला सांगितलं की, ‘जा आणि सोशल मीडियावर सांग की, तू राजीनामा दिला होतास आणि मी स्वीकारला नाही’. मी पत्रकार परिषद घेतली नाही, पण ट्विटरवर ते मी टाकलं होतं. नंतर काही काळातच मोदीजींनी मंत्रिमंडळात बदल करून मला कॉमर्स इंडस्ट्री हे मंत्रालय दिलं. नंतर एकदा त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, ‘तू एकदा ट्रान्सपोर्ट सोडलं होतं, म्हणून तुला उड्डयन मंत्री करतो.’ आणि तेसुद्धा केलं.
राजीनामा देऊन अपघात थांबत नाहीत हे खरं आहे, पण त्याच वेळी मला असं वाटलं की, कुठेतरी आपण नैतिक जबाबदारी घ्यायला हवी. ही माझी वैयक्तिक भावना होती. कदाचित ती चूक असेल, माझा कमकुवतपणा असेल. मला स्वतःला असं वाटलं की, आपण जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे मी राजीनामा दिला.
बर्दापूरकर : तुम्ही भाजपत न जाता भाजपचे मंत्री झालात. शिवसेनेचे अधिकृत सदस्य नसताना शिवसेनेचे खासदार झालात, केंद्रामध्ये मंत्री झालात, हे कसं काय जमलं?
सुरेश प्रभू : मोदीसाहेब आणि माझे संबंध जवळजवळ १९९८ सालापासूनचे आहेत. ते मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या नियमित चर्चा होत असत. मी २०१४ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मोदीजींनी मला त्यांच्या पंतप्रधान कार्यालयात कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन बसवलं होतं. मी तिकडे बसून जी-२०, जी-७ या घडामोडी बघत होतो. नंतर त्यांनी मला रेल्वे मंत्री करायचं ठरवलं. त्या वेळी खासदार असणं आवश्यक होतं, त्यामुळे त्यांनी मला विचारलं की, ‘तू शिवसेनेत आहेस का?’ मी सांगितलं, ‘होय, मी शिवसेनेत आहे’. त्या वेळी नीलम ताई उपनेत्या होत्या आणि मी शिवसेनेचा उपनेता होतो. तेव्हा मोदीजींनी शिवसेनेला निरोप पाठवला की, ‘त्याला (मला) शिवसेनेतून खासदार करा, आम्ही त्याला मंत्री करतो’. त्या वेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं सरकार अजून झालं नव्हतं. नोव्हेंबर २०१४ची गोष्ट. त्यामुळे ते झालं नाही. हा खरं म्हणजे, मोदीजींचा मोठेपणा होता. त्या वेळी भाजपचे लोकसभा आणि राज्यसभेत मिळून ३५० खासदार होते. त्यामुळे मला मंत्री करणं, हे काही सोपं नव्हतं. मी त्यांच्यासाठी काही विशेष नव्हतो, पण त्यांनी मला मंत्री केलं, हा त्यांचा मोठेपणा आहे.
बर्दापूरकर : आता सध्या तुम्ही कोणत्या पक्षात आहात?
सुरेश प्रभू : मी भाजपमध्येच आहे. मी पक्षात असूनही सक्रिय राजकारणात नाही. मला वाटलं होतं की, एकदा मंत्रीपद गेलं की, सगळं कमी होईल, पण प्रत्यक्षात मी सध्या जास्त बिझी आहे.
बर्दापूरकर : हो, तुमचे दररोजचे कार्यक्रम बघतो मी.
सुरेश प्रभू : रोज कुठे ना कुठेतरी कार्यक्रमाला जातच असतो. त्यामुळे नेमका कुठे आहे, हे सांगणं कठीण आहे. कालच कुंभमेळ्यात होतो. शिवाय मी एका विद्यापीठाचा चान्सलर आहे. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये मी व्हिजिटिंग प्रोफेसर आहे. सध्या मी जवळजवळ १६ जागतिक संस्थांशी निगडीत आहे. त्यामुळे मी विविध कामांत व्यग्र आहे. पण भाजपमध्येच आहे आणि भाजपमध्येच राहणार.
बर्दापूरकर : नरेंद्र मोदी हे मनाने फार मोठे आहेत, हे सांगणारं कुणीतरी फार दिवसांनी भेटलं, हे या कार्यक्रमाचं फार मोठं यश समजायला हवं...
सुरेश प्रभू : राजकारण बाजूला राहू द्या. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, नरेंद्र मोदी हे मोठे नेते आहेत. ते २४ तास काम करतात, ही अतिशयोक्ती होईल, पण बहुतांश वेळ ते काम करत असतात. त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती असते. त्यांना देशात आणि जगात काय चालतं, याची पूर्ण कल्पना असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या विषयांवरही ते अनेकांशी संवाद साधतात. शिवाय राजकीय नेता म्हणून देशात सर्व ठिकाणी जाऊन प्रचार करतात. सतत नवीन-नवीन कल्पना राबवतात. मी ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला सांगतो, ‘नरेंद्र मोदी हे आधुनिक काळातील सर्वांत मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
खांडेकर : तुम्ही सांगितलं की, तुम्ही एका विद्यापीठाचे कुलपती आहात, ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्येही काम करत आहात. आणखीन सध्या तुमचं काय काय सुरू आहे? तुम्ही सतत या ना त्या देशात फिरत असता, ते कशासाठी?
सुरेश प्रभू : मी अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये काम करतो. मी जी-२०चा शेर्पा होतो. जी-२०मध्ये मीच सर्वांत जास्त काळ मोदींच्या सरकारमध्ये काम पाहिलं होतं, पण आता नाही. मी अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतो. मी पाणी, पर्यावरण, क्लायमेट चेंज, इकॉनॉमी, गव्हर्नन्स, ट्रान्सपोर्टेशन अशा अनेक विषयांवर काम करतो. आर्थिक विषयांशी संबंधित अनेक विषयांवर माझं काम सुरू आहे. त्यामुळे मी जगभरातल्या अनेक संस्थांशी निगडित आहे.
मला सगळं कळतं, असा काहीतरी लोकांचा गैरसमज आहे. त्यामुळे ते मला उगीच आपलं ‘मिसइन्फॉर्मेशन’च्या आधारावर बोलवत असतात. भाषण करायला जातो आणि त्यांनाही बोअर करतो. जसं आता, इथं तुम्हाला मघापासून बोअर करतोय. तर हे चालूच असतं!
खांडेकर : तुमचा विनयी पुरे, आता या टप्प्यावर असं बोलायची तुम्हाला काहीही आवश्यकता नाही. तुमचा मोठेपणा आम्हाला मान्यच आहे. तुमचं अभ्यासूपण, तुमचं वेगवेगळ्या विषयांमधलं ज्ञान हे वाखाणण्याजोगं आहे. मी नेहमी सांगतो की, माझ्या इतक्या वर्षांच्या पत्रकारितेच्या अनुभवात दोन माणसं अशी आहेत की, ज्यांच्याशी आपण कोणत्याही विषयावर बोललो, तरी त्या विषयातलं लेटेस्ट काय आहे, हे त्यांच्याकडून आपल्याला समजतं. त्यापैकी एक तुम्ही आहात आणि दुसरे पृथ्वीराज चव्हाण आहेत…
सुरेश प्रभू : (विनम्रपणे) धन्यवाद. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. माझ्या सगळ्यात मोठ्या अॅडव्हांटेज म्हणजे मला विविध लोकांना भेटण्याची संधी मिळते. त्यांच्याकडून शिकता येतं. आपल्याकडे पूर्वीही म्हणायचे ना, केल्याने देशाटन! त्याचं खरं महत्त्व काय असतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. उदाहरणार्थ, मी एका थिंक टँकचा फाउंडर आहे. त्याचं नाव आहे ‘काउन्सिल फॉर एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर’ (सीईईडब्ल्यू). आज त्यात जवळजवळ ४०० रिसर्चर काम करतात. या संस्थेत एन्व्हायर्नमेंट, एनर्जी आणि पाण्यावर काम होतं. या तीनही गोष्टींचं एकत्रित अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण एकच विषय स्वतंत्रपणे अभ्यासला, तर प्रश्न सुटणार नाही. म्हणून त्या संस्थेचा मी पाया घातला.
या सगळ्या गोष्टींमधून खूप वेगळा अनुभव मिळाला. जी माणसं भेटली, त्यांच्याकडून जे काही शिकता आलं, त्याचा खूप मोठा फायदा झाला. आय एम व्हेरी व्हेरी ब्लेस्ड!
शब्दांकन - द पीआर टाइम्स, नागपूर
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment