अजूनकाही
हजारो वर्षांपूर्वी मानवाला शेपूट होत म्हणे! पण मानवाने त्याचा वापर न केल्यामुळे ते गळून पडलं असं म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरातल्या एखाद्या अवयवाचा वापर कमी झाला किंवा केला गेला नाही, तर त्याच्या क्षमता कमी होत जाऊन तो नष्ट होतो.
आजघडीला तर आपण आपल्या कित्येक अवयवांचा वापर करणं बंद केलं आहे. त्यामध्ये मुख्यतः आपल्या ज्ञानेंद्रियांचा समावेश होतो.
२५-३० वर्षांपूवी आपण अनेक फोन नंबर, बँकेचा अकाऊंट नंबर सहजपणे सांगू शकायचो, कारण ते आपल्या मेंदूमध्ये साठवलेले असायचे. वाचनाची आवड असलेल्या अनेक जणांनी रात्री हातात घेतलेले पुस्तक पहाटे संपवणे हा अनुभव घेतला असेलच. एखाद्या संगीत मैफिलीत सगळे श्रोते शांतपणे संगीताचा आस्वाद घेत असत. त्या वेळी चित्रपटांची लांबी किमान तीन तासांची असे. म्हणजे तेव्हा आपण आपले डोळे, कान या ज्ञानेद्रियांचा पुरेपूर वापर करत होतो.
आपण जसजसे ‘स्मार्ट’ होत गेलो, तसतशा या आपल्या क्षमता कमी होत चालल्या आहेत की काय, अशी शंका उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती आहे. स्मार्ट फोन्सच्या रूपाने आज आपल्या हातात छोटासा संगणकच आला आहे. अगदी लहानसहान गोष्टींसाठी आपण त्याचा उपयोग करू लागलो आहोत. माणसाचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून, या तंत्रज्ञानाचा शोध लागला, पण त्याने आज आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण केल्या आहेत.
व्यसनाधीनता हे या तंत्रज्ञानाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या तंत्रज्ञानाचं पटकन व्यसन लागतं आणि मग हळूहळू आपला विसराळूपणा वाढायला लागतो. अगदी आपल्या घरातील, जवळच्या व्यक्तीचा फोननंबर विचारला, तरी तो आपल्याला सांगता येत नाही. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलफोनमध्ये डोकावतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नुकताच ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’ने ‘Brain Rot’ हा शब्द २०२४ या सालातील ‘Word of the Year’ जाहीर केला. ‘Brain Rot’ या शब्दाची व्याख्या आहे- "Brain rot" refers to the perceived cognitive decline or mental fatigue resulting from excessive exposure to low-quality or addictive online content, particularly on social media platforms.
आज सोशल मीडियावरील फारसे निर्मितीमूल्य नसलेल्या आणि अतिशय addictive अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या मेंदूवर गंज चढत चालला आहे. त्याच्या क्षमता कमी होत चालल्या आहेत. आपली एकाग्रता नष्ट होत चालली आहे.
नुकतीच जगप्रसिद्ध लेखक युव्हाल नोआ हरारी यांची एक मुलाखत माझ्या पाहण्यात आली. त्यातलं एक वाक्य मला फार आवडलं. आज आपण सोशल मिडियामुळे सतत उत्तेजित अवस्थेत राहत आहोत. या अवस्थेमुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामाईनसारखी उत्तेजित करणारी रसायनं स्त्रवत राहतात. यामुळे हे डोपामाईन स्त्रवत ठेवण्याचा ताण मेंदूवर येतो आणि मेंदू थकून जातो. आपल्याला उत्तेजित करणाऱ्या गोष्टींमध्ये काय बघायचे आहे, हे निवड करण्याच्या पर्याय आपल्यासमोर नाहीत, कारण आज जे काही आपल्यासमोर येत आहे, ते एका algorithmद्वारे ठरवलं जात आहे. हरारी म्हणतो की, कंटाळा येणे ही खरं तर मानवाला मिळालेली देणगीच म्हणावी लागेल. सततच्या उत्तेजित अवस्थेमध्ये राहण्यापेक्षा मध्ये मध्ये कंटाळा येणे आवश्यक आहे.
छायाचित्रांचा आणि चलतचित्रांचा लोंढा हा आणखी एक वेगळा विषय. कुठलीही गोष्ट डोळ्यांनी बघण्यापेक्षा त्याची छायाचित्रं काढण्यात आपण मश्गूल आहोत. एखाद्या पर्यटनस्थळी, सार्वजनिक कार्यक्रमात, लग्न समारंभात, गाण्याच्या मैफलीत आणि हॉटेलमध्येही काय दिसते? तर प्रत्येक जण खिशातील मोबाईल काढून छायाचित्र वा चलतचित्र काढत आहे. निसर्गसौंदर्य डोळ्यांनी बघायचं असतं, मैफलीतलं गाणं कानांनी ऐकायचं असतं, हे आपण विसरतच चाललो आहोत.
मध्यंतरी मी एका मोठ्या शास्त्रीय गायकाच्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट अंतर्मुख करून गेली. ते म्हणाले, आजच्या जमान्यात ऐकणं कमी होत चाललं आहे. ऑडिओचा जमाना जाऊन व्हिडिओचा जमाना आला आहे. गाणं ऐकायचं असतं, हे विसरून लोक त्याचे व्हिडिओ करण्यात, नाहीतर युट्यूबवर बघण्यात रंगून गेली आहेत.
भटकंती हा माझा छंद. पूर्वी कुठे भटकायला गेलो की, मी डिजिटल कॅमेऱ्याने फटाफट छायाचित्रं काढायचो. एका दिवसात सुमारे ४००-५०० छायाचित्रं काढली जायची. आजूबाजूचा निसर्ग मी कॅमेऱ्याच्या लेन्समधूनच बघायचो. त्यातून भानावर आणलं ते माझ्या मित्रानं सांगितलेल्या एका प्रसंगानं. देविदास बागुल यांच्या जीवनातील हा प्रसंग. एक दिवस ते राजू देशपांडेंच्या स्टुडिओत आले आणि ‘आजपासून मी छायाचित्र काढणं सोडून दिलं आहे’ असं जाहीर केलं. मग त्यांनी घडलेली घटना राजूला सांगितली… तर त्या दिवशी रस्त्यातून जाताना बागुलांना एक फुलांनी बहरलेलं एक मोठं झाड दिसलं. ते क्षणभर थबकले. दोन मिनिटांनी त्यांनी आपल्या बॅगेतला कॅमेरा काढला आणि त्या झाडाची छायाचित्र काढली. मात्र त्यांना एकदम जाणीव झाली की, इतक्या सुंदर झाडाचं सौंदर्य डोळ्यानं प्रत्यक्ष बघण्याचा आनंद न घेता आपण त्याचं छायाचित्र काढलं. त्यानंतर त्यांनी छायाचित्रण हा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय बंद केला.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
एखादा पदार्थ खाण्याअगोदर डोळ्यांनी बघणं, नाकानं त्याचा सुवास घेणं आणि शेवटी जिभेनं त्याची चव घेणं, या प्रक्रिया घडतात. एखादा पदार्थ करताना, फोडणी देताना, तळताना होणारा आवाज आणि खाताना होणारा आवाज आपण कानांनी ऐकत असतो. तसंच खाताना आपली जीभ त्या पदार्थाच्या चवीबरोबरच त्याचं textureपण अनुभवत असतं. या सगळ्या क्रियांमुळे आपली पाचनक्रिया उद्दिपित होते. पण आपण हे सगळं सोडून त्याची छायाचित्रं काढणं आणि ती सोशल मिडियावर टाकणं, हेच करू लागलो आहोत..
नुकतीच एक बातमी वाचनात आली. अलका याज्ञिक या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रख्यात गायिकेला बहिरेपण आलं. कानात सतत इअरफोन लावून कानांवर अतिरिक्त ताण आल्यानं त्यांना बहिरेपणा आला. अशी कित्येक उदाहरणं देता येतील.
सलग वाचन करण्याची आपली क्षमता कमी होत चालली आहे. पुस्तक वाचताना दर १० मिनिटांनी आपण आपला मोबाईल पाहतो. एखादं पुस्तक एका रात्रीत वाचून संपवणं, हा अनुभव आपण काही दिवसांपूर्वी कित्येक वेळा घेतला असेल. आता मात्र या आनंददायी अनुभवाला आपण मुकत चाललो आहोत. नाटक, सिनेमा बघताना, एखादं व्याख्यान ऐकताना आपल्या आजूबाजूला कित्येक महाभाग मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले दिसतात!
अशा अनेक गोष्टींमुळे आपल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमता कमी होत चालल्या आहेत. आता आपल्यासमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोका उभा ठाकला आहे. त्याचा वापर करून आपण अनेक कामं सहजपणे करू शकू, पण त्यामुळे आपली विचार करण्याची किंवा कुठलीही नवनिर्मिती करण्याची क्षमताही आपण घालवून तर बसणार नाही ना, हा मोठा प्रश्न आहे. अर्थात ते येणारा काळच ठरवेल.
एखादी गोष्ट न वापरल्यानं किंवा कमी वापरल्यानं ती नष्ट होण्याकडे वाटचाल चालू होते. जसं आपल्या शेपटाचं झालं. शेपूट नसल्यामुळे काय तोटे झाले माहीत नाही, पण ज्ञानेंद्रियं नष्ट होण्यामुळे मात्र आपण नक्की पशुपातळीवर पोहचू. सर्व प्राणिमात्रांमध्ये माणूस हा बुद्धिवान प्राणी समजला जातो, पण आपण तर सध्या आपल्या बुद्धीच्या जोरावर आपल्याच अनेक क्षमता नष्ट करत चाललो आहोत.
हे मानवजातीसाठी अतिशय भयावह असेल, नाही का?
.................................................................................................................................................................
लेखक कौस्तुभ मुदगल डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराविषयी समाजात जागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
creating.awareness06@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment