अजूनकाही
मॅगेस्थेनिसपासून वास्को द गामापर्यंत आणि पोर्तुगीजांपासून ब्रिटिशांपर्यंत भारतात आलेल्या परदेशी प्रवाश्यांनी त्यांना दिसलेला भारत टिपून ठेवला आहे. त्याची ओळख करून देणारा ‘पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान’ हा द्विखंडी ग्रंथराज सुनंदा भोसेकर यांनी लिहिला आहे. ग्रंथालीतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या ग्रंथाला लेखिकेने लिहिलेल्या प्रास्ताविकांचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
मुंबईत फोर्ट ऑफिसला असताना अधूनमधून दुपारी जेवण लवकर आटोपून ‘स्ट्रॅन्ड बुक स्टॉल’मध्ये फेरी मारायचा माझा शिरस्ता होता. अशाच एका फेरीत, दुपारी समोर ‘अल्बेरूनीज् इंडिया’ हे जाडजूड पुस्तक दिसले. अशा पुस्तकाची मी कल्पनाच केली नव्हती. उभ्याउभ्याच पुस्तक चाळायला सुरुवात केली. बराच वेळ झाला असावा. स्ट्रॅन्डचे मालक श्री. शानबाग यांनी खुर्ची सरकवली आणि जाणीव झाली की लंचटाईम संपत आला आहे. पुस्तक ठेवून मी घाईघाईने निघाले. संध्याकाळी जाऊन ते विकत घेतले.
यानंतर स्ट्रॅन्डमध्येच युआन च्वांगच्या (ह्यू एन त्संग) ‘रेकॉर्ड ऑफ वेस्टर्न कन्ट्रीज ऑफ द ग्रेट तांग पिरियड’ म्हणजे ‘महान तांग राजवंशाच्या काळात पश्चिमेकडच्या देशांच्या प्रवासाचे वर्णन’ मिळाले. स्ट्रॅन्डच्याच बाई सुंदराबाई हॉलमधल्या वार्षिक पुस्तक जत्रेत ‘लाईफ ऑफ ह्यू एन त्संग’ हे त्याचा शिष्य ह्यू ली याने लिहिलेले चरित्र मिळाले. त्यानंतरच्या वर्षी मार्को पोलोच्या रोमहर्षक प्रवासवर्णनाचे सर हेन्री यूल यांनी केलेले भाषांतर मिळाले.
फोर्टमधल्या एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाच्या शेजारीच ऑफिस असल्यामुळे तिथूनही इतर पुस्तकांबरोबर प्रवासवर्णने मिळत होती. काही पुस्तके इंटरनेट अर्काइव्हज्वर तर काही ‘फरगॉटन बुक्स डॉट कॉम’ या साईटवर मिळाली. इतर पुस्तकांबरोबर काही जमत गेली, काही डाऊनलोड केली, तर काही लायब्ररीतून आणून वाचली. एकंदरीने, मला प्रवासवर्णने वाचायला आवडतात, त्यात परकीयांच्या नजरेला भारत कसा दिसला याचा शोध घेण्याचा मग नाद लागला.
ज्येष्ठ पत्रकार आणि आमचा मित्र आल्हाद गोडबोले, दैनिक ‘प्रहार’चा संपादक असताना २०११मध्ये ‘प्रहार’च्या रविवार पुरवणीत मी एखादे सदर लिहावे असे त्याने सुचवले. तेव्हा माझ्यासमोर आणखीही एकदोन विषय होते, पण ‘परदेशी प्रवाशांच्या प्रवासवृत्तांतांविषयीचे लेख’ हा विषय थोडा वेगळा असल्यामुळे तोच निश्चित केला. मग कालानुक्रमे प्रवाशांची यादी बनवली. काही नजरेतून सुटलेली पुस्तके गोळा केली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या मालिकेत अठरा संक्षिप्त लेख लिहून झाले. वर्तमानपत्राच्या मानाने संपादकांनी दिलेली जागा भरपूर होती. तरीही असे वाटले की अधिक विस्तृत लेख लिहायला हवेत. यातली अगदी दोन-तीन प्रवासवर्णनेच त्रोटक आहेत, बाकीची सगळीच किमान पाचसातशे पानांची आहेत. वर्तमानपत्रात लेख लिहिताना अनेक महत्त्वाच्या प्रसंगांचा, निरीक्षणांचा उल्लेख राहून गेला होता. तेव्हा विस्तृत लेख लिहून एका पुस्तकात एकत्रित करावेत असा विचार केला.
भारतात आलेल्या प्रवाशांपैकी ज्याचे प्रवासवर्णन काही तुकड्यांनी का होईना पण उपलब्ध आहे, असा पहिला प्रवासी म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळात आलेला मॅगेस्थेनिस. त्याच्यापासून सुरुवात करून इंग्रजांनी मुंबई ताब्यात घेतल्यावर आलेला पहिला प्रवासी डॉ. जॉन फ्रायर याच्यापर्यंत येऊन थांबावे, म्हणजे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतच्या काळात आलेल्या ठळक प्रवाशांच्या प्रवासवर्णनांची नोंद घेतली जाईल आणि त्याचबरोबर सोळाशे-सतराशे वर्षांच्या काळातल्या भारताचेही चित्र उभे राहील, असा आराखडा ठरवला.
गेली काही वर्षे मी या प्रकल्पावर काम करत होते. अर्थात एकटाकी नाही, इतर सर्व व्यवधाने सांभाळून बाजूबाजूने हे काम होत होते. काम संपवण्याची काही निश्चित तारीख मनात नसल्यामुळे काम निवांतपणे चालले होते. अनेकदा मनात विचार यायचा की, हे काम कशासाठी करते आहे? माझ्यापुरते मी उत्तर ठरवले की, आपल्याला जे आवडले आहे ते इतरांना सांगावे असे वाटणे साहजिकच आहे. आणि आपल्याच इतिहासाबद्दल काही धारणा स्पष्ट झाल्या तर चांगलेच.
हे आधीच स्पष्ट करायला हवे की, हा इतिहास नाही. इतिहासाचे एक साधन आहे. या, एका विशिष्ट काळात प्रवास करणाऱ्या माणसांच्या वैयक्तिक प्रतिक्रिया आहेत. त्यांनी गोळा केलेली माहिती आहे. प्रत्येक वेळी ती वस्तुनिष्ठपणे दिलेली असेल असे नाही. माहिती घेणाऱ्याला ती समजली असेल, असेही नाही. समोर दिसणाऱ्या घटितांच्या मागचे पुढचे सांस्कृतिक, राजकीय संदर्भ माहीत नसतील, तर त्या माहितीचे विश्लेषण चुकीचे असू शकते. माहिती देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे पूर्वग्रह त्यात मिसळलेले असू शकतात. सुरुवातीचे पोर्तुगीज प्रवासी, भारतीयांच्या त्रिमूर्तीला ख्रिश्चन धर्मातली ‘होली ट्रिनीटी’ समजत होते, तर पोर्तुगीजांच्या मदर मेरीला त्यांच्या देवीची प्रतिमा समजून भारतीय लोक तिची पूजाअर्चा करत होते. बौद्ध भिक्षू असलेल्या चिनी प्रवाशांना सर्व भारतीय शाकाहारीच असतात, असे वाटत होते.
त्यांच्यासाठी ही पवित्र धर्मभूमी होती. इथले आचार-विचार योग्य आहेत असे वाटून ते मोठ्या उत्साहाने ते आत्मसात करत होते. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकात भारतात आलेल्या चिनी बौद्ध यात्रेकरूंनी जे काही सभोवताली पाहिले, ऐकले त्याची प्रामाणिकपणे सविस्तर नोंद करून ठेवली होती. चिनी यात्रेकरूंनी भारतातून नेलेल्या बौद्ध ग्रंथांची भाषांतरे केली होती. मुघलपूर्व इस्लामी आक्रमणांनंतर भारतातून नाहीसे झालेले काही धर्मग्रंथ या भाषांतरांवरून पुनर्भाषांतरित केले गेले.
माहिती गोळा करताना अमुक एका विषयाची माहिती गोळा करायची असे ठरवून येणारे प्रवासी विरळा आहेत. ते ज्या प्रांतातून फिरत होते, तिथला भूगोल, इतिहास, राजकीय, सामाजिक व्यवस्था, व्यापार, पीकपाणी, आर्थिक स्थिती, त्या प्रांतातले पशूपक्षी, वनस्पती यांचीही नोंद केलेली आढळते. त्यांना जे दिसले, अद्भुत किंवा चमत्कारिक वाटले, त्या गोष्टींची त्यांनी नोंद केली आहे.
उदाहरणार्थ, बहुतेक सगळ्यांनी माडाचे झाड आणि त्याचे उपयोग, फणसाचे झाड आणि फळ, घर सारवण्यासाठी शेणाचा उपयोग, गाय या प्राण्याला पवित्र मानणे आणि मुख्य म्हणजे हत्ती हा प्राणी, हत्ती पकडणे, माणसाळवणे, त्याचा लढाईतला उपयोग; इत्यादी बाबींविषयी लिहिले आहे.
जवळपास प्रत्येकाने सतीच्या चालीविषयी आणि सती जाण्याच्या प्रसंगांविषयी लिहिले आहे. यामुळे लेखांमध्येही पुनरुक्तीचा धोका आहेच. शक्य तिथे तो टाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच उद्देशाने एकाच काळात भारतात फिरणाऱ्या काही प्रवाशांची प्रवासवर्णने बाजूला ठेवावी लागली.
या प्रवाशांचे दृष्टिकोन, ज्या ठिकाणाहून, परिस्थितीतून ते आले होते ती पार्श्वभूमी वेगवेगळ्या प्रकारची होती. स्वत:च्या देशाच्या परिस्थितीशी ते भारतातल्या परिस्थितीची तुलना करत होते. त्यामुळे भारतात गुलामी नाही, असे मॅगेस्थेनिसला वाटले होते. या काळात भारतात स्थिरावत असलेल्या जातीव्यवस्थेचा प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता.
हा इतिहास नाही, तर इतिहासाचे साधन आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे काटेकोरपणे तारीख, वार यांची नोंद करून इतिहास लिहिण्याची भारतीयांमध्ये प्रथा नव्हती. त्यांचा इतिहास हा पुराणांमधल्या कथांमध्ये आणि बखरींमध्ये बंदिस्त होता. परदेशी प्रवाशांच्या प्रवासवर्णनांमध्ये उल्लेख असल्यामुळे कोणत्या काळात, कोणत्या प्रदेशावर, कोणत्या राजाचे राज्य होते, याचा बऱ्याच प्रमाणावर उलगडा झाला. ही प्रवासवर्णनं वाचताना अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या सरधोपट काळ्या-पांढऱ्या प्रतिमांमध्येही रंग भरले जातात. या प्रवासवर्णनांच्या आधारे आधुनिक काळात बऱ्याच ठिकाणी उत्खनन झाले. या अवशेषांच्या आधारेही भारतीय इतिहासाची संगती लावणे शक्य झाले.
यातली फक्त तीनच प्रवासवर्णने मुळात इग्लिशमधून लिहिलेली आहेत. इतर प्रवासवर्णने ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरेबिक आणि चिनी इत्यादी भाषांमध्ये होती. सतराव्या शतकापासून युरोपिय विद्वानांनी या भाषा शिकून घेऊन अतिशय कष्टाने या प्रवासवर्णनांची भाषांतरे केली. त्यांना स्पष्टीकरणात्मक टीपा लिहिल्या. काही प्रवासवर्णनांची एकापेक्षा अधिक भाषांतरेही उपलब्ध आहेत. जिथे शक्य झाले तिथे लेख लिहिताना या दुसऱ्या भाषांतरांचाही विचार केला आहे. मात्र प्रवासवर्णन आणि संपादकांच्या टीपा याच्याबाहेर जायचे नाही, याचे पथ्य पाळले आहे.
या लेखांपैकी फक्त वास्को द गामाचे प्रवासवर्णन त्याने स्वतः लिहिलेले नाही. त्याच्याबरोबर त्याच्या पहिल्या मोहिमेत सामील असणाऱ्या एका धर्मापदेशकाने लिहिलेल्या डायरीच्या आणि पोर्तुगीज दप्तरात उपलब्ध असलेल्या इतर माहितीच्या आधारे ते जास्पर कोरिआ नावाच्या पोर्तुगीज अधिकाऱ्याने लिहिले आहे. याखेरीज गार्सिआ डी ओर्ता हा रूढ अर्थाने प्रवासी नव्हता. हा पोर्तुगीज डॉक्टर सुरुवातीला पोर्तुगीज सैन्याच्या मोहिमांमध्ये सामील होऊन गोव्यात स्थायिक झाला होता. त्याने आपला वृत्तांत एका काल्पनिक संवादाच्या रूपात लिहिला आहे.
बाकी सर्व प्रवासवर्णने प्रथमपुरुषी आहेत. फक्त एक अफानासी निकितिन हा रशियन प्रवासी सोडला, तर बहुतेकांनी आपले वृत्तांत प्रवास संपल्यानंतर, प्रवासादरम्यान लिहिलेल्या नोंदींच्या आधारे किंवा स्मरणशक्तीच्या आधारे लिहिले आहेत. निकितिनने प्रवास करत असतानाच हकीकत लिहिली आहे. प्रवास संपल्यानंतर काही काळाने लिहिलेल्या प्रवासवर्णनांमध्ये आठवणी धूसर झाल्यामुळे तपशीलाचे घोटाळे होतात किंवा नंतर मिळालेल्या माहितीमुळे प्रत्यक्ष घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो, त्यात घटनेबाहेरची माहिती जोडली जाते.
संपादन करणाऱ्यांपैकी किमान काही जणांचा दृष्टिकोन साम्राज्यवादी आणि ख्रिश्चन श्रेष्ठत्वाचा गंड बाळगणारा होता. मूळ लेखकाच्या ज्ञानाविषयी शंका असल्यामुळे किंवा त्याने काही जागा रिकाम्या सोडल्या आहेत त्या भरून काढणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटून काही संपादकांनी मजकुरात फेरफार केले. अश्लील वाटणारा भाग वगळला. छापणारे जुळारीही या पापात सहभागी असतात. परक्या भाषेतला शब्द समजला नाही, तर त्यांनी आपल्या मनचे शब्द घातले. हे सर्व दोष किरकोळ प्रमाणात आहेत. ते असले तरी या सगळ्यांनी मेहनत करून आपल्याच नव्हे, तर आशिया आणि आफ्रिकेच्या इतिहासातील गाळलेल्या जागा भरून काढायला मदत केली हे त्यांचे उपकारच आहेत.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. इ.स. १५२४ मध्ये वास्को द गामाचे कोच्ची येथे निधन झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी १५२६मध्ये बाबराने दिल्लीवर कब्जा केला.
दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे. या काळात इंग्रज, इटालियन, फ्रेंच, डच असे अनेक प्रवासी भारतात फिरत होते आणि त्यांची प्रवासवर्णने उपलब्ध आहेत. मात्र इथे काही ठळक प्रवाशांच्या वृत्तांतांची दखल घेतली आहे. बहुतेकांच्या वृत्तांतांमध्ये समान घटनांचे वर्णन येते. त्यामुळे सरसकट सर्व प्रवासवर्णनांचा पुस्तकात समावेश केलेला नाही. या आधीही म्हटल्याप्रमाणे हा इतिहास नाही, तर इतिहासाचे केवळ एक साधन आहे. एका विशिष्ट काळात प्रवास करणाऱ्या माणसांच्या वैयक्तिक प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी त्या वस्तुनिष्ठपणे दिलेल्या असतील असे नाही.
सोळाव्या शतकात भारताविषयी युरोपियनांच्या मनात कुतूहल होते. भारताच्या श्रीमंतीचे आकर्षण, तिथल्या अद्भुतरम्य वास्तव अथवा कल्पित कथांनी साहसवीरांच्या शौर्याला, कल्पनाशक्तीला भुरळ घातली होती. युरोप आणि दक्षिण आशियामध्ये समुद्रमार्गे थेट दळणवळणाची सोय झाल्याने व्यापारी, राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता दृढ झाली होती. त्यामुळेच क्रॉमवेलविरुद्धच्या लढ्यात बादशहा शहाजहान याची मदत मागायला येणारा हेन्री बार्ड आपल्याला मनुचीच्या हकीकतीत भेटतो.
हा दुसरा खंड कुन्नूर इथल्या पोर्तुगीज वखारीतल्या द्युआर्त बार्बोझा या अधिकाऱ्याच्या प्रवासवर्णनापासून सुरुवात करून ईस्ट इंडिया कंपनीत सर्जन म्हणून रुजू झालेल्या जॉन फ्रायर याच्या प्रवासवर्णनापर्यंत येऊन थांबतो. वास्को द गामामुळे जसा पोर्तुगीजांचा भारतात प्रवेश झाला तसेच मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात आल्यामुळे इंग्रजांचा पाय भारतात स्थिरावला. ही भारताच्या आणि जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना होतीच. जॉन फ्रायरच्या प्रवासवर्णनाचे महत्त्व आणखी एका कारणासाठी आहे. शिवराज्याभिषेकासाठी उपस्थित असलेल्या इंग्रजांकडून माहिती घेऊन त्याने या घटनेचे वर्णन लिहिले आहे. या खंडात मराठ्यांच्या इतिहासातल्याही अनेक घटनांविषयी त्या घटनांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तींकडून माहिती मिळते.
बादशहा अकबराच्या दरबारात आलेला राल्फ फिच् आणि जहांगीराच्या दरबारात आलेला राजदूत थॉमस रो, मुघल दरबाराच्या वैभवाने प्रभावित झाले होते. इंग्लंडसाठी त्यांच्या राजदूताचे जहांगीराच्या दरबारात येणे इतके महत्त्वाचे होते की, वेस्टमिन्स्टरच्या राजवाड्यातल्या सेंट स्टीफन हॉलमध्ये बादशहा जहांगीर आणि थॉमस रो यांच्या भेटीचे चित्रण करणारे एक म्यूरल बनवले होते. कॅथॉलिक रोमपासून विभक्त झाल्यानंतर, राजनैतिक आणि आर्थिक परिणामांना तोंड देण्यासाठी इंग्लंडची राणी एलिझबेथ पहिली, हिच्या प्रोत्साहनाने ओटोमान तुर्क आणि मुघल भारत या इस्लामी साम्राज्यांबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित करण्यासाठी लॅव्हेन्ट कंपनी आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली.
सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची पुसटशी ओळख व्हावी, म्हणून हा लेखांचा प्रपंच.
‘पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान’ (हिंदुस्थानची प्रदक्षिणा) : खंड १ व २ – सुनंदा भोसेकर
ग्रंथाली, मुंबई | पाने - २८८ + ३४८ | मूल्य – १५०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 24 March 2025
जबरदस्त काम आहे. सुनंदाताईंना मानाचा मुजरा !
(वर चुकून मनाचा लिहिलंय म्हणून ही दुरुस्ती.)
-गामा पैलवान
Gamma Pailvan
Mon , 24 March 2025
जबरदस्त काम आहे. सुनंदाताईंना मनाचा मुजरा ! -गामा पैलवान