जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!
ग्रंथनामा - झलक
रवींद्रनाथ पाटील
  • ‘तुरुंगरंग’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 23 March 2025
  • ग्रंथनामा झलक तुरुंगरंग Turungrang रवींद्रनाथ पाटील Ravindranath Patil

‘तुरुंगरंग’ हे माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबई उच्च न्यायालयातील वकील अ‍ॅड. रवींद्रनाथ पाटील यांचं अनुभवपर पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

‘जेल’ या विषयावर मराठी भाषेमध्ये आजवर फारशी पुस्तकं लिहिली गेली नसावीत. माझ्या माहितीप्रमाणे, ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ हे ज्येष्ठ गांधीवादी आणि युवक क्रांती दलाचे (‘युक्रांद’) संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे येरवडा जेलची यापूर्वीची अखेरची आठवण. या पुस्तकात डॉ. सप्तर्षी सरांनी १९७०च्या दशकातील त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले आहेत. म्हणजे तेव्हापासून आजपावेतो एकाही कैद्याला वाटू नये की, आपण जेलच्या अनुभवांवर आधारित एखादं पुस्तक लिहावं? एकाच्याही मनात हा विचार येऊ नये की, गजाआडची दुनिया आपण जगासमोर उलगडून दाखवावी ?

जेलमध्ये असताना मी बंद्यांना सांगायचो की, जामिनावर सुटल्यावर माझे अनुभव मी पुस्तकरूपानं मांडणार आहे. परंतु मला तेव्हा कुणी फार गांभीर्यानं घ्यायचं नाही. एकदा परमेश्वर ऊर्फ ‘देवा’ जाधव नावाच्या बंदी मित्रानं मला चिठ्ठीद्वारे कळवलं की, अनेक वर्षांपूर्वी एक आयएएस अधिकारी येरवडा जेलमध्ये आले होते. सुमारे सहा वर्षं ते आत राहिले. आपल्या बराकीत बसून ते विपुल लेखन करायचे. म्हणायचे, “बाहेर गेल्यानंतर मी एक मोठा ग्रंथ लिहिणार आहे.” परंतु ते जेलमधून सुटल्यावर ग्रंथ सोडा, वृत्तपत्रात त्यांचा साधा लेखही कधी प्रकाशित झाला नाही!

देवा माझा हितचिंतक होता आणि मला तो सावध करत होता. कदाचित त्याला हे सुचवायचं असावं की, जेलमधला उत्साह जेलबाहेर टिकून राहत नाही. असं का बरं होत असावं? नि आपण ते कसं टाळू शकतो? काळाच्या प्रवाहात मला समजलं की, त्यामागं दोन प्रमुख कारणं असावीत. एक म्हणजे, जेलमध्ये असताना बंद्याच्या मनात येणारे विचार हे ‘स्मशान-वैराग्या’सारखे असतात. ते फार काळ टिकत नाहीत. तिथं असताना बंद्याला काय वाटतं, याला त्याच्या जेलबाहेरच्या आयुष्यात काडीची किंमत राहत नाही. किंबहुना, बहुतांश बंदी जेलबाहेर पडतेवेळी आपले विचार तिथल्या तिथंच सोडून आलेले असतात. नि दुसरं व महत्त्वाचं कारण म्हणजे एकेकाळी आपण जेलमध्ये होतो, हे बाहेर आल्यावर मनुष्याला आठवावंसं वाटत नाही आणि इतरांना तर ते अजिबातच सांगावंसं वाटत नाही!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

देवा जाधवची चिठ्ठी वाचून माझा पुस्तक लेखनाचा उत्साह कमी झाला नाही. उलटपक्षी तो वाढला. कारण मला जाणीव झाली की, यापूर्वी भल्याभल्यांना जे शक्य झालं नाही, ते साध्य करण्याचा अट्टाहास मी उराशी बाळगून होतो नि त्या अट्टाहासापायी जेलच्या प्रांगणामध्ये आपले डोळे आणि कान उघडे ठेवून मी पुस्तकासाठी उपयुक्त माहिती गोळा करत होतो. वेळ मिळेल तेव्हा मी बंद्यांशी आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करायचो. बराकीमध्ये, जेलच्या पटांगणात, तिथल्या पिपरी वृक्षाच्या पारावर, रस्त्यात जाता-येता आणि वेळप्रसंगी अंघोळीच्या सिमेंटच्या रिकाम्या हौदावर बैठक मांडून मी गप्पा मारायचो. नि अशा चर्चांमधून जी माहिती गोळा व्हायची, तिचा मजकूर साठवलेला माझा ‘मेंदू’ सोबत घेऊन मी १९ मे २०२३ रोजी माझ्या वाढदिवशी जामिनावर बाहेर पडलो.

बाहेर आल्यानंतर माझे सुरुवातीचे काही दिवस विलक्षण संभ्रमावस्थेत गेले. एकीकडे जेलचे नानाविध अनुभव डोक्यात थैमान घालत होते, तर दुसरीकडे दैना उडून गेलेल्या आपल्या संसाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यात माझा निम्मा-अधिक वेळ खर्ची पडत होता. मग अशा परिस्थितीत पुस्तक लिहायला तरी कसं घ्यायचं? तेव्हा मला आठवण झाली ती माझ्या पहिल्या पत्रकार मित्राची.

१९९६ साली इंजिनिअरिंग करताना मी पुण्यातल्या एका स्थानिक केबल न्यूज चॅनलमध्ये पार्ट-टाईम पत्रकार म्हणून काम पाहत होतो नि त्या काळात माझा ‘तो’ मित्र प्रभात वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून नोकरी करत होता. आमच्यामध्ये तेव्हा बरीच गट्टी जमली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात आम्ही दोघंही एकमेकांच्या विस्मृतीत गेलो होतो. जेलबाहेर आल्यावर मला अचानक टेलेपथी झाली आणि मी त्याला गाठलं. सिंहगड रोडवरच्या एका उडपी रेस्तराँमध्ये त्याच्यासोबत, अर्थात वरिष्ठ पत्रकार उमेश घोंगडे यांच्यासोबत माझी ती भेट झाली नसती, तर स्वैर लेखनाच्या प्रसूतीकळा सोसूनदेखील कदाचित हे सुदृढ बालक (पुस्तक!) आजवर जन्मालाच आलं नसतं.

त्या दिवशी उमेशनं माझे विचार शांत चित्तानं ऐकून घेतले नि लगोलग मला सोबत घेऊन तो बाजीराव रस्त्यावरील लोखंडे तालमीच्या बोळात पोचला. तिथल्या ‘शक्ती टॉवर’च्या चौथ्या मजल्यावर माझी कॉम्रेड अरविंद पाटकरांसोबत मुलाखत पार पडली. हेच ते विख्यात ‘मनोविकास’ प्रकाशनाचे संस्थापक!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! परंतु पाटकर सर मला उद्देशून म्हणाले, “तुम्ही लिहा... मनसोक्त लिहा. तुमचे विचार अडवू नका. थांबवू नका... छान पुस्तक होईल.” माझ्यातल्या उदयोन्मुख लेखकाला तेव्हा विलक्षण उभारी मिळाली आणि आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक लिहिण्यासाठी मी सज्ज झालो.

जून २०२३पासून पुढले सहा महिने मी पुस्तक लेखनामध्ये स्वतःला गाडून घेतलं. मराठी टायपिंगची यापूर्वी मला फारशी सवय नव्हती. त्यात गेली अनेक वर्षं इंग्रजाळलेल्या विश्वात राहिल्यामुळे मराठी लेखनाचीही मला सवय राहिली नव्हती. माझ्या हस्ताक्षराचा बोजवारा उडालेला होता. मराठी भाषेतले पर्यायी शब्द सुचत नव्हते. सुयोग्य विशेषणं आठवत नव्हती. मुद्देसूद मांडणी करताना ओढाताण होत होती. त्यामुळं सहा महिन्यांत जितका काही मजकूर मी संगणकावर टाईप करून फायनल केला असेल, त्याच्या तिपटीनं लिखाण मी केवळ आवडलं नाही म्हणून ‘डिलीट’ मारलं असेल!

भालचंद्र नेमाडेंनी ‘कोसला’ ही विख्यात कादंबरी २४ ऑगस्ट १९६३ ते १० सप्टेंबर १९६३ या कालावधीत, म्हणजे केवळ १८ दिवसांत लिहून पूर्ण केली होती. माझं १८ दिवसांत एक प्रकरणदेखील लिहून व्हायचं नाही. आणि झालं तरी प्रकाशकांची कॉमेंट यायची, “यात बरंच संपादन करावं लागणार!” थोरामोठ्यांचा मोठेपणा समजण्यासाठी मोठेपणाच्या गावाला जाऊन पाहावं लागतं, हेच खरं.

असं करता करता एकदाचा पुस्तकाचा मसुदा तयार झाला, जो मी माझ्या पत्नीला (डॉ. कांचन पाटील) ६ जानेवारी २०२४ रोजी तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून सादर केला. अर्थात, त्या मसुद्यावरही संपादकीय संस्कार गरजेचे होते. ज्येष्ठ पत्रकार कै. वरुणराज भिडे पूर्वी आपल्या सहकाऱ्यांना सांगायचे, “पत्रकारानं नेहमी हनुमानाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा. शक्य असल्यास त्यानं बातमीचा अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणावा, जेणेकरून संपादकांना जी कुठली वनस्पती उपचारायोग्य वाटेल, तिचा वापर करता येईल.”

मीही असाच एक अस्ताव्यस्त अनुभवांचा द्रोणागिरी पर्वत मनोविकास प्रकाशनाच्या पुढ्यात आणून टाकला होता. आणि त्यातून ‘संजीवनी बुटी’ शोधण्याचं अतिशय जटिल काम प्रकाशक आशिश पाटकर, विख्यात लेखक व समाजसेवी डॉ. अरुण गद्रे आणि संपादक विलास पाटील यांनी पार पाडलं आहे. आणि डॉ. गद्रे सरांचे तर आभार मानावे तितके थोडेच आहेत. ते एक सर्जनही आहेत नि सर्जनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही ते सुपरिचित आहेत. त्यामुळे त्यांनी आवश्यकतेनुसार माझ्या लेखनाची ‘शल्यचिकित्सा’ही केली आणि वेळप्रसंगी मला दिलखुलास दाद देखील दिली. किंबहुना मी तर म्हणेन की, माझ्यासारख्या साहित्य क्षेत्रातील धोंड्यातील ‘नको असलेले’ भाग त्यांनी काढून टाकले आणि माझ्यामधला लेखक घडवला.

सदर पुस्तक ‘मनोरंजनातून प्रबोधन’ या माध्यमातून समाजापुढं मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्यांनी आजवर जेल पाहिलेलं नाही आणि जेलमध्ये जाण्याची ज्यांची इच्छा नाही, अशा सर्वांना हे पुस्तक घरबसल्या जेलच्या दुनियेची सफर घडवेल. जेलच्या कोंडवाड्यामध्ये कैदी जगतात कसे, वागतात कसे, रमतात कसे (हो, ते रमतातही!) याचं रसभरीत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळेल.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पुस्तकात खऱ्या खुऱ्या घटनांची, कथानकांची नि आख्यायिकांची रेलचेल बघायला मिळेल. वाचकांना जणू वाटेल की, आपण केवळ एक पुस्तक वाचत नसून गजाआडचं विश्व प्रत्यक्ष अनुभवतो आहोत, सहासष्ट एकर परिसरात पसरलेल्या येरवडा जेलच्या सुमारे बेचाळीस बराकी आणि दोन-अडीचशे खोल्यांमधलं बंद्याचं आयुष्य आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत.

परंतु कैद्यांचं आयुष्य उलगडून दाखवणं, हाच केवळ या पुस्तकाचा हेतू नाही. ते फक्त एक निमित्त आहे - वाचकांचं मनोरंजन करण्याचं आणि जेलच्या विश्वाची तोंडओळख करून देण्याचं. मुख्य हेतू तर यावर ऊहापोह करण्याचा आहे की, माणूस मुळातच गुन्हेगार का होतो आणि समाज म्हणून आपण त्याला गुन्हेगारी विश्वात जाण्यापासून कसं परावृत्त करू शकतो! आणि वाचकांना हेही दाखवून देण्याचा प्रयत्न आहे की, जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

या पुस्तकाच्या जडणघडणीमध्ये विविध क्षेत्रांतील अनेक धुरिणांचं भरीव योगदान आहे. या साहित्य-यज्ञामध्ये माझं झाडून सारं कुटुंब समिधा अर्पण करत होतं. सर्वजण या पुस्तक-घडणीच्या प्रवासामधले माझे सहप्रवासी होते.

आणि हो, या जगरहाटीमध्ये मी माझ्या बंदी-मित्रांना कसं विसरू शकतो? तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, ‘फोडिलें भांडार । धन्याचा हा माल । मी हमाल । भारवाही ।।’ या पुस्तकाचे खरे ‘धनी’ अर्थात लेखक तर येरवडा जेलमधले ते कैदी आहेत, ज्यांचा आवाज जेलच्या निर्जीव भिंती ऐकू शकत नाहीत आणि ज्यांची परवड डोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवता पाहू शकत नाही. या पुस्तकातल्या भावना त्या व्यक्तींच्या आहेत, ज्यांना जगण्याचे कुठले मूलभूत हक्क व अधिकार असतात, हे मान्य करण्याइतपत आमची लोकशाही अद्याप प्रगल्भ झालेली नाही. अशा सर्वसामान्य बंद्यांच्या अंतर्मनातला आवाज गुरुवर्य मच्छिंद्रनाथांच्या प्रेरणेनं जेलबाहेरच्या समाजापर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रांजळ प्रयत्न.

‘तुरुंगरंग’ - अ‍ॅड.. रवींद्रनाथ पाटील

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - ४३२ | मूल्य - ४९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 24 March 2025

आयशप्पत, कसलं भारी प्रकरण आहे. कैदी म्हणून तुरुंगात जायचं आणि तिथलं वर्णन नंतर करायचं. मला आठवतं त्याप्रमाणे केवळ तुषार नातूंनी असं वर्णन केलंय. ते इथे आहे : https://jaisejyachekarm.blogspot.com/2013/12/blog-post_22.html
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......