अजूनकाही
मराठीमध्ये बहुतांश वेळा ‘वाचन-संस्कृती’ या शब्दाचा वापर ‘वाचन’ या शब्दाचा समानार्थी वा पर्यायी शब्द म्हणूनच केला जातो, असे दिसते. मोठ्या प्रमाणात वाचन करणाऱ्या समाजामध्ये ‘वाचन-संस्कृती’ असेलच असे नाही. केवळ वाचनातून वाचक-समाज निर्माण होऊ शकतो आणि तो वाचन-संस्कृतीशिवायही अस्तित्वात असू शकतो. पण ‘वाचक-समाजा’प्रमाणेच ‘वाचन-संस्कृती’ या संकल्पनेचाही पुरेशा गांभीर्याने विचार केला गेलेला नसल्याने तिच्याही व्याख्या मराठीमध्ये फारशा कुणी केलेल्या दिसत नाहीत. शब्दकोशांची जी निर्मिती स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात झालेली आहे, त्यातही या दोन्ही शब्दांचा समावेश झालेला नाही, असेच दिसून येते. ज्या शब्दाबाबत अशी गोंधळाची स्थिती आहे, पण त्याचा वापर मात्र सर्रास होतो, असा एक शब्द म्हणजे ‘वाचन-संस्कृती’ असेही म्हणता येईल.
‘Work-Ethic’ या इंग्रजीचे मराठी भाषांतर ‘कामाचे नीतीशास्त्र’ असे केले जाते. यालाच ‘कार्यसंस्कृती’ (Work Culture) असेही म्हणतात. पण या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. पहिल्या संकल्पनेचे स्वरूप त्याच्या नावातूनच स्पष्ट होते. ‘Work-Ethic’ म्हणजे ‘कामाचे (नीती)शास्त्र’. कुठलेही शास्त्र हे तत्त्वप्रधान असते. ती तत्त्वे जेव्हा माणसं आचरणात आणतात, तेव्हा त्यातून ‘संस्कृती’ निर्माण होते. ‘वाचक-समाज’ आणि ‘वाचन-संस्कृती’ या शब्दांचेही तसेच आहे. ‘Reading Class’ या इंग्रजी शब्दासाठी ‘वाचक-समाज’ हा मराठी प्रतिशब्द वापरला जातो, तर ‘Reading Culture’साठी ‘वाचन-संस्कृती’ हा प्रतिशब्द वापरला जातो. या लेखात फक्त ‘वाचन-संस्कृती’चा विचार केला आहे.
व्याख्या आणि व्याप्ती
‘जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तक-वाचनाची क्षमता आणि सराव ही अनिवार्य गरज मानतो, तो ‘वाचन-संस्कृती’ असलेला समाज म्हणून ओळखला जातो,’ अशी एक व्याख्या प्रा. वेंडी ग्रिसवोल्ड यांनी केली आहे. त्या पुढे असेही म्हणतात की-‘वाचन-संस्कृती प्रस्थापित होण्यासाठी ढोबळ पण थेट सबंध असतो तो नोकरीतील प्रतिष्ठा आणि त्यासाठी आवश्यक असलेले वाचन यांचा.’
इथे हे लक्षात घ्यायला हवे की, ग्रिसवोल्ड यांना केवळ बुद्धिजीवी वर्गाच्या नोकरीतील प्रतिष्ठा आणि त्यासाठी त्यांना करावे लागणारे वाचन अभिप्रेत नाही. एकंदर समाजातील सर्व घटकांमधील व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक असणारे वाचन अभिप्रेत आहे.
“सुसंस्कृत, सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत, ललितकला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्रे याविषयी विचार करून, इतरांना विचार करायला लावणारी संस्कृती म्हणजे ‘वाचन-संस्कृती’ होय” अशीही एक व्याख्या प्राध्यापक-समीक्षक राजशेखर शिंदे करतात. ते म्हणतात की- “वाचन व्यक्तिगत पातळीवरून गटपातळीवर, गटपातळीवरून समाजपातळीवर, समाजपातळीवरून सांस्कृतिक परंपरेत सामील होत असेल तर त्याला ‘वाचन-संस्कृती’ म्हणता येईल.” संस्कृती ही समान रीतीरिवाजांच्या समूहात घडत असते. ती घडते तेव्हा मानवी समूहाचे उत्थान झालेले असते. वाचन-संस्कृतीमुळे समाजमनाचे उन्नयन होते.
केवळ पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत असतील, त्यांचा खप होत असेल, ती वाचली जात असतील म्हणजे त्या समाजात ‘वाचन-संस्कृती’ असेलच असे नाही. मात्र मराठीमध्ये यालाच ‘वाचन-संस्कृती’ म्हणण्याचा प्रघात दिसून येतो. खरे म्हणजे ही गोष्ट पुस्तक प्रकाशन, त्यांची खरेदी-विक्री आणि त्यांचे वाचन यांच्यापुरती निगडीत नाही. त्यातून काय निष्पन्न होते, याच्याशी ‘संस्कृती’चा संबंध असतो. त्यामुळे हा शब्द वाचनाशी जोडताना त्याची संकल्पनात्मक मांडणी समजावून घ्यायला हवी. कारण पुस्तकांची विक्री वाढली आहे म्हणजे ‘वाचन-संस्कृती’ वाढली आहे, असे म्हणता येत नाही. तसे असेल तर वर्षानुवर्षे धार्मिक-आध्यात्मिक विषयांवरील पुस्तके फारशा जाहीरात आणि प्रसिद्धीविनाही खपत आली आहेत. गेल्या काही वर्षांत आरोग्य, गुंतवणूक, शेअर बाजार, पाककला, करिअर-नोकरी मार्गदर्शन या प्रकारच्या माहितीपर-उपयुक्त पुस्तकांना चांगली मागणी आहे. त्यांचा खपही चांगला होतो आहे. म्हणून ‘वाचन-संस्कृती’ वाढली आहे, असे म्हणावे लागेल!
वाचन-संस्कृती अस्तित्वात असलेल्या समाजात लोक कोणत्या प्रकारची पुस्तके वाचतात आणि वाचन हे त्यांच्या जगण्याचा किती प्रमाणात अविभाज्य भाग बनलेले आहे, हे सहजपणे दिसून येते. कोणाच्या वैयक्तिक संग्रहात किती पुस्तके आहेत किंवा कुणी किती पुस्तके वाचली, यावरून त्या व्यक्तीचा दर्जा ठरवला जाऊ शकत नाही. वाचन-संस्कृती असलेल्या समाजात वैयक्तिक ग्रंथसंग्रहांना मानाची आणि हक्काची जागा असते. तो त्यांच्या सांस्कृतिक दर्जाचा अनिवार्य असा एक निकष असतो हे खरे असले तरी केवळ त्यावरूनच तो ठरवला जाऊ शकत नाही. कोणती पुस्तके वाचली आहेत, त्यांचा त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष आचार-विचारांवर किती व कसा प्रभाव पडला आहे, बौद्धिक व भावनिक स्तराचे त्यामुळे कशा प्रकारे उन्नयन झाले आहे, हे त्याहून महत्त्वाचे असते.
थोडक्यात किती वाचले आहे यापेक्षा काय वाचले आहे, हा वाचन-संस्कृतीचा महत्त्वाचा निकष मानला जातो. एका विशिष्ट हेतूने आपल्या आवडीनिवडीच्या विषयात केलेले सखोल वाचन, हे वाचक-समाज ‘वाचन-संस्कृती’च्या दिशेने करत असलेल्या प्रवासाचे द्योतक असते. फावल्या वेळात केलेले वाचन हे वर्तमानपत्र, साप्ताहिक किंवा मासिक यांचेही असते. ते वाचक-समाजासाठी पोषक असते. त्यातून ‘वाचन-संस्कृती’ घडेलच असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही.
वाचन-संस्कृतीची अंगे
‘वाचन-संस्कृती’ निर्माण होण्यासाठी काही पूरक घडामोडी समाजात सतत घडाव्या लागतात. त्यातील काही या संस्थात्मक पातळीवरच्या असतात आणि काही नैमित्तिक. पण त्यांची जितकी जास्त उपलब्धता असेल, त्यातून जेवढे आदान-प्रदान होईल, तितकी ‘वाचन-संस्कृती’ची वाट सुकर होत होते. ही कोणती अंगे असतात?
वाङ्मयीन संस्था, साहित्य संमेलने, पुस्तक-प्रदर्शने, लेखक-वाचक मेळावे, ग्रंथालये, वाङ्मयीन नियतकालिके\दैनिकांच्या रविवार पुरवणीतील लेखन, अभिवाचन\वाचिक अभिनयाचे कार्यक्रम, वाचन मंडळे, भाषांतरे, बुक ऑन बुक्स ही काही वाचन-संस्कृतीची अंगे. ती केवळ पुस्तकांच्या वाचनातून जशी होत नाही, तशी वाङ्मयीन उपक्रमांना हजेरी लावल्यानेही होत नाही. तर त्यानिमित्ताने वाचक आणि पुस्तकांमध्ये जो एक अदृश्य अनुबंध तयार होतो, त्याला समान आवडीनिवडीच्या इतरांकडून हक्काचे स्थान दिले जाते. पुस्तक देवघेवीपासून चर्चेच्या पातळीपर्यंत अनेक पातळ्यांवर संवाद होऊ लागतो. त्यातून विचारप्रधान जगणे आकारत जाते. केवळ पुस्तकेच नाहीतर कुठल्याही गोष्टीची उपयुक्तता निर्विवादपणे सिद्ध झाल्याशिवाय ती समाजाच्या आस्थेचा विषय होत नाही आणि व्यक्तींच्या मनात हक्काची जागा मिळवू शकत नाही. वरील घटक पुस्तकांना ते स्थान मिळवून देण्याचे काम करतात, म्हणून ते वाचन-संस्कृतीचे कारक ठरतात. वाचक आणि पुस्तके यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण करण्याचे काम वरील घटकांच्या माध्यमांतून होते. जिव्हाळ्यातून समान उद्देशांचे संघटन उभे राहते. त्या संघटनाला समान पातळीवर अभिव्यक्त होण्यासाठी समाजात जेवढ्या प्रमाणात वेगवेगळे पर्याय उभे राहतात, त्यातून त्या संघटनाचा पैस वाढतो. वाढलेला पैस त्या संघटनातील सर्वांची मनोभूमिका बदलवत असतो आणि घडवतही असतो. ही प्रक्रिया वाचन-संस्कृतीची नांदी असते.
वाचन-संस्कृतीचे भवितव्य
वाचन-संस्कृतीचे भवितव्य हे समाजाच्या धारणेवर अवलंबून असते. जो समाज आपल्या भौतिक-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी ज्ञानाचा मार्ग अनुसरतो, त्या समाजातील वाचन-संस्कृतीचे भवितव्य हे उज्ज्वल राहते. जो समाज भौतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ज्ञानाशिवायचे मार्ग अवलंबतो, त्या समाजातील वाचन-संस्कृती ही अस्तंगत होऊ लागते. आणि अशी वाचन-संस्कृती अस्तंगत होऊ घातलेला समाज ज्ञाननिर्मिती, तिचा आदर करेनासा होता. परिणामी त्याची भौतिक प्रगती होत राहते, पण तो सांस्कृतिक-बौद्धिकदृष्ट्या कुपोषित होऊ लागतो.
कुठल्याही समाजात बुद्धिवादी लोक तसे कमी असतात आणि या छोट्या वर्गावरच समाजातील वाचक-समाज आणि त्यातून वाचन-संस्कृतीचे उन्नयन करण्याची जबाबदारी असते. ही जबाबदारी एका बाजूने जशी पूर्णपणे व्यावसायिक असते, तशीच दुसऱ्या बाजूने सामाजिक नीतिमत्तेशीही संबंधित असते. समाजहितासाठी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेवणे, यातून व्यावसायिक नीतिमत्तेच्या जपणुकीपेक्षाही सामाजिक नीतिमत्तेची जपणूक अधिक मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यासाठी परंपरा, प्रेरणा आणि आदर्श यांची कास धरावी लागते. पण त्यांचे बोट सुटले की, भलत्याच गोष्टींना आदर्शांचे स्थान मिळायला लागते. अशा समाजात लेखक, प्रकाशक, पुस्तके यांना स्थान राहत नाही. ते उपहासाचा, कुचेष्टेचा विषय होतात. अशा समाजात वाचक-समाज वाढत राहिला तरी वाचन-संस्कृतीचे भवितव्य धोक्यात येते. किंवा वाचन-संस्कृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्ना करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना फारसा व्यापक पाठिंबा मिळत नाही. महाराष्ट्रातील अगदी मोठ्या ग्रंथालयात जाऊन तिथे साधारणपणे कोणत्या वयोगटातले लोक पुस्तके वाचायला येतात किंवा वाचण्यासाठी घरी नेतात, याची चौकशी केली तर हाती येणारे निष्कर्ष हे काहीसे आश्चर्यकारक असतात. कारण या ग्रंथालयांमध्ये वय वर्षे पाच-सहा ते १३-१४ वर्षांपर्यंतची मुले आणि पन्नाशीनंतरच्या महिला यांचेच सर्वाधिक प्रमाण दिसून येईल. पंचवीस ते ४५ या वयोगटातील तरुणवर्ग तुलनेने खूपच कमी प्रमणात दिसतो. जो असतो त्यातील बराचसा हा विद्यापीठीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने वाचन करणारा असतो. १३-१४ वर्षांपर्यंतची मुले आणि पन्नाशीनंतरच्या महिला यांचा वाचन उद्देश हा सरळ सरळ मनोरंजन वा कल्पनेच्या जगात काही काळ रमून ऐहिक जीवनाचा विसर पाडून घेण्यापलीकडे फारसा असत नाही. मुलांना वाचनाची सवय लागण्याच्या दृष्टीने त्यांना जितक्या लवकर लावली जाईल तितके चांगले मानले जाते. पण माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर बहुतेक मुलांची अवांतर वाचनाची ऊर्मी नाहीशी झालेलीच दिसून येते. कारण महाविद्यालयीन पातळीवरील वा नोकरी करणाऱ्या युवावर्गाची वाचनालयातील उपस्थिती फारशी समाधानकारक नसल्याचेच चित्र सर्वत्र दिसते. मात्र पन्नाशीनंतरच्या महिलांची कुठल्याही ग्रंथालयातील उपस्थिती ही लक्षणीय असल्याचे दिसून येते. त्यामुळे वाचक-समाज निर्माण करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आपल्या सामाजिक परिस्थितीने टाकलेली दिसते.
अजून एक उदाहरण पाहू. ‘ललित’ हे ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार आणि ग्रंथसंग्रह या विषयांना वाहिलेले मासिक गेली ५३ वर्षे दरमहा प्रकाशित होत आहे. एप्रिल महिन्याच्या अंकात ‘चोखंदळ वाचकांची निवड’ प्रकाशित केली जाते. १९६६ पासून हा उपक्रम ‘ललित’ दरवर्षी राबवते. त्यासाठी महाराष्ट्रातील लेखक, संपादक, प्रकाशक, प्राध्यापक, पत्रकार, ग्रंथपाल, संशोधक-अभ्यासक यांना पत्र पाठवून त्यांना गत वर्षातील त्यांना आवडलेली तीन पुस्तके कळवण्यास सांगितले जाते. साधारणपणे महाराष्ट्रातील ५०० वाचकांना पत्रे पाठवली जातात. हे सर्व बुद्धिजीवी वर्गातले लोक ‘ललित’चे वाचकही असतात. त्यामुळे त्यांना ललितचे स्वरूपही चांगल्या प्रकारे माहीत असते. त्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असेल असा कुणाचा ग्रह असेल तर तो सपशेल खोटा ठरण्याची शक्यता अधिक आहे. कारण ५०० लोकांपैकी जेमतेम १५० लोक आपल्याला आवडलेली पुस्तके कळवतात. असे गृहीत धरू की, अजून १०० लोकांचे या ना त्या कारणाने कळवायचे राहून जात असेल, तरीही ही संख्या २५०च्या पुढे जात नाही. म्हणजे गेली ५० वर्षे चालू असलेल्या या उपक्रमात अर्धे ‘चोखंदळ वाचक’ही सहभाग घेत नाहीत. (ऐंशीच्या दशकात ललितने सर्वच वर्गणीदारांना या उपक्रमात सहभाग घेता यावा यासाठी त्यांना आवडलेल्या एका पुस्तकाबद्दल १५-२० ओळींत लिहून कळवण्याचा उपक्रमही करून पाहिला. त्याला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता तो त्यांना लवकरच आवरता घ्यावा लागला.)
बुद्धिजीवी म्हणवल्या जाणाऱ्या वर्गाचा गेल्या पन्नास वर्षांतला उत्साह हा अशा प्रकारचा असेल तर वाचन-संस्कृतीचे भवितव्य कशा प्रकारचे आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
..................................................................................................................................................................
लेखक ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nilesh Pashte
Mon , 24 April 2017
सुंदर लेख !!
Nivedita Deo
Sun , 23 April 2017
Chan lekh ahe
Prabhakar Nanawaty
Sun , 23 April 2017
सुंदर लेख. वाचन संस्कृती नेमके काय आहे याचे चांगलेविश्लेषण.