दुर्मीळ पुस्तकांचे संग्राहक आणि विचक्षण वाचक प्रा. नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे इंग्रजीतील Book on Booksचा परिचय करून देणारं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. मराठीतलं हे अशा प्रकारचं अलीकडच्या काळातलं एकमेव पुस्तक आहे. लोकवाङ्मय गृह, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला रिंढे यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली असून त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या वाचनसंस्कृतीचा थोडक्यात आढावा घेतला आहे. त्यांच्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश... आजच्या ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त...
..................................................................................................................................................................
महाराष्ट्रीय समाजात आधुनिक अर्थाने ‘वाचकवर्ग’ एकोणिसाव्या शतकात उदयाला आला आणि या वर्गात पुस्तकसंस्कृतीही आकार घेऊ लागली. या पुस्तकसंस्कृतीला दोन गोष्टींच्या मर्यादा पडल्या होत्या. एक म्हणजे एकोणिसाव्या शतकात आधुनिक शिक्षण घेणार्यांमध्ये ब्राह्मण, प्रभू अशा तथाकथित उच्चजातीय आणि पूर्वीच्या समाजव्यवस्थेत कारकुनी, बौद्धिक कामांची परंपरा असलेल्या लोकांचाच समावेश प्राधान्याने होता. तत्कालीन वाचकवर्ग याच स्तरातल्या शिक्षित लोकांनी बनला. त्यामुळे आकाराला येत असलेल्या पुस्तकसंस्कृतीवर या स्तरातल्या लोकांच्या अभिरुचीचा प्रभाव राहिला. महात्मा फुले यांनी ज्ञानाचं महत्त्व बहुजन समाजाला पटवून वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न सर्वप्रथम केला.
डॉ. आंबेडकरांनी हेच कार्य दलित वर्गासाठी प्राधान्याने केलं. त्यामुळे तेव्हापासून महाराष्ट्रीयांच्या ‘वाचकवर्गा’त वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतल्या लोकांचा समावेश होण्याची प्रक्रिया सुरू झाली. शिक्षणापासून वंचित राहिलेले सामाजिक स्तर महाराष्ट्रीयांमध्ये अजूनही दिसतात. त्यामुळे ‘वाचक वर्गा’त सर्व जाती-स्तरांचा समावेश होण्याची ही प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली आहे असं म्हणता येणार नाही.
दुसरं असं की, स्वातंत्र्यपूर्व काळात वाचन हे अपरिहार्यपणे ज्ञानप्राप्ती या हेतूशी प्राधान्याने बांधील राहिलं. मध्ययुगातून आधुनिकतेमध्ये प्रवेश करू पाहणार्या आपल्या समाजाची समस्याग्रस्त स्थिती लक्षात घेता हे स्वाभाविक होतं. जसजसं शिक्षणाचं लोण समाजात झिरपत गेलं तसतसे लोकहितवादी, न्या. रानडे, दादोबा पांडुरंग यांच्यापासून ते महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. आंबेडकर यांच्यापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतले लोक शिक्षणाचा लाभ घेऊन ज्ञानी बनत गेले. या ज्ञानाचा वापर त्यांनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी, समाजात नवे विचार पेरण्यासाठी केला. त्यामुळे महाराष्ट्रात ज्ञानप्राप्ती, नव्या सामाजिक मूल्यांची प्रस्थापना, सामाजिक-राजकीय चळवळी यांच्याशी वाचन हे जोडलेलं राहिलं. युरोपातदेखील असंच घडलं होतं. रनेसान्स काळात छापील पुस्तकाचा उदय झाला. त्यानंतरच्या प्रबोधनकाळातल्या सुधारणावादी चळवळी, राजकीय क्रांत्या यांचा प्रसार होण्यामध्ये आणि त्या यशस्वी होण्यामध्ये पुस्तकांच्या, वाचनाच्या प्रसाराचा मोठा हात होता.
पण पुढील काळात पुस्तक आणि युरोपीय देशांतले समाज यांच्यातलं नातं ज्ञानव्यवहारापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यात अनेक रंग मिसळत गेले. एक तर तिथं वाचन समाजाच्या तळागाळापर्यंत झिरपलं. अठराव्या शतकात मुंबईत आलेल्या ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नरच्या कार्यालयातल्या इंग्रज कर्मचार्याला जेमतेम दोन वेळच्या जेवणाची बेगमी होईल इतकाच पगार असायचा. पण त्यातल्या प्रत्येकाकडे ‘आपापला शेक्सपिअर’ असायचा. रात्रीच्या चंद्रप्रकाशात हे थकलेभागलेले लोक घराच्या छतावर शेक्सपिअर वाचत पडायचे असा उल्लेख एल. आर. विन्डहॅम फॉरेस्ट या संशोधकाने ‘द टाऊन अॅन्ड आयलंड ऑफ बॉम्बे : पास्ट अॅन्ड प्रेझेंट’ या लेखात केला आहे. (‘जर्नल ऑफ सोसायटी फॉर आर्टस्’, जून १९०१.) जॉन कॅरे या ऑक्सफर्ड विद्यापीग्रतल्या प्राध्यापकाने ‘द अनएक्सपेक्टेड प्रोफेसर’ या आत्मकथनात शेक्सपिअरच्या कविता पाठ म्हणून दाखवणार्या एका सफाई कामगाराची आठवण दिली आहे. पाब्लो नेरूदा या लॅटिन अमेरिकी कवीला, त्याच्या कविता गाणारे नावाडी एका गावात भेटले होते. पुस्तकं पाश्चात्त्य समाजाच्या तळच्या स्तरापर्यंत कशी पोहोचली होती हे या उदाहरणांवरून दिसतं. प्रत्येक गोष्ट नोंदवण्याची, दस्तऐवजीकरण करण्याची आस असणार्या युरोपीय समाजांमध्ये पुस्तक ही एक जपण्यायोग्य मौल्यवान वस्तू असते याचं भान निर्माण झालं. मोठी ग्रंथालयं, दफ्तरखाने निर्माण झाले. खाजगी पुस्तकसंग्रह हे त्या संग्राहकाच्या मृत्यूनंतर रस्त्यावर न येता मोठ्या ग्रंथालयांमध्ये जाऊन विसावले. दुर्मीळ पुस्तकांना महत्त्व प्राप्त झाल्याने त्यांचा व्यापार वाढला. पुस्तकाचं मुखपृष्ठ, आकार, बांधणी, मांडणी, अक्षररचना इत्यादींचे मापदंड ठरून एक सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणून पुस्तकाचा आस्वाद घेण्याची दृष्टी तयार झाली, अशा पुस्तकांच्या आवडीतून पुस्तकांशी अतिशय आत्मीयता बाळगणारे वाचक तर निर्माण झालेच, पण त्याचबरोबर वाचनाची असोशी नसतानाही इतर कारणांसाठी पुस्तकं जमवणारे पुस्तकवेडे तिकडे तयार झाले. पुस्तक या वस्तूभोवती एक संस्कृती उभी राहिली.
आपल्या समाजात या गोष्टी घडल्या नाहीत. एक तर शंभर वर्षांपूर्वी मराठी पुस्तकाची एक आवृत्ती एक हजार प्रतींची असायची. शतकभरात शिक्षणाचं प्रमाण तीनचार पटींनी वाढूनही (आणि लोकसंख्येत वाढ होऊनही) आजही मराठी पुस्तकाची आवृत्ती हजार-पाचशे प्रतींचीच असते. पुस्तकांचं ‘मूल्य’ जाणून त्यांचं नीट संगोपन करणार्या ग्रंथालयांसारख्या व्यवस्था आम्हाला सर्वत्र उभ्या करता आल्या नाहीत. उलट या हेतूने पूर्वी स्थापलेल्या संस्था एव्हाना मोडकळीला आल्या आहेत. त्याचबरोबर एक सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणून पुस्तकाकडे पाहण्याची दृष्टी तयार झाली नाही. शिक्षितांचं प्रमाण वाढूनही पुस्तकांच्या वाचकांचं, संग्राहकांचं प्रमाण त्या तुलनेत न वाढल्याने वाचकवर्ग अल्पसंख्य राहिला. बंगालमधल्या साधारण प्रत्येक शिक्षित मध्यमवर्गीयाच्या घरात संपूर्ण टागोर, संपूर्ण शरच्चंद्र चट्टोपाध्याय किंवा संपूर्ण बंकिमचंद्र हे साहित्य असतंच. नसल्यास, त्या कुटुंबाला सांस्कृतिकदृष्ट्या कमी लेखलं जातं. असं काही चित्र आजच्या महाराष्ट्रात दिसत नाही.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्रात वाचकवर्ग अत्यल्प आहे अशी तक्रार जाणते लोक करत होते. वि. गो. विजापूरकर हे ना. गो. चापेकरांना १ जानेवारी १९०० या दिवशी लिहिलेल्या पत्रात या संदर्भात म्हणतात, “...हल्लीं लोकांस लिहिण्यावाचण्यास शिकविण्याचे यत्न केले पाहिजेत. त्यांसाठी जमल्यास व्हालंटिअर शिक्षक मंडळी झाली पाहिजे. पदरची पाटी पेनसील घेऊन अशिक्षितांस लिहिण्यास शिकवीत फिरलें पाहिजे म्हणजे पुढे ते वाचतील; वाचलेलें ऐकतील. मग गेल्या शतकाचे म्हणजे १८व्या शतकाचे अखेरीस फ्रान्सांत विश्वकोशकारांच्या लेखांचा परिणाम झाला तसा तरी होईल.’’ (चापेकर : ‘जीवनकथा’, पृ. ३९७). विजापूरकरांना अपेक्षित असलेला हा वाचक महाराष्ट्रात आज शंभर वर्षांनंतरही बहुसंख्येने तयार झालेला दिसत नाही.
ज्ञानप्राप्ती हाच एकमेव वाचनाचा किंवा पुस्तकसंग्रह करण्याचा मुख्य उद्देश असू शकतो, अशी समजूत आजच्या बहुसंख्य शिक्षित महाराष्ट्रीयांमध्ये आहे. कोणत्याही समाजात ज्ञानप्राप्तीसाठी गंभीर वाचन करणारे आणि करमणुकीसाठी हलकंफुलकं वाचणारे असे वाचकांचे दोन वर्ग दिसतात. महाराष्ट्रातही प्रथमपासून हे दोन वर्ग आहेत. सन १८६३ पर्यंत मराठीत छापल्या गेलेल्या कुठल्याही धार्मिक, शैक्षणिक, वैचारिक पुस्तकापेक्षा सर्वाधिक वेळा छापली गेलेली दोन पुस्तकं म्हणजे, ‘सिंहासनबत्तिशी’ आणि ‘वेताळपंचविशी’ ही होत. १८५५मध्ये पुण्याच्या नेटिव्ह जनरल लायब्ररीच्या ग्रंथपालाला रावसाहेब मंडलिकांनी ‘कोणती पुस्तकं वारंवार वाचली जातात?’ असं विचारल्यावर त्याने उत्तर दिलं, “ ‘लंदनच्या लोकांचें रहस्य’ या मालेंतली पुस्तकें इतक्या वेळा वाचलीं जातात कीं तीं दोन वेळां बांधून झाली...’’ (ग. रा. हवालदार, १९२७ : ‘रावसाहेब मंडलिक चरित्र’, भाग दुसरा, पृ. १०३६-३७). कुठल्याही समाजात अशा करमणूकहेतूप्रेरित लेखन-वाचनाला प्रतिष्ठा नसते, त्याप्रमाणे ती मराठीतही नव्हती आणि नाही. स्वत: मराठीतले आद्य कादंबरीकार म्हणून मान्यता पावलेल्या बाबा पदमनजी यांनी ‘आपल्याला कादंबर्या वाचण्याचा नाद नाही’ याबद्दल समाधानाचा सुस्कारा सोडला आहे (बाबा पदमनजी, १९५५ : ‘अरुणोदय’ पृ. ८५). कादंबर्या आजही केवळ करमणुकीसाठीच वाचल्या जातात अशी बर्याच ‘शिक्षित’ लोकांची समजूत आहे. ना. गो. चापेकरांनी १९०८ मध्ये ‘४३ आख्यायिका’ नावाने काल्पनिक गोष्टी लिहिल्या आणि त्या आपले गुरू वि. कों. ओक यांच्याकडे अवलोकनासाठी पाठवल्या. त्यावर ओकांचं उत्तर आलं, “(या आख्यायिका) वाचल्यापासून कोणतें उपयुक्त ज्ञान आपल्या लोकांस मिळावयाचें आहे? कोणतेंहि नाहीं. मनोरंजन तरी व्हायचें आहे काय? तेंहि नाहीं. तर मग हे लिहिण्याचे श्रम तुम्हीं घेतले कशाला?... आमच्या तरुणांस भाकडकथा वाचावयास वेळ नाहीं आहे. रिकामा वेदान्त कुटीत बसण्यास किंवा निरुपयोगी माहिती वाचीत बसण्यास अवकाश नाहीं आहे. भोंवतालचीं राष्ट्रें स्वकल्याणार्थ करितात तें करायाचें पुष्कळ आहे. तें कसें करावयाचें हे त्यांस पढवा...’’ (चापेकर : ‘जीवनकथा’, पृ. ३३७-३८). कोणताही समाज सुसंस्कृत बनण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी त्या समाजातल्या वाचकांनी वरील हेतूंनी वाचन करणं आवश्यक असतंच. पण आज, छापील पुस्तकांची निर्मिती होऊन दोनशे वर्षं होऊन गेल्यानंतरदेखील वाचनाकडून ज्ञानप्राप्ती, मूल्यसंस्कार एवढी एकच अपेक्षा ठेवण्याची गरज ज्या अर्थी आपल्या समाजात भासते आहे, त्या अर्थी आपला समाज अद्यापही पुरेशा प्रमाणात सुसंस्कृत, ज्ञानी, सुधारलेला बनलेला नाही असा निष्कर्ष काढावा लागतो.
करमणुकीचा अर्थदेखील इथं ‘वेळ घालवणे’ एवढाच मर्यादित घेतला जातो. खरं तर वाचनापासून मिळणार्या आनंदाच्या अनेक परी असतात. भाषेचा पोत, वर्णनातलं किंवा निवेदनातलं सौंदर्य, रचनेची वैशिष्ट्यपूर्णता इत्यादी गोष्टी मनाला आनंद देणार्या असू शकतात, आणि त्याहीपलीकडे पुस्तकाचं मुखपृष्ठ, त्यातल्या मजकुराची दृश्य मांडणी इत्यादी गोष्टीही ‘आस्वाद्य’ असतात याची जाणीव इथल्या करमणुकीच्या भुकेल्या वाचकवर्गात निर्माण झाली नाही. अशा प्रकारे एकीकडे सामाजिक गरज म्हणून ‘ज्ञानप्राप्ती’ आणि दुसरीकडे ‘मनोरंजना’च्या उथळ कल्पना या द्वंद्वात पुस्तकांविषयीची महाराष्ट्रीय अभिरुची मर्यादित राहिली.
पुस्तकसंस्कृतीचाच दुष्काळ असलेल्या अशा सामाजिक प्रदेशात अस्सल पुस्तकप्रेमी आणि पुस्तकवेडे लोक अल्पसंख्य ठरण्याची आणि खरोखरचे ‘वेडे’ ठरवले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यांचं प्रेम आणि वेड हे इतरांसाठी अनाकलनीय राहतं. कोणताही लेखक पुस्तक लिहितो ते मुख्यत: स्वेतरांशी संवाद साधण्यासाठी. पण इथे पुस्तकप्रेमी किंवा पुस्तकवेडे यांचा उर्वरित न-वाचक, न-संग्राहक समाजाशी संवाद होणं अशक्य ठरतं. त्यामुळे मग पुस्तकांविषयीची पुस्तकं लिहिण्याचं प्रयोजनच उरत नाही. मराठीत पुस्तकांविषयीच्या पुस्तकांची संख्या फार कमी असण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यातूनही जी थोडीफार पुस्तकं लिहिली गेली ती पुस्तकांसंदर्भातल्या ठरावीक विषयांचाच परामर्श घेतात. याची कारणं पुन्हा वाचनाची एकारलेली गरज आणि पुस्तकाविषयीची मर्यादित अभिरुची, ही आहेत. उदाहरणार्थ, मराठीत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांविषयीच्या पुस्तकांमध्ये, काय वाचावं याविषयी आदेशवजा सल्ला देणारी किंवा पुस्तकांचा परिचय करून देणारी पुस्तकं अधिक दिसतात (खुद्द तुमच्या हाती सध्या असलेलं पुस्तकही असंच परिचयात्मक स्वरूपाचं आहे). महाराष्ट्रातला संपूर्ण समाज आजही एकाच ज्ञानात्मक, बौद्धिक अवकाशात जगत नाही. निरक्षर राहिलेले किंवा साक्षर होऊनही पुस्तकं ज्यांच्या नजरेस पडत नाहीत असे, किंवा वाचनाला नुकतीच कुठे सुरुवात केलेले असे समाजघटक आजही महाराष्ट्रीय समाजात आहेत. त्यामुळे पुस्तकांविषयीच्या आदेशात्मक किंवा परिचयात्मक पुस्तकांची या समाजात अद्यापही गरज आहे असं म्हणावं लागेल. तसंच वेगवेगळ्या विषयांवर जोवर मूलभूत लेखन मराठीत होत नाही, तोवर परिचयात्मक लेखनही मोठ्या प्रमाणावर लिहिलं जाणार. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात विखुरलेल्या तुरळक संख्येने असलेल्या वाचकाला गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर यांच्या ग्रंथपरिचयपर पुस्तकांमुळे अनेक देशीविदेशी राजकीय, सामाजिक विषयांवरच्या पुस्तकांचा परिचय घडला. याशिवाय इतर अनेक लेखकांची अशा प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्या त्या लेखकाच्या वाचनाच्या मर्यादा अशा पुस्तकांना असतात. पण अशी पुस्तकं वाचणार्यांपैकी निदान काही वाचकांमध्ये तरी मूळ पुस्तकं वाचण्याची जिज्ञासा निर्माण होते आणि मग त्यांच्या वाचनाच्या कक्षा विस्तारू लागतात.
मराठीतली पुस्तकांविषयीची पुस्तकं प्रामुख्याने पुस्तकप्रेम किंवा पुस्तकवेड काय असतं याचा परिचय करून देणं आणि पुस्तकांच्या वाचनाविषयी मार्गदर्शन करणं याच हेतूंनी लिहिली जातात असा इथवरच्या चर्चेचा निष्कर्ष निघतो. म्हणजे महाराष्ट्रीय पुस्तकसंस्कृती छापील पुस्तकांच्या प्रकाशनाला दोनशे वर्षं उलटल्यानंतरही अद्याप प्राथमिक अवस्थेतच आहे, असा निष्कर्ष काढावा लागतो. पूर्वी समाजातलं अज्ञान, निरक्षरता अशी त्याची कारणं तरी देता यायची. इंग्रजपूर्व काळात धार्मिक हस्तलिखितांचं वाचन ऐकण्याची श्रवणपरंपरा होती. श्रद्धा हा या परंपरेचा मुख्य आधार होता. आधुनिक काळात पुस्तकाला असलेलं धर्माचं, श्रद्धेचं हे अधिष्ठान नाहीसं झालं. साहित्याचा आशय ‘सेक्युलर’ झाला. श्रवणाकडून आपला समाज वाचनाकडे आला. अशा वाचनासाठी व्यक्तीला आवश्यक असणारा मोकळा वेळ, खाजगी अवकाश आणि पुस्तकं मिळवण्यासाठीची आर्थिक क्षमता या तीनही गोष्टी आजच्या महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय समाजाला लाभलेल्या आहेत आणि तरीही इथं पुस्तकाचं वाचन मोठ्या प्रमाणात रुजलेलं नाही, पुस्तकसंस्कृती पुरेशा प्रमाणात विकसित झालेली नाही. असं का झालं असेल? कदाचित अनेक शतकांची मौखिक-श्रवण परंपरा असलेल्या आपल्या समाजाला वाचनाचे संस्कार मुरवून घ्यायला दोनशे वर्षं हा कालावधी अपुरा असेल. कदाचित शेकडो वर्षांपर्यंत समाजातल्या फार मोठ्या वर्गाला लेखन-वाचनापासून दूर राहावं लागल्यामुळे त्यांचा अक्षरांशी निर्माण झालेला परकेपणा भरून यायला जेमतेम साठ-सत्तर वर्षं हा सार्वत्रिक शिक्षणप्रसाराचा कालावधी पुरेसा नसेल. हे खरंच असेल तर पुस्तकांबद्दल आस्था असणार्यांनी, वाचनाविषयी प्रेम असणार्यांनी निराश न होता आशावादी राहिलं पाहिजे, आणखी वाट पाहिली पाहिजे. नव्या तंत्रज्ञानामुळे पुस्तकांचं अस्तित्व धोक्यात आल्याची भीती अनेक जण व्यक्त करतात. याबाबत आपण उम्बर्तो इको याच्यावर विसंबून राहायला हवं. तो म्हणतो की, पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या ‘मूलभूत शोधां’पैकी आहे. अशा शोधात पुढे बदलत्या काळानुसार फेरफार होत राहतात, पण त्यातली मूळ संकल्पना कायम राहते. पुस्तकाचं स्वरूप बदलेल; कागदावर छापलेलं पुस्तक जाऊन त्या जागी ई-पुस्तक येईल. पण त्यातली ‘वाचन करणे’ ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभव घेण्याची तहान आहे, तोवर पुस्तकाला मरण नाही. म्हणूनच पुस्तकसंस्कृतीविषयी आजघडीला काही लिहिलं तर ते कालबाह्य नक्कीच ठरणार नाही.
neegrind@gmail.com
..................................................................................................................................................................
लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे
लोकवाङ्मय गृह, मुंबई
पाने : १९२, मूल्य : २५० रुपये.
..................................................................................................................................................................
हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment