हंसा जिवराज मेहता : ‘संयुक्त राष्ट्रसंघा’वर प्रभाव पाडणारी ‘मानवी हक्क व स्त्रीस्वातंत्र्या’ची अस्सल भारतीय पुरस्कर्ती
पडघम - महिला दिन विशेष
सलील जोशी
  • हंसा जिवराज मेहता
  • Sat , 08 March 2025
  • पडघम महिला दिन विशेष आंतरराष्ट्रीय महिला दिन International Women's Day हंसा जिवराज मेहता Hansa Jivraj Mehta

साल १९४७. ‘संयुक्त राष्ट्रसंघा’(United Nations, UN)च्या ‘मानवी हक्क आयोगा’ची आंतरराष्ट्रीय बैठक सुरू होती. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या जागतिक संस्थेच्या या पहिल्याच बैठकीत युद्ध व त्यानंतर होण्याऱ्या अनन्वित अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून, जगात शांतता, समन्वय साधण्यावर भर दिला जाणार होता. मानवतेच्या शत्रूसंगे जगातील महाशक्तींनी जे युद्ध सुरू केले होते, त्याची परिणती जेते व पराभूतांबाबतच्या समान मानवी हक्कात व्हावी, असा प्रस्ताव या बैठकी करण्यात आला.

या प्रस्तावातील मसुद्यात ‘All men are born free with dignity and rights’ असे एक वाक्य घालण्यात आले होते. या बैठकीत फक्त दोन महिलांचा सहभाग होता. त्यातील एक म्हणजे अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या पत्नी, एलिनॉर रुझवेल्ट. आणि दुसऱ्या होत्या, हंसा जिवराज मेहता.

हंसाबाई या बैठकीत भारताचेसह जवळ-जवळ जगातील संपूर्ण महिलांचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांनी धीटपणे या मसुद्यातील ‘men’ या शब्दाला आक्षेप घेतला. हा आक्षेप नोंदवताना त्यांनी ‘all men’ हा कालबाह्य शब्द असल्याचं सांगून, या कलमात महिलांना बहिष्कृत केल्यासारखे वाटते, असे मत ठामपणे नोंदवले.

अत्यंत मितभाषी, संपूर्ण भारतीय वेशात असलेल्या आणि काहीश्या बुजऱ्या हंसाबाईंकडून इतक्या प्रखर शब्दांत झालेला विरोध बैठकीतल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेला. एलिनॉर रुझवेल्ट यांनी ‘men’ हा मनुष्यजातीकरता वापरल्या जाणारा प्रचलित शब्द आहे, अशी सारवासारव करून बघितली. त्यावर हंसाबाईंनी ‘Human Being’ असा शब्द वापरल्यास काय हरकत आहे, असा प्रतिवाद करून एलिनॉर यांच्यासह सगळ्यांनाच निरुत्तर केले.

पुढे ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने मानवी हक्क संवर्धनासंबंधीच्या प्रस्ताव हाच शब्द वापरून हंसाबाईंच्या ‘महिलांचे हक्क मानवी हक्कांपेक्षा वेगळे नाहीत’ या विचारावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले.

या घटनेच्या आधी, दोन-तीन वर्षांपूर्वी, भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवू लागलेली असताना भारतीय महिलांना शिक्षण, मताधिकार, समान वेतन, मालमत्ता अधिकार आणि विवाह-घटस्फोटाचा समान अधिकार यांवर अधिकारवाणीने भाष्य केले होते. याच मताशी समान धागा साधून ‘संयुक्त राष्ट्रसंघा’ने ‘महिला आयोगा’त या विचारांना समाविष्ट केले होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३ जून १८८७ रोजी गुजरातमधील सुरत या गावी हर्षदागौरी व मनुभाई मेहता यांच्या घरी हंसाबाईंचा जन्म झाला. मनुभाई बडोदा महाविद्यालयामध्ये तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे आजोबा नंदशंकर मेहता गुजरातीतले पहिले कादंबरीकार. त्यांची ही ‘कर्ण घेलो’ नावाची कादंबरी गुजरामधील शेवटचे राजपूत राजे व वाघेला योद्ध्यांवर आहे. त्यांचे काका गुजरातमधले पहिले सिविल सर्व्हन्ट होते.

अशा घरातील उदारमतवादी वातावरणात हंसाबाईंना उच्चशिक्षणाकरता नेहमीच प्रोत्साहन मिळत गेले. त्या काळी मुलींना शिक्षणाच्या फार संधी नसत. दीडशे मुलांच्या वर्गात शिकणाऱ्या हंसा व त्यांच्या दोन बहिणी याच फक्त तीन मुली होत्या.

वडिलांप्रमाणेच तत्त्वज्ञानात पदवी घेऊन पुढे हंसाबाई १९१८मध्ये इंग्लंडला शिकायला गेल्या. तिथे त्यांची भेट सरोजिनी नायडूंशी झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेहतांनी सार्वजनिक जीवनातील कामाचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्या काळी इंग्लंडमध्ये येणाऱ्या जवळपास प्रत्येक मोठ्या नेत्याची भेट घेतल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

तो काळ म्हणजे भारतातील राजकारणात व स्वातंत्र्यलढ्यात ‘टिळक-पर्व’ संपून ‘गांधी-पर्व’ सुरू होण्याचा होता. शिक्षण संपवून भारतात परत आल्यावर सरोजिनी नायडूंनी हंसाबाईंना भेट दिलेली खादीची साडी एका नव्या विचारधारेशी ओळख करून देणारी ठरली. पुढे त्यांनी नायडूंच्या मदतीने साबरमती जेलमध्ये जाऊन गांधीजींची भेट घेतली.

ज्या काळी परदेशात जाणे हे ‘अब्रह्मण्यम’ समजले जायचे, त्या काळी हंसाबाई इंग्लंडहून शिक्षण संपवून भारतात आल्यावर परत अमेरिकेत गेल्या. त्यांच्या अध्यापकांच्या सूचनेनुसार त्यांनी अमेरिकन शिक्षणव्यवस्थेची ओळख करून घेण्याकरता तेथील अनेक विद्यापीठांना भेटी दिल्या.

१९२४मध्ये हंसाबाईंनी जिवराज मेहता यांच्याशी विवाह केला. ते किंग एडवर्ड हॉस्पिटल (KEM Hospital)चे चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून मुंबईत काम करत. या विवाहाससुद्धा हंसाबाईंना समाजाचा आत्यंतिक विरोध सहन करावा लागला. जिवराज मेहता हंसाबाईंपेक्षा खालच्या जातीचे असल्याने तत्कालीन समाजाचा त्यांच्या विवाहाला विरोध होता. जर हा विवाह झाला, तर हंसाबाईंना समाज बहिष्कृत करेल, अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. पण त्यांनी आपल्या उदारमतवादी संस्कारांना जागून समाजाला ठणकावून सांगितले की, तुम्ही मला समाजाबाहेर करण्याआधी मीच स्वतःहून समाजाबाहेर जाण्याचे ठरवले आहे.

पुढे जिवराज मेहता गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. ते गांधीजींचे निकटवर्तीय होते. त्यांच्यासोबतच हंसाबाईंनी अनेक वेळा गांधीजींच्या भेटी घेतल्या. पुढे त्यांनी १९३०च्या सत्याग्रहात भाग घेतला. गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी विदेशी मालाच्या दुकानांपुढे धरणे देण्याच्या कामापासून स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात केली.

या व अशा अनेक आंदोलनातील सहभागामुळे हंसाबाईंना एकूण तीन वेळा कारावास सहन करावा लागला. गांधीजींच्या दोन आंदोलनातील तुलनात्मक फरक सांगताना त्या १९३०मधील आंदोलनात असलेले महिलांचे योगदान आवर्जून अधोरेखित करत.

स्वातंत्र्यलढ्यादरम्यान त्यांचे गांधीजी, सरदार पटेल, पं. नेहरू, सरोजिनी नायडू, अम्रित कौर अशा अनेक नेत्यांशी निकटचे संबंध आले. आणि या सर्वांच्या कार्यपद्धतीवर हंसाबाई अत्यंत रोखठोक मतप्रदर्शन करत. प्रत्येक नेत्याची सगळीच मतं त्यांना पटत नव्हती, हेसुद्धा त्या स्पष्टपणे सांगत.

१९४६-४८ दरम्यान हंसाबाईंनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) विद्यालयाच्या कुलगुरू म्हणून काम पाहिले. नंतर त्या बडोदा विद्यापीठाच्याही कुलगुरू झाल्या. मुले-मुली एकत्र शिकत असलेल्या विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून एका स्त्रीची नेमणूक होण्याचा हा कदाचित पहिलाच प्रसंग असेल. त्या भारतीय संविधान सभेच्यासुद्धा सदस्य होत्या. पंधरा महिलांचा सहभाग असलेल्या या समितीने स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधान लिहिण्यास हातभार लावला.

नंतर अनेक वर्षांनी, १९७२-७३मध्ये नेहरू मेमोरियल संस्थेमार्फत घेतल्या गेलेल्या एका मुलाखतीत त्यांना जगातील प्रगत लोकशाहीत महिलांना नसलेले स्थान व भारतासारख्या देशात अनेक शतकांपासून सुरू असलेली ही परंपरा, या विरोधाभासावर प्रश्न विचारण्यात आले. हंसाबाईंच्या मते आदिकाळापासून भारतात स्त्रीला एक सक्षम शक्ती समजले गेले आहे. त्यात काही ‘देवी’ श्रद्धा जरी असल्या तरी, स्त्री हे सार्वजनिक कामात अग्रेसर दिसत राहिल्याचं त्या सांगतात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

अहिल्याबाई होळकरांसारख्या अनेक महिलांची उदाहरणं देत हा मुद्दा पटवून देतात की, या महिला नुसत्या राज्यकर्त्याच नव्हत्या, तर त्या चांगल्या प्रशासकही होत्या. त्यांना समाजात मानाचं स्थान होतं, जे कालांतराने कमी होत गेलं. पण १९व्या शतकातील स्त्रियांच्या सामाजिक सहभागाच्या वाढीस त्या गांधींच्या चळवळीला मोठं श्रेय देतात. अर्थात त्यांची स्वातंत्र्योत्तर काळातील लोकसभेतील महिलांच्या संख्येबाबतसुद्धा मोठी तक्रार असल्याचं याच मुलाखतीत वाचायला मिळतं, जो मुद्दा आजही तेवढाच विवादित आहे.

काळाच्या ओघात काहीशा विस्मृतीत गेलेल्या हंसाबाई कधी-कधी अचानक एखाद्या लेखातून भेटतात, तेव्हा त्या आजच्या काळाच्याही किती पुढे आहेत ते कळतं. त्यांच्या तीस सेकंदाच्या एका यु-ट्युब क्लिपला - ज्यात त्या भारतीय तिरंगा ध्वज देशातील महिलांतर्फे देशाला भेट देत आहेत - वर्तमान सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या घोषणेची झालर दिसते, तेव्हा त्यांच्या कर्तृत्वावर आजही कोणाचा डोळा आहे, ते कळतं.

संयुक्त राष्ट्रसंघ जेव्हा ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावरील पहिल्या परिसंवादाला ‘हंसा मेहता चर्चासत्र’ असे नाव देऊन त्यांचा ‘मानवी हक्क व स्त्रीस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या’ म्हणून उचित गौरव करतो, तेव्हा मात्र ऊर अभिमानानं भरून येतो.

संदर्भ :

१) Overlook No More : Radhika Vatsal, New York Times, May 31, 2024

२) Oral History - Nehru Memorial Museum and Library Archive

३) https://www.youtube.com/watch?v=5zEpkIDy4kM

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......