अजूनकाही
प्रसिद्ध विचारवंत प्रा. स. ह. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘ऐवज – विचारांचा' हा त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह डॉ. चंद्रहास देशपांडे, निरंजन आगाशे, विनया खडपेकर, मंगला गोडबोले, प्रा. प्रदीप आपटे यांनी संपादित केला आहे. प्रा. देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ प्रकाशित विपुल लेखन केले आणि महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वत:चा एक विशिष्ट ठसा उमटवला. राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या त्यांच्या या पुस्तकातील हा एक लेख...
.................................................................................................................................................................
भारतीय स्वातंत्र्यलढा अगदी निर्णायक अशा वळणावर आला असताना जन्मलेल्या पिढीचे स. ह. देशपांडे हे प्रतिनिधी होते. तरुण वयात स्वातंत्र्याचा उष:काल अनुभवायला मिळालेल्या या पिढीतील अनेकांना देश-उभारणीच्या प्रक्रियेशी आपला संबंध आहे, आपली त्यात काही एक बांधीलकी आहे, असे वाटत होते. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्यावरील लेखात त्यांच्या चिंतनाचा प्रमुख विषय सांगताना सहंनी विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या शब्दांचा आधार घेतला होता. ते शब्द म्हणजे ‘आमच्या देशाची स्थिती’.
सहंच्या विचारसृष्टीतदेखील आपला देश आणि त्याचे भवितव्य हा विषय केंद्रस्थानी होता. ते कृषी-अर्थशास्त्राचे प्राध्यापक. पण ही भूमिका ‘उपजीविकेचे साधन’, एवढ्यापुरती मर्यादित नव्हती. शिकवणे आणि शिकणे ही त्यांची एक सहज वृत्तीच बनून गेली होती. केवळ वर्गात, ग्रंथालयातच नव्हे; तर समाजात मिसळून, ‘ग्रामायन’सारख्या संस्थांच्या उभारणीत सहभागी होऊन, म्हैसाळ येथील दलितमुक्तीच्या प्रकल्पाचे मर्म जाणून घेण्याचा ध्यास बाळगत त्यांची वाटचाल अखंड सुरू असे. साहित्य, संगीतादी कलांमध्ये त्यांना रुची होती. त्यांच्या रसिकतेचे आणि या क्षेत्राविषयीच्या त्यांच्या जाणकारीचे कवडसे सहंच्या लिखाणात दिसतात. पण कमालीच्या उत्कटतेने त्यांनी कोणत्या प्रश्नाचा शोध घेतला असेल, तर तो म्हणजे ‘भारतीय राष्ट्रवादापुढील आव्हानां’चा. हा शोध आणि त्यातून त्यांना जाणवलेल्या गोष्टी त्यांनी निर्भीडपणे मांडल्या. मात्र तशा त्या मांडत असताना ‘अंतिम सत्य’ सांगत आहोत, आव कधीच आणला नाही.
‘सावरकर ते भाजप : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आले” (राजहंस, १९९२) या पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्यांनी म्हटले आहे: “माझ्या प्रतिपादनाबद्दल मी आग्रही नाही. मला आणखी प्रकाश मिळाला तर हवाच आहे. चर्चेतून आणि विचारमंथनातून तो प्राप्त होईल, अशी आशा आहे.”
निखळ अभ्यासकाचा प्रामाणिकपणा यात दिसतो. हिंदुत्व, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता हे विषय उपस्थित होण्याचा अवकाश; त्यावरील चर्चेत ठिणग्या उडाल्याच पाहिजेत, अशी स्थिती आपल्याकडे निर्माण झाली आहे. परंतू अभिनिवेश, पोकळ अभिमान यात न अडकता हा अभ्यासाचा विषय मानून काम करायला हवे, असे त्यांना वाटत असे. अशी दृष्टी असल्याने प्रचलित धारणा, गृहीतके यांची समीक्षा करतानाच ते स्वत:च्याही भूमिका पुन:पुन्हा तपासत राहिले.
त्यांच्या अखेरच्या पुस्तकाचे शीर्षकच ‘धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचारांची फेरमांडणी’ (राजहंस, २००६) असे आहे. यातील ‘फेरमांडणी’ हा शब्द महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादाचा विचार करताना ‘धर्म’ हा विषय चिकित्सेचा करावा लागतो, याची स्पष्टता सहंकडे होती. हिंदू आणि इस्लाम या दोन्ही धर्मांची चिकित्सा त्यांनी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांत फारकत केली, तीच भूमिका सहंनी स्वीकारली. या पुस्तकात आलेल्या त्यांच्या निवडक लेखनातून त्यांची राष्ट्रवादाविषयीची भूमिका जाणून घेता येईल. त्यातील सहंचे वेगळेपणही लक्षात येईल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सहंच्या कामगिरीचा विचार करताना प्रकर्षाने लक्षात येणारी बाब म्हणजे या विषयाच्या अभ्यास आणि मांडणीसाठी असलेले त्यावेळचे प्रतिकूल वातावरण. कारणे अनेक असतील, पण हिंदुत्वाधारित राष्ट्रवाद हा विषयच एके काळी आपल्याकडच्या वैचारिक पर्यावरणात ‘अभ्यासक्रमा’च्या बाहेरचा मानला जात होता. या नवस्वतंत्र देशाची घडी बसवताना भविष्याविषयीचा आशावाद ही प्रेरणा होती. फाळणीचा जबर घाव सोसल्यानंतर त्या जखमा उगाळत न बसता एक ‘नवी सुरुवात’ करण्याचा पंडित नेहरूंचा प्रयत्न होता.
गांधीवाद, लोकशाही समाजवाद, साम्यवाद अशा वेगवेगळ्या विचारसरणींना काही ना काही स्थान या व्यवस्थेत होते. पायाभूत संरचना उभी करणे, विज्ञान-संशोधनाला प्रोत्साहन देणे, उच्चशिक्षण संस्थांची स्थापना, संमिश्र अर्थव्यवस्था, अलिप्तता नि शांततावादाचा स्वीकार, धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाचा अंगीकार ही वाटचालीची दिशा होती. ती चुकीची होती, असे कुणीच म्हणणार नाही. त्यातला आशावाद आकर्षक होता. पण राज्यकर्त्याला मेळ घालावा लागतो, तो आदर्श आणि वास्तवाचा. काही बाबतीत हे भान सुटले. ‘ऑप्शन’ला टाकलेले प्रश्न उफाळून वर येऊ लागले.
वाटचालीतील या त्रुटींचे थोडक्यात वर्णन करायचे तर ते असे सांगता येईल : मानवतेचा उद्घोष करताना ‘राष्ट्रवादा’कडे, धर्मनिरपेक्षता राबवताना मुस्लिमांच्या प्रतिगामी राजकारणाकडे, शांततेचे स्वप्न पाहताना देशाच्या सुरक्षाविषयक गरजांकडे आणि 'संपत्ती विोतरणा'चा विचार करताना ‘संपत्ती-निर्माणा’च्या आव्हानाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत होते.
‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या फुग्याला चीनने टाचणी लावली, ती १९६२मध्ये. त्यानंतर आपल्याकडच्या संरक्षणविषयक धोरणाचे पुनः परीक्षण सुरू झाले आणि ते बरेचसे वास्तवाधिष्ठित बनले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून याविषयी सतत जागर करणाऱ्या सावरकरांचे द्रष्टेपण कळायला ६२ची नामुश्की कारणीभूत ठरली! पण हे झाले संरक्षणाबाबत. भारतीय राष्ट्रवादाचे स्वरूप, त्यात उद्भवणारे तदनुषंगिक प्रश्न या विषयांबद्दलचा गारठा दूर झालेला नव्हता. या प्रश्नांचे गांभीर्य आणि तीव्रता लक्षात आलेल्या काही मोजक्या विचारवंतांमध्ये स. ह. देशपांडे होते.
१९२५मध्ये सावरकरांनी ‘हिंदुत्व’ हा प्रबंध लिहिला. त्यात बीजरूपात मांडलेल्या सिद्धान्ताचा विकास विस्तार करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मानून त्या कार्याला सहंनी वाहून घेतले. तथापि तत्कालीन सार्वजनिक, संस्थात्मक क्षेत्रांतील या विषयांबाबतची अनास्था कायम होती. विद्यापीठे, प्रसारमाध्यमे यांत साम्यवाद्यांचे प्राबल्य होते आणि त्यांचा राष्ट्रवादाला तात्त्विक विरोध होता. या पर्यावरणात सहंनी काम सुरू केले. ‘सत्य-असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही प्रस्थापिता’ असा (तुकोबांची क्षमा मागून) हा बाणा होता.
हे प्रस्थापित म्हणजे अर्थातच वैचारिक क्षेत्रातील प्रस्थापित. त्यांच्या वर्तुळात ज्या विषयांना मज्जाव होता, नेमक्या त्याच विषयांना सह तोंड फोडत होते. खऱ्याखुऱ्या धर्मनिरपेक्षतेचा शोध घेत होते. राष्ट्रवादापुढील आव्हानांमधील सर्वांत ठळक आव्हान हे मुस्लिमांच्या धार्मिक प्रेरणांमुळे तयार झाले आहे, हे स्पष्टपणे सांगत होते. मात्र या वास्तवाला सामोरे जाणे, त्याची चिकित्सा करणे म्हणजे द्वेष करणे नव्हते. तरीही तशी टीका त्यांच्यावर केली गेली. दुसरे म्हणजे उपेक्षा, विपर्यास आणि हेतूंवर संशय अशा आयुधांचा वापरही वेळोवेळी केला गेला. पण त्यातील सहंना वाटणारी सर्वांत त्रासदायक बाब ‘उपेक्षा’ ही होती. एरवी ते चर्चा-संवादाला तयार असत.
ज्ञान प्रबोधिनीत ‘भारतीय एकात्मता केंद्रा’च्या माध्यमातून राष्ट्रवादावर, राष्ट्रीय एकात्मतेपुढील समस्यांवर व्यापक चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यात विविध विचारसरणी मानणाऱ्या अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. ‘अभ्यासमंडळ’ हा त्यांच्या खास आवडीचा विषय. निवृत्तीनंतर ते पुण्यात स्थायिक झाले आणि दीर्घकाळ ‘राष्ट्रवाद अभ्यास मंडळ’ त्यांनी चालवले. त्यांचे शिक्षक पु. ग. सहस्रबुद्धे यांनीदेखील आपल्या विद्यार्थ्यांबरोबर अभ्यासमंडळ चालवले होते. सह त्या मंडळातील एक सदस्य होते. लोकशाही, स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद हे पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय. या दोन्ही बाबतींत सहंवर त्यांचा प्रभाव जाणवतोच. पण त्यांच्याविषयीचा आदर कायम ठेवत त्यांच्याही विचारांचे कसून परीक्षण करताना सह कचरत नाहीत, ही बाब महत्त्वाची.
मुळात राष्ट्रवादाची गरज समाजाला पटवून देणे, हे सहना महत्त्वाचे वाटत होते. एकीकडे जातीय-पोटजातीय निष्ठा, कमालीचे स्तरीकरण आणि त्यातून समाजात आलेला विसकळीतपणा आणि दुसरीकडे थेट मानवतावादाचे स्वप्न यांत ‘राष्ट्रवादा’कडे आपले दुर्लक्ष होत आहे, असे त्यांना वाटत होते. परकी टाचेखाली भरडल्या गेलेल्या ज्या नवस्वतंत्र देशांनी ऐक्याची भावना दृढ केली, लोकांमधील प्रगतीच्या प्रेरणांना साद घातली, ते देश विकासाच्या मार्गावर आहेत, याकडे ते सजगपणे पाहत होते.
या परिस्थितीत सहंना अभिप्रेत होता तो राष्ट्रवाद केवळ पूर्वगौरवावर आधारित नव्हता. आधुनिक मूल्यांचा स्वीकार करण्याविषयी ते आग्रही होते. वैज्ञानिक दृष्टीकोन, आर्थिक-सामाजिक समता, लिंगभाव समानता या मूल्यांचा सहनी सहर्ष स्वीकार केला होता. आजच्या काळात हिंदुत्वाची चळवळ प्रबोधनपरंपरेचे बोट सोडून भरकटत तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत असताना तर सहंच्या मांडणीचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते.
आर्थिक धोरणांच्या बाबतीतही सहंचा दृष्टीकोन आणि मांडणी स्वतंत्र होती. सरसकट सरकारीकरण, उद्योगांवरील जाचक निर्बंध, झालेले नुकसान यांविषयी नव्वदनंतरच्या काळात खूप लिहिले-बोलले जाऊ त्यामुळे देशाचे लागले आहे. उद्योग-व्यापाराच्या एकूण व्यवहारांतील कृत्रिम अडसर दूर केले पाहिजेत, भांडवली गुंतवणूक आकर्षित करायला हवी, याविषयी एक प्रकारची सर्वपक्षीय सहमती बऱ्याच अंशी आज आढळते; पण सत्तर-ऐंशी दशकात ही मांडणी करणे हे महत्त्वाचे आणि प्रवाहाच्या विरोधात होते, यात शंका नाही.
त्यामुळे १९९१मध्ये आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, ती एका प्रकारच्या हतबलतेतून; परिस्थितीच्या रेट्यामुळे. त्याची आवश्यकता व्यक्त करणारे पुरेसे विचारमंथनच आपल्याकडे झाले नाही, याची खंत सहंनी वेळोवेळी व्यक्त केलेली दिसते. ते लिहितात : गेल्या कित्येक दशकांत समाजवादी किंवा डावे विचारवंत विपुल झाले; परंतु उदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाचा प्रभावी समर्थक भारतात निर्माण झाला नाही. तसे मत मांडण्याचा कोणी प्रयत्न केलाच, तर त्यामागे त्यांचे हितसंबंध असणार असे गृहीत धरण्यात आले.
‘उडी मारून समाजवाद’ या शीर्षकाच्या लेखात ते म्हणतात : “भांडवलशाहीच्या गुणांचीही दखल घ्यावी, असे आपल्याकडील विचारवंतांना प्रकर्षाने कधी वाटले नाही, याची कारणे अनेक असू शकतील. वणिग्वृत्ती आणि अर्थप्रेरणा यांना आपल्या सांस्कृतिक वारशात गौण स्थान आहे. शिवाय ऐहिकापेक्षा पारलौकिकाचे आकर्षण आपल्या पूर्वजांना अधिक होते. त्यातून भांडवलशाही आपल्याकडे आली ती पारतंत्र्याची सहचरी म्हणून. इंग्रजांनीही एतद्देशीय भांडवलशाहीला बराच काळ रोखून धरले. रशियातल्या समाजवादी क्रांतीनंतर मार्क्सवादाच्या लाटेत भांडवलशाहीविरोधी पूर्वग्रह अधिक बळावले. देशाचे आणि नियोजनाचे अनेक वर्षे आधिपत्य करणाऱ्या नेहरूंना रशियन अर्थव्यवस्थेचे आकर्षण होते. एकूणच भांडवलशाही हा एक 'घाणरेडा शब्द झाला. परिणामी जी भांडवलशाही आपण राखली, ती मनात हजार शंका साठवून आणि अपराधीपणाच्या भावनेने... या भारतीय समाजाची एकदा नीट घुसळण होऊन जाती-जातींच्या भिंती कोसळून जायला हव्यात. पण हे काम समाजवादाने घडून येण्याची शक्यता कमी, अशा अवस्थेत भांडवलशाही-समाजवाद या द्वंद्वाचा आपण आपल्या परिस्थितीच्या संदर्भात पुन्हा विचार केला पाहिजे.” (साधना, २६ नोव्हें. १९८८)
‘मार्क्सवाद आणि सामाजिक न्याय’ या विषयावर सहंनी ‘मराठी अर्थशास्त्र परिषदे’च्या अध्यक्षस्थानावरून मांडलेला निबंधही काही गृहीतकांना धक्का देणारा आणि नव्याने विचार करायला लावणारा होता. त्यात कार्ल मार्क्स यांच्या लिखाणात ‘वितरणात्मक न्याया’ला (Distributive Justice) फारसे स्थान दिसत नाही, अशी टीका केली आहे. प्रा. नलिनी पंडित या विचारवतीने केलेला त्याचा प्रतिवाद आणि त्याला सहंनी दिलेले विस्तृत उत्तर हा भाग मुळापासून वाचायला हवा. (काही आर्थिक, काही सामाजिक; मौज)
मार्क्सवादावरील टीकेकडे कशा रितीने पाहिले जात असे, याचे प्रत्यंतर हा ‘वाद-प्रतिवाद’ वाचताना येतेच, परंतु सहंचा धारदार तर्क, युक्तिवाद कौशल्य आणि अभ्यासविषयातील सखोल ज्ञान याचीही प्रचिती येते. आपल्या वैचारिक भूमिकेविषयीच संभ्रम निर्माण केला जात आहे. ‘भांडवलशाहीचा समर्थक’ या शेलक्या संबोधनाने आपली भूमिका कमकुवत दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, याबद्दल त्यांनी सात्त्विक संताप व्यक्त केला आहे. याच प्रत्युत्तर लेखात आपली वैचारिक भूमिका काय याचे विवेचन सहंनी केले आहे. ते या ठिकाणी करणे सयुक्तिक ठरेल.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
“मार्क्सवादाच्या मर्यादित अर्थाने ‘शोषण’ नष्ट झाले की, सगळा न्याय पृथ्वीतलावर अवतरतो, असे मला वाटत नाही. किंबहुना नव्या अन्यायाची बीजे मार्क्सवादी समाजवादात आहेत. त्या तुलनेत भांडवलशाहीत अन्यायनिवारणाची शक्यता तिच्यातल्या व्यक्तिस्वातंत्र्यामुळे अधिक आहे. याचा अर्थ एकूण भांडवलशाही मला जशीच्या तशी प्रिय आहे, असा होत नाही. भांडवलशाही समाजरचनेत बदल घडवून आणण्याची खरोखर तीव्र गरज मला वाटते; गरिबीचे निवारण आणि आर्थिक-सामाजिक समता ही इष्ट ध्येये आहेत, अशी माझी धारणा आहे. वर्गकलहाची गरज मी मान्य करतो; पण शोषक-शोषित वर्गाच्या व्याख्या काळजीपूर्वक केल्या पाहिजेत, मार्क्सने पाडलेले ठोकळेच स्वीकारून चालणार नाही. इतर व्यवहारांप्रमाणेच अर्थव्यवहारावरही समाजाचे विशिष्ट परिस्थितीत नियंत्रण अवश्य ठरते, हे मी मान्य करतो आणि या अर्थाने मी समाजवादी आहे. पण देशाची सगळी संपत्ती एका छोट्या गटाच्या अधीन करून त्याच्या हातात गळफासाच्या दोऱ्या देणे म्हणजे समाजवाद असे मी मानीत नाही. समाजवादावर माझे प्रेम आहेच; पण व्यक्तिस्वातंत्र्यावर अधिक आहे. शेक्सपिअरचा ब्रुट्स म्हणतो : ‘नॉट दॅट आय लव्ह सीझर लेस, बट आय लव्ह रोम मोअर’ तशी माझी स्थिती आहे. ‘नॉट दॅट आय लव्ह सोशॅलिझम लेस, बट आय लव्ह फ्रीडम मोअर’. व्यक्तिस्वातंत्र्य मला हवे ते माझ्या किंवा ‘मध्यमवर्गा’च्या खासगी गरजेसाठी नसून सर्व प्रकारच्या सामाजिक-नैतिक ऊर्जांचा मूलस्रोत म्हणून हवे आहे.”
सहंची वैचारिक भूमिका यात नेमक्या शब्दांत आली आहे. एकतर ‘हे’ किंवा ‘ते’ अशा ‘बायनरी’त (द्वि-मिती ध्रुवीकरण) सहंना अडकविता येणार नाही, याची जाणीव करून देणारे हे निवेदन आहे. यातील स्वातंत्र्याबद्दलची आस्था आणि त्याचे ‘सामाजिक-नैतिक ऊर्जांचा मूलस्रो” हे वर्णन महत्त्वाचे आहे. या वैचारिक भूमिकेच्या प्रकाशात सहंचा राष्ट्रवादाचा आग्रहही समजून घेता येतो. स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावत जाणे, हेच कोणत्याही प्रगतिशील समाजाचे लक्षण असते. अनेक पिढ्यांनी संघर्ष करून मिळवलेल्या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण, संवर्धन करणे ही पुढच्या पिढ्यांची जबाबदारी आहे.
सहंनी राष्ट्रवादाच्या अभ्यासाची जी वाट घालून दिली, ती या संदर्भात अत्यंत मोलाची आहे. बरीच वर्षे आपल्याकडे ज्या विषयाच्या बाबतीत ‘कानठळ्या बसवणारी शांतता’ होती, तिचा भेद करून राष्ट्रवाद आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या प्रश्नांचे गांभीर्य आणि महत्त्व याकडे वैचारिक जगताचे लक्ष वेधण्याचा सहनी सातत्याने प्रयत्न केला. ही कामगिरी लहानसहान नाही.
‘ऐवज विचारांचा : स.ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह’
संपादक - डॉ. चंद्रहास देशपांडे, निरंजन आगाशे, विनया खडपेकर, मंगला गोडबोले, प्रा. प्रदीप आपटे
राजहंस प्रकाशन, पुणे | पाने - ४४० | मूल्य - ५०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment