अजूनकाही
माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून घोषणा झाल्यावर महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का बसला. सर्व बाजूंनी अपेक्षेप्रमाणे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सपकाळ हे राज्याच्या राजकारणात तुलनेने फारसे माहीत नसलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या वजनदार नेत्याची निवड होईल, अशी अपेक्षा असणाऱ्या सोशल मीडियावरील अनेक कट्टर काँग्रेस समर्थकांनी निराशा व्यक्त केली. काहींनी तर त्यांच्या नियुक्तीवर जाहीर टीकाही केली.
मात्र, नागरी संघटना आणि निरनिराळ्या वैचारिक गटांतल्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या या नवीन अध्यक्षांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यांच्याकरता ही नियुक्ती एक सुखद आश्चर्यच ठरले. एखाद्या राजकीय पदावरील नियुक्तीला नागरी समाजाकडून मिळालेला इतका उत्साहवर्धक पाठिंबा पाहून राजकीय वर्तुळही तितकेच आश्चर्यचकित झाले. या सुरुवातीच्या प्रतिक्रियांवरून असे दिसून येते की, सपकाळ यांच्या निवडीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे आणि चर्चेला तोंड फोडण्यात काँग्रेसचे नेतृत्व यशस्वी झाले आहे.
अशी चर्चा सुरू होण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या पार्श्वभूमीचा मोठा भाग आहे. ५७ वर्षांचे हर्षवर्धन सपकाळ हे पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. महाविद्यालयात शिकत असताना ते राज्यस्तरीय कबड्डीपटू होते, आणि ते जिथून येतात त्या विदर्भात प्रसिद्धही होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या काळात ते काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या (NSUI) संपर्कात आले, मात्र त्या वेळी ते संघटनेत सामील झाले नाहीत. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या मूळ बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात सामाजिक कार्यावर लक्ष केंद्रित केले आणि आदिवासी वस्त्यांमध्ये फिरून आरोग्य तसेच शिक्षणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले.
या कामामुळे ते विदर्भातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांशी जोडले गेले. विदर्भात गांधीवादाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. महात्मा गांधींनी वर्ध्यात आश्रम स्थापन केला आणि त्यांचे शिष्य विनोबा भावे यांचा आश्रम जवळच पवनारमध्ये आहे. यातून गांधीवादी कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळे या भागात निर्माण झाले होते. सपकाळ त्यांच्यापैकी अनेकांच्या कामात सहभागी झाले, विनोबांच्या सर्वोदय तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झाले. यातूनच पुढे ते महाराष्ट्रभर पसरलेल्या सर्वोदय मंडळाशी जोडले गेले आणि त्याद्वारे त्यांचे निरनिराळ्या सामाजिक कार्यक्रमांसाठी पुण्यामुंबईला येणे-जाणे वाढले.
अशाच एका भेटीदरम्यान सपकाळ यांची ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या नरेंद्र दाभोलकर यांच्याशी भेट झाली. त्यांना दाभोलकरांच्या कार्याचे महत्त्व कळले, कारण उपेक्षित समुदायांच्या प्रगतीत अंधश्रद्धा हा एक मोठा अडथळा होता. कबड्डी हा त्या दोघांना जोडणारा आणखी एक दुवा होता - दोघेही राज्यस्तरीय खेळाडू होते आणि दाभोलकर यांना तर कबड्डीसाठीचा महाराष्ट्राचा सर्वोच्च राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार मिळाला होता.
कालांतराने हर्षवर्धन यांना सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून राजकारणाची गरज लक्षात आली. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. वर्षभरातच ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्या वेळी काँग्रेसचे सध्याचे सरचिटणीस मुकुल वासनिक हे बुलढाण्याचे खासदार होते. सपकाळ यांची क्षमता ओळखून वासनिक यांनी त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी ते सर्वांत तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष झाले.
परिवर्तनशील नेतृत्व आणि राजकीय संघर्ष
१९९९ ते २००२ या काळात बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सपकाळ यांनी भरीव काम करून परिवर्तन घडवून आणले. त्यांनी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात. सपकाळ यांनी केवळ पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली नाही, तर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांच्या या कामाची दखल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली.
परंतु २००२ ते २०१४ हा काळ सपकाळ यांच्याकरता राजकीय संघर्षाचा राहिला. २००९मध्ये त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. १९९०च्या दशकाच्या अखेरीस बुलढाणा जिल्हा शिवसेनेकडे वळू लागला होता आणि शिवसेना-भाजप युतीचा जोर वाढला होता. गांधीवादी विचारसरणीची पिछेहाट होत होती, परंतु सपकाळ त्यांच्या मतदारसंघात सक्रिय राहिले. अखेर २०१४मध्ये महाराष्ट्रात भाजपची लाट असूनही त्यांनी त्यांची जागा जिंकून अनेकांना आश्चर्यचकित केले.
तोवर राज्यात काँग्रेसची सत्ता गेली होती. हर्षवर्धन सपकाळ यांनी एक गंभीर आणि अभ्यासू आमदार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. २०१९मध्ये भाजपने त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र सपकाळ यांनी तसे सर्व प्रस्ताव धुडकावून लावले. काँग्रेस विचारधारेशी असणाऱ्या निष्ठेमुळे त्यांना काँग्रेसमध्ये अधिकाधिक मोठ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. त्यातून मीनाक्षी नटराजन यांच्यासारख्या निष्ठावंत काँग्रेस नेत्यांच्या ते संपर्कात आले. त्यांनी पक्षांतर्गत देशभरातील अनेक भूमिका स्वीकारल्या. परंतु त्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघापासून दुरावले व त्याचीच परिणती २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवात झाली.
या पराभवानंतर सपकाळ राष्ट्रीय स्तरावरील पक्ष संघटनेकडे वळले. नटराजन यांच्याकडे काँग्रेसअंतर्गत ‘राजीव गांधी पंचायतराज समिती’ (RGPRS) या उपक्रमाची जबाबदारी होती. ही समिती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देते. लोकशाहीत स्थानिक पातळीवरील प्रशासन जी कळीची भूमिका बजावते, त्यावर ‘राजीव गांधी पंचायतराज समिती’चा प्रामुख्याने भर आहे. सपकाळ या प्रशिक्षणाच्या कामात सामील झाले आणि त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना विकासात्मक तसेच वैचारिक कामात सहभागी करून घेऊन ‘राजीव गांधी पंचायतराज समिती’चा गेल्या पाच वर्षांत संपूर्ण भारतात विस्तार करण्यात मदत केली.
हे होत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘संगम’ नावाचा प्रशिक्षण उपक्रम सुरू केला. दैनंदिन जीवनात आणि राजकारणात संवैधानिक मूल्यांबद्दल लोकांना शिक्षित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आणि राहुल गांधींचे आणखी एक जवळचे सहकारी सचिन राव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ‘संगम’ या उपक्रमाला महत्त्व प्राप्त झाले. सपकाळ हे या उपक्रमाचा अविभाज्य भाग झाले आणि प्रशिक्षणाच्या प्रयत्नांकडे लक्ष पुरवत होते. राहुल गांधींच्या निकटच्या वर्तुळाशी असलेल्या त्यांच्या संबंधांचा महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होण्यात मोठा वाटा आहे, असे म्हटले जात आहे.
वैचारिक लढा धारदार होणार
भाजपविरोधी वैचारिक लढाई अधिक तीव्र करण्याचा आपला मनसुबा असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसने सपकाळ यांच्या नियुक्तीतून दिले आहेत. ‘महाराष्ट्र हा काँग्रेसचा शेवटचा गड होता’, असे राजकीय शास्त्रज्ञ सुहास पळशीकर यांनी नोंदवले आहे. हा किल्ला दोन कारणांमुळे ढासळू लागला आहे: पहिले कारण म्हणजे गेली काही दशके पक्षाची भरकटलेली वैचारिक दिशा आणि दुसरे म्हणजे एकेकाळी त्याच्या संरचनेचा कणा असलेल्या सहकारी अर्थव्यवस्थेचा ऱ्हास. पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दुहेरी रणनीती आवश्यक आहे - पक्षाची नाळ पुन्हा एकदा त्याच्या मूळ विचारसरणीशी जोडणे आणि महाराष्ट्राच्या बदलत्या अर्थकारणाशी जुळवून घेणे. सपकाळ यांची नियुक्ती हे या दिशेने पहिले पाऊल आहे.
परंतु सपकाळ यांना महाराष्ट्राच्या समकालीन राजकीय पटाशीही जुळवून घ्यावे लागेल. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १३ जागा जिंकल्या तसेच एका अपक्ष खासदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभा खासदारांच्या बाबतीत काँग्रेस राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला. मात्र पाच महिन्यांच्या आतच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या आणि धक्कादायक घसरण होऊन पक्ष पाचव्या स्थानावर फेकला गेला. पक्षाला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.
महाराष्ट्रातील प्रस्थापित वजनदार काँग्रेस नेत्यांशी समन्वय साधणे हा त्यांच्यासमोरील सर्वांत मोठा अडथळा असेल. त्यांच्यापैकी अनेकांकडे जसे साखर कारखाने, शैक्षणिक संस्था, दूध उद्योग किंवा इतर मोठ्या आर्थिक मालमत्ता आहेत, तशा सकपाळ यांच्याकडे नाहीत. ते कोणत्याही राजकीय घराण्यातूनही येत नाहीत. त्यांची पत्नी बुलढाण्यातील एका महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहे. मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतील नेता म्हणून त्यांना पक्षाच्या मोठ्या नेत्यांना एकत्र आणावे लागेल. हे ते कसे साध्य करणार असे विचारले असता सपकाळ यांनी सांगितले, “मला विधान परिषदेचे सदस्य, राज्यसभेचे खासदार किंवा मुख्यमंत्री व्हायचे नाही. पुढला मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला पाहिजे हे माझे ध्येय आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही वरिष्ठ काँग्रेस नेत्याशी माझी स्पर्धा नाही.”
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत असतानाच्या सपकाळ यांच्या या विधानातून त्यांच्या राजकीय हुशारीची चुणूक दिसते. पण खरे काम पुढे आहे. पुढील लोकसभा निवडणुकीला अजून ४८ महिने शिल्लक आहेत आणि या काळात त्यांना एक लाख मतदान केंद्रांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना संघटित आणि प्रशिक्षित करून निवडणुकांकरता सुसज्ज करावे लागेल. अनुसूचित जाती, अल्पसंख्याक आणि ग्रामीण भागातील सरंजाम घराणी यासारख्या आपल्या पारंपरिक मतदारांपलीकडच्या मतदारांना आपलेसे करत काँग्रेसला आपला जनाधार वाढवावा लागेल.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
गमावलेले ‘किलर इन्स्टिंक्ट’ पुन्हा कमावण्याची गरज
५० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र काँग्रेस सत्तेत होती आणि तिच्यावर सरंजामशाही कुटुंबांचे वर्चस्व होते. या नेत्यांनी विरोधी पक्षात राहण्याची कला कधीही आत्मसात केली नाही. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आजच्या भाजपचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली विजिगीषू वृत्ती (‘किलर इन्स्टिंक्ट’) त्यांनी गमावली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना पक्षातील ही प्रवृत्ती पुन्हा जिवंत करावी लागेल किंवा जमिनीवरील लढाईपासून सरंजामशाही घटकांना दूर ठेवावे लागेल.
महाराष्ट्रात काँग्रेसची प्रतिमा बदलणे हे आणखी एक कठीण काम असेल. प्रस्थापितांचा पक्ष ही प्रतिमा बदलून पक्षाला आता सामान्य लोकांचा पक्ष म्हणून स्वतःची नवी प्रतिमा तयार करावी लागेल. हे साध्य करण्यासाठी सपकाळ यांना सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षरचनेत सामावून घ्यावे लागेल आणि त्यांच्या कामाला तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडावे लागेल. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातील कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना लोकांच्या प्रश्नांशी नव्याने जोडणे हे त्यांच्यापुढचे खरे आव्हान आहे.
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सपकाळ यांनी १७ फेब्रुवारी रोजी मुंबईला पहिली भेट दिली. सामान्यतः अशा वेळी नवीन अध्यक्षांचे स्वागत करणारे होर्डिंग्ज शहरभर लावले जातात. परंतु, सपकाळ यांच्या बाबतीत तसे चित्र नव्हते. याउलट, मुंबईत आल्यावर जिथे ते नेहमी राहतात त्या सर्वोदय मंडळाच्या कार्यालयातच ते राहिले. हे म्हणजे दक्षिण मुंबईतील एक अतिसामान्य वसतिगृह. एकेकाळी विनोबा भावे इथे राहत. सपकाळ आपल्या पत्नी आणि मुलासह आले.
एकीकडे त्यांची साधी राहणी आणि दुसरीकडे पंचतारांकित हॉटेले, आलिशान गाड्या यांना सरावलेले काँग्रेस नेते यांच्यातील फरक अगदी लख्ख दिसत होता. आजच्या राजकीय वातावरणात गांधीवादी साधेपणाचा त्यांचा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे. जेव्हा त्यांना विचारले की, आधुनिक राजकारणात हा साधेपणा चालेल का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “गांधीजी एकदा म्हणाले होते, ‘जेव्हा तुमच्यासमोर एखादी समस्या उभी राहील, तेव्हा मुळांशी जा.’ मी माझ्या मुळांजवळ आहे. आम्ही आता पाटी कोरी करून शून्यापासून सुरुवात करत आहोत.”
खरोखरीच, महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी आता संपूर्ण फेरबदल आवश्यक आहे आणि हर्षवर्धन सपकाळ या मोहिमेत आता बिनीचे शिलेदार आहेत.
भाषांतर : डॉ. निमिष साने
.................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख ‘फ्रंटलाईन’ या इंग्रजी पाक्षिकाच्या १८ फेब्रुवारी २०२५च्या अंकात प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment