९८व्या अ.भा.म. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकरांचे शाल-जोडे, शेला-पागोटे, कानपिरगाळणी, दणके आणि तडाखे
पडघम - साहित्यिक
तारा भवाळकर
  • डॉ. तारा भवाळकर
  • Sat , 01 March 2025
  • पडघम साहित्यिक तारा भवाळ Tara Bhavalkar

२१, २२, २३ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. ते अनेक कारणांनी गाजले. पण संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण खरं तर जास्त गाजायला हवे. त्याचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

मराठी भाषेला ‘अभिजात’ म्हणून शासनमान्यता मिळाली, याचा सर्व मराठी भाषिकांप्रमाणे मलाही आनंद झाला. शासकीय दर्जा मिळाल्याने काही आर्थिक लाभ महाराष्ट्राला, मराठी लेखक, कवी, संशोधक आणि महाराष्ट्रातील साहित्यिक उपक्रम राबवणार्‍या संस्थांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी संस्थात्मक पातळीवर, विद्यापीठीय पातळीवर भरीव कार्य करेल आणि करावे, अशी अपेक्षा आहेच. त्याची किती पूर्तता होते, हे येणारा काळ ठरवील. अर्थात त्यासाठी मराठी जनांची सर्वतोपरी प्रयत्न करण्याची तयारी पाहिजे.

ही अपेक्षा बाळगत असताना काही धोक्याचे लालबावटेही समोर फडकत आहेत. भाषा आणि संस्कृती या सजीव संस्था आहेत. ज्याप्रमाणात भाषेचे चलन समाजात सर्वसामान्य माणसांच्या व्यवहारात, आचरणात असेल, त्याप्रमाणात भाषा विकासाची शक्यता असते. भाषेद्वारा सांस्कृतिक अभिव्यक्ती होत असते.

वयाचं जवळजवळ शतक पार करत असताना सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रात सजगपणे दीर्घकाळ वावरणारी एक भारतीय व्यक्ती म्हणून मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल मला साधार साशंकता वाटते. जो समाज उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या काहीसा स्थिरस्थावर झालेला असतो, ज्याची आकांक्षा सर्व स्तरावर जागतिकतेशी स्पर्धा करण्याची असते, तो अभिजनांचा एक महत्त्वाचा स्तर आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, यंत्रयुगोत्तर काळामध्ये आणि विशेषतः आता तंत्रवैज्ञानिक युगाच्या काळामध्ये त्यांची संख्या चढती वाढती आहे. अशा काळात सर्वसामान्यांच्या मराठीचे काय होणार, अशी शंका मनाला साधार भेडसावते आहे.

कारण मराठीला जो ‘अभिजात’ दर्जा मिळाला, त्याच्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न झाले, आमच्या आधुनिक विद्वानांनी त्याच्याबद्दल संशोधनात्मक अक्षरशः शेकडो पानी अहवाल सादर केले, पण त्याच्याआधी जवळजवळ मध्ययुगापासून आमच्या लेखक-कवींच्या मनामध्ये मराठीला हवा तो दर्जा मिळत नाही, याबद्दल खंत असे. त्याच्यामध्ये आमचे संत, निरनिराळ्या पंथांचे आचार्य यांचा समावेश होता. म्हणजे ही जुनी गोष्ट आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माणूस जेव्हा केव्हा जन्माला आला असेल, तेव्हापासून तो आपल्या भोवतालच्या वातावरणातून बर्‍याच गोष्टी शिकत आला आहे. तिथल्या निसर्गाने, गरजांनी आणि हवामानाने त्याला चालीरिती, रूढी शिकवल्या. हे सगळं निसर्ग माणसाकडून करून घेत आलेला आहे आणि माणूस त्या निसर्गाला साद-प्रतिसाद देत आला आहे. त्याच्या ज्या भावना, श्रद्धा, आचरण, घरे, बोलणं, देवता, अन्न, हे तिथल्या निसर्गाने घडवून आणलं. याला आपण ‘संस्कृती’ म्हणतो… ही आदिवासींची संस्कृती, ही अमक्याची संस्कृती, तमक्याची संस्कृती…

आदिवासींची संस्कृती म्हणजे काय? त्या काळामध्ये जो भूगोल होता, त्याच्या भोवताली, त्या भूगोलाने त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलं. खायचं काय? निसर्ग देईल ते. घरं कशी बांधायची? निसर्गाने त्या भागामध्ये जी साधनं उत्पन्न केली असतील ती घेऊन. माणसाला पहिल्यांदा झोपडी बांधायचंही ज्ञान नव्हतं. तो तयार गुहेमध्ये रहायला लागला. नंतर झोपडी बांधायला लागला. चिमण्यांची घरटी पाहून, निसर्गाने त्याला शिकवलं. याला आपण म्हणतो ‘मानववंशशास्त्र’ (Anthropology).  

मानववंश जन्माला आल्यापासून आजपर्यंत जी स्थित्यंतरं झाली, जी निसर्गाने आणि भोवतालच्या वातावरणाने झाली, मग नंतरच्या काळामध्ये निरनिराळ्या संस्कृतींच्या लोकांच्या सरमिसळीमुळे झाली, देवाणघेवाणीमुळे झाली, हे मानववंशशास्त्र.

माणसाच्या वंशाने हे सगळं निर्माण केलं, स्वीकारलं. काही गोष्टी नाकारल्याही. काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी अनावश्यक वाटायला लागतात, काही गोष्टीत सुधारणा करावीशी वाटते. काही गोष्टी एकदम सोडून द्याव्या वाटतात, काहींत थोडंसं परिवर्तन करून त्या वापराव्याशा वाटतात. या सगळ्याचा जो इतिहास आहे, हा ‘माणसाचा इतिहास’ आहे. ज्याला आपण ‘समाजशास्त्र’ म्हणतो.

हा समाज माणसाचा कसा घडत आला, तर निसर्ग, माणूस आणि ‘मी आणि माझ्या भोवतालचं जग’, यांच्यामधला जो नातेसंबंध आहे, त्याच्यातून हे मानववंश, समाजशास्त्र, त्यामागचं माणसाचं मन आणि श्रद्धा, देवदवता, भावभावना, संवेदना, या सगळ्या देवाणघेवाणीतून माणूस घडत आलेला आहे. त्याला आपण ‘संस्कृती’ म्हणतो.

.............................................................................

आमच्या संस्कृतीत असं आहे अन् तुमच्या संस्कृतीत तसं आहे. अहो, साधी गोष्ट आहे, घाटावरचा गणपती आला की, त्याला गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य चालतो किंवा गूळ-खोबर्‍याचा मोदक चालतो आणि कोकणामधल्या गणपतीला ओल्या नारळाचा मोदक चालतो. हे कुणी शिकवलं? हे काय गणपतीनं सांगितलं? हे तिथल्या निसर्गाने सांगितलं. कारण कोकणामध्ये नारळ विपुल आहेत, खोबरं कोरडं होईपर्यंत शिल्लकच राहत नाही.

घाटावर ओलं खोबरं मिळणं ही काल-परवापर्यंत मुष्किल गोष्ट होती. आता व्यापाराच्या सोयी झाल्यामुळे कुठेही काहीही मिळतं. हे सगळं व्यापारानंतर, देवाणघेवाणीनंतर सुरू झालेलं आहे. परंतु क्रमाक्रमानं माणसाचा जो विकास होत गेला, त्यात खाणं-पिणं, राहणं, कपडेलत्ते सगळं आलं. माणसाने कपडे कुठले वापरावेत, हे तिथला निसर्ग ठरवतो. तुम्ही नाही ठरवू शकत. थंडी कडकडीत पडली की, तुम्ही काय असेल ते पांघरता, जनावराचं कातडंसुद्धा पांघरता आणि जर उकडायला लागलं, तर उघडेबंब राहता. हे निसर्ग ठरवतो.

मग यंत्रतंत्र युग आलं. त्यातून निरनिराळी वस्त्रं निर्माण झाली, फॅशन आल्या, परंतु निसर्गाने आम्हाला मूलतः जगायला शिकवलं आहे. म्हणून याला ‘लोकसंस्कृती’ म्हणायचं. हा जो धर्म आहे, त्याला मी ‘लोकधर्म’ म्हणते.

सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आजतागायत जो प्रचलित आहे तो ‘लोकधर्म’. त्यावर तुम्ही हिंदू, मुस्लीम, ख्रिचन कुठलाही शिक्का मारा, परंतु लोकांच्या जगण्यातून ते आपोआप निर्माण झालेलं आहे, तो ‘लोकधर्म’ आहे. म्हणून मग तुम्हाला असं दिसेल की, रूढार्थाने इथला धर्म जरी बदलला आणि भौगोलिक परिस्थिती तीच असली, तरी चालीरिती, रूढींमध्ये फारसा फरक पडत नाही. म्हणून धर्मांतर करूनसुद्धा ‘संस्कृत्यंतर’ होतंच असं नाही.

या सगळ्याकडे डोळसपणे पाहताना एक मला अतिशय आश्चर्याची गोष्ट वाटली. काही विधी हे सर्वत्र समान असतात. विशेषतः लग्नातली हळद हा विधी आदिवासी जमातींपासून, धर्मांतरित जमातींपासून महाराष्ट्रातल्या उच्चवर्णीयांपर्यंत सर्वत्र आहे. त्याचे तपशील वेगळे असतील. हा इस्लाममध्येही आहे. अनुपमा निरंजन उजगरे यांनी ‘ख्रिस्ती स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्या’ या पुस्तकात धर्मांतरित ख्रिस्ती स्त्रियांच्या जात्यावरच्या ज्या ओव्याचे संकलन केले आहे, ते जणू सर्व बहुजन मराठी स्त्रियांच्या ओव्यांचेच संकलन आहे. फक्त ‘विठ्ठला’ऐवजी ‘येशू’चे नाव या ओव्यांत आहे. धर्मांतराने संस्कृती पूर्णपणे बदलत नाही, याचे हे उदाहरण आहे.

सांगलीत माझी एक मुस्लीम मैत्रीण होती. अत्यंत उच्चशिक्षित, हिंदीची प्राध्यापक होती. तिने अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तिचं एक पुस्तक विलक्षण वाटतं. त्याचं नाव मोठं अन्वर्थक आहे - ‘कृष्णा ते जमजम’. हे कुटुंब कृष्णाकाठी राहणारं. लहानपणी ती ज्या गावामध्ये राहत होती, त्यामध्ये शिवशंकराच्या पूजेचं प्राबल्य होतं. तिच्या पूर्वजांमध्ये काही लोक शिवभक्त होते. कृष्णेचा उत्सव अतिशय भक्तिभावाने उत्सव साजरा करणारी मंडळी होती. नंतर तिने हजची यात्रा केली. काबाचा जो प्रस्तर आहे, त्याच्या समोर एक झरा आहे. त्याला ‘जमजम’ असं म्हणतात. त्याच्यात स्नान करणं पवित्र मानलं जातं. म्हणजे एकीकडे कृष्णेत स्नान केलं आणि एकीकडे जमजममध्ये, असा माझ्या आयुष्याचा प्रवास झाला, असे तिने लिहिले आहे.

मला वाटतं की, सांस्कृतिक सेतूच्या दृष्टीने याच्यापेक्षा दुसरी उदाहरणे नसतील. सीमा प्रदेशांमध्ये ही संस्कृतीची देवाण-घेवाण इतकी चालते की, काही विचारता सोय नाही.

.............................................................................

दिल्लीला हे संमेलन तालकटोरा इथं भरत आहे. याचाही एक अनुबंध आहे. दिल्लीची सरहद ओलांडल्यानंतर आपल्याला उत्तरेकडे जाता येतं. दिल्लीच्या ज्या निरनिराळ्या व्युत्पत्ती सांगितल्या जातात, त्यातली एक व्युत्पत्ती आहे- ‘देहली’ म्हणजे उंबरठा. प्राचीन काळापासून निरनिराळ्या राजवटी आल्या, त्यांची राजधानी दिल्ली किंवा दिल्लीचा परिसर होता. अगदी महाभारताच्या राजवटीतसुद्धा. सांगायचं तात्पर्य, महाभारतापासून किंवा त्याच्या आधीपासून दिल्लीचं महत्त्व आहे. कारण हा उत्तर आणि दक्षिणेला सांधणारा भूप्रदेश आहे. त्याला खूप मोठी ऐतिहासिक, पौराणिक अशी परंपरा आहे.

तीच गोष्ट महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्र उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या तळ्यात-मळ्यात एकएक पाय टाकून उभा आहे. उत्तरेकडील संस्कृती आर्यबहुल आहे आणि दक्षिणेकडील संस्कृती द्रविडबहुल आहे. आर्य आणि द्रविड या प्रदेशांचा सीमा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र! आणि म्हणून महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या फार एकारलेला कधी झाला नाही. येथे दोन्ही संस्कृतींची देवाण-घेवाण, उदारमनस्कता सातत्याने राहिली.

ती भाषेमध्येही राहिली आहे. गंमत म्हणून दोन्ही भाषिक एकमेकांची टिंगल करत असतात, नाही असं नाही. कन्नड भाषेचं वर्णन करताना नाटककार गडकर्‍यांनी म्हटलेलं आहे की, एका गाडग्यामध्ये खडे टाकावेत आणि ‘गडगड, गडगड’ आवाज करावा, तसे कन्नड लोक बोलताना आवाज करतात. आणि कन्नड लोक मराठीचे वर्णन करतात- ‘इकड्डे - तिकड्डे’ असं म्हणणारे जे असतात, ते ‘मराठी’ असतात. दक्षिणेकडचे लोक मराठी लोकांचे वर्णन प्राकृतमध्ये करतात की, ‘धडधाकट, काळ्या रंगाचे ‘दिणल्ले गहिल्ले’…’ अशी ही परंपरा आहे.

ही आजपर्यंत टिकते, कारण आमचा एकही कौटुंबिक किंवा सामाजिक असा भाग नाही, जिथे भांडणं होत नाहीत. म्हणजे लग्नं असलं तरी भांडणं होतात, बारसं असो किंवा बारावं असो, भांडणं हा मराठी माणसाचा गुण. काहीतरी खुसपट काढून भांडायचं. सांगायचं तात्पर्य सांस्कृतिक आणि भाषिक देवाण-घेवाण, सीमाप्रदेश ओलांडून, धर्म ओलांडून, जात ओलांडून होत असते, पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते. म्हणून एकारलेपणा टिकत नाही.

आणखी एक महत्त्वाची नोंद. ‘लोकसंस्कृती’ केवळ ग्रामीण, केवळ जुनी असते, असा अलीकडे शहरवासीयांचा एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात लोकसंस्कृती व नागरसंस्कृती यांत सतत आदान-प्रदान होते. किंबहुना ‘लोक’जीवनात ज्या बाबी लोकप्रिय असतात, त्या नागरजन- अभिजन जाणीवपूर्वक उचलतात आणि त्यात काही फेरफार करून तिचे जाणीवपूर्वक नागरीकरण - संस्कृतीकरण करतात. ही प्रक्रिया जीवनाच्या सर्व अंगात सतत चालू असते.

संस्कृतीचे थोर अभ्यासक एम्. एन्. श्रीनिवासन त्याला ‘संस्कृतिकरण’ (लोकनागर प्रक्रिया) असं म्हणतात. उदा. पारंपारिक विध्यात्मक लोककला उणावत असताना त्यातील कलात्मक घटकांचा उपयोग विजय तेंडुलकर ‘घाशीराम कोतवाल’ किंवा सतीश आळेकर ‘महानिर्वाण’सारख्या नाटकांत करतात व ‘लोकनागर रंगभूमी’ निर्माण होते. म्हणून लोकसंस्कृतीचा प्रवाह आदिम ते अद्यतन संस्कृतीच्या सर्व अंगांत चालू आहे.

लोकसंस्कृती ही काळानुसार बदलणारी एक प्रवाही प्रक्रिया आहे. लोकसंस्कृती सर्व माणसांच्या अस्तित्वाला व्यापून राहिलेली आहे. ‘लोक’ हा शब्दच समूहवाचक आहे. बर्‍याच लोकांचे जरा समज वेगळे असतात. त्यांच्यासाठी थोडं स्पष्टीकरण की, इंग्रजीमध्ये जो ‘फोकलोअर’ (Folklore) शब्द आहे. त्याच्यासाठी ‘लोकसाहित्य’ हा शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आहे. आपल्याकडे ‘लोक’ हा शब्द आदरवाचक आहे. म्हणजे लोकमत, लोकसत्ता, लोकभावना यांचा आदर करणारा! हा शब्द भारतामध्ये आदरसूचक अशा प्रकारे निरनिराळ्या भाषांमध्ये वापरलेला आहे. ‘लोकसाहित्या’मध्ये ‘साहित्य’ या शब्दाचा रूढ अर्थ हा केवळ ‘शब्दसाहित्य’ एवढाच आहे, म्हणजे शब्दांनी घडलेलं साहित्य- कथा, नाटक, कादंबरी वगैरे वगैरे.

.............................................................................

आमचं सगळं संतसाहित्य प्रामुख्याने अतिशय उदारमनस्क साहित्य आहे. डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे या संतसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या मोठ्या अभ्यासकाने म्हटलेलं आहे की, ‘संतसाहित्य हे परमार्थीकृत लोकसाहित्य आहे.’ परमार्थ हे उद्दिष्ट आहे, पण ते लोकसाहित्य आहे. लोकजीवनातले अनेक कंगोरे संतसाहित्यामधून व्यक्त झालेले आहेत. संतसाहित्याने बोधाचे काम करावे, अशा प्रकारची एक भूमिका संतांची होती. संत ‘बोध’ करत आले, लोकांना शहाणपण शिकवत आले, परिवर्तनाच्या वाटा सांगत आले. लोकसंस्कृतीने तेच करावं अशी अपेक्षा आहे.

संपूर्ण मध्ययुग संतचळवळीचं युग आहे. संतांनी पहिल्यांदा मराठी भाषा जिवंत ठेवली. भाषा देशाच्या अस्मितेचा फार मोठा भाग असतो. ‘महाराष्ट्रधर्म’ असं शिवाजी महाराज म्हणत आले, महाराष्ट्र धर्म टिकवण्याचं काम अप्रत्यक्ष रितीने संतसाहित्याने भाषेतून व त्यांच्या रचनेतून केलं आणि सर्वसामान्य लोकांचं प्रबोधन केलं. पुढे इंग्रजोत्तर काळात, कामगार चळवळीमध्ये निरनिराळ्या शाहिरांनी लोकप्रबोधनाचं काम केलं.

संतसाहित्यामध्ये संतकवयित्री हा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्याकडे असा एक अपसमज आहे की, आमच्या बायका अडाणी होत्या आणि त्यांना लिहिता-वाचता यायला शिकवण्यासाठी ज्या वेळेला शाळा निघाली, त्या वेळेला बायका शहाण्या झाल्या. संतसाहित्याचा काळ आहे इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकापर्यंतचा. तोपर्यंत कुठेही बायकांसाठी आणि इतरांसाठी शाळा नव्हत्या. म्हणजे लिहायला-वाचायला स्त्रियांना बंदी होती, पण बायका रचना करायच्या थांबत होत्या का? संतरचना बायकांच्या आहेत. निरनिराळ्या जातीजमातीच्या संत आमच्याकडे इसवी सनाच्या ७व्या-८व्या शतकापासून १६व्या-१८व्या शतकापर्यंत आहेत.

उत्तरेकडे गेलो, तर लाल दीदी आहे. लल्लेश्वरी असं तिला म्हणतात. या सगळ्या बायकांचं वैशिष्ट्य असं की, त्यांनी नवरेपणाला झुगारून दिलेलं आहे. लल्लेश्वरीने म्हटलं आहे- ‘‘वस्त्र लेवुन विरळ हवेचे नृत्य करितसे लल्ला मोदे।’’

दक्षिणेकडची आमची अक्कमहादेवी आहे. त्या अक्कमहादेवींनी आपल्या नवर्‍याला - बिज्जल नावाचा राजा - अट घातली, मी शंकर भक्त आहे. त्यामुळे माझ्या घरामध्ये शिवभक्त येणार. त्यांचा आदर झाला पाहिजे. मी ज्या वेळेला शिवअर्चना करत असेल, त्यामध्ये मला विक्षेप चालणार नाही तीन वेळा मी माफ करीन. नंतर मी घर सोडून निघून जाईन.

तिचे शिवभक्त आले, त्यांना त्याने अडवले म्हणून तिने दोनदा माफ केले. नंतर एकदा शिवभक्त आले आणि ती त्यांच्या आदरसत्कारासाठी जायला लागली, त्या क्षणी राजा कामातुर झालेला होता. त्याने तिच्या वस्त्राला हात घातला. ती म्हणाली, या क्षणी मला जाऊ दे. ही तिसरी वेळ आहे. त्याने ऐकलं नाही. तिने त्याचक्षणी ते वस्त्र त्यागलं आणि तशीच्या तशी बाहेर आली. हातामध्ये शिवमूर्ती घेतली आणि ती रस्त्याने चालायला लागली. श्रीपर्वतावर गेली.

हे धाडस उत्तरेकडच्या लल्लेश्वरीपासून दक्षिणेकडच्या अक्कमहादेवीपर्यंत अनेक संतस्त्रियांनी केलेलं आहे.

यात महाराष्ट्रामधीलही संत आहेत. मुक्ताबाईबाबतीत नामदेवानेच म्हटलं होतं की, ‘मुक्ताईचे चित्त चिरंतर मुक्त’. जनाबाई तर ‘आई मेली बाप मेला। आता सांभाळी विठ्ठला॥ मी तुझे गा लेकरु। नको मजसि अव्हेरुं॥’ तिचे आईबाप होते, पण ते अंत्यज जमातीतले होते. लहानपणीच तिला नामदेवांच्या दारामध्ये सोडलेली. नामदेवांचे वडील दामाशेटी म्हणाले, राहूदे. त्यामुळे ती राहिली. त्या घराण्याची सेवा करत करत तिने आपलं सगळं आयुष्य व्यतित केलं.

संत जनाबाईंने जे अभंग रचले आहेत, त्याच्यामध्ये ‘नामयाची दासी जनी’ अशी नाममुद्रा लावली. या ठिकाणी ‘दासी’ याचा अर्थ ‘सेविका’ नाही, ‘शिष्या’. ज्ञानेश्वरांनीसुद्धा स्वतःला ‘निवृत्तीदास’ म्हणवून घेतलेलं आहे. दास याचा अर्थ ‘मी शिष्य आहे’! ही गुरुपरंपरा आहे. सबंध संतपरंपरेमध्ये गुरूच्या बाबतीत कुठेही जातीभेद नाही- मग त्या स्त्रिया असू देत, पुरुष असू देत, राजस्थानमधल्या असू देत, महाराष्ट्रातल्या असू देत, कुठल्याही असू देत.

.............................................................................

मराठीमध्ये दोनच संत स्त्रियांच्या आत्मकथा उपलब्ध आहेत- एक बहिणाबाईची आणि दुसरी विठाबाईची. बहिणाबाईची आत्मकथा खूप प्रसिद्ध आहे. तिचा नवरा ब्राह्मण, उच्चकुलीन, अत्यंत वेदशास्त्रसंपन्न, परंतु लंपट.

तिचे मन गुरू तुकारामांकडे ओढ घेत असलेलं, तिला गुरूने स्वप्नामध्ये दृष्टान्त दिला, असं तिने वर्णन केलेलं आहे. परंतु नवर्‍याला ते सहन झालं नाही. का, तर मी एवढा मोठा ब्राह्मण असून हा तुकाराम शूद्र जातीचा गुरू कसा केला? म्हणून त्याने तिचा खूप छळ केला. तरीही ती स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करून तुकारामाला भेटायला गेली.

विठाबाईची अवस्थाही तशीच, लहानपणी लग्न झालेलं, पती लंपट. ती अबोध बालिका. तिने निरागसपणे वर्णन केलेलं आहे-

‘‘भ्रतार हो मजसि, ओढितो एकांती। मध्यरात्री जाणा समयासी॥

ओढोनिया बहुत मारितो मजसि, भोगावे मजसि म्हणोणीया॥’’

या मराठी संतस्त्रिया आहेत, इतक्या मोकळेपणाने लिहिणार्‍या. आजसुद्धा प्रश्न निर्माण होतात, आमचे सर्वोच्च न्यायालयातले, उच्च न्यायालयामधले न्यायाधीश वाद घालत असतात की, पतीने जर अत्याचार केला किंवा पतीने जर तिच्या परवानगीशिवाय संभोग केला, तर तो गुन्हा मानावा की नाही? तो बलात्कार मानावा की नाही? इथे विठाबाईने हे सांगितलेलं आहे. काळाच्या पुढे गेलेल्या आमच्या संतस्त्रिया होत्या, याकडे आमचं फारसं लक्षच नाहीये.

.............................................................................

१९७५मध्ये ‘स्त्री मुक्ती वर्ष’ नावाची भानगड आली. त्या वेळेला लोक सांगायला लागले की, हे पाश्चिमात्यांकडून आलेलं आहे. त्या वेळेला मला मोठं आश्चर्य वाटायला लागलं. मी म्हटलं हे पाश्चिमात्यांच्याकडून आलेलं नाही, आमच्या बायका फार जबर्‍या होत्या हो!

आणखी एक मोठी संतबाई. ती ‘चोख्याची महारी’ म्हणवते स्वतःला. सोयराबाई तिचं नाव. तिने एक अतिशय मूलभूत मुद्दा सांगितला. ही बाई कुठल्याही शाळा-कॉलेजात गेली नाही, कुठल्याही ‘स्त्र- मुक्तीवाली’कडे गेली नाही. तिला कुठली सिमोन दि बोव्हा माहिती! ती काय म्हणते?

‘‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुद्ध तो जाहला कवण प्राणी॥

उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान। कोण देह निर्माण नाही जगी॥’’

मला असा एखादा माणूस दाखवून द्या की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आलेला नाही. आता आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे. त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा, परंतु त्याचा भांडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी १३-१४व्या शतकांमध्ये केलेला आहे.

यांना ‘स्त्री-मुक्तीच्या उदगात्या’ म्हणायचं की नाही? आजच्या स्त्री-मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशा प्रकारचे विचार आमच्या या स्त्रिया, संतस्त्रिया, निरनिराळ्या जातीजमातीच्या स्त्रिया बोलतात. त्यांची विचारशक्ती, प्रतिभाशक्ती आणि संवेदनशीलता, भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत!

ज्याला आपण ‘कला’ म्हणतो, ती म्हणजे संवेदनशीलता नेमक्या शब्दांत उतरवणं. याच्यासाठी जी प्रतिभा लागते, ती या बायकांजवळ उपजत आहे आणि ती अनुभवातून परिपक्व झालेली आहे. यांच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत की नाही? लक्ष न देता आपण पुढे चाललेले आहोत आणि आम्ही सुधारलेले आहोत, असं आपण म्हणत असतो!

माझ्या जात्यावर दळणार्‍या बायका इतक्या परखडपणे बोलत आलेल्या आहेत; पण गंमत अशी आहे की, लोकसाहित्याचा अभ्यास करणार्‍या आमच्या पुरुषमित्रांनी याचा उल्लेख केलेला नाहीये. त्या ओव्यांमध्ये बापाचं, भावाचं, नवर्‍याचं कसं कौतुक आहे एवढ्याच ओव्या सगळ्यांनी सांगितल्या. पण अरे बाबा, आईच्या मांडीचं तेव्हा काय होत होतं, त्याच्याकडे तुझं लक्ष गेलं का? ते शेवटी दिलं आमच्या एका बाईने. ती आमची इंदिरा संत! त्यांना अगदी अलीकडच्या काळामध्ये काही ओव्या मिळाल्या आणि त्या कर्नाटकातल्या आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रदेशामधल्या आहेत.

‘जातं ओढताना, बाई गं, माझ्या हाताला येती फोडं। माय माऊलीचं मन ऐकुनि कळवळं।’

माय माऊलीला माझी दया येते; कारण माझ्या हाताला गोळे येतात. रोजच्या रोज रात्री उठायचं आणि तीन वाजता उठून दळायला बसायचं. दोन दोन, चार-चार पायली दळायचं ही काही साधी गोष्ट आहे! त्या बायका आपल्या गाणी म्हणत होत्या आणि दळत होत्या. आणि दळताना काय म्हणत होत्या- ‘गाण्याच्या नादात तुला ओढीते दगडा’.

आता करणार काय, कारण आमच्या केशवसुतांनी पुढे सांगितलं. ते म्हणाले- ‘गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके।’ हे त्यांनी श्रम न करता म्हटलेलं आहे, परंतु या श्रम करता करता बायका म्हणताहेत की-

‘‘गाण्याच्या नादात तुला ओढीते दगडा॥

जात्या तू इसवरा नको मला जड जाऊ ॥

सयाच्या दुधाचा बया पाहतात अनुभवु॥’’

आजसुद्धा आईचा उद्धार होतो, तर तेव्हा तर होतच होता. तेव्हा माझ्या आईला कमीपणा यायला नको म्हणून मी ते सगळं करत असते, कष्टाची कामं करते. पुरुष वर्गाकडून माझ्यावर अन्याय होतो, अपमान होतो, हे मला कळत नाही, असं नाही. त्याच्या शेकडो ओव्या आहेत.

‘‘कडुविंद्रावन डोंगरी त्याचा रहावा। पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा॥’’

आता हे तिचं येड पांघरून पेडगावला जाणे आहे की नाही?

तिला तथाकथित ‘शुद्ध’ बोलता येत नसेल, पण तिला काय चाललं आहे त्याचं ‘शुद्ध’ भान आहे! तक्रार फक्त नवर्‍याबद्दल आणि सासरच्यांबद्दलच आहे असं नाही. ज्या वेळेला बाप, भाऊ अन्याय करतात त्या वेळेला त्यांनासुद्धा तिने फटकारलेलं आहे. विशेषतः सवतीवर ज्या वेळेला बाप मुलगी किंवा भाऊ बहीण देतो. तेव्हा काय या पोरी प्रेमविवाह करायला जात नव्हत्या, बापच सवतीवर मुलगी द्यायचा. कारण पुरुषांनी कितीही लग्न करायचे, म्हणून मग ती ज्यांनी दुसरं लग्न लावून दिलं त्या बापालासुद्धा दोष देते.

‘‘सवतीवर लेक दिली जशी साखरेची गोणी। बाप विकून झाले वाणी॥’’.

अशा प्रकारच्या ओव्या बाई ज्या वेळेला म्हणते, त्या वेळेला तिला वास्तवाचं केवढं मोठं भान असतं, इकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाहीये, हे मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं.

.............................................................................

आज ज्या पद्धतीनं माणसांचं जीवन चाललेलं आहे, त्यामध्ये ‘जुनं ते जाऊद्या सगळं, आता नवीन काय ते पहा’, असं एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे जुन्याचाच पुन्हा पुन्हा वापर कसा योग्य आहे, हे सांगण्याचाही प्रयत्न करायचा. विशेषतः लोकांना निरनिराळ्या कर्मकांडांत गुंतवून ठेवण्याचे उद्योग, देवाधर्माच्या नावावर, संस्कृतीच्या नावावर पुन्हा पुन्हा चाललेले दिसतात. त्याच्यामध्ये ‘तथाकथित’ शिक्षित स्त्रिया अडकतात.

लोकसंस्कृतीतल्या आणि संतस्त्रियांनी स्वतःच्या जगण्याचा जेवढा विचार केला, तेवढा या शिक्षित बाया करत नाहीत. स्वतःला पदवीधर म्हणवतात, उच्चशिक्षित म्हणवतात, परंतु आपण हे कर्मकांड का करतो आहोत, याचा विचार करत नाहीत. विधी श्रद्धेने केला जातो, पण ज्या वेळेला ज्या विध्यात्मकतेतली श्रद्धा बाजूला होते, त्या वेळेला जे उरतं त्याला ‘कर्मकांड’ म्हणतात.

आता लोककलांमध्येसुद्धा ‘स्यूडो’ सायन्स ही भानगड आलेली दिसते आहे. परवा मी लोककलांचा एक कार्यक्रम पाहिला मुंबईला. गंमत अशी की, आधुनिक पद्धतीनं लोककला शिकवणार्‍या एका संस्थेमधल्या एका मुलीने हा कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये एक गोंधळ सादर केला. त्याच्यामध्ये तिने असं समर्थन केलं की, बाईने कपाळाला कुंकू लावणं हे कसं आवश्यक आहे, त्याला कसा शास्त्रीय आधार आहे. ती वैज्ञानिक कारणे काय? तर बायकांना फार मानसिक त्रास असतो. कपाळावर मधोमध दोन भुवयांमध्ये दाब बिंदू असतो. त्यावर कुंकवामुळे दाब पडतो आणि त्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य सुरळीत होतं.

मी ऐकलं सगळं आणि नंतर प्रश्न विचारला, कुंकवाच्या दाब बिंदूमुळे स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य ठीक होत असेल, तर मानसिकदृष्ट्या जास्त स्वास्थ्याची गरज कोणाला आहे, लग्न झालेल्या बायकांना का विधवांना? विधवांना जास्त गरज आहे! कारण मानसिकदृष्ट्या त्या जास्त असुरक्षित आहेत. पण विधवांना आम्ही कुंकू लावायचीच मनाई करणार. मग या ‘सायंटिफिक रिझन’ला अर्थ काय आहे?

याला आम्ही काय म्हणणार? विज्ञानाच्या नावावर या खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, आणि यालाच ‘वैज्ञानिक सत्य’ कसं आहे, हे ठासून सांगायचा उद्योग चालू झाला आहे. दुर्दैव म्हणजे ‘तथाकथित’ शिक्षित समाज याला बळी पडतो आहे. हा उलटा प्रवास चिंताजनक आहे.

बरं स्त्रियांना जर मानसिक अस्वास्थ्य असेल, तर पुरुषांचं काय? सगळे पुरुष मानसिकदृष्ट्या स्वस्थ असतात का? नाही. आपण ज्याला ‘सायंटिफिक रिझन’ वा ‘वैज्ञानिक सत्य’ म्हणतो, त्याच्या पाठीमागच्या जो अप्रबुद्धपणा आहे, त्याच्याकडे आमचं लक्षच नाहीये.

तथाकथित उच्चशिक्षित स्त्रिया हे अत्यंत आंधळेपणाने करतायत, असं मला सगळीकडे दिसतं. एखाददुसरी असेल वेगळी, परंतु ज्यांना आर्थिक स्वास्थ्य आहे, सामाजिक दर्जा आहे, त्यांचे मेंदू काम करत नाहीयेत. यांचे मन आणि मेंदू मोकळे करायला पाहिजेत.

यांना सुशिक्षित का म्हणायचं? त्या स्त्रिया असोत किंवा पुरुष असोत. हे ‘साक्षर’ आहेत फक्त. म्हणजे ‘लिहिता-वाचता येणं म्हणजे शिक्षण’ ही जी शिक्षणाची व्याख्या झालीये, ती तोकडी आहे. त्यांना फक्त लिहिता-वाचता येतं. सुशिक्षणाने, ज्ञानाने धीर यायला पाहिजे, ज्ञानाने धाडस यायला पाहिजे, ज्ञानाने भीती वाढायला नको. अज्ञानाने भीती वाढते, ज्ञानाने ती जायला पाहिजे. जर ज्ञानाने भीती जायच्याऐवजी वाढत असेल, तर या लिहिता-वाचता येणार्‍या या पदवीधरांना ‘ज्ञानी’ म्हणायचं का, असे प्रश्न उभे रहायला पाहिजेत.

ज्ञानामुळे माणूस निर्भय व्हायला पाहिजे. या देशातले लोक जर जास्त निर्भय व्हायचे असतील, तर त्यांनी या सगळ्या कोंडाळ्यातून बाहेर यायला पाहिजे. आणि लोकसंस्कृती व लोकविज्ञानाचा सर्वांगानी नीट धांडोळा घ्यायला पाहिजे.

केवळ जुनं आहे म्हणून नव्हे, त्यातलं काही टाकाऊ असू शकतं, त्यातलं काही उपयुक्त असू शकतं. आमच्या नाटककार कालिदासांनी म्हटलं आहे की, ‘जुनं असतं ते सगळं चांगलच असतं असं नाही, नवे असतं ते सगळं टाकाऊ असतं असं नाही’.

शहाणी माणसं विचार करतात आणि टाकाऊ काय, टिकावू काय याचे विवेकाने ग्रहण करत असतात. शहाणी माणसं काय करतात, ती स्वतः परीक्षण करतात, स्वतःचं डोकं चालवतात. आणि मूर्ख जे असतात, ते दुसर्‍याच्या बुद्धीवर अवलंबून असतात.

अमुकतमुक महाराजांनी सांगितलंय, व्हा शरणागत. या शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे, ज्ञानाने माणसाला निर्भय बनवलं पाहिजे. आणि ते जर निर्भय बनवत नसेल, तर त्यांना ‘ज्ञानी’ म्हणायचं का?

.............................................................................

‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’बाबत सध्या बरीच चर्चा आहे. मी काही जाणकार लोकांना विचारलं- ‘ही कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची काय गोष्ट आहे?’ मग त्या क्षेत्रातल्या लोकांनी मला इंग्रजी, मराठी, हिंदीमध्ये लांबलचक निबंधच्या निबंध पाठवले. त्याचे सार मी माझ्या अल्प मतीप्रमाणे काढण्याचा प्रयत्न केला.

तुमच्या माझ्यासारखा सजीव माणूस आजपर्यंत आपलं डोकं चालवून नवं-जुनं ठरवत होता. मी लेखक असेन, तर माझं लेखन जे काही बरं-वाईट असेल, ते माझं मी करत असे. आणखीन कोण दुसर्‍या क्षेत्रातला असेल, तर तो त्याची निर्मिती करत असे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या कर्तृत्वशक्तीची बंधनं संपणार आणि ती तुमच्या बुद्धीपेक्षा जास्त क्षमतेने काम करणार. ती तुमच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाते. म्हणजे मी माझ्या बुद्धीने जर काही ठरवायचं म्हटलं, तर ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ त्याच्यापेक्षा शतपटींनी पुढे जाणार आणि माणूस तोकडा पडणार. मला स्थानच नाही काही.

मी बरा-वाईट अनुभव घेऊन समजा एखादी कथा लिहिली, तर ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ त्यापेक्षाही आणखीन मोठ्या गोष्टी तयार करू शकते, असं मला सांगण्यात आलं. मग मी तयार केलेल्या कथेला काहीच अर्थ नाही. म्हणजे उद्या कुणीही ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ला सांगेल, तारा भवाळकरांसारखं पुस्तक करा, तो फटाफट फटाफट करून देईल!

आता प्रश्न निर्माण होतो, माणसाच्या अस्तित्वाला किंमत राहणार की नाही? कारण माणूस ज्या वेळेला कुठलीही कृती निर्माण करत असतो, त्या वेळेस त्याच्या पाठीमागे त्याचा अभ्यास, विचार असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची संवेदना असते. जर ती संवेदनाच नाहीशी होणार असेल, तर मग जिवंत माणसाचं काम काय?

म. गांधींवर एकेकाळी आरोप होत असे की, त्यांचा यंत्र/विज्ञानाला विरोध आहे. त्यावर महात्माजींचं उत्तर होतं की, यंत्र-तंत्र हे माणसासाठी आहेत, ते माणसाला गुलाम करण्याइतके वरचढ होऊ नये. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात तसे होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. त्यासाठी जगभरच्या शासनकर्त्यांनी आणि वैज्ञानिकांनी सावध रहावे.

उद्या जर कला आणि साहित्य यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेने आक्रमण केले, तर संवेदनशील कलावंत आणि साहित्यिक संपतील की काय? मग आजच्यासारखी साहित्य संमेलने तरी होऊ शकतील का?

.............................................................................

मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळालेला आहे. याबद्दल आपण आनंद व्यक्त करतोच, याबद्दल वाद नाही. प्रश्न असा आहे, ‘अभिजात’ म्हणजे नेमकं काय? मी मुद्दाम शब्दकोश काढून ‘अभिजात’ आणि ‘अभिजन’ या शब्दांचे अर्थ पाहिले. ‘अभिजन’ म्हणजे ‘कुलीन, सभ्य, उच्च, सुसंस्कृत’ असे पर्यायी शब्द दिलेले आहेत. आणि ‘अभिजन’ म्हणजे ‘उत्तम कूळ असलेला, कीर्तिवान’. आता प्रश्न असा येतो की, उच्च कुळामध्ये जन्माला न येऊनसुद्धा माणसे अधिक गुणवान होऊ शकतात की नाही? त्याची उदाहरणे आपल्या पुराणामध्ये, इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत.

त्याचं सर्वांना माहिती असलेलं उदाहरण आहे कर्णाचे. कर्णाने म्हटलेलं आहे की, जन्म कुठे झालाय हे महत्त्वाचं नाही, तर कर्म काय आहे, हे महत्त्वाचं आहे. परंतु पौरुष, पराक्रम, गुणवत्ता वाढवणं हे आपल्या हातात असतं आणि त्याप्रमाणे माझा जन्म सूर्य कुळात झालाय का, आणखीन कोणाच्या पोटी झालेला आहे, मला माहिती नाही. परंतु माझा पराक्रम कसा आहे. मी अर्जुनासारखा बाण मारणारा आहे की नाही, मी धनुर्धर आहे की नाही, मी त्याच्या तोडीचा धनुर्धर म्हणून उभा राहू शकतो की नाही? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

हे केवळ कर्णाच्या बाबतीतच नाही, तर अनेकांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं. अलीकडचे मोठे उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.

आता प्रश्न असा आहे की, ज्या निरनिराळ्या बोली आहेत, त्यांना आपण ‘प्राकृत’ म्हणतो. इंग्रजोत्तर काळामध्ये आपल्याकडे लेखन-वाचन पद्धतीने सार्वत्रिक शिक्षण देण्याची परंपरा सुरू झाली. नंतर शिक्षण म्हणजे लेखन-वाचन येणं, अशा प्रकारची एक परिभाषा निर्माण झाली.

जणू काही ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, ते अडाणी, ते मूर्ख! खरं म्हणजे आपण पुष्कळ उदाहरणे पाहिली की, लिहिता-वाचता न येणारी मंडळी - मग ती स्त्रिया असू देत, संत असू देत, अन्य कुळामधली असू देत - ही अतिशय विचक्षण असू शकतात, संवेदनशील असू शकतात, प्रतिभावंत असू शकतात. जात्यावर दळण दळणार्‍या बायकांपासून संतसाहित्यातल्या स्त्री-पुरुषांपर्यंत विविध जातीजमातींची उदाहरणं आपल्याला दृष्टोत्पत्तीस येतात.

मग लिहिता-वाचता येणं म्हणजे शिक्षण, ही भूमिका कशी तयार झालेली असावी? तर इंग्रजोत्तर काळामध्ये शालेय पाठ्यपुस्तके निर्माण करून ज्या शाळा निघाल्या, त्यामधून मेकॉलेने ती रूढ केली असे म्हणतात. त्या वेळेलाही एक भूमिका होती की, मेकॉलेने काय केलं? तर मास्तर आणि कारकून निर्माण करण्याच्या शाळा निर्माण केल्या. म्हणजे निरनिराळ्या शाळा निघाल्या पाहिजेत, तिथे शिकवायला मास्तर पाहिजेत आणि सरकारी कचेर्‍यांमध्ये कारकून पाहिजेत आणि त्या पद्धतीचे लेखन-वाचन ज्यांना येतं ते शिक्षित, आणि बाकीचे सगळे अडाणी.

आपल्याकडे मूठभर मंडळींमध्ये लेखन-वाचनाची परंपरा वंशपरंपरागत होती. आणि खरं सांगायचं तर ब्राह्मण जमातीमध्ये ही परंपरा दीर्घकाळपासून होती, जुन्या काळापासून असा आपला समज आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर सर्व ब्राह्मणांनासुद्धा नीट लिहिता-वाचता येत होतं, असं नाही. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये याची अनेक उदाहरणं आपल्याला साहित्यामध्येसुद्धा दिसतात.

बेळगावचे गंगाधरपंत देशपांडे नावाचे काँग्रेसचे फार मोठे पुढारी होते. त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. ते बेळगावहून पुण्याला शिकायला आले होते. कारण बेळगावमध्ये उच्चशिक्षणाची सोय नव्हती. त्या काळात मुलामुलींची लग्ने लवकर व्हायची. म्हणजे मुलगे हायस्कूलमध्ये पंधरा-सोळा वर्षांचे असताना लग्नं व्हायची आणि मुली म्हणजे त्यांच्या बायका नऊ-दहा-अकरा वर्षांच्या होत्या. तसे गंगाधरपंतांचे लग्न झालेले होते. ते पुण्याला शिकायला होते, पत्नीशी संपर्क असा फारसा येत नव्हता.

एका सुट्टीमध्ये ते बेळगावला आले. नंतर ते बायकोला हळूच म्हणाले, (कारण त्या घरातल्या पद्धतीप्रमाणे नवरा-बायकोची भेट फक्त रात्रीच व्हायची.) ‘मी तुझ्यासाठी पुण्याहून एक गंमत आणली आहे.’ तिला वाटलं पुण्यावरून आपला नवरा शिकून आलाय, म्हणजे काहीतरी नव्या पद्धतीची साडी-बीडी, दागिना वगैरे असेल. ती बिचारी वाट बघत बसली. तर रात्री त्यांनी पाटी, पेन्सिल आणि पुस्तके बाहेर काढली आणि म्हणाले की, ‘मी तुला आता लिहायला-वाचायला शिकवणार आहे.’ ते पाहिल्याबरोबर त्या बाईचं डोकं फिरलं. ती म्हणाली, ‘मला असलं भलतं काही तरी सांगू नका!’ गंगाधरपंत देशपांड्यांचं बेळगावमधले अतिशय प्रतिष्ठित, उच्चवर्णीय, उच्चशिक्षित असं घराणं, त्या घराण्यातली ही मुलगी म्हणते, ‘मला हे भलतं सलतं काही सांगू नका.’ ते म्हणाले, ‘अगं, आता पुण्या-मुंबईतल्या सगळ्या बायका सर्रास लिहायला-वाचायला शिकतात.’ ती म्हणाली, ‘शिकत असतील! त्यांना लवकर विधवा व्हायचं असेल, म्हणून त्या शिकत असतील.’

समज असा होता की, बाई जर लिहायला-वाचायला शिकली, तर सरस्वतीचा तिच्यावर कोप होतो आणि सरस्वतीच्या कोपाने ती विधवा होते! उच्च-वर्णीयांच्या स्त्रियांमध्ये असलेले समज दीर्घकाळपर्यंत होते. गंगाधरपंत देशपांडे गांधींच्या चळवळीमध्ये काम करणारे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातले. ही तशी अलीकडची गोष्ट, इसवी सनाच्या १९व्या शतकाच्या सुरुवातीची. त्या काळात जर लोकांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी इतका अपसमज असेल, तर मग इतर जातीजमातींमध्ये तो किती मोठा असेल!

त्या काळातलं साहित्य जर बारकाईनं वाचलं, तर अशा अनेक घटना आणि अनेक प्रसंग पहायला मिळतील. या स्त्रिया उच्च कुळातल्या नव्हत्या का?, कुलीन नव्हत्या का? लेखन-वाचन करायची त्यांना मुभा होती का? नव्हती!

.............................................................................

मध्ययुगातले सगळे राज्यकर्ते सरंजामशाही होते. मराठा राज्यकर्ते होते, धनगर राज्यकर्ते होते. ते जास्त कुलीन, जास्त सुसंस्कृत होते. म्हणजे मराठा घराण्यातल्या स्त्रिया आणि पुरुष यांचं जे वर्तन असेल, वागण्याची जी पद्धत असेल, ही जास्त मर्यादित होती, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये. मग ब्राह्मणांच्या स्त्रियाच फक्त कुलीन आणि मराठा स्त्रिया अकुलीन म्हणायच्या का? मराठा लोकांचे उलट म्हणणे असे की, आमच्या स्त्रिया जास्त कुलीन आहेत. का, तर त्यांच्या डोक्यावरच्या पदरातून त्यांचा केससुद्धा दिसत नाही.

कुलीनाच्या संकल्पना प्रत्येक स्तरामध्ये वेगळ्यावेगळ्या असतात. नऊवारी साडी नेसल्यानंतर पायाचा घोटासुद्धा दिसता उपयोगी नाही अशा प्रकारे साडी नेसणे, हे कुलीनतेचे लक्षण होते. कुलीनत्वाच्या कल्पना जात-जमाती नुसार बदलत्या असतात. म्हणून ‘उत्तम कूळ’ म्हणजे काय? हे कुणी ठरवायचे? परंतु आमच्याकडे एक समज असा आहे की, ब्राह्मणाचं कूळ हे उत्तम कूळ! का, तर ‘मनुस्मृती’ने सांगितलेलं आहे म्हणून. अभिजाततेचे उच्चत्व, कुलीनत्व, सुसंस्कृतता या सुसंस्कृततेचे निकषसुद्धा त्यांनी ठरवलेले आहेत.

बाकीच्यांवर ते लादले जाण्याची शक्यता आपल्याला दिसते. त्यामुळे इंग्रजोत्तर काळामध्ये जो ब्राह्मण वर्ग शिकायला, नोकरी करायला लागला, शहरामध्ये स्थिरस्थावर व्हायला लागला, तो आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला. त्यांनी जी काही आपली जीवनशैली निर्माण केली, ती समाजामध्ये आदर्श ठरली. आजही त्यालाच बसंचसं महत्त्व दिलं जातं.

.............................................................................

‘आदिम ते अद्यतन्’ हा परंपरेतला जो प्रवाह आहे, त्या शोध घेणं हा माझा उद्योग आहे. तो अनेकांना करता येतो आणि अनेकांनी तो केलेला आहे. हे करत असताना सबंध सामाजिकतेच्या पातळीवर आपल्याला असे दिसते की, अनेक देवदेवता बहुजनांच्या देवता. काय आहे की, दर खेपेला असं असतच असं नाही. उदा. खंडोबासारखा देव किंवा रेणुकेसारखी देवी, हे भटक्या जातींपासून उच्च जातीपर्यंत असतात, पण हे सर्वच कुळदेवतांबाबत नसते.

पुष्कळदा काय होते की, सर्वसामान्य माणसांच्या ज्या देवता आहेत, त्या अतिशय लोकप्रिय असू शकतात. नुसत्या लोकप्रिय असतात असं नाही, त्यांच्या जत्रा-यात्रा मोठ्या प्रमाणावर भरतात. त्या भरल्या की, त्या देवता स्थानांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळायला लागतं. मग अशा वेळेला उच्चवर्णीय समाज त्या देवतेला पहिल्यांदा हिणकस मानायचा प्रयत्न करतो. ती कशी टाकाऊ आहे, शूद्र लोकांची देवता आहे वगैरे. तरीसुद्धा लोकांमधून तिची लोकप्रियता कमी होत नाही, मग काय करायचं? तर आपण त्याच्यात शिरायचं आणि मग आपणही त्या देवतेची उपासना करायला लागायचं, त्या देवतेला उचलून धरायला लागायचे. त्याला ‘उन्नयन प्रकिया’ असं म्हटलेलं आहे.

एम. एन. श्रीनिवासन नावाचे एक समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी म्हटलेलं आहे की, ‘भारतामध्ये ही प्रक्रिया अखंड चालत आलेली आहे, आणि ती संस्कृतीच्या सर्व अंगांत चालत आलेली आहे.’ आपण बारकाईने अभ्यास केला, तर आपल्याला असं कितीतरी मंदिरांच्या बाबतीत आणि देवतांच्या बाबतीत दिसतं.

‘गणपती’ ही देवता मुळामधली आदिम समाजामधली उग्र देवता. मुळात गणपती विघ्नकारक आहे, त्याला ‘विघ्नहारक’ केला. देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ पुस्तकाचे सुलभ असे मराठीकरण स. रा. गाडगीळांनी केलेले आहे. त्याच्यात ही सगळी वर्णने केलेली आहेत.

अभिजन मंडळी लोकपरंपरेतल्या अनेक फायद्याच्या गोष्टी उचलतात, देवता उचलतात, भाषा उचलतात, पोशाख उचलतात, चालीरिती उचलतात आणि दागिने उचलतात... काय उचलत नाहीत! आणि मग त्याला एक प्रतिष्ठेचं स्थान देतात. याची कितीतरी उदाहरणं आपल्याला सांगता येतील.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, अभिजन परंपरा बर्‍याच वेळेला लोकपरंपरेतल्या काही गोष्टी आपल्या स्वाधीन करून, त्याचे विपरितीकरण करते. आपल्या लोकपरंपरेमध्ये देवतांचे निरनिराळे गजर, म्हणजे जयजयकार असतात. त्या उत्सवाच्या काळामध्ये वगैरे किंवा एरव्हीसुद्धा, भक्त इष्ट देवतेचा जयजयकार करतात.

जेवायची पंगत बसली की, कुणी कुठला तरी श्लोक म्हटला की, मग शेवटी ‘पार्वतीपते हर हर महादेव’, विठ्ठलाचं भजन करायला लागलं की, ‘विठ्ठल रखुमाई’, रामाचं भजन करायला लागलं की, ‘सीताकांत स्मरण जय जय राम’. हे जे सगळे गजर आहेत, याच्यामध्ये सगळीकडे त्या देवतेच्या दाम्पत्याचा उच्चार आहे. पार्वती आणि महादेव, सीतेचा पती श्रीराम आहे, रुक्मिणीचा पती विठ्ठल आहे. या सगळ्या देवतांच्यामध्ये नुसत्या एकेरी देवतांचा गजर कुठे आहे का? तो आता अलीकडे सुरू झालेला आहे. उत्तरेकडे तुलसीदासांनी ‘तुलसी रामायण’ लिहिलं, त्या वेळेससुद्धा ‘सीया वर रामचंद्र की जय’ अशा प्रकारचा गजर होता.

आता त्या स्त्राळ देवतेचा उच्छेद करून टाकलेला आहे, असे आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. या ठिकाणी स्त्रियांचा सन्मान होतो का? असा प्रश्न आहे. तेव्हा अभिजन परंपरा ही उदात्त परंपरा आहे, उच्च आहे, सुसंस्कृत आहे, असे जे म्हटले जाते, त्याला बाध देणार्‍या अशा अनेक गोष्टी मला संस्कृतीच्या प्रवासामध्ये, प्रत्यक्ष आचरणामध्ये अनेक पातळ्यांवर दिसतात. देवतांच्याही पातळ्यांवर दिसतात, आचरणामध्ये दिसतात. म्हणून लोकसंस्कृतीचा आणि अभिजन संस्कृतीचा विचार एकेरी करता येत नाही. त्याच्या पाठीमागे असलेली मानववंश कसा चालत आलेला आहे, ते पहावं लागतं. जसं त्या सवतीच्याबाबतीतही सांगितले की, काळ बदलत आला, उत्पादनाची साधने बदलत आली, पण तरीसुद्धा काही लोकांच्या श्रद्धा किंवा चालीरिती रूढी या तशाच राहतात आणि काही अभिजनांच्या - म्हणजे सत्ताधारी व संपत्तीधारी लोकांच्या हिताच्या सोयीने बदलल्याही जातात. अशा अनेक बाबतीमध्ये आपल्याला दिसते.

समाजशास्त्राचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि या समाजशास्त्रात जाती-पाती, त्यांचे तिढे दिसतात. अर्थशास्त्राचाही विचार करावा लागतो. लोकसंस्कृतीमध्ये विचार करत असताना आजपर्यंत अर्थशास्त्राचा विचार कुणीही केला नाही. माझ्या मते, तो अतिशय महत्त्वाचा विचार आहे. कारण आर्थिक स्तराशीच तुमचं सगळं जीवन बांधलेलं असत. म्हणून अर्थोत्पादनाची साधनं जशीजशी बदलतात, तसतसं माणसाचं जीवन बदलतं, हे मार्क्सनी सांगितले आहे. परंतु नुसतं तेवढंच नाहीये की, अर्थोत्पादनाची साधनं, त्याच्यावरची मालकी आणि (मी त्याला आणखीन एक मुद्दा जोडते) त्याच्या विनिमयाचे अधिकार! स्त्रिया अर्थोत्पादन जन्मभर करत आलेल्या आहेत म्हणजे अगदी रानात शेतात काम करणार्‍या, घरकाम करणारी बाईसुद्धा हे अर्थोत्पादनच करत असते.

खर्‍या अर्थाने संस्कृतीचा अभ्यास - भले ती अभिजन संस्कृती असू देत की लोकसंस्कृती असू देत - प्रवास कसा कसा झालेला आहे, आदिम अवस्थेपासून ते आजपर्यंत मानववंशाची समाजव्यवस्था कशी कशी बदलत आलेली आहे, म्हणजे समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि बाकीची शास्त्रे या सगळ्यांचा समन्वय केल्याशिवाय करता येत नाही. विशिष्ट मंत्रतंत्र आणि देवदेवता म्हणजे संस्कृती असत नाही. माणसाची जगण्याची जी रीत आहे आणि जगण्यासाठी आवश्यक असलेली जी सर्व साधने आहेत, ती मिळून संस्कृती होते.

लोकजीवनाच्या जडण-घडणीसाठी असलेली जी सगळी साधने - भले ती आदिम अवस्थेतील असू देत, अनक्षर असू देत, ग्रामीण असू देत, शहरी असू देत, जुनी असू देत, नवीन असू देत - कायम आहेत. आणि या सगळ्याचा विचार केल्याशिवाय आपल्याला त्या संस्कृतीचा, त्या समाजाचा, त्या व्यक्तीचा विचार करता येत नाही. त्याला अभिजात मराठीत अंतरज्ञानशाखीय (Interdisciplinary Study Approach) म्हणतात.  तो घेतल्याशिवाय कुठल्याही संस्कृतीचा पूर्णपणे विचार करता येत नाही.

लोकसंस्कृतीमधून अभिजन संस्कृती क्रमाक्रमाने उन्नत होत गेलेली किंवा उसनवारी करत गेलेली आहे. आणि एका विशिष्ट जाती-जमातीला आदर्श ठेवणे हे तर अशक्यच आहे. कारण या सर्व गोष्टी करत असताना सर्व जाती-जमातींचे उद्योग, व्यवसाय, रहाणीमान, त्यांचं खाणंपिणं, त्यांचे हवामान, इतिहास, भूगोल या सगळ्याचा विचार करावा लागतो. माणसाचं जगणं हे काही केवळ तुमच्याजवळ असलेले पैसे ठरवत नाहीत. तुम्ही कुठल्या प्रदेशात राहता, तिथं उत्पादन काय होतं, ती उत्पादनं तुमचं राहणीमान ठरवतात, तुमचं खाणंपिणं ठरवतात, तुमचे कपडेलत्ते ठरवतात.

लोकसंस्कृतीचा हा प्रवास लक्षात घेतल्याशिवाय ‘अभिजात’ म्हणजे काय, हे नेमकं कळेल असं मला वाटत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......