मोहन, घाईत एक्झिट घेतलीस रे तू...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • मोहन हिराबाई हिरालाल
  • Sun , 26 January 2025
  • संकीर्ण श्रद्धांजली मोहन हिराबाई हिरालाल Mohan Hirabai Hiralal

गुरुवार, २३ जानेवारीची सकाळ मोहनच्या निधनाची बातमी घेऊन उगवली... आणि कशाला झाली सकाळ, असा प्रश्न पडला. डोकं सुन्न झालं... अशा वेळी एरवी सवयीचा झालेला एकटेपणा अस्वस्थ करतो...

मोहन म्हणजे मोहन हिराबाई हिरालाल. आमची पहिली ओळख ते आजची सकाळ हा दीर्घ असा साडेचार दशकांचा प्रवास आहे. आता उरली आहेत, ती त्यातील असंख्य आठवणीं फ्रीज्ड वर्षं.

मोहन ज्या घाईत वावरायचा, त्याच घाईत त्यानं एक्झिट घेतली... मोहनचा वावर घाईचा असला, तरी त्याच्या कामात आणि विचार करण्यात विलक्षण ठामपणा होता. त्याची अनेक उदाहरणं देता येतील.

आदिवासी आणि त्यांचं जल, जमीन, जंगल याभोवती मोहनचं काम आणि विचार केंद्रित राहिले. मोहन हा कोणतीही परतफेडीची अपेक्षा न बाळगता परिवर्तनाची विधायक लढाई तळमळीनं जगणारा कार्यकर्ता होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘मेंढा लेखा’चा वेगळा प्रयोग यशस्वीपणे राबवूनही मोहननं कधी साधी प्रसिद्धीचीही अपेक्षा बाळगली नाही. या प्रयोगाच्या यशाचं श्रेय सहकाऱ्यांच्या पदरात टाकून मोकळा होण्याइतका तो नि:स्वार्थ होता.

असं नि:स्वार्थ असणं, ही एक फार मोठी साधना असते आणि त्याचा कोणताही गवगवा न करण्याची वृत्ती हा स्तिमित करणारा वसा असतो.  

मोहनला त्याच्या कामाबद्दल ‘जमनालाल बजाज सन्मान’ मिळाला, हे मला जरा उशीराच समजलं, तेव्हा (१२ नोव्हेंबर २०१६ला) लिहिलेला मजकूर—

■■

सलग सहा-सात दिवस वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, इंटरनेटपासून लांब होतो. ‘रेंज’मध्ये आल्यावर वृतपत्र पाहिली तर कळलं की, मोहन हिराबाई हिरालाल याला ‘जमनालाल बजाज सन्मान’ मिळाला आहे. बातमी वाचल्यावर मनाच्या गाभाऱ्यात हा आनंद साहजिकच दाट पसरला. त्या आनंदाचा गंध वातावरणातही दरवळला. मोहनला लगेच फोन केला आणि म्हटलं, ‘मोहन सॉरी. अरे, रेंजमध्ये नव्हतो रे. म्हणून तुला मिळालेल्या बजाज पुरस्काराची बातमी उशीरा कळली. खूप आनंद झाला मला आणि मंगलाला. तू मित्र आहेस आमचा याचा अभिमान वाटतो’. तर मोहन, त्याच्या चिरपरिचित शैलीत म्हणाला, ‘या बातमीचा तुम्हाला आनंद होणारच की! मलाही छान वाटलं ही बातमी कळल्यावर’.

मग, मन आठवणींच्या प्रदेशात मागे गेलं. थेट ऐंशीच्या दशकात. मोहनची ओळख झाल्याला आता चार दशकं होतील. तेव्हा मी नागपुरात होतो आणि मोहन बहुदा गडचिरोली जिल्ह्यातल्या वडसा देसाईगंज या आड-नीड गावात रोजगार हमी योजनेच्या मजुरांचं संघटन करत होता. वन आणि बांधकाम क्षेत्रातील मजुरांची संघटना बांधण्याचं कामही तो करत होता. ग्रामीण आणि दुर्गम भागातील असंघटित क्षेत्रातील लोकाना संघटित करण्याचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. मजुरांना ‘रोहयो’वर काम मिळालं नाही, तर भत्ता मिळण्याची तरतूद होती, पण प्रशासनाच्या बिलंदरपणामुळे प्रत्यक्षात काम दिलं गेलं नाही, तरी असा भत्ता दिलाच जात नसे.

एका घटनेत काम न मिळाल्याचं रीतसर रेकॉर्ड निगुतीनं तयार करून मोहननं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक खटला दाखल केलेला होता. (त्याची हकिकत ‘डायरी’ या माझ्या पुस्तकात आहे.) आमचा कॉमन मित्र आणि तेव्हा वकिलीच्या क्षेत्रात दबदबा निर्माण होऊ लागलेला सुबोध धर्माधिकारी त्याचा वकील होता. चित्रकार चंद्रकांत चन्ने, पत्रकार प्रकाश देशपांडे हेही आमचे समानधर्मी मित्र होते. शिवाय महात्मा गांधी, विनोबा, आनंदवन आणि आमटे कुटुंबीय हे आमचं ‘गोत्र’ जुळलं. साहजिकच आमच्या भेटी वाढल्या.

मोहनशी मैत्री घट्ट होण्याचं आणखी एक निमित्त घडलं. तेव्हा नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचा वासंतिक अंक निघत असे. सांस्कृतिक क्षेत्रात त्याला दिवाळी अंकाइतकं महत्त्व असे. बहुदा १९८५ किंवा ८६ साल असावं. त्या वर्षीच्या अंकाचं संपादन आमचा दोस्तयार प्रकाश देशपांडेकडे होतं. आम्ही ‘विदर्भातील पूर्णवेळ कार्यकर्ते’ हा विषय घेतला. डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग, मोहन यांच्यावर लिहिण्याची जबाबदारी अर्थातच माझ्यावर आली. त्यासाठी गडचिरोलीच्या बंग दाम्पत्य राहत असलेल्या, सर्व सोयी कॉमन असणाऱ्या वाड्यात अस्मादिकांनी मग चार-पाच दिवस मुक्काम ठोकला. गप्पा तर भरपूर झाल्याच, शिवाय बंग दाम्पत्य आणि मोहनशी असलेलं मैत्र आणखी दृढ झालं.

त्या काळात मोहन नागपुरात आला की, आमची भेट बहुदा होतच असे. आमच्या घरी जे अनपेक्षित पाहुणे त्या काळात अचानक, न कळवता टपकत आणि पत्नी-मंगलानं, आमच्या ‘चिमण्या’ संसारासाठी केलेला स्वैपांक हमखास फस्त करत, त्यात मोहन हमखास असे. आमच्या मैत्रीला असा ‘उदर मार्गा’चाही आधार आहे! अशा अनपेक्षित पाहुण्यात एकदा गडचिरोलीच्या ‘जंगल बचाव, मानव बचाव’ आंदोलनासाठी आलेले सुंदरलाल बहुगुणा हेही होते. हे आंदोलन उभारण्यातही मोहन अग्रभागी होता.

हळूहळू आमचे व्याप वाढले, कामाचा विस्तार झाला, पायाला चाकं लागली आणि भेटी कमी झाल्या, तरी आमच्यातली सलगी, स्नेह आणि ममत्व कधीही कोरडं झालं नाही; तसं ते होणारच नव्हतं म्हणा.

मोहनचं खानदान सुखवस्तू. आडनावावरून जात सहज लक्षात येतं म्हणून या पठ्ठ्यानं आडनावच टाकलं! हे कमी की काय म्हणून आपल्या नावानंतर हिराबाई हे आईचं नाव वडिलांच्या जागी आणि आडनावाच्या जागी वडिलांचं हिरालाल हे नाव लावणं सुरू केलं. आज हे लिहायला जितकं सहज वाटतंय तितकं, ते त्या काळी सोपं नव्हतं; विलक्षण काटेरी होतं ते कृत्य त्या काळात.

मोहनचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार. शरीरयष्टी तशी धिप्पाडच. वर्ण गोरा पण, उन्हानं रापलेला; त्यामुळे मोहन ‘फॉरिनर’ वाटायचा अनेकांना! तेव्हा मोहनला भली मोठ्ठी दाढी होती. कपडे चटक-मटक आणि गळ्यात शबनम बॅग. चुरगाळलेले-मुरगाळलेले कपडे घातलेला आणि दुर्मुखलेला मोहन दुर्मीळ असायचा आणि आजही आहे. चष्म्याआड कायम उत्सुक आणि लुकलुकणारे डोळे. त्या काळच्या आमच्या पिढीत युवकात; एक प्रवाह हिंदुत्ववादी, ‘त्यांचा हिंदुत्ववाद’ अमान्य असणाऱ्या दुसरा प्रवाह राष्ट्र सेवा दल किंवा जयप्रकाश नारायण-म्हणून छात्र युवा संघर्ष वाहिनी आणि कम्युनिस्टप्रणित एआयएएसफ किंवा तत्सम; असा तिसरा प्रवाह असायचा. या तीनपैकी एकाही प्रवाहात नसलेला किंवा या तीनपैकी एकाही विचाराशी नाळ नसलेला महाविद्यालयीन युवक ‘नुळनुळीत’ समजला जाई.

मोहन या दुसऱ्या स्कूलचा म्हणजे ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’चा स्कॉलर. प्रत्येक घटना, प्रश्न, समस्येची माहिती घेणं आणि मांडणी मूलभूत दृष्टीनं करणं, समोरच्याचं म्हणणं संयम बाळगत नीट (आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण) ऐकून घेणं आणि मग त्यावरच्या मुद्देसूद शंका विचारत चिरफाड करणं; हे या स्कूलच्या स्कॉलर्सचं वैशिष्ट्य मोहनमध्ये ठासून भरलेलं होतं; अजूनही आहे. जनता पक्षातील एकजात सर्वांकडून जयप्रकाश यांचा झालेला पराभव आणि समाजवाद्यांकडून झालेला दारुण अपेक्षाभंग, यामुळे ‘छात्र’स्कूलच्या अनेकांना नैराश्यानं ग्रासलं, वागण्या-बोलण्यात त्यांना नखशिखान्त कडू बनवलं.

याला जे काही मोजके अपवाद राहिले, त्यात मोहन एक. शिवाय ‘कार्यकर्तापण’ नावाचं व्रत कसोशीनं जपायचं म्हणजे अपरिहार्य रुक्षपणा ठेवावा लागतो, असा जो काही जागतिक समज आहे, त्याला मोहन अपवाद. राजकारणात आणि राजकीय गॉसिपमध्ये रस आणि अनपेक्षितपणे समोरच्याची टोपी उडवण्याची खोड, कविता आणि गाण्यात रुची, खाण्यात दर्दीपण असं मोहनचं रसिलं असणं आहे.

मोहन सतत घाईत असतो असं चित्रकार चंद्रकांत चन्ने आणि माझं कायम मत आहे. म्हणजे तो कायम कुठून तरी आलेला असतो आणि त्याला कायम अन्यत्र कुठे तरी जाण्याचे वेध लागलेले असतात. एक काम नीटनेटकेपणानं हातावेगळं करतानाही त्याला असेच दुसऱ्या कामाचे वेध लागलेले असतात.

पाच-सात वर्षापूर्वी मला वाटतं शीतल आमटेच्या विवाहासाठी नागपूरहून चंदू चन्ने आणि मी सोबत गेलो होतो. आनंदवनात फिरतांना मोहनची आठवण झाली. चंदू म्हणाला, ‘आता मोहन भेटेलच. नेहमीप्रमाणे तो जाम घाईत असेल आणि भेट झाल्यावर पाचच मिनिटात सांगेल, मी इकडून आलो आणि तिकडे जाणार आहे!’

आमचं हे बोलणं होतं न होतं तोच जीन्स आणि टीशर्ट, डोईवर काऊबॉय घालतात, तशी टोपी ऐटीत घातलेला मोहन थेट समोरच उगवला. आमची भेट झाली. अपेक्षा होती तेच मोहन बोलला. तो चंद्रपूरहून आलेला होता आणि त्याला लगेच बंगलोरला जायचं होतं. चंदू आणि मी मग ठोसून जाम हसलो. मोहन वैतागला, पण आम्ही काय ते सांगितल्यावर निर्मळ हसला. हे मोहनचं आणखी एक वैशिष्ट्य.

मोहननं केलेल्या कामांची यादी लांबलचक आहे. तो सुरुवातीला ‘लोकबिरादरी’ प्रकल्पात डॉ. मंदा आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्यासोबत रमला. वन आणि बांधकाम क्षेत्रातील आणि रोजगार हमी योजनेवरील मजुरांचं संघटन मोहननं केलं (याचा फायदा विधानसभेची निवडणूक जिंकताना सुखदेवबाबू उईके यांनाही झाला होता), जंगल बचाव मानव बचाव आंदोलनात तो सक्रीय होता, ‘आमच्या गावात आमचं सरकार’ हा प्रयोग त्याने दीर्घ अविश्रांत श्रम आणि संघर्षातून साध्य केला; त्यातून मेंढा लेखा हा प्रयोग साकारला.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

मेंढा लेखा या गोंड आदिवासी गावात ग्रामस्थांनी वृक्षाभ्यास केला, आपल्या गावच्या पाण्याचं आणि शेतीचं नियोजन केलं, ग्रामकोष निर्माण केला, गावातली सावकारी आणि दारू हद्दपार केली, आदिवासींना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू जंगलातून नि:शुल्क घेऊ देण्यासाठीची निस्तार हक्काची चळवळ मोहननं उभारली. शुभदा आणि डॉ. सतीश गोगुलवार यांच्या कुरखेडा परिसरातील ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ चळवळीसोबत तो आहे, डॉ. अभय बंग यांच्या कामात त्याची साथ आहे... स्तिमित करणारी- मोहनशी संबधित ही कामाची यादी संपणारी नाही. मूलभूत अभ्यास, प्रबोधन, प्रशिक्षण देणं आणि कार्यकर्त्याला त्याच्या पायावर उभं करणं, हीदेखील मोहनच्या कामाची वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळे काम उभारत असतानाच ते भविष्यात सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी उभी राहते, अशी ही दूरदृष्टी आहे. पण मोहनच्या कामाची महती सांगणं आणि यादी देणं, हे या मजकुराचं प्रयोजन नाहीच नाही.

काही मित्र अनेकांच्या जगण्याचं असं काही लाघवी आणि उबदार प्रयोजन असतात की, त्यांना मिळालेला सन्मान आपल्याला मिळाला आहे, त्यांच्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंमागची वेदना आपल्यालाही झाली, असं वाटत राहतं. सतत विधायक घाईत असणाऱ्या मोहन हिराबाई हिरालाल नावाच्या मित्राला प्राप्त झालेल्या जमनालाल बजाज पुरस्काराशी आमच्यासारख्या अनेकांचं नातं हे असं ‘आपलं’ आहे. मोहनचं विधायक घाईत असणं आमच्यासाठी म्हणूनच अभिमानाची बाब आहे.

■■

मोहन आजारी होता, पण इतकी घाईनं एक्झिट घेईल असं वाटलं नव्हतं. तीन-चार आठवड्यांपूर्वीच आमचा नेहमीप्रमाणं एकमेकांची टांग खेचणारा वाद झाला होता. भेटण्याचे वादे झाले होते. त्याच्या पंचाहत्तरीच्या कुशल वार्ता समजल्या होत्या आणि आज सकाळी ही बातमी आली...

मोहन, सब की जुबां पे चर्चा है तेरी, और तू खामोष... हे पचवणं खूपच कठीण आहे रे...

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......