महाराष्ट्रीय सुशिक्षित बौद्धिक जीवनाला प्रा. मे. पुं. रेगे यांची ओळख नाही, असे नाही. उत्तराधुनिक भारतीय प्रबोधनकालातील विचारवंतांमध्ये प्रा. मे. पुं. रेगे यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील प्रबोधनाचे एक शिल्पकार, साक्षीदार आणि सॉक्रेटिकवृत्तीचे चोख भाष्यकार म्हणून प्रा. रेगे मराठी भाषिक विचारविश्वाला परिचित आहेत. तथापि रेगे यांचे २००० साली निधन झाल्यानंतर ती ओळख क्षीण झाली आहे, हे कबूल करण्यातच सुज्ञता आहे. २४ जानेवारी १९२४ हा त्यांचा जन्मदिवस. प्रा. रेगे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याबाबत आणि ते कार्य पुढे नेण्याबाबत काही प्रश्न उपस्थित करणे, आणि त्या प्रश्नांच्या सूत्रणाच्या दिशेने जाता येईल का, याची चिकित्सा करणे आवश्यक आहे.
.................................................................................................................................................................
प्रा. मे. पुं. रेगे यांचे विचारविश्व अनेक ज्ञानविषयांनी भरलेले आणि भारलेले आहे. त्यांची स्वलिखित स्वतंत्र पाच पुस्तके, लेखांची संपादित पाच पुस्तके आणि अनेक ठिकाणी प्रकाशित झालेल्या लेखांची संख्या किमान ४०० असावी. भारतीय परिभाषेत मांडावयाचे तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही क्षेत्रातील भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान, संस्कृती, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रांतील त्यांच्या मूलगामी चिंतनाची भरारी अतिशय उत्तुंग आहे. त्यांच्या लेखनाची शिस्तबद्ध सुनियोजित वर्गवारी करणे, हे एक महत्त्वाचे काम आहे.
प्रा. रेगे यांच्या समग्र विचारांचा व्यापक व्यामोह पाहता त्यांचे सारे विचारविश्व, एखादे जाळे विणले जावे आणि त्याची प्रत्येक गाठ दुसरीवर अवलंबून असावी, तसे परस्परावलंबी असून त्यांचा एक विचार त्यांच्या दुसऱ्या विचाराशी थेटपणे अगदी जवळून अथवा काही दूरस्थतेने का होईना, पण जोडला गेलेला आहे.
प्रा. रेगे प्रारंभीच्या कालखंडात इंग्रजीतून वाचत लिहीत होते. त्यांचे सारे अध्ययन- अध्यापन, इतर प्रशिक्षण इंग्रजीतच झाले. ते इंग्रजीचे उत्तम जाणकार होते. ‘न्यू क्वेस्ट’ या इंग्रजी नियतकालिकाचे संपादकही होते. त्यांचा सारा राष्ट्रीय ज्ञानव्यवहार इंग्रजीतच झाला. तरीही ते मराठीचे आग्रही होते. मराठी भाषिकांसाठी नव्या आधुनिक ज्ञानाची निर्मिती, हे त्यांचे उत्तरकालीन ध्येय बनले होते, असा निष्कर्ष त्यांच्या लेखनातून आणि त्याविषयीच्या त्यांच्या प्रतिपादनातून जाणवतो.
‘राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रबंध-शोधनिबंध इंग्रजीतून सादर करणाऱ्या मराठी वैज्ञानिक, विचारवंत, अभ्यासकांनी आपापल्या तज्ज्ञतेच्या ज्ञानक्षेत्रांत मराठीतून लिखाण करावे. त्यांनी मराठीत ग्रंथनिर्मिती करण्यास प्राध्यान्य द्यावे. तो मराठी वैचारिक साहित्य समृद्ध, आशयसंपन्न करण्याचा मार्ग आहे. त्या योगे मराठी विचारविश्वात ज्ञानाचे चैतन्य, जोम निर्माण होऊ शकेल, असा कळकळीचा आशावाद प्रा. रेगे यांनी प्रकट केला आहे.
अर्थात अशा लिखाणासाठी जाणीवपूर्वक शास्त्रीय-तांत्रिक मराठी परिभाषा घडवण्याचे कष्ट घ्यावे लागतील. असे नव्या परिभाषेने श्रीमंत बनलेले आधुनिक ज्ञानाचे साहित्य हा ‘मराठी उच्च बौद्धिक संस्कृती’चा आविष्कार असेल. ती मराठी ज्ञानभाषा असेल आणि आपल्या ‘मायमराठीची संस्कृतीची भाषा’ असेल, कारण जो समाज संस्कृतीची, विशेषतः बौद्धिक संस्कृतीची उच्च पायरी गाठतो, त्या समाजाची भाषा ‘ज्ञानभाषा’ म्हणून; त्या समाजाच्या संस्कृतीची भाषा म्हणून प्रतिष्ठा पावते, असे प्रा. रेगे स्पष्टपणे अधोरेखित करतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
काही प्रश्न
प्रा. रेगे यांना जाऊन (निर्गमन २८ डिसेंबर २०००) आज पंचवीस वर्षे झाली. हा मोठा काळ आहे. आता, काही प्रश्न उपस्थित करणे अनुचित ठरणार नाही. प्रा. रेगे आता नसल्याने या प्रश्नांच्या उपस्थित करण्याविषयी त्यांच्या आक्षेपाचा विचार करण्याचे कारण नाही. (वस्तुतः हे प्रश्न त्यांच्या ‘असण्या’च्या काळातच उपस्थित करावयास हवे होते, केले असते, तर रेग्यांनी काय उत्तर दिले असते, याची कल्पना नाही. पण कदाचित नाखुशीने मान्यता दिली असती, किंवा नसतीही दिली!) पण आता, रेगे नाहीत, त्यामुळे प्रश्न विचारू.
प्रा. रेगे यांनी मांडलेले तात्त्विक विचार एकूण मानवी ज्ञानाच्या व्यवहारात अर्थात जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही? रेगे विचारवारसा निर्माण का होऊ नये? प्रा. रेगे बेवारस तर झाले नाहीत ना? असे काही प्रश्न आज उपस्थित करणे आवश्यक आहे.
प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ मराठी भाषिक समाज आणि सुशिक्षित वर्ग, कार्यकर्ते, चळवळी, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे व्यावसायिक अभ्यासक (प्राध्यापक), अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत, असे आढळते.
वानगीदाखल पाहू. इहवाद, सर्वधर्मसमभाववाद, विवेकवाद, मी आस्तिक का आहे?, देवाशी भांडण हे विचार सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाचे आहेत. हिंदुत्व, आधुनिक हिंदू आणि आधुनिक बौद्ध, हिंदूंची जबाबदारी, हिंदू-ख्रिस्ती संवाद, ‘ते काय करत आहेत हे त्यांना कळत नाही’–बायबल, धर्मांतर, इस्लाम धर्म, इस्लामी जीवन शैलीची काही वळणे, भारतीय मुसलमानांचे राजकारण, हे लेख केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत.
त्याचप्रमाणे बर्ट्रांड रसेलच्या ‘तत्त्वज्ञानातील समस्या’ या अनुवादित (१२३ पाने) ग्रंथाला लिहिलेले ‘प्रास्ताविक भाष्य’ (१२७ पाने), सौंदर्यशास्त्रविषयक सहा प्रदीर्घ लेख, भारतीय तत्त्वज्ञान, चिकित्सक दृष्टीकोन आणि वैज्ञानिक विचार पद्धती, ‘कांटची सौंदर्यमीमांसा’ या रा. भा. पाटणकरकृत ग्रंथाला जोडलेले ‘कांटचा विचारव्यूह’ हे परिशिष्ट (पाने ९५), तत्त्वज्ञानाचा इतिहास आणि कल्पनांचा इतिहास, वैचारिक वाटचाल, अनेकविद्यामूलतत्त्वकोविद, या लेखांचे आशय जागतिक आहेत.
तसेच ‘तत्त्वज्ञानाच्या आधारावर मराठी सौंदर्यशास्त्रीय लेखन’ हा लेख मराठी भाषिकांसाठी असला तरी त्यातील ‘मराठी’ शब्दाच्या जागी अन्य भाषा लिहिली की, लेखातले युक्तिवाद त्या भाषेलाही लागू होतात.
प्रा. रेगे यांच्या या आणि इतरही अनेक लिखाणाचा इंग्रजी अनुवाद होणे आवश्यक आहे. प्रा. रेगे यांच्या समग्र मराठी लेखनावर (इतर लेखनावरही) प्रामुख्याने मराठी माणसाचा हक्क असला, तरी त्यांच्या तात्त्विक मांडणीवर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ बर्ट्रांड रसेलच्या ‘तत्त्वज्ञानातील समस्या’ या अनुवादित ग्रंथाला लिहिलेले ‘प्रास्ताविक भाष्य’ हे मराठीत लिहिले म्हणून केवळ मराठी माणसासाठीच आहे, असे नाही. त्याचे मूळ कारण रसेल मराठी नव्हता, त्याचा ग्रंथही मराठी माणसासाठी नव्हता. रसेलचे लिखाण हा जागतिक तत्त्वज्ञानाच्या साहित्याचा हिस्सा आहे. साहजिकच रेग्यांचे त्यावरील भाष्य हेही जागतिक तत्त्वज्ञानाचा हिस्सा बनणे आवश्यक आहे, पण ते मराठीत आहे, परिणामी ते त्यातील मूलभूत भाष्य, अन्वयार्थ केवळ मराठीतच राहिले.
प्रा. दि. य. देशपांडे यांचे भाष्य
प्रा. रेगे यांचे मित्र, ‘आजचा सुधारक’कर्ते आणि समव्यावसायिक विवेकवादी मराठी तत्त्ववेत्ते प्रा. दि. य. देशपांडे यांनी या भाष्यावर उत्तम टीका केली आहे. त्यात ते म्हणतात, “हे भाष्य म्हणजे रसेलच्या तत्त्वज्ञानाची अत्युच्च तात्त्वज्ञानिक पातळीवर केलेली चर्चा आहे. ती अतिशय सूक्ष्म आहे. ती सुबोध नाही. म्हणजे ती स्पष्ट नाही, किंवा तिच्यातील युक्तिवाद तर्कशुद्ध नाहीत, असे नाही. पण स्पष्टच सांगायचे तर, सामान्य वाचकाला ती बऱ्याच प्रमाणात अगम्य आहे. ती समजण्याकरिता वाचकाला अत्यंत सावध असावे लागते, एवढेच नव्हे तर त्याने तत्त्वज्ञानाची एक बरीच प्रगत पातळी गाठलेली असावी लागते. शिवाय ती इतक्या बारकाव्यात शिरणारी आहे, की ती अतिशय चिकाटीने वाचावी लागते. ती एकदा वाचून समजत नाही. एवढेच सांगतो की, सबंध प्रास्ताविक भाष्य ज्याने वाचले आहे आणि ज्याला त्याचे आकलन झाले आहे, असा वाचक अपवादात्मकच आढळेल. सामान्यपणे ‘हे प्रकरण बरेच कठीण दिसते, ते केव्हातरी सवडीने पाहू’ असे म्हणून ते टाकून देणारेच बहुतेक वाचक आहेत. तो ‘केव्हा-तरी’ सामान्यपणे येतच नाही. आणि त्यासाठी वाचकांना दोष देण्यातही अर्थ नाही. कारण तत्त्वज्ञानातील चर्चा जितकी कठीण असू शकते तितकी, ही चर्चा आहे. ती इंग्रजीत लिहिली असती, तर कुठल्याही इंग्लिश किंवा अमेरिकन तत्त्वज्ञानाच्या त्रैमासिकात ती सहज प्रसिद्ध झाली असती, इतका तिचा दर्जा आणि तिची योग्यता उच्च आहे.”
पुढे प्रा. देशपांडे पुस्ती जोडतात की, “... तत्त्वज्ञानाची चर्चा कशी असावी याचे मराठीत एक उत्तम उदाहरण त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. मला पडलेला प्रश्न वेगळा आहे. तो म्हणजे त्यांनी या भाष्याला ‘प्रास्ताविक भाष्य’ हे दिशाभूल करणारे नाव का दिले हा. कारण प्रास्ताविक म्हणजे प्रस्तावनेच्या स्वरूपाचा. आपट्यांच्या कोशात त्या शब्दाचे अर्थ ‘introductory’, ‘serving as an introduction’ असे दिले आहे. ‘Introduction’ म्हणजे पुढे येणारा विषय समजण्याकरिता पूर्वतयारी, पण तसे या भाष्यात काही नाही. ते रसेलच्या मतांचा परिचय नव्हे, तर त्याचे पूर्ण खंडन करण्याकरिता लिहिले आहे. त्या दृष्टीने त्याचे नाव ‘खंडनात्मक भाष्य’ असे काहीतरी असावयास हवे होते. आणि त्याची जागा रसेलच्या पुस्तकापूर्वी नव्हे, नंतर होती. याची अंधुक जाणीव रेग्यांना असावी असे दिसते, कारण आपल्या प्रस्तावनेत ते म्हणतात की, ‘वाचकांना अशी सूचना करावीशी वाटते की, त्यांनी सरळ भाषांतराकडे जावे, आणि नंतर तशी आवश्यकता असली, तर प्रास्ताविक भाष्याकडे वळावे.’ उत्तम मार्ग म्हणजे ‘प्रास्ताविक भाष्य’ स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रसिद्ध करावयास हवे होते. अजूनही जर या पुस्तकाच्या पुनर्मुद्रणाचा प्रसंग आला, तर अनुवाद आणि भाष्य दोन स्वतंत्र पुस्तके म्हणून प्रसिद्ध करावीत, असे सुचवावेसे वाटते.”
रेगेकृत टिळकांचे उदाहरण
प्रा. देशपांडे या ‘प्रास्ताविक भाष्या’चे महत्त्व अधोरेखित करतात. हा अनुवाद १९७३ सालचा आहे. त्याला आता ५१ वर्षे झाली. अर्धशतक होऊनही ते भाष्य आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेले नाही, हे मराठी विचारविश्वाला निश्चितच भूषणावह नाही, यात शंका असू नये. आता प्रश्न असा आहे की, रेग्यांचे हे वैचारिक योगदान तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते मराठीत लिहिल्याने मराठीतच राहिले. खुद्द रेग्यांनीही ते इंग्रजीत नेले नाही. रेग्यांनी ते इंग्रजीत का नेले नाही, असा प्रश्न त्यांच्या हयातीत विचारायला हवा होता. कारण प्रा. रेगे लोकमान्य टिळकांचे एक उदाहरण देतात.
ते म्हणतात, “एखादी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी ज्ञानभाषा म्हणून, म्हणजे नवीन ज्ञानाच्या शोधाचे आणि नवीन ज्ञानाच्या प्रसिद्धीचे माध्यम हे स्थान जर एखाद्या भाषेला मिळायचे असेल, तर त्याची अट अशी की, त्या ज्ञानाविषयी आस्था असलेले, ते समजून घेऊ शकणारे, नवीन ज्ञानाची चिकित्सा करू शकणारे लोक त्या भाषासमूहात पुरेशा संख्येने असले पाहिजेत. लोकमान्यांनी आपले गीतारहस्य मराठीत लिहिले, पण ‘ओरायन’ आणि ‘धि आर्टिक होम ऑफ् धि वेदाज’ ही पुस्तके इंग्रजीतून का लिहिली? प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा लोकमान्यांच्या जिव्हाळ्याचा व अभिमानाचा विषय होता. पण ‘भाषिक व इतर पुराव्याचे विश्लेषण करून प्राचीन मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा वेध घेणारे नवीन शास्त्र’ ही युरोपची निर्मिती होती. लोकमान्यांच्या नवीन संशोधनाचे मूल्यमापन करू शकतील, त्यात हे ग्राह्य आहे त्याचा स्वीकार करतील, अशी अधिकारी मंडळी बहुसंख्येने युरोपमध्ये होती. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे लोकमान्यांना उपलब्ध असलेले माध्यम केवळ इंग्रजी भाषा हे होते. आपले संशोधन त्यांनी मराठीतून प्रसिद्ध केले असते, ते असून नसल्यासारखे झाले असते. त्याने ज्ञानात भर पडली नसती. कारण ज्ञान पुस्तकात नसते, ते जाणकारांच्या आणि जिज्ञासूंच्या मतांत, विचारात, त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या विवादांत आणि संवादात असते. ह्या क्षेत्रात सक्रीय असलेली मंडळी ज्या भाषांद्वारे हा ज्ञानव्यवहार पार पाडीत, त्या इंग्रजी इत्यादि युरोपीय भाषा होत्या.”
या प्रतिपादनाचा अर्थ असा की, रेग्यांना इंग्रजीत लिहिण्याचे कारण माहीत होतेच. पण त्यांनी स्वतः मात्र ते टाळले. का टाळले असावे? मराठीत तत्त्वज्ञानाचे पुरेसे जाणकार नसतानाही रेगे मराठीतच का लिहीत राहिले? याची संभाव्य उत्तरे अशी : (१) जाणकारांची अपेक्षित संख्या लवकरच पुरी होईल. (२) रेग्यांचे मराठी वरील आणि मराठी भाषिकांवरील प्रगाढ प्रेम (३) महाराष्ट्रापुरती तरी मराठी ‘संस्कृतीची भाषा’ व्हावी, ‘ज्ञानभाषा’ व्हावी, ही त्यांची उत्कट तळमळ.
प्रा. रेगे यांना तत्त्ववेत्ते, प्रबोधनकार व सामाजिक शिक्षक म्हणून साहित्य आणि तत्त्वज्ञान या उभय क्षेत्रातून गौरवले जात असल्याने, त्यांच्या वैचारिक कार्याची माहिती ज्या ज्ञानविश्वाशी रेगे निगडीत होते, त्या जागतिक ज्ञानविश्वाला होणे आवश्यक आहे. मराठी भाषिक महाराष्ट्रीयन तत्त्ववेत्ते सुरेंद्र बारलिंगे हे जागतिक पातळीवर तत्त्ववेत्ते म्हणून सुपरिचित होते (म्हणजे आहेत). रेगे ज्यांचे कौतुक करतात ते डॉ. सुरेंद्रनाथ दासगुप्ता, दयाकृष्ण, एम. हिरियण्णा हे अन्य भारतीय तत्त्ववेत्ते जागतिक पातळीवर नावाजले गेलेले आहेत. एवढेच नव्हे, तर रेगे ज्यांच्या लेखनावर टीका करतात, ते डॉ. राधाकृष्णनदेखील जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. प्रा. रेगे या साऱ्यांपेक्षा वेगळे, आधुनिक भाष्यकार होते. त्यामुळे त्यांचे विचार जगाला कळणे, जगभर पोहोचणे आवश्यक आहे.
‘जर्नल ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशन’, ‘द सेक्युलरिस्ट’मधील काही निवडक लेख आणि ‘न्यू क्वेस्ट’ची १९८२ ते १९९८पर्यंतची संपादकीये या स्वरूपात रेगे यांनी इंग्रजीतच केले. तथापि त्यांचे मराठीतील काही महत्त्वपूर्ण विचार समग्र मानवी विचारविश्वाला उपयोजित आहेत, हे अधोरेखित होणे आवश्यक आहे. त्याचा मार्ग आपली इच्छा असो वा नसो, तो ‘इंग्रजी भाषा’ हाच आहे. त्यामुळे रेगे यांचे विचारविश्व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणे, हे विद्यमान पिढीचे कर्तव्य आहे.
अनुवाद आणि गोषवारा
केवळ इंग्रजी नव्हे तर फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज या युरोपीय भाषा व अरबी भाषेतही रेगे गेले पाहिजेत. कारण या साऱ्या परकीयांनी भारतात व्यापार केलाच, पण येथे राज्यही केले. भारतीय भाषा, संस्कृती, धर्म, जीवन रिती यांचा सखोल अभ्यास करून काहीएक मते बनवून त्या आधारे या राज्यकर्त्यांनी येथे राज्यव्यवस्था राबवली आणि धर्मप्रसारही केला. त्यात ब्रिटिशांना सर्वाधिक यश मिळून ते अखेरचे परकीय राज्यकर्ते बनले. त्या अनुषंगाने फ्रेंच, जर्मन, पोर्तुगीज व अरबी संस्कृती व तत्त्वज्ञान यांचे रेगे यांनी केलेले विविधांगी अचूक विश्लेषण आणि या साऱ्याच राजवटींचा भारतीय प्रबोधनाशी कोणता, कशा स्वरूपाचा संबंध आला, याचे अचूक निर्दोष अन्वयार्थ रेग्यांनी दिले, हे त्यांचे प्रबोधनातील महत्त्वाचे योगदान आहे.
प्रबोधनाचे शिल्पकार आणि राष्ट्रीय तत्त्वज्ञानातील सक्रीय तत्त्वचिंतक ही रेग्यांची राष्ट्रीय ओळख आहे. त्यामुळे हिंदी आणि संस्कृत या भारतीय भाषेतही रेगे जाणे नितांत गरजेचे आहे. त्यांचे तात्त्विक, राजकीय व धार्मिक विश्लेषण केवळ महाराष्ट्रालाचं नव्हे, तर देशाच्या राजकारणाला उपयुक्त आहे.
प्रा. रेगे यांच्या लेखांचे, विचारांचे वेगवेगळ्या भाषेत अनुवाद होणे आणि त्याला प्रास्ताविक भाष्ये जोडणे ही पूरक कामगिरी आहे. त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद हा मोठा प्रकल्प आहे. ते शक्य नसेल, तर प्रा. रेगे यांच्या पुस्तकांमधील विविध तात्त्विक संकल्पनांचा परिचय देऊन त्यांचा गोषवारा देणे, हे किमान काम तरी करणे आवश्यक आहे. रेगे यांचे स्वतःचे मत होते की, एखाद्या ग्रंथाचा किंवा लेखाचा अनुवाद शक्य नसेल, तर त्याचा गोषवारा द्यावा. त्यामुळे वाचकाला, अभ्यासकाला उत्सुकता निर्माण झालीच, तर त्याचा त्या मूळ स्रोताकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल.
रेगे यांनी इंग्लिशमध्ये(सुद्धा) लिहावे, अशी दि. यं. ची इच्छा होती, हे त्यांनी त्यांच्या टीकेत नमूद केले आहेच. प्रा. रेगे खुद्द इंग्रजीकडे कसे पाहत होते, याचा शोध घेणे उपयुक्त ठरू शकेल.
रेगे यांचा इंग्रजीविषयक दृष्टीकोन
रेगे आवर्जून नमूद करतात की, इंग्रजी ही ‘पाश्चात्य जगाची’ ज्ञानभाषा आहे. विशेषतः वैज्ञानिक ज्ञानाच्या आदानप्रदानाचे ती प्रमुख जवळपास एकमेव भाषा आहे. याची कारणे अशी : (१) विज्ञानाच्या उदयानंतर जगातील (त्यात भारत आहेच) सर्व वैज्ञानिकांचा एक परिवार बनला. तो जागतिक वैज्ञानिक परिवार बहुभाषिक आहे. मुख्यतः अमेरिका, इंग्लंड, जर्मन, फ्रेंच, स्वीडिश इत्यादी. पण त्यांची समान ज्ञानभाषा इंग्रजी आहे. (२) विज्ञान-तंत्रज्ञानात हळूहळू विशेषीकरण झाले. ते सारे संशोधक वेगवेगळ्या देशातील आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते. त्यांना त्यांचे संशोधन जगाच्या पटलावर मांडायचे होते. साहजिकच त्या संशोधकांना त्यांचे ज्ञान एका समान भाषेत, अर्थात इंग्रजीतच मांडावे लागते. (३) आज इंग्रजीचे वर्चस्व इंग्लंडमुळे नाही; तर आजच्या जगात अमेरिकेच्या आर्थिक व तंत्रज्ञानात्मक सामर्थ्याने (अमेरिकन) इंग्रजीचे वर्चस्व आहे. (४) आज अमेरिका ‘अधिसत्ता’ (super power) बनली असून, तिचीच भाषा जगावर लादली जाणे स्वाभाविक आहे.
परकीय भाषा माध्यम
रेगे विचारतात, “इंग्रजी ही परकीय भाषा ‘माध्यम’ म्हणून आपण मुळातच का स्वीकारली, हा प्रश्न आहे.” त्याची ऐतिहासिक कारणे ते देतात. राज्यकर्त्यांनी ती आपल्यावर लादली, हे एकच कारण नाही. मुख्य कारण असे की, इंग्रजी अमदानीपूर्वी प्रौढ बौद्धिक व्यवहाराच्या भाषा म्हणून आपल्या प्रादेशिक भाषा (जसे की मराठी) आपण कधीच वापरल्या नाहीत. ‘भजन-कीर्तनासाठी आणि म्हाताऱ्यांनी एकमेकांना भोंगळ वेदान्त सांगण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भाषा’ एवढेच त्यांचे सांस्कृतिक कार्य होते. न्यायवैशेषिकावर, आयुर्वेदावर, नीतिशास्त्रावर, कामशास्त्रावरसुद्धा मराठीत ग्रंथ लिहिण्यात आले नाहीत. अशी परंपरा असती, तर मराठी स्वाभाविकपणे आधुनिक ज्ञानाची वाहक ठरली असती. कणादाच्या परमाणुवादाचे विवेचन करणारे ग्रंथ मराठीत असते, तर ते लिहिणाऱ्या-वाचणाऱ्यांनी डाल्टनच्या परमाणुवादावरही मराठीत ग्रंथ लिहिले असते, अपेक्षिले असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष केले. साहजिकच ही परकीय भाषा डोक्यावर व डोक्यात बसली.
भारत आणि इंग्रजी
रेगे स्पष्ट करतात की, इंग्रजांचा राजकीय अंमल भारतावर बसल्यामुळे इंग्रजी भारतावर व म्हणून महाराष्ट्रावर लादली गेली, यात शंका नाही. एकोणिसाव्या शतकात इंग्रजांनी आपली शिक्षणव्यवस्था जेव्हा भारतात सुरू केली, तेव्हा इंग्रजी जाणणारे दुभाषी भारतीय, पुरेशा संख्येने दुय्यम दर्जाचे शासकीय अधिकारी म्हणून उपलब्ध असावेत, हा तिच्या मागचा एक महत्त्वाचा उद्देश होता. असा वर्ग त्यांना मिळालाच; त्याच वेळी इंग्रजी भाषेद्वारा भारतीय विद्यार्थ्यांना एका नवीन आणि अद्भुत बौद्धिक जगाचा शोधही लागला. एका वेगळ्या प्रकारच्या ललित साहित्याशी, संस्कृत भाषेतील साहित्याहून अधिक विविध, अधिक समृद्ध, वास्तव जीवनाच्या सर्व अंगांना अधिक जवळून भिडणाऱ्या अशा साहित्याशी त्यांची गाठ पडली. इतिहास, सुव्यवस्थित आर्थिक, राजकीय, सामाजिक विचार, भौतिक विज्ञाने, आणि ह्या सर्व प्रकारच्या ज्ञानाची चिकित्सा करणारे आणि सामाजिक जीवनाला दिशा देण्याची जबाबदारी स्वीकारणारे तत्त्वज्ञान यांचे संपन्न भांडार इंग्रजी भाषेद्वारा त्यांना सापडले. ह्या सर्व ज्ञानाची आणि त्यात मूर्त झालेल्या अमूर्त, प्रगल्भ विचाराची वाहक असलेली अशी समृद्ध आणि कार्यकुशल भाषा या स्वरूपात इंग्रजी भाषा त्यांना दिसली. केवळ राजकीय शासनाची भाषा ह्या स्वरूपात नव्हे.
याच काळात भारतात मात्र पारंपरिक बौद्धिक देवाणघेवाणीची अखिल भारतीय भाषा संस्कृत होती. आणि लौकिक व्यवहारांची अखिल भारतीय भाषा नेहमीच हिंदी होती, पण हे अखिल भारतीय व्यवहार अतिशय तुटपुंजे होते; यात्रेला जाणे वगैरे. साहजिकच सर्वच आधुनिक व्यवहारांची अखिल भारतीय भाषा इंग्रजी झाली. राष्ट्रसभेने लोकांसाठी घेतलेल्या सभांत हिंदीतून भाषणे होत. पण राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणारे, राजकीय मागण्या मांडणारे आणि त्यांच्यासाठी समर्थक युक्तिवाद सादर करणारे वर्किंग कमिटीचे ठराव शैलीदार इंग्रजीत असत.
रेगे अधोरेखित करतात की, देशाच्या संसारात इंग्रजीची भूमिका तिहेरी राहिली : (१) आधुनिक ज्ञानाच्या ग्रहणाची भाषा (२) आधुनिक व्यवहाराचे माध्यम असलेली भाषा आणि (३) अखिल भारतीय आदान-प्रदानाची भाषा. अर्थात बाह्य जगाशी म्हणजे युरोपशी संपर्क ठेवण्याची भाषाही तीच होती.
राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली परिस्थिती मूलगामी बदलली, पण त्याबरोबरच जागतिक परिस्थितीत झपाट्याने बदल झाला. आणि विज्ञानाचे स्वरूप आणि व्याप ह्यांच्यांतही क्रांतिकारक बदल झाला. ह्या पार्श्वभूमीवर भारताचा आधुनिकतेत प्रवेश ज्या पद्धतीने झाला, तो इतिहास ध्यानात घेऊन, आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांच्या संदर्भात इंग्रजीचे भारतात स्थान काय असावे, ह्याचा विचार केला पाहिजे.
इंग्रजी केवळ साधन
रेगे यांच्या मते भारतातील इंग्रजीचे योग्य स्थान म्हणजे आधुनिक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्राप्त करण्याचे ती केवळ एक साधन असे असले पाहिजे. ब्रिटिश वसाहतवादाने ती लादली गेली असली, तरी ती आज जगाची, विशेषतः आर्थिक व राजकीय महासत्ता असलेल्या आणि आधुनिक निसर्ग विज्ञान, सामाजिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या यांचीदेखील महासत्ता असलेल्या अमेरिकेची आणि काही प्रमाणात युरोपची भाषा आहे.
रेगे यांच्या मते भारतात इंग्रजीचे महत्त्व तीन पातळ्यांवर राहील. (१) या सत्तांकडून हे आधुनिक ज्ञान स्वीकारणे (२) या सर्व क्षेत्रातील आपले योगदान आणि आपले पारंपरिक स्वीकार्य ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवणे (३) बहुभाषिक भारतातील सुजाण जबाबदार ज्ञानी लोकांची आपसातील त्यांच्या चिंतन क्षेत्रातील ज्ञानाच्या आदानप्रदानाचे साधन.
थोडक्यात, केवळ ‘जागतिक आणि स्थानिक ज्ञानाची साधन भाषा’ म्हणून इंग्रजीला महत्त्व राहील, असे पाहिले पाहिजे; तिचा विनाकारण बडेजाव वाढणार नाही, अशी काळजी घेतली पाहिजे. इंग्रजीच्या आहारी न जाता तिचा सराव करणे, हे आपले शक्तीकेंद्र मानले, तर तिचा योग्य वापर करता येईल, असे रेगे यांना वाटते.
आज अखिल भारतीय व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे. शिवाय ‘उच्च’ शिक्षणाचे माध्यमही बहुतांशी इंग्रजीच आहे. आपले ज्ञान आपल्याला जगात पोहोचावयाचे उद्दिष्ट असेल, तर साहजिकच इंग्रजीचा उपयोग करणे अनिवार्य ठरते. ज्ञानाचा व्यवहार आंतरराष्ट्रीय असतो, कारण मानवी व्यवहार असतो. विशिष्ट समाजापुरता नसतो.
विचारांजली
प्रा. रेगे हयात असताना त्यांनी कदाचित इंग्रजी भाषांतराची परवानगी दिली नसती. याचे कारण त्यांना त्यांचे विचार मराठी भाषिक लोकांसाठी मांडावयाचे होते. पण आता रेगे हयात नसताना त्यांना आदरांजली म्हणून त्यांना इंग्रजीत नेणे, हे आपले काम मानले पाहिजे. विचारवंताविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा यथार्थ मार्ग म्हणजे त्याच्या वैचारिक योगदानाची योग्य नोंद घेणे आणि त्याने व्यक्त केलेल्या पुढील कार्याच्या दिशेने काहीएक पाऊल टाकता येणे शक्य आहे का, याचा अंदाज घेऊन ती कृती करणे. म्हणजेच त्यांना ‘विचारांजली’ अर्पण करणे.
प्रा. रेगे यांना इंग्रजीत नेण्याचा एकमेव यशस्वी प्रयोग म्हणजे त्यांच्या ‘हिंदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ या पुस्तकाचे त्यांचा मुलगा किरण रेगे यांनी केलेले इंग्रजी भाषांतर. अजून बरेच, म्हणजे हा प्रस्तुत अनुवाद वगळता सारेच काम बाकी आहे.
रेगे यांनी भारतीय आणि महाराष्ट्रीय प्रबोधनाचा वारसा पुढे नेला असेल, तर त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी केवळ रा. भा. पाटणकर, प्रा. बाळ देशपांडे, प्रा. दि. य. देशपांडे, प्रा. सुनीती देव, आचार्य विवेक गोखले, प्रा. सुधीर रसाळ, वसंत पळशीकर, देवदत्त दाभोळकर, हरिश्चंद्र थोरात, मिलिंद मालशे, सरोजा भाटे, किशोर बेडकीहाळ, अशोक जोशी इत्यादि आणि अन्य काही निवडक लोकांपुरताच राहणे, हे अर्थातच योग्य नाही.
भारत ही ज्ञानसत्ता आहे, असा दावा विद्यमान राज्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय ज्ञानव्यवस्थेतील मानवजातीचा तार्कीकदृष्ट्या बौद्धिक विकास साधू पाहणारी ज्ञानमीमांसा व तिचे आधुनिक भाष्यकार म्हणून रेगे यांचे विचार जगात सर्वत्र पोहोचणे आवश्यक आहे.
गेल्या वर्षी, २०२४ साली ‘नवभारत’चा ‘मे. पुं. रेगे जन्मशताब्दी विशेषांक’ प्रसिद्ध झाला. त्यात रेगे यांचे सामाजिक, वैचारिक व्यक्तित्व विशद करणारे लेखन आहे. तथापि त्या अंकाची महाराष्ट्रीय विचारविश्वाने कोठेही दखल घेऊ नये, हे तात्त्विक आणि वैचारिकदृष्ट्या सुशिक्षित असण्याचे लक्षण म्हणता येणार नाही.
अनुवादाचे उत्तरदायित्व
आता, एका महत्वाच्या प्रश्नाकडे येणे आवश्यक आहे. प्रा. रेगे यांचे या प्रकारचे अकादामिक कार्य पुढे नेण्याचे उत्तरदायित्व कोणाकडे जाते? तत्त्वज्ञानेतर विद्वानांची, की विद्यापीठीय व्यावसायिक अभ्यासकांची? अन्य कोणाची? कोणता समाजगट या कामासाठी अधोरेखित करता येईल? हा अन्य मोठ्या लेखाचा (किंवा ग्रंथाचा भाग) विषय आहे. त्याचे संक्षिप्त सूतोवाच येथे केले तर उचित ठरेल.
रेगे यांचा बहुविध विचार पुढे नेण्याची जबाबदारी रेगेंच्या विचारांचा ज्यांना साक्षात लाभ झाला आहे, त्यांच्यावर प्रामुख्याने येते, याचे भान ठेवले गेले पाहिजे. त्यात रेगे यांना इंग्लिशमध्ये नेणे ही जबाबदारी रेगे यांचा चाहता वर्ग, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुरोगामी विचारवंत, त्यांचे अनुयायी आणि त्यांचे विविध क्षेत्रातील विविध विषयांचे शिष्य यांच्यावर येते. मराठीच्या संकुचित आणि मर्यादित विचारविश्वात रेगे कायमचे अडकून राहणे, किंवा ठेवणे हे खुलेपणाचे लक्षण खासंच नाही, याविषयी दुमत होऊ नये.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
प्रा. रेगे यांचा ‘तात्त्विक जनता वर्ग’
प्रा. रेगे यांच्याबाबतीत त्यांच्या ‘तात्त्विक जनता वर्ग’चे स्वरूप अमेरिकेतली ‘तात्त्विक जनता वर्ग’पेक्षा भिन्न आहे. विशेषतः रेगे सरांच्या निवृत्तीनंतर त्यांना साम्यवादी, समाजवादी, पुरोगामी इत्यादी वेगवेगळ्या चळवळीतील कार्यकर्ते, तत्त्वज्ञानेतर विषयांचे निवडक प्राध्यापक, तुरळक पत्रकार इत्यादींचा ‘तात्त्विक जनता वर्ग’ गोतावळा लाभला. रेगे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि तत्त्वज्ञ होते, म्हणून त्यांना तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील समकालीन चाहता वर्ग मिळाला आणि त्यांनी सामाजिक विषयांवर चिंतन लेखन केल्यामुळे तत्त्वज्ञानाचा नसलेला, पण इतर विषयांचा सुशिक्षित उच्च वर्गही लाभला.
रेगेंचा वर्ग काही प्रमाणात भारतीय आणि खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रीय होता (म्हणजे तत्कालिन महाराष्ट्रातील सुशिक्षित लोकांची जी काही संख्या होती, आणि मुख्यतः मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावती ह्या शहरांतील आणि उरलेल्या महाराष्ट्रातील तुरळक संख्येत ज्याला ‘मोठे प्रमाण; म्हणता येईल, असे ‘प्रमाण’). या वर्गात तत्त्वज्ञानाच्या बोटावर मोजण्याइतक्या निवडक प्राध्यापकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील गेल्या वीस-तीस वर्षांतील नवे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. रेगे यांच्याकडे फिरकण्याचे धाडस दाखवू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे; त्यामागे विविध कारणे आहेत. ती प्रा. रेगे यांच्या व्यक्तित्व वैचित्र्यात आणि लेखनशैलीत दडलेली आहेत.
प्रा. रेगे यांच्या निर्गमन पश्चात त्या कारणांची अर्थविवरणे अधिक जटील झाली आहेत. या साऱ्या वर्गात प्रा. रेगे यांच्याविषयी शंका, गैरसमज, अपसमज, रोष, संताप, दुखावल्या गेलेल्यांकडून काही प्रमाणात बहिष्कार इत्यादीला सामोरे जावे लागले, त्यावर उत्तरपक्ष रूपात नवा ग्रंथ रचता येऊ शकेल, असे वाटते. प्रा. रेगे यांच्या वतीने ती जटिलता सोडवण्यास कोणी पुढे येईल, याची प्रतीक्षा करण्यास अवकाश आहे.
................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास हेमाडे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक, व्यावसायिक तत्त्ववेत्ते, अनुवादक आणि ‘तत्त्वभान’ या पुस्तकाचे लेखक आहेत.
shriniwas.sh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Mon , 10 February 2025
श्रीनिवास हेमाडे,
मला तत्त्वज्ञानातलं फारसं कळंत नाही. तुम्ही व्यक्त केलेली रेगेंचे लेखन इंग्रजीत न गेल्याची खंत पटली. एखादी कलाकृती मराठीतनं इंग्रजीत न्यायची झाली तर मराठीपुरतं तरी सांस्कृतिक एकसंधत्व असावं लागतं. सांस्कृतिक एकसंधत्व याचा अर्थ मुळे मजबूत असणे. इंग्रजी शिक्षणामुळे आपली मराठी मुळे मजबूत करायची आपण विसरून गेलो. मुळे मजबूत नसल्याने नवीन पिढी कलाकृती निर्मितीसाठी मराठीत रस घेत नाही. मराठीत अशा प्रकारचा रस न घेतल्याने पुढील मराठीभाषिक पिढ्या आपापली मुळे अधिकंच गमावून बसतात. रेगेंना हे दुष्टचक्र भेदायचं आहे, असं मला वाटतं. मराठीत सकस निर्मिती व्हायला हवी. त्याकरिता मराठी ही सकस निर्मितीसाठी आकर्षक वाटायला हवी. सुदैवाने मराठी सारस्वत आजूनही जागतं आहे. आज मराठीत प्रतिशब्द शोधायला अडचण येत नाही. अन्य ( भारतीय वा अभारतीय ) भाषेतले विचार व्यक्त करण्यासाठी मराठीस चाचपडत राहावं लागंत नाही. ही फार मोठी जमेची बाजू आहे.
मुळे गमावून बसलेल्या एका माणसाचा हा इंग्रजी लेख वाचवा म्हणून सुचवेन. त्या लेखकाचं नाव आतिश तसीर आहे. लेखाचा दुवा : http://paalaguttapalle.blogspot.com/2017/11/deracination-and-recovering-roots.html
आपला नम्र,
-गामा पैलवान