१० ऑक्टोबर रोजी शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये विसाव्या शतकातील प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांचे एक वाक्य लिहून ठेवले आहे - “One of the saddest lessons of history is this : If we've been bamboozled long enough, we tend to reject any evidence of the bamboozle. We're no longer interested in finding out the truth. The bamboozle has captured us. It's simply too painful to acknowledge, even to ourselves, that we've been taken. Once you give a charlatan power over you, you almost never get it back.”
शिरोजीने या वाक्याचा मराठी तर्जुमासुद्धा आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवला आहे- “इतिहासामधील एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक धडा पुढीलप्रमाणे आहे : आपण जर खूप वेळपर्यंत फसलेल्या अवस्थेत राहिलो, तर आपण फसलो आहोत, याबद्दलचा समोर येणारा प्रत्येक पुरावा नाकारण्याकडे आपला कल होत जातो. आपल्याला सत्य नावाची गोष्ट शोधून काढण्यामध्ये कसलाही रस उरत नाही. फसवणुकीने आपल्यावर संपूर्ण कबजा मिळवलेला असतो. आपण फसवले गेलो आहोत, हे स्वीकारणे अशक्य होऊन जाते. अत्यंत दुःखदायक बनून जाते. आपण जर एकदा स्वतःला एखाद्या ढोंगी माणसाच्या कब्जात जाऊ दिले, तर आपल्याला पुन्हा कधीही स्वतंत्र होता येत नाही.”
हा तर्जुमा दिल्यावर शिरोजीने एक प्रदीर्घ टिपण आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे. शिरोजी खरं तर इतकं स्पष्ट आपल्या बखरीमध्ये लिहीत नाही, परंतु त्याने ‘मोदीकालीन भारता’मधील २०२४ सालच्या नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमधील राजकीय परिस्थितीविषयी लिहिलेले आहे - “२०१४ साली ज्या ज्या लोकांनी स्वतःची बहुमूल्य मते मोदींनी दाखवलेल्या स्वप्नांवर उधळली होती, त्यातल्या निम्याहून अधिक लोकांचा भ्रमनिरास झाला होता. मोदींनी दाखवलेल्या स्वप्नांपैकी कुठलेही स्वप्न पूर्ण झाले नव्हते. डॉलर समोर रुपयाची किंमत वधारली नव्हती, चीनला घाबरवले गेले नव्हते, पाकिस्तानातून दाऊदला फरफटत आणले गेले नव्हते, ‘अच्छे दिन’ आले नव्हते, भारतातील गरिबी संपून जाणार असे सांगितले होते, तसे काहीच घडलेले दिसत नव्हते, जम्मू आणि काश्मीरमध्ये कुणाही सामान्य माणसाला प्लॉट घ्यायचे धैर्य झाले नव्हते. नुसतेच ‘अब्दुलला टाईट केले गेले’ आहे, हे ऐकत बसायचे. चीनने भारताची जमीन हडप केलेली सॅटेलाईट इमेजेसमध्ये दिसत असताना चीन घाबरला आहे, हे मेसेजेस वाचायचे, दाऊद कराचीमध्ये मजा करत असताना पाकिस्तान थरथर कापत आहे, हे वाचत बसायचे, ८० कोटी लोकांना फुकटचे रेशन द्यायला लागत असताना भारत श्रीमंत झाला आहे, असे मेसेजेस वाचत बसायचे. स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या ‘गोदी मीडिया’वर चाललेल्या चर्चा ऐकत बसायचे!
खूप भक्तलोकांना आपण फसलो आहे, हे कळत होते, पण स्वीकारता येत नव्हते. सगळ्या लोकांसमोर छाती पिटून पिटून ‘मोदीस्तोत्रे’ गायली होती, या लोकांनी. आता मोदीने आपल्याला फसवले, असे लोकांना सांगायचे कसे?
भक्तांमधला एक गट मात्र मोदींच्या मागे खंबीरपणे उभा होता. या लोकांच्या मनामध्ये मुसलमान धर्मीयांविषयी द्वेषभाव शिगोशीग ठासून भरला गेला होता. शिवाय आपापल्या राज्यामधील सत्ताधीश जातींविषयीसुद्धा पराकोटीचा द्वेषभाव या लोकांच्या मनात ठासून भरलेला होता. या भक्तलोकांचे स्वतःचे आर्थिक नुकसान झाल्याशिवाय हे लोक मोदींशिवाय इतर कुणाला मते देणार नव्हते. हा मूलतः मध्यमवर्ग होता. महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि ओबीसी, गुजरात आणि राजस्तानमधील जैन, हरयाणामधील सैनी, उत्तर प्रदेशामधील ब्राह्मण आणि कायस्थ अशा या जाती होत्या.
महाराष्ट्रात ब्राह्मण आणि ओबीसी यांना मराठा जातीविषयी द्वेष होता, गुजरातमध्ये पटेल या जातीविषयी ओबीसी लोकांना द्वेष वाटत होता, हरयाणामध्ये सैनी लोकांना जाट जातीविषयी द्वेष होता. मोदीप्रणित भाजपने प्रत्येक राज्यात जाती-जातीमध्ये असा तडका लावला होता.
‘फोडा आणि राज्य करा’ अशी ही नीती होती. प्रगतीच्या थापा मारायच्या, विश्वगुरुत्वाचे ढोल पिटायचे, अस्तमितेचे अंगार फुलत ठेवायचे, असे हे कंप्लीट पॅकेज होते. सामान्य जनता प्रतिक्रियावादी असते. त्याने असे केले म्हणून आपण असे करायचे, त्याने तसे केले म्हणून आपण तसे करायचे, एवढाच विचार ती मुख्यत्वेकरून करत असते. ठोशास ठोसा, दातासाठी दात आणि डोळ्यासाठी डोळा, हाच न्याय बहुतांश सामान्य लोकांना पटत असतो. सामान्य जनतेला संपूर्ण सामाजिक भान नसते, याचा फायदा उठवायची ही नीती होती. ‘त्यांनी’ असे केले, ‘त्यांनी’ तसे केले, असे खरे खोटे मेसेजेस फिरवत राहायचे फक्त! ‘त्यांना’ वठणीवर आणण्याच्या आड लोकशाही आणि लोकशाहीवादी लोक येत आहेत, असा प्रचार करत राहायचे. ‘त्या’ लोकांमध्ये कधी मुसलमान, कधी ख्रिश्चन, कधी पाश्चात्य तर कधी चीन! शत्रू हवा सततचा. या सगळ्या खूंखार शत्रूंना वठणीवर आणण्यासाठी एक सुपरमॅन, एक अवतारी पुरुष, एक देव!
देश उभा आणि आडवा फोडत राहायचा आणि त्याच वेळी ‘एक हैं तो सेफ हैं’ अशा घोषणा देत राहायच्या. लोकांमधील द्वेषभावाला खतपाणी घालत राहायचे आणि त्याच वेळी आदर्शवादालाही शब्दसुमने वाहात राहायची. मानवी मनाला असणारी द्वेषाची गरज भागवायची आणि त्याच वेळी मानवी मनाला आदर्शवादापासून आपण दूर गेलेलो नाही, असे भासवत राहायचे.
मोदी हे विलक्षण राजकारणी होते. विचारसरणीमधील कुठलाही अंतर्विरोध सामान्य माणसाच्या लक्षात येत नाही, हे त्यांच्या जेवढे लक्षात आले होते, तेवढे ‘मोदीकालीन भारता’मधील दुसऱ्या कुणाही नेत्याच्या लक्षात आले नव्हते.
द्वेषभावनेच्या पायावर आदर्शवादाचे इमले बांधायचे! आदर्शवादाची व्याख्या अगदी सोपी करून टाकायची! आपण जे करू तो आदर्शवाद! आपल्याला उच्च मूल्य बोलाविशी वाटली, तर तसे बोलून टाकायचे! आपण अत्यंत सहिष्णू आहोत म्हणून केवळ आपणच असे बोलू शकतो असे सांगायचे. आपल्याला आपण जे बोललो आहोत, त्याच्या विरुद्ध वागावेसे वाटले तर तसे वागून टाकायचे. आपण सहिष्णू असलो, आदर्शवादी असलो, तरी आपण व्यवहारात व्यवहारासारखे वागू शकतो, असे तेव्हा सांगायचे. लोक दुष्ट आहेत म्हणून आपण दुष्टपणा करत आहोत, असे सांगायचे! आपण उच्च मूल्यांविषयी जे बोललो त्याच्या अगदी उलट बोलावे, असे आपल्याला वाटले तर तसेही बोलून टाकायचे. आदर्शवाद आदर्शवादाच्या ठिकाणी, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, असे या वेळी सांगायचे! या जगात कसेही वागले तरी ते ‘डिफेंड’ करता येते. आपल्या समर्थकांच्या गळी उतरवता येते. बास एवढेच! आपला मतदार खुश राहतो आहे ना, बास! ऐवढे सगळे सुचले म्हणजे मग पुढचे सोपे असते.
आपण आदर्शवादी आहोत, भ्रष्टाचारापासून दूर आहोत, ताकदवान आहोत, सामर्थ्यशाली आहोत, आपल्यावर अमेरिकेसह सगळी दुनिया जळते आहे, आपले विरोधक या दुष्टतेच्या एकसंध मूर्ती आहेत, इतर धर्मीय हा तर दुष्टतेचा कळस आहेत, हे सतत लोकांच्या कानीकपाळी ओरडत राहायचे. ‘गोदी मीडिया’ची फौज उभी करायची. सामान्य माणूस दिवसभराच्या व्यापाने थकून टीव्ही लावून जेवायला बसला की, टीव्हीवरून द्वेषाच्या विषाचा एक एक थेंब रोज त्याच्या कानात ओतत राहायचे! रोज रोज तेच! विष, विष आणि विष!
गांधीजींचा विश्वास माणसामधल्या चांगुलपणावर होता. मोदीजींचा विश्वास माणसाच्या भित्रेपणावर होता. लोकांना सतत भीती वाटत राहिली पाहिजे. मुसलमानांची भीती, ख्रिश्चन लोकांची भीती, पाश्चिमात्य संस्कृतीची भीती, बुद्धिवादाची भीती, सायन्सची भीती, चीनची भीती, रोहिंग्या मुसलमानांची भीती, बांगलादेशी घुसखोरांची भीती, हिंदू धर्म नष्ट होण्याची भीती.
जे कोणी पत्रकार, जे कोणी टीव्ही चॅनेल्स आपला अजेंडा प्रसारित करणार नाहीत, त्यांचा छळ करायचा. आपल्या उद्योगपती मित्रांना हे चॅनेल्स आणि हे पत्रकार विकत घ्यायला सांगायचे! तरीही काही यू ट्यूब चॅनेल्स ऐकत नाहीत, काही लेखक आणि पत्रकार ऐकत नाहीत. त्यांना काहीच करता येत नाही. त्यांना काही करायला गेले, तर ‘इंटरनॅशनल बॅकलॅश’ येतो. मग त्या विषयी सांगायचे की, ‘बघा आम्ही लोकशाहीवादी आहोत, म्हणून हे लोक दुष्ट असले तरी केवळ लोकशाही जिवंत राहावी, म्हणून आम्ही त्यांचा विरोध सहन करत आहोत!
हे सर्व करत असताना एक एक करून लोकशाही यंत्रणा पोखरत राहायच्या. विश्वविद्यालये, न्यायसंस्था, इलेक्शन कमिशन, वृत्तसंस्था, कुणाला कुणाला म्हणून सोडायचे नाही. ईडी आणि सीबीआय वापरून विरोधी पक्ष खिळखिळे करत राहायचे. त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत राहायचे. भीती दाखवून विरोधी पक्षातले सगळे भ्रष्ट नेते आपल्या पक्षात घ्यायचे. त्यांच्या जिवावर त्यांच्या प्रभावक्षेत्रामधील त्यांची ‘व्होट बँक’ हस्तगत करायची. वर आपण स्वतः भ्रष्टाचारी नाही आहोत, असा डंका बडवत राहायचे.
आणि एवढे सगळे करत असताना मोठे मोठे उद्योगपती आपले मिंधे कसे होत राहतील, हे बघायचे. २०१४ साली जो उद्योगपती ६० हजार कोटीचा होता, त्याला सुमारे २ लाख कोटी रुपयाची तारणरहित कर्जे भारतीय बँकांकडून मिळवून द्यायची. त्याला कर चुकवू द्यायचे, त्याला आपल्या स्वतःच्या शेअर्सच्या किमती मॅनिप्युलेट करू द्यायच्या, मॅनिप्युलेट केलेले शेअर्सचे तारण बँकांना तारण म्हणून स्वीकारायला लावायचे. बाहेरच्या देशात या उद्योगपतीवर खटले दाखल झाले, तरी भारतात त्याच्याविरुद्ध साधा एफआयआरसुद्धा दाखल होणार नाही, याची काळजी घ्यायची. त्याला ज्या ज्या कंपन्या पाहिजे आहेत, त्या त्या त्याला मिळतील, अशी व्यवस्था करायची. मूळ मालकांना आपल्या मालकीच्या फायद्यात असलेल्या कंपन्या याला विकायला लावायच्या. त्यासाठी त्या मालकांवर सीबीआय वगैरे संस्थांना केसेस दाखल करायला लावायच्या! अनेक उद्योग!
असल्या मिंध्या आणि अस्तित्वासाठी आपल्यावर अवलंबून असलेलेया उद्योगपतीला मग विविध राजकारणी विकत घेण्यासाठी वापरायचे. त्याचा पैसा वापरून पक्ष फोडायचे, सरकारे पाडायची, विरोधी पक्ष तहस नहस होतील हे बघायचे.
यात एकच गोची असते. नृशंस राजकारण करणे सहज जमून गेले, तरी चांगले अर्थकारण करणे अवघड असते. चुकीच्या निर्णयांनी अर्थव्यवस्था मंदावू लागते. निवडणूक जिंकणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागते. मग सरकारी पैसा मतदारांवर उडवायचा. ‘लाडली बेहना’, ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’, ‘प्रिय माता’ अशी नावे देऊन निवडणुकीच्या आधी हजारो आणि लाखो कोटी करदात्याच्या पैशातून उडवायचे. गरीब मतदारांना ‘आपने मेरा नमक खाया हैं’ असे ऐकवायचे. सरकारी पैसा उडवायचा आणि तुम्ही माझे स्वतःचे मीठ खाल्ले आहे, असे सांगायचे! अशा असंख्य गोच्या करून निवडून यायचे आणि म्हणायचे – ‘मी हिंदू हृदयसम्राट आहे’. एवढा सिनिसिझम, एवढा दंभ, एवढी नृशंस विचारधारा! सगळेच विचित्र, अनाकलनीय!”
शिरोजीने हे सगळे एका दमात लिहिले असणार, परंतु एक गोष्ट खरी होती. ही बखर लिहिली गेली, त्या काळात लोकशाहीवादी आणि उदरामतवादी निराश झाले होते. शिरोजी मात्र शांत होता. हरयाणा आणि विशेषतः महाराष्ट्रामधील विजयानंतर मोदीभक्त चेकाळले होते.
शिरोजीने आपल्या एकविसाव्या बखरीत तत्कालीन भारतामधले हे वातावरण अगदी खरे खरे उतरवले आहे. रोजनिशीशी शिरोजी जेवढा मनस्वीपणे बोलतो, तेवढा तो आपल्या बखरीमधून बोलत नाही. असो.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शिरोजीची बखर : प्रकरण २१
लोकसभेत मोदीजींना संपूर्ण बहुमत प्राप्त करता आले नाही. नंतर जम्मू आणि काश्मीरमधील निवडणुकीमध्येसुद्धा भाजप पराजित झाला. या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि महाराष्ट्रातसुद्धा भाजप हरणार असाच सगळ्यांचा अंदाज होता. हरयाणा काँग्रेसच्या हातून थोडक्यात गेला, पण महाराष्ट्रात मात्र भाजपने कमाल केली. २३७ जागा मिळवून दणदणीत बहुमत मिळवले. भक्तांना उधाण आले. अविनाश तर रात्रभर जागून भास्कर आणि समरला मेसेजेस पाठवत होता. उदारमतवादी तर निराशेमध्ये बुडून गेले.
पांडेजींनी समजूत काढली, तसे भास्कर आणि समर पांडेजींच्या ठेल्यावर आले. ग्रूपमध्ये नुकताच अॅड झालेला राघव तेथेच होता. भास्कर आणि समर येताच पांडेजी म्हणाले -
पांडेजी - ये जनमत का फैसला नहीं हैं.
भास्कर - जनता मूर्ख झाली आहे, आपण तरी काय करायचे?
समर - मी तर आता निवडणुका या विषयावर बोलणारच नाहिये. काय करायचं आहे या देशाचं करा, जावा!
भास्कर - जनतेला लाज नाही, तर आपण तरी कशाला आपला जीव वाळवायचा?
पांडेजी - ऐसा नही हैं! लोकशाही में हर कोई अपने अपने हिसाब से मत देता हैं! लोगों को आज लग रहा हैं के भाजपा को मत देने से उनके हितों की रक्षा होगी.
राघव - लोकतंत्र को ऐसे आव्हानों का सामना करनाही पडता हैं!
भास्कर - आता ‘लोकतंत्र’ उरलेले नाहिये, हे ‘धनतंत्र’ झालेले आहे. ‘डेमॉक्रसी’ जाऊन ‘प्लुटॉक्रसी’ आलेली आहे.
समर - ७३,००० कोटी रुपयांची लाच दिली मतदारांना. ‘लाडकी बहीण’ काय, ‘लाडका भाऊ’ काय - आपला पैसा उडवला या लोकांनी दिवसाढवळ्या!
पांडेजी - काँग्रेस भी तीन हजार रुपया देने वाली थी अपने बहेनों को!
राघव - (पांडेजींकडे दुर्लक्ष करत) मतदाराला लाच देऊन मतं घेतली.
समर - नऊ कोटी मतदारांपैकी अडीच कोटी मतदारांना लाच दिली. पंचवीस टक्के मतदाराला हजार दीड हजार रुपयात येडं केलं.
राघव - आहे हे असं आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकी आधी काँग्रेसनेसुद्धा शेतकऱ्यांची ७० हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली होती आणि निवडणूक जिंकली होती.
भास्कर - शेतकरी निदान पीक काढतो.
पांडेजी - आप ऐसा नहीं कह सकते. स्त्री शक्ती भी अपना भार उठा लेती हैं अर्थव्यवस्था में.
राघव - तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. भारतातली गरिबी हटवण्यात काँग्रेस आणि भाजप दोन्हीही पक्ष अयशस्वी झालेले आहेत, म्हणून हे असे पैसे वाटून निवडणूक लढवायची पाळी दोन्ही पक्षांवर आलेली आहे.
पांडेजी - झारखंड में भी जे एमएमने ‘मैया सम्मान’ योजना में पैसा बाटा और चुनाव जीत लिया.
राघव - केजरीवाल क्या कर रहें हैं? मतदारांना लाच देऊन ते निवडणुका जिंकत आले आहेत हे खरे आहे. आणि काँग्रेसनेसुद्धा भाजपपेक्षा जास्त लाच देऊन निवडणूक जिंकायचा प्रयत्न केला, हेसुद्धा खरे आहे.
भास्कर - आता हा पैसा असाच उडवला जात राहिला, तर काय होणार? परवडणार आहे का भारताला ते?
राघव - हा पैसा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकून हळूहळू जॉब तयार केले गेले पाहिजेत, पण निवडणुका जिंकण्याच्या गोंधळात ते आता कुठल्याही पक्षाला शक्य नाहिये. आता हळूहळू सगळ्याच गरीब लोकांना पैसे देत राहावे लागणार आहे.
पांडेजी - मोदीजी मुफ्त राशन अस्सी करोड़ लोगों को दे रहें हैं. उसका पाच साल का खर्चा ११ लाख करोड हैं.
समर - परवडणार आहे का आपल्याला हे?
राघव - नाही परवडणार.
समर - म्हणजे, मोदीकाका निवडून यावा म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेने मरायचे का?
राघव - काँग्रेसवाले आले तरी तेसुद्धा पैसा देणारच आहेत. (यावर भास्कर आणि समर काही बोलू शकले नाहीत.)
राघव - या सगळ्या प्रकाराचे परिणाम दिसू लागतील. रुपया हळूहळू कोसळू लागेल. रुपया कोसळला की, ऑइल इम्पोर्टचा खर्च वाढेल. त्यामुळे बेसुमार महागाई होईल. तेव्हा बघू हे राजकीय पक्ष आणि पैसे घेऊन या लोकांना मतं देणारी जनता काय करते...
(चर्चा इथेच थांबली. पुढे डिसेंबरमध्ये रुपया हळूहळू कोसळू लागला. मोदी सरकारने आपल्या परकीय चलन गंगाजळीमधून ६० अब्ज डॉलर म्हणजे चार लाख सत्तर हजार कोटी रुपये खर्च करून रुपयाची घसरण थांबवायचा प्रयत्न केला, पण रुपया पडतच राहिला. शेवटी तो एक डॉलर मागे ८६ रुपयांच्या पुढे गेला. मनमोहनसिंग सरकारच्या काळात रुपया ४८वरून ६२पर्यंत पडला, तेव्हा मीडियाने हलकल्लोळ माजवला होता. एवढेच काय अमिताभ बच्चनसारख्या सिनेनटांनीसुद्धा ट्विटरवरून विनोद केले होते. मोदीकालीन पडझडीत मात्र हे सर्व शूरवीर शांत राहिले. शेअर मार्केट धडाधड पडू लागले. सोने महागले. अशा अवस्थेत पांडेजींनी पुन्हा सगळ्यांना बोलवले. )
अविनाश, नाना आणि अच्युत आले; तेव्हा राघव, भास्कर, समर आणि पांडेजी भजी खात होते.
अविनाश - महाराष्ट्रात मार खाल्यावर आज वेळ झाला तुम्हाला चर्चा करायला.
नाना - निराशेने ग्रस्त झाले होते हे लोक! (हु हु हु)
पांडेजी - भजी लीजिए नानाजी!
नाना - (भजे उचलत) थ्री चिअर्स टू बीजेपीज दणदणीत परफॉर्मन्स!
अविनाश - बरनॉलच्या किती ट्यूबा संपल्या भास्कर?
समर – अरे, एक राज्य जिंकलं तर इतके नाचताय. लोकसभेला काय वाट लागली पाहिली ना?
नाना - पण लोकांना लगेच कळलं की, मोदीजींशिवाय पर्याय नाही. (हु हु हु)
भास्कर - मोदीजी इतके पॉप्युलर आहेत, तर ७३ हजार कोटी रुपयांची लाच का दिली मतदाराला?
समर - आणि इलेक्शन मॅनिप्युलेट का करावी लागली तुम्हाला?
अविनाश - काय पुरावा आहे तुमच्याकडे?
राघव - आपण एकेक विषय बोलू. पहिल्यांदा ७३ कोटी रुपयांच्या रेवड्या का वाटल्या गेल्या, यावर बोलू.
नाना - जीएसटीमुळे कर जास्त जमा होतो आहे, त्यामुळे सरकारकडे पैसे आहेत. गरिबांचा पैसा गरिबांना परत द्यायचा. काय वाईट आहे त्यात?
भास्कर - अगदी इलेक्शनच्या तोंडावर का वाटला पैसा?
अविनाश - त्यालाच तर ‘चाणक्यनीती’ म्हणतात.
समर - मतदारांना लाच देणे याला ‘चाणक्यनीती’ म्हणतात?
अविनाश - कसली लाच? मदत आहे ती गरीब बहीण आणि भावांना.
राघव - गरीब का राहिले आहेत हे बहीण आणि भाऊ?
नाना - सत्तर वर्षे वाया घालवली तुम्ही लोकांनी. लोक गरीब राहणार नाही तर काय होईल?
राघव - पाच वर्षांत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करतो असं म्हणाले होते मोदीजी. आज अकरा वर्षं झाली मोदीजी येऊन, शेतकरी रोज खाली खाली जात राहिला आहे.
अविनाश - त्याचा इथं काय संबंध?
राघव - शेतकरी गरीब राहिला नसता, तर कोणी गरीब राहिलं नसतं या देशात.
भास्कर - शेतकऱ्याकडं पैसा आला असता, तर त्याने खर्च केला असता. त्यातून खेड्यापाड्यात उद्योगधंदे चालले असते. खेड्यात डिमांड वाढली असती, तर भारतभरात मोठे उद्योगधंदे वेगाने वाढले असते.
समर - रुपया पडला नसता मग असा धडाधड.
अविनाश - काहीतरी बोलू नकोस मूर्खासारखं!
भास्कर - यात काय आहे मूर्खासारखं?
राघव - “रुपिया उसी देश का गिरता हैं, जिस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता हैं”, असं म्हणाले होते स्वतः मोदीजी १४ साली.
अविनाश - ते मनमोहनसिंग सारख्या माणसाबद्दल खरं होतं. मोदीजी वेगळे आहेत.
(मोदीभक्तांच्या अशा वागण्यामुळेच मोदीभक्तांना अंधभक्त असेही म्हटले जात असे - संपादक)
समर - का? मोदीजींनी अर्थव्यवस्था खूप स्ट्राँग केली आहे, म्हणून रुपया पडतो आहे का?
अविनाश - नाना आपण या मूर्ख लोकांशी का बोलतो आहोत? तरी बरं भारतीय जनता या लोकांच्या पार्श्वभागावर दरवेळी लाथा घालते आहे.
राघव - रुपया का पडतो आहे एवढं सांग.
नाना - रुपया पडला तर एक्पोर्ट करणाऱ्या माणसाला फायदा होतो. म्हणून मोदीजींनी मुद्दाम पाडला आहे रुपया.
राघव - हो का?
नाना - तसा तर जपानचा येन तर एक डॉलरला १५८ येनपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी मुद्दाम खाली ठेवला आहे.
राघव – अहो, एक्सपोर्ट खूप आहे जपानचा. त्यांना फायदा होतो येन खाली ठेवल्याचा.
अविनाश - मग मोदीजीसुद्धा तेच करत आहेत.
राघव - जपानचा एक्पोर्ट त्यांच्या इम्पोर्ट एवढाच आहे. त्यांना फायदा होतो येन स्वस्त झाल्यावर. आपला इम्पोर्ट आपल्या एक्पोर्टपेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला तोटा होणार रुपया पडला की.
अच्युत – राघव, तू हे काय बोलतो आहेस? मला काही कळत नाहिये. रुपया पडला की, एक्सपोर्टला फायदा आणि इम्पोर्टला तोटा हे कसे होईल?
राघव - हे बघ तू एक्पोर्टर आहेस. डॉलरची किंमत ८० रुपये आहे. तू एक डॉलरचा एक्पोर्ट केलास तुला किती रुपये मिळाले?
अच्युत - ८०.
राघव - आता रुपया पडला आणि डॉलरच्या तुलनेत ८६पर्यंत घसरला. आता तू एक डॉलरचा एक्पोर्ट केलास तर तुला किती रुपये मिळाले?
अच्युत - ८६.
राघव - म्हणजे सहा रुपये तुला रुपया पडल्यामुळे जास्त मिळाले.
अच्युत - हो.
राघव - आता तू इम्पोर्टर आहेस असे समज. रुपयाचा भाव ८० असताना तू एक डॉलरचा इम्पोर्ट केलास. तुला किती रुपये द्यावे लागले?
अच्युत - ८०.
राघव - हाच भाव ८६ झाला, तर तुला एक डॉलरच्या इम्पोर्टसाठी किती रुपये द्यावे लागले?
अच्युत - ८६.
राघव - म्हणजे तुला इम्पोर्ट किती रुपयांनी महाग पडला रुपया पडल्यामुळे.
अच्युत - ६ रुपयांनी.
अविनाश - (चिडून) या राघवला जे कळते आहे, ते मोदीजींना कळत नाहिये का? मोदीजींनी रुपया पडू दिला, म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असणारच ना? ते काय वेडे आहेत का रुपया पडू द्यायला?
राघव - (अविनाशकडे दुर्लक्ष करत) अच्युत, आता असा विचार कर, तू एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट असं दोन्ही करतो आहेस. तुझ्या इम्पोर्टपेक्षा तू करत असलेला एक्सपोर्ट जास्त असेल, तर रुपया पडल्यामुळे तुला जास्त फायदा होईल का रुपया वधारल्यामुळे?
अच्युत - पडल्यामुळे.
राघव - करेक्ट. जपानची अवस्था अशी आहे, त्यामुळे येन पडला तर त्यांना फायदा होतो.
अच्युत - च्यायला अशी गेम आहे होय!
राघव - आता तुझा इम्पोर्ट तू करत असलेल्या एक्पोर्टपेक्षा जास्त आहे, तर तुला रुपया पडल्यावर फायदा होईल का पडल्यावर?
अच्युत - वधारल्यावर.
राघव - राईट! भारताची परिस्थिती अशी आहे. भारत आपल्या एक्पोर्टपेक्षा इम्पोर्ट जास्त करतो.
भास्कर - आता सांग, भारताचा रुपया पडला पाहिजे की, चढला पाहिजे.
अच्युत - नक्कीच चढला पाहिजे.
समर - म्हणजे मोदीजी पंतप्रधान असताना रुपया पडला, तर ते अपयश आहे, असंच म्हणायला लागेल.
अविनाश - (चिडून) नाना, दर वेळी हे लोक निवडणुकीत पडतात आणि काहीतरी खुस्पट काढून आपली चेष्टा करतात.
राघव - प्रत्येक वेळी तुम्ही निवडून येता असं कसं म्हणता येईल?
भास्कर - कर्नाटकात काय झालं? तेलंगणात काय झालं? हिमाचलमध्ये काय झालं? काश्मीरमध्ये काय झालं?
राघव - झारखंडमध्ये काय झालं?
भास्कर - अविनाश लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुझ्या घरचा टीव्ही तू भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते, म्हणून फोडला होतास का?
अविनाश - तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहिये.
अच्युत - आपला इम्पोर्ट आपल्या एक्सपोर्टपेक्षा जास्त असेल, तर आपला रुपया पडला नाही पाहिजे. साधी गोष्ट आहे.
अविनाश - तुम्ही गप्प बसा. मोदीजींनी रुपया पडू दिला, म्हणजे भारताच्या फायद्याचंच असणार ते.
(अंधभक्त - संपादक)
अच्युत - (हसतो)
अविनाश - मोदीजी कर्तृत्ववान आहेत. सगळं बघून घेतील ते.
भास्कर - काय बघून घेतील? बेरोजगारी वाढते आहे किती!
अविनाश - तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच आहे. इतकं सगळं बेकार चाललं आहे, तर मोदीजी निवडून का येतायत चोंग्यांनो?
भास्कर - तू लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी टीव्ही का फोडलास, हे सांग.
समर - आणि रुपया का पडतो आहे, हे सांग.
नाना - तुम्ही महाराष्ट्रात मार का खाल्ल्ला सपाटून हे सांगा तुम्ही पहिल्यांदा.
राघव - सांगतो. महाराष्ट्रात एकूण नऊ कोटी मतदार आहेत. त्यातल्या अडीच कोटी मतदारांना तुम्ही रेवडी वाटली ७३ हजार कोटी रुपयांची. मतदान ५० ते ६० टक्के होते साधारणपणे. म्हणजे ५ ते ६ कोटी लोक मतदान करतात. त्यातल्या अडीच कोटी लोकांना तुम्ही लाच दिलीत. यामुळे किमान ४ किंवा ५ टक्के स्विंग आला तुमच्या बाजूला. त्यामुळे निवडणूक फिरली.
भास्कर - तुम्ही लाच दिलीत मतदारांना म्हणून फरक पडला ४-५ टक्क्यांचा.
अविनाश - तुम्ही द्यायचे होते ७३ हजार कोटी रुपये.
राघव - काँग्रेस कुठून देणार इतके पैसे? तुम्ही सरकारमध्ये होतात म्हणून उडवू शकलात जनतेचा पैसा.
भास्कर - आणि एक सांग, लोकसभेची निवडणूक ते विधानसभेची निवडणूक यात पाच महिन्यात महाराष्ट्रातले मतदार ४५ लाखांनी कसे वाढले?
समर - राहुल गांधी म्हणत आहेत की, एक कोटी मतदार वाढले.
नाना - लोकसभेचा निकाल बघून सामान्य नागरिक सावध झाला. मोदीजींना पाडण्याचे कारस्थान लक्षात आले त्याच्या. म्हणून ज्यांनी आपली मतदार म्हणून नोंद केली नव्हती, ते लोक मोठ्या संख्येने मैदानात उतरले आणि त्यांनी आपल्या नावाची नोंद केली.
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
नाना - (गालातल्या गालात हसतात)
अच्युत - (राघवला) या वर काय म्हणणे आहे तुमचे?
राघव - बरोबर आहे. नोंद झालेले सगळे मतदार खरे होते ना?
नाना - नक्कीच होते.
राघव - मतदाराची जेव्हा नोंद होते, तेव्हा त्याचा पत्ता द्यावा लागतो ना?
भास्कर - हो द्यावा लागतो.
राघव - म्हणजे नोंद झालेला प्रत्येक मतदार जेन्युइन आहे, हे क्रॉस चेक करता येईल ना?
समर - नक्कीच करता येईल!
भास्कर - दिलेल्या पत्त्यावर तो मतदार राहतो आहे, हे तिथे जाऊन चेक केल्याशिवाय मतदारयादीत नाव घातलं जात नाही कुणाचं.
राघव - करेक्ट. आता नव्यानं अॅड झालेले मतदार चेक करायचे असतील, तर त्यासाठी निवडणूक आयोगाने सगळ्या मतदारांची यादी विरोधी पक्षाला एक्सेल शीटमध्ये द्यायला पाहिजे ना?
अच्युत - नक्कीच द्यायला पाहिजे.
अविनाश - काय गरज आहे?
अच्युत - अरे द्या की! कर नाही त्याला डर कशाला?
राघव - करेक्ट! काँग्रेस आणि इतर पक्ष मागत आहेत तर निवडणूक आयोग का देत नाहिये ती यादी?
अच्युत - हे संशयास्पद आहे.
अविनाश - काही संशयास्पद नाही आणि काही नाही. तुम्हाला आणि त्या काँग्रेसला काही उद्योग नाहिये. इलेक्शन हरायच्या आणि नंतर चीटिंग झालं म्हणून बोंबलत फिरायचं. भिकार×× साले!
राघव - इथे काँग्रेसला हा गेम उशिरा कळला. दिल्लीमध्ये केजरीवालने रंगेहात चोरी पकडली.
अविनाश - कसली चोरी?
राघव - भाजपच्या अनेक खासदारांच्या दिल्लीमधल्या घरच्या पत्त्यांवर तीस-तीस चाळीस-चाळीस खोटे मतदार नोंदले गेले आहेत.
अच्युत - हे भयानक आहे.
अविनाश - हे खोटे आहे.
राघव - खुद्द केजरीवालच्या मतदारसंघात दहा हजार नवीन मतदार नोंदले गेले आहेत असे आणि पाच हजार पूर्वीचे मतदार डिलीट झाले आहेत.
अविनाश - खोटे बोलू नकोस.
राघव - हे बघ, ‘टाईम्स ऑफ इंडिया’मधली बातमी आहे १६ जानेवारीची. ‘व्होटर लिस्ट मॅनिप्युलेशन’ प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे.
अविनाश - त्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला काय कळतंय?
भास्कर - केजरीवालचा मतदारसंघ आहे एक लाखाचा, त्यात दहा हजार भाजपचे खोटे मतदार अॅड झाले.
समर - आणि मुसलमान, गरीब, झुग्गीवाले असे केजरीवालचे पाच हजार मतदार डिलीट झाले.
राघव - म्हणजे एक लाखाच्या मतदानसंघात स्विंग किती परसेंटचा झाला?
अच्युत - १५ परसेंटचा. चार-पाच परसेंटचा स्विंग आला की, निवडणूक इकडची तिकडे होते.
राघव - महाराष्ट्रात हे असेच झाले आहे. नक्कीच!
भास्कर - राहुल गांधी म्हणतो आहे ते बरोबर आहे. महाराष्ट्रात झोल झाला आहे.
अविनाश - त्या राहुल गांधीला काय कळतंय? यूसलेस माणूस.
अच्युत - मतदारयादी द्या विरोधीपक्षांना.
भास्कर - महाराष्ट्रात ग्रामीण भागात जा तुम्ही. तिथल्या लोकांचं हेच म्हणणं आहे की, झोल झाला आहे.
अविनाश - आम्ही कशाला जाऊ. तू जा तुला पाहिजे तर. तुम्ही हरला आहात निवडणूक.
राघव - मारकडवाडीमधले लोक म्हणाले की, आमच्या गावात भाजपला इतकी मतं मिळूच शकत नाहीत. म्हणून त्यांनी बॅलट पेपरवर मतदान घेऊन बघायचं ठरवलं!
भास्कर - का नाही घेऊ दिलं मतदान त्यांना?
समर - गाड्या गाड्या भरून पोलीस का पाठवले?
नाना – ‘लॉ अँड ऑर्डर’चा प्रॉब्लेम झाला असता.
राघव - ज्या गावात केवळ १५०० मतदार आहेत तिथं कसला होऊ शकतो प्रॉब्लेम?
नाना - फार मोठं षड्यंत्र होतं ते!
राघव - तुम्ही दीड हजाराच्या गावात तीन हजार पोलीस पाठवले होते. काय गोंधळ होऊ शकणार होता? घेऊ द्यायचं होतं मतदान.
अविनाश - तू गप रे! तुला एवढं कळत असतं, तर लोकांनी तुलाच नसतं का पाठवलं मोदीजींच्या ऐवजी?
नाना - तुम्ही आता पराभव झाला की, ‘ईव्हीएम, ईव्हीएम’ असं ओरडणं बंद करा.
अविनाश - नाहीतर ईव्हीएम चुकीचं मतदान करतायत, हे सिद्ध करा. बाकी बकवास बंद करा.
नाना - तुम्हाला इतक्या संधी दिल्या निवडणूक आयोगानं. इतक्या वेळा ‘ओपन हॅकॅथॉन’ आयोजित केलं. ओपन चॅलेंज दिला की, ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवा. करू शकलात का तुम्ही?
राघव - आम्ही ईव्हीएम हॅकिंगविषयी नाही बोलत आहोत. आम्ही ईव्हीएम मॅनिप्युलेशनविषयी बोलत आहोत.
अविनाश - त्याला काही अर्थ नाही, नुसते शब्दांचे खेळ.
राघव - हा ईव्हीएमचा प्रश्न जर्मन सर्वोच्च न्यायालयाने, सोडवला तसा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सोडवला पाहिजे.
अविनाश - त्यांनी काय दिवे लावले तेही सांगा आता. तुम्हाला त्या पाश्चात्यांचे पाय चाटल्याशिवाय करमतच नाही.
राघव - जर्मन सर्वोच्च न्यायालय म्हणालं की, मतदानाची पद्धत सामान्यातल्या सामान्य मतदाराला समजेल अशी असायला हवी. ती खरी ट्रान्सपरन्सी! सामान्य मतदाराला संशय आहे ना ईव्हीएम गोची करतंय म्हणून, नका वापरू ईव्हीएम मग! सिंपल!
भास्कर - ग्रेट निर्णय आहे जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाचा.
समर - आपल्या सर्वोच्च न्यायालयाने हा विचार करायला पाहिजे.
अविनाश - तुम्हाला जे कळतंय ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना समजत नसेल का?
नाना - आपल्या देशात परिस्थिती वेगळी आहे. बूथ कॅप्चर करून एकगठ्ठा ठप्पे मारता येतात.
राघव - तुम्ही म्हणता ते पूर्वी बरोबर होतं नाना. आता परिस्थिती बदलली आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आजकाल. शिवाय सतत क्लोज सर्किट कॅमेऱ्यावर मॉनिटर करता येते व्होटिंग प्रोसेस. पूर्वीसारखं शक्य नाही आता.
समर - सीसीटीव्ही चालू असताना ईव्हीएम मॅनिप्युलेशन हाच एक मार्ग उरतो!
अविनाश - तू गप! मोदीजी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बघून घेतील.
(अंधभक्त! मोदीभक्तांची आत्मवंचना करण्याची क्षमता कुणाही डोकं ठिकाणावर असलेल्या व्यक्तीला आश्चर्य वाटावे अशीच होती. - संपादक)
राघव - (अविनाशकडे दुर्लक्ष करत) मला कळत नाहिये की, इतका साधा, सिंपल आणि लोकशाहीच्या हिताचा विचार का करत नाहिये न्यायालय!
समर - (नेट वर चेक करत) २००९चा निर्णय आहे हा जर्मन न्यायालयाचा!
भास्कर - आश्चर्य आहे! अजून आपल्याकडं ही चर्चासुद्धा का होत नाहिये?
राघव - मारकडवाडीमध्ये मतदान होऊ नाही दिलं या लोकांनी, पण मारकडवाडीने एक दिशा दाखवून दिली आहे सर्वोच्च न्यायालयाला.
अविनाश - त्या अडाणी लोकांचं ऐकायचं का सर्वोच्च न्यायालयाने?
राघव - सामान्य, ग्रामीण आणि दलित माणसाच्या शहाणपणावर थोडा विश्वास ठेवायला शिका तुम्ही लोक!
अविनाश - तू ठेव तुला पाहिजे तर. (हु हु हु)
भास्कर - तुमच्या मनात अशी घृणा आहे सगळ्या समाजाबद्दल म्हणून विद्वेषाच्या राजकारणाच्या मागे लागला आहात तुम्ही लोक!
नाना - तुमची पकड सुटली आहे सत्तेवरची म्हणून तुम्ही असं बोलता आहात.
भास्कर - पकड खरं तर तुमची सुटली आहे. तुमच्या विचारसरणीला ट्रॅक्शन मिळत नाहिये आता समाजात १४ आणि १९ साली मिळालं तसं. तुमच्या नेत्याचा करिश्मा कामाला येत नाहिये आता तुमच्या. म्हणून तुम्ही सरकारचा पैसा उधळत सुटला आहात. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीपासून हे सुरू झालं आहे.
भास्कर - लाडली बहेना, लाडला भैया, लाडली मैय्या…(जोरात हासतो)
राघव - पैसा उडवायचा, द्वेष पसवायचा, मतदारयादीमधून आपले विरोधक मतदार उडवायचे, आपले मतदार त्या लिस्टमध्ये घुसडायचे, आणि त्यानेही काम भागत नाही म्हणून गुंड आणि भ्रष्ट बाहुबली वापरायचे.
अविनाश - तोंड सांभाळून बोल. काय पुरावा आहे तुझ्याकडं?
राघव - केजरीवालने रेड हँडेड पकडलंय तुम्हा लोकांना. एकेका खासदाराच्या पत्त्यावर चाळीस चाळीस नवे मतदार?
अविनाश - केजरीवालच्या लोकांनीच केलं असणार ते.
नाना - रेवडी बहाद्दर केजरीवाल!
राघव - ७३ हजार कोटी उडवून झाल्यावर आता हा शब्द इतरांविषयी वापरायचा अधिकार उरलेला नाहिये तुम्हाला.
भास्कर - आता एकच गोष्ट उरली आहे. तुम्ही केलेल्या आतोनात खर्चामुळे रुपया अजून किती पाडतो आहे ते पाहत बसायचं. अजून महागाई किती होते आहे ते पाहाता बसायचं.
नाना - कितीही वाढू दे महागाई. तो मोदी शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच फिरवणारा खिलाडी आहे.
समर - एकदा नीतीशकुमार आणि चंद्राबाबू नायडूने तुमच्या कुबड्या काढून घेतल्या की, कळेल तुम्हाला.
अविनाश - त्यांचे खासदार ऑलरेडी भाजपकडे आलेले आहेत. नीतीश आणि नायडूने काही हालचाल केली, तर त्यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे होणार! (हु हु हु)
(शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे ‘मोदीकालीन महाराष्ट्रा’मधले मोठे नेते होते. त्यांचे आमदार फोडून त्यांची राजकीय प्रभा संपवण्याचा मोठा प्रयत्न २०२२ ते २०२४ या काळात केला गेला. त्यासाठी मोदीजींच्या कथित उद्योगपती मित्राने सुमार २००० हजार कोटी खर्च केले, अशी चर्चा त्या काळी झाली होती. - संपादक).
राघव - कुणी विकत घेतले आहे त्या नीतीश आणि नायडूच्या खासदारांना? मोदीजी तर भ्रष्टाचार करत नाहीत ना?
नाना - ते स्वतः होऊन आले आहेत मोदीजींकडे मोदीजींची देशभक्ती पाहून.
राघव - (जोरात हसतो) इस बढ़िया बात पर एक चाय पिला दिजिए पांडेजी. अब चर्चा करने लायक कुछ बचा नही हैं आजकी तारीख में.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
तर २०२४च्या जानेवारीमध्ये ‘मोदीकालीन भारता’त अशी परिस्थिती होती. विद्वेष, लाचखोरी, ठप्प होत चाललेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी, अपप्रचार, ‘गोदी मीडिया’ने लोकशाहीशी केलेली प्रतारणा, सर्वोच्च न्यायालयाची मुग्धता, रोज कणाकणाने कोसळून पडू लागलेले लोकशाहीचे आधारस्तंभ अशी सगळी दारुण परिस्थिती होती. आज शंभर वर्षानंतरचे वाचक म्हणतील की, अशा वेळी भारतामधील मतदार काय करत होते?
शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे की- “राहुल गांधी आणि त्यांची भगिनी प्रियांका गांधी हे दोघेच ‘मोदीवादा’ला खरा खुरा विरोध करत होते. बाकी विरोधी पक्षनेते ‘ट्रँझॅक्शनल’ होते. म्हणजे सत्ता आणि पैशासाठी कुठलिही किंमत द्यायला तयार असलेले होते. त्यांना विचारधारेशी काही घेणे-देणे नव्हते. विचारधारेचे राजकारण राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त बाकी कोणीही करत नव्हते.”
शिरोजी पुढे लिहितो - “मोदीकालीन भारतात गरिबी इतकी होती की, दर महीना हजार दीड हजार ही फार मोठी रक्कम होती भारतातील अनेक स्त्री-पुरुषांसाठी. दीड हजार दर महिन्याला जो देईल त्याला मत द्यायला हे लोक तयार होते. भाजप असो वा काँग्रेस वा इतर जो कोणी पक्ष, जो पैसे देईल त्याला या लोकांची मतं मिळणार होती. जो पैसे देतो आहे त्याला मत, अशी परिस्थिती होती. ज्यांच्याकडे पैसे होते असे लोक बेरोजगारी, वाढती महागाई, अर्थव्यवस्थेची परिस्थिती यांचा विचार करून मत देण्यापेक्षा आपली जात आणि आपला धर्म या निकषांवर मत देत असत. कारण बेरोजगारी आणि महागाई वाढतच जात असतात असा अनुभव लोकांना सतत येत राहिला होता. बेरोजगारी कोणी कमी करू शकते, अर्थव्यवस्था नीट हाताळली तर महागाई कमी होऊ शकते, यावर ‘मोदीकालीन भारता’तील कुणाही मतदाराचा विश्वास उरला नव्हता. या गोष्टी कोणताही पक्ष कसा कमी करू शकेल, असे बहुतांश मतदारांना वाटत होते.
या बाबतीत शेवटचा विश्वास २०१४ साली मतदारांनी मोदीजींवर दाखवला होता. त्यांनीही याबाबतीत निराशा केली होती. सगळी परिस्थिती अशी असल्यामुळे सरकारकडून जो पैसा मिळतो आहे तो घ्या, अशी वृत्ती झाली होती. मोदीजी अशा लोकांना पैसा वाटत सुटले होते.
थोडक्यात, पैसे मिळतायत म्हणून मत देणारे आणि इतर धर्माच्या निकषावर मत देणारे लोक ‘मोदीप्रणित राजकारणा’चे आधारस्तंभ बनले होते. लाभार्थी आणि अंधभक्त! बाकी कुठे मतं कमी पडू लागली तर ‘व्होटर लिस्ट मॅनिप्युलेशन’ वगैरे प्रकार होतेच. इतके करूनही विरोधी पक्षाचे सरकार कुठल्या राज्यात आलेच तर त्यांचे आमदार बेसुमार पैसा देऊन फोडणे हा प्रकार होतच! त्याला ‘ऑपरेशन लोटस’ असे गोड नाव दिले गेले होते.”
असा हा २०२५च्या सुरुवातीचा कालखंड होता. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये निवडणूक होती. केजरीवाल विरुद्ध भाजप अशी लढत होती. परंतु काँग्रेसला गरीब आणि मुसलमान लोकांमध्ये पाठिंबा वाढतो आहे, असे काही सर्व्हे सांगू लागले होते.
शिरोजीचे लक्ष दिल्ली काय कौल देते आहे, याकडे लागून राहिले होते. परंतु त्याहीपेक्षा त्याचे लक्ष भारताच्या डळमळू लागलेल्या अर्थव्यवस्थेकडे आणि वेगाने कोसळणाऱ्या रुपयाकडे लागले होते. त्याने त्याच्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे - “आता पुढची बखर अर्थकारणावर लिहिली पाहिजे.”
शिरोजीने आपल्या बखरींमध्ये रंगवलेल्या चर्चानाट्यामधून ‘मोदीकालीन भारत’ आपल्यासमोर अगदी जिवंत होऊन उभा राहतो, हे २१२५मधील आजच्या सर्व वाचकांना मान्य करावेच लागेल, परंतु त्याच वेळी शिरोजीच्या रोजनिशीमधून व्यक्त होणाऱ्या तत्त्वचिंतनामधून ‘मोदीकालीन भारता’चे अंतरंग आपल्या समोर उलगडत जातात, हेसुद्धा आपण नाकारू शकत नाही.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment