‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे
ग्रंथनामा - झलक
दत्तप्रसाद दाभोळकर
  • ‘संघ समजून घेताना...’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 12 January 2025
  • पडघम झलक संघ समजून घेताना Sangh Samjun Ghetana दत्तप्रसाद दाभोळकर Dattaprasad Dabholkar

प्रसिद्ध शास्त्रज्ञ व अभ्यासक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी वेळोवेळी आपल्या लेखांच्या माध्यमातून देशातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक राजकारणाचा वेध घेतला आहे. त्या लेखांचे संकलन असणारे ‘संघ समजून घेताना...’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. नुकतीच त्याची दुसरी आवृत्ती आली आहे. त्यानिमित्ताने लेखकाने या पुस्तकाला लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१.

हे शतप्रतिशत सत्य आहे की, संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज संघ उभा आहे.

या मागे आहे, संघाची शंभर वर्षांची अथक, एकाकी, कष्टप्रद, काही काळ यातनामय अशी चिवट वाटचाल. या वाटचालीत संघाबरोबर होते काही वेळा मूठभर, काही वेळा सूपभर, पूर्णपणे समर्पित, व्रतस्थ, चिवट स्वयंसेवक. आपल्याला काय करावयाचे आहे, हे संघाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय ‌- ‘‘आम्हाला अखंडित, सुसंघटित, एक घटनात्मक, एकचालकानुवर्तित्व, परमवैभवशाली हिंदू राष्ट्र पुन्हा उभे करावयाचे आहे. भगवा ध्वज हा या राष्ट्राचा राष्ट्रध्वज असेल, संस्कृत ही राष्ट्रभाषा असेल. ‘गीता’, ‘महाभारत’, ‘रामायण’, वेद, उपनिषदे हे मार्गदर्शक ग्रंथ असतील.”

थोडक्यात, याचा अर्थ सनातन ब्राह्मणी संस्कृती, आपण या देशात पुन्हा प्रस्थापित करणार आहोत! गुरू गोळवळकरांनी या समर्पित स्वयंसेवकांना एक संदेश, म्हणजे संघाच्या शब्दांत एक आदेश दिला होता- ‌“लक्षात ठेवा, पुढील काही काळात आपल्याला अशी एक संघटना उभी करायची आहे, ज्या संघटनेच्या केवळ नजरेच्या एका इशाऱ्याने केंद्रात सत्ता येतील आणि जातील.”

गुरुजींचे हे विधान म्हणजे ‌‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ असे म्हणत संघाकडे उपेक्षेने किंवा उपहासाने पाहत परिवर्तनवादी चळवळ उभी होती आणि त्यात त्यांचीही काही फार चूक नव्हती... कारण संघ जे अगदी चिवटपणे करत होता, ती एक भयावह पण अशक्यप्राय रचना होती. धर्म, जात, पंथ, भाषा यामुळे शतखंडित झालेला हा विशाल भूभाग होता. ‌‘विविधतेतून एकता’ एवढा एकच मंत्र बरोबर घेऊन या भूभागाचे नवनिर्माण करता येईल, असे आम्ही मानत होतो. या मांडणीला नाकारत संघ उभा होता. त्यातून त्यांना पुन्हा पिळवणुकीवर आधारलेली सनातन ब्राह्मणी व्यवस्था धर्म म्हणून या भूभागावर वज्रलेप करायची होती. या रचनेत भंग्याचा मुलगा केवळ शंभर पिढ्याच नव्हे तर पिढ्यान्‌‍ पिढ्या भंग्याचेच काम करू शकत होता.

बहुजन समाजाला अप्राप्य असलेल्या संस्कृत भाषेत ज्ञान, धर्मशास्त्र, कायदे बंदिस्त होते. हे संस्कृत ग्रंथ वाचण्याचे जरी पाप केले, तरी रामराज्यात देखील शंबुकाला मृत्युदंड होता. सर्वसामान्य माणसांना त्यांच्यासाठी बनवलेला धर्म, त्यांच्यासाठी बनवलेले कायदे म्हणजे त्याने कसे वागावे, काय खावे, कोणते कपडे घालावेत, त्याने कोणत्या शिक्षा भोगल्या पाहिजेत हे फक्त ब्राह्मण ठरवणार होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बहुजन समाजाचे राहू देत, स्वत:च्या असामान्य, अलौकिक, अद्भुत सामर्थ्याच्या क्षत्रिय माणसालासुद्धा तुला राजा बनण्याचा अधिकार आहे की नाही, हे ठरवण्याचा आणि तुला राज्याभिषेक करावयाचा की नाही, हे ब्राह्मण त्याला सांगू शकत होते आणि या ब्राह्मणांबद्दल समाजाचे प्रबोधन करताना रामदास स्वामी ‌‘झाला ब्राह्मण मूढमती तरी तो जगत्वंद्य’ ही लक्ष्मणरेषा सांगत होते. आणि केवळ रामदासस्वामी नव्हे, तर मध्ययुगातील बहुतेक सर्व संत हेच सांगत उभे होते. आता आपणाला काय करावयाचे आहे, हे देश स्वतंत्र होत असताना संघाचे ‌‘ऑर्गनायझर’ हे वृत्तपत्र सांगत होते. त्यांनी लिहिले होते, ‌“ ‘मनुस्मृती’ ही या देशाची घटना असली पाहिजे.”

या घटनेवर आधारित एक सनातन, अखंडित, सुसंघटित, एक घटनात्मक आणि एकाधिकारशाही मानणारे राष्ट्र संघाला पुन्हा निर्माण करावयाचे होते. खरे तर या विशाल भूभागावर अनेक काळ छोटी-मोठी राज्ये होती. राष्ट्र ही संकल्पनाच नव्हती. डावे विचारवंत काय सांगतात, हे पूर्णपणे नजरेआड केले, तरी साक्षात स्वामी विवेकानंद सांगत होते, ‌‘या भूभागावर हळूहळू एक राष्ट्र निर्माण होत आहे.’ आणि लोकमान्य टिळकांनी नेमकं हेच सांगितलंय.

६ ऑगस्ट १८९५च्या ‘केसरी’त ‌‘११वी राष्ट्रीय सभा’ या आपल्या अग्रलेखात त्यांनी लिहिले आहे- “आमच्या हिंदूस्थानात पूर्वी ५६ देश होते. असा आमचा इतिहास आहे. पण इंग्रज सरकारमुळे हे ५६ देश मोडून त्यांचे एक राष्ट्र होण्याचा समय आला आहे.” त्याच अग्रलेखात त्यांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे- “राष्ट्रीय सभेच्या विस्तीर्ण मंडपात बंगाली, मद्रासी, सिंधी, पारशी, मुसलमान आदींकरून सर्व जातीचे लोक एकमताने राष्ट्रीय प्रश्नांचा विचार करताना आपण पाहात आहोत. या देशाच्या भावी ऐक्याचा हा पाया आहे, असे मी समजतो.”

टिळकांचे मोठेपण मान्य करत असतानाच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे सर्व लोक उच्चवर्णीय हिंदू किंवा अशरफ मुसलमान आहेत. जातींच्या पिरॅमिडमध्ये सर्वोच्चस्थानी असलेले या देशाच्या एकूण लोकसंख्येत त्यांची टक्केवारी दहा टक्क्यांहूनही कमी आहे. याची नोंद टिळकांनी तेथे व त्यानंतर कुठेही घेतलेली नाही. म्हणजे या देशातील बहुजन समाज या लोकांच्या मनात नव्हताच का? मोगल आणि इंग्रज यांनी आमचे म्हणजे उच्चवर्णीयांचे किंवा अशरफ मुसलमानांचे राज्य घेतले ते आम्हाला परत पाहिजे एवढेच हे लोक सांगत होते का?

या देशातील बहुजन समाज उच्चवर्णीय हिंदू आणि अशरफ मुसलमान यांच्या पायदळी तुडवला गेला आहे, जात आहे, ते या उच्चवर्णीय पुढाऱ्यांच्या लक्षातही आलेले नाही, असे काही आहे का?- २० जून १८९४ रोजी दिवाणजी यांना पाठवलेल्या पत्रात विवेकानंदांनी या देशाच्या अवनीतीचे कारण सांगिताना सांगितलेय- ‌‘‘आपले खरे राष्ट्र आज झोपटीत रहात आहे. आणि हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन राजवटीत ते निर्दयपणे तुडवले गेले आहे.”

त्यापूर्वी मोगल आणि इंग्रज सोडले तर मध्यवर्ती राजासुद्धा नव्हता आणि अगदी त्या कालखंडातसुद्धा आपापल्या छोट्या छोट्या राज्यांचे रक्षण करत युद्धे होत होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज आणि सून महाराणी ताराबाई यांच्यात आपल्या राज्याच्या सीमा नक्की करण्यासाठी फार मोठ्या लढाया होत होत्या. रजपूत राजे आपल्या जातीचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्याबरोबर लढाया खेळत होते. इंग्रजी अंमल असताना दोन जवळची छोटी छोटी संस्थाने आपापल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी युद्धे करत होती. आणि त्या दोन्ही छोट्या संस्थांनातील युद्ध कायमपणे थांबवण्यासाठी इंग्रजांनी त्या दोन्ही संस्थानाचा सीमेजवळचा भाग घेऊन त्यांच्यामध्ये इंग्रजी अंमल बसवला होता!

मात्र संघाच्या मनात एक अखंडित, सुखंडित सनातन ‘हिंदू राष्ट्र’ होते. ते ‘हिंदू राष्ट्र’ आणि ‌‘सकल हिंदू बंधू बंधू’ म्हणून संघ वाटचाल करत होता. पण त्यात एक विलक्षण पेच होता. त्यांच्या मनात मनुस्मृती पक्की होती. त्यामुळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा ‌‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’, ‌‘हरीजनांना मंदिर प्रवेश’, ‌‘एक गाव एक पाणवठा’ या गोष्टी ‌‘सकल हिंदू बंधू बंधू’ म्हणताना त्यांना आठवत नव्हत्या. ‌‘आंतरजातीय विवाह’ हा कार्यक्रम हिंदू एकतेसाठी त्यांना हातात घ्यावा वाटला नाही - याचे कारणही आपण समजावून घ्यावयास हवे.

संघाच्या ‌‘सकल हिंदू बंधू बंधू’ या कार्यक्रमात अगदी धर्मकृत्य मानून अस्पृष्यता म्हणजे शिवाशिव न मानता सर्व हिंदूंनी संघस्थानावर एकत्र येणे, रोटी-बेटी व्यवहार करणे पाळणे एवढेच बसत होते. आंतरजातीय विवाह कार्यक्रम म्हणून संघ घेऊ शकत नाही. गुरुजींनी त्यांच्या ‌‘बंच ऑफ थॉटस्‌’मध्ये अगदी खणखणीत शब्दांत सांगितलेय, ‌‘‘जाती व्यवस्था एक फार चांगली व्यवस्था आहे. या जाती व्यवस्थेमुळेच अनेक काळ, अनेक आक्रमणे पचवून हा देश आणि हा धर्म अजिंक्य ठरले.”

आणखी एक गोष्ट आहे. संघांच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत संघातील सर्वोच्चपद ‌‘सरसंघचालक’ हे प्रामुख्याने फक्त ब्राह्मणांना मिळाले. फार थोडा वेळ ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना ‘द्विजजाती’ म्हणतात त्यांना मिळाले. मात्र या द्विजजातींची सेवा करणे एवढेच फक्त इतर बहुजनसमाजाचे जीवनकार्य आहे, ही जी लक्ष्मणरेषा अगदी ज्ञानेश्वर महाराजांनीही घातली आहे, ती संघाने ओलांडलेली नव्हती.

परिवर्तनवादी मंडळी पूर्णपणे बेसावध होती. कारण एक अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आम्ही करणारच म्हणून संघ उभा आहे, असे त्यांना वाटत होते. मात्र हे एवढ्यावरच थांबले का? प्रत्येक संघटनेची, प्रत्येक रचनेची काही शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने असतात. आपण अगदी नकळत संघाची शक्तिस्थाने बळकट केली आणि त्यांची मर्मस्थाने झाकून ठेवायला मदत केली, असे काही झाले का? संघाची शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून परिवर्तनवादी चळवळीने आपली रणनीती ठरवणे गरजेचे आहे का?

...........................................................................................................................................

गुरुजी सरसंघचालक झाल्यावर १९४८पर्यंत संघाची वाढ फार झपाट्याने झाली. गुरुजींचे संघटनाकौशल्य याला कारणीभूत आहे, हे खरेच. पण तो कालखंडपण झपाटलेला किंवा मंतरलेला होता. या कालखंडात संघ भारतभर पसरला. संघाने भारतभर पसरलेले प्रामाणिक, पारदर्शक आणि वरिष्ठांच्या आज्ञेसाठी काहीही करावयास, कोणताही त्याग करावयास तयार असलेले हजारो स्वयंसेवक तयार केले हाते. मात्र संघ आणि काही तुरळक अपवाद सोडता संघाचे स्वयंसेवक गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनापासून पूर्णपणे दूर राहिले. फाळणीच्या वेळी भारतभर पसरलेल्या दंगलीत हिंदूंना संरक्षण देताना त्यांनी आपले प्राणही गमावले- मात्र त्याचा व्यत्यासही खरा आहे!

...........................................................................................................................................

२.

संघाचा खऱ्या अर्थाने फार मोठा विस्तार झाला, तो गोळवलकर गुरुजी सरसंघचालक असताना. गुरुजींची सरसंघचालक म्हणून नियुक्ती कशी झाली, ते लक्षात घ्यावयास हवे. १७ जून रोजी डॉक्टर हेडगेवार यांची एक फार कठीण शस्त्रक्रिया करण्याचे नक्की झाले. डॉक्टरांचे वास्तव्य नेहमीप्रमाणे त्या वेळी घटाटे यांच्या बंगल्यात होते. डॉक्टरांनी कृष्णराव मोहरीर, यादवराव जोशी आणि घटाटे यांना जवळ बोलावले. डॉक्टर गुरुजींना म्हणाले, ‌‘मी यातून वाचलो तर मी आहेच. नाहीतर तुम्ही सर्व सांभाळा.’

त्यांनतर २० जूनला सकाळी साडेनऊ वाजता डॉक्टर गेले. ताबडतोब प्रांतसंघचालक पाध्ये आले. त्यांना घटाटेंनी डॉक्टरांचा निर्णय सांगितल्यावर त्यांना फार बरे वाटले. घटाटे यांना निर्णय लगेच जाहीर करावयाचा होता. पण पाध्ये यांच्या मते हिंदू परंपरेप्रमाणे तो तेराव्या दिवशी जाहीर करावा. घटाटे यांनी हे मान्य केले. मात्र निर्णय न आल्यामुळे मधल्या काही दिवसात भय्याजी कायंदे, विनायकराव आपटे, अप्पाजी जोशी अशी अनेक नावे घटाटे यांच्याकडे आली. तेराव्या दिवशी संघाचे सर्व मान्यवर नेते आले होते. मात्र गुरुजी आले नाहीत. ‌‘माझे नाव जाहीर होत असताना मी तेथे नको’ असे ते म्हणाले. विदर्भ प्रांताचे संघ प्रमुख बाबाजी पाध्येपण आले नाहीत. त्यांनी नेमकी त्याचवेळी अकोल्याला बापूसाहेब सोहनींकडे सभा बोलावली.

मात्र यानंतर घटाटे यांनी जे लिहिले आहे, ते महत्त्वाचे आहे. या मंडळींचा ब्राह्मणी, सनातन कर्मकांडावर असलेला विश्वास त्यातून आपल्यासमोर येतो. त्यांनी लिहिलंय, ‌‘ज्या वेळी सर्वानुमते गुरुजींची नियुक्ती मान्य झाली, त्याच वेळी रेशीमबागेत कावळ्याने पिंडाला स्पर्श केला. तोपर्यंत कावळे जवळ येत होते पण स्पर्श करत नव्हते. त्या वेळी ठरल्याप्रमाणे साडे दहा वाजता अकोल्याचाही निर्णय झाला होता. म्हणजे अगदी त्यावेळी साडे दहा वाजता कावळ्यांनी पिंड ग्रहण करण्यास सुरुवात केली.”

आपण आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. घटाटे, मुंजे ही फार मोठी माणसे आहेत. १९३१मध्ये लंडन येथील गोलमेज परिषदेत हे दोघेही उपस्थित होते. या दोघांनी युरोपातील सैनिकी शाळांचे निरीक्षण करून १९३५ ते ३७ या कालखंडात भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली आहे. त्याचप्रमाणे घटाटेंच्या बंगल्यात गुरुजी, शामाप्रसाद मुखर्जी, बलराम मधोक, बाळासाहेब देवरस, भय्याजी दाणी यांनी एकत्रित चर्चेतून जनसंघ स्थापन केलाय.

गुरुजी सरसंघचालक झाल्यावर १९४८पर्यंत संघाची वाढ फार झपाट्याने झाली. गुरुजींचे संघटनाकौशल्य याला कारणीभूत आहे, हे खरेच. पण तो कालखंडपण झपाटलेला किंवा मंतरलेला होता. या कालखंडात संघ भारतभर पसरला. संघाने भारतभर पसरलेले प्रामाणिक, पारदर्शक आणि वरिष्ठांच्या आज्ञेसाठी काहीही करावयास, कोणताही त्याग करावयास तयार असलेले हजारो स्वयंसेवक तयार केले हाते. मात्र संघ आणि काही तुरळक अपवाद सोडता संघाचे स्वयंसेवक गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनापासून पूर्णपणे दूर राहिले. फाळणीच्या वेळी भारतभर पसरलेल्या दंगलीत हिंदूंना संरक्षण देताना त्यांनी आपले प्राणही गमावले- मात्र त्याचा व्यत्यासही खरा आहे!

संघाची आणि गुरुजींची अग्नीपरीक्षा सुरू झाली ती गांधीहत्येनंतर. संघपरिवाराविरुद्ध अप्रत्यक्षपणे एक फार भयानक दंगल सुरू झाली. संघातील स्वयंसेवकांचा एक जहाल गट आपण या वेळी आक्रमक भूमिका घ्यावी या मताचा होता. त्यांनी गुरुजींना सांगितले- ‌“निरपराध लोकांवर प्राणघातक हल्ले होताहेत. त्यांची घरेदारे जाळली जात आहेत. आम्हाला आदेश नको- फक्त परवानगी द्या. आम्ही लाठ्या काठ्या घेऊन तेथे जातो. एकाही निरपराध माणसाला त्रास होणार नाही. घरे जाळली जाणार नाहीत. संपत्तीचे नुकसान होणार नाही. आमचे प्राण जातील पण दंगलखोरांना आणि सरकारला ही दंगल थांबवायलाच लागेल.”

गुरुजींनी याला स्पष्ट नकार दिला. त्यांनी सांगितले, ‌“आपल्याला या देशात हिंदूंमधील यादवीसुद्धा नको आहे. ही दंगल दुसऱ्या संस्कृतीमधील लोकांनी केली असती तर आपले सामर्थ्य आपण दाखविले असते. दंगल करणारे आपलेच रागावलेले भाऊ आहेत.”

गुरुजींचा हा विचार जपणारे खूप स्वयंसेवक होते. आज आपण प्रा. डॉ.वि. रा. करंदीकर यांना नामवंत प्राध्यापक आणि संत वाङ्मयाचे आणि विवेकानंदांच्या विचारांचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखतो. त्यावेळी ते संघाचे प्रचारक होते. त्यामुळे त्यांचे झोपडीवजा घर पेटवण्यात आले. त्यांना नेसत्या पंचानिशी आई वडिलांसह झोपडी सोडावी लागली. नंतर काही काळाने जळितांना मदत देण्याचा सरकारी कार्यक्रम सुरू झाला. तुमचे नुकसान किती झाले? तुम्हाला किती मदत द्यावी म्हणून त्यांना विचारले. त्यांनी दिलेले उत्तर आहे, ‌“मी कोणतीही मदत घेणार नाही. माझ्याच घरातील माझीच माणसे माझ्यावर चिडली होती. त्यांची समजूत पुढील वाटचालीत मी घालणार आहे.”

त्यानंतर सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली. (काही जण सांगतात त्याप्रमाणे बंदी घालण्यास नेहरूंचा विरोध होता.) संघाने सत्याग्रहाचा निर्णय घेतला. अनेक स्वयंसेवकांचा त्याला विरोध होता. आजवर सत्याग्रह, तुरुंग भरती याची आपण चेष्टा करत आलोय. आता आपणच सत्याग्रह का करायचा? हा त्यांचा प्रश्न होता. मात्र हा संघटनेचा म्हणजे गुरुजींचा आदेश होता. स्वयंसेवकांनी फार मोठ्या संख्येने सत्याग्रहात म्हणजे तुरुंग भरतीत भाग घेतला किंवा संघ आजही सांगतो त्याप्रमाणे गांधीजींच्या कोणत्याही सत्याग्रहात एवढे लोक तुरुंगात गेले नाहीत!

‌‘संघ ही सांस्कृतिक संघटना आहे. संघाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही’, अशा स्वरूपाचा लिखित वचननामा गुरुजींनी दिल्यावर संघावरील बंदी उठली. त्या वेळी संघातील एक तसा मोठा गट हे सारेच पटत नसल्याने संघाबाहेर पडला. त्या वेळी संघात उभी, आडवी अशी काही फूट पडली नाही. मात्र त्यामुळे संघाची पुढील काही वर्षांतील वाटचाल थोडी अधिक क्लेशदायक झाली. बाहेर पडलेल्यांनी वेगळी संघटना काढली नाही.

त्यानंतर गुरुजींनी संघाची एक शाखा म्हणून जनसंघ स्थापन केला. त्या वेळी काय ठरले हे बलराज मधोक यांनी त्यांच्या ‌‘हिंदू स्टेट’ या पुस्तकात लिहिलंय. जनसंघाची घटना लिहिण्यात खरेतर गुरुजी, हिंदू महासभेचे शामाप्रसाद मुखर्जी आणि प्रजापरिषदेचे मधोक या तिघांचा प्रमुख वाटा आहे. त्या वेळी लालकृष्ण अडवाणी मधोकांचे सेक्रेटरी म्हणून काम करत होते. मधोकांनी लिहिलंय, ‌‘‘आम्हाला जनसंघाच्या घटनेत ‌‘हिंदू राष्ट्र’ हा शब्द घालावयाचा होता. मात्र पटेलांची दहशत एवढी मोठी होती, की आम्ही ते टाळले.” डिसेंबर १९५२मध्ये कानपूर येथे भरलेल्या जनसंघाच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशात शामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेल्या आणि सर्वानुमते संमत झालेल्या ठरावात आम्ही सांगितलंय- १) सर्व स्तरावरील शिक्षणात गीता, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत शिकविणे अनिवार्य असावे. २) उच्च माध्यमिक व त्यावरील शिक्षण घेणाऱ्या सर्वांना संस्कृत चांगले आले पाहिजे आणि सर्व भारतीय भाषांसाठी देवनागरी लिपी अनिवार्य हवी.

पुढील काही काळात संघ आणि जनसंघ अगदी सावकाश वाढत होते. गुरुजींची या दोन्ही संघटनांवरील पकड विलक्षण होती. संघातील फार मोठे कार्यकर्ते बाळ दाणी किंवा संपूर्ण दिल्ली ज्यांच्या हातात होती असे वसंतराव ओक यांना गुरुजींनी केवळ फुंकर मारून दूर केले. अप्पा पेंडसे, देवल यांच्यासारख्या बुद्धिमान, व्रतस्थ स्वयंसेवकांनी प्रश्न विचारले म्हणून बाहेरचा रस्ता दाखवला. जनसंघाचे अध्यक्ष मौलीचंद्र शर्मा आणि त्यानंतरचे जनसंघाचे अध्यक्ष खुद्द बलराज मधोक यांना केवळ जनसंघातून नव्हे तर राजकारणातून पालापाचोळ्यासारखे दूर फेकले.

म्हणजे गुरुजींच्या काळात संघ, जनसंघ भारतभर पसरला होता. संघटनेवर गुरुजींची पोलादी पकड होती आणि भारतभर पसरलेले व्रतस्थ बुद्धिमान स्वयंसेवक गुरुजींच्या आदेशावर काहीही करावयास तयार होते. मात्र संघ आणि जनसंघ फारसे किंवा अजिबात वाढत नव्हते.

संघाबद्दल संघाने प्रकाशित केलेले सर्व काही मी वाचले होते. मनात निर्माण होणारा गोंधळ मजेशीर होता. हे केवळ गोलगोल फिरणे नव्हते. राजकारण म्हणजे ‌‘रेड लाईट एरियात प्रवेश करणे’, ‌‘वारांगनेव नृपनीती अनेक रूप’ हे लक्षात ठेवा. ‌‘मुखवट्यांचे जग’, ‌‘राजकारणात खोटे बोला, पण रेटून बोल” त्यांच्या स्वयंसेवकांवर त्यांनी केलेले हे संस्कार हा त्यांच्या रणनीतीचा भाग होता. पण अगदी हास्यास्पद स्वरूपात त्यांचे मुखवट्याचे जग ज्या पुस्तकातून पुढे येते, त्या पुस्तकातील एक उदाहरण देतो- दामुअण्णा दाते हे संघाच्या महाराष्ट्र विभागाचे बौद्धिक प्रमुख. ‌‘स्मरण शिल्पे’ हे त्यांचे पुस्तक. त्या पुस्तकात पाठोपाठ दोन परस्पर विरोधी विधाने आहेत. पहिले विधान आहे- पुण्याच्या वसंत व्याखानमालेत बाळासाहेब देवरसांचे भाषण होते. भाषणात ते म्हणाले, ‌‘‘मी आत्ता एक महत्त्वाचे विधान करणार आहे. हे विधान करण्यापूर्वी मी या सभेचे अध्यक्ष बाबाराव भिडे यांच्याशीपण बोललो आहे. त्यांनाही हे मान्य आहे आणि हे विधान मी सरसंघचालक म्हणून करतोय. ते विधान असे आहे- जोपर्यंत दलितांना हवे आहे तोपर्यंत आरक्षण सुरू राहिले पाहिजे.”

आणि त्याचवर्षी झालेल्या प्रतिनिधी सभेत कोणता ठराव पारीत झाला, ते त्या पुस्तकात पुढील प्रकरणात दिले आहे. तो ठराव आहे. ‌‘आता एखादी नवी समिती नेमून आरक्षणाचा पुर्नविचार करण्याची वेळ आलेली आहे!’

...........................................................................................................................................

परिवर्तनवादी चळवळीने संघाला अतिशय कठीण काळात केंद्रस्थानी येण्यास फार मोठी मदत केली. अर्थातच त्या वेळी मधू लिमये यांनी याला फार मोठा विरोध केला. लिमयेंचा मुलगा अनिरुद्ध याने यावर लिहिले आहे, ‌‘‘मधू लिमये अणि लोहिया तीन दिवस, दिवस-रात्र चर्चा करत होते. तुम्हाला संघ समजलेला नाही. हे असे काही आपण अजिबात करू नये, असे लिमये सांगत होते. लोहियांना ते पटले नाही आणि मग तुमचा एक कार्यकर्ता म्हणून मी हे स्वीकारतो.” असे लिमये म्हणाले. परंतु संघपरिवार सत्तेत केंद्रस्थानी येण्याची अपरिवर्तनीय प्रक्रिया सुरू झाली ती बाबरी मशीद त्यांनी उद्ध्वस्त केली तेव्हा.

...........................................................................................................................................

३.

मी आवड किंवा वेड म्हणून आयुष्यात खूप शोधयात्रा केल्यात; ‌‘नर्मदा प्रकल्प’, ‌‘शंभर ग्रामदानी खेड्यांचा कारभार पाहणारा गोविंदपूर आश्रम’, ‌‘देवराळाची सती’, ‌‘कोसळणारा रशिया’, ‌‘नानाजी देशमुखांचा गोंडा प्रकल्प’, ‌‘भारताची अंटार्टिका मोहीम’ वगैरे वगैरे... त्यामुळे मला एक गोष्ट लक्षात आली आहे. वाचन, अवलोकन हे सुरुवात म्हणून महत्त्वाचे आहेच. खरे महत्त्वाचे असते, या सर्वांत गुंतलेल्या माणसांचा जवळचा मित्र बनून त्यांना बोलते करणे, म्हणजे उसवणे!

संघपरिवारातील ज्येष्ठ विचारवंत आणि जनसंघ, भाजप यातील फार मोठी नेते मंडळी यांच्याबरोबर मैत्री करून या माध्यमातून संघ, जनसंघ समजावून घेणे गरजेचे होते. ही मंडळी मला दारात तरी उभा करतील का? हा प्रश्न होता. संघविरोधी म्हणून मी तोवर पुरता बदनाम झालो होतो. पण मला एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला. बलराज मधोक, वसंतराव ओक, नानाजी देशमुख, मोरोपंत पिंगळे, नानाजींचा उजवा हात समजले जाणारे ‘पांचजन्य’, ‘ऑर्गनायझर’ यांचे सर्वेसर्वा असा ज्यांचा लौकिक ते यादवराव देशमुख हे सारे जण माझे फार जवळचे मित्र झाले. त्या मैत्रीचे उल्लेख पुढील लेखात मिळतील.

नानाजींच्या निधनानंतर यादवराव देशमुख यांच्याबरोबर माझा पत्रव्यवहार झाला. स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रात यादवरावांनी लिहिलेय, ‌‘‘तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. संघाचे स्वयंसेवक हिंदुत्व म्हणजे ख्रिश्चन आणि मुसलमान द्वेष असे समजतात. आणि ही चुकीची आणि भयंकर गोष्ट आहे. याचा अर्थ कदाचित आपण त्यांना मार्गदर्शन करण्यात कमी पडलो, असाही होवू शकतो.”

संघ जनसंघाचे चाणक्य, आजचे भारतरत्न नानाजी देशमुख यांनी अगदी मित्र बनून माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या. त्या ध्वनिमुद्रित करून त्यांच्याच हयातीत मला त्या प्रसिद्ध करावयास परवानगी दिली. त्यात त्यांनी म्हटलंय, ‌‘‘जनसंघ वाढत नव्हता, याचे कारण माझ्या लक्षात आले होते. संघ, जनसंघ यांना देशातील जनता गांधीजींचा हत्यारा समजते आणि गांधीजींचा खून करणाऱ्यांना या देशातील लोक जवळ उभे करणार नाहीत. मी वेगवेगळे फंडे वापरून लोहिया आणि जयप्रकाश यांच्याजवळ गेलो. त्यांनी जनसंघाला स्वीकारले आणि मग या देशातील लोकांनी जनसंघाला स्वीकारले!”

याचा अर्थ परिवर्तनवादी चळवळीने संघाला अतिशय कठीण काळात केंद्रस्थानी येण्यास फार मोठी मदत केली. अर्थातच त्या वेळी मधू लिमये यांनी याला फार मोठा विरोध केला. लिमयेंचा मुलगा अनिरुद्ध याने यावर लिहिले आहे, ‌‘‘मधू लिमये अणि लोहिया तीन दिवस, दिवस-रात्र चर्चा करत होते. तुम्हाला संघ समजलेला नाही. हे असे काही आपण अजिबात करू नये, असे लिमये सांगत होते. लोहियांना ते पटले नाही आणि मग तुमचा एक कार्यकर्ता म्हणून मी हे स्वीकारतो.” असे लिमये म्हणाले.

परंतु संघपरिवार सत्तेत केंद्रस्थानी येण्याची अपरिवर्तनीय प्रक्रिया सुरू झाली ती बाबरी मशीद त्यांनी उद्ध्वस्त केली तेव्हा. आपण एक गोष्ट विसरतो. याची रंगीत तालीम संघपरिवाराने कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक उभारताना केली आहे. विवेकानंदाच्या पत्रातील मजकुराप्रमाणे ‌‘‘आपण मित्र कन्याकुमारी मंदिराच्या मागे असलेल्या दगडावर बसून भारताचे नवनिर्माण कसे करता येईल यावर विचार करत होतो” असे आहे.

कन्याकुमारीच्या मंदिराच्या आवारात मागच्या बाजूला तो दगड आहे. विवेकानंद अर्धा मैल पोहत जाऊन त्या खडकावर रात्रभर बसले होते, असा उल्लेख त्यांच्या पत्रात नाही. अर्थात हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला आणि स्वामी विवेकानंद तेथे पोचले, हे मान्य करून तेथे तशी स्मारक शिला उभारा म्हणून राज्यसरकारने एकनाथजी रानडे यांना सांगितले होते. कारण त्याच खडकावर सेंट झेविअरचा क्रॉस होता. ख्रिश्चन लोकांचे तो क्रॉस हे श्रद्धास्थान होते. तो क्रॉस उखडून फेकून देणे, हे दंगलीला आमंत्रण देत सामाजिक सद्भाव कायमचा नाहीसा करण्यासारखे होते. मात्र १९६३मध्ये एके दिवशी सकाळी लोक उठून बघतात, तर तो क्रॉस तिथे नव्हता. ख्रिश्चन लोक प्रक्षुब्ध होऊन रस्त्यावर आले. त्यांना उत्तर देण्यासाठी हिंदू जमाव रस्त्यावर आला. फार मोठी दंगल होणार म्हणून शासनाला १४४ कलम लावावे लागले.

त्या वेळी मी पंचवीस वर्षांचा होतो. संशोधक म्हणून एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला लागलो होतो. पण पत्रकारिता ही माझी आवड होती. मी त्या वेळी तेथे होतो. त्या वेळच्या माझ्या वृत्तांकनात लिहिलेले शब्द आहेत, ‌‘‘या देशाचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याची पहिली खेळी संघपरिवाराने जिंकली आहे.’’

विवेकानंद हे नाव फार मोठे आहे. विवेकानंदांचे नाव आल्यावर कोणीही खासदाराने विरोध केला नाही. एकनाथजी रानडे यांनी प्रत्येकाकडून एक रुपया या अभिनव कल्पनेने भारतातून सर्व रक्कम उभी केली, हे कुजबूज आघाडीतून भारतभर पसरवले गेले.- परिवारानेच प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तकात म्हटलंय, ‌‘‘घटाटे यांनी एकहाती दिलेल्या गुप्त देणगीमधून एकनाथजी रानडे यांचे स्वप्न साकार झाले.”

त्याचप्रमाणे अयोध्येत भव्य राममंदिर उभारायला या देशात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ओबीसी, दलित कोणाचाच कधी काही विरोध नव्हता. विवेकानंद स्मारकाला पण विरोध नव्हता. मात्र सेंट झेविअरचा क्रॉस तेथून उखडून फेकून देण्यात होता. बाबरी मशिदीच्या जागी रामजन्मभूमी मंदिर होते, की नाही, हे प्रथम सर्वोच्च न्यायालयाने ठरवून त्यांनी तेथून ती मशीद किंवा ढाचा हलवण्यास परवानगी दिली असती, तरीही या देशाने ते स्वीकारले असते. मात्र या देशात अनेक दशके उभी असलेली एक वास्तू, काही कोटी लोकांचे श्रद्धास्थान असलेली वास्तू, हातात हातोडे घेऊन आक्रमक जमाव आला, पोलीस संरक्षणात त्यांनी ते श्रद्धास्थान उद्ध्वस्त केले, त्यानंतर जाहीरपणे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो असे सांगितले. या देशातील कायदा, व्यवस्था, संविधानिक यंत्रणा, लोकशाही यांना आम्ही मानत नाही, असे अगदी आक्रमकपणे ब्राह्मणी सनातन संस्कृतीने त्या वेळी या देशाला सांगितले.

बाबरी मशीद रस्त्यावर जमाव जमवून उद्ध्वस्त झाली, तर या देशाचा ढाचा मुळातच हादरेल आणि हे असे होऊ नये, असे वाटणाऱ्यात संघपरिवारातील काही लोकही होते. हे कसे टाळता येईल, याबद्दल मधू लिमये आणि मोरोपंत पिंगळे यांच्यात काही बैठका झालेल्या आहेत. त्या बैठकीत काय चर्चा झाली, हे माहीत नाही. त्याचप्रमाणे नानाजी देशमुख आणि मधू लिमये यांच्यात पत्रव्यवहार झालेला आहे. ती पत्रे मी स्वत:च पोचवत होतो. त्या पत्रात काय लिहिलेले होते, हे मला माहीत नाही. मात्र बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यावर नानाजींनी मला मुलाखत दिली, जी प्रसिद्ध झालेली आहे. त्यात त्यांनी सांगितलंय, ‌‘‘बाबरी मशीद उद्ध्वस्त होणे, ही चुकीची गोष्ट आहे. एकत्र बसून चर्चेनेच हा प्रश्न सोडवायला हवा होता. आमच्या मनातील अखंड भारतात केवळ पाकिस्तान, बांगला देश नव्हते, तर मालद्वीप, मलेशिया, असे अनेक विभाग येतात. आता हे कधीतरी शक्य होईल का?”

आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली नाही. ‌‘जे झाले ते वाईट झाले’ असे मानणारा एक छोटा वर्ग त्या वेळी संघात होता. नानाजी देशमुख म्हणाले, ‌‘‘आजचे सारे पक्ष, अगदी भाजप धरून सत्तेसाठी वखवखलेल्या लोकांच्या टोळ्या आहेत.” संघपरिवारात लहानपणापासून असलेल्या, डॉ.मुंजे यांच्या नातवाने स्वहस्ताक्षरात मला पत्र पाठवलं. त्या पत्रात त्याने लिहिले, ‌‘‘मी तुमच्याबरोबर संघाबाबत चर्चा केली. डॉ.खरे, बाबाराव सावरकर, डॉ.मुंजे, डॉ.हेडगेवार, घटाटे यांची पुस्तके वाचली. त्यानंतर अनेकांशी चर्चा केली. त्यामुळे आज संघाचा दैनंदिन व्यवहार बघितल्यावर संघाचा ढोंगीपणा मला कळतो. सध्याचे गडकरी मॉडेल, मुंडे मॉडेल व प्रमोद महाजन मॉडेल पाहिल्यावर आता अजून काही उरलेले नाही. कथनी व करनी मधील फरक आधी दिसत नव्हता. आता तो सर्व जगासमोर उघड झाला. आमचा राजकारणाशी संबंध नाही, असे म्हणावयाचे हे किती खोटे होते हे खरंतर घटाटे यांच्या चरित्रामधूनही आपल्याला समजले होते. ‌‘सर्व काही उद्योग करावयाचे आणि आम्ही नाही त्यातले’ असे बाहेर घोकत राहायचे. अनेक गोष्टी भेटल्यावर बोलू.” - आनंद मुंजे

असे मानणारे स्वयंसेवक त्या वेळी थोडे होते. आणि संघाने आक्रमक हिंसक दहशतवाद भारतात सर्वत्र अगदी सावकाश पण सातत्याने पसरवण्यास सुरुवात केली होती. या वाटचालीचा भयावह घृणास्पद शेवट गुजरात येथील पाशवी दंगलीत झाला. सावरकरांनी आपल्या लिखाणातून केलेले मार्गदर्शन ‌‘‘शत्रू पक्षांचे मनोबल कायमचे खच्ची करावयाचे असेल तर, त्यांच्या स्त्रियांवर त्यांच्यासमोर सामूहिक बलात्कार केले पाहिजेत.” हे व्यवहारात उतरवण्यात आले.

या सर्वांचे वृत्तान्त जगातील प्रमुख विश्वासार्ह वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. या दंगलीचे चित्रीकरण जगभर दाखवण्यात आले. प्रगत लोकशाही देशात मोदी द्वेषाची एक लाट पसरली होती. या प्रक्षुब्ध जनमानसामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी मोदींना व्हिसा नाकारला. त्या वेळी लोहिया, जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाला मनात धरून शरद पवारांनी मोदींना इस्त्रायलमधील शेती दाखवण्याच्या निमित्ताने त्यांना जागतिक पातळीवर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला! एक अस्वस्थ करणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांधीजींचा खून मिठाई वाटून भारतभर साजरा करणारे स्वयंसेवक, गुजरात दंगलीच्यावेळी भारतभर मिठाई वाटत होते. त्या वेळी अगदी ठामपणे सांगत होते, ‘‌‘केंद्रात सत्ता कशी स्थापन करावयाची आणि वापरायची हे ठरवण्यासाठी आम्ही केलेला हा शेवटचा प्रयोग आहे.”

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

४.

बालपणापासून अस्वस्थ होऊन संघ समजावून घेण्याचा मी प्रयत्न करत आलो. मात्र मी संघावर फारसे लिहीत नव्हतो. परंतु, त्या वेळी जनसंघाचे प्रवक्ते वा त्यांचे विचारवंत ‌‘आपण संघ, भाजप यांची बाजू समजावून देत आहोत’, असे जे लेख लिहीत, ज्या लेखांत अप्रत्यक्षपणे परिवर्तनवादी विचारांना झोडपून काढत. त्यामुळे मी अस्वस्थ होत होतो. त्या लेखांचा मात्र मी प्रतिवाद करत होतो. या पुस्तकातील ‘प्रतिसाद’ या भागात ते लेख समाविष्ट आहेत.

फक्त संघावर असलेला माझा पहिला लेख २००४मध्ये गुजरात दंगलीनंतर ‌‘इत्यादी’ मासिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. त्यानंतर माझा संघावरील दुसरा लेख ‌‘सनातन धर्म कधीच पराभूत झाला नाही’ हा दहा वर्षांनंतर मोदी सरकार केंद्रात आल्यावर 2014 मध्ये ‌‘मीडिया वॉच' दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. संघावरचा माझा शेवटचा ‌‘सरसंघचालक भागवत आणि स्वामी विवेकानंद’  ‌ लेख ‘मीडिया वॉच' दिवाळी अंकात २०२२मध्ये प्रसिद्ध झाला. म्हणजे या पुस्तकातील बाकीचे सर्व लेख २०१४ ते २०२२ या कालखंडात वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेत. ते लेख पूर्णपणे संघाशी संबंधित नाहीत. मात्र ‌‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ कसा केंद्रस्थानी आला, हे त्या लेखांमधून नकळत लक्षात येईल.

या पुस्तकातील माझ्या लेखात काही त्रुटी आहेत, याची मला जाणीव आहे. परंतु, या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे.

‘संघ समजून घेताना...’ - दत्तप्रसाद दाभोळकर | मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने - २१६ | मूल्य - २८० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......