दिवाळी अंकांमधील विज्ञानकथांचा आढावा घ्यायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं की, काटेकोर व्याख्येत बसणाऱ्या विज्ञानकथांपेक्षा विज्ञानाचा वापर करणाऱ्या कथा जास्त प्रमाणात आहेत. त्या कधी फॅंटसीकडे झुकतात, तर कधी त्यात विज्ञानापेक्षा इतर गोष्टींवर जास्त भर असतो. त्यामुळे अधिक व्यापक दृष्टीने ‘स्पेक्युलेटीव्ह कथां’कडे बघायला लागलो.
या कथांमध्ये विज्ञान फॅंटसी, फॅंटसी, सायबरपंक, स्टीमपंक, फ्यूचरिस्टिक, डिस्टोपियन, युटोपियन, अपॉकॅलिप्टिक, पोस्ट-अपॉकॅलिप्टिक, मॅजिकल रिआलिझम, अल्टरनेट हिस्टरी, सुपरनॅचरल, सुपरहीरो, क्लायमेट फिक्शन, आणि इतर अनेक प्रकार येतात. एकूणच आजच्या वास्तवापलीकडील जे काही असेल, त्याचा अंतर्भाव असतो. त्यातील सुपरनॅचरल आणि केवळ रूपकात्मक कथांचा इथं विचार केलेला नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
एआयचा धमाका
नोव्हेंबर २०२२ला चॅटजीपीटी आल्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय सहजपणे सर्वसामान्यांच्या हातात आली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत सर्वत्र एआयचीच चर्चा आहे. याचं प्रतिबिंब साहित्यात न दिसलं तर नवल! त्यामुळे एआयकडे अनेक प्रकारे बघणाऱ्या स्पेक्युलेटीव्ह कथा या वर्षी वाचायला मिळाल्या. निलेश मालवणकर यांनी विनोदी, हलक्याफुलक्या दृष्टीने एआय वापरून ‘झिंगालाला हू झिंगालाला हू फुर्र फुर्र’ या ‘आवाज’मधील कथेत बहार आणली आहे. त्यांचीच ‘धनंजय’मधील ‘तुझं माझं जमेना’ ही एआयवरची कथाही विचार करायला लावणारी आहे.
राजश्री बर्वे यांची ‘नवल’मधली ‘पूर्वीसारखं’ ही कथा एआय, रोबॉट, अंतराळ, विविध ग्रहांवर वस्ती अशा विविध संकल्पनांच्या दाटीनं भरलेली स्पेक्युलेटीव्ह कथा आहे. मेधा मराठे यांच्या ‘पेंटिंग’ या ‘लोकमंगल मैत्र’मधील कथेत एआय वापरून केलेल्या चित्राचा संदर्भ आहे. त्यातून माणसाच्या मनाचा ठाव घेणारी ही कथा आहे. एआय न वापरताही मनातले विचार कॅनव्हॉसवर चित्ररूपानं उमटू शकतात. त्यामुळे हे तंत्रज्ञान इथं महत्त्वाचं नाही. विज्ञान किंवा तंत्रज्ञान कथा असं जरी ठामपणे म्हणू शकत नसलो, तरी एआयकडे बघण्याची एक पद्धत त्यातून समोर येते.
‘धनंजय’मधील ‘शत जन्म शोधुनिया’ या अरुण मनोहर यांच्या कथेत एआययुक्त यंत्रांच्या विविध टप्प्यांनंतर मानवी समाजाचं चित्र रेखाटलेलं आहे. त्यात अखेरीस एक चांगली कलाटणीदेखील दिली आहे. दर टप्प्यातील चित्र वेगळं असल्यानं त्यातील नायिका आपल्याला उशीरा भेटते, पण ती प्रातिनिधिक असल्याचा अनुभव आल्यानं कथा रमणीय झाली आहे.
‘ऐसी अक्षरे’ या ऑनलाइन अंकात ‘चेतागुंजन’ ही झंपुराव तंबुवाले यांची कथा सुरुवातीपासूनच मनाची पकड घेते. आज आपण अनुभवत असलेला मन:शांती शोधणारा समाज आणि कथेतला एआयचा वापर फार निराळा आहे. म्हटलं तर किंचित धास्तावणारा आहे. कथा योग्य त्या वेगानं फुलत जाते आणि अखेरीस एक उत्तम कथा वाचल्याचं समाधान देऊन जाते. ‘तो आणि त्या तिघी’ ही मेघश्री दळवी यांची ‘महाअनुभव’मधली कथा एआय तंत्रज्ञान काय करू शकतं, काय करतं, याची एक झलक देते.
‘बेळगाव तरुण भारत’मधली डॉ. बाळ फोंडके यांची ‘पंचाहत्तरावी कादंबरी’ ही अमृतराव आणि डॉ. कौशिक या सिरीजची आणखी एक कथा. एआयच्या काळात एखाद्या लेखकाची शैली अनुसरत त्याच्या नावावर लिहिलेली फेक कादंबरी हा प्रश्न अगदी ज्वलंत होऊ घातलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर लेखन खरं की फेक याचा रहस्यभेद अचूक आणि रंजक प्रकारे करणारी ही कथा. त्यातली कोर्ट प्रोसीडिंग्जही तर्कशुद्ध पद्धतीनं व चांगल्या रितीनं मांडलेली आहेत.
आपण एआय वापरू लागलो, तरी त्याचे काम कसे चालते, याचं गूढ अजूनही काही प्रमाणात आहे. त्यामुळेच बहुधा चेतन कोटबागे यांच्या ‘धनंजय’मधील ‘बाधा’ या रहस्यकथेत एआयची भूमिका वेगळ्या धर्तीची आहे. अर्थात ती सर्वांना पटेलच असं नाही.
मागच्या वर्षी ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकात चॅटजीपीटीकडून लिहून घेतलेल्या कथा होत्या. या वर्षी ‘विनर्स’ हा दिवाळी अंक आणखी एक पायरी पुढे जाऊन पूर्णपणे एआयकडून लिहून घेतलेला आहे. मोठ्या कुतूहलानं तो वाचला. प्रयोग म्हणून स्तुत्य निश्चितच आहे. सर्व लेख एकाच लेखकाने म्हणजे एआयने लिहिले असले, तरी त्यात विषयांची विविधता आहे, हा एक दिलासा. पण यातलं लेखन मानवी लेखकांनी खुलवलेल्या लेखनाच्या पातळीवर जात नाही. ते बरंचसं अलिप्त आणि शुष्क वाटतं. मांडणी एकाच प्रकारची वाटते. या अंकात दोन कथा आहेत आणि त्या केवळ निवेदनात्मक पातळीवर राहिल्यानं त्यातील नाट्य किंवा व्यक्तिरेखा उभ्या राहत नाहीत.
मात्र एआय तंत्रज्ञान वेगानं विकसित होत आहे. त्यामुळे कदाचित आणखी दोन-तीन वर्षांनी चित्र वेगळं असेल. तंत्रज्ञानाचा झपाटा वाढत चालला असताना अशा अंकांतून भविष्यातली चुणूक दिसते, तेव्हा आपण नेमकं काय करावं? लेखक, चित्रकार, आणि सुजाण वाचक यांनी हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
...........................................................................................................................................
विज्ञानकथेचा कंटाळवाणा लेख होण्याचा धोका नेहमीच असतो, आणि अनेकदा तो टाळला जात नाही, असं दिसतं. अत्यावश्यक तेवढीच माहिती, ठसठशीत पात्ररेखाटन, भावनांचा चढउतार, आणि प्रसंगांमधून उभे राहणारे नाट्य यांचा मेळ चांगला बसला असेल, तरच ती कथा म्हणून तरते. नाहीतर ती गोष्टीरूप लेख होते. असा अनुभव ‘हसवंती नवलकथा’मधील ‘छायेची भुताटकी’ या देवबा पाटील यांच्या कथेतही येतो. मराठीत वेगवेगळे स्पेक्युलेटिव्ह कथांचे प्रयोग जम धरत असताना या कथांमधली ही त्रुटी विशेषत्वानं जाणवते.
...........................................................................................................................................
अनोख्या विषयांची लयलूट
नामवंत चित्रकारांची चित्रं, त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तिथले लिलाव, त्यातली फसवणूक हा विषय मुळातच रंजक आहे. त्याला तंत्रज्ञानाची रोचक जोड देऊन लिहिलेली डॉ. बाळ फोंडके यांची ‘धनंजय’मधली कथा ‘मायकेल एंजेलोची सही’ सुरेख झाली आहे. डॉ. कौशिक आणि अमृतराव जोडगोळीच्या सिरीजमधली ही आणखी एक कथा सिरिजच्या लौकिकाला साजेशी झाली आहे.
स्वरा मोकाशी यांची ‘जनता जीन क्लिनिक’ ही याच अंकातली कथाही जीन थेरपी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याच्या विषयावर आहे. तिच्यातील एक प्रतीक अनेक पातळ्यांवर खेळवल्याने शेवट वरच्या पातळीवर झालेला दिसतो. आशिष महाबळ यांच्या तंत्रज्ञान आणि प्रायव्हसीवरील ‘याज्ञरक्ष’ या कथेत विषय आणि हाताळणी निराळी आहे. डेटाचा विचार करताना त्यामागचा समाज विसरून चालत नाही, याची नकळत जाणीव करून देणारी ही तंत्रज्ञान कथा आहे. मेघश्री दळवी यांच्या ‘मोहनाचा दिवस’ या कथेत पर्यावरण आणि त्याला जोडून आलेलं तंत्रज्ञानातील हॅकिंग हा संघर्ष दाखवलेला आहे.
शिरीष नाडकर्णी यांची ‘त्रिमितीतला बेडूक’ ही कथादेखील वेगळ्या विषयावरची आणि कधीही घडू शकते अशी आहे. तिच्यात संघर्ष थोडा कमी पडतो, कदाचित अधिक व्यापक परिणाम दाखवून हा विषय रंगवता आला असता. स्मिता पोतनीस यांच्या ‘अदृश्य खेळी’ या कथेत नवं तंत्रज्ञान वापरण्याची रहस्यपूर्ण शक्यता खुलवून मांडली आहे.
असीम चाफळकर यांची ‘जीव भाषा’ ही कथा आपल्याला संशोधकांच्या एका निराळ्या विश्वात घेऊन जाते. भाषा, ज्ञान, त्याचा अर्थ, यासोबत मानवी भावनांचे खेळ, असे अनेक आयाम घेऊन आलेली ही कथा वाचनीय आणि मननीय झाली आहे. ‘गुलाम’ ही प्रसन्न करंदीकर यांची कथा शीर्षकापासून लक्ष वेधून घेते. तिची मांडणी आणि तिच्यात फिरत रहाणारं मध्यवर्ती सूत्र, दोन्ही रंगतदार आहेत.
डॉ. संजीव कुलकर्णी यांची ‘जलसमाधी प्रा लि.’ ही कथा पर्यावरणाचे प्रश्न, रूढी, बदलाला तयार असण्याची मानसिकता, अशा अनेक अंगांना सुरेखपणे समोर आणते. हा विषय अनोखा आणि तितकाच वास्तववादी आहे. कथेतील चर्चा उत्तम आणि तार्किक मनोवृत्तीचा पुरस्कार करणारी आहे. तुलनेत शेवट त्या पातळीवर जात नाही.
‘धनंजय’च्या अंकातील या बहुतेक विज्ञानकथा हटके विषयावर आहेत आणि त्या चांगल्या रंगल्या आहेत.
‘वसंत’मधली डॉ. बाळ फोंडके यांची ‘गुलमोहर’ ही तरल, हळुवार, भावनिक अशी कथा माणसाचे वनस्पतींशी जुळलेलं नातं दर्शवते. वाचक त्यातल्या अनुभवांशी सहजी रिलेट करतील, अशी ही उत्तम जमलेली विज्ञानकथा आहे. ‘भावार्थ’मधील प्रसन्न करंदीकर यांच्या ‘पाऊस’ या कथेत दोन काळातील विज्ञानाची प्रगती, पर्यावरण, यांना धरून झालेल्या इतिहासाच्या पुनरावृत्तीला कारणीभूत समान घटनांचे धागे जोडलेले आहेत. रूपकांचा उत्कृष्ट वापर करणारी ही कथा एकाच वेळी थरारक आणि विचारांना चालना देणारी आहे.
‘शाखामृग’ ही असीम चाफळकर यांच्या ‘लोकमंगल मैत्र’मधल्या कथेत इतिहासातील व्यक्तिरेखा विज्ञानाच्या साहाय्यानं या काळात जन्माला आली तर, ही अनोखी संकल्पना मध्यवर्ती आहे. कथा आपल्याला एका अपूर्वाईच्या वातावरणात घेऊन जाते आणि त्यातील मुख्य व्यक्तिरेखांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होते. कथेतील भाषेचा वापर आणि शेवटही चांगला झाला आहे.
‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या अंकात दर वर्षी आवर्जून विज्ञानकथा प्रकाशित होतात. या वर्षी त्यातली ‘मीन जळी तळमळले’ ही डॉ. संजीव कुलकर्णी यांची कथा पर्यावरण, परिसंस्थेचं संतुलन, त्यावर अवलंबून असलेलं जनजीवन, अशा अनेक पैलूंचा विचार करत एक वास्तव आपल्यापुढे मांडते. मंगला नाडकर्णी यांची ‘अदृश्य स्वाक्षरी’ ही त्याच अंकातली कथा एका आधुनिक तंत्राचा चांगला वापर करत शीर्षकाला न्याय देते. ‘पर्याय’ ही स्वरा मोकाशी यांची कथाही भविष्यातील एका मोहीमेचं चित्रण करता करता एक वेगळं वळण घेते. तिन्ही कथांचे विषय वेगळे असल्यानं नक्कीच लक्षात राहतील.
‘महाराष्ट्र टाईम्स, पुणे’मधील ‘खिब शॅन्ग’ ही डॉ. संजीव कुलकर्णी यांची कथा एक विलक्षण वास्तव मांडते. क्रिस्पर किंवा जीन एडिटिंग हे आजचं तंत्र, पण माणूस कितीतरी शतकं प्राण्यांचा संकर घडवून आणतो आहे. त्या प्रयोगांची नोंद कुठे असेल-नसेल, इथं स्पेक्युलेटीव्ह कथारूपातून त्यातला धक्का समोर येतो. ‘नवल’मधली ‘मेघातुर चातक’ ही शिरीष नाडकर्णी यांची कथा ‘विज्ञानानुभव’ असा टॅग लावून येते. भविष्यातील मुंबईचे अनोखे तपशील देत ही कथा पर्यावरणीय समस्या अधोरेखित करते. चातक पक्ष्याच्या प्रतीकात्मक वापरानं कथा खूप छान खुलली आहे.
मॅजिकल रिआलिझम वर्गातली निखिलेश चित्रे यांची ‘हंस’मधली ‘अविरत वाचकांचं अजब आख्यान’ ही कथा अत्यंत उत्कंठावर्धक झाली आहे. फॅंटसी, मॅजिकल रिआलिझम, विज्ञानकथा, खरं तर कोणतीही स्पेक्युलेटीव्ह कथा, यांना वाचकाला कथेतील वेगळ्या जगात ओढून घेण्याचं, ते जग विश्वासार्ह करण्याचं आव्हान असतं. ते आव्हान या कथेत समर्थपणे पेललं आहे.
‘भास’ या नव्या अंकात ‘२६ माकडे आणि अथांग विवर’ ही कीज जॉन्सन यांची स्पेक्युलेटीव्ह कथा नर्मदा खरे यांनी अनुवादित केली आहे. एकाच वेळी अॅब्सर्ड आणि अर्थपूर्ण वाटणाऱ्या या कथेचे एक एक थर आपण नकळत उलगडत जातो, तो अनुभव खरोखरीच न्यारा आहे. मराठीत अशी कथा आणल्याबद्दल ‘भास’च्या टीमचं कौतुक करायला हवे.
‘नवल’मधील रमा गोळवलकर यांची ‘नादब्रह्म’ ही कथाही एक उत्कट अनुभव देते. दरवर्षी वेगळे विषय निवडून त्यावर सुरेख कथा गुंफणाऱ्या या लेखिकेकडून आता आणखी लेखनाची अपेक्षा आहे. याच अंकात ‘शेवटचा निॲन्डरथल’ ही सुरेश भावे यांची स्पेक्युलेटीव्ह कथा एक प्रागैतिहासिक शक्यता फार मनमोहक प्रकारे रंगवते. ‘पायसची गुहा’ या मिलिंद नरहर जोशी यांच्या गूढकथेत इजिप्शियन ममी, चित्रलिपीतील लेखन, त्याला पुरातत्वशास्त्राची पार्श्वभूमी, यांच्या मदतीनं एका ऐतिहासिक घटनेची शक्यता उत्तम गुंफली आहे.
‘दीपावली’मधली विवेक गोविलकर यांची ‘देवदूत’ ही स्पेक्युलेटीव्ह कथा चित्तवेधक प्रकारे सुरू होते आणि उत्तरोत्तर रंगत जाते. शेवटाकडे आपण येतो, तेव्हा निवेदक पुढे काय करणार याबाबत आपल्या मनात काही शक्यता घोळायला लागतात. लेखक कोणती शक्यता निवडेल की, काही वेगळं वळण देईल, यावर विचार सुरू होतात. त्यांना कथेत न्याय मिळायला हवा होता असं जाणवतं. तरीही ही कथा चांगली वाचनीय झाली आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधली ‘कालप्रवाह’ ही मिया कुतो यांची निखिलेश चित्रे यांनी अनुवाद केलेली छोटेखानी स्पेक्युलेटीव्ह कथा आपल्याला निश्चितच विचार करायला लावते. तिच्यातील वातावरणनिर्मितीही सुंदर आहे.
याच अंकात ‘शिनागावाच्या माकडाचे कबुलीजबाब’ ही हारुकी मुराकामी यांची विवेक गोविलकर यांनी अनुवाद केलेली स्पेक्युलेटीव्ह कथा छान सुरू होते, थोडी लांबते, पण मुराकामीकडून अपेक्षित असलेला हटके अनुभव देऊन जाते.
‘नवल’मधली स्मिता पोतनीस यांच्या ‘ध्यास’ कथेत सुरेख वातावरण निर्मितीसोबत गुरुत्वाकर्षण या आगळ्या विषयाची चांगली सांगड घातलेली आहे. आशिष महाबळ यांच्या ‘जैवमंथन’ या कथेत जिवाणूंची अवकाशातली वागणूक याचा वापर करत एक रहस्य उलगडलं आहे. सहसा अवकाशस्थानक म्हटलं की, तिथल्या नाट्यमय घडामोडींची अपेक्षा असते. या कथेत ती पूर्ण होते आणि सोबत विचारांना एक नवी दिशा मिळते. सदानंद भणगे यांच्या ‘बोटॅनोफोबिक’ या कथेला आपण केसस्टडी म्हणू शकतो. वर्तमानात घडणाऱ्या मेडिकल केसेसवरची कथा विज्ञानकथेच्या काटेकोर व्याखेत बसत नाही.
गिरीश पळशीकर यांची ‘द रोड नॉट टेकन’ ही कथा कालप्रवास आणि समांतर विश्व या संकल्पना वापरून एक गुंतागुंत सादर करते. याच अंकात ‘एनटॅंगलमेंट’ या श्रीनिवास शारंगपाणी यांच्या फॅंटसी कथेत क्वांटम संकल्पनेचा वेगळा विचार केलेला दिसतो.
सूक्ष्मजीव वाचकाशी संवाद साधतात, ही कल्पना घेऊन लिहिलेली रंजन गर्गे यांची ‘मला काही सांगायचंय’ ही कथा सृष्टीज्ञान अंकात आहे. अनेक सूक्ष्मजीवांना बोलतं करताना मात्र त्यातली कथा हरवून तो एक लांबलचक माहितीवजा लेख झाला आहे.
विज्ञानकथेचा कंटाळवाणा लेख होण्याचा धोका नेहमीच असतो, आणि अनेकदा तो टाळला जात नाही, असं दिसतं. अत्यावश्यक तेवढीच माहिती, ठसठशीत पात्ररेखाटन, भावनांचा चढउतार, आणि प्रसंगांमधून उभे राहणारे नाट्य यांचा मेळ चांगला बसला असेल, तरच ती कथा म्हणून तरते. नाहीतर ती गोष्टीरूप लेख होते. असा अनुभव ‘हसवंती नवलकथा’मधील ‘छायेची भुताटकी’ या देवबा पाटील यांच्या कथेतही येतो. मराठीत वेगवेगळे स्पेक्युलेटिव्ह कथांचे प्रयोग जम धरत असताना या कथांमधली ही त्रुटी विशेषत्वानं जाणवते.
...........................................................................................................................................
पर्यावरण हे सूत्र मागील दोन वर्षी जास्त कथांमध्ये दिसलं होतं. या वर्षी तुलनेत पर्यावरण मध्यवर्ती असणाऱ्या कथा कमी आढळल्या. आपण पर्यावरण प्रश्नांना रोजच्या आयुष्यात स्वीकारलं आहे का? की हताश होऊन त्यावर विचार करणं सोडून दिलं आहे? पर्यावरण यावर भरपूर चर्चा होत असल्याने तो विषय फक्त चर्चेपुरता आहे, असा कल झालेला आहे का? की उद्या काय होईल, याचा विचार करायच्या आधीच आपण त्याचे भयानक परिणाम अनुभवतो आहोत?
...........................................................................................................................................
काही अजरामर विषय
मानवी भावभावना असलेला रोबॉट ही थीम आयझॅक असिमोव्हने अनेकदा यशस्वीपणे वापरली आहे. तिची भुरळ अजूनही उतरलेली नाही. त्यामुळे ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’तली उज्ज्वल राणे यांची ‘चाहूल’ ही कथा वाचनीय तर झालीच आहे. त्यात विविध अंगांनी चर्चा आणि उठावदार पात्ररेखाटन झाल्याने कथा अधिक खुलते. ‘रणांगण’मधील स्मिता पोतनीस यांची ‘स्वीकार’ ही कथा रोबॉटने स्वतःला रोबॉट म्हणून स्वीकारण्याच्या प्रवासाची कथा आहे.
सूड या अशाच कालातीत थीमवरील डॉ. सुनील विभूते यांची ‘धनंजय’मधील कथा ‘प्रतिघात’ वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, समाजातील निष्काळजी व्यक्ती यांच्यावर भाष्य करताना काही नैतिक प्रश्न उभे करते. ‘एलियन्सची भेट’ हा लोकप्रिय विषय मेघश्री दळवी यांच्या समतोलमधील ‘प्रतीक्षा’ या कथेत वेगळ्या पद्धतीनं हाताळलेला आहे.
मानवजातीचा सर्वनाश जवळ येत चालला आहे, पण कोणीही आपला अजेंडा सोडत नाही, अशा वेळी आपल्यापुढे काय पर्याय असतील? अनेक विज्ञान आणि स्पेक्युलेटिव्ह कथांमध्ये हा विषय घेऊन लेखकांनी त्याला तऱ्हेतऱ्हेनं पेश केलं आहे. शैलेन्द्र शिर्के यांच्या ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या अंकातील ‘वारसा’ या कथेत ही थीम येते, तेव्हा पुढे काय ही उत्सुकता राहते. अखेरीस त्याला वारसांनी दिलेला ट्विस्ट नक्कीच पटण्यासारखा झाला आहे.
पृथ्वीपलीकडे माणसानं वसाहत उभी करणं, हा विषयदेखील साहित्यसृष्टीला नवीन नाही. याच पार्श्वभूमीवरील मेघश्री दळवी यांची ‘साहित्य’मधील ‘किंत्सुगी’ ही आगळी कथा नातेसंबंध, पर्यावरण विनाश अशा विषयांना स्पर्श करते. अवकाशप्रवास आणि त्यात भेटलेले मानवसदृश्य जीव हा विषय माणसाला कायम मोहवणारा आहे. यावर अनेक कथा-कादंबऱ्या-चित्रपट झालेले आहेत. त्या सर्वांमध्ये दरवेळी या थीमच्या आधारे लेखक काही सांगू पाहत असतो.
हेच ‘हसवंती नवलकथा’तील ‘प्रतिबिंब’ या गिरीश पळशीकर यांच्या कथेतून दिसतं. विज्ञानकथेच्या सामर्थ्यापैकी काही म्हणजे भविष्याविषयी बोलताना आजच्या समस्यांकडे लक्ष वेधून घेणे, पाहुण्यांच्या नजरेतून आपली जीवनशैली पाहणं, आणि एकूणच व्यापक पातळीवरील मांडणीतून वास्तवाची जाणीव करून देणं, या सामर्थ्यांचा कथेत पुरेपूर वापर आहे. पण लेखन अधिक सूचक असतं, तर कथा अधिक परिणामकारक झाली असती.
कालप्रवास आणि त्याचा नातेसंबंधावर होणारा परिणाम अनेक लेखकांनी याआधी चांगला दाखवला आहे. मात्र ‘हसवंती नवलकथा’तील ‘पुनर्भेट’ या शशिकांत काळे यांच्या कथेतील उलटसुलट कालप्रवासाला वैज्ञानिक तर्काचा पाया नाही, अशा प्रवासातील विरोधाभासांचा (पॅराडॉक्सेसचा) विचार नाही की, त्यातील नातेसंबंधांना खोली नाही.
विज्ञानकथेची व्याख्या काय, यावर बऱ्याचदा चर्चा झडताना दिसते. कधी कधी इतकी चिकित्सा करणं आवश्यक आहे का, असा प्रश्न पडतो. मग ही किंवा याच अंकातील ‘त्रिभुवनाची गोष्ट’ ही डॉ. मोनिका मुळीक यांची कथा वाचताना या व्याख्यांचं महत्त्व जाणवतं. विज्ञानकथा या लेबलखाली असलेल्या या कथेला स्पेक्युलेटिव्ह कथाही म्हणता येत नाही, लेखकाची सोय म्हणून विज्ञानाला वेठीला धरलं आहे आणि पात्रांच्या वागण्याला काहीही सुसूत्रता नाही, अशा या कथा साहित्याच्या आणि विज्ञानाच्या - दोन्ही निकषांवर उण्या पडतात.
पर्यावरण हे सूत्र मागील दोन वर्षी जास्त कथांमध्ये दिसलं होतं. या वर्षी तुलनेत पर्यावरण मध्यवर्ती असणाऱ्या कथा कमी आढळल्या. आपण पर्यावरण प्रश्नांना रोजच्या आयुष्यात स्वीकारलं आहे का? की हताश होऊन त्यावर विचार करणं सोडून दिलं आहे? पर्यावरण यावर भरपूर चर्चा होत असल्याने तो विषय फक्त चर्चेपुरता आहे, असा कल झालेला आहे का? की उद्या काय होईल, याचा विचार करायच्या आधीच आपण त्याचे भयानक परिणाम अनुभवतो आहोत?
...........................................................................................................................................
तंत्रज्ञानाची मुळं आपल्या आयुष्यात आता फार खोलवर रुजली आहेत. त्याचा प्रत्यय कुमार वाचकांसाठीच्या काही कथांमध्ये आला. मोबाइलचं व्यसन सोडवण्यासाठी मोबाइलचाच वापर, अडचणीत अलेक्साची मदत, किंवा ओटीपी याचा आणखी एक अर्थ लावून त्याचा वापर, अशा संकल्पनांमुळे विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या जवळचं वाटायला लागतं. या वाचकांना उद्या विज्ञानकथा कदाचित वेगळ्या न वाटता इतर कथांसारख्याच वाटू शकतील.
...........................................................................................................................................
कुमारवयीन वाचकांसाठी
कुमारवयीन वाचकांसाठी गेल्या काही वर्षांमध्ये चांगले अंक येत आहेत. त्यात सहसा उपदेशपर लेखन नसतं, उलट मुलांच्या कल्पनाशक्तीला पुरेपूर वाव मिळेल, अशा रंजक आणि समयोचित कथा-कवितांचा समावेश असतो. यावर्षी विज्ञान किंवा स्पेक्युलेटिव्ह कथा संख्येनं कमी असल्या, तरी त्या समकालीन विषयांना हात घालणाऱ्या आहेत.
मुलं तंत्रज्ञान सहजी हाताळतात, पण ते हाताळताना त्यातलं बरं-वाईट त्यांना समजत नसतं, यावर आपण अनेकदा चर्चा करतो. ‘छात्र प्रबोधन सुबोध’ या अंकातील ‘बुद्धी विरुद्ध बळ’ ही क्षितिज देसाई यांची कथा हाच विषय छान सुगम प्रकारे पुढे आणते. अशा कथा आजच्या वास्तवाशी सुसंगत असल्यानं त्या कुमार वाचकांशी सहज कनेक्ट होऊ शकतात, हे महत्त्वाचं. मेघश्री दळवी यांची ‘पासवर्ड’मधील ‘मोबाइल बंद’ ही कथा आजच्या एका महत्त्वाच्या विषयाकडे थोड्या मजेनं पाहणारी आहे.
‘स्वान्तःसुखाय’मधील ‘डोलू’ ही स्मिता पोतनीस यांची कथा एका वेगळ्या रितीनं आणि वेगळ्या कारणानं जन्माला आलेल्या मुलाची भावनिक आंदोलनं दाखवते, तेव्हा तिचं सबटेक्स्टही ध्यानात येतं.
‘छात्र प्रबोधन’मधली ‘वृक्षाय नम:’ ही नीलिमा करमरकर यांची स्पेक्युलेटीव्ह कथा अतिशय सुलभतेने क्रिप्टीड या संकल्पनेचा वापर करून घेते. याच अंकात ‘गरुडझेप’ ही डॉ. संजय ढोले यांची विज्ञानकथा आहे. अंतराळप्रवास, एलियन्स, मूलकण या कल्पना त्यात कुमार वाचकांना रुचतील, अशा रोमांचक पद्धतीने गुंफल्या आहेत. राजीव तांबे यांची ‘वयम’ अंकातील चटपटीत कथा ‘ऑपरेशन गॅस व्हॉल्व’ घरातल्या रोबॉट्सची आहे. त्यांचे फणकारे आणि रूसवेफुगवे मस्त, मजेदार आहेत.
तंत्रज्ञानाची मुळं आपल्या आयुष्यात आता फार खोलवर रुजली आहेत. त्याचा प्रत्यय कुमार वाचकांसाठीच्या काही कथांमध्ये आला. मोबाइलचं व्यसन सोडवण्यासाठी मोबाइलचाच वापर, अडचणीत अलेक्साची मदत, किंवा ओटीपी याचा आणखी एक अर्थ लावून त्याचा वापर, अशा संकल्पनांमुळे विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या जवळचं वाटायला लागतं. या वाचकांना उद्या विज्ञानकथा कदाचित वेगळ्या न वाटता इतर कथांसारख्याच वाटू शकतील.
दृश्यभाषेचा सहभाग
कोणत्याही साहित्याबरोबर असलेली रेखाटनं म्हणजे साहित्याला पूरक अशी दृश्यभाषा. ती कथेच्या ओघवत्या प्रवाहाला पुढे घेऊन जाणारी, वाचकाचं कुतूहल वाढवणारी, कथेला साजेशी अशी असायला हवी. या वेळीही विविध चित्रकारांनी त्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यात चंद्रमोहन कुलकर्णी, अनीश दाते, सतीश भावसार, सतीश खानविलकर, चंद्रशेखर बेगमपुरे, भ.मा. परसवाळे, रविकांत सोईतकर इत्यादी चित्रकारांची नावं प्रामुख्याने घेता येतील.
विज्ञानकथेची रेखाटनं करताना ती नेमकी कशी असायला हवीत, हे सांगताना चित्रकार अनीश दाते म्हणतात - विज्ञानकथालेखक आणि वाचक या दोघांनाही आवडतील अशी कामगिरी चित्रकाराची असायला हवी. वाचकाला आकर्षित करून त्या कथेबद्दल विचार करायला लावणारी, लेखकाची शैली प्रकट करणारी, आणि वाचकाच्या नजरेसमोर कथेतील व्यक्तिरेखा, घटना, वातावरण आणणारी, या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण रेखाटनं असतील, तरच त्याला अचूक रेखाटन म्हणता येतं. एआयही आता स्पर्धेत आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यासाठी चित्रकाराला विज्ञानविषयक आणि साहित्याविषयक जाण असणं गरजेचं आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.
...........................................................................................................................................
अटेन्शन स्पॅन कमी होत असताना लघुलघुकथा किंवा क्षणिका यांचं महत्त्व जाणवायला लागलं आहे. ‘कालनिर्णय’ने ३०० शब्दांच्या आतल्या कथांची स्पर्धा जाहीर केली होती. त्यातल्या पारितोषिक प्राप्त कथांपैकी शिरीष नाडकर्णी यांच्या ‘कमाल कृत्रिम बुद्धिप्रणालीची’ या कथेत विषय थोडक्यात चांगल्या प्रकारे पुढे येतो. प्रज्ञा जांभेकर यांची त्याच अंकातली ‘ती आणि तो’ ही चिमुकली कथाही उत्कंठावर्धक झाली आहे. निलेश मालवणकर यांची ‘झपूर्झा’मधील ‘मधुरा’ ही खुसखुसशीत लघुलघुकथा भविष्यातली एक मजेशीर समस्या आणि त्यावरचा एक झणझणीत उपाय चमचमीतपणे मांडते. हा क्षणिकांचा फॉरमॅट कदाचित तरुण पिढीला अधिक अपील होईल आणि कदाचित येत्या काळात अशा प्रकारच्या आणखी कथा वाचायला मिळतील.
...........................................................................................................................................
लेखनातली प्रयोगशीलता
अटेन्शन स्पॅन कमी होत असताना लघुलघुकथा किंवा क्षणिका यांचं महत्त्व जाणवायला लागलं आहे. ‘कालनिर्णय’ने ३०० शब्दांच्या आतल्या कथांची स्पर्धा जाहीर केली होती. त्यातल्या पारितोषिक प्राप्त कथांपैकी शिरीष नाडकर्णी यांच्या ‘कमाल कृत्रिम बुद्धिप्रणालीची’ या कथेत विषय थोडक्यात चांगल्या प्रकारे पुढे येतो. प्रज्ञा जांभेकर यांची त्याच अंकातली ‘ती आणि तो’ ही चिमुकली कथाही उत्कंठावर्धक झाली आहे.
निलेश मालवणकर यांची ‘झपूर्झा’मधील ‘मधुरा’ ही खुसखुसशीत लघुलघुकथा भविष्यातली एक मजेशीर समस्या आणि त्यावरचा एक झणझणीत उपाय चमचमीतपणे मांडते. हा क्षणिकांचा फॉरमॅट कदाचित तरुण पिढीला अधिक अपील होईल आणि कदाचित येत्या काळात अशा प्रकारच्या आणखी कथा वाचायला मिळतील.
कथेत दोन-तीन थ्रेड्स आणि त्यातील प्रत्येकाची गोष्ट आळीपाळीनं खेळवत ठेवून शेवटी उलगडा, किंवा निरनिराळ्या पात्रांच्या तोंडून निवेदन, असे फॉरमॅटचे प्रयोग दिसले. ते फार नवीन नसले, तरी त्या त्या कथांना चांगला उठाव देतात. असे प्रयोग व्हायला हवेत. दिवाळी अंकांतील कथांचं वाचन अनेकदा एकापाठोपाठ एक असं होत असल्यानं नावीन्यपूर्ण फॉरमॅटमधील कथा जास्त लक्षात राहतात.
एकांकिका हा साहित्यप्रकार दिसला नाही. त्याची मांडणी कथेपेक्षा वेगळी असल्यानं तो फॉरमॅटही लक्षवेधी ठरू शकतो. आज दृश्य माध्यमाला जास्त पसंती असल्यानं निवेदन किंवा वर्णन टाळून संवादातून सर्व काही पोहोचवणाऱ्या एकांकिका आजच्या वाचकांना कदाचित जास्त अपील होऊ शकतात. पण, बऱ्याचदा एकांकिका सादर करण्यावर भर असल्यानं दिवाळी अंकांमध्ये त्या साहित्य प्रकाराचा अभाव जाणवतो.
कथेसोबत चित्रं अशी सहसा मांडणी असते. कुमार वाचकांना चित्रासोबत थोडं टेक्स्ट अशी मांडणी जास्त आवडते आणि तसा प्रयोग काही अंकांमध्ये दिसला. हा ट्रेंड चांगला वाटला.
काही प्रश्न
लिहिताना आपण पूर्णविराम म्हणून एक टिंब देतो. तीन टिंबं असतील तर तो पदलोप (एलिप्सीस), म्हणजे वाक्यरचनेला किंवा अभिव्यक्तीला आवश्यक अशा शब्दांचा लोप झालेला असतो. असा पदलोप एकदा-दोनदा आला, तर तो प्रभावी होऊ शकतो. एक-दोन कथांमध्ये मात्र जागोजागी पदलोप, आणि काही ठिकाणी तर कोणताही अर्थ नसणारी दोन आणि चार टिंबं आढळली. कथेच्या वाचनात आणि पर्यायानं परिणामात त्याने अडसर होऊ शकतो, हे लक्षात आलं नसेल का? मराठी वाचन कमी होत चाललं आहे, अशी हाकाटी करताना निदान असा रसभंग टाळायला हवा.
अनेक कथांमध्ये इंग्रजीतून भाषांतर केल्यासारखे शब्द, संवाद, किंवा निवेदन आहे. उदा. ‘अनुत्सुक आहे’. इथे ‘उत्सुक नाही’ ही भाषा जास्त नैसर्गिक वाटते. दिव्यांचा मृदू प्रकाश, बाटलीतला राक्षस, ही आणखी काही उदाहरणं. दोन वाक्यांश ‘जो’, ‘ज्याने’ या अक्षरांनी जोडणं हेही मराठीत नैसर्गिक नाही. अशी रचना हिंदी, इंग्रजीत दिसते. ही कृत्रिम रचना वाचताना आपोआप एक परकेपणा जाणवतो. त्याकडे लेखकांनी लक्ष द्यायला हवं.
बहुतांशी कथा भूतकाळात लिहिल्या जातात. क्वचित वर्तमानकाळचाही वापर करून विलक्षण परिणाम साधता येतो. परंतु यावर्षी वाचलेल्या काही कथांमध्ये दोन्ही काळ वाटेल तसे मिक्स झालेले होते. त्यामागे काही कारण किंवा ठरवून केलेली योजना दिसली नाही. लेखन, त्यावर पुन्हा हात फिरवून संपादकांकडे सोपवणं, आणि नंतर संपादन, या प्रक्रियेतून जाताना, या त्रुटी लक्षात आल्या नसतील का?
बरेचदा तृतीयपुरुषी निवेदन आणि प्रथमपुरुषी निवेदन यांत गोंधळ आढळला. त्याबद्दल लेखकांनी जागरूक राहिलं, किंवा प्रत्येक पात्राची बोलण्याची शैली विशिष्ट ठेवली, तर हा गोंधळ टाळता येईल का?
कथेतील व्यक्तिरेखा रंगवताना फक्त त्यांचं वर्णन नाही, तर त्यांची भाषाही व्यक्तिरेखेला साजेशी असणं गरजेचं आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवरील कथा असल्यास ग्रामीण भाषा अनुकूल असते, आणि काही कथांमध्ये ती योग्यरित्या आली, पण प्रमाण भाषा वापरत त्यात उगीचच अशुद्ध उच्चार मिसळवणं योग्य ठरत नाही.
देवनागरी लिपीत मध्येच येणारी रोमन अक्षरं खड्यासारखी खटकतात. एखाद्या मराठी वाचकाला रोमन लिपी समजत नसेल, तर काय होईल? कथेतील गुजराती, पंजाबी शब्द त्या त्या लिपीत लिहिली, तर कथा वाचणं शक्य होईल का? की भाषेप्रमाणे लिपी वाचवा, अशा चळवळीची वेळ आली आहे?
रेखाटनं कथेला निश्चितच समृद्ध करतात. दिवाळी अंकांचं ते वैशिष्ट्यच आहे. काही वेळा मात्र कथेच्या शेवटी येणारा रहस्यभेद कथेच्या सुरुवातीलाच चित्रातून पेश केलेला दिसला. याकडे संबंधित संपादकांनी लक्ष द्यायला हवं.
आजचे वाचक उत्तम दर्जाचे सायफाय चित्रपट बघतात, कौशल्यानं हाताळलेल्या अनेकपदरी वेब सीरीज बिंज करतात, गुंतागुंतीचे गेम्स खेळतात, त्यावर सर्वांगीण चर्चा करतात. या वाचकांना शोधाची किंवा वैज्ञानिक माहिती देणारी प्राथमिक पातळीवरची कथा कितपत रुचेल, हा विचार का होत नाही?
स्पेक्युलेटिव्ह अशा विस्तारित दृष्टीकोनातून बघितलं, तरी व्याकरणाशिवाय भाषा नाही, तसं विज्ञानकथेच्या निकषात न बसणारी विज्ञानकथा नसते, फॅंटसीलाही काही पाया लागतो, याकडे लक्ष देता येईल का?
अखेरीस
लेखाचं नियोजन करताना त्यात अधिकाधिक कथांचा समावेश व्हावा, म्हणून लेखकांनी आपल्या कथांची माहिती पाठवावी, असं आवाहन केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आपण वाचलेल्या कथा या लेखाशी सुसंगत असतील, हे लक्षात आपल्यावर काही जणांनी ती माहितीही कळवली. त्यामुळे व्यापक प्रमाणात कथांचा विचार करता आला. तरीही काही कथा राहून गेल्या असतील.
या वर्षीच्या एकूण ५९ स्पेक्युलेटिव्ह कथा वाचल्यावर लक्षात आलेली एक चांगली गोष्ट - विज्ञानकथा म्हणजे ‘विज्ञानाची कथा’ हा समज मागे पडून ‘विज्ञानामुळे घडणारी कथा’ हा अर्थ रूळतो आहे. जागतिक साहित्यातील आजच्या दृष्टीकोनाशी जुळणाऱ्या या अर्थामुळे मराठी विज्ञानकथा योग्य मार्गावर आहे म्हणता येईल. विज्ञानकथांची संख्या बघता लेखक तसाच वाचकाचा विज्ञान / तंत्रज्ञानाकडे झुकणारा कलही जाणवतो. ‘मॅजिकल रिआलिझम’ हा साहित्यप्रकारही हळूहळू प्रकाशझोतात येतो आहे. त्यातील अद्भुतरम्यता आपण कोणताही पूर्वग्रह न बाळगता आपलीशी करत असू तर या ट्रेंडचे स्वागतच आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
विज्ञानविषयक अंक किंवा वेगळ्या प्रवाहांना आवर्जून स्थान देणारे ‘नवल’ आणि ‘धनंजय’ हे अंक - यांत विज्ञानकथा नेहमी दिसतात. इतरही काही दिवाळी अंकांमध्ये विज्ञान आणि स्पेक्युलेटीव्ह कथांचा समावेश होता. त्यातील बहुतेक जागी कोणतंही वेगळं लेबल नव्हतं. लेबल असावं की नसावं, याविषयी वेगवेगळे मतप्रवाह असतील. विज्ञानकथेला सगळ्यात सामावून घेतलं गेलंय, असाही एक मतप्रवाह आहे. पण विज्ञानकथा म्हणून असणारा वेगळेपणा राखायचा, तर लेखक विज्ञानकथा नावाखाली वाहवला जाणार नाही, हे पाहायला हवं.
लेखन, चित्रकला, आणि विविध क्षेत्रांत जर एआयने चंचूप्रवेश केला, तर येत्या काळात काय होईल? वाचकांच्या अनुभूतीत फरक पडेल का? या बदलाबद्दल वाचकांचं मत काय असेल? त्यांच्या कलेकडून असलेल्या अपेक्षा बदलतील का? एआयच्या लेखनावर कोणत्या लेखकाच्या शैलीची वा कथानकाची सावली दिसते का? यातील लेखन लेखकांनी केलेल्या लेखनापेक्षा काही वेगळं जाणवतं का? लेखक-कलाकारांनी आपली वाटचाल करत राहायची की, ही स्पर्धा म्हणजे एक संधी मानून स्वतःचा विकास करण्यावर भर द्यायचा? त्यात माणूस जिंकेल की, माणसानेच निर्माण केलेलं एआय? हाही म्हटलं तर एक विज्ञान कथेचा विषय आहे!
यावर्षी दिवाळी अंकात एआय विषयक बरेच लेख वाचायला मिळाले. त्यात माहितीसोबत चांगलं विश्लेषण होतं, शंका आणि काही वेळा शंकासमाधान होतं. पुढील वर्षी चित्र काय असेल? एआयची झेप कुठवर गेली असेल? हे प्रश्न साहजिकच मनात उभे राहिले. त्यांचं उत्तर येणारा काळच देऊ शकेल.
.................................................................................................................................................................
लेखिका मेघश्री दळवी विज्ञानकथालेखक व समीक्षक असून आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
meghashri@gmail.com
लेखिका स्मिता पोतनीस विज्ञानकथालेखक व समीक्षक आहेत.
potnissmita@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment