रवीश कुमार : झीरो टीआरपीवाला पत्रकार!
दिवाळी २०१७ - व्यक्तिचित्रे
सिद्धार्थ खांडेकर
  • पत्रकार रवीश कुमार
  • Tue , 25 October 2016
  • सिद्धार्थ खांडेकर रवीश कुमार Sidharth Khandekar Ravish Kumar

‘मैं नवाज़ का बंदानवाज़ बन गया हूँ. सोमवार को छुट्टी लेकर माँझी देख आइये.’....

गेल्या वर्षी रवीश कुमारनं केलेल्या या ट्वीटनंतर ‘माँझी’ सिनेमा त्याच्या आणि नवाजु़द्दीनच्याही हजारो चाहत्यांनी पाहिला असेल. ‘माउथ टू माउथ’ पब्लिसिटीवर बऱ्यापैकी अवलंबून असलेल्या ‘माँझी’सारख्या अस्सलपटांना रवीश कुमारची एक ट्विटर पावतीही संजीवनी ठरली असेल. परवा त्यानं ‘सैराट’कार नागनाथ मंजुळेची हिंदी मुलाखत ‘एनडीटीव्ही इंडिया’वर घेतली. नागनाथची स्टाइल आणि ‘सैराट’चा ‘हिडन मेसेज’ नीट समजावा यासाठी त्याच दिवशी सकाळी रवीशनं ‘फँड्री’ पाहिला. त्यातील काळ्या पक्ष्याचा मेटाफर रवीशनं रात्रीच्या चर्चेत आणला.

राजकीय भाष्यकार असलेल्या रवीशला सिनेमाच्या तांत्रिक भाषेपेक्षाही, दिग्दर्शकाच्या मनातले मेसेज उलगडून दाखवण्याची कलाही अवगत आहे, हे त्यावेळेपर्यंत ठाऊक नव्हतं. रवीशविषयीच्या जाणिवेतली ही भर सुखावणारी ठरली. टीव्ही प्रेझेंटर, तोही प्राइमटाइममधला, सर्वज्ञ असला पाहिजे, असा काही नियम नाही. पण वेगळ्या आणि चर्चेतल्या विषयावर स्वतंत्र संशोधन करून काही तरी वेगळं मांडण्याची, म्हणण्याची हातोटी असणं ही प्राइमटाइम प्रेझेंटरची अलिखित जबाबदारी असते. सध्याच्या पोलिटिकल कोलाहलात ही जबाबदारी जणू विसर्जित झाल्यासारखी वाटते. राजकीय विषयांपलीकडे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांचे महासागर असतात. टीव्हीच्या मुशाफिरांना त्या महासागरांतील सफरींची भुरळ फारशी पडत नसावी. राजकीय चर्चा घडवून आणाव्यात, कोंबड्यांसारख्या राजकीय नेत्यांच्या झुंजी लावून मजा बघावी किंवा अत्यंत चिथावणीखोर विधानं स्वत:च करून त्यानिमित्तानं वातावरण डहुळल्यावर श्रेय स्वत:कडे घ्यावं, यापलीकडे विशेषत: दिल्लीतल्या अँकर मंडळींचा (खरं तर टीव्ही चॅनलच्या मालकांचा) अजेंडाच नसतो. या मंडळींच्या तोंडून कळत-नकळत समाजात जी पराकोटीची विध्वंसनिर्मिती होते, त्याची यांना कल्पना नसते वा फिकीर नसते. ही मंडळी स्वत:ला कधी पॉवर ब्रोकर समजतात, कधी स्वतंत्र संस्थान समजतात, कधी ‘लोकमाध्यमं म्हणजे आपणच’ असं हे धरून चालतात. पण लोकांना रवीश कुमार आपला वाटतो, तसे हे लोक ‘आपले’ वाटत नाहीत. ‘अंग्रेजी आती नहीं’ अशी रवीशच्या (सध्या बंद पडलेल्या) ट्विटर हँडलवरची बिनधास्त कबुली लक्षवेधक ठरते. खरं तर केवढी मोठी रिस्क! एखाद्यानं प्रोफेशनल कन्सल्टंटची मदत घेऊन इंग्रजीत ट्विटरबाजी सुरू ठेवली असती. रवीशचा तो धर्मच नव्हे! अत्यंत संवादी धाटणीची त्याची हिंदी ऐकून कधीही पूर्ण समाधान होत नाही! इतक्या सहजपणे हल्ली लोक आपसांतही बोलत नसावेत. अजूनही स्टुडिओतली वातानुकूलित चौकट ओलांडून सामान्य लोकांमध्ये, दिल्लीतल्या कळकट वस्त्यांमध्ये, राजकीय नेत्यांच्या सभांना युनिट घेऊन हजेरी लावण्याचा रवीशचा उत्साह कायम आहे.

मागे अशाच एका सभेला एक गरीब खेडुत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘सर, आपको टीव्ही पे देखता हूँ.’ ‘जी शुक्रिया. क्या चाहते हैं आप यहाँ आके?’ रवीशचा संवाद सुरू. ‘बस्स. नेताओंको देखना चाहता था. फिर आप जैसे भी दिख जाते हैं तो अच्छा लगता है.’ रवीश लगेच कॅमेऱ्याकडे पाहून बोलू लागला, ‘यहीं शायद देश का भी हाल हो. पाने के लिये यहाँ कोई नहीं आता. पूछने के लिये भी कोई नहीं आता. बस देखने चले आतें हैं. और फिर वापस चले जातें हैं. नेताओं को भीड मिलती है और हमे रिपोर्ट!’

भीड (गर्दी) आणि रिपोर्ट यापलीकडे या देशातले नेते आणि मीडिया सर्वसामान्यांची कदर करत नाहीत, हे किती सहजपणे रवीशनं सांगून टाकलं. आमचे टीव्ही पत्रकार सारं काही नेत्यांवर ढकलून मोकळे होतात. याबाबत खूप पूर्वी पुण्यात योगेंद्र यादवांनी मार्मिक टिप्पणी केली होती- ‘आपल्याकडे सगळ्यांना लोकशाही हवी. पण नेते नकोत! हे कसं शक्य आहे? ही भावना विशेषत: दिल्लीतला इंग्रजी मीडिया मोठ्या प्रमाणावर पसरवत आहे.’ यादव बोलले तो काळ साधारण १५ वर्षांपूर्वीचा. केवळ वाईटाचं खापर नेत्यांच्या माथी फोडून, चांगल्याचं श्रेय मीडियाला स्वत:कडे घेता येणार नाही. ती प्रगल्भता नव्हे, हे यादवांनी त्यावेळी सांगितलं होतं. आज रवीश कुमारही वेगळ्या प्रकारे हेच तर सांगतोय. ‘पीपल गेट द रूलर्स दे डिझर्व्ह’ असं इंग्रजीत एक वाक्य आहे. त्यात थोडा बदल करून असं म्हणता येईल की, राज्यकर्तेच नव्हे, तर नोकरशहा, पोलिस आणि प्रसारमाध्यमेही लायकीप्रमाणेच मिळत असतात. कारण जनतेपेक्षा ते वेगळे नसतात. पण यात मीडिया असा एकमेव आहे, जो स्वत:ला वेगळा आणि नैतिक मानून चालतो. या समजुतीतला पोकळपणा रवीश कुमारनं केव्हाच ओळखलाय. वेळोवेळी तो मीडियाला याची जाणीवही करून देतो. म्हणूनच तो वेगळा ठरतो.

रवीश कुमार एनडीटीव्हीवरील प्राइम टाइम शो सादर करताना

‘माँझी’विषयीच्या दोन ओळींच्या ट्वीटमध्ये, चांगलं काही तरी समाजात अजूनही निर्मिलं जातंय आणि डोकं ठिकाणावर असलेल्या प्रत्येकानं त्या चांगल्याचा आस्वाद घेणं अत्यावश्यक आहे, हे किती सहज पण नेमकेपणानं मांडलं गेलंय! हा सहज, स्वाभाविक नेमकेपणा ही पत्रकार, अँकर, एडिटर रवीश कुमारची सुस्थपित आणि आश्वासक आयडेंटिटी बनून गेलीये.

गेल्या वर्षीपर्यंत ट्विटरवर रवीश भलताच सक्रिय होता, पण एनडीटीव्हीचा अँकर म्हणून त्याचं ‘काँग्रेसी भडवा’ असं ब्रँडिंग ‘भक्त’संप्रदायानं करून टाकलं. तितकं करून ते थांबले नाहीत. शिवीगाळ राजरोस होत होती. सोशल मीडियावरील भिकार$#@ झुंडीवादाचा फटका राजदीप सरदेसाईप्रमाणेच रवीशलाही बसला. कंटाळून तो ट्विटरबाहेर पडला. त्याची दररोजच्या घडामोडींवर चार ओळींची तिरकस, पण नेमकी आणि सजग कमेंट दिसेनाशी झाली. नुकसान सोशल मीडिया कम्युनिटीचं झालं. रवीशला व्यक्त होण्यासाठी आणखी माध्यमंही आहेत. पण आता तिथंही त्याचं मार्जिनलायझेशन होईल की काय, अशी भीती त्याच्या चाहत्यांना वाटते. अत्यंत सहजपणे तो त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक आघाताचा हसतमुखानं सामना करतोय. पण हे किती दिवस चालणार?

तो उद्विग्न होतो हे दोन घडामोडींवरून बऱ्यापैकी स्पष्ट झालंय. ट्विटरवरून तो बाहेर पडला ही एक घटना. त्यानं भाजप आघाडी सरकारमधील मंत्री आणि माजी संपादक-पत्रकार एम.जे. अकबर यांना लिहिलेल्या जाहीर पत्रातही मनातली निराशा स्पष्टपणे मांडली. समजा अडीच वर्षांनी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, तर रवीशच्या कारकीर्दीला किंवा उत्साहाला संजीवनी मिळू शकेल, असं त्याच्या काही चाहत्यांना वाटतं. पण या भानगडीत रवीशच्या ‘काँग्रेसी’ ब्रँडिंगवर शिक्कामोर्तब होईल. बाकीच्यांचं सोडा, पण खुद्द रवीशला ते मानवणार नाही. कारण त्याच्यातल्या संवेदनशील पत्रकाराला भाजपप्रमाणेच काँग्रेसमधीलही असंख्य दोष पटणारे नाहीत. रवीशकुमारसारखे पत्रकार पक्षातीत असतात. काँग्रेसमधील अनेकांना रवीश कुमार ‘त्यांच्यातला’ वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत. ‘भक्त’संप्रदायानं रवीशची आई-बहीणच काढल्यामुळे आणि ते सतत त्याच्या मागावर असल्यामुळे रवीशला स्वत:च्या बचावार्थ काही तरी बोलावं लागतंय. पण रवीश असहिष्णुतेविषयी बोलतो, तेव्हा तो दुर्गुण भाजपइतकाच काँग्रेस, सपा, बसपा, आप, क्षेत्रीय पक्षांनाही लागू होतो. रवीशची टिप्पणी पक्षीय विचारसरणीत कोंदण्याचा बावळटपणा दिल्लीतले सत्ताधीश आणि विरोधक करतात आणि इथंच सगळा घोळ होऊन बसतो. म्हणजे तो काँग्रेसचा आहे असं भाजपवाले समजून बसतात आणि काँग्रेसवाल्यांनाही तसं वाटू लागतं. खरं तर सध्याच्या राजकीय संस्कृतीला रवीशसारखा पत्रकार झेपणारा नाही.

ही संस्कृती काय आहे? एकीकडे ती असहिष्णू आहे. दुसरीकडे भ्रष्ट आहे. बहुसंख्य नेते आजही सामान्य परिस्थितीतून वर येतात. सत्तेत आल्यावर किंवा लोकप्रतिनिधी असा घटनात्मक शिक्का बसल्यानंतर मात्र काय होतं कुणास ठाऊक. अनेक जण खानदानी राजकारणी असतात. बापजाद्यांच्या बळावर निवडून येतात. पण बापजाद्यांसारखी संवेदनशीलता किंवा लोकांशी असलेला ‘कनेक्ट’ नवीन पिढीकडे दिसत नाही. पैसा बापानंही खाल्लेला असतो. पण प्रत्येक गाववाल्याला व्यक्तिश: ओळखणारा हा बाप मतदारांनाही थोडाफार जवळचा वाटत असतो. गल्लोगल्ली, गावोगावी थोड्याफार फरकानं दिसणारं हे चित्र दिल्लीत ‘मॅग्निफाय’ होऊन गेलेलं दिसतं. रवीश कुमार त्या माहोलमध्ये वावरतोय. खऱ्या अर्थानं व्यवस्थेला टक्कर देतोय. पण ही व्यवस्था केवळ भ्रष्ट राजकारणी आणि मुर्दाड नोकरशाहीची नाही. ती बेभान आणि ध्रुवीभूत मीडियाचीही आहे. राजकारणी चुकलेमाकले, तर कधी ना कधी तरी जनता त्यांना वठणीवर आणते. नोकरशहांचा जनतेच्या दबावाखाली किंवा मीडियामध्ये लक्तरं जाहीर झाल्यानंतर तबादला होतो किंवा राजीनामा द्यावा लागतो. ‘ट्रायल बाय मीडिया’ राजरोस होत असते. मीडियाची किंवा मीडियावाल्यांची ट्रायल कोण घेणार? ती कधीतरी घेण्याची गरज उद्भवते, याची मीडियातल्या किती जणांना जाण वा भान आहे?

रवीश चांगला कथालेखकही आहे. त्याच्या दोनपैकी एका कथासंग्रहाचं मुखपृष्ठ

परवाच्या त्या बहुचर्चित आणि बहुविश्लेषित सर्जिकल स्ट्राइकवर रवीशनं त्याच्या ब्लॉगमध्ये फार सुंदर वाक्य लिहिलंय : ‘उन्माद ही मीडिया की दैनिक उम्मीद है. इसके दर्शक भी बहुत हैं.’ त्यानं सर्जिकल स्ट्राइकबद्दल सरकारचं आणि विशेषत: मोदींचंही मनापासून अभिनंदन केलं. उरी हल्ल्यानंतरच्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी केरळमधील कुपोषण आणि भूकबळीच्या विरोधात लढण्याची भाषा केली होती. उन्माद सोडून मुद्द्याचं आणि त्यातही गरिबीसारख्या राष्ट्रीय आपत्तीवर बोलणं/ऐकणं रवीशकुमारला नेहमीच आवडतं. त्याला ‘काँग्रेसी’ ठरवणाऱ्यांचा त्याच्या ब्लॉगशी फारसा परिचय नसावा. सुषमा स्वराज ते नरेंद्र मोदी अशांपर्यंत सगळ्यांचं त्यानं वेळोवेळी मनापासून कौतुकही केलेलं असतं. पण त्याचे मूलभूत मुद्दे कायम आहेत. जात, धर्म, क्षेत्र यांच्यावरून वाद निर्माण करणाऱ्यांना गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, अस्वच्छता, भ्रष्टाचार, स्त्रिया-मुलींवरील अत्याचार या समस्यांची एकतर पडलेली नसते आणि त्यांच्यावरून दुसरीकडे लक्ष जावं यासाठीच भावना भडकवण्याकडे राजकारण्यांचा कल असतो, हे रवीशचं मत आहे. मोदी सरकारनं आता ‘बिर्याणी कमिशन’ स्थापावं, अशी कोपरखळी त्यानं याच भूमिकेतून मांडली होती. त्यातून भक्तसंप्रदायाची टाळकी पुन्हा सरकली. गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषत: टीव्हीवरील स्टार अँकर मंडळींमध्येच ‘राष्ट्रवादी’ आणि ‘राष्ट्रद्रोही’ कोण यावरून जुंपली, त्यावेळी रवीशनं कधी जाहीरपणे, पण बऱ्याचदा अडून-आडून ‘टाइम्स नाउ’च्या अर्णब गोस्वामीवर तोफ डागली. ‘प्राइमटाइमवरील ‘त्या’ शोमध्ये गेल्या किती दिवसांत देशातील एकतरी मूलभूत समस्येवर चर्चा झाल्याचं आठवतं का?’ असा सवाल त्यानं एकदा उपस्थित केला होता. इथं रवीशनं स्वत:पुरती आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडली असं मात्र वाटतं. तिरकस आणि थेट उल्लेख न करता केलेल्या कमेंट्स हे रवीशचं बलस्थान नेहमीच राहिलेलं आहे. अर्णबनं काय बोलावं, त्याच्या चॅनलनं काय दाखवावं हा त्यांचा प्रश्न आहे. कन्हैया कुमार प्रकरणात त्यानं एकदा संपूर्ण टीव्ही स्क्रीन काळी दाखवून शो केला होता. त्याच्या नेमस्त व्यक्तिमत्त्वाचा विचार केल्यास ती स्टंटबाजी ठरली. हे सगळं करण्याचा रवीशचा अधिकार कोणी नाकारू शकत नाही. पण तरीही रवीशच्या या कृत्यांमध्ये निर्धारापेक्षा हतबलताच अधिक डोकावली असं वाटून गेलं. त्यानं अशा प्रकारे हतबल होणं, त्याच्या चाहत्यांना अस्वस्थ करणारं ठरतं.

रवीश ‘न्यूज लाँड्री’ या टीव्ही मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना

एम. जे. अकबरांनी भाजप सरकारात मंत्री म्हणून शपथ घेतल्यावर रवीशचा तळतळाट झाला. कशासाठी? त्याला एकेकाळी पूजनीय वाटणाऱ्या पत्रकारानं त्याला प्रतिकूल असलेल्या आणि प्रतिगामी वाटणाऱ्या विचारसरणीच्या सरकारात प्रवेश केल्याबद्दल जगबुडी झाल्यागत तळतळाट रवीशनं का करावा? पत्रकारांची, संपादकांचीही विचारसरणी असतेच. पण समोरच्यावर त्यानं पत्रकार असूनही विशिष्ट विचारसरणीची कास धरली म्हणून टीका करताना, आपणही दुसऱ्या विचारसरणीचं समर्थन करतो हे रवीशच्या लक्षात येत नसेल काय? मोदी सरकार आल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण - राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक - होऊ लागलंय असं नुसतं म्हणून, हळहळ व्यक्त करून रवीशसारख्या जबाबदार पत्रकारांना मोकळं होता येणार नाही. खरं तर कोणत्याच महत्त्वाच्या पत्रकाराला ही जबाबदारी टाळता येणार नाही. ‘जगबुडी सिंड्रोम’मधून बाहेर यावं लागेल. प्रामाणिक आत्मपरीक्षण करावं लागेल. प्रतिक्रियात्मक कृत्य प्रत्येक वेळी प्रतिगामी ठरवण्यात पुरोगाम्यांची अर्धी ऊर्जा खर्ची पडते. २०१४मध्ये मोदी सरकारला काही कोटी जनतेनं सत्तेवर आणलं. हा सगळा असहिष्णू, प्रतिगामी मंडळींचा कट होता, असं म्हणून आणि काही प्रकार-प्रवृत्तींकडे मासल्यादाखल बोट दाखवून डावे आणि पुरोगामी विचारवंत मोकळे होतात. देशात इतके कोटी हिंदुत्ववादी, मोदी-समर्थक आणि धर्मांध असूच शकत नाहीत! तसं समजणं हा मूर्खपणा ठरतो. हल्ली हे असंच चालतं. मीडिया यांच्याकडेच आहे. सोशल मीडिया यांच्याकडेच आहे. ही नवी असहिष्णू ‘ब्रीड’ देशाचं वाटोळं करणार आहे, वगैरे बडबड भरपूर सुरू आहे. २०१९मधील सार्वत्रिक निवडणुकीत मोदींचा पराभव झाल्यावर, त्यांच्याच मतदारांचं ‘काँग्रेस समर्थक, सजग मतदार’ असं रिब्रँडिंग केलं जाणार आहे का?

भारतात एखाद्या पक्षाचं, विचारसरणीचं सत्तेवर निवडून येणं हा एका अवाढव्य सायक्लिकल पोलिटिकल प्रोसेसचा भाग असतो. काँग्रेसप्रणित विचारसरणीला अधिक व्यापक आणि प्रदीर्घ काळ पारखलं जातं. तितका ग्रेस पिरियड काँग्रेसेतर विचारसरणीला मिळत नाही, इतकंच फारतर म्हणता येईल. तिथं अर्णबसारखे पत्रकार टाळ्या पिटत शिखरावर चढत असतील, तर चढोत बापडे! त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आमच्या रवीशनं निराशेच्या डोहात जाऊन गोते खाण्याची गरज नाही, असं मनापासून वाटतं. तो अर्णब प्रवृत्तीचा विजय नसून रवीश प्रवृत्तीचा निष्कारण ओढवून घेतलेला पराभव ठरतो. रवीश या रोजच्या झटापटीत ओढला जाण्याइतका छोटा नाही. हे रवीशनंही समजून घेण्याची गरज आहे. बुनियादी समस्यांवर आजही परखड, तिरकस बोलणारा पत्रकार दिल्लीत, देशात मौजुद आहे. त्यानं भावनिक होण्याची गरज नाही. रवीश अलीकडे त्या निसरड्या वाटेवर अधिक जातो, ही भीती अस्वस्थ करणारी आहे. त्याची अलीकडे वारंवार प्रकट होणारी उद्विग्नता भयसूचक ठरते. स्वत:चा उल्लेख त्यानं नुकताच ‘झिरो टीआरपीवाला’ पत्रकार असा केलाय. भरघोस टीआरपीवर सवार होऊन हल्लीचे काही चॅनल जे उद्योग करतात, ते पाहता झिरो टीआरपीवालाच अधिक ‘आपला’ वाटतो. ‘उन्माद’पेक्षा ‘उम्मीद’ची सध्या गरज आहे. रवीशनं हे ओळखायला हवं.

 

लेखक मुक्त पत्रकार आहेत.

sidkhan@gmail.com

Post Comment

Rahul Vaidya

Tue , 25 October 2016

एकंदर लेख आवडला- मात्र 'कन्हैया कुमार प्रकरणात त्यानं एकदा संपूर्ण टीव्ही स्क्रीन काळी दाखवून शो केला होता. त्याच्या नेमस्त व्यक्तिमत्त्वाचा विचार केल्यास ती स्टंटबाजी ठरली' हा शेरा खटकला. संपूर्ण JNU प्रकरण म्हणजे फ्रान्स मधील गाजलेल्या द्रेफ्यू प्रकरणाची नवीन आवृत्ती होती. सरकार आणि संघ परिवार उन्मादी जमाव आणि प्रचारकी प्रसार माध्यमे यांच्या साहायाने सर्व विरोधकाना 'राष्ट्रद्रोही' ठरवून चिरडून टाकण्याचा डाव खेळत होते. रवीश चा काळा पडदा म्हणजे अर्थातच एक व्यापक अर्थाने 'राजकीय' भूमिका होती. पण केवळ अमूक एक पक्ष किंवा विचारसरणीशी बांधील अशी प्रचारकी 'स्टंटबाजी' नव्हती. तो संविधान आणि लोकशाही यांच्या रक्षणाचा प्रश्न होता. पत्रकार, विद्यार्थी आणि विरोधी राजकीय पक्ष यांच्यावर हल्ला (शारीरिक देखील) करणाऱ्या फाससिस्ट झुंडी यांच्या स्टंट समोर तर हा काळा पडदा म्हणजे अगदीच सुमार आणि नीरस 'झीरो टीआरपी' स्टंट म्हटला पाहिजे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख