विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...
पडघम - साहित्यिक
भूषण निगळे
  • विनय हर्डीकर आणि त्यांच्या व्यक्तिचित्रांच्या तीन पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Sun , 15 December 2024
  • पडघम साहित्यिक विनय हर्डीकर Vinay Hardikar

लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारे अनेक लेख प्रकाशित झाले. हितचिंतक-लेखकांनी हर्डीकरांचे सर्वांगीण व्यक्तीचित्र उभे करण्यावरती भर दिल्यामुळे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य असलेल्या ‘व्यक्तीविमर्शलेखन’ या पैलूचा सविस्तर शोध घेणे या लेखांत शक्य झाले नाही. हर्डीकरांच्या ओळखीला वक्ता, राजकारणी, रसिकाग्रणी संगीतज्ञ, मराठी-इंग्रजी साहित्याचा गाढा अभ्यासक अशी अनेक आमुखे आहेत. या क्षेत्रांतल्या अग्रगण्य व्यक्तींचे गुणग्राहन करायचा त्यांचा अधिकार वादातीत आणि असाधारण आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आढावा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या व्यक्तीविमर्शांचा परामर्श घेणे समयोचित ठरेल.     

हर्डीकरांच्या व्यक्तीविमर्श लेखांचे विश्लेषण करण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांनी या निबंध प्रकाराला दिलेले नवीन वळण. प्रमोद महाजन ते जॉर्ज फर्नांडिस, म.द. हातकणंगलेकर ते श्री.ना. पेंडसे, आणि वि.म. दांडेकर ते अ.भि. शहा अशा अग्रगण्य व्यक्तिमत्त्वांचा वेध हर्डीकरांनी घेतला आहे. यातील अनेक व्यक्ती सामाजिक स्मृतिपटलाच्या आड जात असल्या, तरी आर्थिक-राजकीय-साहित्यिक क्षेत्रांतील त्यांचे कार्य प्रभावी आहे.

स्वातंत्र्योत्तर कालातील अनेक अग्रगण्य व्यक्तींची समग्र ओळख हर्डीकरांच्या लेखांतून घडते, पण ती वरवरची नसून त्या व्यक्तींचे विचारदर्शन करणारी असते. एकीकडे विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा (essence या अर्थाने) हर्डीकर शोध घेत असतात. निव्वळ व्यक्तींच्या निवडीतूनच नव्हे, तर त्यांच्या विचारसरणीवर टाकलेल्या प्रकाशझोतामुळे हर्डीकरांची व्यक्तीचित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. त्यांनी लिहिलेल्या तिसाहून अधिक व्यक्तीविमर्शांची एकत्रित पाहणी केल्यास विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राजकीय-सामाजिक-साहित्यिक विचारसरणींच्या ठळक रूपरेषा दिसतात, आणि या रेषा एकमेकांना छेद देत असल्यामुळे एक भव्य, व्यामिश्र पट उभा होतो. समष्टीतून सारतत्वाचे दर्शन घडवण्याच्या हर्डीकरांच्या अभिनव पद्धतीमागच्या प्रेरणा ओळखणे त्यामुळे सयुक्तिक ठरते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१.

मराठी साहित्यविश्वात हर्डीकरांचे पदार्पण ‘जनांचा प्रवाहो चालला’ या पुस्तकाद्वारे झाले. आणीबाणीच्या (१९७५-७७च्या) प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असलेले हे पुस्तक १९७८ साली प्रकाशित झाले. एकविसाव्या शतकातील नवीन वाचकांना मात्र हर्डीकरांची ओळख प्रामुख्याने त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वांत गाजलेल्या लेखातून - ‘सुमारांची सद्दी’ - झाली आहे. मराठी साहित्य-कला विश्वात सुमारपणा शिरजोर होत असताना एकूण अभिरुचीचीच हानी कशी होते, याचे त्यांचे परखड विश्लेषण इतके गाजले की, लेखाचे शीर्षक मराठी भाषेतले एक पद बनले.

मराठी विश्वाची वैचारिक, आर्थिक, राजकीय आघाडींवर झालेली अधोगती पाहता हर्डीकरांना सुमारपणा शोधायला कष्ट पडत नाहीत, उलट सुमारपणा त्यांना शोधत येतो, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण हर्डीकरांचा विलयशोध खोलवर जातो : त्यांना खुणावतो तो इतिहासाचा विस्तीर्ण पट आणि ऐतिहासिक प्रक्रियांची एकमेकांवरती पडणारी छाया.

हर्डीकर समग्रलक्ष्यी चिंतक आहेत: विचारसरणीच्या (ideology) उगमाचा, उत्कर्षाचा, आणि पराभवाचा शोध घ्यायला त्यांना आवडतो. ज्ञानमार्गावरचा प्रवास थांबला की सुमारपणा कसा येतो, तत्त्वप्रणालीचे महत्त्व न ओळखल्यामुळे समाजाची पीछेहाट कशी होते, व्यक्ती-संस्था-समाज यांचा विलय, आणि ह्रासकाळाचे अवलोकन हे त्यांच्या चिंतनाचे विषय राहिले आहेत. सुमारांच्या सद्दीपेक्षाही प्रभावी, चिंतनात्मक, पण दुर्दैवाने तेवढी दखल न घेतला गेलेला हर्डीकरांचा ‘एन्ड ऑफ आयडिऑलॉजी : एक मतलबी भ्रम’ लेख हा पाहता या आकर्षणाचे कारण शोधता येते.

२००७ साली प्रकाशित झालेल्या या लेखात हर्डीकरांनी विचारसरणीच्या प्रवासाचा सूत्रबद्ध शोध घेतला आहे. परिस्थितीतील परिवर्तन आणि त्यामुळे व्यवस्थांच्या अभिक्रिया आणि अनुरूप बदल हा मुख्य मुद्दा मानला तर हर्डीकरांच्या व्यक्तीविमर्शांमागच्या प्रेरणा समजून घेता येतात. व्यक्तीची विचारसरणी काय आहे? आव्हानांना सामोरे जायला तिला ती कितपत मार्गदर्शक ठरते? कुठल्या राजकीय-सामाजिक माहौलात तिच्या विचारांची प्रगती झाली आहे? हर्डीकर हे प्रश्न केंद्रस्थानी ठेवतात, कारण त्यांना आकर्षण असते ते व्यक्तीच्या वैचारिक उत्क्रांतीचे. व्यक्तीच्या विचारांचा प्रवाह थांबला, विचारधारा कुंठीत झाली असे वाटले, तर ते दूर जातात आणि नवीन वैचारिक ऊर्जांचा शोध घेतात. त्यांचा हा शोध तटस्थपणे घेतलेला नसतो तर त्यामागे एक प्रगत, सक्रिय मूल्यव्यवस्था असते. उत्कृष्ट रसग्रहण―दोषांसकट―करत व्यक्तिमत्त्वाचे स्थापत्य त्यांना उलगडून दाखवायचे असते. या अवलोकनासाठी ‘विमर्श’ ही पद्धत त्यांना कसबीपणे वापरली आहे.

आपण जेव्हा एका समस्येवर विचारविमर्श केला आहे असे म्हणतो, त्या वेळी तिचा साकल्याने केलेला विचार अभिप्रेत असतो. एकांगी किंवा फार तर दोन बाजूंनी विचार केल्यास प्रश्न सोपा आहे आणि समस्या सुटली आहे आणि असा गंड होतो. पण खोलवरचा विचारविमर्श विषयाचे पदर उलगडून दाखवतो, आणि वरकरणी साध्या वाटणाऱ्या प्रश्नांची व्यामिश्रता वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून दिसून समस्येला भिडायला मदत होते.

व्यक्तींचेही तसेच असते. कर्तृत्ववान व्यक्तींच्या कारकीर्दीत अनेक चढउतार आणि धोकादायक वळणे असतात. समाजजीवनाच्या अनेक अंगांना व्यक्तींचे कर्तृत्व स्पर्श करते आणि कालप्रवाहाला प्रभावित करते. अनेक वेळी व्यक्तींचे महत्त्व तिच्या समकालीनांना उमगत नाही आणि तिचा प्रभाव जाणवायला दशके―क्वचित शतके उलटावी लागतात. शिवाय व्यक्तींची असामान्यता ज्या मूल्यघटकांतून घडते ती ओळखायला आणि त्यांचे प्रमाण जोखायला ज्ञान, अनुभव आणि आकलनशक्ती लागते. तसे नसल्यास व्यक्तित्वाचा शोध अपूर्ण आणि धूसर राहतो, आणि अनेक व्यक्तींचे असे चित्रण करत राहिल्यास उभे राहणारे समग्र चित्र ठिगळांनी जोडलेली गोधडी बनते.

पण दुसरीकडे व्यक्तींच्या विचारसरणीचा इतिहास यांत्रिक, एकसुरी पद्धतीने मांडला तर तो कोरडा होईल. शिवाय व्यक्तीला एका विचारसरणीचे आकर्षण का आहे, काही विचारसरणींना ठराविक वेळी अनेक अनुयायी का लाभतात, हे प्रश अनुत्तरित राहतील. संश्लेषणात येणारा हे संभाव्य गंभीर प्रमाद टाळायला हर्डीकरांनी विश्लेषणाची एक अभिनव पद्धत विकसित केली आहे. ही पद्धत मराठीत अद्वितीय असल्यामुळे तिचे विवरण सयुक्तिक ठरेल.

 

२.

व्यक्तीचित्रण करताना स्थळ, काळ, आणि चित्रण केलेल्या व्यक्तीशी आपला संबंध हे तीन आयाम लेखक सहसा वापरतात. या त्रिमित अवकाशात व्यक्तीच्या जीवनाचा समग्र आलेख लेखकाला काढता येतो. कालौघाने व्यक्तीचे महत्त्व कसे बदलत गेले, स्वतःच्या बदलणाऱ्या भूमिकांतून व्यक्तीची ओळख कशी बदलली, आर्थिक-भूराजकीय स्थित्यन्तरांचे व्यक्तीवर आणि व्यक्तीने त्यांच्यावर केलेले परस्परसंबंध या दृष्टीकोनात अभिप्रेत असतात. मोजक्या लोकांच्या व्यक्तिचित्रणासाठी ही पद्धत योग्य असली तरी विविध क्षेत्रांतील, चार-पाच दशके कार्यरत असलेल्या अनेक व्यक्तींच्या कर्तृत्वाचे परिपूर्ण आकलन करण्यासाठी ती तोकडी पडते. 

अविरत स्थित्यंतरातील स्थैर्यबिंदू शोधून आणि त्यांना आशयात गुंफून एक विस्तृत संदर्भचौकट बांधण्यासाठी हर्डीकरांनी खुद्द 'व्यक्ती'लाच एक स्वतंत्र मिती बनवली आहे. हर्डीकरांच्या वैचारिक भूमिका उत्क्रांत होत गेल्यामुळे वेगवेगळ्या व्यक्तींच्या परिप्रेक्ष्यातून स्वतःच्या विचारसरणीचा आलेख त्यांना याद्वारे चितारता येतो आणि विचारसरणींचा तौलनिक अभ्यास करता येतो. या चतुर्मित अवकाश भूमितीतील सूत्रे त्यामुळे अधिक सम्यक बनतात, सामाजिक-राजकीय-आर्थिक वास्तव व्यामिश्रपणे प्रतिबिंबित होते आणि पारंपरिक व्यक्तिचित्रणाच्या साच्यात कोंडलेल्या आशयसूत्रांना विकसित व्हायला विस्तृत कॅनव्हास मिळतो.

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते. स्वतःच्या आणि व्यक्तीच्या वैचारिक प्रगतीचा समांतर प्रवास त्यांना चित्रित करता येतो आणि आणि या प्रवासाची चौकट स्थिर असल्यामुळे वाचकांना आशयसूत्राचा बोध व्हायला मदत होते.

उदाहरणार्थ, ज्ञानप्रबोधिनीच्या वि.वि./अप्पा पेंडसे यांचा प्रवास उदारमतवादी ते ‘कठोर समर्पणवादी’ कसा झाला, हे वाचकांना पेंडसे यांच्या बदलत्या वैचारिक भूमिकांतून दिसते, पण त्याचबरोबर पेंडसे यांच्या दृष्टीतून हर्डीकर कसे बदलत गेले, याचेही भान होते : संभाव्य वारसदार आणि बिनीचा कार्यकर्ता ते संस्थेत गरज नसलेला इसम या प्रवासामागची वैचारिक पार्श्वभूमी दिसते―प्रबोधिनीतले वाढते कर्मकांड आणि कट्टरपणा देशातील हिंदुत्ववादी राजकारणाची बदलणारी दिशा सुचवणारे असते.

वि.म. दांडेकरांवरच्या लेखात दांडेकरांची निर्भीड संशोधक आणि स्पष्टवक्ता अर्थतज्ञ ही ओळख हर्डीकरांच्या मनात कशी उमलत गेली हे दिसते. पण त्याचबरोबर उमदा पण अप्रगल्भ असा ज्ञानप्रबोधिनीतील युवा शिक्षक ते मुरब्बी पत्रकार आणि शेतकरी संघटनेतील आघाडीचा कार्यकर्ता हा हर्डीकरांचा प्रवासही दांडेकरांच्या नजरेतून दिसतो. या प्रवासाची सुरुवात झालेली असते ती ‘अर्थशास्त्रातील आपले ज्ञान शून्यवत आहे’ ही दांडेकरांचे भाषण ऐकून हर्डीकरांना झालेली जाणीव. पुढे हर्डीकर स्वप्रयत्नाने अर्थराज्यशास्त्रात प्राविण्य मिळवतात (आणि दांडेकरांकडून ‘हर्डीकर हा चक्रम माणूस आहे’ हे प्रशस्तिपत्रक) आणि हा विषय वैचारिक क्षितिजे विस्तारण्यासाठी पायाभूत का आहे, याची जाण वाचकांना होते.

‘सत्यकथे’त प्रकाशनासाठी हर्डीकरांच्या हस्तलिखितावर तासभर चर्चा केल्यावर हर्डीकरांचा उर्मट नकार/उत्तर श्रीपु भागवत सहन करतात, कालांतराने या घटनेचा विचार करताना लेखकाचा अहंकार बाजूला ठेवून त्याच्या निर्मितीप्रक्रियेला वाव कसा द्यावा, हे संपादकीय कौशल्य हर्डीकरांना दिसते. आणीबाणीच्या विरोधात लढणारे युवक या ओळखीमुळे प्रमोद महाजन आणि हर्डीकर सहपांथस्थ बनतात. या प्रवासात शेतकरी संघटना, भाजपच्या राजकारणाने वरवरच्या समाजवादाला सोडचिठ्ठी देऊन हिंदुत्वाकडे घेतलेले वळण, अर्थकारणाची बदलती दिशा, आणि पैशाला निवडणुकांत आलेले अतोनात महत्त्व हे थांबे येणार असतात, आणि या दोन मित्रांचा वैचारिक, नैतिक आणि भौतिक प्रवास वेगळ्या वळणवाटा घेणार असतो. 

अनेक दशकांचा सहप्रवास केल्यामुळे स्मरणरंजनात गुंग होऊन व्यक्तीच्या मर्यादा विसरण्याचा धोका हर्डीकर टाळतात. शेतकरी चळवळीशी ते जवळून निगडित होते, १९७५च्या आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात त्यांना तुरुंगवास घडला आहे. असे असूनही या दोन्ही चळवळींचे निव्वळ गोडवेच त्यांनी गायलेले नाही, उलटप्रसंगी त्या चळवळींवरच्या दोषांवरती मर्मघाती प्रहार केले आहेत.

हर्डीकरांचा कुठलाही व्यक्तिविमर्श हा श्रद्धालेख नसतो, आराधना त्यांना नामंजूर असते. उलट सुरुवातीला आदर्शवत वाटून त्या व्यक्तीशी हर्डीकर आकर्षित जरी झाले, तरी त्या व्यक्तीचे गुणदोष ते बारकाईने पाहत असतात. कितीही जिव्हाळ्याचे नाते असले, तरी अंगभूत वैचारिक सचोटीमुळे व्यक्तीचे न्यून तिच्याच तोंडासमोर मांडायला हर्डीकर कचरत नाहीत. श्री.ना. पेंडसे यांचे उत्तरोत्तर प्रयोग कसे आणि का फसले, याची चर्चा ते थेट पेंडशांबरोबर करतात. ग.प्र. प्रधानांचे समकालीन इंग्रजी वाचन कसे तोकडे आहे, हे रागावून ते प्रधानांना सांगतात. १९८५ सालच्या निवडणुकीत शेतकरी संघटेनच्या ४० उमेदवारांचे नावे प्रमोद महाजन हर्डीकरांना फोन करून विचारतात. ही गुप्त माहिती विचारल्याबद्दल हर्डीकर संतापून फोन खाली ठेवतात.

पण स्पष्टवक्तेपणामुळे व्यक्ती आणि हर्डीकर यांचे संबंध दुरावले असे क्वचितच होते. कमावलेले व्यक्तिगत भांडवल खर्च करण्यात हर्डीकरांना कंजूषपणा वाटत नाही, आणि हर्डीकरांचा वैचारिक प्रामाणिकपणा स्वीकारण्याचा मोठेपणा व्यक्तींकडे असतो―तसे नसते तर हर्डीकर त्या व्यक्तीकडे आकर्षित झालेच नसते असेही वाटते.

व्यक्तीला चौथी मिती वापरून तिच्या विचारसरणीचा संदर्भबिंदू घेऊन स्वतःची वैचारिक प्रगती हर्डीकर मापत असतात. आपला वैचारिक प्रवास त्यांना व्यक्तीच्या प्रवासाशी तपासून पाहायचा असला तरी यात स्पर्धेचा भाग नसतो―त्यांना हवा असतो तो आत्मप्रत्यय. बहुतेक वेळा त्यांचा विचार व्यक्तीच्या पुढे गेलेला  असतात. ‘अभिरुचीचे अनभिषिक्त सम्राट’ असूनही ढासळत्या मराठी वाङ्मयअभिरुचीवर श्री.पु. भागवत टीका करतात, तेव्हा त्यातली विसंगती जाणवून हर्डीकर तिच्यावर तीव्र पहार करतात. ‘माओ हाच आपला नेता आहे’ असे कॉम्रेड कनू संन्याल जाहीर करतात, तेव्हा त्यांच्याभोवतीचे वलय तुटून पडल्याची जाणीव हर्डीकरांना होते. वसंत बापटांकडून वैचारिक नेतृत्व मिळणार नाही, बाबा आमटे यांना त्यांना अभिप्रेत असलेल्या सर्वंकष सामाजिक क्रांतीचे दर्शन मांडता आले नाही, याची जाणीव हर्डीकरांना असते. पण त्यामुळे कधीही ते त्या व्यक्तीला कमीचे मानत नाहीत. उलट व्यक्तीची भूमिका समजून घेण्यात त्यांना रस असतो, कारण त्यांचा पिंड स्वयंप्रज्ञ आहे.

स्वयंप्रज्ञ व्यक्ती स्वतःच्या परिश्रमांतून ज्ञान मिळवते आणि विदाबिंदूंना जोडून नवीन ज्ञान तयार करते किंवा परिस्थितीचे अचूक विश्लेषण करते. हर्डीकर व्यक्तीच्या दृष्टिकोनातून स्वतःचा वैचारिक आत्मशोध घेतात. पण स्वतःच्या विचारसरणीवर प्रकाशझोत टाकल्यामुळे त्यांचे लेखन आत्मस्तुतीने भरले आहे, असे वाटू शकते. त्यांच्या प्रत्येक व्यक्तिविमर्शात भरपूर आत्मस्तुतीपर वाटणारी विधाने असतात. त्यामुळे हर्डीकर अहंभावी, अहंकारी आहेत, असा समज होऊ शकतो.

परंतु हर्डीकर अहंप्रेमी नसून अहंमात्री आहेत : स्वतःच्या बुद्धीला पटेल, स्वतःच्या वैचारिक चक्षुंतून दिसेल तेच मांडणे, स्वतःच्या अनुभवसिद्ध जगातच वावरणे, ही पथ्ये हर्डीकर कटाक्षाने पाळतात. फक्त आपण आहोत, आपली बुद्धी हेच प्रमाण आहे, स्वतःच्या बुद्धीने प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो, याची यथार्थ जाणीव हर्डीकर यांना आहे. स्वतःच्या माध्यमाद्वारे वैचारिक जडणघडणीतील संघर्ष एकसारखा त्यांना तपासून असतो पाहायचा असतो. यात आत्मस्तुती प्रतीत झाली, तर त्याला हर्डीकरांचा नाईलाज असतो. त्यांची निष्ठा आहे ती स्वतःच्या बुद्धीप्रामाण्यावर.

हर्डीकरांची मते त्यांची स्वतःची आहेत, अथक परिश्रमांनी घटवून केलेली आहेत. त्यामुळे त्यांची त्यांवर अढळ दृढासक्ति आहे. त्याचबरोबर बुद्धीला विपरीत अनुभव आले तर आपल्या अनुभव अपडेट करण्याची वैचारिक शिस्तही आणि लवचिकता त्यांच्यात आहे. विवक्षितेत वैश्विक मूल्ये शोधणे, तात्कालिकेतून कालातीत तत्वे ओळखणे हे त्यांच्या लेखांचे सामर्थ्य बनते. वैचारिक परिवर्तन रातोरात होत नसते, त्यासाठी विचारसौष्ठव कमवावे लागते, याची जाणीव ते वाचकांना करून देतात.

 

३.

या दीर्घ प्रवासात वाचक हरवून जात नाहीत, याचे श्रेय हर्डीकरांच्या शैलीला जाते. पण हर्डीकरांच्या व्यक्तीविमर्शांची वाचनीयता केवळ प्रवाही शैलीमुळे नसून जाणीवपूर्वक वापरलेल्या तंत्रांतूनही आलेली आहे. मुद्दामहून त्यांनी एकरेषीय निवेदनशैली निवडली आहे : ते स्वतःच लेखातील चौथी मिती असल्यामुळे या सहनायकाची आणि व्यक्तीची ओळख कशी झाली, किंवा ते त्या व्यक्तीच्या चुंबकीय क्षेत्रात कसे आले, इथून सुरुवात करून ते स्वतःच्या आणि व्यक्तीच्या संबंधांचा चढउतार पुढे आणतात. व्यक्तीशी दीर्घकाळ ओळख असेल तरच तिच्यावर लिहिणे, तेसुद्धा बराच काळ उलटल्यावर हे पथ्य ते पाळतात. सहसा लेख व्यक्तीच्या अंत्यदर्शनापासून/निधनवार्तेपासून सुरू होतो. (व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्यावर लिहिणे आपण पसंत करतो, हे हर्डीकरांनी इतरत्र म्हटले आहे).

व्यक्तीशी दीर्घकाळ ओळख-संबंध असल्यामुळे तिचा उत्कर्ष-पाडाव त्यांनी पाहिलेला असतो. पहिल्या वाक्यापासूनच वाचकांना ते थेट प्रसंगात ओढतात (In medias res)―रमतगमत विषयप्रवेश त्यांना नामंजूर आहे. मर्त्यतेची जाणीव ते सुरुवातीलाच करून देतात: मग तो वि.म. दांडेकरांच्या अंत्यविधीचा प्रसंग असो वा रा. प. नेने यांच्या निधनाची बातमी, किंवा व्यंकटेश माडगूळकर यांच्या निधनानंतरही सुंदर दिसणारे त्यांचे घर.

त्यांच्या बहुतेक लेखांतील कालावकाश ३०-४० वर्षांचा असल्यामुळे हर्डीकरांना व्यक्तीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येतेच, शिवाय एकमेकांशी असलेल्या संबंधांचे आकलनही करता येते. काळाचे आकुंचन-प्रसरण त्यांना उत्तमपणे जमते. दुर्गाबाई भागवतांशी त्यांच्या प्रत्यक्ष भेटी एका प्रसंगानंतर रोडावल्या तरी बाईंच्या ‘वाणीविद्यादायिनी’ प्रतिभा त्यांना साथ देत असते. जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर नोव्हेंबर १९७८मध्ये ते चिकमगळूर पोटनिवडणुकीत ते सोबत असतात, पण या महिन्याचे तरंग अनेक वर्षे घुमणारे असतात आणि लोकशाही समाजवादाचा भारतात पराभव का झाला आहे हे शिकणवारे असतात. राजकीय घटनांमागे, राजकीय व्यक्तींच्या कार्यामागची विचारसरणी ओळखणे, वरवरच्या, बाह्य रूपाला न भुलता विचारकेंद्राकडे कसे जावे, हे हर्डीकर दाखवतात.

अनेकदा व्यक्ती स्वतःच्या विचारसरणीला घट्ट पकडून राहते, मात्र हर्डीकरांच्या वैचारिक प्रवासातील पुढील टप्पा आलेला असतो. या विसंवादामुळे कधीकधी व्यक्ती आणि हर्डीकर यांचे संबंध थंडावले, तरी त्या संबंधांच्या विश्लेषणाद्वारे भारतीय राजकारणातील बदलांचे आकलन व्हायला मदत होते: हिंदुत्ववादी आणि मार्क्सवादी-समाजवादी विचारसरणी चिकाटीने पोथीनिष्ठ असल्या तरी आज ‘संघविचारांचा माणूस पंतप्रधान आहे’, तर समाजवादी चळवळ कालसमर्पक रहायला धडपडत का आहे, याचे उत्तर सापडते. प्रतीकवादाचा कायम धिक्कार करणारे शरद जोशी कालांतराने स्वतःच नवनवीन प्रतीके शोधत फिरतात, हा प्रवास हर्डीकरांना शेतकरी संघटनेचे बदलणारे वास्तव शिकवतो.

दुसरीकडे जर व्यक्ती आणि हर्डीकर यांचा स्वरमेळ जुळत गेला तर काळाचे बंधन गळून पडते : आठ वर्षे भेटगाठ झाली नसताही यू. आर. अनंतमूर्ती हर्डीकर भेटले की, आनंदून त्यांची गळाभेट घेतात, कारण लेखकाच्या राजकीय बांधीलकीचे महत्त्व दोघांनाही बांधून ठेवलेले असते.  

मात्र या प्रवासात वाचकांची सहसा दिशाभूल होत नाही, कारण अनेक काल- आणि क्षेत्र-दर्शक चिन्हे हर्डीकर त्यांच्या लेखात पसरतात. या अर्थवाही चिन्हांच्या साहाय्याने वाचकांना हर्डीकरांचा हात धरून मार्कक्रमण करता येते. उदाहरणार्थ, त्यांच्या अनेक लेखांत त्यांच्या पीएचडीचा उल्लेख असतो. ‘लेखक आणि सामाजिक बांधिलकी’हा विषय त्यांनी का निवडला आणि मग पीएचडी पूर्ण का केली नाही याची पुनरुक्ती असते आणि व्यक्तीची सविस्तर प्रतिक्रिया त्यावर असते. हर्डीकर यांच्या पीएच.डी.बद्दल त्या व्यक्तीला कसे वाटते त्यावरून तिच्या विचारांची जाणीव होते आणि हर्डीकरांचा वैचारिक प्रवास दिसतो : विषय ऐकून दुर्गाबाई भागवत सुखावतात, पुढे पीएच.डी. पूर्ण न करण्याचा निर्णय घेतला तरी अ.भि. शहा आणि वि.म. दांडेकर हर्डीकरांना संधी देतात, कारण हर्डीकरांची तडफ त्या दोघांनी ओळखलेली असते.

‘इंडियन एक्सप्रेस’मधली त्यांची नोकरी आणि त्याआधी अरुण शौरींबरोबरची मुलाखत अशीच वारंवार येणारी व्यक्तीची भूमिका अजमावणारी कसोटी (Rorschach test) असते: पत्रकाराच्या भूमिकेतून सुरुवात होऊन पुढे हर्डीकर शेतकरी चळवळीला पूर्णवेळ जोडले जाणार असतात. या पुनरावृत्तीमुळे खंत-अभिमान-निराशा अशा भावनांचे संयुग हर्डीकरांना निर्माण करता येते.

भावनांना गौण न मानल्यामुळे हर्डीकरांचे अनेक व्यक्तिविमर्श व्यक्तीला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रांचे रूप घेतात. व्यक्तीचे निधन झाल्यामुळे तिला आपली बाजू मांडता येणार नाही याची जाणीव त्यांना असते. त्यामुळे विस्ताराने ते व्यक्तीची बाजू पुढे आणतात आणि तिला झुकते माप देतात. या पत्रांतील सूर हळवा नसला तरी व्यक्तीबद्दल सहानुभूती असते आणि अनेकदा आपल्या स्वतःच्या प्रमादांची कबुली. ही पत्रे विलक्षण प्रामाणिक असल्यामुळे या पत्रलेखांत दोन विचारसरणींचा खळाळणारा प्रवाह अनुभवण्याचा आनंद वाचकांना मिळतो.

व्यक्तिविमर्शाचा घाट आणि धाटणी ठरून गेली असली, तरी हे लेखन साचेबद्ध न वाटण्याचे कारण म्हणजे हर्डीकरांची भाषाशैली: ओघवती, नेमकी, अलंकार-क्रियाविशेषणांचा हव्यास नसलेली आणि मोजके शब्द वापरणारी ही शैली त्यांच्या आणि वाचकांच्यामध्ये येत नाही. व्यक्ती आणि स्वतःचे विचार केंद्रस्थानी ठेवल्यामुळे भलत्याच प्रयोगांच्या फंदात ते सापडत नाहीत. हर्डीकर स्वतः अनेक भारतीय भाषांत पारंगत असल्यामुळे भाषांच्या सामर्थ्यांची त्यांना पुरेपूर जाणीव आहे―अनंतमूर्तींवरच्या लेखातील कन्नड आणि स्वामी अग्निवेशांवरच्या लेखातील हिंदी शब्द प्रसंगोचित वापरल्यामुळे व्यक्ती-हर्डीकर यांच्यातील आत्मीयता दिसते. संस्कृतवर त्यांची पकड असूनही सोप्या, पारंपारिक मराठी शैलीचे हर्डीकर कसबी कारागीर आहेत- ‘अप्पा, दहा वर्षे तुम्ही जवळ ठेवलंत. माझं भलं झालं; १९७६मध्ये बाहेर काढलंत, त्यामुळे जास्त भलं झालं!’

येथे ‘धन्य’ किंवा ‘हित’च्या ऐवजी ‘भलं’ (‘भले’ नव्हे) वापरले आहे, ‘बाहेर काढणे’, यातून बदलणारे पेंडसे-हर्डीकर गुरुशिष्य संबंध दिसतात, आणि दोन्ही ओळी एकत्रितपणे पाहता हर्डीकरांचा वाढणारा आत्मविश्वास आणि स्वतंत्रपणा दिसतो. दिसत नाही तो ‘पहा! पहा! हे पाहिलेत का येथे मी काय केले आहे ते?’ असा चलाखीचा भाव.

हर्डीकर शीर्षकांवरही बरीच मेहनत घेतात. ‘हुर्मुजी रंगाचा उंच मोती-दाणा’ यातील प्रत्येक शब्द स्वामी अग्निवेश यांचे व्यक्तिमत्व बरोबर पकडतो, तर ‘श्री माता भवानी’ या उपाधीवरून गंगुबाई हनगल यांचे भारतीय शास्त्रीय संगीतात असलेले अढळपद (‘श्रीकृष्ण कमिशन’ हे श्रीपु भागवतांवरच्या शीर्षक आता त्या चौकशी समितीच्या शिफारशींइतकेच कालबाह्य झाले आहे हा अपवाद). तपशिलावरची त्यांचे पकड ही विलक्षण आहे. श्री.ग. माजगावकर यांच्या व्यक्तीविमर्शाची सुरुवात माजगावकर त्यांना देत असलेल्या अर्ध्या साध्या-डोश्याने होते, तो डोसा श्रीपु भागवतांच्या लेखात अर्धाच राहतो. धुळ्याला शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात प्रमोद महाजनांचे भाषण फसते. महाजनांच्या भाषणातील ‘आचरट वाक्ये’ उद्धृत करताना त्यांतील एका वाक्यातील शेतकरी महाजनांच्या आणि स्वामी अग्निवेश यांच्या व्यक्तीविमर्शांत सातच किलोमीटर चालतो, सहा किंवा आठ नव्हे. या सुखद अंतर्गत सुसंगतीमुळे निवेदनाला एक विलक्षण सामर्थ्य प्राप्त होते. 

दुर्दैवाने पुनर्लेखन करण्याची शिस्त हर्डीकर पाळत नसल्यामुळे काही लेख पसरट होतात, उदाहरणार्थ ‘पाच उत्तरांची कहाणी’ ―भारतीय समाजवादाचा पराभव का झाला, याचे विश्लेषण प्रभावी असले तरी चटपटीत किश्श्यांत हरवून जाते. अनावश्यक तपशील घुसडण्याचा मोह त्यांना अनेकवेळा टाळता येत नाही: भास्करराव बोरावके यांच्या घरी जेपी जेवून गेले होते, स्वामी अग्निवेशांच्या लेखात मोहन गुरुस्वामी नावाच्या माणसाचे कर्तृत्व, हातकणंगलेकरांवरच्या लेखात पूर्वी गाजलेल्या पण आता विस्मृतीत केलेल्या एका लेखकाने ‘डॉक्टरांनी मला एसटीत बसायलाच परवानगी दिली नाही’ असा आजार सांगत हर्डीकरांबरोबर प्रवास टाळणे―असे क्षेपक मनोरंजक असले, तरी रसभंग करतात. पण मग लगेच हर्डीकरांच्या मर्मदृष्टीतून सत्याचा एक नवीन पैलू दिसतो, घटनांचा परस्परसंबंध लावायला मदत होते आणि वाचकांचे आकलन समृद्ध होते.

 

४.

हर्डीकर कधीही एकाच क्षेत्रामध्ये फार काळ रमले-टिकले नाहीत, अस्थैर्य हाच त्यांचा स्थायीभाव आहे असा सूर त्यांच्या अमृतमहोत्सवावरच्या बहुतेक लेखांत आला आहे. हा निष्कर्ष त्यांच्यावर अन्याय करणारा आहे : विचारसरणीचा वास्तवावर आणि भौतिकतेवर पडणारा प्रभाव व्यक्तींच्या आणि स्वतःच्या माध्यमातून अविरतपणे शोधत राहणे हेच हर्डीकरांच्या वैचारिक जीवनाचे सूत्र राहिले आहे.

सार्वजनिक आयुष्यात पन्नास वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या व्यक्तीची भूमिका घटनांकडे पाहताना आणि त्यांच्यात सहभागी होताना दोन प्रकारची असू शकते. ॲडम स्मिथने व्यक्तीला ‘निःपक्षपाती दर्शक’ असे म्हटले आहे तर व्यवस्थापन गुरू पीटर ड्रकरनी ‘रिंगणाबाहेरची दर्शक’. हर्डीकरांना हे दोन्ही पवित्रे अमान्य आहेत: रिंगणात घुसून (आणि रिंगमास्टरची शिस्त झुगारून) आग्रही भूमिका ते घेत आले आहेत. त्यांचा मूल्यविचार एका ‘सकर्मक संशयवाद्या’चा (active skeptic) आहे- तर्ककठोर, विवेकवादावर आणि उदारमतवादावर निष्ठा, आणि वैचारिक मोकळेपणा.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

हर्डीकरांचा उदारमतवाद पुस्तकी-दरबारी नाही. अनेक आव्हानांचा धीरोदात्तपणे सामना करत, स्वतःच्या भूमिका परखडपणे तपासत तो विकसित झाला आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधने असता कामा नयेत, या प्राथमिकतेपासून सुरुवात करून व्यक्तीच्या क्षमतांना पूर्णपणे फुलण्याचा मोकळेपणा आणि अवकाश मिळावा, या सकारात्मक भूमिकेपर्यंतचा हर्डीकरांचा व्यक्तिरेखालेख या प्रदीर्घ प्रवासाचा साक्षीदार आहे.

म्हणूनच स्वतःच्याच काव्यशक्तीने स्तिमित झालेला युवक ते दमनशाहीचा निषेध करणारा तडफदार तरुण ते शेतकरी चळवळीत वावरणारा सर्जक कार्यकर्ता ते महाराष्ट्राच्या  वाताहतीचे तटस्थपणे रोगनिदान करणारा चिंतनशील जाणता या भूमिकांचा प्रवास करणाऱ्या ‘विनय हर्डीकर’ या व्यक्तिरेखेचा विमर्श उद्बोधक ठरतो आणि पुढील पाव शतकात ही व्यक्ती अजून कुठले आव्हान पेलणार याची उत्कंठा लागते.

एकीकडे आर्थिक उदारीकरणाला अवाजवी विरोध पण दुसरीकडे समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी कोणताही ठोस उपाय न सुचवल्यामुळे आणि जागतिकीकरणाशी जुळवून न घेतल्यामुळे समाजवाद्यांची निर्णायक हार, साहित्य ज्या व्यापक आर्थिक-राजकीय अवकाशात उमलते तो समजून न घेता त्याच्याशी बांधीलकी न ठेवल्यामुळे साहित्यिकांचे अवमूल्यन होणे, आणि व्यक्तीची विचारसरणी उत्क्रांत पावू शकते, याची जाणीव न ठेवल्यामुळे बिघडणारे नातेसंबंध, अशा प्रक्रियांचा विचक्षण वेध हर्डीकरांनी घेतला आहे.

उदारमतवादी लोकशाही ज्या वेगाने जगभर पराभवांचा सामना करत आहे, ते पाहता आता हर्डीकरांना अजून एका विचारसरणीचा संभाव्य विलय मांडावा लागणार आहे, अशी भीती वाटते, पण चार मितींतील त्यांची मुशाफिरी तितकीच समर्थ आणि वेधक असणार, हे नक्की.

निवडक संदर्भ आणि ऋणनिर्देश

१. विनय हर्डीकरांचे विचारविमर्श आणि इतर वैचारिक निबंध. 

२. द.न.गोखले यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य’ (मौज प्रकाशन) या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ‘व्यक्तिविमर्श’ या संकल्पनेबद्दल उपयुक्त विचार मांडले आहेत. 

३. विचारसरणी आणि कल्पनांचे महत्त्व यावर उद्बोधक चर्चा इसाया बर्लिन यांनी रामीन जहानबेगलू यांच्याबरोबर केली आहे, ती मुळापासूनच वाचण्यासारखी आहे. (Conversations With Isaiah Berlin – Ramin Jehanbegloo, Peter Hablan Publications).

४. राम जगताप यांनी ‘जन ठायीं ठायीं तुंबला’ (जनशक्ती वाचक चळवळ) या विनय हर्डीकरांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हर्डीकरांच्या लेखनात स्वतःबद्दल भरपूर विधाने असतात, या तक्रारीचा उत्तम प्रतिवाद केला आहे.

५. हर्डीकरांचे अभिष्टचिंतन करणाऱ्या ईमेलऐवजी हा लेख लिहावा या सुचनेबद्दल इंद्रजित भालेराव यांचा मी आभारी आहे. ‘विचारसौष्ठव’ ही प्रतिमा सुचवल्याबद्दल साक्षेपी वाचक जनार्दन वेर्लेकर यांचा मी आभारी आहे.

.................................................................................................................................................................

लेखक भूषण निगळे हे साहित्यात रुची असलेले संगणक अभियंता आहेत. ते जर्मनीतील Hemsbach इथं राहतात.

bhushan.nigale@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......