(हा विषय मांडण्यापूर्वी मला तीन माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या तिघांनी मला या विषयाची ओळख तर करून दिली. यातील दोघांच्या पुस्तकांनी माझे डोळे उघडले आणि तिसर्याने केलेल्या कृतीमुळे मला आपण करत असलेल्या एका अनिर्बंध गोष्टींची जाणीव करून दिली. पहिले पुस्तक आहे - Garry McGovern या लेखकाचे ‘World Wide Waste’; दुसरे पुस्तक आहे- Mike Lee या लेखकाचे ‘How Bad are Bananas’ आणि तिसरे लेखक आहेत, प्रसिद्ध छायाचित्रकार देवीदास बागूल.)
साधारणतः या शतकाच्या सुरुवातीला स्मार्ट फोन्स बाजारात आले. आज आपले आयुष्य मोबाईल या तळहातावर मावणार्या साधनाने व्यापून टाकले आहे. आता १५-२० वर्षांनंतरचे वास्तव आपल्याला काय सांगते? कुठल्याही गोष्टीचे काही फायदे आणि काही तोटे असतात. मोबाईलमुळे आपले आयुष्य नक्कीच सुखकर झाले आहे. अगदी अनेकांचे प्राण वाचवण्याचेही काम या साधनाने केले आहे. आज आपण अनेक आर्थिक व्यवहार लीलया करू लागलो आहोत, घरबसल्या हॉटेलमधून पदार्थ मागवणे शक्य झाले आहे. असे कितीतरी फायदे मोबाईलमुळे झाले आहेत. या साधनाची उपयुक्तता ही झाली पहिली बाजू.
आता दुसरी बाजू पाहू. स्मार्ट फोन्स आपल्या आयुष्यात आल्याने अनेक समस्याही आपल्यासमोर येऊ लागल्या आहेत. व्यसनाधीनता, मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, सोशल मीडियावर होणारे विखारी संवाद आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेली दुफळी इत्यादी. त्याचबरोबर आपले डोळे, कान या अवयवांना होणार्या व्याधींचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात, असे आपण ऐकत आलो आहोत. पण एखाद्या गोष्टीला दुर्लक्षित अशी तिसरी बाजूही असू शकते. ती मोबाईललाही आहे. मात्र या दुर्लक्षित तिसर्या बाजूविषयी फारसे कोणी बोलताना दिसत नाही. हे तंत्रज्ञान जेथे विकसित झाले, त्या पाश्चात्य देशांमध्ये मात्र आता या तिसर्या बाजूची जाणीव होऊ लागली आहे.
ही बाजू आहे मोबाईलमुळे पर्यावरणात होणार्या प्रदूषणाची आणि नैसर्गिक स्त्रोतांच्या हानीची.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आज आपण डिजिटल युगात वावरत आहोत. अनेक गोष्टी या डिजिटल तंत्रज्ञानाने सहजरित्या करत आहोत. कागदाचा कमी झालेला वापर, संदेश पाठवण्यासाठी होणारी वेळेची बचत, यामुळे हे तंत्रज्ञान जागतिक प्रदूषण कमी करते. तसेच या टिकावू तंत्रज्ञानामुळे जागतिक कार्बन उत्सर्जन कमी होत आहे आणि हेच तंत्रज्ञान पुढे पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवू शकेल, असं चित्र आपल्यासमोर निर्माण केलं गेलं आहे. पण काही तथ्ये या विधानांना छेद देतात आणि आपल्यासमोर एक भयावह चित्र उभं राहतं.
या सगळ्या तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागते. जलविद्युत, औष्णिक, अणुऊर्जा, सौरऊर्जा, पवनऊर्जा यांतून वीजनिर्मिती होते. पण आज जगभरात अशी स्थिती आहे की, एकंदर विजेपैकी सुमारे ५० टक्के औष्णिक म्हणजेच कोळसा किंवा डिझेलसारखी जैविक इंधन जाळून तयार केली जाते.
ही वीज आपण वापरत असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाला २४ तास लागते. ‘Journal of Cleaner Production’ या २०१८ साली प्रकाशित झालेल्या अहवालात २०४० सालापर्यंत या तंत्रज्ञानाला जगात निर्माण होणार्या वीजेपैकी १४ टक्के वीज लागेल, असे म्हटले आहे. आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनवरून जो डेटा निर्माण होतो, तो साठवण्यासाठी लागणारे सर्व्हर्स, त्यांना थंड ठेवण्यासाठी लागणारी वातानुकुलित यंत्रणा यांची प्रत्येक दिवशी भर पडत चालली आहे. त्यामुळे २०४०च्या आधीच आपण वर दिलेला आकडा गाठण्याची शक्यता आहे. हा सगळा डेटा साठवण्यासाठी दरवर्षी ४१६.२ टेरावॅट इतकी वीज लागते. इंग्लंड या देशाची एका वर्षाची विजेची गरज एवढीच आहे.
आपण स्मार्टफोन वापरतानाच्या प्रत्येक कृतीला वीज लागते. फेसबुक-इन्स्टाग्रामवरील पोस्ट, व्हॉटसअॅपवरील मेसेज, ईमेल, रील्स, युट्यूबवरील व्हिडिओज, पॉडकास्ट, फोटो, ऑनलाईन मिटिंग्ज, व्हायरल पोस्ट याबरोबरच अगदी आपण सतत बदलत असलेले स्टेटस, सेल्फीज, आपण वापरत असलेली डिजिटल घड्याळे, लोकेशन अशा अनेक गोष्टींसाठी वीज खर्च होते.
आपल्याला वाटते की, यासाठी फक्त आपल्या स्मार्टफोनमधील बॅटरीमधील खर्च होत असेल, पण खरं चित्र अतिशय वेगळं आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीमुळे नेमके किती प्रदूषण होते, हे ‘कार्बन फूटप्रिंट’ या यंत्रणेद्वारे मोजले जाते. एखाद्या वस्तूचा किंवा आपण केलेल्या कृतीचा कार्बन फूटप्रिंट कसा काढला जातो, याची माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे. समजा आपण वापरत असलेल्या एखाद्या पेनचा कार्बन फूटप्रिंट काढायचा असेल, तर काय काय विचारात घ्यावे लागेल? तर त्याच्या निर्मितीमध्ये वापरलेले विविध धातू खाणीतून काढताना होणारे प्रदूषण, त्या धातूंवर प्रक्रिया करतानाचे प्रदूषण, त्या पेनाच्या उत्पादनात वापरल्या गेलेल्या विविध तंत्रज्ञानांच्या वापरामुळे होणारे प्रदूषण आणि ते पेन बाजारात पोहोचण्यासाठी केलेल्या वाहतुकीतून होणारे प्रदूषण हे सगळे विचारात घेतले जाते. या सगळ्याची एकत्रित बेरीज म्हणजे त्या वस्तूचा ‘कार्बन फूटप्रिंट’.
पण कोणत्याही वस्तूला किंवा कृतीला फक्त कार्बन फूटप्रिंटच असतो असे नाही. त्याच्या निर्मितीत पाण्याचा आणि जमिनीचाही वापर होतो, म्हणून ‘वॉटर फूटप्रिंट’ आणि ‘लॅण्ड फूटप्रिंट’ची त्यात भर पडते. जगातील कुठलीही वस्तू उत्पादित करताना कुठल्या ना कुठल्या प्रकारे कार्बन डायऑक्साईड तसेच मिथेन, नायट्रस ऑक्साईडसारखे Green House Gases वातावरणात सोडले जातात. त्या वस्तूचे उत्पादन करताना उत्सर्जित केलेले हे वायू हा त्या उत्पादनाचा कार्बन फूटप्रिंट असतो. Mike Lee या लेखकाने ‘How Bad are Bananas’ या आपल्या पुस्तकात आपल्या प्रत्येक कृतीचा कार्बन फूटप्रिंट दिलेला आहे.
त्याशिवाय वस्तू निर्मितीप्रक्रियेत पाण्याचा आणि जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे प्रत्येक वस्तूच्या निर्मितीत वॉटर फूटप्रिंट आणि लॅण्ड फूटप्रिंट असतो. ‘Mind Your Step’ या अहवालात याविषयी विस्तारपूर्वक सांगितले आहे. आपण पित असलेल्या एक चहाच्या कपाचा वॉटर फूटप्रिंट आहे २६ लिटर. म्हणजे आपण जेव्हा एक कप चहा पितो, तेव्हा २६ लिटर पाणी वाया गेलेले असते.
भात हे जगभरातल्या अनेकांचे खाद्य आहे. या पिकाला सगळ्यात जास्त पाणी लागते. त्यामुळे खरे तर आज आपण ५०-६० रुपये किलोने घेत असलेल्या तांदळाची किंमत ही कितीतरी जास्त असायला पाहिजे. त्याचबरोबर भातशेतीमधून मिथेन या Green house gasचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते. आज जागतिक तापमान वाढीमध्ये मिथेन या वायूचे प्रमुख योगदान आहे.
डिजिटल तंत्रज्ञानात वापरल्या जाणार्या इलेक्ट्रॉनिक मायक्रो चिपच्या निर्मितीलाही असेच प्रचंड पाणी लागते. या चिप बनवण्याचे सर्वाधिक कारखाने तैवानमध्ये आहेत, आणि तिथे भातशेतीसाठी पाण्याची मोठी कमतरता आहे.
साधारणतः एका स्मार्टफोनच्या उत्पादन प्रक्रियेत सुमारे ६० किलो एवढे कार्बन उत्सर्जन होते. २०२३ साली जगभरात १३४ कोटी स्मार्टफोन्स विकले गेले. त्याशिवाय आपण स्मार्टफोन्सवर विविध अॅप्स वापरतानाही कार्बन उत्सर्जन होते. उदाहरणच द्यायचं झाले, तर एक ई-मेल पाठवला की, ४ ग्रॅम एवढे कार्बन उत्सर्जन होते. हे कसे मोजले जाते, ते पाहुया. हा मेल टाईप करताना झालेला वीजेचा वापर, तो पाठवताना वापरलेले नेटवर्क आणि त्याचा वीजवापर, तो साठवून ठेवण्यासाठी वापरलेल्या सर्व्हरचा वीजवापर, तो वाचताना होणारा वीजवापर, यांचा विचार करून हे प्रमाण काढले गेले आहे.
याचबरोबर हा मेल पाठवताना तुम्ही कुठल्या सर्व्हरचा वापर म्हणजे समजा तुम्ही पुण्यातून एक मेल पाठवत आहात, पण तुमचा सर्व्हर दिल्लीला असेल, तर उत्सर्जन आणखी वाढते. तसेच मेल असलेल्या अॅटॅचमेंटमुळेही या उत्सर्जनात आणखी भर पडते.
या संख्या अगदी किरकोळ वाटत असल्या तरीही सध्या दररोज जगभरातून ३०० अब्ज मेल पाठवले जातात. हीच गोष्ट फेसबुक-इन्स्टाग्रामवरील पोस्ट, व्हॉटसअॅपवरील मेसेज, ईमेल, रील्स, युट्यूब वरील व्हिडिओज, पॉडकास्ट, फोटो, ऑनलाईन मिटिंग्ज, व्हायरल पोस्ट, स्टेटस, सेल्फीज, डिजिटल घड्याळे, लोकेशन यांनाही लागू पडते. https://www.domo.com/data-never-sleeps या साईटवर दर मिनिटाला जगभरात इंटरनेट वापरून काय काय कृती केल्या जातात, याची एक आकृती दिलेली आहे. त्यातील संख्या बघितल्या, तर आश्चर्यचकीत व्हायला होते.
...........................................................................................................................................
आपल्या स्मार्टफोनच्या टच स्क्रिनसाठी ‘इंडियम’ नावाचे एक मूलद्रव्य वापरले जाते. या पारदर्शक मूलद्रव्याला स्पर्श केल्यावर आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले सर्किट पूर्ण होते आणि आपण केलेली कृती घडते. हे खनिज अतिशय दुर्मीळ असे आहे. याबरोबरच इलेक्ट्रॉनिकमध्ये टिटानियम, निकेल, सोनं, चांदी असे महागडे धातू वापरले जातात. NEODYMIUM, PRASEODYMIUM, GADOLINIUM ही खनिजं फोनमधील स्पिकर, मायक्रोफोन आणि व्हायब्रेशनसाठी वापरली जातात. बॅटरीमध्ये कोबाल्टसारखी विषारी खनिजं वापरलेली असतात. ही सगळी खनिजं पृथ्वीच्या पोटातून उत्खनन करून काढली जातात. ही सगळी खनिजं पृथ्वीच्या पोटातून उत्खनन करून काढली जातात. आजघडीला जगभर वेगवेगळे धातू मिळवण्यासाठी दरवर्षी सुमारे १०० अब्ज टन एवढे उत्खनन केले जाते. दुर्दैवी बाब म्हणजे यातला जवळपास ७०-८० टक्के भाग वाया जातो. उरलेल्या २०-३० टक्के भागातूनच हे धातू, खनिजं आपल्याला मिळतात.
...........................................................................................................................................
आपण वापरत असलेल्या स्मार्टफोन्समध्ये अनेक दुर्मीळ असे धातू वापरले जातात. https://www.weforum.org या साईटवर आपण वापरत असलेल्या स्मार्टफोन्समध्ये वापरलेल्या धातूंची एक आकृती दिली आहे. रासायनिक मूलद्रव्यांचे Periodic Table आपण शाळेत असताना शिकलेलो असतो. सध्या या Periodic Tableमध्ये ११८ मूलद्रव्ये आहेत. त्यापैकी सुमारे ५० टक्के आपल्या स्मार्टफोनमध्ये वापरलेली असतात. यातील अनेक मूलद्रव्ये अतिशय दुर्मीळ आहेत.
उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या स्मार्टफोनच्या टच स्क्रिनसाठी ‘इंडियम’ नावाचे एक मूलद्रव्य वापरले जाते. या पारदर्शक मूलद्रव्याला स्पर्श केल्यावर आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेले सर्किट पूर्ण होते आणि आपण केलेली कृती घडते. हे खनिज अतिशय दुर्मीळ असे आहे. याबरोबरच इलेक्ट्रॉनिकमध्ये टिटानियम, निकेल, सोनं, चांदी असे महागडे धातू वापरले जातात. NEODYMIUM, PRASEODYMIUM, GADOLINIUM ही खनिजं फोनमधील स्पिकर, मायक्रोफोन आणि व्हायब्रेशनसाठी वापरली जातात. बॅटरीमध्ये कोबाल्टसारखी विषारी खनिजं वापरलेली असतात.
ही सगळी खनिजं पृथ्वीच्या पोटातून उत्खनन करून काढली जातात. आजघडीला जगभर वेगवेगळे धातू मिळवण्यासाठी दरवर्षी सुमारे १०० अब्ज टन एवढे उत्खनन केले जाते. २०५० सालापर्यंत ते १७० अब्ज टनांपर्यंत पोहोचेल. हे जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या आकारमानापेक्षा जास्त आहे.
दुर्दैवी बाब म्हणजे यातला जवळपास ७०-८० टक्के भाग वाया जातो. उरलेल्या २०-३० टक्के भागातूनच हे धातू, खनिजं आपल्याला मिळतात. हल्ली जगभरात दरवर्षी १३४ कोटी स्मार्टफोन्स विकले जातात. हा खप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि तो याच वेगाने वाढत राहिला, तर इंडियमसारखी दुर्मीळ खनिजं पृथ्वीवरून कायमची नष्ट होण्याची शक्यता आहे.
कोबाल्ट हे खनिज काँगोसारख्या आफ्रिकन देशांमध्ये मिळते. याच्या उत्खननात लहान मुलांचा वापर केला जातो. याचे काही व्हिडिओज युट्यूबवर आहेत.
दुसरी दुर्दैवी बाब म्हणजे काहीही गरज नसताना दरवर्षी मोबाईल बदलणारे महाभाग आहेत. एकदा फोन बदलला की, तो जुना फोन दोन-तीन वेळेला पुनर्वापर करून त्याचा पुढे ई-कचरा होतो आणि त्याच्या निर्मिती प्रक्रियेत वापरलेले अनेक दुर्मीळ धातू वाया जातात.
स्मार्टफोन्समुळे जो अवाढव्य प्रमाणात डेटा निर्माण होतो आहे, त्यासाठी जगभर नवनवीन डेटा सेंटर्स उभारली जात आहेत. अखंडीत वीजेचा पुरवठा ही या डेटा सेंटर्सची मूलभूत गरज आहे. आज जगभरातील डेटा सेंटर्सना ४१६.२ टेरावॅट इतकी दरवर्षी गरज लागते. ही संख्या संपूर्ण इंग्लंड देशाच्या एका वर्षाच्या मागणीपेक्षा जास्त आहे. या डेटा सेंटर्समधून होणारे कार्बन उत्सर्जन जगभरात चालणार्या विमानवाहतुकीतून होणार्या उत्सर्जनापेक्षा जास्त आहे. या सेंटर्समध्ये साठवलेल्या डेट्यामधील ९० टक्के केवळ कचरा आहे. याचा अर्थ आपण केवळ कचरा साठवून ठेवण्यासाठी अवाढव्य प्रमाणात प्रदूषण करत आहोत.
प्रत्येकालाच वाटते की, आपल्याकडे महागडा, अनेक वैशिष्ट्ये असणारा, चांगले फोटो काढता येणारा आणि अद्ययावत तंत्रज्ञान असणारा मोबाईल फोन पाहिजे. या महागड्या फोनमध्ये अनेक मौल्यवान धातू वापरलेले असतात. त्यामुळे त्याची किंमत जास्त असते. यांचा कार्बन फूटप्रिंट आणि वॉटर फूटप्रिंट खूप जास्त आसतो.
Garry McGovern आपल्या पुस्तकात म्हणतो की, आपण विकत घेतलेला एक स्मार्टफोन हा कमीत कमी १० वर्षे तरी वापरला गेला पाहिजे. तर Mike Lee महागड्या स्मार्टफोन्सविषयी म्हणतो की, हा फोन कमीत कमी ३० वर्षं वापरला गेला पाहिजे. मात्र या महागडे फोन विकणार्या कंपन्या Wright to Repairच्या विरुद्ध आहेत. तुमचा फोन नादुरुस्त झाला, तर तुम्ही नवीन फोन घ्यावा, अशी त्यांची भूमिका असते.
आज आपण निर्माण करत असलेल्या डेटामधील मोठा वाटा आहे तो फोटोंचा. आपण आपल्या जीवनातील प्रत्येक घटना-प्रसंगाचे फोटो काढत बसतो. जगभरात दरवर्षी १६ लाख कोटी येवढे फोटो काढले जातात. यातील ९० टक्के फोटो हे स्मार्टफोन्सवर काढले जातात. १६ लाख कोटी ही संख्या संपूर्ण २०व्या शतकात काढल्या गेलेल्या एकूण फोटोंपेक्षा जास्त आहे.
हे सगळे आकडे बघून भयचकीत व्हायला होतं. पण आपल्यापुढे आणखी एक धोका उभा आहे, तो म्हणजे Generative AI चा. या तंत्रज्ञानामुळे वीजेची मागणी प्रचंड वाढणार आहे.
मग याला पर्याय काय? खरं तर या तंत्रज्ञानाला कुठलाही पर्याय नाही. स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. पण आपण याचा नियंत्रित वापर मात्र नक्की करू शकतो. निरर्थक पोस्ट, मेसेजेस करणे टाळू शकतो. मोबाईल अॅपची नोटिफिकेशन्स बंद केली, तरी मोबाईलचा वापर कमी होतो. याचबरोबर आपल्या कुठलेही अॅप इन्स्टॉल करताना काही परवानग्या नाकारू शकतो. फोनवर डार्क मोड वापरल्यानेही वीजेचा वापर कमी होतो, कारण आपल्या फोनच्या स्क्रिनवर दिसणार्या रंगांसाठीही प्रचंड वीज लागते. कधीकाळी काढलेले फोटो काढून टाकणे, मेलवर न लागणारे मेसेजेस अनस्बस्क्राईब करणे, यामुळे वीजेची बचत होते. Garry McGovern म्हणतो - ‘Digital Technology making it simple to distroy our planet’.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
काही दिवसांपूर्वी माझा जिवलग मित्र राजू देशपांडेने मला प्रसिद्ध लेखक, चित्रकार व छायाचित्रकार देवीदास बागूल यांचा एक किस्सा सांगितला, त्याने मला मला विचार करावयास भाग पाडले. डिजिटलच युगाच्या खूप आधीचा हा प्रसंग आहे. एकदा बागुलांना एक फुलांनी बहरलेले मोठे झाड दिसले. ते क्षणभर थबकले. दोन मिनिटांनी त्यांनी आपल्या बॅगेतला कॅमेरा काढला आणि त्या झाडाचा फोटो काढला. पण क्षणभरात त्यांना जाणीव झाली की, आपण कशासाठी फोटो काढला? इतक्या सुंदर झाडाचे सौंदर्य डोळ्याने प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद न घेता आपण त्याचा फोटो काढला, याचा प्रचंड पश्चात्ताप झाला. त्यानंतर ते राजूच्या स्टुडिओत आले आणि त्यांनी हा प्रसंग त्याला सांगून ‘आजपासून मी फोटो काढणे सोडून दिले आहे’ असे जाहीर केले.
आजघडीला तर खरोखरच आपण आपल्या डोळ्यांनी एखाद्या प्रसंगाची मजा घेण्याची क्षमता पूर्णपणे हरवून बसलो आहोत. आपल्याला सगळ्या गोष्टी १०-१५ मिलिमीटरच्या लेन्समध्ये पकडून चार-पाच इंचाच्या स्क्रिनवर बघायचीच सवय लागली आहे.
हा लेख लिहिण्यायासाठी मी अनेक वेबसाईट धुंडाळल्या. अनेक लेख डाऊनलोड केले. त्यातून जागतिक उत्सर्जनात आणखीच भर पडली. त्यामुळे माझ्या मनातही अपराधीपणाची भावना आहे.
संदर्भ
World Wide Waste – McGovern Gerry
Environmental Digital Responsibility – Frick Tim
What’s the Carbon Footprint of your Website? - Jungblut Sarah-Indra
This graphic shows what your smartphone is made of – Venditti Bruno
The Environmental Impact of Digital Technologies and Data – Canales Luna Javier
Unthinking Photogrphy
Mind your Step
Data Never Sleeps
.................................................................................................................................................................
कौस्तुभ मुदगल
creating.awareness06@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment