गिव्ह सम क्रेडिट टू ‘क्रेडिट्’स!
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 22 April 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar जॅकी चॅन Jackie Chan सुरुवातीची श्रेयनामावली Opening Credits शेवटची श्रेयनामावली End Credits

 ईगो हा फार  कळीचा  शब्द आहे शोबिझमध्ये. इथे प्रत्येकात हा इगो ठासून भरलेला असतो. त्याचं पडद्यावरच दृश्यरूप म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला आणि शेवटी  येणारी श्रेयनामावली. त्यात नायकाचं नाव सर्वांत प्रथम झळकणं आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेला साजेसंच. चित्रपटात एकापेक्षा जास्त मोठे नायक असतील तर? राज कपूर, दिलीप कुमार आणि देवानंदला एकत्र घेऊन विजय आनंद एक भव्यदिव्य चित्रपट करणार होता, पण तो बारगळला. कारण पडद्यावर कुणाचं नाव आधी झळकणार हा प्रश्न तिघांनाही पडला. तिघंही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. कुणीच माघार घ्यायला तयार नाही. मग तो चित्रपट कधीच आला नाही. या तिघांच्या इगोपुढे निरुपाय होऊन विजय आनंदने चित्रपटाचाच नाद सोडला. राजकुमार संतोषी शाहरुख आणि आमीरला घेऊन चित्रपट काढणार होता. तो डब्यात जाण्याची जी अनेक कारणं होती, त्यात श्रेयनामावली हेही एक कारण होतं.

ज्यामुळे एवढं रामायण होतं, ती श्रेयनामावली प्रेक्षकांच्या दृष्टीनं मात्र मुळीच महत्त्वाची नसते. चित्रपटाच्या सुरुवातीला येणारी श्रेयनामावली प्रेक्षक मन लावून वाचत आहेत असं चित्र कधी चित्रपटगृहात दिसत नाही. मुळात आपला प्रेक्षक चित्रपटात नायक कोण आहे हे बघून चित्रपट बघायला जायचं की नाही ते ठरवतो. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेत अजून कोण सामील आहे, याबद्दल त्याला शून्य रस असतो. काही थोड्या लोकांना नायिका, काही अल्पसंख्याना दिग्दर्शक आणि हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या लोकांना संगीत दिग्दर्शक कोण आहे याबद्दल थोडी उत्सुकता असते. संकलक, लेखक, सिनेमॅटोग्राफर या लोकांमध्ये तर कुणालाच रस नसतो. एकूणच व्यक्तिगत करिष्म्याला भुलणाऱ्या आणि सांघिक कामाबद्दल प्रचंड औदासीन्य असणाऱ्या समाजात हे स्वाभाविकच. एक पटकथालेखक म्हणून इथं हे आवर्जून नोंदवावंसं वाटतं की, मला माझ्या पटकथेत आवर्जून श्रेयनामावली कधी दाखवली जाणार  आहेत याचा उल्लेख करावा लागतो. 

श्रेयनामावलीचे दोन उपप्रकार आहेत. एक, सुरुवातीची श्रेयनामावली अर्थात ओपनिंग क्रेडिट्स, जी चित्रपटाच्या सुरुवातीला येते. त्यात फक्त प्रमुख अभिनेते आणि महत्त्वाचे तंत्रज्ञ आणि निर्माता दिग्दर्शकांची नावं असतात. दोन, शेवटी येणारी श्रेयनामावली अर्थात क्लोजिंग क्रेडिट्स. यामध्ये मात्र चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेत सामील असणाऱ्या झाडून सर्वांची नावं येतात. यात स्पॉटबॉयज, मेकअपमन, प्रकाशयोजना करणारी टीम, स्टंट टीम, सहाय्यक दिग्दर्शक अशा अनाम कलाकारांची नोंद घेतली जाते, ज्यांच्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता. मात्र ही श्रेयनामावली वाचण्याचा धीर प्रेक्षकांकडे नसतो. चित्रपट संपला आहे याची खात्री पटताच प्रेक्षक ही श्रेयनामावली चालू असतानाच बाहेर पडायला लागतात. थिएटर खाली होतं आणि पुढच्या शो साठी स्क्रीनची साफसफाई सुरू होते. अर्थात यात प्रेक्षकांना दोष देण्यात अर्थ नाही.

ही श्रेयनामावली बहुतेक वेळा इतक्या बारीक अक्षरात असते की, ती वाचताही येत नाही. मात्र श्रेयनामावली चालू असताना प्रेक्षक बाहेर पडू नयेत म्हणून निर्माता-दिग्दर्शक अनेक वेळा शक्कल लढवतात. जॅकी चेनचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना शेवटची श्रेयनामावली चालू असताना दाखवले जाणारे 'ब्लुपर सिक्वेन्स' आठवत असतील. त्यात जॅकी चेन पडद्यावर जे अचाट स्टंट करत असे, त्याची शूटिंग प्रोसेस दाखवत असत. हे स्टंट करताना जॅकी खूपदा घायाळ व्हायचा, त्याचं ऑफ द कॅमेरा फुटेज दाखवलं जायचं. प्रेक्षकाच्या एका मोठ्या वर्गाला हे 'ब्लुपर सिक्वेन्स' चित्रपटाएवढेच आवडत. मार्वलच्या सुपरहिरोंचे चित्रपट थिएटरमध्ये बघताना सच्चा मार्वल फॅन कधीच श्रेयनामावली संपेपर्यंत खुर्ची सोडत नाही. कारण श्रेयनामावली संपल्यावर सगळ्यात शेवटी चित्रपटाच्या पुढच्या भागाची हिंट देणारा एक प्रसंग दाखवला जातो, हे त्याला माहीत असतं. आपल्याकडच्या अनेक चित्रपटांमध्ये शेवटची श्रेयनामावली चालू असताना शूटिंगच्या वेळेस घडलेल्या गमतीजमती दाखवतात. रोहित शेट्टीच्या काही चित्रपटांची शेवटची श्रेयनामावली खरंच भारी होती. 

मात्र ज्याला चित्रपट मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन बघायचे आहेत, त्याने शेवटची श्रेयनामावली पूर्ण वाचूनच मग थिएटर सोडायला पाहिजे. कारण त्यातून तुम्हाला खूप नवीन गोष्टी कळतात आणि समजतात. ज्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. एका मराठी नसणाऱ्या समीक्षकाचा 'सैराट' बघतानाचा अनुभव बोलका आहे. त्यात परशाच्या वडलांच्या तोंडी जी भाषा आहे, ती पारधी आहे हे त्याला शेवटची श्रेयनामावलीमुळे कळालं. आता मला सांगा, मराठी असूनही किती लोकांना हे माहीत होतं? प्रामाणिकपणे सांगायचं तर मलाही माहीत नव्हतं. त्या समीक्षकाची फेसबुक पोस्ट वाचून मला हे कळालं.

मला वैयक्तिकपणे याचा फायदा झाला आहे. हॉलिवुड अॅनिमेशनपटांची श्रेयनामावली काळजीपूर्वक वाचली तर त्यातला भारतीय तंत्रज्ञांचा वाटा किती मोठा आहे हे कळतं. हॉलिवुडचे कार्टूनपट ते लोक एवढे भारी कसे करतात आणि आपल्या लोकांना बापजन्मी हे जमणं शक्य कसं नाही, अशा हवेतल्या गप्पा मी मारायचो. नंतर श्रेयनामावली काळजीपूर्वक वाचण्याची सवय लावून घेतल्यावर मला लक्षात यायला लागलं की, भारतीय लोकांचा यात सिंहाचा वाटा आहे. असे अनेक गैरसमज श्रेयनामावली वाचण्यामुळे दूर होतात.

शेवटची श्रेयनामावली वाचणे हा चित्रपटनिर्मितीचा छोटा क्रॅश कोर्स असतो. चित्रपटनिर्मितीत कोण कोण सहभागी असतात याचा अंदाज आपल्याला येतो. चित्रपटाची सलगता वा 'कंटिन्यूटी' बघणारे लोक असतात. त्यांचं काम फक्त दृश्यसातत्य कायम आहे ना हे बघणं असतं. म्हणजे नायकाने एका प्रसंगात खिशात गुलाबाचे फुल खोवले आहे असं दाखवलं आहे आणि त्याच प्रसंगाच्या दुसऱ्या शॉटमध्ये जर खिशात फुल नसेल तर ते प्रेक्षकांच्या नजरेला लगेच खटकतं. तर अशी चूक होऊ नये याची काळजी 'कंटिन्यूटी'कडे लक्ष ठेवणारी माणसं करत असतात.

असे अक्षरशः शेकडो विभाग आणि लोक चित्रपटनिर्मितीत गुंतलेले असतात. त्याची कल्पना शेवटची श्रेयनामावली वाचून येते. एका परिणामकारक चित्रपटाचा सुन्न करणारा शेवटाचा प्रभाव शेवटच्या श्रेयनामावलीमुळे वाढतो. अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे'मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट होतात आणि चित्रपट त्या सुन्न करणाऱ्या नोटवर संपून इंडियन ओशनच्या 'अरे रुक जा रे बंदे' या आर्त गाण्याचे सूर कानावर पडायला लागतात. ते सूर चित्रपटाला अजून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात असं मला तरी वाटतं. ‘सैराट’च्या हादरवून टाकणाऱ्या शेवटानंतर येणारी श्रेयनामावली चित्रपटाच्या परिणामकारकतेमध्ये भर टाकते. 

भारतीय दिग्दर्शकांपुरतं बोलायचं झालं तर मला अब्बास मस्तान ज्या स्टाईलीशपणे श्रेयनामावली दाखवतात ते भारी वाटतं. भारतीय समाजाप्रमाणेच पुरुषप्रधान असणाऱ्या बॉलिवुडमध्ये सध्या श्रेयनामावलीच्या बाबतीत खरंच काही छान प्रयोग होत आहेत. 'पिंक'मध्ये अमिताभ बच्चनचं नाव जेव्हा तीन अभिनेत्रींनंतर झळकलं तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हा चित्रपट महिलांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणतो. त्यातल्या तिन्ही महिला व्यक्तिरेखा या अतिशय सशक्त आहेत. याची जाणीव ठेवून अमिताभ बच्चन यांनी हा मनाचा मोठेपणा दाखवला. 'चेन्नई एक्स्प्रेस'पासून शाहरुख खान नायिकांचा नामोल्लेख पहिल्यांदा येण्यासाठी आग्रही असतो. 'चेन्नई एक्स्प्रेस'नंतरच्या त्याच्या प्रत्येक चित्रपटात नायिकेचं नाव आधी झळकतं आणि मग शाहरुखच नाव येतं. आपलं सुपरस्टारडम आणि इगो बाजूला ठेवण्याचं श्रेय शाहरुखला द्यावंच लागतं.

अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मानधनात मोठी विषमता आहे. अगदी हॉलिवुडमध्येही. टेनिसमध्ये पुरुष खेळाडूंना मिळणारी प्राईज मनी जास्त असते. या विषयावर वेगवेगळी मतं असू शकतात पण श्रेयनामावलीमध्ये बॅकसीटवर जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल बच्चन आणि शाहरुख यांचं अभिनंदन करावं लागेल.

मी काही दिवसांपूर्वी 'ट्रॅपड' चित्रपट थिएटरमध्ये पाहिला. नेहमीप्रमाणं चित्रपट बघायला आलेलं लोक शेवटची श्रेयनामावली सुरू झाली की बाहेर पडायला लागली. थोड्या वेळात मी एकटाच उरलो थिएटरमध्ये. त्याची साफसफाई करणारी टीम आत आली. मी जागचा हलत नाहीये हे पाहून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. मी त्यांच्या कामात अडथळा होतो हे उघड होतं. शेवटची श्रेयनामावली चालू असताना थिएटरची साफसफाई करून पुढच्या शो साठी चित्रपटगृह सज्ज करणं हा त्यांचा रिवाज होता. त्यांच्या देहबोलीवरून आणि नेत्रपल्लवीवरून त्यांना मी तिथं नको होतो हे उघड होतं. कदाचित जास्तीत जास्त प्रेक्षक शेवटची श्रेयनामावली संपेपर्यंत थांबायला लागतील, तेव्हा या परिस्थितीत फरक पडेल. त्यामुळे यापुढे चित्रपट बघाल तेव्हा शेवटची श्रेयनामावली काळजीपूर्वक वाचूनच थिएटर सोडा. या छोट्या कृतीमुळे तुमच्या चित्रपटनिर्मितीच्या ज्ञानात भर पडेलच, शिवाय चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत सामील असणाऱ्या शेकडो पडद्याआडच्या लोकांचीही नोंद घेतली जाईल. विन-विन सिच्युएशन!

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......