प्रयोगसिद्ध गानपरंपरांचा मागोवा
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • ‘मला भावलेले संगीतकार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि डॉ. अशोक रानडे
  • Sat , 22 April 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe अशोक रानडे Ashok Ranade मला भावलेले संगीतकार Mala Bhavlele Sangeetkar कुमार गंधर्व Kumar Gandharva किशोरी आमोणकर Kishori Amonkar

आपण वाचक आहातच, संगीतही आपण ऐकत असालच. शास्त्रीय संगीताचे आपण निष्ठावान श्रोते व्हावे एवढाच माझ्या आजवरच्या कटकटीचा हेतू होता. तुम्हाला काही सांगण्याचा आव आणून मी मलाच अनेक प्रश्न विचारतो, चिंतन करतो, Loud Thinking करतो. सुटकेचा श्वास सोडू नका. अजूनही हे सगळं करत राहणार आहे. आज ही प्रस्तावना करण्याचं कारण वेगळं आहे. सुप्रसिद्ध आधुनिक संगीतशास्त्री पं. अशोक दा. रानडे यांचं ‘मला भावलेले संगीतकार’ हे ते पुस्तक. या पुस्तकाविषयीची माझी निरीक्षणं पुढे नोंदवलीच आहेत, पण हा परिचय वाचण्यापूर्वी चार शब्द. संगीत ही श्राव्य कला आहे. म्हणून संगीतकलेच्या आस्वादासाठी श्रवणाला पर्याय नाहीच. हे श्रवण सहज, जमेल तसं, केवळ आनंदासाठी, गायक-वादक कोण, राग कोणता, अशा कोणत्याही प्रश्नात न पडता करता येतं. अशा श्रवणाचं महत्त्व खूप आहे. यापुढे जाऊन अभ्यास म्हणून, थोडी शिस्त लावून घेऊन श्रवण करता येतं. संगीतविषयक साहित्याचं वाचनही अभिरूची संवर्धनासाठी महत्त्वाचं आहे. संगीतविषयक लेखन मराठी भाषेत विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. ते सगळंच सारखंच महत्त्वाचं, सारख्याच दर्जाचं अर्थातच नसणार. संगीतविषयक लेखनात रोमँटिक (शृंगारिक!), स्वप्नाळू, भासमय शास्त्रीय अशा प्रकारच्या लेखनाची मुळीच कमतरता नाही. आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, हे ज्यांना नक्की माहीत असतं असे लेखक थोडे. आपल्यापेक्षा आपला विषय महत्त्वाचा, या गोष्टीचं भान असणारे लेखक त्याहूनही कमी. डॉ. अशोक दा. रानडे हे अभ्यासाची व्यापक पार्श्वभूमी असलेले अत्यंत विश्वासार्ह लेखक. संगीतविषयक लेखनाचा वाचक म्हणून एखाद्याची जडणघडण करणारे लेखक. तर सध्या एवढी प्रस्तावना पुरे. संगीतकला व्यवहारात लेखन-वाचनाचं काम काय, याविषयी विचार करायचा आहे, पण तो पुन्हा कधीतरी.

डॉ. अशोक दा. रानडे

डॉ. अशोक दा. रानडे यांचं ‘मला भावलेले संगीतकार’ हे पुस्तक त्यांच्या सर्व गुणवैशिष्ट्यांत एका आगळ्या रसाळपणाची भर घालणारं आहे. या पुस्तकात १९ संगीतकारांविषयी (शास्त्रीय गायक\गायिकांविषयी) त्यांनी लिहिलं आहे. प्रत्येक गवयाचा आपल्या विषयाच्या दृष्टीनं संबद्ध असा जीवनपट दिला आहे. १९२६ ते १९९७ या काळातले हे सर्व गायक (गायिका) आहेत. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, किराणा, पतियाळा या घराण्यांच्या या मातब्बर गवयांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनावर आपला ठसा उमटवलेला आहे.

या महान लोकप्रिय गवयांचे गोडवे गाणे हा मात्र या लेखनामागचा हेतू नाही. विभूतीविषयांच्या लेखनात सामान्यत: आढळणारे दोष - व्यक्तिपूजा, अतिशयोक्ती, परनिंदा आणि भोंगळपणा - हे या लेखनात असूच शकत नव्हते. तटस्थपणे आणि संवेदनशीलतेनं या महान विभूतांच्या कला आणि कार्याचं मूल्यमापन रानड्यांनी केलं आहे. अपयश किंवा मर्यादांविषयी स्पष्ट विधान करत असताना कुठेही अधिक्षेप होत नाही, एवढी सर्वंकष कृतज्ञता रानड्यांच्या मनात या सर्वच कलाकारांविषयी आहे, हे नक्की जाणवतं. ही कृतज्ञता केवळ वैयक्तिक पातळीवरची नाही, तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या आजच्या रसिकाची आणि अभ्यासकांची, या संगीत परंपरेला समृद्ध बनवणाऱ्या प्रतिभावंताबद्दल असणारी प्रातिनिधिक कृतज्ञता आहे, म्हणून ती व्यापक आणि डोळस आहे.

“अतिशय मोठ्या आवाक्याच्या, संपन्न, अनन्यसाधारण स्वरूपाच्या आणि अनेक जीवनक्षेत्रांत वावरणाऱ्या मौखिक व प्रयोगसिद्ध परंपरा’’ हा (निदान शास्त्रीय संगीतक्षेत्रात) अतिशय महत्त्वाचा ‘ज्ञानाचा स्रोत’ आहे. “वेगवेगळ्या कलाकारांनी निर्माण केलेले संगीत अभ्यासणे व तपासणे” हा या स्रोताचा लाभ घेण्याचा ‘राजमार्ग’ आहे. (अवतरणातील शब्द रानड्यांच्या प्राक्कथनातले!) सोप्या भाषेत सांगायचं तर, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा (१८८० ते १९४०) ऐतिहासिक मागोवा घ्यायचा झाला तर केवळ ग्रंथ वाचणं पुरेसं ठरणार नाही. तो काळ ज्यांनी घडवला, त्या कलाकारांचं संगीत अभ्यासलं पाहिजे. सुदैवानं या काळातील अनेक महत्त्वाच्या कलाकारांचं संगीत ध्वनिमुद्रित स्वरूपात, त्रोटकपणे का होईना उपलब्ध आहे. या संगीतविचारांचा, धारणांचा मागोवा घेऊन ते समजून घेण्यामध्ये रानड्यांचं प्रस्तुत लेखन महत्त्वाची भूमिका पार पाडेल यात संशय नाही.

उस्ताद अब्दुल करीम खान

किराणा घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खान (१८७२-१९३७) यांच्या उपलब्ध ध्वनिमुद्रिकांतील (७८ आरपीएम) सहा प्रस्तुतींचं रसग्रहण रानड्यांनी विशेष समरसतेनं केलं आहे. पुस्तकाचं परिशिष्ट म्हणून किरणा घराण्याच्या सवाई गंधर्व, रोशन आरा बेगम, फिरोज दस्तूर व गंगूबाई हनगल या दुसऱ्या पिढीच्या चार कलाकारांविषयी लिहिलं आहे. त्यांच्याच शब्दांत - ‘गुलचट लालित्य व कोरडे पांडित्य या दोहोंचा धोका टाळण्याचा प्रयास’ त्यांनी केला आहे. या कलाकारांनी गायलेल्या व खास संदर्भाच्या कोंदणात ऐकण्यासारख्या ध्वनिमुद्रित संगीताचं हे सुबोध परीक्षण आहे. या खेरीज पं. जगन्नाथ बुवा पुरोहित (गुणीदास) यांची राग जोगकंसमधील ‘पीर पराई’ ही बंदिश घेऊन त्यांच्या रचनाकौशल्याविषयी तपशीलवार चर्चा रानड्यांनी केली आहे. ही बंदिश माणिक वर्मांच्या आवाजात ध्वनिमुद्रिका स्वरूपात उपलब्ध आहे. (या चर्चेसोबत ‘पीर पराई’ बंदिशीचं स्वरलेखन दिलं असतं तर आकलन अधिक सुलभ व संपूर्ण होऊ शकलं असतं.) खुद्द माणिक वर्मांच्या गायनशैलीचं उदाहरण म्हणून त्यांच्या भटियार रागातील ध्वनिमुद्रणाचं त्रोटक रसग्रहण दिलं आहे.

या पुस्तकातील सर्वांत दीर्घ-तपशीलवार व सांगोपांग-लेख आहे तो कुमार गंधर्वांवरचा. या (४७ पानी) लेखात कुमारांच्या एका मैफलीचं रसग्रहण आहे. कुमारांच्या जवळपास सर्व सांगीतिक प्रयोगांच्या प्रथम प्रस्तुतीचं त्या-त्या वेळी रानड्यांनी केलेलं रसग्रहण (डिसेंबर १९६६ ते जुलै १९७१मधील प्रस्तुतींचं रसग्रहण व प्रयोगांचं मूल्यमापन) आहे.

कुमार गंधर्व

संगीतकलेचा अभ्यास क्रियात्मक संगीताच्या परिघात राहून तंत्रदृष्ट्या करणं कलाकारासाठी अनिवार्य आहे आणि कदाचित पुरेसंही; परंतु संगीतकला हा संस्कृतीचा एक घटक म्हणून अभ्यासताना संगीतकलेच्या क्रियात्मक परिघाबाहेरून संगीताकडे पाहणं आवश्यक आहे. संगीतात होणारे बदल, त्यांची इष्टता, संगीत जतन व संवर्धनासाठीच्या प्रयत्नांची दिशा, संगीताच्या मूल्यमापनाचे निकष या आणि अशा बाबींचा विचार करताना ही परिघाबाहेरची निरीक्षकाची जागा महत्त्वाची ठरते. अर्थात परिघात काय घडतं आहे, हे समजण्याची व त्याचा अन्वय लावण्याची कुवतही निरीक्षकाजवळ असावी लागते. या दोन्ही पातळ्यांवर कलाकारांचं त्यांनी केलेलं मूल्यमापन लक्षणीय आहे. प्रस्तुत लेखनातून रानड्यांनी अंगिकारलेली मूल्यमापन-निकषांची एक सारणी हाती लागते.

हे लेखन करताना रानड्यांनी काळाचं भान सतत ठेवलं आहे आणि आपल्या खास शैलीत ते सतत वाचकालाही दिलं आहे. पुस्तकातील लेखांचा क्रमही कलाकाराच्या जन्म व कार्यकालाच्या क्रमाने (पं. भातखंडे-१८६० ते माणिक वर्मा - १९२६) ठेवला आहे. कलाकारांच्या कलाविषयक धारणांचा मागोवा घेताना, त्याच्या कलाकर्तृत्वाचं मूल्यमापन करताना संगीत रसग्रहणातील अगदी मूलभूत प्रश्नांना रानड्यांनी सहज हात घातला आहे. या संदर्भात संगीत मार्तंड ओंकारनाथ ठाकूर यांच्याविषयीचा लेख विशेष लक्षणीय आहे.

संगीत मार्तंड ओंकारनाथ ठाकूर

सर्वसाधारणपणे गायन\वादनाविषयी लिहिताना ‘सुंदर’, ‘अप्रतिम’, ‘अवीट गोड’, ‘दिव्य’ अशा विशेषणांमध्ये वर्णन संपून जातं. पण ‘म्हणजे काय?’ हा प्रश्न उरतोच. रानड्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यात काही एक यश मिळवलं आहे. अलंकारिक, लालित्यपूर्ण, संपूर्णपणे व्यक्तिनिष्ठ अशा उद्गारांतून लेखकाची लेखनवस्तूविषयीची (म्हणजे इथं गायनाविषयीची) भावना लक्षात येते, परंतु विश्लेषण होऊ शकत नाही. म्हणूनच रानड्यांना ‘गुळचट लालित्य’ वर्ज्य आहे. तरीही आपल्या काही संकल्पना आणि संज्ञा त्यांनी थोड्या अधिक स्पष्ट केल्या असत्या - अगदी अपरिहार्य म्हणून ललित अंगानेही, तर अधिक बरं झालं असतं.

‘मला भावलेले संगीतकार’ म्हणताना केवळ गायक कलाकारांचा समावेश पुस्तकात आहे, वादकांचा नाही. ‘उत्तम गायन, मध्यम वादन…’ असं ब्रीद रानडे मानत असतील असं वाटत नाही. वादक कलाकारांविषयी न लिहिण्याचं कुठे स्पष्टीकरणही दिलेलं नाही! पुन्हा ‘मला भावलेले...’ म्हटलं की विवाद होऊ शकत नाही. हे ‘भावणं’ मात्र प्रत्येक वेळी अधोरेखित झालं आहे, असं नाही. १९ आणि परिशिष्टातील ४ अशा एकूण २३ कलाकारांपैकी सर्व निवर्तलेले. हिंदुस्थानी ख्याल गायकीवर ज्यांचा दूरगामी सार्वत्रिक प्रभाव दिसतो, त्या उस्ताद अमीर खानसाहेबांना या पुस्तकात स्थान नसावं याचं आश्चर्य वाटतं. असाच सार्वत्रिक प्रभाव असणारं स्त्री व्यक्तिमत्त्व म्हणजे किशोरी आमोणकर. त्यांच्यावर लिहिण्याची कदाचित वेळ झाली नसेल!

या पुस्तकाच्या मध्यवर्ती कल्पनेत न बसणारे दोन लेख पुस्तकात शेवटी परिशिष्टात आहेत - ‘एक गुरूचे होणे’ व ‘आठवणी : काही कल्पित, काही सत्य’. दोन्ही लेख सर्जनशील लेखनाचे छोटेखानी पण उत्तम नमुने आहेत. रानड्यांचे तीर्थरूप दामोदर रानडे आणि गुरू पं. गजाननबुवा जोशी या दोघांचा काळ, बालपण, बालपणातील सांगलीतील वास्तव्य, जीवनदृष्टी यांतील लक्षणीय साम्य टिपत असतानाच महाराष्ट्रातील त्या काळाची नाडी (स्पंदन) रानड्यांनी वाचकाला जाणवून दिली आहे. दोघांचा अकृत्रिम स्नेह अत्यंत साध्या शब्दांत, पण त्या स्नेहाच्या संपूर्ण हृद्य स्वरूपात केवळ काही ओळींत रानड्यांनी उभा केला आहे.

‘भावलेल्या संगीतकारांचे ऋण अंशत: तरी फेडण्याचा प्रयत्न म्हणजे या लेखांचा प्रपंच’ असं रानडे म्हणतात. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा रसिक या लेखांबद्दल रानड्यांचा सदैव ऋणी राहील. हे लेख संपूर्णत: समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं यातूनच रसिकांची त्या ऋणाची अंशत: फेड होईल.

लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......