रूपांतर : श्रीनिवास जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अंक पहिला (उत्तरार्ध)
मनू - हवा छान आहे नाही आज?
शाल्मली - हो नं….(पॉज घेते. मग अचानक) ए आणि हवापाण्याच्या गप्पा मारायला लागलं कोणी की, मला अस्वस्थ होतं सत्यशील.
मनू - का ग?
शाल्मली - मला संशय यायला लागतो की, याला दुसरंच काही तरी बोलायचंय म्हणून. खूप नर्व्हस वाटायला लागतं मग मला.
मनू - खरंय तुझं. मला दुसरंच काहीतरी बोलायचंय तुझ्याशी.
शाल्मली - वाटलंच मला.
मनू - मावशी यायच्या आत बोलून घेतो मी.
शाल्मली - हो, लवकर बोलून घे. पटकन् परत यायची खोड आहे तिला. इतकी पटकन् परत येते नं ती. मी इतक्या वेळेला बोललेय तिला त्याबद्दल. पण ऐकतच नाही ती.
मनू - (नर्व्हस झालेला) शाल्मली...जेव्हापासून मी तुला पाहिलंय त्या क्षणापासून ह्या जगात तुझ्यापेक्षा कुणी सुंदर आहे, असं वाटेनासं झालंय मला... मी जेव्हापासून तुला भेटलोय... म्हणजे मला म्हणायचंय की...
शाल्मली - माझ्या लक्षात आलंय ते! माझ्याच काय पण सगळ्यांच्याच लक्षात आलंय ते तुझ्या वागण्यामुळं. मला तर आपण भेटलो नव्हतो, तेव्हापासूनच आवडतोयस तू मला.
मनू - (गोंधळलेला.) भेटलो नव्हतो आपण तेव्हापासून आवडतोय मी तुला?
शाल्मली - आपण एका आदर्शवादाने भारावून गेलेल्या जगात राहतो आहोत, हे तुला माहीतच असेल सत्यशील. सगळे टीव्ही निरनिराळ्या आदर्शांच्याच चर्चा करत असतात आजकाल! त्यामुळंच आदर्श नाव असललेल्या माणसाच्या प्रेमात आपण पडायचं असं मी ठरवूनच टाकलं होतं! अगदी खरं सांगायचं तर समीरदादानं त्याच्या एका मित्राचं नाव सत्यशील आहे असं सांगितलं, त्या वेळीच प्रेमात पडले मी सत्यशील या नावाच्या आणि म्हणून सत्यशीलच्या. मला नाव खूप आवडलं तुझं. त्या नावातच काहीतरी जादू आहे. एक विश्वास तयार होतो आपल्या मनात त्या नावामुळं.
मनू - खरंच तुझं प्रेम आहे माझ्यावर शाल्मली?
शाल्मली - अगदी मनापासून.
मनू - तुला कळूच शकणार नाही, मला किती आनंद झाला आहे तो.
शाल्मली - सत्यशील, ह्या क्षणापासून तू, माझा सत्यशील आहेस.
मनू - जर माझं नाव सत्यशील नसतं, तर तू माझ्यावर खरंच प्रेम केलं नसतंस?
शाल्मली - पण तुझं नाव खरंच सत्यशील आहे.
मनू - बरोबर आहे तुझं, माझं नाव सत्यशीलच आहे. पण समज जर ते दुसरं कुठलं तरी असतं तर? तू खरंच माझ्यावर प्रेम केलं नसतंस?
शाल्मली - अरे, काल्पनिक प्रश्न आहे हा. काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देत बसायचं नसतं.
मनू - अगदी खरं बोलायचं तर... मला सत्यशील हे नाव आवडत नाही. मला शोभूनही दिसत नाही ते.
शाल्मली - नाही, नाही. ते तुझ्यासाठीच तयार झालेलं नाव असावं इतकं ते तुला सूट होतंय. शिवाय सत्यशीलमध्ये एक लय आहे... एक म्युझिक लपलंय त्यात... हे नाव ऐकलं की, सुंदर व्हायब्रेशन्स तयार होतात! (स्वप्निलपणे) सत्यशील....
मनू - शाल्मली... खरं तर सत्यशील ह्या नावापेक्षा कितीतरी सुंदर नावं आहेत जगात. उदाहरणार्थ- मनस्विन... किती गोड नाव आहे हे...
शाल्मली - मनस्विन?... म्हणजे त्याचा शॉर्टफॉर्म मनू होणार... ह्या नावात काही संगीतच नाहीये.
मनू - सत्यशीलचा शॉर्टफॉर्मसुद्धा फार काही चांगला होत नाही.
शाल्मली - न होऊ देत... पण मनस्विन ह्या नावात काहीच थ्रिल नाहीये. एकही व्हायब्रेशन येत नाही त्यातून. ज्या बाईचं लग्नं मनू नावाच्या माणसाशी होतं ना, तिची खूप दया येते मला. घरकोंबड्या नवऱ्याचं नाव वाटतं नाही हे? मनूच्या बायकोला घरात एकटं राहण्याचा आनंदच मिळत नसणार असं वाटत राहतं मला.
मनू - शाल्मली, मला नाव बदलायला लागणार पटकन्... म्हणजे मला म्हणायचंय की, लवकरात लवकर लग्न करून टाकायला पाहिजे आपल्याला.
शाल्मली - लग्न? लगेच?
मनू - (गोंधळलेला) हं, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की... म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि तूच असं म्हणालीस की... तुलाही मी अजिबात अवडत नाही असं काही नाहीये...
शाल्मली - हो, मग आहेच माझं तुझ्यावर प्रेम. खूप आवडतोस तू मला.
मनू - मग?
शाल्मली - अरे, पण तू प्रपोज कुठं केलंयस मला अजून? लग्नाचं विचारलंयस का तू मला? तू विषयसुद्धा काढला नाहीयेस अजून तो.
मनू - मी आत्ता प्रपोज करू का तुला?
शाल्मली - जरूर कर. मला विचारशील तर खूप ग्रेट संधी आहे ही तुला. आणि तुला भीती वाटत असेल सत्यशील की, मी तुला नाही वगैरे म्हणेन... तर त्याची चिंता करू नकोस. अगदी स्पष्टच बोलायचं तर, मी तुला ‘हो’ म्हणणार आहे. आय स्वेअर!
मनू - शाल्मली!
शाल्मली - बोल सत्यशील. काय विचारायचंय तुला ते विचार.
मनू - तुला माहिती आहे मला काय विचारायचं आहे तुला.
शाल्मली - हो, पण तू विचारलं नाहीयेस अजून.
मनू - शाल्मली, तू लग्न करशील माझ्याशी? (तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो)
शाल्मली - हो, सत्यशील नक्की करेन. ए किती दिवस विचारायचं होतं नाही तुला! तुला प्रपोज करायचा अजिबात अनुभव नाहीये, हे कळत होतं मला.
मनू - शाल्मली! मी ह्या जगात तुझ्याशिवाय दुसऱ्या मुलीवर प्रेमच केलेलं नाहीये.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शाल्मली - अरे, प्रेम नाही म्हणून प्रपोज करायचं नाही असं काही नसतं. काही पुरुष फक्त प्रॅक्टिस असावी म्हणून प्रपोज करतात. माझा भाऊ आहे नं अमित, तो तर फक्त प्रॅक्टिस असावी म्हणून प्रपोज करत असतो मुलींना. माझ्या मैत्रिणी सांगत असतात मला. (सत्यशीलकडे बघत) ए तुझे डोळे किती छान आहेत सत्यशील! किती काळेभोर आहेत! तू माझ्याकडं असंच बघत राहावं असं वाटतंय मला. आजूबाजूला माझ्या मैत्रिणी असताना तू असं बघत राहशील ना माझ्याकडं?
संगीता - (अचानक येत) सत्यशील, ऊठ तू. असा कसा अर्धवट खाली बसला आहेस. असं बसतात का कधी?
शाल्मली - ममा! (मनू उठायचा प्रयत्न करतो; ती त्याला खाली दाबून ठेवते) ममा, प्लीज तू जा इथून. अशा वेळी अचानक येणं शोभून दिसत नाही कुठल्याही आईला. आणि आमचं बोलून व्हायचंय अजून.
संगीता - काय बोलून व्हायचंय?
शाल्मली - मी आणि सत्यशील लग्न करणार आहोत. (दोघंही उठतात).
संगीता - सॉरी शाल्मली, तुझं लग्न अजून ठरलेलं नाहीये. जेव्हा तुझं लग्न ठरेल, तेव्हा, मी किंवा तुझे पपा, तुला सांगू तसं. कुठल्याही मुलीला तिचं लग्न ठरल्याची बातमी एक सरप्राईज म्हणून द्यायची असते. प्लेझंट ऑर अन्- प्लेझंट!
शाल्मली - ममा!
संगीता - मुलींना त्यांची लग्न ठरवू देणं अतिशय धोकादायक असतं शाल्मली! ...आणि मि. सत्यशील खरे, मला तुमच्याशी काही बोलायचंय. शाल्मली, मला सत्यशील खरे ह्यांच्याशी बोलायचं आहे, तू कारमध्ये जाऊन बस.
शाल्मली - ममा!
संगीता - तू कारमध्ये जाऊन बस शाल्मली! (शाल्मली दाराकडे जाते. संगीतामावशीच्या पाठीमागून मनू आणि शाल्मली एकमेकांना फ्लाइंग किस देतात. किसचा आवाज आल्यावर संगीतामावशी मागं वळते. तिला कसला आवाज आलाय ते कळलेलंच नाहीये. ती परत शाल्मलीकडे वळते.) कसला आवाज आला?
शाल्मली - नाही, मला नाही ऐकू आलं काही.
संगीता - बरं, तू कारमध्ये जाऊन बस.
शाल्मली - हो ममा. (मनूकडे बघत बाहेर जाते)
संगीता - (सोफ्यावर बसत) तुम्ही बसू शकता श्री. सत्यशील खरे. (तिच्या पर्समधून एक वही आणि पेन्सिल काढते)
मनू - मी उभाच ठीक आहे.
संगीता - (वही उघडून) मला तुम्हाला एक सांगायचं मिस्टर खरे. माझ्या एलिजिबल बॅचलर्सच्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाहीये. अर्थात् ह्या लिस्टमध्ये तुमचं नाव घालायला माझी काही हरकत नाहीये. पण त्यापूर्वी, एका प्रेमळ आईचं कर्तव्य म्हणून मला तुम्हाला काही प्रश्न विचारला लागणार आहेत... तुम्ही स्मोक करता का?
मनू - अगदी खरं सांगायचं तर हो.
संगीता - ऐकून बरं वाटलं मला. पुरुषानं कसल्या ना कसल्या उद्योगात असावं नेहमी. समाजात पैसा वाढला, तसं अनेक निरुद्योगी पुरुषांचं प्रमाण खूप वाढलंय आपल्या समाजात आजकाल. उद्योगातून संपत्ती आणि संपत्तीतून निरुद्योग हे खरं ठरतंय आपल्या समाजात... बरं आपलं वय काय आहे?
मनू - एकोणतीस.
संगीता - लग्नाला अत्यंत योग्य असं वय आहे. काय आहे, माझं पहिल्यापासून मत आहे की, ज्या पुरुषाला लग्न करायचं आहे, त्याला एकतर ह्या जगातलं सगळं माहीत असावं किंवा काहीही माहीत असावं. तर आता मला एक सांगा, ‘सगळं’ आणि ‘काहीच नाही’ ह्यातलं काय माहीत आहे तुम्हाला?
मनू - (थोडा विचार करून) या जगाविषयी काहीही माहिती नाहिये मला.
संगीता - छान! बरं वाटलं ऐकून. किती निर्मळ असतात नाही ह्या जगाविषयी संपूर्ण अज्ञान असलेले लोक! अज्ञान हे एखाद्या ताज्या फुलासारखं असतं. त्याला हात लावा आणि त्याचा ताजेपणा निघून जातो. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, महाराष्ट्रातल्या आजकालच्या शिक्षणामुळं लोकांच्या अज्ञानाला अजिबात धक्का लागत नाहीये. कॉलेज आणि युनिव्हसिर्टीच्या धकाधकीतून अनेक विद्यार्थी ताज्या फुलासारखेच बाहेर पडतात. बरं आपलं इन्कम काय?
मनू - आठ ते दहा लाख रुपये महिना.
संगीता - (वहीमध्ये लिहून घेते.) तुमचा धंदा आहे की नोकरी?
मनू - इन्व्हेस्टमेंटस करतो मी. प्रॉपर्टीज आणि शेअर्स.
संगीता - गुड! पैसे लावून धंदा करण्यापेक्षा, धंदा करणाऱ्यांवर पैसे लावणे जास्त चांगलं नाही का? त्यामुळं धंद्यासारख्या वेळखाऊ गोष्टींवर लक्ष देण्याची गरज राहत नाही. सगळं लक्ष पैसे वाढण्यावर पाहिजे. धंद्यावर लक्ष ठेवायचं म्हटलं तर शक्य नाही होत ते. बरं, प्रॉपर्टीज म्हणजे काय करता आपण? स्वतः बिल्डिंग्ज बांधता की, लँडमध्ये पैसे गुंतवता?
मनू - नाही, बिल्डिंग्ज नाही बांधत मी. लॅन्ड घेतो आणि विकतो काही काळानंतर.
संगीता - एक्सलंट. बिल्डिंग्जची डिमांड कमी-जास्त होऊ शकते, जमिनीची वाढतच राहते. स्मार्ट इनफ यू आर मि. खरे!
मनू - आमची काही शेती आहे, पण मी तिकडं जात नाही. चराऊ कुरण म्हणूनच गावातले लोक वापरतात आमची शेतजमीन.
संगीता - गुड! शेतीवर पैसा खर्च करण्यापेक्षा, बाजारातल्या भाज्यांवरच पैसा खर्च करणं योग्य.
मनू - माझा पुण्याला एक बंगला आहे.
संगीता - किती बेडरूमचा? बरं, ते राहू दे आत्ता. अशा गोष्टी नंतर क्लिअर करून घेतल्या जाऊ शकतात.
संगीता - तुमचं मुंबईत घर आहे ना? कारण शाल्मली अगदी सरळ आणि साधी मुलगी आहे. ती पुण्यात टिकाव धरू शकणार नाही, हे तुम्हीही मान्य कराल.
मनू - माझा पार्ल्यात फ्लॅट आहे. तो एका मध्यमवयीन डॉक्टरबाईंना दिला आहे भाड्यानं. डॉ. सरिता नाईक.
संगीता - डॉ. सरिता नाईक?
मनू - मध्यमवयीन आहेत त्या.
संगीता - हं. बाई मध्यमवयीन आहे, म्हणजे ती चारित्र्यवान असेलच असं काही उरलं नाहीये आजकाल आपल्या समाजात! बरं कुठं आहे फ्लॅट पार्ल्यात तुमचा.
मनू - हनुमान रोड. पार्ला ईस्ट.
संगीता - (निराशेने मान हलवत) म्हणजे पार्ल्याची अन्-फॅशनेबल साईड आहे! अर्थात लग्न ठरलं तर ते चेंज करता येईल.
मनू - काय चेंज करता येईल? फॅशन का साईड?
संगीता - (कठोरपणे) तशीच वेळ आली, तर दोन्ही चेंज करावं लागेल मि. खरे...
मनू - हो.
संगीता - मला एक सांगा, तुमची राजकीय मतं काय आहेत?
मनू - खरं तर, मला फार रस नाहीये राजकारणात, पण मी लिबरल डेमॉक्रॅट आहे.
संगीता - (लिहीत) म्हणजे समाजवादीच. ताजमधल्या पार्ट्यांना भेटतात हे लोक मला... बरं आता, काही चिल्लर गोष्टी क्लिअर करून घेऊ... तुमचे आई-वडील जिवंत आहेत का?
मनू - आय हॅव लॉस्ट बोथ ऑफ माय पेरेंटस्.
संगीता - दोन्ही पेरेंटस् लूज केले तुम्ही? असे कसे लूज केलेत?
मनू - देवाची इच्छा दुसरं काय?
संगीता - आई-वडिलांमधलं कोणीतरी एक गेलं, तर समजू शकतो आपण. देवाची इच्छा म्हणून सोडूनही देऊ शकतो. पण तुमचे दोन्ही पेरेंटस् गेले. जरा निष्काळजीपणाचंच नाही का वाटत तुम्हाला हे? बरं तुमचे वडील कोण होते? ते श्रीमंत असणार हे उघडच आहे. त्यांनी कष्ट करून पैसा मिळवला होता की, वडिलार्जित संपत्ती मिळाली होती त्यांना.
मनू - मला खरंच माहिती नाहिये. अगदी खरं सांगायचं तर - आय हॅव लॉस्ट माय पेरंट - ह्याचा अर्थ, माझे आईवडील ‘गेले’ असा घेण्यापेक्षा, ते ‘हरवले’, असाच घेणं योग्य होईल. फार तर- दे लॉस्ट मी- असा घ्या हवा तर. माझे खरे आई-वडील कोण आहेत हे माहीत नाहीये मला... माझा ‘जन्म झाला’, असं म्हणण्यापेक्षा, ‘मी सापडलो’ असं म्हणणं जास्त योग्य होईल.
संगीता - तुम्ही जन्मलेला नाहीत? सापडलायत?
मनू - रंगराव काळे नावच्या गृहस्थांना मी सापडलो आहे. अतिशय प्रेमळ होते रंगराव काळे. त्यांनीच माझं नाव सत्यशील असं ठेवलं आणि माझं आडनावही ‘खरे’ असं ठेवलं.
संगीता - ह्या अतिशय प्रेमळ अशा रंगराव काळ्यांना तुम्ही कुठं सापडलात?
मनू - एका पिशवीत.
संगीता - एका पिशवीत?
मनू - हो पिशवीत. हॅन्ड-बॅग म्हणा हवं तर. अगदी साध्या अशा हॅन्डबॅगेत मी सापडलो त्यांना.
संगीता - कुठल्या लोकॅलिटीत सापडलात अत्यंत साध्या अशा हॅन्ड-बॅगमध्ये त्या रंगराव की ढंगराव काळ्यांना तुम्ही?
मनू - व्हीटीच्या क्लोकरूममध्ये. म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी टर्मिनस.
संगीता - व्हीटीच्या क्लोकरूममध्ये सापडलात तुम्ही?
मनू - हो. दुसऱ्या मजल्यावरच्या क्लोकरूमध्ये.
संगीता - दुसरा मजला फारसा महत्त्वाचा नाहीये इथं सत्यशील... अगदी खरं बोलायचं, तर मी अगदी गोंधळून गेलेय. तुमचं असं हॅन्ड-बॅगमध्ये जन्मणं, किंवा सापडणं, हे एकंदरीत उच्च अभिरुचीला फारसं धरून आहे, असं मला वाटत नाहिये! तुम्हाला कुटुंबसंस्थेविषयी फारशी आस्था नाही, हेच त्यावरून दिसून येतं आपल्याला! कुटुंबसंस्था नाकारणाऱ्या ह्या असल्या प्रवृत्तीतूनच अनेक सामाजिक गोंधळ सुरू होतात. समाजवादी किंवा कम्युनिस्ट चळवळी ह्याच प्रकारातून सुरू होतात. त्यांचे परिणाम जगानं काय भोगले, ते आपण पाहिलंच आहे. तुम्ही क्लोकरूममध्ये सापडलात ह्यावरूनच समाजातील आपल्या स्थानाविषयी तुम्ही बेदरकार आहात, हेच दिसून येतं. त्यातल्या त्यात तुम्ही व्हीटीच्या क्लोकरूममध्ये सापडलात, हे चांगलं झालं. अगदीच कुर्ला टर्मिनसच्या क्लोकरूममध्ये सापडला असतात, तर फारच गोंधळ झाला असता. अगदी स्पष्टच बोलायचं, तर ह्या जगात यायचा हा हॅन्ड-बॅगेचा जो मार्ग तुम्ही स्वीकारलेला आहे, तो काही फार प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे, असं मला वाटत नाही.
मनू - बरोबर आहे तुमचं. पण मी आता काय करावं ह्याविषयी तुम्ही काही सांगाल का? शाल्मलीच्या सुखासाठी मी ह्या जगात काहीही करायला तयार आहे.
संगीता - काही नातेवाईक मिळवायचा प्रयत्न करा. एकट्या माणसाला मुलगी कशी द्यायची? आणि मुख्य म्हणजे, आई किंवा वडील मिळतील असं करा काहीतरी. एकतरी पेरेंट मुलाला असायलाच पाहिजे. कुणीही चालेल. आयदर सेक्स वुड डू. आणि मुख्य म्हणजे ह्या वर्षीचे लग्नाचे मुहूर्त संपायच्या आत करायला हवं तुम्हाला हे.
मनू - तुम्ही म्हणता ते मॅनेज करण्याचा कुठलाही मार्ग मला दिसत नाहीये. फार तर ती हॅन्ड-बॅग तुमच्यापुढं हजर करू शकतो मी. ती बॅग मी माझ्या बेडरूममध्येच ठेवलीय. जन्माचा पुरावा म्हणून तेवढी बॅग पुरेशी आहे, असं मला वाटतंय. नाही का?
संगीता - काय बोलताय काय तुम्ही? मी आणि माझे आजारी पती, अशा आम्ही दोघांनीही आमच्या मुलीला अत्यंत लाडात आणि सुसंस्कारात वाढवलेलं आहे. ह्या अशा मुलीचं सासर, एक क्लोकरूम आहे, हे आम्ही कसं मान्य करू? तुम्हाला मुलगी असती, तर तिचं लग्न क्लोकरूममधल्या एका पार्सलशी लावून दिलं असतंत का तुम्ही?... गुडबाय मि. खरे! (सात्त्विक संताप आणि आणि कमालीच्या उद्विग्नतेने निघून जाते.)
मनू - बाय. (समीर आतल्या खोलीतून लग्नाचा बँडची ट्यून लावतो. मनू संतापतो. त्या रूमच्या दारापाशी जातो) कृपा करून ती भयंकर ट्यून वाजवू नकोस समीर. तू अतिशय दुष्ट माणूस आहेस! (संगीत बंद होते. समीर अत्यंत हसऱ्या चेहऱ्याने येतो)
समीर - इतकं ओरडायला काय झालं सत्यशील? शाल्मली नाही म्हणाली का? ती तशीच आहे. कित्येक चांगल्या मुलांना नाही म्हणालीय ती. चांगलं नाही इतक्या मुलांना नाही म्हणणं. ती मुलं शहाणी होती म्हणून त्यांनी फार मनावर घेतलं नाही. एखादा सेन्सिटिव्ह मुलगा असता, तर काय झालं असतं त्याचं?
मनू - नाही नाही, शाल्मली अतिशय चांगली मुलगी आहे. मला ‘हो’ म्हणालीय ती. आम्ही एंगेज झालोय. पण तिची आई एक भयानक बाई आहे. अन्-बेअरेबल बुढिया! असली पुतनामावशी पाहिली नव्हती मी कधी! खरं तर खरी पुतनामावशी कशी होती, हे पाहिलं नाहीये मी. पण तुझ्या ह्या संगीतामावशीसारखीच दिसायला असणार ती. आय डॅम शुअर! ती खरी पुतनामावशी निदान गोष्टीत तरी होती, तुझी संगीतामावशी ही पुतनामावशीची कॉपी असली तरी ओरिजिनल पुतनामावशीपेक्षा खरी आहे! (आवाज खाली आणत) सॉरी समीर, मी तुझ्या मावशीबद्दल असं बोलायला नकोय पण..
समीर - नाही नाही गो ऑन, आपल्या नातेवाईकांना दिल्या गेलेल्या शिव्या ऐकणं, हा एक अवर्णनीय अशा स्वरूपाचा आनंद असतो. त्यांच्यावर सूड उगवण्याचा हा एकमेव मार्ग उपलब्ध असतो माझ्यासारख्या सभ्य आणि संकोची माणसाला. नातेवाईक लोक भयंकर असतात. कसं जगायचं हे तर माहीत नसतंच त्यांना, पण कधी कटायचं या जगातून याचाही सेन्स नसतो त्यांना.
मनू - नातेवाईक ह्या गोष्टीवर चर्चा करायची नाहीये मला. तुला सतत चर्चा करायच्या असतात. प्रत्येक गोष्टीवर चर्चा आणि कॉमेंट!
समीर - देवानं जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्यावर चर्चा करता याव्यात म्हणूनच तयार केलेल्या असतात.
मनू - तुला एक सांगतो समीर... मला स्वतःला गोळी घालून घ्यावी असं वाटायला लागलंय. (पॉज.) शाल्मली तिच्या आईसारखीच होईल का रे?
समीर - सगळ्या मुली शेवटी त्यांच्या आईसारख्याच होतात, ही स्त्री जन्माची सगळ्यात मोठी ट्रॅजडी आहे. आणि सगळे पुरुष आपल्या आईसारखे होऊ शकत नाहीत, ही पुरुष जन्माची सगळ्यात मोठी ट्रॅजडी आहे.
मनू - तू खरं बोलतो आहेस असं तुला म्हणायचंय का?
समीर - अगदी सत्य. शंभर टक्के सत्य! अॅज ट्रू अॅज एनी अदर ट्रुथ.
मनू - ह्या असल्या क्लेव्हर सत्यांचा वीट आलाय मला. आजकाल सगळंच क्लेव्हर झालंय म्हणा. सगळीकडंच क्लेव्हर माणसंच भेटतात. एक त्रासच झालाय ह्या क्लेव्हर माणसांचा. मी प्रार्थना करणार आहे देवाकडं की, औषधाला तरी मूर्ख लोक राहू देत बाबा या जगात!
समीर - भरपूर मूर्ख आहेत सत्यशील ह्या जगात अजून; काळजी नको करूस.
मनू - भेटायला आवडेल मला त्यांना. करतात काय हे लोक?
समीर - मूर्ख काय करतात? निषेध करतात, ह्या जगात क्लेव्हर लोक फार झालेत म्हणून.
मनू - (निराश होऊन बघतो).
समीर - बाय द वे, तू शाल्मलीला सांगितलंयस का, की तू मुंबईत सत्यशील खरे आणि पुण्यात मनस्विन काळे म्हणून जगतो आहेस म्हणून.
मनू - (अत्यंत पेट्रनायझिंगली) छे, छे, काहीतरीच काय? अरे, शाल्मली इतक्या सुंदर, सुसंस्कृत आणि गोड मुलीला सत्य सांगून त्रास देतं का कुणी? स्त्रियांशी वागण्याबद्दलची तुझी मतं जरा विचित्रच आहेत.
समीर - स्त्रीशी वागण्याची एकच पद्धत आहे. स्त्री सुंदर असेल तर तिच्यावर प्रेम करा, आणि ती सुंदर नसेल, तर दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करा.
मनू - धिस इज शिअर नॉनसेन्स! उनाडपणा आहे हा.
समीर - हो का? मग आपल्या ह्या सत्यशील खरे ह्या बंधुराजांबद्दल आपलं काय मत आहे? उनाड सत्यशील!
मनू - ह्या वीकएन्डपर्यंत तो मेलेला असेल. मी सांगेन की, बेंगलोरमध्ये त्याला अचानक हार्टअॅटॅक आला आणि तो गेला. आजकाल अनेक लोक हार्टअॅटॅकनं जातात. नॅचरल वाटेल सगळ्यांना ते.
समीर - हार्ट ट्रबल हेरिडिटरी असतं बरं का! मुलींच्या आया खूप सिरियसली घेतात असल्या गोष्टी. त्यापेक्षा स्वाइन फ्ल्यूनं गेला असं सांग.
मनू - स्वाइन फ्ल्यू हेरिडिटरी नसतो ना?
समीर - नाही नाही. अजिबात हेरिडिटरी नसतो.
मनू - ठरलं तर मग! कळवण्यास अत्यंत खेद होतो की, आमचे प्रिय बंधू, सत्यशील ह्यांचे स्वाईन फ्ल्यूच्या संसर्गाने अचानक निधन झाले. (हात झटकतो). सत्यशीलचा काटा निघाला!
समीर - पण मधुराला त्याच्यात इंटरेस्ट तयार झाला आहे नं?
मनू - दॅट इज ऑल राइट. मधुरा ही अतिशय नॉर्मल मुलगी आहे. प्रेम वगैरे गोष्टी ती फार सिरियसली घेत नाही... तिला खायलाप्यायला खूप आवडतं, लांब फिरायला जाते मोटरसायकल्सवर, ट्रेकला जाते. अभ्यासाकडं अजिबात लक्ष देत नाही. छान आहे मुलगी.
समीर - एकदा भेटलं पाहिजे ह्या मधुराला.
मनू - तुझी अजिबात भेट होणार नाहीये तिची. मधुरासारख्या सुंदर आणि तरुण मुलीची भेट तुझ्यासारख्या माणसाशी होऊ देणार नाही मी. काहीही झालं तरी गार्डियन आहे मी तिचा.
समीर - तू शाल्मलीला सांगितलं आहेस का, की मधुरा नावाच्या एका अठरा वर्षांच्या सुंदर मुलीचा तू गार्डियन आहेस.
मनू - असल्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नसतात. शाल्मली आणि मधुरा एकमेकींच्या अत्यंत चांगल्या मैत्रिणी होतील. एकमेकींना भेटल्यापासून अर्ध्या तासात त्या एकमेकींना बहिणीसारख्या ट्रीट करतील.
समीर - बायका एकमेकींना बहीण समजण्याआधी खूप काही गैरसमज करून घेतात एकमेकींबद्दल. गैरसमज करून घेतल्याशिवाय समज येत नाही स्त्रियांना!
मनू - (समीरच्या बोलण्याने वैतागलेला) सात वाजलेत.
समीर - मला भूक लागल्यासारखं वाटतंय.
मनू - तुला भूक न लागल्याचं कधी आठवतंच नाहीये मला.
समीर - मेनलॅन्ड चायनात डिनर झाल्यावर आपण आयनॉक्सला जाऊ.
मनू - मला सिनेमा बघण्याचा कंटाळा येतो.
समीर - मग पबमध्ये जाऊ.
मनू - मला आवाजाचा त्रास होतो.
समीर - मग समुद्रावर फिरायला जाऊ.
मनू - मला समुद्राकडं बघत बसण्याचा कंटाळा येतो. तो आपला हलत असतो, आणि आपण आपलं पाहात बसायचं.
समीर - मग काय करायचं आपण डिनर झाल्यावर?
मनू - काही नाही.
समीर - काहीही न करणं हे फार कठीण काम आहे. ठीक आहे, काहीही न करण्याचं काम कितीही मोठं असलं, तरी मी मागे हटणार नाही. ह्या असल्या बाबतीत हार्डवर्क म्हणजे हार्डवर्क. (राम येतो)
राम - शाल्मली मॅडम आल्यात. (राम जातो. शाल्मली येते)
समीर - शाल्मली?
शाल्मली - समीर, तू जरा तिकडे तोंड करून उभा राहा. मला सत्यशीलशी काही बोलायचंय.
समीर - नाही शाल्मली. मी तुझा मोठा भाऊ आहे. मी हे अलाऊ करणार नाही.
शाल्मली -असं दुष्टासारखं वागायला म्हातारा झालायस का तू? (समीर वळतो)
मनू - शाल्मली!
शाल्मली - सत्यशील, आपलं लग्न कधीच होऊ शकणार नाही. ममाच्या चेहऱ्याकडं बघून माझी खात्री झालीय. आपल्या मुलीला काही भावना असतात, हे मान्यच नसतं आयांना. ममा माझं ऐकतंच नाही कधी. मी तीन वर्षांची व्हायच्या आधी ममा माझं सगळं ऐकायची, असं मी ऐकलंय. पण मी तीन वर्षांची झाले आणि तिनं माझं काही ऐकणं बंदच केलं. मी वयात आले, तसं माझं काही ऐकू येणंच बंद झालं तिला. पण मी तुला एक मनापासून सांगते सत्यशील, आपलं लग्न नाही झालं तरी मी तुझीच आहे. मी दुसऱ्या कोणाशी लग्न केलं, तरी मी तुझीच असेन. मी आयुष्यात दोन-चार लग्नं केली तरी तुझीच असेन. फक्त तुझी!
मनू - शाल्मली.
शाल्मली - सत्यशील, तुझ्या हॅन्डबॅगेतल्या जन्माविषयी ममानं सांगितलंय मला. मला खूप आवडली तुझ्या जन्माची कथा. खूप वेगळं वाटलं असेल नाही तुला?... तुझ्या जन्माची गोष्ट सांगताना ममासारखी कॉमेंटस् करत होती तुझ्यावर. पण ते जाऊ दे सत्यशील. किती सुंदर नाव आहे रे तुझं! आणि मुख्य म्हणजे सत्यशील असल्यासारखा दिसतोस तू. किती सिंपल आहे हे नाव; पण किती कॉम्प्लिकेटेड भावना तयार होतायत माझ्या मनात त्यामुळं! सत्यशील, तुझा मुंबईतला अॅड्रेस माझ्याकडे आहे. पुण्यात कुठं राहतोस तू?
मनू - शांतिकुंज, प्रभात रोड, गल्ली क्र. सहा. ‘दरोडे ऑनेस्टी’ नावाची स्कीम आहे मोठी, तिच्या शेजारीच बंगला आहे आमचा.
(समीर ऐकतोय. तो हसतो थोडासा. तो अॅड्रेस शर्टच्या बाहीवर लिहून घेतो.)
शाल्मली - आता माझा प्रेमभंग झालाय. म्हणजे मला आता खूप दुःख होईलच. दुःख झालं म्हणजे मला काहीतरी डेस्परेट करावंच लागणार... मी तुला फोन करत जाईन रोज.
मनू - जरूर कर.
शाल्मली - किती दिवस मुंबईत आहेस तू?
मनू - सोमवारपर्यंत.
शाल्मली - गुड! समीर, आता तू इकडं वळू शकतोस.
समीर - मी कधीच वळलोय.
शाल्मली - मी मोबाईल करते ड्रायव्हरला. गाडी घेऊन येईल तो. समीर तुझ्या घरासमोर कधीच पार्किंग मिळत नाही.
मनू - कारपर्यंत सोडायला येतो मी.
शाल्मली - लिफ्टपर्यंतच सोड, खाली ममा आहे. (जातात.)
समीर - राम, एक छान चहा दे.
राम - देतो सर.
समीर - मी उद्या पुण्याला चाललोय.
राम - ठीक आहे सर.
समीर - मी सोमवारी परत येईन. माझी बॅग भरून ठेव.
राम - (चहा देत) हो सर, भरून ठेवतो.
(राम जातो, मनू येतो - )
मनू - ग्रेट आहे ही मुलगी. सेन्सिबल, सेन्सिटिव्ह तरीही इन्टेलिजन्ट. समीर, शाल्मली इतकं कोणाच्याच प्रेमात पडलो नव्हतो मी. (समीर हसतोय.) का हसतोयस इतका?
समीर - विलास आजारी पडलाय.
मनू - मी तुला सांगून ठेवतोय समीर. एकतर तू ह्या विलासला लवकर मारून तरी टाक, नाहीतर बरं तरी कर. नाही तर खूप गोंधळ घालणार आहे तो.
समीर - गोंधळाशिवाय काय मजा आहे? गोंधळ ही एकच गोष्ट अशी आहे आयुष्यात की, जी सिरीयस नसते कधीच.
मनू - तू नॉनसेन्सशिवाय दुसरं काही बोलतच नाहीस.
समीर - या जगात नॉनसेन्सशिवाय दुसरं काहीही बोललंच गेलेलं नाहिये कधी! (मनू त्याच्याकडं उद्विग्नतेनं पाहतो. निघून जातो. समीर सिगरेट पेटवतो. आपल्या बाहीवरच्या अॅड्रेसकडं पाहतो. हसतो.)
(पहिल्या अंकाचा पडदा)
.................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment