अंक दुसरा (पूर्वार्ध) : सत्यशील खरे की खोटे? (इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट)
दिवाळी २०२४ - लेख
ऑस्कर वाइल्ड
  • ऑस्कर वाईल्ड आणि त्यांच्या ‘इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट’ या नाटकाची प्रयोगाची काही पोस्टर्स
  • Sat , 09 November 2024
  • दिवाळी २०२४ लेख ऑस्कर वाइल्ड Oscar Wilde इम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट The Importance of Being Earnest

सत्यशील खरे की खोटे?

रूपांतर : श्रीनिवास जोशी

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

अंक दुसरा (पूर्वार्ध)

(प्रभात रोडवरच्या शांतीकुंजची बाग. मागे पायऱ्या दिसतायत बंगल्यात जाणाऱ्या. बाग. कुंड्या वगैरे आहेत. एका मोठ्या झाडाचा बुंधा. त्याच्याच सावलीत टेबल लावलेलं आहे. बास्केट चेअर्स लावलेल्या आहेत. झाडांना फुलं वगैरे आहेत. खूप गुलाब आहेत. टेबलावर अनेक पुस्तकं. श्रीमती शारदा पुणेकर टेबलाजवळ बसल्यात. पन्नाशीच्या. टिपटाप आहेत वेशभूषा वगैरेंच्या संदर्भात. मधुरा गुलाबांना पाणी घालतेय.) 

शारदा - (मधुराला) मधुरा, मधुरा! झाडांना पाणी घालण्यात वेळ वाय घालवू नकोस. ज्ञानाचा आनंद तुझी वाट पाहतोय इथं. हे बघ मराठी व्याकरणाचं पुस्तक आणलंय मी. पान पंधरा. कालचा लेसन् आपण बघून घेऊ परत एकदा. 

मधुरा - (नाईलाजानं येते) पण मला व्याकरण आवडत नाही. आणि व्याकरणाचा एक जरी लेसन् वाचला नं की, मी काकूबाईसारखी दिसायला लागलंय असं वाटतं मला. बॉबला अंबाडा फुटलाय असं वाटतं मला. 

शारदा - अगं, असं काय करतेयस. मनूकाकाला किती काळजी आहे तुझी. तू प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असावंस असं वाटतं त्यांना. मराठी व्याकरण शिकलीस, तर येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात मराठीची ट्रान्सलेटर म्हणून किती मोठा जॉब मिळेल तुला. लोक दारात रीघ लावतील तुझ्या. आम्ही जे बोलतोय आणि लिहितोय ते मराठीत ट्रान्सलेट करून द्या म्हणून. आजकाल मोडी येणारे किती पैसे मिळवतात माहीत आहे नं तुला? 

मधुरा - मनूकाका प्रत्येक गोष्ट सिरियसली घेतो. कित्येक वेळा तो इतकं सिरियसली बोलतो की, वाटतं की, ह्याची तब्येत तर ठीक आहे ना? 

शारदा - तुझ्या मनूकाकाला काहीही झालेलं नाहीये. चांगला धडधाकट आहे तो. इतकं लहान वय आहे त्याचं, पण किती मॅच्युअर आहे तो. ह्या वयात इतके जबाबदार नसतात लोक. 

मधुरा - त्यामुळंच आपण तिघं एकत्र असलो की, तो बोअर झाल्यासारखा दिसतो. 

शारदा - काय बोलतेयस काय तू मधुरा? मनूकाकाला किती व्याप आहेत. तरुणपणाची मौजमस्ती, धमाल त्याच्या बोलण्यात कशी येईल? सत्यशीलची किती काळजी असते त्याला. भावाविषयी इतकं प्रेम नसतं कोणाला!

मधुरा - मला नेहमी वाटतं की, त्या सत्यशीलला बंगल्यावरच आणावं राहायला. तुमच्यामुळं नक्की सुधारेल तो. तुम्हाला व्याकरण चांगलं येतं ना? शिवाय भूगोलही खूप चांगला आहे तुमचा. 

शारदा - (खूश होते) अगं, मी झाले म्हणून काय झालं? त्याच्यात काहीही फरक पडणार नाही. अगदी उथळ माणूस आहे तो. तुझ्या मनूकाकासारखा नाहीये तो. आणि सत्यशीलमध्ये फरक घडवून आणावा, असं मलाही वाटणार नाही. आजकाल सगळ्या वाईट लोकांना चांगलं व्हायची संधी देण्याचे दिवस आहेत, पण त्या भाबड्या लोकांमधली मी नाही. जे काही पेराल तेच उगवणार माणसाच्या बाबतीत. मधुरा, तुझी डायरी तू बाजूला ठेव. तुम्ही पोरी डायरी का ठेवता, तेच मला कळत नाही.  

मधुरा - अहो, अविस्मरणीय आणि वंडरफुल सीक्रेटस् लिहायची असतात मला माझ्या आयुष्यातली. मी लिहिली नाहीत ही अविस्मरणीय सीक्रेटस, तर विसरून नाही का जाणार मी ती सीक्रेट्स. 

शारदा - आपली मेमरी हीच आपली डायरी असते मधुरा. आणि ती नेहमी आपल्याजवळच असते. 

मधुरा - मेमरीची डायरी सत्य साठवण्यासाठी नसते मिस! सत्य प्रोसेस करून आपल्याला आवडतं ते साठवण्यासाठी असते. शिवाय मेमरीत कधीकधी न घडलेल्या गोष्टीसुद्धा लिहिल्या जातात. किंवा कधीकधी कधीच न घडू शकणाऱ्या घटनाही लिहिल्या जातात मेमरीमध्ये. त्यापेक्षा मग सरळ मराठी कादंबरीच लिहावी माणसानं!

शारदा - कादंबऱ्यांविषयी असं बोलू नकोस मधुरा. मी स्वतः कादंबरी लिहलेली आहे. एक हजार पानांची. 

मधुरा - खरंच? किती हुशार आहात तुम्ही!... पण कादंबरीचा शेवट गोड केला नव्हतात ना तुम्ही? मला आनंदी शेवट अजिबात आवडत नाहीत. इतकं दुःख होतं ना मला कादंबरीचा शेवट आनंदी झाला की!

शारदा - असा होलसेल शेवट केला नाही मी माझ्या कादंबरीचा. जी पात्रं चांगली होती, त्यांचा शेवट गोड झाला. जी वाईट होती, त्यांचा शेवट वाईट झाला. ह्यालाच ‘फिक्शन’ असं म्हणतात. 

मधुरा - किती अनफेअर आहे ना असं होणं! तुमची कादंबरी पब्लिश झालीय? 

शारदा - हस्तलिखित गहाळ झालं तिचं... ठीक आहे मधुरा... अभ्यास कर आता. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मधुरा - (स्मित करत) डॉ.फणसे येतायत. 

शारदा (उत्साहानं उठत) या डॉ.फणसे! (फणसे येतात)

फणसे - (उत्साहात) कशा आहात तुम्ही? 

मधुरा - शारदा मिसचं डोकं थोडंसं दुखतंय डॉक्टर. तुम्ही त्यांना जरा फिरायला घेऊन गेलात तर बरं वाटेल त्यांना. 

शारदा - मी काहीच म्हणाले नाही तुला माझ्या डोकं दुखण्याबद्दल. 

मधुरा  - मी बाहेर बघत होते, तेव्हा डॉ.फणसे येताना दिसले आणि मला वाटून गेलं की, तुमचं डोकं दुखणार आता. 

शारदा - नाही त्या गोष्टीत लक्ष देण्यापेक्षा अभ्यासात लक्ष दे मधुरा. 

मधुरा - हो मिस्. 

डॉ.फणसे - शारदाबाईंचा विद्यार्थी असण्याचं भाग्य मिळालं असतं मला, तर माझं लक्ष अजिबात इकडंतिकडं गेलं नसतं. माझं सगळ लक्ष त्यांच्या ओठांकडेच लागून राहिलं असतं. (शारदा बघते) म्हणजे मला म्हणायचंय की, तुम्ही काय बोलताय त्याकडं लक्ष लागून राहिलं असतं माझं लक्ष. (विषय बदलत) मनस्विन् नाही आले का मुंबईहून? 

शारदा - ते सोमवारी येणार आहेत. 

डॉ.फणसे - रविवार म्हटलं की, त्यांना मुंबईला जावंच लागतं. त्यांच्या त्या दुर्दैवी भावासाठी! आठवडाभर पुण्यात काम, आणि मग शनिवार-रविवार मुंबईत आपल्या बेजबाबदार भावाचे उद्योग निस्तरायला जायचं. तारुण्याची मौज-मस्ती नशीबातच नाही त्यांच्या. 

शारदा - मला काय वाटतंय माहिती आहे का डॉक्टर... आपण जरा फिरून येऊच. मधुरा म्हणतेय ते बरोबर आहे, असं माझ्या लक्षात आलंय. खरंच माझं डोकं दुखतंय... फिरून आले तुमच्याबरोबर की, बरं वाटेल मला. 

मधुरा - डॉक्टर फणसेंच्या बरोबर फिरायला जाणं, हे एक चांगलं औषध आहे. 

डॉ.फणसे - खरंच आहे. मीच औषध आहे शारदाबाईंच. 

शारदा - (बघते)

डॉ.फणसे - म्हणजे मला म्हणायचं होतं की, डॉ. आणि औषध एकमेकांपासून वेगळे नसतात.   

शारदा - खरं आहे तुमचं! खूप डोकं दुखतंय माझं. मधुरा, तू इकॉनॉमिक्स वाच. ‘रुपयाचं अधःपतन’ हा चॅप्टर वाचला नाहीस तरी चालेल. कोसळणाऱ्या रुपयाचा ‘छन्छन्’ असा आवाज चांगला नसतो तब्येतीला. चला डॉ.फणसे. (त्यांच्याबरोबर जाते.)

मधुरा - (टेबलावरून पुस्तक उचलते. फेकते. दुसरे उचलते फेकते.) दुष्ट इकॉनॉमी! दुष्ट जिऑग्राफी! आणि दुष्ट दुष्ट दुष्ट व्याकरण. मराठी व्याकरण. शुद्धलेखनाचे एकोणीस नियम? छत्तीस अक्षरांना एकोणीस नियम? ह्या पेक्षा ट्रॅफिकचे नियम कमी आहेत. इतकं करून शब्दांचा ट्रॅफिक जाम व्हायचा तो होतोच. (खुशीराम येतो)

खुशीराम - मधुराताई, सत्यशील खरे आलेत. 

मधुरा - सत्यशील खरे? म्हणजे, मनूकाकाचा दुष्ट आणि मनमौजी भाऊ? त्याला सांगितलं नाहीस का की, मनूकाका मुंबईलाच गेलाय म्हणून.  

खुशीराम - सांगितलं नं. खूप डिसअपॉइंट झालेले दिसले ते ऐकल्यावर. मी सांगितलं त्यांना की, तुम्ही आणि शारदा मिस् बागेत आहात. तुम्हाला भेटायचंय त्यांना. थोडं महत्त्वाचं बोलायचंय त्यांना तुमच्याशी.   

मधुरा - त्यांना पाठवून दे इकडे. आणि गेस्टरूम आवरून ठेव त्यांच्यासाठी.  

खुशी - ठेवतो ताई. (जातो.)

मधुरा - खरं तर मी इतका दुष्ट आणि बेजबाबदार माणूस कधीच पाहिला नाहीये. भीतीच वाटतेय मला सत्यशीलला भेटायला. (समीर येतो. अतिशय उत्साही आणि आनंदी दिसतो)

समीर - मधुरा, मधुरा म्हणतात ती तूच तर!  

मधुरा - हो, मीच तुमची कझिन मधुरा. आणि तुम्हीच मनूकाकाचे ते प्रॉब्लमॅटिक भाऊ? सत्यशील!... दुष्ट, बेजबाबदार, आणि मनमौजी सत्यशील!

सत्यशील - अगं मी दुष्ट वगैरे काही नाहीये. 

मधुरा - तुम्ही दुष्ट नाही आहात? म्हणजे मग फसवताय तुम्ही लोकांना. डबल लाईफ जगताय. दुष्ट नसून दुष्टासारखं वागायचं म्हणजे काय? किती फसवावं लोकांना माणसानं? धिस इज प्लेन अँड सिंपल हिपॉक्रसी! 

समीर - (तिच्याकडं आश्चर्यानं बघतो) मला मान्य करायलाच पाहिजे की, थोडंसं बेजबाबदारीनं वागलोय मी. 

मधुरा  - (कुतुहलानं) अवघड असेल नाही बेजबाबदारपणे वागणं! किती धैर्य लागतं त्याला!  

समीर - आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, की ज्याला चुकीचं म्हटलं जातं, तसंही वागलोय मी थोडंसं. 

मधुरा -अहो, हसताय काय? अभिमानाची गोष्ट नाहीये ती.  

समीर - तू समोर असताना प्रसन्न वाटणारच माणसाला. तो दुष्ट असला तरी.  

मधुरा - पण तुम्ही इथं अचानक कसे आलात? मनूकाका सोमवारपर्यंत येणार नाहीये. 

समीर - म्हणजे भेट होणारच नाही त्याची आणि माझी. मला सोमवारी डेक्कन क्वीननं जायलाच हवं. एक बिझनेस अपॉइंटमेंट आहे मुंबईत. चुकवलीच पाहिजे अशी. 

मधुरा - मग तुम्ही ती पुण्यातही चुकवू शकता. 

समीर - नाही. नाही. ती अपॉइंटमेंट मुंबईतच आहे. म्हणजे ती मुंबईतच चुकवली पाहिजे. 

मधुरा - हो, बरोबरच आहे तुमचं. बिझनेस अपॉइंटमेंटस् चुकवणं फार फार इम्पॉर्टंट असतं आयुष्यात. आयुष्यातलं सौंदर्य जपायचं असेल, तर बिझनेस अपॉइंटमेंटस् चुकवाव्याच लागतात माणसाला! नाहीतर सगळी ब्यूटीच निघून जाईल आयुष्यातली! ...आणि मुंबईतली अपॉइंमेंट मुंबईतच चुकवली पाहिजे. बिझनेस इज बिझनेस!... पण तरीही माझं म्हणणं आहे की, तुम्ही मनूकाका येईपर्यंत थांबलंच पाहिजे इथं. बोलायचंय त्याला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं.  

समीर - कशाबद्दल? 

मधुरा - मुंबईतून शिफ्ट करतोय मनूकाका तुम्हाला. त्यासाठी कपडेपण घेऊन देणार आहे तुम्हाला तो. 

समीर - मनूनं माझे कपडे आणले नाहीत, तर बरं होईल. जीन्स तर हॉरिबल आणतो तो. टेस्टच नाही त्याला जीन्समधली. 

मधुरा - मला नाही वाटतं तुम्हाला जीन्स किंवा पॅन्टस लागतील आता. मनूकाका तुम्हाला चेन्नईला का अंदमानला पाठवणार आहे...(समीर अचंबित.) काका लुंग्या छान आणतो. 

समीर - चेन्नई किंवा अंदमान? त्यापेक्षा हे जग सोडून गेलेलं चांगलं. तू कधी गेलीयस चेन्नईला? बापरे! काय उकाडा? शी! जीन्स घालणं तर अशक्यच. लुंग्यातरी कशा घालतात हे लोक. आब्रूपायी किती उकाडा सहन करायचा माणसानं?... आणि अंदमानला तर पाणी काळं आहे, असं म्हणतात. 

मधुरा - ईऽ, काळं आहे पाणी तिथलं? 

समीर - मी पाहिलेलं नाहीये, पण इतिहासाच्या पुस्तकात तसं वाचल्याचं आठवतंय मला. एकदम काळं पाणी... मनूनं पाठवलं मला तिकडं तर मी सरळ त्याची माफी मागून परत येणार महाराष्ट्रात... ए, तो खरंच पाठवणार आहे मला तिथं? 

मधुरा - तो कालच सांगत होता फोनवर... सत्यशीलला आता चेन्नई, अंदमान किंवा स्वर्ग, ह्यातलंच काहीतरी निवडायला लागणार म्हणून. 

समीर - चेन्नईचं काही खरं नाही. अंदमानविषयी इतिहासात वाचलं तेही फारसं चांगलं नाहीये. स्वर्गात आजकाल सुईसाईड बॉम्बर्स जास्त झालेत. मधुरा, मी मुंबईतच ठीक आहे. 

मधुरा  - पण काका म्हणत होता की, सत्यशीलची मुंबईत राहायची लायकी नाहीये. 

समीर - खरंय त्याचं! ए मधुरा, मला सुधरवण्याचं तूच मनावर घे ना आता. एक मिशन म्हणून. मला वाटतंय की, हे आव्हान तुझ्यासारखी सुंदर आणि सेन्सिटिव्ह मुलगीच स्वीकारू शकते. मला एक नवं आयुष्य सुरू करायचंय मधुरा. मला सुधरव तू. प्लीज. 

मधुरा - सॉरी सत्यशील, मला वेळ नाहीये आज दुपारी. मी सिनेमा बघायला जाणार आहे. ‘डर्टी रॉटन् स्काऊंड्रल्स’!  

समीर - मी आज दुपारभरात सुधरवलं मला स्वतःला तर तुझं काही ऑब्जेक्शन आहे का? 

मधुरा - तूच तुला सुधरवणार? बघ प्रयत्न करून. 

समीर - खरंच सुधरवणार आहे मी स्वतःला आज दुपारी. अगदी खरं सांगायचं, तर मला ऑलरेडी वाटायला लागलंय की, मी सुधारलोय म्हणून.  

मधुरा - तू सुधारायला लागलास आणि लगेच किती डल दिसायला लागलायस? सगळा चार्मच गेलाय तुझा. 

समीर - ते मला भूक लागल्यामुळं आहे. मी दोन डबल ऑमलेटशिवाय काही खाल्लं नाहीये आज डेक्कन क्वीनमध्ये. 

मधुरा - किती वेंधळी आहे मी? तू आता एक संपूर्ण नवं आयुष्य सुरू करणार आहेस, म्हणजे मग तुझं खाणं-पिणं सगळं कसं व्यवस्थित व्हायला पाहिजे. 

समीर - थॅन्क यू! मला एक गुलाबाचं फूल देशील. बटनहोलमध्ये गुलाबाचं फूल लावल्याशिवाय मला चांगली भूक लागत नाही. 

मधुरा - हा पिवळा गुलाब देऊ? (कात्री उचलते)

समीर - नको. तू पिंक गुलाब दिलेला आवडेल मला. 

मधुरा - का? (फूल तोडते)

समीर - कारण तू स्वतःच एका पिंक रोज आहेस मधुरा. 

मधुरा - तू असं माझ्याशी बोललेलं सभ्यतेला धरून नाहीये सत्यशील. शारदा मिस माझ्याशी असं कधीच बोलत नाहीत. 

समीर - चष्मा आहे का त्यांना? (मधुरा ते फूल त्याच्या बटनहोलमध्ये लावते) मधुरा, तू या जगातली सर्वांत सुंदर मुलगी आहेस! 

मधुरा - शारदा मिस् सांगत होत्या की, सौंदर्य हा भूलभुलय्या आहे. 

समीर - खरं आहे त्यांचं. त्या भूलभुलय्यात हरवून जायला आवडतं कुठल्याही सेन्सिबल माणसाला. 

मधुरा - मला नाही आवडणार सेन्सिबल माणूस माझ्या प्रेमात पडलेला. सेन्सिबल माणसं आकर्षक नसतात. सेन्सिबल माणसाशी लग्न करणं समाजवाद्यांना मत देण्यासारखं असतं. खोट्या समाधानाशिवाय हाती काहीच लागत नाही. (ते दोघं बोलत बोलत घरात जातात. शारदा आणि डॉ.फणसे येतात)

शारदा - तुम्ही खूप एकटे आहात डॉ.फणसे. तुम्ही लग्न केलं पाहिजे. देशसेवा मी समजू शकते. पण त्यासाठी असं एकटं राहायचं? 

डॉ.फणसे - (विद्वानासारखे खांदे उडवत) नाही. मला ‘देशसेवक’ हे बिरूद शोभून नाही दिसणार. मी केवळ एक स्वयंसेवक आहे. आणि लग्नाचं म्हणाल तर, आमचा लग्नावर विश्वास नाहीये... म्हणजे स्वयंसेवकांनी लग्न करण्यावर. आधी लगीन देशाचं, आणि त्यासाठी आपले कधीच नाही! आपल्या लग्नापेक्षा, देशातल्या लोकांचा आनंद महत्त्वाचा.  

शारदा - (उसासा सोडून) खरंय त्यांचं. ह्या देशात आज मुलंबाळं आनंदानं खेळतायत, ती अनेक स्वयंसेवक ब्रह्मचारी राहिलेत म्हणूनच!

डॉ.फणसे -(गंभीरपणे) खरं आहे तुमचं. पण सगळ्यांच्याच लक्षात येत नाही ही गोष्ट! चेष्टा करतात आमची. 

शारदा - (त्याच्या हातावर हात ठेवून) तुम्ही ब्रह्मचारी राहता म्हणूनच देश चालतो. 

डॉ.फणसे - आम्ही ब्रह्मचर्याशी ईमान राखलंय म्हणून अब्रू टिकून आहे देशाची, पण समजत नाही लोकांना ते. चेष्टा करतात आमची!

शारदा - खरं आहे.

शारदा - पण एक सांगू का? पुरुष ब्रह्मचारी राहिला नं की, तो एक कायमचं असं सामाजिक आकर्षण बनून राहतो. कितीतरी वधुपिते आशेवर राहतात त्यामुळं! 

डॉ.फणसे - पुरुषाचं लग्न झालं की, पुरुष आकर्षक नाही राहत का?  

शारदा - लग्न झालेला कुठलाच पुरुष आकर्षक नसतो, त्याच्या बायकोशिवाय कोणालाच आकर्षण वाटत नाही त्याचं. 

डॉ.फणसे - आणि काही लोक तर सांगतात की, त्याच्या बायकोलाही त्याचं आकर्षण वाटत नाही म्हणून. हु, हु, हु !

शारदा - ते त्या बाईच्या बुद्धीवर अवलंबून असतं. ती जर मॅच्युअर असेल, तर जरूर राहतं तिला तिच्या नवऱ्याचं आकर्षण. त्यासाठी जरा प्रौढ स्त्रीशीच लग्न करावं पुरुषांनी असं मला वाटतं. आपल्याकडं बावीशी-पंचविशीतल्या कोवळ्या मुलींची लग्न लावून देण्याची जी प्रथा आहे, ती चुकीची आहे. स्त्रीचं लग्नाचं खरं वय पस्तिशीनंतरच सुरू होतं. विशेषतः देशभक्तांनी तर चाळीशी-पन्नाशीमधल्याच स्त्रीशी लग्न करावं, असं माझं मत आहे. पण ही मधुरा कुठे आहे? (एवढ्यात मनू येतो. त्यानं पांढरे कपडे घातलेत. मलूल दिसतो आहे. पांढरी टोपीपण घातली आहे.) 

शारदा - मनू! काय झालं काय? 

डॉ.फणसे - मि. खरे! काय झालं काय तुम्हाला? 

शारदा - आम्हाला तर वाटत होतं की, तुम्ही सोमवारीच येणार आहात. 

मनू - (अतिशय दुःखात असल्यासारखा) लवकर आलो मी. डॉ.फणसे कसे आहात तुम्ही? 

डॉ.फणसे - छान आहे. छान आहे. 

मनू - कळवण्यास अत्यंत दुःख होतंय की...

शारदा - सत्यशीलनं पुन्हा कर्ज काढून पैसे उडवले? 

मनू - गेला तो. 

डॉ.फणसे - कुठे? 

मनू - (वर बोट दाखवतो)

डॉ.फणसे - विमानानं गेला? 

मनू - नाही सर्वोच्च तत्त्वाकडे गेला. 

डॉ.फणसे - म्हणजे नागपूरला गेला? 

मनू - देवाकडं गेला. 

डॉ.फणसे - मग ठीक आहे. मला वाटलं सर्वोच्च तत्त्वाकडं गेला!

शारदा - देव नेणारच होता त्याला. किती त्रास द्यायचा आपल्या भावाला? 

डॉ.फणसे - मी आपल्या दुःखात सहभागी आहे मि. खरे. पण एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो तुम्हाला की, तुम्ही तुमच्या भावाशी अतिशय चांगले वागलेले आहात. अतिशय चांगली काळजी घेतली आहे तुम्ही त्याची. अतिशय जबाबदारीनं वागलात तुम्ही त्याच्याशी, तो इतका बेजबाबदार असूनसुद्धा. 

डॉ.फणसे - खरंच खूप क्रूर घाव घातलाय नियतीनं तुमच्यावर... तुम्ही शेवटपर्यंत बरोबर होता त्याच्या? 

मनू - नाही. तो चेन्नईत गेला. तिथल्या चेट्टियार इन्टरकॉन्टिनेन्टलच्या मॅनेजरचा फोन आला होता मला. 

डॉ.फणसे - कशानं गेला म्हणून सांगितलं? 

मनू - थंडी-तापाचं निमित्त झालं आणि गेला. 

शारदा - पेरावे ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते. 

डॉ.फणसे - तुमच्या सांत्वनासाठी आमच्या प्रमुखांचं एक व्याख्यान वाचून दाखवेन मी तुम्हाला. एक छोटीशी शोकसभा घेऊ आपण. त्यात मी हे व्याख्यान वाचून दाखवेन. तुमच्या मनाला शांती लाभेल हे व्याख्यान ऐकून. अतिशय छान व्याख्यान आहे हे. कुठही वापरावं असं. कोणी मृत्यू पावलं, कुठलं बारसं असलं, कुठं कांदापोह्यांची मेजवानी असली, कुणाला पुरस्कार मिळाला... अगदी डोहाळ जेवण असलं, तरी मी हेच व्याख्यान वाचून दाखवतो. सगळीकडंच लागू होतं हे व्याख्यान. एकदा आमच्या समाजवादी मित्राच्या साठीला मी हे व्याख्यान वाचून दाखवलं. 

शारदा - मग काय म्हणाले ते व्याख्यान ऐकून? 

डॉ.फणसे - काहीच म्हणाले नाहीत. व्याख्यानावर काही बोलायची संधीच मिळाली नाही त्यांना. भ्रमिष्टच झाले तासाभरात ते व्याख्यानानंतर! बाय द वे, सत्यशीलचे अंत्यसंस्कार तुम्ही इथं पुण्यात करणार आहात की, मुंबईत?  

मनू - त्याची शेवटची इच्छा होती की, त्याचे अंत्यसंस्कार चेन्नईतच केले जावेत. 

डॉ.फणसे - अरेरे, परक्या मातीत मिसळून जावं असं वाटलं त्याला! नागपूर महाराष्ट्रात असून महाराष्ट्राची माती नको वाटली त्याला. फारच दारुण मनःस्थितीमध्ये अंत झाला असणार त्याचा! 

मनू - बाय द वे, मला एक बारश्याचा कार्यक्रम करायचाय... शारदाताई, तुम्हाला नाव ठेवता येतं? 

शारदा - इश्श! त्यात काय येण्यासारखं आहे? कित्येक लोकांना नावं ठेवलीत मी.  

डॉ.फणसे - कुणी बाळ आहे का? पण, सत्यशीलनं लग्नच केलं नव्हतं ना?

मनू - नाही. नव्हतं केलं लग्न त्यानं. 

शारदा - (कडवटपणे) ज्यांना मौजमजा करायची असते, ते कशाला करतील लग्न? (डॉ.फणसे दचकतात. त्यांना ठसका लागतो.) सॉरी हं, तुम्हाला नाही म्हणाले मी. 

मनू - मी काय म्हणत होतो... की बाळाचं बारसं करायचं नाहीये मला... मला माझंच बारसं करायचंय. 

शारदा - पण तुझं बारसं झालंय मनस्विन!

मनू - मला काहीच आठवंत नाहीये माझ्या बारश्याबद्दल. 

शारदा - पण तुमचं बारसं झालंय की नाही, ह्याविषयी फारसा डाऊट नाहीये ना मनात तुमच्या? 

मनू - मला डाऊट घ्यायलाच लागणार आहे त्यावर. परिस्थितीच तशी आहे. 

शारदा - आज माझ्या प्लॅटच्या शेजारी एक बोरवणकर म्हणून राहतात. त्यांच्याकडंही बारसं आहे. त्यांना जुळं झालंय. 

मनू - बोरवणकरांच्या त्या पोरांबरोबरच माझं बारसं? फार पोरकटपणा होईल तो. 

शारदा - मग वेगळं करू तुमचं बारसं... पण इतका मोठा पाळणा कुठून आणायचा? 

डॉ.फणसे - आमचे स्वयंसेवक मदत करू शकतात या बाबतीत! कुठलाही चॅलेंज म्हटलं की, रक्त सळसळून उठतं त्यांचं! 

मनू - काही पैसे द्यावे लागतील का त्यांना? 

डॉ फणसे - नाही! समाजसेवा म्हटलं की सगळे येतील. फक्त कांदा-पोहे करा भरपूर. 

शारदा - सैन्य पोटावर चालतात असं म्हटलं जातं ते चूक आहे. खरी जातीवंत सैन्य पोह्यावर चालतात! 

डॉ.फणसे - खरं तर मूळ म्हण तीच आहे. कुणा दुष्ट समाजवाद्यानं त्या पोह्यातल्या ‘ह्या’चा ‘टा’ केला. दुष्ट लोक. देशद्रोही!

मनू - या देशात आजकाल फक्त ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ असे दोनच प्रकारचे लोक राहायला लागले आहेत. सामान्य नागरिक राहातच नाहीत या देशात आता! 

डॉ.फणसे - देशावर विनोद करू नका मि. खरे. 

मनू - मी कुठं देशावर विनोद केला? 

डॉ.फणसे - आमच्यावर विनोद म्हणजे देशावरच विनोद. विरोध करता आला नाही की, विनोद करायचे! म्हणून आमचा विनोदालाच विरोध आहे.

मनू - विनोद नाही करायचे तर मग करायचं काय आमच्यासारख्या माणसानं? 

डॉ.फणसे - मग बोलवू का आमच्या लोकांना? 

मनू - बोलवा की. 

डॉ.फणसे - मी आमच्या माणसांना वैदिक पद्धतीनं बारसं तयार करायला सांगतो. आधुनिकता आणि वैदिक जीवनप्रणाली या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात असूच शकत नाहीत. प्रमुखांनीच सांगितलंय. म्हणजे ते खरं असणारंच.  

(मधुरा बंगल्यामधून येते)

मधुरा - मनूकाका? तू सोमवारी येणार होतास ना? ...आणि तू कपडे कसले घातलेयस असले? 

शारदा - (तिला रोखत) मधुरा!

डॉ.फणसे - तुला कसं सांगायचं मुली...

मधुरा - (मनूकाकाकडे जात) काय झालं मनूकाका? मला तुला एक सरप्राइज द्यायचंय... ओळख काय असेल ते? 

मनू - काय? 

मधुरा - तुझा भाऊ आलाय इथं. 

मनू - कोण? 

मधुरा - अरे तुझा भाऊ.  

मनू - मला भाऊच नाहीये पण.  

मधुरा - हे जरा जास्त होतंय हं मनूकाला. अरे सत्यशील कितीही वाईट वागला, तरी तुझा सख्खा भाऊ आहे. (मनू गडबडलेला)... मी इकडंच बोलावते त्याला. (आत पळत जाते)

डॉ.फणसे - प्रमुख म्हणाले होते एकदा... आयुष्य हे विचित्र दैवयोगांनी भरलेलं असतं म्हणून. किती खरं होतं त्यांचं!

शारदा - गेलेला माणूस परत आला, तर किती चुकल्याचुकल्यासारखं होतं ना? पटतच नाही मनाला, तो आलाय हे. 

डॉ.फणसे - थोडक्यात चुकलेली बस, रिव्हर्स गिअर टाकून आपल्यासाठी परत आली आहे, असं वाटतंय मला तर. 

मनू - सत्यशील कसा येईल इथं? काहीतरी चुकतंय. (समीर आणि मधुरा एकमेकांच्या हातात हात घालून येतात)

मनू - अरे बापरे! (समीरला मधुरापासून दूर करण्याचा प्रयत्न करतो)

समीर - (त्याला दाद न देता) मनू तुला आवडणार नाही, मी इथं आलेलं. पण एकदा तुझी माफी मागायची ठरल्यावर राहवलं नाही मला. सॉरी मनू, मी तुला आतापर्यंत जो त्रास त्याबद्दल. आता मी एक चांगलं वागायचं ठरवलंय. मला माफ कर मनूदादा. (हात पुढं करतो.) 

मधुरा - प्लीज मनूकाका. 

मनू - काही झालं तरी मी ह्याचा हात हातात घेणार नाही. त्यानं इथं येणं चुकीचं आहे. आणि त्याचं कारण माहिती आहे त्याला. 

मधुरा - असं काय रे? कर ना माफ त्याला, तो एवढं म्हणतोय तर. तूच म्हणतोस ना, की प्रत्येक माणसात काहीना काही चांगलं असतंच म्हणून. सत्यशील आत्ताच मला सांगत होता की, विलास नावाचा त्याचा एक मित्र आहे म्हणून. खूप आजारी असतो तो. 

मनू - तो बोलला तुझ्याशी विलासबद्दल? 

मधुरा - हो. त्यानं सगळं सांगितलंय मला विलासबद्दल. तो आजारी कसा असतो, त्याला त्याचं सगळं करावं कसं लागतं...  

मनू - समीर, तू तिच्याशी विलासबद्दल बोललेलं मला आवडणार नाही... वेड लावणार आहे हे विलास प्रकरण मला.  

समीर - मी आयुष्यात अक्षम्य चुका केल्यात हे मान्य आहे मला, पण म्हणून मनूनं मला असं वागवावं? तेही मी पहिल्यांदाच त्याच्या घरी आलेलो असताना? अक्षम्य चुकांना क्षमा झाली नाही, असं होतं का कधीतरी? 

मधुरा - मनूकाका, आता तू सत्यशीलशी बोलला नाहीस, तर मी तुला कधीच माफ करणार नाही. 

मनू - अगं पण!

मधुरा - तू आधी शेक हॅन्ड कर त्याच्याशी. नाही तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही! नाही म्हणजे नाही!!

मनू - ठीक आहे. मी करतो शेकहॅन्ड त्याच्याशी, पण एकदाच. पहिला आणि शेवटचा. (समीरशी शेकहॅन्ड करतो)

डॉ.फणसे - किती सुंदर दृश्य आहे हे... दोन भावांचं मीलन हे जगातल्या कुठल्याही मीलनापेक्षा सुंदर असतं, असं आमचे प्रमुख म्हणाल्याचं आठवतंय मला!... मला वाटतं की, ह्या दोघा भावांना आपण थोडा वेळ एकटं सोडावं.   

शारदा - मधुरा, आमच्याबरोबर येतेस?

मधुरा - हो. आय अॅम सो हॅप्पी नं. 

डॉ.फणसे - खरंच किती छान काम केलंयस तू मधुरा. मला तर ध्वजवंदन करून आल्यासारखं वाटतंय. (तिघे जातात.)

.................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख