रूपांतर : श्रीनिवास जोशी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
अंक दुसरा (उत्तरार्ध)
मनू - अरे लबाड माणसा, तू इथनं निघायचं बघ. नाहीतर तुझी सगळी बदमाशी उघड करीन मी!
खुशीराम - (येतो) मी सत्यशीलसाहेबांचं सामान तुमच्या रूमच्या शेजारच्या रूममध्ये ठेवलंय. सगळी रूम रेडी करून ठेवलीय.
मनू - काय?
खुशीराम - सत्यशीलसाहेबांचं सामान गेस्टरूममध्ये ठेवलंय सर.
मनू - ह्याचं सामान?
खुशीराम - हो सर. तीन बॅगा आहेत मोठ्या. आणि लॅपटॉप आणि गोल्फचं किट आहे.
समीर - आय अॅम सॉरी मनू. एका आठवड्यापेक्षा जास्तं राहता येणार नाहीये मला ह्यावेळी.
मनू - खुशीराम, रिक्षा आण. सत्यशीलसाहेबांना मुंबईला जायला लागतंय लगेचच. त्यांना महत्त्वाचं काम निघालंय.
खुशीराम - सांगतो साहेब. (घरात परत जातो)
समीर - अरे, थोडीतरी लाज वाटू देत खोटं बोलण्याची मनू तुला.
मनू - अतिशय महत्त्वाचं काम निघालंय मुंबईत तुझं.
समीर - नाही.
मनू - तुझा बिझनेस बोलवतोय मुंबईत तुला.
समीर - माझा बिझनेस असं कधीच करणार नाही. खूप चांगला आहे बिझनेस माझा. माझ्या आनंदाच्या आड आत्तापर्यंत एकदाही आलेला नाहीये बिचारा.
मनू - तुझ्या आनंदाच्या आड येण्याइतका सशक्त नाहीये तुझा बिझनेस.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
समीर - मधुरा एक अतिशय गोड मुलगी आहे.
मनू - गोड आणि कडू असलं काहीही बोलणार नाहीयेस तू तिच्याबद्दल.
समीर - मनू, तू हे कपडे बदलून ये प्लीज. किती विचित्र दिसतोयस. अरे, आपला भाऊ गेला तर दुःख होणारच माणसाला. पण आता आलाय नं तो तुझ्याबरोबर अठवडाभर राहायला?
मनू - तू आठवडाभर वगैरे राहाणार नाहीयेस माझ्या घरात.
समीर - सूतक संपल्याशिवाय जाणार नाहिये मी. काहीही झालं तरी मित्र आहे मी तुझा.
मनू - मी हे कपडे बदलले तर जाशील तू?
समीर - हो, पण लवकर बदललेस हे हॉरिबल कपडे तरच.
मनू - उल्लू माणूस आहेस तू. तुझी लबाडी चालू देणार नाहिये मी इथं. तुझा डाव फसलेला आहे आज. तू लगेच निघणार आहेस. इज दॅट क्लिअर? तू जाणार आहेस. लगेच. (बंगल्यात निघून जातो)
समीर - नाही डाव फसलेला नाहीये मनू. मी मधुराच्या प्रेमात पडलोय. त्याचसाठी तर मी आलो होतो इथं. (मधुरा त्याच्या मागच्या बाजूनं येते. झाडांना पाणी घालायला लागते) पण जाण्यापूर्वी मला भेटायलाच पाहिजे तिला. देअर शी ईज!
मधुरा - (थोडीशी लाजत) इथं फक्त झाडांना पाणी घालायला आलेय हं मी. मला वाटलं की, मनूकाका बंगल्यात गेलाय.
समीर - तो रिक्षा सांगायला गेलाय माझ्यासाठी.
मधुरा - गावात फिरायला घेऊन चाललाय तो तुला?
समीर - तो मला मुंबईला परत जा म्हणतोय.
मधुरा - म्हणजे ताटातूट होणार आपली.
समीर - काय करणार?
मधुरा - नवे मित्र दुरावले तर किती दुःख होतं नं? जुने दुरावले तर फार काही वाटत नाही. (खुशीराम येतो)
खुशीराम - रिक्षा आलीय सर. (समीर, मधुराकडं केविलवाणेपणाने बघतो)
मधुरा - थांब म्हणावं त्या रिक्षावाल्याला पाच मिनिटं.
खुशीराम - हो. सांगतो. (जातो.)
समीर - मला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे तुला. आय होप की, तुला राग येणार नाही... मला तू ह्या जगातली एक परफेक्ट आणि सुंदर मुलगी वाटतेस.
मधुरा - एवढं स्पष्टपणे माझ्याशी बोललं नव्हतं कुणी! तुझी हरकत नसेल तर तुझं हे वाक्यं लिहून घेऊ मी माझ्या डायरीत?
समीर - तू डायरी लिहितेस? मला वाचायला मिळेल ती? मुली काय लिहितात डायरीत याबद्दल खूप उत्सुकता आहे मला.
मधुरा - ए नाही हं. (डायरीवर हात ठेवते) एका गोड, अल्लड, तरुण आणि हुशार मुलीचे विचार असे वाचायला मिळतात का कधी?
समीर - मग कसे मिळतात?
मधुरा - तिचा एखादा मित्र चोरतो तिची डायरी आणि नेटवर टाकतो. माझी डायरी लवकरच कुणीतरी चोरून नेटवर टाकणार आहे. इट विल बी क्वाइट अ सेन्सेशन ना? ...मी फॉरवर्ड करेन ती लिंक तुला... हं, बोल काय सांगत होतास तू... (ती डायरीत लिहिण्याच्या तयारीत.)...कुठपर्यंत आला होतास तू? हं... मला तू ह्या जगातली एक परफेक्ट आणि सुंदर मुलगी वाटतेस... हं पुढं बोल...
समीर - (थोडासा गडबडलेला, त्यामुळे सुरुवात करताना थोडा खाकरतो)
मधुरा - डिक्टेशन देताना खोकू नये समीर. खोकल्याचा आवाज लिहिता येतो का डायरीत? (समीर बोलू लागतो. ती लिहू लागते)
समीर - ...मधुरा, जेव्हा मी तुला पाहिलं, त्याक्षणी तुझ्या सौंदर्यामुळं डेव्हास्टेट झालो मी. मी प्रेमातच पडलो तुझ्या. भक्त झालोय मी तुझा. मला दुसरं काही सुचतच नाहिये.
मधुरा - शब्द चांगले सुचतायत तुला. लोकांना वाचायला आवडेल ही प्रायव्हेट डायरी.
समीर - मधुरा! (खुशीराम येतो)
खुशीराम - रिक्षावाला वाट पाहतोय सर.
समीर - त्याला सांग की, बरोब्बर ह्याच वेळेला ये, पुढच्या आठवड्यात.
खुशीराम - (मधुराकडे बघतो. ती काहीच बोलत नाही) सांगतो सर. (जातो)
मधुरा - मनूकाकाला कळलं नं की, तू पुढच्या आठवड्यात या वेळेपर्यंत राहणार आहेस तर डोकं फिरेल त्याचं.
समीर - आय डोन्ट केअर अबाऊट युवर मनूकाका. आय लव्ह यू मधुरा. तू लग्न करशील माझ्याशी?
मधुरा - यू सिली बॉय! करेन मी लग्न तुझ्याशी! ...तुला एक सीक्रेट गोष्ट सांगू का? मी तीन महिन्यांपूर्वीच प्रेमात पडलेय तुझ्या.
समीर - तीन महिन्यांपूर्वी?
मधुरा - हो. बरोब्बर तीन महिने होतील ह्या गुरुवारी.
समीर - तीन महिन्यांपूर्वीच्या गुरुवारी?
मधुरा - खूप पूर्वीच मनूकाकानं तुझ्याबद्दल सांगितलं होतं आम्हाला?
समीर - काय सांगितलं होतं?
मधुरा - हेच की, त्याला एक सत्यशील नावाचा भाऊ आहे. तो खूप कर्ज करतो आणि ते पैसे उडवतो वगैरे. त्यानंतर माझ्यात आणि शारदा मिसमध्ये खूप चर्चा झाल्या तुझ्याबद्दल. मग हळूहळू मला वाटायला लागलं की, इतक्या चर्चा होतायत ह्या माणसाबद्दल म्हणजे तो चार्मिंग असणारंच. मला वाटलं की, ह्याला प्रेम मिळालं तर तो नक्की सुधारेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुझं नाव फार आवडलं मला. सत्यशील. मी प्रेमातच पडले तुझ्या. लगेच मग आपली एंगेजमेंटपण झाली.
समीर - हो. कधी झाली एंगेजमेंट आपली?
मधुरा - चौदा फेब्रुवारीला. त्या दिवशी खूप रोजेस् आले मला, पण ती सगळी चांगली मुलं होती. मला प्रेम नाही वाटलं त्यांच्याबद्दल. चांगल्या लोकांना सुधारण्यात काय मजा? चांगला माणूस सुधारला की, अजून थोडा चांगला माणूस होणार. मग त्यात काय मजा? स्वारगेटला बसमध्ये बसायचं आणि स्वारगेटलाच परत येऊन उतरायचं.
समीर - खरंय तुझं.
मधुरा - पण मग एक प्रश्न आला की, जो आपल्याला ओळखतंच नाहीये त्याच्यावर आपण कसं प्रेम करायचं.
समीर - खरंय. आपल्याला जो माहीत नाही, त्याच्यावर प्रेम करता येतं. सगळ्या मुली तेच करत असतात. पण आपणच ज्याला माहीत नाही, त्याच्यावर आपण प्रेम कसं करणार?
मधुरा - खूप वादळं उठली विचारांची माझ्या मनात. शेवटी सरळ अॅक्सेप्ट केलं मी तुला. ह्याच झाडाखाली. दुसऱ्या दिवशी ही रिंग आणली मी, तुझ्या नावानं माझ्यासाठी.
समीर - अरे वा! ही रिंग मी दिलीय का तुला? किती सुंदर आहे ना?
मधुरा - खूप वाईट वागलायस तू आयुष्यात सत्यशील, पण यू हॅव एक्सलंट टेस्ट. किती सुंदर रिंग आणली आहेस, तू मला माहीत नव्हतास तरीही... आणि हा बॉक्स बघ, मी हाँगकाँग लेनमधून आणलाय, तू मला ज्या मेल्स पाठवल्यात त्यांच्या प्रिंटस् ठेवण्यासाठी. मी प्रिंटस् काढते तुझ्या सगळ्या मेल्सच्या.
समीर - माझ्या मेल्सच्या? पण मी कधीच पाठवलेल्या नाहीत मेल्स तुला.
मधुरा - त्या तुझ्या दुष्टपणाची आठवण देण्याची काही गरज नाहीये. तू लिहीत नसल्यामुळं मलाच लिहाव्या लागल्या तुझ्या मेल्स. मी दिवसातून तीन तीनदा लिहिल्या आहेत तुझ्या मेल्स मला. कधी कधी पाच पाच वेळा पण लिहिल्यात.
समीर - मला वाचायला मिळतील मेल्स मी लिहिलेल्या?
मधुरा - असं दुसऱ्यांच्या मेल्स वाचणं इनडिसेन्ट आहे सत्यशील... (बॉक्समधून तीन प्रिंटस् काढत)... हे बघ, ह्या तीन मेल्स. मी आपली एंगेजमेंट ब्रेक केली तेव्हाच्या. किती सुंदर आहेत ना त्या. किती स्पेलिंग्ज चुकलीत बघ त्यातली. इतकी डिस्टर्ब झाले होते न मी... स्पेलचेकसुद्धा करायचे विसरले... किती इमोशनल आहेत ना ह्या मेल्स. त्या वाचताना अजूनसुद्धा रडू येतं मला.
समीर - आपली एंगेजमेंट मोडली होती?
मधुरा - हो. बावीस मार्चची एन्ट्री बघ माझ्या डायरीतली. आज मी सत्यशीलबरोबरची एंगेजमेंट मोडली. आय ब्रोक ऑफ विथ सत्यशील. ही एंगेजमेंट मोडणं हेच मला योग्य वाटतंय. मार्च असूनही पुण्यात आज उकडत नाहीये... छान आहे नं ही एन्ट्री?
समीर - पण का मोडलीस तू आपली एंगेजमेंट? मी काय केलं होतं असं? खरं बघायला गेलं तर मी काहीच केलं नव्हतं. करायचं म्हटलं तरी शक्य नव्हतं मला. मला खूप वाईट वाटतंय मधुरा, मार्च असूनही पुण्यात उकडत नव्हतं आणि तरीही तू मोडलीस एंगेजमेंट?
मधुरा - एंगेजमेंट मोडली नाही एकदाही, तर सिरियस कसं म्हणता येईल तिला? पण अठ्ठावीस मार्चला मी माफसुद्धा केलंय मी तुला!
समीर - (तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो) थँक्यू मधुरा. यू आर अ परफेक्ट एन्जल.
मधुरा - किती रोमँटिक आहेस तू? ए तुझे केस नॅचरलीच कुरळे आहेत ना?
समीर - कर्लिंग क्लिप्स लावतो मी, त्यामुळे अगदी नॅचरली कुरळे दिसतात माझे केस.
मधुरा - किती छान!
समीर - तू आपली एंगेजमेंट आता परत ब्रेक करणार नाहीस ना?
मधुरा - आता तू मला भेटलायस नं सोनी, मग आता कशी ब्रेक करेन मी एंगेजमेंट? शिवाय तुझं नाव किती ग्रेट आहे?
समीर - (नर्व्हसली) तेही एक आहेच म्हणा.
मधुरा - तुला हसू येईल पण माझं एक ड्रीम होतं - गर्लिश ड्रीम - की मी लग्नं केलं तर मला ज्याचं नाव आवडतं, त्याच नावाच्या मुलाशी लग्न करेन. तुझं नाव ऐकलं मी मनूकाकाकडून आणि त्याच क्षणी ते नाव खूप आवडलं मला! (समीर अस्वस्थ होऊन उठतो, मधुराही उठते) सत्यशील ह्या नावानंच किती विश्वास तयार होतो नं मनात. अजिबात इन्सिक्युअर वाटत नाही आपल्याला, सत्यशील नावाच्या माणसाशी लग्न करताना... माय डिअर सत्यशील...
समीर - म्हणजे, माझं नाव सत्यशीलऐवजी दुसरं कुठलं तरी असतं, तर तू प्रेम केलं नसतंस माझ्यावर?
मधुरा - म्हणजे कुठलं नाव असतं तर?
समीर - म्हणजे, दुसरं कुठलंही. म्हणजे उदा. समीर.
मधुरा - पण मला नाही आवडत समीर हे नाव.
समीर - अगं खरंच छान नाव आहे ते.
मधुरा - तुझं नाव समीर असेल तर मला फार तर आदर वाटेल तुझ्याविषयी, खूप कौतुकही वाटू शकेल तुझं, पण प्रेम अशक्य. केवळ अशक्य!
समीर - मधुरा, शारदा मिसना आपल्या संस्कृतीतले सगळे विधी माहीत आहेत ना?
मधुरा - हो. का?
समीर - मला भेटलंच पाहिजे त्यांना. एका बारश्याविषयी विचारायचंय त्यांना.
मधुरा - सांगतील ना त्या.
समीर - लगेच भेटतो त्यांना. (जातो)
मधुरा - किती इम्पल्सिव्ह समीर! पण त्याचे केस आवडतात मला खूप. इम्पल्सिव्ह स्वभाव आणि कुरळे केस हे कॉम्बिनेशन किती छान दिसतं नाही? (खुशी येतो)
खुशीराम - मनूकाकांकडे कोणी एक शाल्मली नावाच्या ताई आल्यात.
मधुरा - मनूकाका नाहीये का घरात?
खुशीराम - नाहियेत ते! मघाशी ते बारश्याबद्दल काहीतरी बोलत होते. मग एकदम उठून बाहेर पडले ते.
मधुरा - त्या बाईंना इकडंच बोलव मग.
खुशीराम - बोलवतो ताई. (जातो)
मधुरा - शाल्मलीताई? ही कोणीतरी समाजसेवा करणारी बाई असावी. ह्या समाजसेवा करणाऱ्या बायका अजिबात आवडत नाहीत मला. स्वतःच्या फार प्रेमात असतात त्या!
मधुरा - (पुढे येत) हॅलो, मी मधुरा काळे.
शाल्मली - मधुरा! किती गोड नाव आहे? (शेक हॅन्ड करतात) तुमच्याकडं पाहिलं मी आत्ताच आणि मला अचानक वाटलं की, आपण एकदम ग्रेट-फेन्डस् होणार आहोत. आय लाइक्ड यू द मोमेंट आय सॉ यू. माझ्या मनात तयार झालेलं पहिलं इम्प्रेशन कधीच चुकत नाही.
मधुरा - बसा ना आपण.
शाल्मली - ए, मी तुला अरे-तुरे केलं तर चालेल ना मधुरा?
मधुरा - मला आवडेल ते.
शाल्मली - आणि तूही मला शाल्मलीच म्हण.
मधुरा - (हसते)
शाल्मली - दॅट इज सेटल्ड नाऊ.
मधुरा - बस ना तू. (दोघी बसतात)
शाल्मली - माझी ओळख करून देते मी... माझे वडील आहेत श्री आनंद सुकथनकर. हे नाव आपण अजिबात ऐकलेलं नाहीये, असं वाटत असेल नाही तुला?
मधुरा - अजिबात ऐकल्यासारखं वाटत नाहीये नाव मला हे.
शाल्मली - हं! खरं आहे ते! अगं सांगायची गोष्ट म्हणजे, आमचे पपा कुणाला माहीतच नाहीयेत फारसे. पुरुषानं सतत कामात असावं म्हणून सतत घरकाम करत असतात ते. फार मॅनली आहेत ते!
मधुरा - असणारच! इतकं काम करतात म्हणजे फार मॅनली असणार ते!
शाल्मली - तू इथं पाहुणी आहेस का?
मधुरा - नाही नाही. मी राहते इथं.
शाल्मली - (थोडीशी वैतागून) खरंच? मग तुझी आई किंवा कुणीतरी एखादी वयस्कर बाई असं कुणीतरी राहत असेलच ना इथं.
मधुरा - नाही, मला आई नाहीये. खरं तर मला कुणी नातेवाईकच नाहीयेत.
शाल्मली - खरंच?
मधुरा - मि. खरे माझे गार्डियन आहेत. आणि त्यांनी मला शिकवायला आणि मला सोबत म्हणून शारदाबाई पुणेकर नावाच्या बाई ठेवल्यात.
शाल्मली - तुझे गार्डियन?
मधुरा - हो मि. खरे माझे गार्डियन आहेत.
शाल्मली - पण त्यांनी कधी सांगितलं नाही मला की, ते एका तरुण मुलीचे गार्डियन आहेत म्हणून. बरं ठीक आहे. मधुरा, मी म्हणाले तुला की, तू मला खूप आवडली आहेस, पण आता मला वाटायला लागलंय की, तू वयानं आहेस त्यापेक्षा मोठी असायला हवी होतीस आणि मुख्य म्हणजे जरा कमी सुंदर असतीस तर चाललं असतं... थोडं स्पष्ट बोलू का मी तुझ्याशी?
मधुरा - बोल नं. कौतुक करताना स्पष्ट बोललं नाही तरी चालतं, पण कुणाविषयी वाईट बोलायचं असेल, तर स्पष्टच बोलायला लागतं माणसाला!
शाल्मली - अगदी स्पष्ट बोलायचं मधुरा तर, तू निदान बेचाळीस वर्षांची असायला हवी होतीस. आणि दिसायला पन्नाशीच्या बाईसारखी हवी होतीस... म्हणजे मला माहिती आहे की, सत्यशील हा अतिशय शुद्ध चारित्र्याचा आहे. अप्रामाणिकपणा रक्तातच नाहीये त्याच्या. पण कित्येक वेळा अगदी चारित्र्यवान असे पुरुषही शरीराच्या सौंदर्याकडे ओढले जातात. मानवाचा सगळा इतिहास चारित्र्यवान लोकांच्या अप्रामाणिकपणानं भरलेला आहे. अर्थात हे लोक नसते, तर इतिहास वाचणं फार बोअरिंग झालं असतं.
मधुरा - शाल्मली तू आत्ता सत्यशील म्हणालीस?
शाल्मली - हो.
मधुरा - पण सत्यशील खरे माझे गार्डियन नाहीयेत. त्यांचे मोठा भाऊ माझा गार्डियन आहे.
शाल्मली - सत्यशीलनं मला कधीच सांगितलं नाही की, त्याला मोठा भाऊ आहे म्हणून.
मधुरा - त्यांचे संबंध फार चांगले नाहीयेत... खूप वर्षांपासून.
शाल्मली - म्हणूनच बोलला नसावा तो काही भावाबद्दल. आणि तसं पाहायला गेलं तर, पुरुष आपल्या भावाबद्दल फारसं बोलतच नाहीत. त्यांना मनापासून आवडत नाही तो विषय... मधुरा, तू माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरवलं आहेस. आपल्या मैत्रीवर काळा ढग आलेला चालला नसता मला. पण तुझी खात्री आहे खरोखर की, सत्यशील तुझा गार्डियन नाहीये?
मधुरा - हो. (पॉज) अगदी खरं बोलायचं तर आमची एंगेजमेंट झालीय.
शाल्मली - काय झालीय?
मधुरा - (सीक्रेट सांगितल्यासारखं) आमची एंगेजमेंट झालीय. आम्ही ती बातमी लवकरच सांगणार आहोत सगळ्यांना.
शाल्मली - काहीतरी चूक घडतेय छोटीशी. डार्लिंग मधुरा... सत्यशील आणि मी एंगेज झालोय. आम्हीही ती बातमी लवकरच सांगणार आहोत सगळ्यांना.
मधुरा - (अतिशय नम्रपणे उठत) चूक वगैरे काही नाहीये. मला वाटतंय की, तुझाच काहीतरी गैरसमज झालाय. सत्यशीलनं मला दहा मिनिटांपूर्वीच प्रपोज केलं. (प्रूफ म्हणून डायरी दाखवते)
शाल्मली - (तिची डायरी केअरफुली बघते) हं... सत्यशीलनं मला काल अगदी बरोब्बर सांगायचं तर पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांनी प्रपोज केलं होतं. (तिची डायरी काढते) बघ. सॉरी मधुरा, तुला थोडंस वाईट वाटलं तरी चालेल, पण सत्यशीलवर पहिला हक्क माझा आहे.
मधुरा - शाल्मली, मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायलाच लागणार आहे तुझ्या. तुला थोडा त्रास होईल, पण त्याला आता माझा इलाज नाहीये. हे बघ, सत्यशीलनं मला तुझ्यानंतर प्रपोज केलंय ह्याचा अर्थ, मला बघितल्यावर सत्यशीलचं मन बदललं असाच होतो.
शाल्मली - सत्यशीलसारख्या भावनिक आणि प्रामाणिक माणसाला भावनावश करून त्याला लग्नाचं प्रॉमिस द्यायला लावलं असेल कुणी, तर त्याला वाचवणं हे कर्तव्यच आहे माझं. आणि हे कर्तव्य करताना मला थोडं कठोर व्हायला लागलं, तरी चालणार आहे मला ते!
मधुरा - (विचारात पडलीय) मी त्याला स्वीकारण्याच्याआधी आणि नंतरही, ज्या कुठल्या जाळ्यात अडकलेला असेल माझा सत्यशील, तर त्याला मी त्या जाळ्यातून सोडवणं हे माझं पहिलं कर्तव्य ठरेल.
शाल्मली - मी जाळ्यात अडकवलं आहे सत्यशीलला, असं तुम्हाला म्हणायचं आहे का मधुरा तुला? तू अत्यंत फाजील अशी मुलगी आहेस!
मधुरा - मी सत्यशीलला भावनावश करून लग्नाचं प्रॉमिस द्यायला लावलं, असं म्हणायचं होतं तुला शाल्मली? अगं तू समजतेस काय स्वतःला… वाह्यात मुलगी!
शाल्मली - मी अतिशय चांगली मुलगी आहे. अतिशय गोड स्वभावाची आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की, तू मला वाटेल तसं बोलावंस. फार वाहवत जाऊ नकोस.
मधुरा - (उठते) माझ्या बिचाऱ्या सत्यशीलला जर कोणी फसवत असेल, तर मी वाहवतच काय पण पोहतही जाईन.
शाल्मली - ज्या क्षणी मी पाहिलं तुला तेव्हाच वाटलं होतं मला की, ही एक अत्यंत उथळ, खोटारडी आणि मग्रूर मुलगी आहे. माझं पहिलं इम्प्रेशन कधीच चुकत नाही.
मधुरा - (हर्ट झालेली. निग्रहानं) मिस शाल्मली, तुम्ही तुमचा बहुमूल्य की काय म्हणतात तो वेळ माझ्याबरोबर खूप वाया घालवलेला आहे. तुम्हाला अजून अपॉइंटमेंटस् असतीलच पुण्यात. (मनू येतो)
शाल्मली - (त्याला बघून) सत्यशील, माझा सत्यशील! (त्याच्या जवळ जाते, त्याचा हात हातात घेते.)
मनू - शाल्मली! इथे?... किती छान दिसतेयस तू!
शाल्मली - (एकदम मागे होत) मला एक सांग सत्यशील, या इथं जी मुलगी उभी आहे, तिच्याशी तुझी एंगेजमेंट झालीय का? (मधुराकडे बोट दाखवते)
मनू - मधुराशी एंगेजमेंट? छे छे. काही तरी काय बोलतेयस तू? कुणी सांगितलं तुला?
शाल्मली - (त्याचा हात परत हातात घेते, मधुराकडे अभिमानाने पाहते)
मधुरा - (गोड हसून) वाटलंच मला, काहीतरी गैरसमज झालाय. तुझ्या हातात ज्याचा हात आहे, तोच आहे माझा गार्डियन, मनस्विन काळे.
शाल्मली - आय बेग युवर पार्डन. काय म्हणालीस?
मधुरा - हा माझा मनूकाका आहे. मनस्विन काळे. माझा गार्डियन.
शाल्मली - (मनूपासून दूर होत) मनू?...ओह! (तेवढ्यात समीर येतो)
मधुरा - आणि हा आहे सत्यशील. सत्यशील खरे.
समीर - (इतर दोघांना न पाहता तिच्याकडे जातो) मधुरा, माझी मधुरा!
मधुरा - (मागे सरते) एक मिनिट सत्यशील. या इथं उभ्या असलेल्या स्त्रीशी तुझी एंगेजमेंट झालेली आहे?
समीर - (वळून बघतो) कोणत्या स्त्रीशी. माय गॉड! शाल्मली?
मधुरा - म्हणजे झालीय तुझी एंगेजमेंट?
समीर - छे छे. काहीतरीच काय? कुणी सांगितलं तुला?
शाल्मली - माझ्या मते इथं थोडा गैरसमज झालेला आहे मधुरा तुझा. ज्याचा हात तू हातात घेतलायस, तो माझा कझिन आहे. आणि त्याचं नाव सत्यशील नसून समीर आहे. समीर सुकथनकर!
मधुरा - (समीरचा हात सोडून) समीर सुकथनकर? ओह! (दोघी एकमेकींच्या जवळ जातात. एकमेकींच्या कमरेभोवती हात ठेवतात)
मधुरा - तुझं नाव समीर आहे.
समीर - खरं सांगायचं तर हो.
मधुरा - ओह.
शाल्मली - आणि तुझं नाव मनस्विन आहे?
मनू - हो, माझं नाव मनस्विन आहे.
मधुरा - (शाल्मलीला) घोर, घोर फसवणूक झालीय आपल्या दोघींची.
शाल्मली - मधुरा, किती अन्याय झालाय तुझ्यावर! (तिचे डोळे आपल्या रुमालानं. अत्यंत प्रेमानं पुसते)
मधुरा - तुझीसुद्धा किती घोर फसवणूक झाली आहे शाल्मली!
शाल्मली - तू माझ्या बहिणीसारखी आहेस, हो ना मधुरा? (दोघी मिठी मारतात. समीर आणि मनू स्टेजवर अस्वस्थ होऊन फेऱ्या मारतायत.)
मधुरा - (एकदम आनंदाने) शाल्मली, आपण माझ्या मनूकाकाला एक प्रश्न विचारू शकतोय. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम सुटेल. (तिच्या कानात सांगते).
शाल्मली - खरंच की! मला सुचलंच नाही हे. सगळेच प्रश्न सुटून जातील एकाच प्रश्नाच्या उत्तरात. मि. मनस्विन, तुमचा तो सत्यशील नावाचा भाऊ कुठंय? आम्ही दोघीही त्याच्याशी एंगेज झालोय. त्यामुळं आता आम्हाला सत्यशीलला भेटायलाच हवंय. कुठं आहे तो तुमचा भाऊ सत्यशील.
मनू - हे बघा मुलींनो, मी आता तुम्हाला जे काही सांगतो आहे, ते नीट ऐका. मला सत्यशील नावाचा कोणताही भाऊ नाही. सत्यशील नावाचाच काय पण, मला कोणताच भाऊ नाही. कुठलाही भाऊ मला कधीच नव्हता. आताही तो नाहीये, आणि आता मी भाऊ होऊही देणार नाहीये.
मधुरा - तुला भाऊच नाही?
मनू - नाही.
मधुरा - आपण एखाद्या माणसावर प्रेम करावं, त्याला आपलं हृदय द्यावं, त्याच्याबरोबर लग्नाच्या आणाभाका घ्याव्यात आणि नंतर एकदम समजावं आपल्याला की, ह्या जगात तो माणूसच नाहीये. दुर्दैव, दुर्दैव म्हणतात ते हेच.
शाल्मली - बघ जरा नीट विचार कर, एक तरी असेल.
मधुरा - (चिडून) तुला एकही भाऊ नाही. कुठल्याच प्रकारचा?
मनू - अॅब्सोल्यूटली नाही.
शाल्मली - अरे चुलत भाऊ असेल एखादा? (मनू मान हलवतो) मग मामेभाऊ... आतेभाऊ तरी? (मान हलवतो) हां, एक भाऊ आहे मला. भोजनभाऊ.
मधुरा - चालेल आम्हाला.
मनू - पण त्याचं नाव समीर सुकथनकर आहे.
मधुरा - स्त्रीचा जन्म दुःख भोगण्यासाठी आहे, असं म्हणतात ते खरंय.
शाल्मली - मधुरा, चल आत जाऊ आपण.
शाल्मली - दुःख एन्जॉय करायचं तर एकटेपणा पाहिजेच... पण ते दोघं आपल्या मागोमाग येणार नाहीत ना?
मधुरा - शक्य नाही. त्यांची हिम्मतच होणार नाही. (दोघांकडे जळजळीत कटाक्ष टाकून दोघी आत जातात)
समीर - हेच ते परफेक्ट डबल लाईफ जगण्यामधलं सेन्सेशन! अशी मजा आली नव्हती कधी.
मनू - (वैतागून) जरा सिरियस हो समीर.
समीर - मी सिरियसच आहे. मौजमजा करण्याबाबत अत्यंत सिरीयस आहे मी.
मनू - नाही सुधारणार कधी तू!.. ह्या सर्व गोंधळातून एकच चांगली गोष्ट झालीय, आणि ती म्हणजे, तुझ्या त्या विलासचं बिंग फुटलंय ह्या सगळ्या प्रकारात. आता तू परत मुंबईबाहेर पडू शकणार नाहीस, मनाला येईल तेव्हा. सर्व्हज यू राइट!
समीर - आणि तो तुमचा सत्यशीलही उघडा पडलाय इथं. नाही का मनूकाका? आता तुलाही मुंबईला येता यायचं नाही. मेनलँड चायना काय? तुलासुद्धा असंच पाहिजे होतं.
मनू - तू मधुराशी अत्यंत बेजबाबदारपणे वागलायस. तिच्यासारख्या अत्यंत गोड, सिंपल आणि निरागस मुलीला सत्यशील म्हणून फसवताना काही वाटलं नाही तुला? तेही मी तिचा गार्डियन असताना.
समीर - आणि शाल्मलीसारख्या अत्यंत हुशार, व्यवहारी आणि एक्सपिरियन्स्ड मुलीला तू जे फसवलंयस, ते तर त्याहूनही वाईट आहे. ती माझी सख्खी मावस बहीण असताना फसवलंस तू तिला?
मनू - मला तिच्याशी लग्न करायचंय. दॅटस् ऑल. माझं प्रेम आहे तिच्यावर.
समीर - आणि मलाही मधुराशी लग्न करायचंय. दॅटस ऑल. माझं मनापासून प्रेम आहे तिच्यावर.
मनू - तुझं मधुराशी लग्न होण्याची शक्यता शून्य आहे.
समीर - शाल्मली आणि तुझ्या लग्नाचे चान्सेसही फार काही ग्रेट नाहीयेत.
मनू - धिस इज नॉट युवर बिझनेस.
समीर - (टेबलावर ठेवलेले मफिन्स खाऊ लागतो)
मनू - तू मफिन्स कसे खाऊ शकतोस ह्या वेळी? सगळा गोंधळ माजलाय आणि तू मफिन्स खातोयस शांतपणे?
समीर - घाईघाईत मफिन्स खाता येत नाहीत मला. घाई केली, तर मफिन्समधलं बटर हातांना लागतं!
मनू - तू शांतपणे मफिन्स खातो आहेस ह्याबद्दल बोलत नाहीये मी! मी म्हणतोय की, असा प्रसंग गुदरला असताना तू मफिन्स शांतपणे कसे खाऊ शकतोयस? यू आर हार्टलेस!
समीर - माणसावर संकट आलं की, खाण्यासारखा रिलीफ नसतो दुसरा कुठला. माझ्यावर खूप मोठं संकट वगैरे आलं की, खाण्यापिण्याशिवाय काही करतच नाही मी ते संकट जाईपर्यंत .
मनू - (उठत) पण म्हणून सगळे मफिन्स संपवलेच पाहिजेत असं काही नाहीये. (मफिन्सची बास्केट त्याच्यासमोरून उचलतो) त्यापेक्षा हा टी केक घे... मला अजिबात आवडत नाहीत टी केक्स.
समीर - मला मफिन्सच आवडतात!
मनू - समीर, तू इथून लवकरात लवकर निघून जा अशी विनंती आहे माझी तुला!
समीर - अरे, डिनर झाल्याशिवाय जाऊ कसा देतोस मला तू? तुझ्यावर इतकं मोठं संकट आलेलं असताना, तुला एकट्याला डिनर करू देणार नाही मी. शिवाय मी शारदा मावशींना सांगून सहा वाजता माझं बारसं करायचा कार्यक्रम ठरवलाय.
मनू - अरे, एवढा सगळा गोंधळ झाला तरी तुझा नॉनसेन्स सोडत नाहीयेस तू समीर. बारसं कसलं करतोयस सहा वाजता? शुद्धीत आहेस का तू? हे बघ, तुला तुझं बारसं वगैरे काही करता येणार नाहिये. कारण, मी माझं बारसं साडेपाच वाजता ठेवलंय. माझं नाव त्या सत्यशील ठेवणार आहेत.
समीर - माझंपण!
मनू - अरे, तुला कळत कसं नाही? आपल्या दोघांचही नाव सत्यशील ठेवलं गेलं, तर काही अर्थ आहे का त्याला? (मफिन्सची बास्केट उचलतो).
समीर - मनू, तू परत मफिन्स खायला लागलायस?
समीर - मी सांगितलं होतं तुला की, मला मफिन्स फार आवडतात म्हणून.
मनू - मलासुद्धा आवडतात मफिन्स! तू टी केक घे पाहिजे तर! मला अजिबात आवडत नाहीत टी केक्स!
समीर - आणि तरीही तू आपल्या गेस्टना टी केक का ऑफर करतोस? हे तुझं आतिथ्य? कशी द्यायची माझी बहीण आम्ही तुला? त्यापेक्षा विहिरीत ढकलेन मी तिला.
मनू - मी तुला जायला सांगितलेलं आहे इथून! मला नको आहेस तू इथं! तू का जात नाहीयेस?
समीर - कारण माझा चहा अजून संपलेला नाहीये, आणि बास्केटमध्ये अजून थोडे मफिन्स उरलेले आहेत.
(दुसऱ्या अंकाचा पडदा)
.................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment