आपण एका थोर भारतीय नेत्याच्या म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या (त्यांनी मानवी प्रतिष्ठा आणि नागरी हक्क यांच्यासाठी दिलेला लढा, आधुनिक भारताचा त्यांनी घातलेला पाया आणि आधुनिक जगाचे त्यांनी आपल्या शिकवणीतून केलेले वैचारिक आणि आध्यात्मिक पुनरुत्थान यासाठी) ऋणात राहणे आवश्यक आहे. वास्तविक ते चैतन्याने क्रियाशील झालेले बोधिसत्त्वच आहेत. जर ते आज येथे उपस्थित असते, तर त्यांनी आपल्या विचारांचा प्रखर प्रकाशझोत ‘बौद्ध धर्म आणि जागतिक शांतता’ या विषयावर टाकला असता. त्यासाठी भारताच्या वैचारिक विश्वात रमलेले लेखक आणि पाश्चिमात्य जगातले तत्त्वज्ञानी, इतिहासतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि कवीसुद्धा – जे त्यांना अतिपरिचित होते - अशांना या परिषदेत बोलावले असते. आणि मग ‘बायबल’काळातील एखाद्या प्रेषिताप्रमाणे आपला आवाज चढवून आपण आजच्या जगातल्या भीषण परिस्थितीला कसे सामोरे जात आहेत, यासंबंधी त्यांनी इशारे दिले असते.
जगामध्ये आज संपत्ती आणि संधी यांच्या उपलब्धतेमध्ये आलेली विषमता; पाणी, अन्न, निवारा, आरोग्य आणि शिक्षण यांच्या पुरवठ्यामध्ये पडलेल्या दऱ्या, आणि जागतिक पातळीवर निर्बल राष्ट्रांचे सबलांकडून आणि मोठमोठ्या अर्थसंस्थांकडून होणारे शोषण यांच्यावर ते तुटून पडले असते. सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व बेकायदेशीर व्यवहार, लक्षावधी मानवांचा संहार करणारी आधुनिक शस्त्रास्त्रे, गरीब व श्रीमंत दोन्ही प्रकारच्या राष्ट्रांना सारखीच भेडसावणारी संघटित गुन्हेगारी व दहशतवाद आणि शेवटी, वंश, धर्म, जाती यांच्यावरून समाजात पडलेल्या भेगा, वंशवाद, राष्ट्रवाद व संस्कृती यांच्यावरून वाढलेले दीर्घ द्वेष आणि तिरस्कार या सर्व प्रवृत्तींचा त्यांनी प्रखरपणे निषेध केला असता.
पण आंबेडकर एवढेच करून थांबले नसते. तर मानव जात आता अतिमहत्त्वाचे वळण घेत आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी पुरावा गोळा केला असता. सध्या आपण अशा कालखंडात आहोत, जेव्हा जागतिक स्तरावरील दळणवळण व संपर्क व्यवस्था, या यामुळे लोकांना एकत्र येऊन त्यांच्या समोरील आपत्तींशी सामना करता येईल. अफाट भौतिक आणि तांत्रिक साधनसामग्रीचे स्त्रोत आणि सहानुभूती व करुणेने भारलेल्या स्वयंसेवकांच्या सेना भूकंप, त्सूनामी आणि युद्धासारख्या आपत्तींना बळी पडलेल्यांच्या सेवेसाठी धावतील; युनो (संघ), आंतरराष्ट्रीय न्यायालय, यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे निर्णय मानले जाऊन त्यांना काम करू दिले जाईल. उपयुक्त विधायक कामासाठी विविध देशांची सरकारे एकत्र येऊन काम करतील आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, ज्यू आणि बौद्ध असे सर्व जण आपले सर्व साधनस्त्रोत एकत्र करून आपल्या मुलांना वाढवतील, या सर्व गोष्टींची जाणीव डॉ. आंबेडकरांनी आपल्याला निश्चितपणे करून दिली असती.
डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या अतिशय प्रिय आणि त्यांच्या जीवनाची अखेरची वर्षे व्यापून टाकणाऱ्या आणि ज्या साठी प्रकृती-अस्वास्थ्याला व राजकीय नैराश्याला तोंड देत त्यांनी आयुष्यातल्या सर्वश्रेष्ठ विषयावरील लिखाण प्रसिद्ध केले, तो विषय म्हणजे ‘बौद्ध आणि सामाजिक, परिवर्तन’. त्यावर त्यांनी केलेले भाष्य फार विचारप्रचूर आणि विदारक होते. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या निधनापूर्वी काहीच दिवस आधी केलेले ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ हे भाषण आणि त्यांचे शेवटचे पुस्तक ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ज्याचे संपादन त्यांच्या जीवनाच्या अखरेच्या क्षणापर्यंत ते करत होते. या दोघांमधून त्यांनी आपल्या काळातली आव्हाने आणि त्यामागे दिसणारे आशेचे किरण आपल्यासमोर उभे केले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शांतता आणि न्याय यांच्या प्रस्थापनेसाठी बौद्ध तत्त्वज्ञान जगाला कसे मार्गदर्शक ठरू शकेल, याचेही विवेचन त्यांनी केले. डॉ. आंबेडकरांनी या विषयांवर स्पष्टीकरण देताना त्या वेळी इतर कोणाशी विचारविनिमय न करता स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडली होती, हे फारच थोड्यांना माहिती होते. बौद्धांच्या परंपरांचा आधार घेत त्यांनी आपल्या काळासमोरील आव्हानांचे धाडसीपणाने आणि नवा मार्ग अनुसकरून आविष्करण केले. १९५६ साली नागपूरला धर्मपरिवर्तनासाठी सर्व जमले असता, आधीच्या संध्याकाळी पत्रकारांनी आंबेडकरांना ते आणि त्यांचे अनुयायी दुसऱ्या दिवशी सकाळी कोणत्या प्रकारचा बौद्धधर्म स्वीकारणार आहेत, याबद्दल विचारले, तेव्हा ते म्हणाले, “भगवान बुद्धांनी स्वत: जे ज्ञान लोकांसमोर प्रकट केले, त्याच्या मर्यादांमध्ये आमचा बौद्ध धर्म राहील. हीनयान आणि महायान या धर्माच्या अनुयायांच्या दोन फळ्यांपासून तो मुक्त राहील. आमचा बौद्ध धर्म नवा असेल, त्याचे वाहन नवे असेल. आपण त्याला ‘नवायन’ म्हणू.”
माझ्या विवेचनात डॉ. आंबेडकरांचा विचार आणि त्याच्याभोवतीची दलितांची धर्मपरिवर्तनाची चळवळ केंद्रस्थानी ठेवून काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. या निष्कर्षांना गेल्या पन्नास वर्षांत आशियातील बौद्धधर्मीय राष्ट्रे आणि पाश्चिमात्य देशांत स्थायिक झालेले बौद्ध समाज, यांच्या बौद्धधर्मीय परंपरा ज्या जागतिक फेरबदलामुळे लयाला गेल्या, त्याचाही संदर्भ आहे. भारतातील दलित समाजांप्रमाणे वर निर्देशित केलेले समाजही दडपशाही आणि हिंसा यांचा अवलंब करणाऱ्या शक्तींविरोधात झगडत आहेत. आणि भारतातील दलितांप्रमाणेच जगण्याचे आणि अस्तित्व टिकवून धरण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत.
त्याचबरोबर जुन्या राखेवर नव्या समूहांची उभारणीही करत आहेत. या प्रक्रियेत बौद्धधर्माची जुनी शिकवण आणि आचार अधिकच लखलखीत आणि पुनरुज्जीवित झाले. तेव्हा प्रथम या नवीन बौद्ध धर्माचा किंवा आंबेडकरांच्या ‘नवायनां’चा जागतिक उदय कसा झाला हे पाहू. नंतर जागतिक शांततेच्या ध्येयामागील या बौद्ध धर्माच्या शक्तीने दिलेल्या तत्त्वज्ञानाचा विचार करू.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
नव बौद्ध धर्माचा किंवा ‘नवायनां’चा उदय
अलीकडील काही वर्षांत बौद्धांच्या धार्मिक परंपरांच्या स्वरूपात आणि सिद्धान्तांत काही लक्ष्यवेधी बदल घडून आले आहेत. एका शतकापूर्वी जर्मन समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांनी या तत्त्वज्ञानाला ‘राजकीय दर्जा नसलेला धर्म’ असे संबोधले होते. याचे भटकत राहण्याचे धार्मिक तंत्र बौद्धिक क्षमतेने युक्त अशा भिक्षूंनी सांभाळले असून, जे व्यक्तिगत मोक्षाच्या उद्दिष्टासाठी प्रयत्नशील आहेत, असेही बौद्ध धर्मीयांचे वर्णन केले होते. नवीन बौद्धवाद किंवा नवबौद्ध धर्म हा आशियातील भू-राजकारण आणि विविध देशांच्या अस्मितांना उजाळा देणारा ठरला आहे. संघर्षस्थगिती, अहिंसक समाज परिवर्तन, सामाजिक नीती आणि न्यायाधारित राजकारण, या मुद्द्यांवर जागतिक संवादात ओळखू येणारा आवाज ठरला आहे.
या नवबौद्धवादाचा परिणाम असंघटित किंवा सुट्या सुट्या राहिलेल्या बिनसरकारी स्वयंसेवी संघटनांवर झाला असून, नव्या जागतिक वातावरणातील त्यांचे शिक्षण आणि आचार यांनी त्याचे मार्गदर्शन होत आहे. १९६० साली व्हिएतनाममध्ये युद्ध चालू असताना तेथील एक भिक्षू थिक्-न्हाट-हान यांनी आपल्या सहकारी भिक्षूंचा युद्धविरोधी संघर्ष वर्णन करण्यासाठी मुक्ती किंवा मोक्ष या जुन्या संकल्पनेचा खुलासा करण्यासाठी ‘नवबौद्धवाद’ ही संज्ञा वापरली होती. निर्वाण किंवा आत्मबोध या व्यक्तिगत ध्येयांवर भर न देता नवबौद्धवादाने ‘लोकोदय’ (जागतिक जागरण) या सामूहिक कल्पनेवर भर दिला- ज्यांमध्ये व्यक्ती, समाज, गावे आणि राष्ट्रे यांच्या अभ्युदयाचे आश्वासन परलोकात नव्हे, तर याच आयुष्यात, याच जगात याच भूमीवर देण्यात आले आहे.
श्रीलंकेमध्ये ११०००पेक्षा अधिक खेड्यांमध्ये आणि गावांमध्ये काम करणारे स्वयंसेवक, भिक्षू आणि विद्यार्थी ज्यांच्या कार्यामागे बौद्ध धर्म पुरस्कारित सर्वोदय श्रमदान चळवळीची प्रेरणा आहे, त्यांच्या ‘जागतिक जागरण’ या कल्पनेमध्ये स्वच्छ पर्यावरण, शुद्ध पिण्याचे पाणी, किमान पेहरावासाठी लागणारी वस्त्रे, आहार, निवास आणि आरोग्य, संपर्काची सोय, ऊर्जा, शिक्षण, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्त्रोत या सर्व गरजा पूर्ण करण्याचा ध्यास आहे.
१९५०च्या दशकात आशियामध्ये ज्या नवबौद्ध मुक्तीचळवळी चालू झाल्या, त्यांपैकीच श्रीलंकेत ‘सर्वोदय श्रमदान’ ही एक चळवळ होती. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात श्रीलंका सरकारचे सैन्य आणि तमीळ बंडखोर यांच्यामधील संघर्षाला या संघटनेने अहिंसक पद्धतीने विरोध दर्शवला होता. या संघटनेचे बळही वाढत चालले आहे.
बौद्धांची (संघटनांची) समाजसेवा आणि राजकीय सक्रियता यांच्यामध्ये जगभर झालेल्या वाढीचे अलीकडे दृश्य दिसते आहे. हे केवळ परंपरागत समाजांमध्येही दिसते आहे. त्जिन-हुआंग मायकेल झियाओ या लेखकाने ‘जागतिकीकरणाची अनेकता : समकालीन जगातील सांस्कृतिक विविधता’ या ग्रंथात तैवानमधील बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासंबंधी लिहिले आहे –
“कॅथलिक आणि प्रॉस्टेस्टंटस या पंथांच्या कुंठित विकासाच्या तुलनेत स्थानिक बौद्ध धर्माचे नवीन धार्मिक प्रबोधन किंवा पुनरुत्थान चालू झाले आहे, असे मानण्यास हरकत नाही. बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या संख्येत मागील दशकात अभूतपूर्व अशी वाढ झालेली असून १९८०च्या दशकात आठ लाख असलेल्या अनुयायांची संख्या २००० साली ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. बौद्ध मंदिरांची संख्याही १,१५७वरून ४,५००पेक्षा अधिक वाढली आहे. बौद्ध भिक्षू आणि भिक्षुणी यांची संख्याही याच काळात ३,४७०वरून १०,००० वर गेली आहे…”
या नव्याने सचेतन झालेल्या बौद्ध धर्मात आणि त्याच्या परंपरागत अवतारात जाणवणारा मुख्य फरक म्हणजे त्यांच्या सैद्धान्तिक भूमिकांत जाणवणारे अंतर. नवीन गट दोन्ही हात पसरून समाजाला, त्यांची जनकल्याणाची कामे आणि सामाजिक उद्दिष्टे यांना भरभरून साहाय्य करताना दिसतात. हे नवबौद्धवादी गट समाजकल्याण, आरोग्य सेवा, शिक्षण, प्रकाशन आणि पर्यावरण संवर्धनामध्ये मग्न झालेले दिसत असल्यामुळे तैवानमध्ये गेली अनेक शतके रूढ असलेल्या धर्मोपासनेचा मार्ग एकदम बदलून गेल्याचे दृश्य दिसते.
अशाच प्रकारचे बदल दक्षिण आणि आग्नेय प्रदेशातील थेरवादी देशांमध्ये – श्रीलंका, थायलंड, कंबोडिया आणि म्यानमार या देशांमध्ये, त्याचप्रमाणे आग्नेय व पूर्व आशियातील महायान देशांत, म्हणजे व्हिएतनाम, जपान, तैवान व कोरिया या देशांमध्ये आणि हिमाचल प्रदेशातील वज्रयान देश – तिबेट, लडाख, सिक्कीम आणि भूतान यांमध्ये घडून आलेले दिसतात. पण त्या सर्वांपेक्षा अधिक नाट्यपूर्ण परिवर्तन, बुद्धाच्या आणि त्याच्या धर्माच्या जन्मभूमीत आणि जिथे त्या धर्माचा विकास, ऱ्हास होऊन हजार वर्षांपूर्वी तो पूर्णपणे अस्तंगत झाला, त्या भारतात आज चाललेल्या दलित-बौद्ध मुक्ती चळवळीतून झाले आहेत.
या चळवळीकडे आणि धर्मांतराकडे लाखो लोक ओढले जात आहेत आणि मानवी दु:खाची निधर्मी जाणीव देणारे दारिद्रय, सामाजिक अन्याय, शासनयंत्रणेतील भ्रष्टाचार, जुलूम यांच्या विरुद्धचा संघर्ष आणि मानवाच्या सर्वंकष मुक्तीचा डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या घोषणेतून मिळालेला संदेश, यांमधून जुन्या बौद्ध तत्त्वज्ञानापासून ही नवबौद्ध संघटना किती पुढे आली आहे, याचा पुरावा मिळतो.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
‘बौद्ध धर्म आणि विसाव्या शतकातील आशियाचे राजकारण’ (Budhhism and Politics in the 20th Century Asia) या ग्रंथाचे लेखक ब्रिटिश विचारवंत इयान हॅरिस यांनी त्या ग्रंथाच्या परिचयपत्रात नवबौद्धवादाच्या अभ्यासासाठी एक आराखडा किंवा चौकट सुचवली आहे-
“सध्याच्या बौद्धधर्मीय जगातला एकही देश असा नाही की, ज्याला आधुनिकतेच्या एकाही बाजूचा किंवा घटनांचा स्पर्श झालेला नाही. मग तो वसाहतवाद असो की औद्योगिकीकरण, दूरसंचारयंत्रणा, बाजारवाद, अतिरेकी व्यक्तिवाद किंवा डाव्या अथवा उजव्या शक्तींची एकाधिकारशाही, यांपैकी काहीही असो. या अशा अनपेक्षित जहाल परिस्थितीत बौद्धांना त्या परिस्थितीचा स्वीकार करणे किंवा हळूहळू अस्तंगत होत जाण्याच्या शक्यतेचा स्वीकार करणे एवढेच पर्याय खुले होते. या काळात, विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात वसाहवादविरोधी चळवळीत बौद्धांचा सहभाग होता, हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे नव्या किंवा नवा मुखवटा चढवून उभ्या राहिलेल्या कडव्या राष्ट्रवादी, सुधारणावादी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय, उपशामक आणि प्रतिक्रियावादी व मूलतत्त्ववादी अशा सर्व प्रकारच्या स्वरूपातल्या बौद्धधर्मीय संघटना विसाव्या शतकात क्रियाशील झालेल्या दिसतात.”
एका दृष्टीक्षेपात रूढी-परंपरा व आधुनिकता यांच्यामधील संघर्ष पाहून आपल्या हे लक्षात येते की, हॅरिस यांनी केलेले पृथक्करण बौद्धधर्मासमोर दोन सरळ पर्याय उभे करते – स्वीकारा अगर नष्ट व्हा. त्याचबरोबर या संघर्षातून पुढे आलेल्या प्रतिक्रियांची मांडणीही सामोरी येते. वसाहतवादविरोधी आणि राष्ट्रीय (सनातनी) चळवळींपासून सुधारणावादी, जहाल सामाजिक क्रियाशील चळवळी, मार्ग वळून व्यक्तिगत किंवा स्वातंत्र्यवादी उपशामक चळवळी, ते मूलतत्त्ववादी प्रतिगामी चळवळी, असे या प्रतिक्रियांचे वर्तुळ पूर्ण होताना दिसते.
या सर्व चळवळींना ‘पुरोगामी’ म्हणता येणार नाही. नवबुद्धवाद किंवा डॉ. आंबेडकरांच्या भाषेत ‘नवायान बौद्धवाद’ याची व्याख्या तळातून वर आलेला, म्हणजे स्थानिक तळागाळाच्या संघटनांतून पसरत चाललेला बौद्धवाद, राष्ट्रीय धार्मिक संघटना किंवा सरकारे यांनी वरून लादलेला नव्हे!
हॅरिसच्या या ग्रंथामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या बौद्ध असलेल्या दहा राष्ट्रांमधील धार्मिकदृष्ट्या मोठ्या आणि सरकारी संस्था यांचा विकास आणि परस्परांवर होणारे परिणाम यांना केंद्र करण्यात आले आहे. याच प्रक्रियांना थाई बुद्धवादी विचारवंत ‘कॅपिटल बी- बुद्धिझम’ असे संबोधतात. तरीसुद्धा हॅरिस यांचे हे निरीक्षण जगातल्या ‘स्मॉल बी- बुद्धिझम’च्या चळवळींकडे अभ्यासकांचे आणि विचारवंतांचे लक्ष मागील दशकात कसे वेधले गेले, याचा खुलासा करते. त्यांत स्थानिक व धार्मिक संघटना ते आंतरराष्ट्रीय बिनसरकारी संघटना – ज्यांचा रोख न्याय, स्वातंत्र्य आणि पर्यावरण संरक्षण, यांच्यावर केंद्रित झाला आहे – अशांचा समावेश आहे. शांतता प्रस्थापनेसंबंधांत या सर्व संघटना आपल्याला काय सांगतात?
बौद्ध धर्म आणि शांतिप्रस्थापना
बौद्ध परंपरांचे शांती प्रस्थापनेचे प्रयत्न आणि प्रबोधन, शिवाय मागील २५०० वर्षांतील त्यांच्या अहिंसक चळवळींचा इतिहास यांबद्दल त्यांची जगात सर्वत्र प्रशंसा होत आहे. ही प्रशंसा योग्य असली, तरीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती ही की, बौद्ध धर्माचे योगदान केवळ शांतिप्रस्थापनेच्या बांधीलकीत नाही, कारण जगातले सर्वच धर्म या ना त्या रितीने शांतता प्रस्थापनेचा दावा करतात. तर त्यासाठी त्यांनी स्वीकारलेला विशिष्ट दृष्टीकोन आणि तंत्रे यांमुळे व्यक्तीव्यक्तींमध्ये आणि समाजसमूहांमधील व्यवहारात शांतता प्रस्थापित करण्यास अगर टिकवून ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. बौद्ध समाजांना हिंसेचाही परिचय होता, असे इतिहासात दाखले आहेत.
बौद्ध तत्त्वज्ञानाची अगर धर्माची शिकवण, आणि ती देणाऱ्या संस्था टिकवून ठेवण्यासाठी बौद्धधर्मीय युद्धाला सामोरे गेले. शिवाय राष्ट्रीय हितसंबंधांच्या जपणुकीसाठी आणि शेजारील राष्ट्रे जिंकून घेण्यासाठी सैन्याला दिल्या जाणाऱ्या शिक्षणात बौद्धवादी ध्यान-चिंतन पद्धती आणि बौद्ध मठनिवासींची करडी शिस्त त्या सैन्याची ताकद वाढवण्यासाठी वापरली जात असे.
तरीसुद्धा बौद्ध परंपरांनी शांततानिर्मिती आणि अहिंसेची जोपासना, याकरता भरपूर साधनसामग्री पुरवलेली आहे. आणि आशियामधील व पश्चिमेकडील अनुयायांवर त्यांचेच संस्कार झालेले आहेत. या शिकवणुकीतील काही गोष्टी अशा –
- बुद्धाने सांगितलेली पायाभूत धर्मतत्त्वे माणसाच्या क्लेशांपासून त्याची मुक्तता करणारी आणि त्याचे कारण शोधणारी चार उदात्त सत्ये (पाली अरिया साक)
- पहिला महत्त्वाचा निर्बंध म्हणजे जिवंत प्राण्यांच्या – सजीवांच्या हत्येपासून दूर राहणे (अहिंसा) किंवा त्यांना न दुखवणे. प्रतिकार किंवा बदला यांच्यासाठी पर्याय शोधणे.
- दया, करुणा, आनंदाचा सहानुभाव घेणे आणि मनाची समतोल वृत्ती (ब्रह्मविहार) यांची वाढ किंवा जोपासना करण्यासाठी प्रयत्नशील राहणे. सामाजिक जबाबदारीने वागण्यासाठी मनाला शिक्षण देणे.
- संघर्ष मिरवण्यासाठी नि:स्वार्थीपणा (अनत्त,) परस्परावलंबन (परिक्कासामुप्पद) आणि निर्द्वंद्व (शून्यता) या नवीन आदर्शांचा स्वीकार
- खरे ज्ञान प्राप्त झालेले (बोधीसत्व) कुशल तंत्रे (उपाय) वापरून इतरांची दु:खांपासून मुक्तता करू शकतात, यावर विश्वास.
- चक्र फिरवणारे (चक्रप्रवर्तिन) थोर बौद्धजन आणि नैतिक मार्गदर्शन करणारे नेते (धम्मराज) – जनतेची मने आणि अंत:करणे जिंकून घेणारे – शत्रू आणि प्रदेश यांना दूर ठेवणारे आपल्या अथांग प्रज्ञेने आणि भूतदयेने ते कार्य साधतात.
या शिकवणुकीचा पाठपुरावा करणारे आणि निष्ठावान प्रचारक, ज्या ज्या संस्कृतींना बौद्ध धर्माचा स्पर्श झाला आहे, त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात मिळाले. आधुनिक जगात मानवी हक्क आणि सामाजिक न्याय यांसाठी चालवलेल्या अहिंसक लढ्यांना आशिया खंडात आणि पाश्चिमात्य देशांत अनेक बौद्ध अनुयायी लाभले.
अलीकडच्या वर्षांत नोबेल शांतता पारितोषिकांचे मानकरी म्हणून तेन्झिन ग्योत्सो, तिबेटचे दलाई लामा आणि आँग सान सू की या म्यानमारच्या लष्करी सरकारच्या प्रमुख विरोधक, या दोन व्यक्तींची नावे जगापुढे आली. त्यांनी आपल्या देशातील लोकशाही आणि सांस्कृतिक पुनरुत्थान, या ध्येयांसाठी हुकूमशाही राज्यकर्त्यांच्या विरोधात अहिंसक प्रतिकार अवलंबला आहे. नोबेल शांतता पारितोषिकासाठी नामांकन झालेल्या आणखी काही बौद्ध नेत्यांची नावे अशी आहेत - थिक् न्हाट हान् (व्हिएतनाम), डॉ. ए.टी. अरियरत्ने (श्रीलंकेतील सर्वोदय श्रमदान चळवळीचे प्रवर्तक), वेन महा घोसानन्द (कंबोडियातील शांती आणि पुनर ऐक्य चळवळीचे नेते) आणि सुलक सिवरक्ष (थायलंडमधील रूढ बौद्ध मत संघटनेतून बाहेर पडून नवायान बौद्धांच्या आणि इतर संघटनांचे आंतरराष्ट्रीय जाळे पसरवणारे संघटक). १९९० साली आंबेडकरांच्या जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्ताने त्यांना समाजसेवा आणि राष्ट्रीय नेतृत्व यांच्या सन्मानार्थ ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
बौद्धांच्या शांतिप्रस्थापनेच्या परंपरांचे मूळ आणि परिणाम यांचा थोडा सूक्ष्म आढावा घेणे जरुरीचे आहे. प्रा. विजेसेकेरा यांनी शांतितत्त्व हे बौद्धधर्म पद्धतीच्या सामाजिक नीतीशास्त्राचा कळीचा मुद्दा आहे, असे म्हटले आहे. पाली भाषेमध्ये त्यासाठी संस्कृत ‘शांति’ या शब्दापासून रूढ झालेला ‘सांती’ हा शब्द प्रचलित आहे आणि तो व्यक्तिगत मन:शांतीशी संबंधित आहे. बौद्ध मानसशास्त्रात त्याचे ‘निब्बण’ (संस्कृत - निर्वाण) हे रूप लालसा, संताप, दु:ख आणि आक्रमण या भावनांचा पूर्ण उपशम दर्शवणारे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये शांती आणि अहिंसा यांचा संबंध समूहातंर्गत नात्यांशी पोहचतो. प्रा. विजेसेकेरा यांनी या संबंधांत असे निरीक्षण नोंदवले आहे –
“बौद्धधर्मीय आणि भारतातील इतर धर्मांच्या तत्त्वज्ञानात व्यक्तिगत मन:शांतीवर भर दिलेला असून, त्याचे सामाजिक परिणाम व्यक्तीच्या स्वत:च्या मानसशास्त्रीय केंद्राशी एकवटलेले दिसतात. तेथूनच त्यांचा उगम होतो.”
गौतम बुद्धांनी पहिले धर्मचक्र प्रवर्तन सारनाथ येथे केले. त्या वेळी त्यांनी चार मौलिक सत्यांचा उच्चार केला. मानवी आयुष्य हे लोभ आणि दु:ख या भावनांमुळे अस्थिर बनते. वेदनांचा किंवा दु:खाचा उगम जीवनाच्या क्षणभंगूरतेबद्दलचे अज्ञान, सुखोपभोग आणि सुरक्षितता यांचा सतत घेतलेला ध्यास यातून होतो. निर्वाण किंवा शांतीचा लाभ सर्व दु:खाचे परिहरण (निरोध) करतो आणि योग्य दृष्टीकोन, आकांक्षा, कृती, वक्तव्य, जीवनपद्धती, जाणीवजागृती आणि एकाग्रता या आठ मार्गांचा अवलंब मानवाला मुक्तीची दिशा दाखवतो.
बुद्धांनी प्रवर्तित केलेली मौलिक सत्ये आणि दाखवलेले अष्टमार्ग हे एकएकटेसुद्धा माणसाच्या भावनिक गरजा भागवणारे आहेत. पण त्या ध्येयाकडे – विशेषत: योग्य कृती, वक्तव्य आणि जीवनपद्धती या पायऱ्या आपल्याला सामाजिक संबंधांच्या परिमाणापर्यंत थेटपणे पोहोचवतात. डॉ. आंबेडकर आणि त्यांचे नवायन बौद्ध आज या गोष्टींकडेच निर्देश करतात.
इतिहासातील फार मोठ्या प्रमाणात जे शिकाऊ बौद्ध भिक्षू होते व आहेत, त्यांनी योग्य कृती या शब्दाचा अर्थ पाच कर्मकांडापासून, म्हणजे प्राणीहत्या, जे दिलेले नाही त्याचा स्वीकार, चुकीचे वक्तव्य, लैंगिक दुराचार आणि नशा चढवणाऱ्या द्रव्यांचे ग्रहण, यांच्यापासून दूर राहणे (पंचशील), असा केला आहे. या आचारात अंतर्गत मन:शांतीचा शोध अहिंसेची शपथ घेतल्यावर सुरू होतो. अपाय आणि जखमा यांच्यापासून सर्व सजीवांचे (ज्ञानेंद्रिये असणाऱ्या) रक्षण करणे कर्तव्य असल्याची भावनाही बळावते. त्यामुळे प्राचीन बौद्ध समाज (भिक्षूंचे संघ) यांना माणसे किंवा जनावरे यांची धार्मिक कार्यासाठी होणारी हत्या थांबवावी लागली. बौद्ध धर्माचा स्वीकार केलेल्या सम्राट अशोकानेही या निर्बंधांचे पालन केले. माणसाने आपल्या मनातील विकारांची म्हणजे हिंसा, असत्य, चौर्यकर्म, लैंगिक दुराचार आणि व्यसने यांची आहुती देणे, ते विकार नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, हीच खरी धार्मिकता आहे, असा उपदेश बुद्धांनी केला.
प्राचीन काळी आजच्या इतका दुसऱ्याला उपसर्ग न पोचवण्याच्या आचार पद्धतीचा पगडा होता. विचार हेतू आणि त्याचे परिणाम या मुद्द्यांच्या गुंतागुंतीमुळे अवघड झालेला होता. बहुतेक सर्व बौद्ध देशांत मांसाचा आहारात पूरक अन्न म्हणून समावेश असे. इतकेच नाही तर, स्वसंरक्षण, कायदा-सुव्यवस्था, राष्ट्रीय संरक्षण आणि शेतीसाठीसुद्धा सजीवांची हत्या होतच असे. यातून मध्यम मार्ग काढावा, असा बौद्धांचा एक विचारप्रवाह होता. हिंसेवर आधारलेल्या जीवनपद्धती व व्यवसाय – शिकार, कसाईखाने, सैन्यभरती अशा प्रकारचे – टाळावेत आणि जीवनाला योग्य वळण लावावे, असा होता.
दुसरा विचार प्रवाह जैनांचा. अतिरेकी म्हणजे कीटकांची किंवा सूक्ष्म जंतूंचीसुद्धा हत्या तोंडावर फडके बांधून थांबवणे किंवा चालताना वाट झाडत चालणे, यांसारखे आचार कृतीत उतरवणे हा होता. बौद्धांच्या अहिंसक तत्त्वाला हेतूंचीही एक बाजू होती. यानुसार क्रिया करणाऱ्याच्या मनातील हेतू किंवा त्याची मन:स्थिती ही विचारार्ह बाजू होती. जोपर्यंत पशू भिक्षुकांना खायला घालण्यासाठी मुद्दाम कापले जात नाहीत, तोपर्यंत त्याच्या भिक्षेच्या वाडग्यात पडलेला मांसाचा तुकडा खाण्यास त्यांना प्रतिबंध नव्हता. त्याचप्रमाणे घरात एखादा अपघात एखाद्या किरकोळ व्यक्तीच्या हातून अनवधानाने घडला, तर त्यावर पूर्वरचित कट किंवा हत्येचा आरोप ठेवून त्याच्याकडून दुष्कर्म घडले, असे मानण्यास येत नसे.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
प्राचीन बौद्ध धर्माचे अहिंसा तत्त्वाला सर्वांत महत्त्वाचे योगदान होते. ते हे की, द्वेष, लोभ आणि मोह या कोणत्याही कृतीच्या मुळाशी असणाऱ्या तीन विकारांचा बंदोबस्त किंवा उपशमन करण्याचे तंत्र. द्वेषाचा उपशम करण्यासाठी निराकरण करण्यासाठी निस्सीम प्रेमळपणा, लोभ शमवण्यासाठी औदार्याचा आणि मोहाचे निराकरण करण्यासाठी ज्ञान किंवा प्रज्ञा यांचा वापर करण्याचे तंत्र प्राचीन बौद्ध विचाराने ‘अहिंसा प्रस्थापने’साठी दिले. हिंसेला चिथावणी देण्यात ज्याप्रमाणे लोभ आणि मोह हे विकार बरोबरीने जबाबदार असतात, तसेच अन्य व्यक्ती आणि समूह यांच्याविषयी वाटणारा अकारण संताप आणि द्वेष यामुळेही हिंसा व विध्वंस आजच्या जगात थैमान घालताना दिसतो.
याच संदर्भात प्रेमळपणा अगर मित्रभावना स्वत:बद्दल आणि दुसऱ्यांबद्दलही जी सदभावना किंवा आत्मीयता निर्माण करते, तोच बौद्ध धर्माच्या अहिंसेचा पाया आहे. बौद्धांच्या शिक्षणक्रमातील पहिला पाठ ‘परमधाम’ (ब्रह्मविहार) यात मित्रभावनेला संकटात सापडलेल्या अन्य व्यक्तीबाबत सहानुभूती (करुणा), इतरांचा उत्कर्ष पाहून वाटणारा आनंद (मुदित) आणि लाभ व हानी, या दोनही प्रकारच्या प्रसंगात मनाचा राखलेला समतोल, यांची जोड मिळावी लागे. मैत्रभावनेच्या वाढीसाठी साधकाने स्वत:च्या अस्तित्वावर लक्ष केंद्रित करून पालीमध्ये अगर स्वत:च्या भाषेत खालील सूत्रांचा पुनरुच्चार करणे गरजेचे आहे –
‘अहम अव्हरो होमी’ – शत्रुभावनेपासून मी मुक्त असावे.
‘अभ्यापज्जो होमी’ – दुष्टपणापासून मी मुक्त राहावे
‘अनिघो होमी’ – दु:ख आणि वेदना यांच्यापासून मी मुक्त असावे
‘सुखी अत्तानाम परिहरामि’ – मला स्वत:ला संतुष्ट ठेवता यावे.
स्वत:इतकेच दुसऱ्यावरही प्रेम करता यावे, या ख्रिस्ती जनांच्या प्रयत्नांचा आदर्श ठेवून बौद्ध धर्मही शत्रुत्व, दुष्टबुद्धी आणि दु:ख यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भोवतालच्या परिसरात व स्वत:ला सुखवृद्धी व्हावी म्हणून पायरीपायरीने – म्हणजे प्रथम एखाद्या आवडत्या शिक्षकाबद्दल किंवा आपल्या पालकांबद्दल व्यक्ती आत्यंतिक प्रेम बाळगतो, आणि नंतर त्याच्या मैत्रभावनेचे क्षेत्र मित्र, एखादा परका किंवा अपरिचित माणूस आणि शेवटी एखादा प्रतिस्पर्धी अगर न आवडणारी व्यक्ती, अशा क्रमाने विस्तारत जाते. हे करत असता प्रत्येक पावलावर साधकाचे मन अधिक मृदू आणि संस्कारक्षम होत जाते. करुणा, दुसऱ्याच्या उत्कर्षाचा आनंद आणि मनाचा समतोलपणा, या अवस्था वाढीला लावण्यासाठीही वरीलप्रमाणे ध्यान-धारणेचे शिक्षण घेणे व सराव करणे जरुरीचे आहे.
बौद्ध धर्माच्या अहिंसेबद्दलच्या दृष्टीकोनाचे मूळ पद्धतशीरपणे केलेल्या स्वभावावरील संस्कारांमध्ये आहे. ज्यामध्ये द्वेषभावना, लोभ आणि स्वाभाविक असंतुलन यांसारख्या नकारात्मक दोषांचे निर्मूलन ध्यानधारणेच्या स्वयंशिक्षण प्रयोगांद्वारे सकारात्मक सामाजिक जाणीवांमध्ये करण्याचे सामर्थ्य आहे. पण या अंतर्बाह्य मन:शांतीसाठी बुद्धांनी प्रतिपादन केलेल्या अष्टमार्गी साधनेची वाटचाल आवश्यक आहे. ध्यानधारणा आणि नैतिक व्यवहार सांभाळण्यासाठी योग्य संकल्पनांच्या रूपरेखा बनवण्यासाठी सुयोग्य दृष्टीकोन, तो सराव सांभाळण्यासाठी आणि वाढवण्यासाठी योग्य त्या अपेक्षा आणि प्रयत्न यांचे भान, प्रत्येक क्षण जगताना नवनव्या घटना आणि निर्माण होणाऱ्या नात्यांचा सांभाळ करण्यासाठी उचित अशी जाणीव-जागृती आणि मन:शांती हस्तगत करण्याच्या सरावासाठी आवश्यक ती एकाग्रता, जिच्यामुळे साधक, व्हिएतनामी झेन मुनी थिक न्हाट हान यांनी म्हटल्याप्रमाणे, स्वत:च शांतीचा निर्हेतुक आदर्श बनून, निर्वाण अवस्थेतील मुक्तीचे उदाहरण जगासमोर ठेवील. बौद्धांच्या शांतिमार्गाच्या सर्व परंपरांची माहिती येथे एकत्रित करणे शक्य नसल्यामुळे आपण येथे बौद्धांच्या नैतिक व्यवस्था आणि त्यानंतर वैश्विक मुक्तीचा बोधिसत्त्वांचा मार्ग यांची थोडक्यात माहिती घेऊ.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
बौद्धांची शांतिप्रस्थापना : सिद्धान्त आणि आचरण
कर्म, नीतीव्यवहार, संसार यांच्यातून मिळणारी शिकवण माणसे, जनावरे, देवता आणि इतर क्षूद्रजीव यांचे जन्म-मृत्यु या चक्रातील फेऱ्यांची अटळता या कल्पनांचा प्रभाव युगानुयुगे आशियायी संस्कृतीवर पडला आहे. बौद्ध भाष्यकारांच्या मते मानव लोक हा स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण मानवी रूपातील स्त्री-पुरुषच फक्त उत्तम नीतीमत्ता हस्तगत करून बौद्धपदाला पोचतात आणि जीवन-मृत्युच्या चक्रातून कायमचे मुक्त होतात. नैतिक वर्तन हा प्रत्येक व्यक्तिमनाचा एक खोल कप्पा आहे आणि प्रत्येक जण आपल्या कृत्यांनी पाप-पुण्याची बीजे पेरत असतो. ज्याची बरी-वाईट फळे त्या व्यक्तीला मिळत राहतात. क्रोध आणि हिंसा यांसारख्या कृत्यांच्या जहाल शिक्षा नरकवासासमान परिस्थितीत जन्म घेऊन भोगाव्या लागतात.
बौद्ध समाजांमध्ये नैतिकतेला उत्तेजन देण्यासाठी दाखवलेली प्रलोभने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पण माणसे परस्परांपासून तोडण्यापेक्षा जीवनचक्राची ही कल्पना सर्वांनाच एकमेकांशी जोडून टाकते. कोणताही जीव एकेकाळी आपली माताही असू शकतो, हा विचार त्या जीवाबद्दल मनात आदर निर्माण करू शकतो, यावर अनेकांचा विश्वास आहे. आणि अतिशय दु:ख ज्यांनी भोगले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या धोक्याचे आनंद निर्मितीत रूपांतर करण्याची संधी मिळते.
दुष्ट आत्मे त्याग आणि बलिदानाने संतुष्ट होत नाहीत. ते पवित्र (सदगुणी) व्यक्तींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सामर्थ्याने नम्र बनतात, माणसाळतात. ऋषीमुनींनी आपल्या मानसिक सामर्थ्याने राक्षसांचे परिवर्तन घडवून आणल्याच्या पद्धतींचा पुढील शतकांमध्ये ठिकठिकणी पसरत गेलेल्या बौद्धधर्मीयांनी दुष्ट आत्म्यांच्या बंदोबस्तासाठी केलेला दिसतो. सौम्य प्रवृत्तीच्या आत्म्यांच्या खोडकरपणाच्या कथा प्राचीन वाङ्मयात निर्विष विनोदाने सजवलेल्या असतात.
आदर आणि सदभावना दाखवण्याच्या या पद्धतींचा मानवी स्तरावर योग्य वापर करून बौद्ध प्रसारकांनी आशियामध्ये सर्वत्र बुद्धाचे तत्त्वज्ञान पोहोचवले, हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. पण या ठिकाणी बुद्धाच्या मुक्तीविषयक तत्त्वज्ञानातील विसंगती सामोरी येते. कारण शेवटी या तत्त्वज्ञानाच्या शिकवणीनुसार ‘स्वत:’ आदर, संरक्षण, पुनर्जन्म आणि बुद्धाशी एकरूपता साधतच नसतो. बौद्ध मानसशास्त्रे आणि नीतीतत्त्वे यांच्या गाभ्याशी ‘स्वत:’ नसणे किंवा नि:स्वार्थीपणा (अनत्त-संस्कृत-अनात्मन्) याची शिकवण असते. सर्व ऐहिक अस्तित्व हे अनित्य (अनिक्क) आहे, या शिकवणुकीचा उपसिद्धान्त, नि:स्वार्थ याचा अर्थ बंदिस्त, संमिश्र आणि अस्थर स्वरूपाचे व्यक्तित्व असा होतो आणि मग कायम अस्मितेच्या स्वरूपात ते पकडून ठेवणे नैराश्य, वैफल्य किंवा अगदी हिंसेला आमंत्रित कसे करते, याचाही खुलासा त्यातून होतो.
या शिकवणुकीचा स्वीकार, दुसऱ्या बाजूला कोणत्याही कृतीच्या वाईट हेतूचे (मुळांचे) पोषण करणे नाकारतो. कोणाही नि: स्वार्थी व्यक्तीचा द्वेष कसा करील? त्यांच्याकडे कोणीही हावरेपणाने किंवा ताबा घेण्याच्या दृष्टीने कसे पाहू शकेल? मानवी स्वभावाचे सत्य जेव्हा उमगते, तेव्हा फसव्या समजुतीत गटांगळ्या खात कोण राहील? अशा प्रकारच्या विचारसरणीचा परिणाम अधिक प्रवाही आणि दुसऱ्यांबद्दल आणि परिस्थितीबाबत खुल्या व मोकळ्या दृष्टीकोनात होतो. त्यातून मानवी जीवनातले अपेक्षित संघर्ष कमी होऊन जीवनातील प्रश्नांना अनेक प्रकारची उत्तरे सापडतात.
...........................................................................................................................................
...........................................................................................................................................
आशियायी बौद्धवादामध्ये अहिंसेचे जे तत्त्वज्ञान आहे, त्याला आधार देणारी ‘परस्पर अवलंबित्वाची अपरिहार्यता’ ही दुसरी एक शिकवण आहे. म्हणजे नैतिक विश्वातील जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकलेले सर्व प्राणी आणि त्यांच्या कृती यांचे परस्परावलंबित्व. मनाचे सामर्थ्य विश्वव्यापी बनवण्याची संकल्पना – जी बुद्धाच्या प्रज्ञेचे आणि आंतर्दृष्टीचे केंद्र मानले जाते, तीचा संबंध नि:स्वार्थीपणा आणि पुनर्जन्म यांच्याशी आहे. तिचा विकास बौद्ध तत्त्वज्ञानाच्या उत्तरकाळात शून्यता अनुभवण्याच्या शिकण्यातून आणि अस्तित्वाचे अद्वैत अनुभवताना झाला. या अनुभवात परस्परांच्या सहवासातून आणि नात्यातून होत जाणाऱ्या विकासाचा लाभ होतो.
इहलोकातील सर्वांचे एकमेकांवरचे परस्परावलंबित्व ‘इंद्राचे जाळे’ या संज्ञेनेही व्यक्त होते. ज्याप्रमाणे जाळ्यात गोळा केलेली रत्ने त्यांच्या विविध पैलूंमुळे परस्परांचे प्रतिबिंब उमटवत, त्या सर्व प्रतिबिंबाबतून एक ‘आभा’ निर्माण करतात. त्याप्रमाणे जीवांच्या परस्परावलंबित्वातून एक प्रकारचे सामाजिक ‘इंद्रजाल’ निर्माण होत जाते, असा या संज्ञेचा अर्थ असावा. या सर्व सिद्धान्ताचा नैतिक परिणाम बौद्ध साधकांना अनेक युगांत अनुभवास आला. समाजाची अस्थिरता आणि घटकांचे परस्परावलंबित्व यांतून एकमेकांविषयी आदरभावाची निर्मिती होते. या पवित्र नात्यांची हिंसेद्वारा चिरफाड करणे, हे भीषण परिणामांना आमंत्रण ठरेल, असाही इशारा या सिद्धान्तातून मिळतो.
बौद्ध धर्माने परिपक्व होऊन भारतात पाय रोवल्यानंतर तो मध्य, पूर्व आणि आग्नेय आशियात पसरला. त्यातून त्या भागात शांतीचे नवे संदेश विकसत गेले. त्यातून सुधारणावादी चळवळ अस्तित्वात आली. तिला ‘महायान’ (वैश्विक वाहन) असे नाव पडले. ही बोधीसत्त्वासाठी म्हणजे भविष्यात निर्माण होणाऱ्या बुद्धाच्या अवतारांना प्रेरणा देणारी चळवळ होती.
बौद्ध वाङ्मयात जातक कथा लोकप्रिय आहेत. त्यात शाक्यमुनी बुद्धांच्या मागील जन्मांच्या कथा आहेत. या कथांतील माहितीप्रमाणे बुद्धाचे ३५७ मानवजन्म, ६६ देवाचे अवतार आणि १२३ प्राणीजन्म असे पूर्वजन्म झाले. या सर्व जन्मांत बोधिसत्त्वांनी दुसऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी अगर दुसऱ्याने जगावे म्हणून बलिदान केलेले आहे. पण महायान पंथाच्या शिकवणुकीप्रमाणे प्रत्येकामध्ये बुद्ध बनण्याची सूक्ष्मक्षमता आहे, हे प्रसृत झाल्यानंतर अगणित बोधिसत्त्व निर्माण झाले. त्यात शेजारच्या घरातला एखादा हुशार सामान्य माणूस (विमला किर्तिनिर्देस सूत्र), आगीत अगर पुरात उडी घेऊन लोकांना वाचवणारा ‘देवदूत’ (प्रज्ञापरिमिता किंवा प्रज्ञा पक्व प्रज्ञा साहित्यातील उदाहरण), किंवा संभ्रमात राहणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या मानवांना योग्य (बुद्धाच्या) मार्गावर आणण्यासाठी जो कुशलतेने प्रयत्न करतो, विविध उपाय योजतो. त्याचे उदाहरण ‘सद्धर्मपुंडरिक’ किंवा ‘कमलसूत्रा’त आहे. अथवा समाजातील स्त्रिया, मुले, माता आणि इतर असहाय व्यक्ती यांना मदत करणारा. चीन व जपानमधल्या कुआन यिन किंवा कान्नून यांच्याप्रमाणे हे सर्व बोधिसत्त्वच मानले जातात.
एका अभ्यासकाने नमूद केल्याप्रमाणे हे सर्व बुद्धिवादी संत, संरक्षक आणि प्रेषित यांच्यामध्ये एक गोष्ट समान आहे. स्वत:च्या ‘निर्वाणा’चा मार्ग सोडून सर्व जीवांच्या संरक्षणासाठी आणि उद्धारासाठी ‘संसारा’मध्ये दीर्घकाळ राहणे या सर्वांनी पसंत केले आहे. हे उदात्त ध्येय, त्याला मिळालेली कडव्या इव्हेंजेलिस्टच्या जिद्दीची साथ आणि एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला शोभणारा सोशिकपणा व हिकमत या सर्वांची एकत्रित मूस बौद्धवादी शांतिसैन्याच्या व्यक्तिमत्त्वात दिसते.
महायान पंथ हा बुद्धाच्या शांतिपरंपरांचा वारसदार आहे, याचे कारण त्याची वैश्विक भूमिका, म्हणजेच सर्व लोकांना त्याने दिलेले मुक्तीचे आश्वासन-विशेषत: समाजाने अनेक शतके ज्यांना दूर ठेवले आहे, अशांना त्याने दिलेला धीर. आजच्या मानवी हक्कांचे त्या काळात जणू सूतोवाच करणाऱ्या कमलसूत्रा(कि सूक्त?)तून बुद्धाचा दुष्ट चुलतभाऊ देवदत्त आणि दैत्यांच्या राजाची अदभुत बुद्धिमत्ता असलेली कन्या या दोघांनीही प्राप्त करून घेतलेले सर्वोच्च आत्मिक ज्ञानाचे दर्शन आहे. देवदत्ताने बुद्धाच्या हत्येचा प्रयत्न केला आणि भिक्षूंच्या संघात तोडफोड केली, यासाठी त्याला नरकवासाची शिक्षा मिळाली होती. पण बुद्धाने त्याचा उद्धार करून त्याला बोधिसत्त्वाच्या पदाला पोहोचवले. जेमतेम आठ वर्षांच्या वयाची दैत्यकन्या धर्म या विषयावरची तिची पारंगतता आणि तिची बोधिसत्त्वाच्या पायरीची तयारी विद्वजनांच्या खुल्या सभेत व आत्मतेजाने चमकणारे भिक्षू आणि त्यांचे शिष्य यांच्या मेळाव्यात दाखवते. बुद्धाने अस्पृश्य, स्त्रिया आणि खुनी व्यक्तींनाही त्याच्या धार्मिक व्यवस्थेत जागा दिली. सम्राट अशोकाने त्याच्या राज्यातील कल्याणकारी व्यवस्था गोरगरीब, रुग्ण, वृद्ध, गुन्हेगार, प्राणिमात्र, वने यांच्यापर्यंत पोचविल्या. त्यामुळे महायान बौद्धपंथाद्वारे बुद्धाचे उच्च आदर्श लिंगभेद, धर्मदीक्षा आणि सामाजिक वर्ग या सर्वांच्या मर्यादा ओलांडून सर्वांपर्यंत पोहोचले.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
निष्कर्ष
१३ ऑक्टोबर १९५६ या दिवशी डॉ. आंबेडकर यांनी पत्रकारांना सांगितले होते की, नवीन बौद्धधर्म (नवायान) महायान आणि हीनयान या जुन्या पंथांना धक्काही न लावता भगवान बुद्धांनी दिलेल्या उपदेशानुसार आणि त्यांच्या तत्त्वांनुसार आचरला जाईल. त्यांच्या नवबौद्धवादाद्वारे त्या परंपरेची शिकवण आणि शांतता प्रस्थापनेचे तंत्र वापरून दलित आणि व्यथित जनतेची परिस्थिती सुधारणे हे उद्दिष्ट त्यांच्या नजरेसमोर होते.
हिंसाचार आणि विद्वेष यांनी ग्रस्त अशा या जगाला मार्गदर्शनासाठी डॉ. आंबेडकर यांचे जीवन आणि त्यांचे लिखाण यांच्याकडेच पाहणे आवश्यक आहे, असा निष्कर्ष काढावा लागतो. महाराष्ट्राच्या एका झोपडपट्टीत ज्यांच्या बुद्धीला अंकुर फुटले आणि कोलंबिया युनिर्व्हसिटी व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षणसंस्थांच्या वर्गांत ज्यांची बुद्धी पक्व झाली, त्या डॉ. आंबेडकर यांना हाव किंवा लोभ, विद्वेष आणि असत्य यांचा संस्थात्मक आविष्कारही अनुभवायला मिळाला.
या सर्व गोष्टी वसाहतवाद, भ्रष्टाचार, आणि जातविषमता यांची अपत्ये होती. तरीही ती माणसाच्या मनातून आणि हातांतून साकारली होती, म्हणूनच त्यांच्यामधील दोष काढून टाकून त्यांची पुनर्रचना करणे किंवा त्या गोष्टी पूर्ण नष्ट करणे, हे दोन पर्याय शक्य होते. (आंबेडकरांना ‘जातिनिर्मूलन’ - ‘Annihilation of caste’ - हा शब्द पसंत होता.) सामूहिक कृतीची कल्पना हे एकच त्याला उत्तर होते - अगदी मानवी दु:खाचा शोध घेणे आणि त्याचे निवारण या दोनही गोष्टींच्या संदर्भात.
बुद्ध किंवा गांधी यांच्या पठडीतले आंबेडकरांचे आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व नव्हते आणि तशी त्यांची शिकवणही नव्हती. पण अमेरिकन प्रोफेसर जॉन ड्युई यांच्या सामाजिक, बुद्धिवादी विचारसरणाचा मोठाच प्रभाव त्यांच्यावर होता. लोकशाही संस्था, न्यायालये आणि शिक्षणसंस्था ही या युगातली सज्ञान आणि सुबुद्ध नागरिकांच्या हातातील उपयुक्त अवजारे आहेत, असे नागरिक समाजाच्या प्रश्नांवर बोलू शकतात, सदविवेकबुद्धीला अनुलक्षून मतदान करतात, जरूर असेल तर न्यायालयात फिर्याद करू शकतात आणि अगदीच निकड निर्माण झाली, तर रस्त्यावर उतरून सामाजिक बदलासाठी चळवळ करू शकतात. पण सशस्त्र प्रतिकार, बंडखोरी, दहशतवादी कारवाया अगर युद्ध हे मार्ग बौद्ध संस्कृतीत वर्ज्य आहेत, याविषयी आंबेडकर आणि ड्युई यांचे एकमत होते.
डॉ. आंबेडकर, दलाई लामा, थिक्-न्हाट हान् आणि आजच्या इतर बौद्ध विचारवंतांनी अनुसरलेला नवबौद्ध मार्ग (नवायन) महायान परंपरेतील व्यक्तिवादाला छेद देणारा आहे. कारण सामाजिक संस्था आणि संबंध यांचे महत्त्व नवबौद्ध मार्गात अधोरेखित केलेले आहे. बौद्ध इतिहासपर्वातील सामाजिक व्यवहारांची माहिती आपल्याला त्यातून मिळते. सम्राट अशोकाने बांधलले सार्वजनिक उपयोगांचे पाणपोया, धर्मशाळा, मोफत दवाखाने, पूलबांधणी, इत्यादी प्रकल्प, चीनमधील सुई आणि तांग राजवटीत बौद्ध मंदिरांना चालवलेली वृक्ष लागवडीची मोहीम यांची वर्णने आपण वाचतो, पण ही सार्वजनिक कार्याची वर्णने अपवादात्मकच आहेत. कारण अभिजात बौद्ध परंपरेनुसार व्यक्तिगत शिस्त, सदगुण आणि कमलीचा नि:स्वार्थीपणा यांनाच अधिक महत्त्व दिले गेलेले आहे.
‘बुद्धिस्ट पीस फेलोशिप’चे संस्थापक आणि पश्चिमेकडील नवबौद्धवादाचे प्रवक्ते रॉबर्ट आइटकेन यांनी नमूद करून ठेवले आहे - “बौद्धांच्या इतिहासात काही ठिकाणी सार्वजनिक कल्याण किंवा सामाजिक निषेध अशा क्षेत्रांत उतरलेल्या व्यक्तींचे थोडे फार कार्य आपण पाहू शकतो, पण बहुतेक वेळा चाललेले वैयक्तिक किंवा सामाजिक उन्नयन हे मठात किंवा मठातील भिक्षूंमध्येच मर्यादित झालेले दिसते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बौद्धांच्या सामाजिक हालचालींचे दर्शन होऊ लागले, तेही ख्रिश्चन धर्म तत्त्वज्ञान आणि पाश्चिमात्य विचार यांच्या दडपणाखालीच!”
अशा तऱ्हेने अतिशय आव्हानात्मक आणि सतत बदलणाऱ्या परिस्थितीत अडीच हजार वर्षे भारतामध्ये, आशियामध्ये आणि आता जागतिकीकरणाच्या जमान्यातही बौद्ध धर्म टिकून राहिला आहे. आपण त्याचे वारसदार आहोत. आजचे जग एकीकडे वाढते परस्परावलंन आणि त्यामुळे एकजुटीचे महत्त्व जाणणारे आहे. त्याचबरोबर वाढता हिंसाचार, दहशतवाद, द्वेष आणि दारिद्रय यांनीही ग्रस्त आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यातून बौद्ध परंपरेने आपली संस्कृती सांभाळली आहे. वैदिक आणि हिंदू तत्त्वज्ञान, ताओंचे अध्यात्म, कन्फ्यूशियसचे प्रशासनशास्त्र, ज्यू प्रेषितांचा सामाजिक आक्रोश आणि येशू ख्रिस्ताचा उपदेश या सर्वकालातून पुढे जाताना बौद्ध संस्कृतीने इतरांकडून जे उचलले ते त्यांनी धर्माशी असलेल्या त्यांच्या उत्कट बांधीलकीसाठी म्हणजे माणसाच्या मनात आणि पर्यायाने समाजात शांती निर्माण करण्यासाठीच वापरले.
सर्व मानवजात एका वळणावर उभी असताना ही सर्व लोकांची, सामाजिक चिंता बाळगणाऱ्यांची, समाजातील नेतृत्व करणारी मंडळी, क्रियाशील कार्यकर्ते, धर्मप्रचारक आणि सर्वसाधारण नागरिक या सर्वांची जबाबदारी आहे. भारतात आणि जगात प्रचित असलेले हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन आणि ज्यू हे मुख्य धर्म व इतर पंथ यांनी आपापल्या धर्मातील तंत्रे वापरून जागतिक शांततेच्या समोर ठाकलेले आव्हान दूर सारण्याचा प्रयत्न करावा. हे करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारखेच समकालीन थोर बौद्ध नेते यांची वचने आणि जीवन आपल्याला नक्कीच स्फूर्तीदायक ठरू शकेल.
‘Buddhism and the contemporary world : an Ambedkarian perspective’ या डॉ. भालचंद्र मुणगेकर व आकाश सिंग राठोड यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील ‘Buddhism and World Peace: A Turning Point for Humanity’ या लेखाचा हा अनुवाद आहे. २००५ साली मुंबईमध्ये झालेल्या ‘पहिल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फरन्स’मध्ये सादर केल्या गेलेल्या शोधनिबंधांचा समावेश या संग्रहात केला असून हे पुस्तक नवी दिल्लीतील Bookwell या प्रकाशनसंस्थेने २००७मध्ये प्रकाशित केले आहे.
प्रस्तुत लेखाचा अनुवाद - कुमुद करकरे
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment