‘वाँटेड स्पिरिच्युअल जर्नलिस्ट!’ म्हणजे ‘गोदी मीडिया’ला आता ‘योगी पत्रकारा’ची आवश्यकता!!
दिवाळी २०२४ - लेख
जयदेव डोळे
  • ‘ ‘वाँटेड स्पिरिच्युअल जर्नलिस्ट!’ची दै. ‘अमर उजाला’ची जाहिरात
  • Tue , 05 November 2024
  • दिवाळी २०२४ लेख स्पिरिच्युअल जर्नलिस्ट Spiritual Journalist अमर उजाला Amar Ujala पत्रकारिता Journalism

‘घसरण’, ‘अध:पतन’, ‘गचाळ’, ‘अमूल्यन’, ‘लाचार’… अशी कितीही विशेषणे तुम्ही पत्रकारितेला लावली, तरी तिचे काही बिघडत नाही. ती फार पूर्वीच म्हणजे साधारण १० वर्षांपूर्वीच कामातून गेली आहे. त्यात आता ती ‘निर्ढावलेली निर्लज्ज’ होऊन बसली आहे. ‘कशाला लागता तोंडी त्यांच्या?’ असा जो उदगार आपण एखाद्या वाह्यात माणसाबद्दल काढत असू, तो उदगार आजकाल उलट्या अर्थाने आपल्या अंगावर येतो. म्हणजे तमाम मराठी वृत्तवाहिन्या जो नेता दिसेल त्याच्या तोंडी लागतात अन् तो जे बकेल वा बरळेल ती ‘हेडलाईन’ म्हणून आपल्या डोक्यावर मारतात.

हेडलाईन इतकी बिनडोक कशी काय असू शकते, त्यांनाच ठाऊक! कदाचित या साऱ्या दुर्दशेला वैतागून ‘अमर उजाला’ या हिंदी दैनिकाने ‘आध्यात्मिक पत्रकार’ हवा असल्याची जाहिरात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात छापली.

दुर्दशेला वैतागून अशी कारणमीमांसा तरी आपण का करावी? त्या दैनिकाचाही दुर्दशेस तेवढाच हातभार लागलेला आहे. ‘गोदी मीडिया’ या नावाने वृत्तपत्रांची दुकाने चालतात, त्यात तेही अग्रभागी आहे.

लोक अध्यात्म, देवधर्म, तीर्थाटन इत्यादींच्या नादी लागतात ते जीवनाच्या उत्तरार्धात, नाही का? निदान भारतीय परंपरा तरी तसे सांगते. जे चार आश्रम सांगितले आहेत, त्यातल्या संन्यासाश्रम अन् वानप्रस्थाश्रम यांचा थेट अध्यात्म अन् देवदेव यांच्याशी संबंध. तोवर पूर्वजांनी सांगितलेला गृहस्थाश्रम पाळायचा!

भारताची परंपराच अध्यात्माला वार्धक्याशी जोडत असल्याने तारुण्याचा व त्याचा संबंध नाही, हे मान्य. संसारात पडला आहात, तर त्यातली कर्तव्ये पार पाडा, असे ठरवून दिलेले आहे. त्यामुळे ‘अमर उजाला’ने जाहिरातीत वयाची अटच छापलेली नाही. तशी तर पत्रकारितेच्या पदवीचीही गरज नसल्याचे ती आडून आडून सांगते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पत्रकारिता किती तरी वर्षे केली व शिकवलीसुद्धा, परंतु अध्यात्म हा विषय ना अभ्यासक्रमात आहे, ना वार्तांकनात. वार्ताविषयांत अध्यात्म हा खरे तर अतिक्रम. साऱ्या वार्ता ऐहिक, भौतिक आणि लौकिक जगतातल्या द्यायच्या हे आपले तत्त्व. पारलौकिक, परमेश्वरी किंवा अतिभौतिक जगात ना मर्त्य वार्ताहराला जाता येते, ना जायचे असते. स्मशान हा या जगाचा अखेरचा टप्पा. त्यापलीकडे माणसांचे जग नाही. भुते, पिशाच्चे, मुंज्ये, हडळी आदी कल्पनेतल्या गोष्टी. तसेच या अध्यात्माचे. मन, मनाची जागृतावस्था, मनाची निद्रिस्त स्थिती किंवा मन:पटलावर उमटलेले उपदेश अथवा मनाने निर्विचार होणे आदी गोष्टी बातम्यांत कशा आणता येतील?

विकाररहित मन तर पत्रकारितेसाठी मोठे घातकी, धोकादायक! विकारच नुरले तर बातम्या कशाच्या आणि त्या ज्या घटनांमधून घडवल्या जातात, त्या कशा प्रत्यक्ष घडतील? ‘नाही निर्मळ मन, काय करील साबण?’ असे तुकोबा म्हणतात. त्यावर आमचे म्हणणे असे की, मळलेले मनच पत्रकारांची पोटे भरत असते. सत्तेचे राजकारण म्हणजे मळ, मळलेले, मळमळ आणि मळभ. स्वच्छ, नितळ, पारदर्शक, निरभ्र असे आमच्या पत्रकारितेच्या वाट्याला काही आले, तर वृत्तपत्रांची पाने कोरी छापावी लागतील अन् चित्रवाणीच्या बातम्या नि:शब्द!

पण पत्रकारांकडून अशी अध्यात्माची मागणी नवी नाही. स्वत:ला लीडर म्हणवून घेणाऱ्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने अध्यात्माला अग्रलेखाच्या पानावर जागा दिली. ‘स्पीकिंग ट्री’ अशा नावाचे ते सदर अजूनही चालू आहे. हे सदर का सुरू झाले, त्याविषयी एका पुस्तकात पुढील माहिती देण्यात आली आहे - “उदाहरणार्थ ‘स्पीकिंग ट्री’ घ्या. ही कल्पना सदहेतूने मांडली गेली. बातमीची पूर्वसूचना म्हणून अध्यात्मात का उडी मारू नये? पण जेव्हा ती प्रत्यक्षात आली, तेव्हा तिची टर उडवण्यात आली. तत्त्वज्ञानावर कितीतरी भाष्ये उपलब्ध होती आणि आत्म्याच्या प्रांतातही. तरीही ‘टाइम्स’ मागे हटला नाही आणि वाचकांना त्याने ते सादर केले, अशा प्रकारच्या शहाणपणाची सुप्त मागणी पाहून अन् पुढे त्याची गरज वाढवून. या कल्पनेचे अनुकरण ‘टाइम्स’ गटातल्या अन्य पत्रांनी तर केलेच, परंतु स्पर्धकांनाही केले. ‘द स्पीकिंग ट्री’ इतके यशस्वी सदर झाले की, त्याची आता स्वतंत्र पुरवणी निघते. (समीर जैन यांची ही लाडकी कल्पना मानतात)” - ‘द टीओआय स्टोरी’, संगिता मेनन मलहान, हार्पर कॉलिन्स इंडिया, २०१३, पृष्ठ १५८

मोठ्या कौतुकभरल्या शब्दांत हे वर्णन झाले. नवे काही तरी देत राहायचा ‘टाइम्स’ समूहाचा हा आध्यात्मिक प्रयोग नवा नव्हे, तर फार जुना मानला पाहिजे. अध्यात्म देशाला अज्ञात कधीच नव्हते. पत्रकारितेला अज्ञात प्रदेशात जायला मनाई होती, कारण अध्यात्म निखळ एक व्यक्तिगत आणि अदृश्य बाब होय. शब्दांचे बुडबुडे, कठीण संकल्पनांचे प्रदर्शन आणि जणू हेच खरे जीवनाचे सार असल्याचा त्यातल्या आशयाचा आव, यांमुळे सामान्य नागरिक वा वाचक अध्यात्माकडे कमी वळे. पोथ्या, पुराणे, महाकाव्ये, मिथके जीवनविषयक तत्त्वज्ञानासाठी खूप पूर्वीपासून बाजारात उपलब्ध आहेत.

याचा अर्थ ज्याच्यापाशी फुरसत, पैसा आणि खाणेपिणे भरपूर आहे, त्यांनाच अध्यात्मात गोडी असे. ती गोडी सर्वसामान्यांनादेखील पूर्णवेळ भागवणे अवघड. कोणी निरुपण अथवा विवेचन करत असेल, तर समजेल तितके ते ऐकले जाई. पण पूर्णपणे अध्यात्माला वाहून घेणाऱ्यांना वैराग्य, संन्यास, मुक्तता यांपासून सुटका नसे. म्हणून हे जे शहाणपण असे ते थोडक्यात अन् मोजक्या शब्दांतच गोड वाटे. ‘टाइम्स’ने तोच मार्ग पत्करला.

‘टाइम्स’चे मालक समीर जैन हेही स्वत: खूप आध्यात्मिक आहेत. गंमत अशी की, त्यांच्या या आध्यात्मिक रूपातच ‘टाइम्स’चा नफा एक हजार कोटी रुपयांवर पोचला. वार्ता म्हणजे जाहिराती छापून उरलेल्या जागेत भरावयाचा मजकूर अशी व्याख्या ज्यांनी केली, त्यांनी अध्यात्माचादेखील बाजारच केला. फार तर असे म्हणू की, अध्यात्माच्या अभिजन बाजारात त्यांनी दैनिक वाचकाला ग्राहक बनवले.

...........................................................................................................................................

गेली दहा वर्षे भारतीय माध्यमे आध्यात्मिक होऊन बसली आहेत अथवा बसवली आहेत. कारण त्यांना ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ ही ताकीद देण्यात आली आहे. विनोबांच्या किंवा अन्य बाबांच्या अध्यात्माचा अर्थ नेमका हा संदेश व्यक्त करतो! राज्यकर्ते अन् सत्ताधारी यांना असे अध्यात्म केवढे फायद्याचे!! कारण त्यांचाच अमल जिकडेतिकडे असताना, त्यांची भ्रष्ट कृत्ये, निर्लज्ज वाणी आणि अनैतिक तडजोडी यांचा जो उच्छाद चालू असतो, त्याकडे डोळेझाक-कानझाक-मुखझाक करा असेच त्याचे सार. पत्रकार बिचारा या उकिरड्यावर तर जगतो. राज्यकर्ते जेवढी घाण करतील, तेवढी पत्रकारिता तजेलदार अन् टवटवीत असते म्हणे!

...........................................................................................................................................

भारतातल्या अध्यात्माचा बाजार कोट्यवधी रुपयांचा आहे. श्री श्री रविशंकर, जग्गी वासुदेव, ब्रह्मकुमारी, मां अमृतानंदमयी देवी, आसारामबापू, मुरारीबापू, रामरहीम, निर्मलबाबा इत्यादी बाबा-महाराज यांच्यासकट धर्म, संस्कृती, सण, परंपरा, मन:शांती अशा विषयांवर भाषणे देऊन भरपूर कमाई करणारे स्त्री-पुरुष गेल्या दहा वर्षांत गावोगावी अवतरले. चित्रवाणी वाहिन्या तर गेली अनेक वर्षे दिवसभर अध्यात्म ओकत असतात. या वाहिन्या म्हणजे अमेरिकेतल्या धर्मप्रचारार्थ सुरू झालेल्या टीव्हीची भ्रष्ट नक्कल… घरबसल्या साऱ्या चैनी उपभोगत या अध्यात्माचा ग्राहक वर्ग तयार करणारा एक बाजार. यू-ट्युब आणि तत्सम मंचांवर तर अशा आध्यात्मिक विषयाचा प्रत्यय नित्य येत राहतो.

पण अध्यात्म म्हणजे नेमके काय? त्याची गोडी म्हणा, ख्याती म्हणा किंवा आसक्ती; काय आहे हा प्रकार? विनोबांशिवाय त्याची माहिती कोणाला असणार? त्यांनी सांगितले आहे की, “आध्यात्मिक विचार मी जेवढे वाचले आहेत, अध्यात्माविषयी जेवढे मी चिंतन केले आहे, त्याचे सार जर एका शब्दांत सांगावयाचे असेल, तर ते आहे, गुणग्रहण. कुणीही मनुष्य असा नसतो की, जो संपूर्णत: गुणहीन असतो. आणि कुणीही मनुष्य असा नसतो की, जो संपूर्णत: दोषरहित असतो. ह्यासाठी सतत गुण आकर्षित जावे, गुणांचे स्मरण करावे, ह्यासाठी गुणभावन करावे, गुणवर्धन करावे, हा मनुष्याच्या उन्नतीसाठी सर्वोत्तम मार्ग आहे. मी ह्यालाच भक्ती मानली आहे. भक्ती म्हणजे ईश्वराचे ग्रहण. ईश्वर ह्या विश्वात प्रकट आहे तो गुणाच्या रूपाने. म्हणून गुणांचे दर्शन करू तेव्हाच ईश्वराचे दर्शन होईल असे मी मानतो.” (‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’, विनोबा, कृषी-उद्योग व आदिवासी कल्याण प्रतिष्ठान, बोर्डी, जि. ठाणे, २००४, पृ. ९२)

या व्याख्येने विनोबा संतुलन, समतोल, समन्वय साधायचा प्रयत्न करत आहेत, हे स्पष्ट दिसते. महत्त्वाचे म्हणजे त्यांचा भर गुणग्रहणावर अधिक आहे. गुणगान करून दोष नाहीसे होतील का, हे ते सांगत नाहीत. शोषण, हत्या, हिंसा, फसवणूक, भ्रष्टाचार, सत्तेसाठी अनैतिक तडजोडी इत्यादी मानवी दोष मग विनोबांसारखे लोक कायम नजरेआड करणार, असेच ना? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घातकी व कारस्थानी डावपेच, मोदी-शहा-भाजप यांची जात्यंधता आणि त्यांच्या भांडवलदार मित्रांना त्यांनी भेट देऊन टाकलेला भारत हे फक्त दोष आहेत, असे कसे आपण मानायचे? विनोबांचे अध्यात्म कायदा, राज्यघटना, न्याय आणि लोकशाही मूल्ये धुडकावून लावत आहेत, असा संशय येत राहतो.

वृत्तपत्रे काय किंवा चित्रवाणी वाहिन्या काय, त्यांचा जास्तीत जास्त वेळ दोषरहित नसणाऱ्या माणसाची कृत्ये, विचार आणि इरादे यांचे दर्शन आणि वर्णन यांतच जात असतो. किंबहुना ‘बॅड न्यूज इज गुड न्यूज’ हे पत्रकारितेच्या व्यवसायाचे मर्म मानले जात असताना, केवळ गुणदर्शनाने तुमचे ज्ञान संपादित करून घ्या, असे माध्यमांचे मालक सांगत आहेत की काय, हा प्रश्न तसा व्यर्थ आहे.

गेली दहा वर्षे भारतीय माध्यमे आध्यात्मिक होऊन बसली आहेत अथवा बसवली आहेत. कारण त्यांना ‘बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो’ ही ताकीद देण्यात आली आहे. विनोबांच्या किंवा अन्य बाबांच्या अध्यात्माचा अर्थ नेमका हा संदेश व्यक्त करतो! राज्यकर्ते अन् सत्ताधारी यांना असे अध्यात्म केवढे फायद्याचे!! कारण त्यांचाच अमल जिकडेतिकडे असताना, त्यांची भ्रष्ट कृत्ये, निर्लज्ज वाणी आणि अनैतिक तडजोडी यांचा जो उच्छाद चालू असतो, त्याकडे डोळेझाक-कानझाक-मुखझाक करा असेच त्याचे सार. पत्रकार बिचारा या उकिरड्यावर तर जगतो. राज्यकर्ते जेवढी घाण करतील, तेवढी पत्रकारिता तजेलदार अन् टवटवीत असते म्हणे! कारण लोकशाहीतले तीन खांब कामगिरी कशी करत आहेत, यावर या तथाकथित चौथ्या खांबाची देखरेख असते. त्या तीन खांबांना सरळ करतच चौथा खांब समाजाची व देशाची रचना डळमळू देत नाही, असे आपण पूर्वजांकडून ऐकत आलेलो.

‘अमर उजाला’सारख्या पत्रकारितेत मुरलेल्यांना एकाएकी अध्यात्माची निकड कशी काय जाणवली कळेना. मात्र राज्यकर्त्यांच्या उकिरड्याची झाकपाक कितीही केली तरी ती थांबेना, म्हणून लक्ष विचलित करायला हा अध्यात्माचा सगुण धांडोळा सादर केला जातो आहे. आता गंमत अशी की, छापील अध्यात्म हा मौखिक अध्यात्माचाच एक अवतार असला, तरी मुद्रित अध्यात्माची आवड मात्र अगदी थोड्या लोकांना भासत असणार. आपला देश अजूनही निरक्षरासारखा वागतो. म्हणजे त्याला वाचल्यावर कळतील अशा गोष्टी मुद्रित रूपात मिळतात, तरीही प्रवचन, निरुपण, भजन, कीर्तन यांचा समाजावरचा पगडा अजूनही हटता हटत नाही. असे मानतात की, ‘भरल्या घरी करावे हरी हरी’ : म्हणजे भक्ती आणि तिची चैन कष्टकरी, श्रमिक यांना परवडत नाही. त्यामुळे ऐकणे, श्रवण करणे हे काम मुख्यत्वे अडाण्यांचे व अल्पशिक्षितांचे. पण घडते उलटेच. जिथे प्रवचने, सप्ताह अन् कीर्तने असतात, तिथे श्रमिक वर्गापेक्षा भरल्या घरचे व भरल्या पोटाचे लोकच जास्त आढळतात. ते प्रवचनकारदेखील भली थोरली रक्कम घेऊनच प्रवचने-सप्ताह पूर्ण करत असतात. त्यांचे साथीदार वादक, गायक, वाचक, ऑडिओ सिस्टिमवाले, वाहने असा तगडा सरंजाम गावोगावी फिरतो. याचा अर्थ काय? चैनीला अध्यात्म असे नाव पडले. अध्यात्म, भक्तीरस यांचा प्रचंड खर्च असतो.

आता ‘स्पिरिच्युअल जर्नलिस्ट’ असे सभोवतालचे भरजरी अन् रंगीबेरंगी वातावरण त्यांच्या बातम्यांत टिपेल का? एखाद्या आध्यात्मिक संयोजनासाठी झालेला खर्च, तो करणारे, जाहिरातदार आणि प्रायोजक यांची नावे, त्यांचे धंदे, त्यांची जीवनचर्या आदी माहिती देईल काय? की फक्त तो बाबा अथवा ती बाई काय बोलले तेवढेच सांगेल? दिसते असे की, जेव्हापासून वृत्तपत्रांत अन् टीव्हीवर अध्यात्माचे वारे वाहू लागले, तशी आध्यात्मिक खर्चाची, चैनीची आणि उधळपट्टीची बाजूच अंधारात जाऊन लपली.

...........................................................................................................................................

अध्यात्माच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांपुढे सर्वांत मोठी समस्या ही येत असावी की, पगार किती मागावा? डोके भंजाळून जाईल असे विषय मांडण्याची हातोटी असणारे बुवा, महाराज, बाबा जेवढे बोलतील तेवढे देऊन मोकळे व्हायचे की, त्यांनी केलेल्या प्रवचनाचा अर्थ उलगडून सांगणे हेही काम करायचे? म्हणजे त्यासाठी भरपूर वाचन, श्रवण, विश्लेषण आले. त्याचे वेगळे पैसे मालक देईल काय? अध्यात्माच्या खोल डोहात डुंबायचे आणि तळाशी सापडलेली माणके, रत्ने लोकांना आणून द्यायची म्हटली, तर केवढे सायास करावे लागतील त्या पत्रकाराला? हे प्रयास पत्रकाराला जर त्याच्या प्रपंचापासून दूर नेणारे ठरले, तर बिचाऱ्याला खरोखरच वैराग्य स्वीकारावे लागेल.

...........................................................................................................................................

मागील वर्षी आमच्या गावातला एक तेव्हाचा मंत्री निवडणुकीला इच्छुक होता, म्हणून तो आपली छबी उजळायला निघाला. कशाच्या जिवावर, तर अध्यात्माच्या! त्याने बोलवावे कोणाला, तर सुदूर राज्यातल्या बालिश, बाष्कळ बडबडणाऱ्या एका तरुण बाबाला.... तो म्हणे पाटीवर समोरच्या व्यक्तीची माहिती, नाव-गाव न विचारता लिहितो. तिशीच्या आतला हा पोरगा कशावर प्रवचन करतो, त्यालाच ठाऊक. हा बाबा त्याच वर्षी भलतीसलती विधाने करून वादातही सापडला होता. परंतु अशा अध्यात्माची भुरळ काही कोणावर पडली नाही. त्या मंत्र्याला ना उमेदवारी मिळाली, ना त्याचे मंत्रिपद टिकले!

काही अध्यात्माचे वतनदार निवडणूक स्वत: लढवायचेही मनावर घेतात, उभे राहतात अन् पडतात. पडता पडता दुसऱ्याला घेऊन पडतात. वाचावीर असल्यामुळे या गुरूचा प्रचार ज्ञानी अन् उदबोधक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असेल, तर विसरा ती. असे बाबा कधी मौनी असतात, तर कधी अदृश्य. तिकडे उत्तरेत कसे काय असे आध्यात्मिक उमेदवार जिंकतात अन् मुख्यमंत्री वगैरे बनतात समजत नाही!

शिवाय यांच्या अध्यात्माला हिंदू-मुस्लीम, भारत-पाकिस्तान, सत्य-असत्य, भ्रष्टाचार, दिरंगाई, बलात्कार, जातीयता, हिंसा अशा साऱ्यांचा विटाळ नसतो. नाहीतर अध्यात्म केवढे सोवळे! हे नाही चालत, ते वर्ज्य अन् अमुकाचा बहिष्कार...! सांगायला असे अध्यात्म ऐहिक बाबींवर मात करणारे, पण सारा इहलोक व त्याचा उकिरडा त्याच्या अंगात मुरलेला!

स्थानिक पत्रकारांना या तरुण बाबाची व्यवस्था कोठे, कशी, कोणी केली आणि त्यावर खर्च किती आला, याची माहिती विचारली, तर कसचे काय! सारे पत्रकार अशा ऐहिक, लौकिक, मानवी समस्यांपासून कधीचेच पलायन करत अध्यात्मवादी झालेले. दहशत, आमिषे अथवा भावी हिते, यामुळे भौतिक माहिती देणेघेणे त्यांनी त्यागलेले दिसले. वैराग्य किंवा वास्तवातून संन्यास त्यांनी घेतलेला असावा. ‘गोदी मीडिया’ पक्का गुणवाचक व गुणदर्शक (अर्थातच भाजपचा व सरकारी) झालेला. मग स्थानिक काय, वैश्विक काय; अध्यात्माला अशा हद्दी अथवा चौकटी नसतात. ‘गोदी मीडिया’ विनोबाजींचा अनुयायी झाला आहे.

भारतात अध्यात्मावर बोलून प्रचंड कीर्ती, पैसा आणि आंतरराष्ट्रीय अनुयायी जमा करणाऱ्यांवर पत्रकारांनी एकदाही आपली शोधक व चिकित्सक नजर वळवली नाही. ‘इंडिया टुडे’ने कधी काळी सत्य साईबाबा यांच्या हवेतून घड्याळे वा माळा काढण्याची बिंगफोड केली होती. आता आता ‘कॅरॅव्हॅन’ या मासिकाने ऑगस्ट २०२४चा अंक ‘द गॉडमदर : अमृतानंतमयीज एम्पायर ऑफ सिक्रेटस’ या कव्हर स्टोरीवर काढला आणि आध्यात्मिक विश्वाची एक लपलेली वाईट बाजू वाचकांना सादर केली. रजनीश यांच्या काही अनुयायांनीही पुस्तके लिहून रजनीशांचे ढोंग, हाव उघड केली होती.

...........................................................................................................................................

भारतातल्या अध्यात्माचा बाजार कोट्यवधी रुपयांचा आहे. श्री श्री रविशंकर, जग्गी वासुदेव, ब्रह्मकुमारी, मां अमृतानंदमयी देवी, आसारामबापू, मुरारीबापू, रामरहीम, निर्मलबाबा इत्यादी बाबा-महाराज यांच्यासकट धर्म, संस्कृती, सण, परंपरा, मन:शांती अशा विषयांवर भाषणे देऊन भरपूर कमाई करणारे स्त्री-पुरुष गेल्या दहा वर्षांत गावोगावी अवतरले. चित्रवाणी वाहिन्या तर गेली अनेक वर्षे दिवसभर अध्यात्म ओकत असतात. या वाहिन्या म्हणजे अमेरिकेतल्या धर्मप्रचारार्थ सुरू झालेल्या टीव्हीची भ्रष्ट नक्कल… घरबसल्या साऱ्या चैनी उपभोगत या अध्यात्माचा ग्राहक वर्ग तयार करणारा एक बाजार. यू-ट्युब आणि तत्सम मंचांवर तर अशा आध्यात्मिक विषयाचा प्रत्यय नित्य येत राहतो.

...........................................................................................................................................

टीव्हीला नुसते व्याख्यान अथवा शाब्दिक आविष्कार परवडत नाही. त्यामुळे ते हातचलाखी, चमत्कारसदृश कृती आणि अंगात येणे, मनातले ओळखणे, मारझोड करणे, शारीरिक कसरती करणे, अशा गोष्टी करणाऱ्यांकडे खेचला जातो. साहजिकच अशा बाबा आणि बाया खूप प्रसिद्धी मिळवू लागतात. वाहिन्या अशा प्रकारे परजीवी होत प्रेक्षक मिळवू लागतात व त्यातून जाहिराती. म्हणून पत्रकारांना या बतावणीची कल्पना आलेली असूनही त्यांना शंका घेण्याची परवानगी नसते. नाही तर संशय वा शंका नसेल, तर ती व्यक्ती पत्रकार कसची?

जे. कृष्णमूर्ती असेच एक शब्दबंबाळ गूढवादी स्तोम. अवघी स्वातंत्र्यचळवळ या माणसाच्या अवतीभवती चालू असताना तो चक्क त्याकडे पाठ फिरवून आनंद, दु:ख, मुक्ती, भय, आत्मशोध, ध्यान अशा अनेक विषयांवर भरपूर बोले. देखणे व्यक्तिमत्त्व अन् उत्तम इंग्रजी, तसेच अॅनी बेझंट यांचा सहवास, यांमुळे कृष्णमूर्ती कोणी थोर तत्त्वज्ञ असल्याची अफवा त्यांच्या अनुयायांनी पसरवली. त्यांची व्याख्यानेही भरपूर खपत.

कृष्णमूर्ती एके ठिकाणी म्हणतात, “तुम्ही तुमच्या आध्यात्मिकतेसाठी दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून आहात व आनंदासाठी आणखी कोणावर तरी! आणि तुमच्या आत्मप्रकाशासाठी तुम्ही अन्य कोणावर तरी निर्भर असता… आता मी तुम्हाला म्हणतो की, या साऱ्या गोष्टी बाजूस सारून स्वयंप्रकाशासाठी तुम्ही तुमच्या आताच पाहायला पाहिजे. स्वत:च्या वैभवसंपन्नतेसाठी स्वत:च्या विशुद्धीकरणासाठी, स्वत:च्या अभ्रष्टतेसाठी तुम्ही तुमच्या आतच पहा. मला माहीत आहे की, तुमच्यापैकी एकसुद्धा ते करणार नाही… तुमची प्रगती किती झाली आहे व तुमचे आध्यात्मिक स्थान किती उंचावले आहे, हे दुसऱ्या कुणीतरी तुम्हाला सांगण्याची सवय झाली आहे, हे किती बालिश आहे. तुम्ही सोडून आणखी दुसरं कोण तुम्हाला सांगू शकणार की, तुम्ही स्वत:  भ्रष्ट आहात की नाही?” (‘जे. कृष्णमूर्ती - जीवन आणि मृत्यू’, मेरी लट्येन्स, अनुवाद कल्याणी किशोर, साकेत प्रकाशन, २००८, पृ. ८१)

काय समजले? आपल्या श्रोत्यांना असे झटकल्यावर कृष्णमूर्तींनी त्यांचा बोलायचा उद्योग थांबवला का? त्यांनीच सूचवल्याप्रमाणे त्यांचे किती स्वयंप्रकाशित अनुयायी त्यांना सोडून गेले?

हे जे स्वयंप्रकाशित आणि आत्मज्ञानप्राप्त प्रकरण असते, त्याचा पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात शिकवल्या जाणाऱ्या संज्ञापनाच्या (कम्युनिकेशनच्या) सिद्धान्तांशी संबंध आहे. माणूस जसा इतरांशी संज्ञापन करतो, तसा तो स्वशीसुद्धा करतो. त्याला ‘इंट्रा कम्युनिकेशन’ म्हणतात. प्रत्येक व्यक्तीकडे अशी स्वत:शी बोलायची क्षमता असते. परंतु मजा अशी की, या संज्ञापनाचा ठोस पुरावा कोठेही नसतो. जसा एखाद्याला साक्षात्कार होतो अन् त्यावर बळेबळेच इतरांना विश्वास ठेवावा लागतो, तसा हा प्रकार. एखाद्याने समजा म्हटले की, मला आत्मज्ञान प्राप्त झाले असून माझी आत्मशुद्धीही झाली आहे, तर त्याची पडताळणी पत्रकार कशी करणार?

इहलोकीच्या पत्रकारितेत अशा स्वजाणिवा आणि स्वज्ञान यांना काही स्थान नाही. आजवर कोणीही आपण स्वयंप्रकाशित झाल्याचे पत्रक काढलेले नाही आणि ते कोणा वृत्तपत्राने छापलेलेही नाही! कोणी समजा तसे प्रकाशित केलेच, तर त्या व्यक्तीला मनोरुग्ण ठरवले जाईल.

पत्रकाराचेच बघा ना! त्याला\तिला काही माहिती मिळाली, तर तो वा ती आपण माहीतगार झाल्याचे संपादकाला सांगून घरी जाऊ शकत नाही. ती माहिती कागद वा संगणक यावर उमटवल्याशिवाय ती साकार होणार नाही. म्हणून पत्रकारितेत निर्गुण, निराकार, नि:शब्द-निर्विकार असे काही नसते. तिच्या नजरेत ते सारे बकवास व थोतांड! त्यामुळे या होऊ घातलेल्या आध्यात्मिक पत्रकारांना जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे अध्यात्माचे थोडेफार ज्ञान करून घ्यावे लागेल. मात्र बहुतकरून ते भाषणे-प्रवचने, दृष्टान्त, कथा, मिथके अशा माध्यमांतून घ्यावे लागेल. माणूस सुदृढ आहे याचे पुरावे देता येतात, आध्यात्मिक असल्याचा काय व कसा देणार?

म्हणजेच वास्तव विज्ञानाधारे मांडता येते, तद्वत अध्यात्म नव्हे, ही अडचण म्हणा की बकवासांची बिंगफोड अंगलट येऊ पाहिल म्हणून भलेभले लोक विज्ञान व अध्यात्म यांत काही वाकडे नसल्याचा दावा करतात. थोर विद्वान व गांधीवादी आचार्य स.ज. भागवत यांत चांगलेच अडकले. ते सांगतात - “अध्यात्म आणि विज्ञान यांचा परस्परविरोध दिसत असला तरी नजीकच्या भविष्यात या दोघांचा यथायोग्य समन्वयच होणार आहे. या समन्वयासाठी आपण उत्साहाने-जाणिवेने उद्युक्त होणे हे आजचे कर्तव्य आहे… शरीर व मन यांचे समाधान करीत गेल्याने बुद्धीची वाढ होते आणि बुद्धीच्या वाढीबरोबर केवळ बुद्धिवादाचा अपुरेपणाही प्रतीत होऊ लागतो… अध्यात्माचा… संदेश इतका भव्य आहे की, यापुढे बाकी सर्व भौतिक सुखे फोल आहेत असे वाटते… तथापि… सर्वसामान्य लोकांना भौतिक सुखाचीच अधिक लालसा वाटलेली आहे. अध्यात्माच्या…उच्च संदेशाचा स्वीकार करण्याची पात्रता नसल्यामुळे लोकांनी तो संदेश विकृत बनविला.” (‘आचार्य भागवत संकलित वाङ्मय - खंड १’, म.रा.सा.सं. मंडळ, मुंबई, १९८३, पृष्ठे ३०-३१.)

...........................................................................................................................................

जे. कृष्णमूर्ती असेच एक शब्दबंबाळ गूढवादी स्तोम. अवघी स्वातंत्र्यचळवळ या माणसाच्या अवतीभवती चालू असताना तो चक्क त्याकडे पाठ फिरवून आनंद, दु:ख, मुक्ती, भय, आत्मशोध, ध्यान अशा अनेक विषयांवर भरपूर बोले. देखणे व्यक्तिमत्त्व अन् उत्तम इंग्रजी, तसेच अॅनी बेझंट यांचा सहवास, यांमुळे कृष्णमूर्ती कोणी थोर तत्त्वज्ञ असल्याची अफवा त्यांच्या अनुयायांनी पसरवली. त्यांची व्याख्यानेही भरपूर खपत. काय समजले? आपल्या श्रोत्यांना असे झटकल्यावर कृष्णमूर्तींनी त्यांचा बोलायचा उद्योग थांबवला का? त्यांनीच सूचवल्याप्रमाणे त्यांचे किती स्वयंप्रकाशित अनुयायी त्यांना सोडून गेले?

...........................................................................................................................................

अध्यात्माच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांपुढे सर्वांत मोठी समस्या ही येत असावी की, पगार किती मागावा? डोके भंजाळून जाईल असे विषय मांडण्याची हातोटी असणारे बुवा, महाराज, बाबा जेवढे बोलतील तेवढे देऊन मोकळे व्हायचे की, त्यांनी केलेल्या प्रवचनाचा अर्थ उलगडून सांगणे हेही काम करायचे? म्हणजे त्यासाठी भरपूर वाचन, श्रवण, विश्लेषण आले. त्याचे वेगळे पैसे मालक देईल काय? अध्यात्माच्या खोल डोहात डुंबायचे आणि तळाशी सापडलेली माणके, रत्ने लोकांना आणून द्यायची म्हटली, तर केवढे सायास करावे लागतील त्या पत्रकाराला? हे प्रयास पत्रकाराला जर त्याच्या प्रपंचापासून दूर नेणारे ठरले, तर बिचाऱ्याला खरोखरच वैराग्य स्वीकारावे लागेल.

अनेक धर्मांतले अनेक पंथ, उपपंथ, गुरू, तत्त्वज्ञाने, देवदेवता, चमत्कार, साक्षात्कार, संप्रदायात्मक भेदाभेद पाहता एकही पत्रकार आध्यात्माच्या क्षेत्रात मुक्काम ठोकायची शक्यता नाही. व्यक्तिश: त्याला मद्य, धुम्रपान, मांसाहार, द्रव्य, चैन आवडत असेल, तर काय होईल त्याचे?

महाराष्ट्रातले एक उपेक्षित पण मोठे धाडसी व विद्वान संपादक रघुनाथ धोंडो कर्वे प्रखर बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ. ते काय म्हणत ते पाहा : “बुद्धिवाद हा तर्कशास्त्रावर आधारलेला असतो आणि अध्यात्मवाद कल्पनेवर आधारलेला असतो, हा या दोहोंतला मोठा फरक आहे. ज्ञानाची कसोटी तर्कशास्त्र आहे. अध्यात्मवादात काही ज्ञान आहे आणि ते अंत:स्फूर्तीने मिळते, असा भ्रम धार्मिक लोकांत आढळतो. अंत:स्फूर्ती याला काही अर्थ असला, तर तो इतकाच की कधी कधी जाणूनबुजून कोणताही विचार केल्याशिवाय आपल्या मनात एखादी कल्पना येते आणि ती कधी कधी खरी निघते. या अंत:स्फूर्तीचा अर्थ इतकाच की, आपल्याला नकळत आपल्या मेंदूत विचार चाललेला असतो आणि त्याचा निष्कर्ष अंत:स्फूर्तीच्या रूपाने आपल्या मनात येतो. पण अशा रीतीने झालेल्या कल्पनांना तर्कशास्त्राची कसोटी लावल्याशिवाय त्यांना ज्ञानाचा दर्जा कधीही मिळणार नाही… अशा सुचलेल्या कल्पनांपैकी कोणत्या खऱ्या आणि कोणत्या खोट्या हे तर्कशास्त्राच्या कसोटीने ठरवावे लागते, हे शास्त्रज्ञांना कळते. अध्यात्मवाद्यांना हे कळत नाही आणि म्हणूनच ते भलभलत्या कल्पना खऱ्या धरून चालतात. ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म वगैरे कल्पना तर्कशास्त्राच्या कसोटीला उतरत नाहीत… आचार्य भागवतांसारख्या लोकांना हा मूलभूत फरक न कळल्यामुळे ते बुद्धिवादाचा व अध्यात्मवादाचा समन्वय करू पाहतात आणि अर्थातच हा प्रयत्न फोल होतो.” (रधों : ‘समाजस्वास्थ्य’मधील निवडक लेख, संपादक अनंत देशमुख, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१०, पृष्ठ २११)

अध्यात्माच्या क्षेत्रात वादविवाद तर होतातच, मारामाऱ्यासुद्धा होतात. आपण सांगतो ते बिनतोड असते असे अहंकारी रूपही येथे आढळते. म्हणूनच खुलासे, स्पष्टीकरण, दिलगिरी यांना मुळीच वाव नसतो या क्षेत्रात. अर्जदारांनो, सांभाळून असा बाबांनो! जय जर्नलिस्ट!!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख