अजूनकाही
१. अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांच्या अधिकृत नावांचे ‘प्रमाणीकरण’ केल्याचा दावा चीनने केला असून, त्याला ‘वैधानिक कृती’ संबोधून पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशाच्या भेटीला तीव्र विरोध दर्शवल्यानंतर चीनने आता भारताविरोधात हे पाऊल उचलले आहे. अरुणाचल प्रदेशला चीन ‘दक्षिण तिबेट’ म्हणून संबोधतो. या ‘दक्षिण तिबेट’मधील सहा ठिकाणांचे चिनी वर्ण आणि तिबेटी, रोमन अक्षरे निश्चित करण्यात आली आहेत. वो गिआनलिंग, मिला री, कोडेंगारबो री, मेनकुका, बुमो ला आणि नामकापुब री अशी ही सहा ठिकाणांची नावे रोमन अक्षरांचा वापर करून तयार करण्यात आली आहेत.
हा प्रश्न राजनैतिक पातळीवर सामंजस्याने सोडवायला हवा. उगाच आजकालची राष्ट्रवादी हवा या फुग्यात भरण्यात अर्थ नाही. चीनने मनातल्या मनात आपल्याकडच्या काही गावांची नावं ठरवली आहेत. आपण तर त्यांनी कधी आयुष्यात न ऐकलेले-पाहिलेले पदार्थ थेट ‘चायनीज’ म्हणून खपवतो आहोत, यावर त्यांनी संयुक्त राष्ट्रांत बोट ठेवलं, तर आपल्यापाशी काय उत्तर असेल? त्यापेक्षा दोघांनी एक चिकन फ्राइड आणि एक थंडा मागवलेला बरा.
...................................................................................................
२. मल्याळी सुपरस्टार मोहनलाल याच्या १००० कोटी रुपये बजेटच्या 'महाभारत' या चित्रपटाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध दर्शवला आहे. ज्येष्ठ साहित्यिक एम. टी. वासुदेवन नायर यांच्या 'रंदमूझम' या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कादंबरीवर आधारित कादंबरीमध्ये भीमाच्या नजरेतून महाभारताचे वर्णन करण्यात आले आहे. एम. टी. यांच्या विकृत लिखाणाला महाभारत म्हणणं चुकीचं आहे, 'रंदमूझम'वर १० हजार कोटींचा सिनेमा बनवला तरी ते महाभारत ठरू शकत नाही. त्यामुळे या चित्रपटाला ‘महाभारत’ हे नाव देण्याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहोत, असं संघाच्या केरळ शाखेने म्हटलं आहे.
महर्षी वेदव्यास प्रात:शाखेत जात होते की सायंशाखेत? हजारो वर्षांच्या प्रक्षिप्त कथांची भर पडत पडत सिद्ध झालेलं महाभारत हे महाकाव्य आहे. त्याचा ‘धर्मग्रंथ’ कधी झाला? साधे कॉपीराइटही फार फार तर शंभर वर्षांत संपुष्टात येतात. महाभारताचे कॉपीराइट यांच्याकडे कधी आले? सगळ्या गोष्टींचं आपल्या बुद्धीला झालेलं आकलनच बरोबर आहे, त्यापलीकडे कोणी काहीही अर्थ लावता कामा नये, असले एकेकांचे हट्ट चालवून घ्यायला हा देश आहे की पोगो चॅनेल?
...................................................................................................
३. मोदी सरकारने मंत्री आणि व्हीआयपींना त्यांच्या गाडीवरील लाल दिवा हटवण्याचे आदेश दिले असले तरी देशातली व्हीआयपी मस्ती संपायचं नाव घेत नाही. पंतप्रधान मोदी यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरचा भाजप आमदार राकेश राठोड याने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला श्रीमुखात लगावत मारहाण केल्याचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. राठोड याने टोल नाक्यावरील बॅरिकेडची मोडतोड केल्याचे दिसत आहे.
काही काळानंतर पोलीस, टोल नाक्यांवरचे कर्मचारी, अन्य सरकारी संस्थांचे कर्मचारी आणि काही ठिकाणचे सामान्य नागरिकही सरकारला अर्ज सादर करतील की, कृपा करून व्हीआयपींच्या गाड्यांवर लाल-हिरवे-निळे वगैरे काय दिवे लावायचेत ते लावा. त्याने कोणाच्या अंगात मस्ती असणार, हे ओळखू तरी येईल. आताच्या निर्णयामुळे साध्या वाहनातून आलेला कोणीही रगेलपणा करेल आणि त्याचा वाह्यातपणा तो व्हीआयपी असण्याची शक्यता गृहीत धरून सहन करावा लागेल.
...................................................................................................
४. राजकीय नेत्यांच्या कोणत्याही बोलण्याला ‘होय होय’ असे म्हणत त्यांची हुजरेगिरी न करता, महत्त्वाच्या पदावर बसलेल्या नेत्यांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात कठोर कारवाई करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना केले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कायम नि:पक्षपाती भूमिका घेणे आवश्यक असून, एखादा निर्णय घेताना डळमळीत भूमिका न घेता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. देश आणि जनतेच्या हितासाठी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता आपले काम सुरू ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
बाकी जे निर्णय आमच्या, आमच्या विचारधारेच्या, ‘आमच्या माणसां’च्या विरोधात जातील, त्यांचा समाचार कसा घ्यायचा ते आम्ही पाहू. कुठेतरी जंगलात, वाळवंटात बदली झाली तर त्याला तयार राहा. चुकून काही ‘कार्यकर्त्यां’चा राग अनावर होऊन दोनपाच फटके पडले, तर ते सहन करा... हेही नाही बोलले का राजनाथ? आश्चर्य आहे!
...................................................................................................
५. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये यापुढे सोशल मीडियाचा संभाळून वापर करावा लागणार आहे. वाराणसीमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास यापुढे थेट ग्रुप अॅडमिनवर कारवाई होईल. फेसबुक, व्हॉटसअॅपवरून आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि अफवा पसरवल्यास ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरून थेट तुरुंगात रवानगी करण्यात येईल. सोशल मीडियाचा वाढता गैरवापर कमी करण्यासाठी वाराणसीतील स्थानिक प्रशासनाने हे आदेश दिले आहेत.
वाराणसी भारताबाहेर आहे की चंद्रावर? कोणत्याही ग्रूपवर कोणीही वेडपटासारखं काहीही बरळू शकतं. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकचे ग्रूप अॅडमिन काही पगारी नोकर असतात की काय २४ तास कोण काय पोस्टतो, हे पाहत बसायला. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल आधीच निर्णय दिलेला आहे. वाराणसी सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यकक्षेबाहेर आहे काय?
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment