शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sun , 29 September 2024
  • संकीर्ण व्यंगनामा शिरोजीची बखर Shirojichi Bakhar नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

लोकसभा निवडणुकांनंतरच्या तीन महिन्यांत शिरोजीने एकच बखर लिहिली. बिहारचे नीतीश कुमार आणि आंध्राचे चंद्राबाबू नायडू यांच्या समर्थनाच्या जोरावर श्रीमान नरेंद्र मोदी यांनी सरकार बनवले. त्यानंतर वातावरणात थोडे दिवस शांतता होती.

या काळाविषयी संपादकीय लिहिण्याऐवजी आम्ही शिरोजीने या काळात जी डायरी लिहिली आहे, त्यातील उतारे द्यायचे ठरवले आहे. आजकाल शिरोजीच्या बखरीपेक्षा आमची संपादकीये मोठी होऊ लागली आहेत, अशा तक्रारी वाचक करत आहेत. आम्ही स्वतः त्याबद्दल वाईट वाटून घेत नाही. हा आमचा अपमान नसून शिरोजीचा सन्मान आहे, असे आम्ही समजतो. आज २१२४मध्ये शिरोजीची लोकप्रियता शिखरावर गेली आहे. अशा वेळी लोक शिरोजीने आजच्या बखरीत काय लिहिले आहे, याविषयी उत्सुक असतात. त्यांना डायरेक्ट हिऱ्यालाच स्पर्श करायचा असतो. आम्ही कसोशीने तयार केलेल्या अप्रतिम कोंदणाचा त्यांना त्रास होतो. या बखरीच्या वेळी मात्र आम्ही एक युक्ती केली आहे. हिऱ्याच्या चुऱ्याचेच कोंदण आम्ही केले आहे. घ्या लेको! शिरोजीच्या बखरीचे संपादकीय शिरोजीच्याच शब्दांत. शिरोजीच्या डायरीमधील उतारे हेच संपादकीय!

उतारा एक  - “लोकसभेचे निकाल मोदीभक्तांच्या दृष्टीने अपमानकारक होते. मोदीजी चारशेच्या वर सीट्स घेऊन विक्रम करणार, असे म्हणत भक्त नाचत होते. मिळाल्या दोनशे चाळीस! चारशेच्या वर जागा न देऊन भारताच्या मतदारांनी नरेंद्र मोदींचा अपमान केला आहे, असे मोदीभक्तांचे म्हणणे पडले. मोदीभक्तांना हा मोठा झटका होता, पण ही नाराजी फार काळ टिकली नाही. लवकरच भाजपच्या आयटी सेलने दहा वर्षं राज्य केल्यावर अँटी-इन्कम्बन्सी जगात कुठेही तयार होते, तशी भारतातसुद्धा तयार झाली असा प्रचार सुरू केला.

परंतु मोदीजी हे मोदीजी असल्यामुळे त्यांनी नेहमीप्रमाणे कमाल केली आणि एवढी अँटी-इन्कम्बन्सी असूनसुद्धा २४० चाळीस जागा मिळवल्या, असे सांगण्यात येऊ लागले. जातिवंत भक्तांचे डोळे चमकले. त्यांच्या डोक्यातले आणि त्यांच्या मोबाईलचे लाईटस् एकदम लागले. अरेच्चा खरंच की! एवढी मोठी अँटी-इन्कम्बन्सी तयार होत असते जगभर, पण मोदीजींनी २४० जागा मिळवून केवढा पराक्रम केला! धडाधड मेसेजेस फिरू लागले.

मोदीजी, मोदीजी, मोदीजी! भक्त नाचू लागले, भाजपच्या आयटी सेलच्या तालावर थरकू लागले. आयटी सेलचा मेसेज आल्याशिवाय मोदीभक्तांच्या डोक्यातल्या ट्यूबा पेटत नसत! लवकरच दुसरे नॅरेटिव्ह फिरू लागले. नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनलेले मोदीजी हे पहिलेच पंतप्रधान! निराशेने पार गारठलेल्या भक्तांमध्ये उत्साहाच्या उबदार लहरी फिरल्या! मोदीजी, मोदीजी, मोदीजी!”

शिरोजीला स्वतःला भक्तांच्या वाहवत जाण्याचे फार आश्चर्य वाटत होते.

उतारा दोन - “गेली दहा वर्षं मला आश्चर्य वाटत आहे. भक्तजन आपले डोके गहाण ठेवून स्वतःशी अशी वंचना कशी करू शकतात? चार दिवसांपूर्वी आपण मोदीजी ‘चारसौ’ पार करणार म्हणून नाचत होतो. मोदीजींनी भारताला विश्वगुरू बनवले आहे, भारताच्या अर्थकारणाच्या आकाशात सोन्याचा धूर निघत आहे, म्हणून भारतीय जनता मोदीजींना अतिप्रचंड बहुमताने निवडून देणार आहे म्हणून नाचत होतो; आणि आज आपण मोदीजींनी एवढी मोठ्या अँटी-इन्कम्बन्सीचा सामना करून २४० जागा जिंकल्या म्हणून नाचतो आहोत. असे निर्बुद्ध वर्तन आपण का करत आहोत, हा प्रश्न कुणा भक्ताच्या डोक्यात कसा येऊ शकत नाही, याचे मला आश्चर्य वाटत आहे. गेली दहा वर्षं प्रत्येक विषयाबाबत आणि प्रत्येक घटनेबाबत हेच चालले आहे.”

शिरोजीच्या मनात उठणारे प्रश्न बिनतोड होते. या प्रश्नांची उत्तरे शिरोजीने येत्या काही बखरींमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

उतारा तीन  - “आता हजार वर्षे राज्य आपलेच असा प्रचार आयटी सेल करत होता, मग राज्यस्थापनेच्या केवळ दहाव्या वर्षांत हा अँटी-इन्कम्बन्सीचा भाग कसा आला, हा प्रश्न भक्तांच्या मनात का उठत नाही? राज्य हजार वर्षं चालायचे म्हणजे पाहिली किमान आठशे वर्षं तरी अँटी-इन्कम्बन्सी आली नाही पाहिजे.”

हा विचार आपल्या रोजनिशीमध्ये लिहिताना शिरोजी गालातल्या गालात हसत असणार असा विचार आमच्या मनात येतो आहे.

उतारा चार – “गेल्या चार हजार वर्षांच्या इतिहासात या जगात कुठलेच राज्य किंवा साम्राज्य एक हजार वर्षे टिकलेले नाही मग आपले का टिकावे, हा प्रश्न भक्तांच्या मनात का उठत नाही?”

उतारा पाच – “हिटलर, आपले ‘थर्ड राईश’ म्हणजे आपण स्थापन केलेले साम्राज्य एक हजार वर्षं टिकेल असे म्हणत होता. तत्कालीन जर्मन जनतेचा त्यावर विश्वासही होता. हिटलरचे राज्य बारा वर्षं टिकले. हिटलर, आपला जर्मन लोकांचा आर्यन वंश विश्वाचा नायक आहे, असे म्हणत होता आणि सामान्य जर्मन जनतेने त्यावर विश्वास ठेवला होता. आपण विश्वगुरू आहोत, असे आज म्हटले जात आहे आणि भक्तलोक त्यावर विश्वास ठेवत आहेत. हिटलरच्या साम्राज्याला दहाव्या वर्षांपासून पनौती लागली आज आपल्यालाही अँटी-इन्कम्बन्सीचा सामना करावा लागत आहे. या विषयी आज रोजी नाचणारे भक्त नक्की काय विचार करत आहेत?”

उतारा सहा – “स्वातंत्र्याच्या चळवळीच्या वेळी स्वातंत्र, समता आणि बंधुभाव या दिव्य तत्त्वांनी भारतीय जनता प्रेरित झाली होती. भव्य जनसागर दिव्य तत्त्वांच्या सागरावर झुलत होते. आज हीच जनता वंशवाद, धर्मांधता आणि जातीयवाद या मुद्द्यांमुळे चेकाळली आहे. हे परिवर्तन नक्की कसे घडते? सामान्य माणूस फारसा विचार न करता राज्यकर्त्यांनी त्याच्या डोक्यात भरलेल्या विचारांबरोबर वहावत जातो का? पण एक गोष्ट नक्की की, महात्मा गांधी यांना जनतेचे जेवढे प्रेम मिळाले तेवढा जनाधार मोदी आणि कंपनीला मिळालेला नाही.”

मोदीकालीन भारतातील मोदीभक्तांच्या मानसिकतेचा खूप विचार शिरोजीने केला होता. मोदीभक्त असे का वागतात, याची उत्तरे आपल्याला अल्फ्रेड अॅडलरच्या विचारात सापडतात, असे त्याला वाटत होते. अल्फ्रेड अॅडलर ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ होता आणि सिग्मंड फ्रॉईडचा शिष्य होता, हे आज सर्व जाणकार वाचकांना माहीत आहेच!

शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे -

उतारा सात – “मोदीभक्तांची मानसिकता अॅडलर कडून समजून घेता येते. माणसाला आपल्यात काहीतरी न्यून आहे, असे वाटत असते. त्यामुळेच तो सामर्थ्याच्या शोधात असतो. या शोधातून त्याचे ‘बिलीफ्स’ म्हणजे त्याचे विचार आणि त्याच्या श्रद्धा तयार होतात. माणूस या आपल्या श्रद्धांच्या जास्त जास्त आहारी जात राहतो. इतका की, कुठलाही तार्किक विचार न करता आणि कुठलेही प्रश्न न विचारता तो आपल्या श्रद्धांच्या मागे वाहवत जाऊ लागतो. श्रद्धा जशी प्रगाढ होत जाते, तसे तो कुठलाच विचार करण्याच्या पलीकडे जातो.”

उतारा आठ – “राजकीय भक्तांना झुंडीचा भाग बनून राहायला आवडते. झुंडीच्या विरोधात त्यांना जायचे नसते. त्यांना ‘सेन्स ऑफ बिलाँगिंग’ हवा असतो. झुंडीच्या आहारी जाण्यात स्थिरता आहे, असे त्यांना वाटत असते. त्यासाठी ते आपल्या विवेकाला कायमचा निरोप देतात.”

उतारा नऊ – “काही लोकांना कुठल्या ना कुठल्या ऑथॉरिटी फिगरची (अधिकारी व्यक्तीची) मानसिक गरज असते. कुणीतरी खंबीर व्यक्तीने या जगाची सगळी सूत्रे आपल्या हातात घ्यावी आणि सगळे छान करून टाकावे असे या भाबड्या लोकांना वाटत असते.”

देशोदेशीचे हुकूमशहा याच गोष्टीचा फायदा घेताना दिसतात.

उतारा दहा – “आपला जर्मन वंश जगाचा नायक आहे, असे हिटलर सांगत होता. आज आपला स्लाव्ह वंश ग्रेट आहे, असे व्लादिमीर पुतिन सांगत आहेत. आपली संस्कृती जगाची नायक आहे, असे आपल्या लोकांना सांगून तुर्कस्तानचे तायिप एर्डोगन निवडून येत आहेत आणि एथनिक हंगेरियन हे जगातील सगळ्यात प्रगत लोक आहेत, असे हंगेरीचे व्हिक्तोर ओर्बान सांगत आहेत. आपले मोदीजी भारतीय संस्कृती विश्वगुरू आहे असे सांगत आहेत. अखेर सगळेच वंश आपापल्या जागी ग्रेट असतात, हे या नेत्यांच्या अनुयायांना कळत का नाही?”

उतारा अकरा – “हा सगळा वर्चस्ववादाचा खेळ आहे. याच्या उलट प्रत्येक देशातील काही लोकांना शांतता, सहकार्य, एकमेकांविषयी आदर, लोकशाही मूल्ये या तत्त्वांच्या आधारावर जगायचे असते. सामाजिक झुंडी आणि हे शांततावादी लोक यांच्यात झगडा तयार होतो.

इतिहासाची सगळी आवर्तने बघितली, तर विवेकहीन आणि आक्रमक वर्चस्ववाद, आणि समंजस सहकार्याच्या आधाराने जगू पाहणारा विवेकवाद यांच्यातले झगडे आपल्या हाती लागतात.”

उतारा बारा – “हे जग म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून विवेकहीन आक्रमक वर्चस्ववाद आणि समंजस सहकार्याच्या आधाराने जगू पाहणारा विवेकवाद यांचे सनातन भांडण आहे.”

शिरोजी पुढे लिहितो -

उतारा तेरा – “सगळेच हुकूमशहा ‘आपण लोक ग्रेट आहोत’ म्हणून आपल्याला खूप शत्रू आहेत आणि असुयेपोटी ते आपल्याला संपवायला टपलेले आहेत, असे सांगत असतात. ज्यू लोक आपले शत्रू आहेत, असे हिटलर सांगत होता, पश्चिम युरोपियन लोक आपले शत्रू आहेत, असे पुतिन सांगत आहेत, लोकशाहीवादी ख्रिश्चन संस्कृती आपली शत्रू आहे, असे एर्डोगन सांगत आहेत आणि मुस्लीम संस्कृती हिंदू संस्कृतीची शत्रू आहे असा प्रचार मोदींचा आयटी सेल करत आहे.”

उतारा चौदा – “लोकांच्या न्यूनगंडावर फुंकर घातली जावी म्हणून आपण एक वंश म्हणून ग्रेट आहोत असे सांगायचे, परंतु त्याचवेळी लोकांच्या न्यूनगंडामधून जन्मलेल्या भीतीचा फायदा घ्यायचा, अशी नीती असते. आपल्याला घनघोर शत्रू आहेत असे सांगायचे. या शत्रूपासून बचाव करून जग जिंकायचे असेल तर स्ट्राँग नेत्याला निवडून द्यायला लागेल असे सांगायचे. जिथे तिथे एकच खेळ!”

या जगात सर्वत्र एकच खेळ काही काळ तरी यशस्वीपणे खेळता येतो, हे शिरोजीने दिलेल्या वरील उदाहरणांवरून दिसून येते. 

असो. शिरोजीच्या विसाव्या बखरीकडे जाताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. लोकसभेच्या निकालांमुळे ‘लिबरल’ लोकांमध्ये आशेचा एक किरण जागा झाला होता. ते आनंदात होते. तो आनंद त्यांच्या अभिव्यक्तीमधूनसुद्धा झळकायला लागला होता. गेली दहा वर्षं अस्वस्थ असलेले लिबरल लोक त्यांच्या कळत-नकळत जरा जास्त आक्रमक झाले होते.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे

नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा स्थानापन्न झाले आणि दोन महिने राजकारणामधली उथल-पुथल थोडी कमी झाली. मोदीजी कुबड्यांवर अवलंबून होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती हताशा दिसू लागली होती. शांत शांत दिसणाऱ्या मोदीजींची छायाचित्रे यू-ट्यूब चॅनेलवाले परत परत दाखवू लागले.

पांडेजींच्या ठेल्यावरसुद्धा शांतता होती. पण चर्चेचा अड्डाच तो, किती दिवस शांत राहणार? एके दिवशी पांडेजीच अस्वस्थ झाले आणि त्यांनी सगळ्यांना फोन करून बोलवून घेतले.

भास्कर आणि समर आले तेव्हा नाना, अविनाश, अच्युत आणि राघव आधीच येऊन बसले होते. दोन प्लेट भजी झाली होती.

भास्कर - काय अविनाश भेटला नाहीस निकालाच्या दिवसानंतर?

समर - पराजय झोंबला त्याला!

अविनाश - विजयाला पराजय का म्हणतो आहेस? मोदीजींनी एवढी मोठी अँटी-इन्कम्बन्सी परतवून लावली!

भास्कर - लागला पोपट बोलायला!

अविनाश - कसला पोपट?

समर - ते तुला कळायचं नाही.

अविनाश - मला पोपट म्हणजे काय ते माहीत नाहिये का?

नाना - एकट्या मोदीजींनी २४० सीट्स घेतल्या हे आपल्याला विसरता येत नाही. बाकी राहुल, केजरीवाल, माया, ममता, लालू, स्टालिन, अखिलेश, उद्धव आणि पवार या सगळ्यांनी मिळून २४० मिळवल्या! (हु हु हु)

अविनाश - एक अकेला सब पर भारी!

समर - एक अकेला सब पर भारी आहे, तर मग सरकार का नाही चालवू शकत?

अविनाश - चालवतायत की!

भास्कर - हे कसले सरकार?

समर – ‘यू टर्न सरकार’ असं नाव दिलं आहे लोकांनी मोदीजी सरकारला!

अविनाश - वाटेल ते बोलू नकोस!

भास्कर - गेल्या १०० दिवसांत चार-पाच ‘यू टर्न’ घेतले मोदीजींनी!

अच्युत - कसले ‘यू टर्न’?

भास्कर - वक्फ बोर्ड इश्यूवर यू टर्न, यू-ट्यूब बिलावर यू टर्न, यूपीएससी लॅटरल एन्ट्री मुद्द्यावर यू टर्न,

समर - सगळ्यात गंमतीचे म्हणजे वक्फ बोर्ड बिलावर यू टर्न घेतला.

अच्युत - वक्फ बोर्ड ही काय भानगड आहे?

भास्कर - मुसलमान लोकांनी आपल्या समाजाला जी प्रॉपर्टी दान केली आहे, ती वक्फ बोर्डांतर्फे मॅनेज केली जाते. या श्रीमंत बोर्डांच्या नाकात वेसण घालायला पाहिजे, असं मोदीजींचं मत होतं. पण नीतीश आणि चंद्राबाबू नाही म्हणाले. मग पार्लमेंटरी कमिटीकडं दिलं आहे आता हे विधेयक.

नाना - लोकशाहीमधली पद्धतच आहे ती.

भास्कर - हो का? मग तुम्हाला बहुमत होतं, तेव्हा का नाही पाठवली बिलं पार्लमेंटरी कमिटीकडं.

नाना - मोदीजी जेव्हा जे योग्य असते, तेव्हा ती गोष्ट करून टाकतात.

भास्कर - म्हणजे गरजवंताला अक्कल नसते!

समर - वक्फ बोर्डाच्या बाबतीत चंद्राबाबूचा पाठिंबा नाही मिळाला. त्याला मुसलमानांची मतं महत्त्वाची आहेत. १० टक्के मुसलमान आहेत आंध्रप्रदेशात! 

भास्कर - मोदीकाका घाबरले चंद्राबाबूला. म्हणाला चर्चा करू. पार्लमेंटरी कमिटीकडं पाठवू विधेयक.

समर - आता काही ते विधेयक परत येत नाही लोकसभेत.

भास्कर - आता फक्त व्हॉट्सअप मेसेजेस येत राहणार भक्तांना! वक्फ बोर्ड ‘लॅंड-जिहाद’ करतंय, हिंदूंच्या जमिनी काबीज करत चाललं आहे.

समर - घाबरलेला भक्तगण मोदीकाकांनाच मतं देत राहणार असं वाटतंय या लोकांना.

अविनाश - तू मोदीजींना मोदीकाका म्हणू नकोस. मोदीजी म्हण!

भास्कर - मोदीकाका राहुललासुद्धा घाबरू लागले आहेत.  

अविनाश - शक्य नाही.

भास्कर - राहुल म्हणाला ‘मोदी हा माणूस देशात बेरोजगारी असताना युपीएससीची परीक्षा न घेता आपल्या माणसांना आयएएसच्या नोकऱ्या देतोय’. मोदीकाकांनी घाबरून लगेच यू टर्न घेतला!

समर - बिहारामध्ये बेरोजगारी भयंकर आहे. १० शिपायांच्या जागा असतील तर तीन तीन हजार पीएच.डी. लोक अर्ज करतायत आणि इथं मोदीकाका परीक्षा न घेता आपल्या लोकांना आयएएस करतायत! नीतीशबाबूनं डोळे वटारले असणार लॅटरल एंट्रीबाबत.

अविनाश - तू मोदीजींना मोदीकाका म्हणू नकोस!

राघव - आपण त्यांना मोदीजी म्हणूयात का?

समर - आम्ही तरी मोदीजींना ‘अहो-जाहो’ करतो. हे लोक तर राहुलला काहीही बोलत असतात.

राघव - आपण मोदीजी आणि राहुल गांधी या दोघांबद्दलही आदरानं बोलू.

अविनाश - मी मेलो तरी राहुलला ‘अहो-जाहो’ करणार नाही.

नाना - मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना आदर दिला गेला पाहिजे आपण! 

समर - राहुलसुद्धा विरोधी पक्षनेता आहेत, कुठल्याही क्षणी ते पंतप्रधान बनू शकतात. त्यांनाही आपण आदर दिला पाहिजे.

भास्कर - विरोधी पक्षनेता फार महत्त्वाचा असतो. पंतप्रधानाची विरोधी पक्षातली एक सावलीच असते ती! Shadow Primeminister!

अविनाश - घंटा Shadow Primeminister! अक्कल आहे का?

भास्कर – अरे, लोकशाहीतला तसा संकेतच आहे जगभर!

अविनाश - खड्ड्यात गेली लोकशाही.

समर - या लोकशाहीमुळेच तुम्ही सत्तेवर आला आहात!

अविनाश - आता आम्ही सत्तेवर आलो आहोत. आता आम्हाला माहीत आहे या लोकशाहीचं काय करायचं आहे ते!

भास्कर - म्हणजे काय करणार आहात?

अविनाश - घटनाच बदलून टाकायची! नो लोकशाही! आता इथून पुढं निवडणुका होणार नाहीत, हे जाहीर करून टाकायचं!

समर - आम्ही घटना बदलू असं म्हणालात तर केवढा हंगामा झाला! ३०३ जागांवरून २४० जागांवर आलात तुम्ही.

भास्कर – उत्तर प्रदेशमध्ये तर ६३ जागांवरून ३० जागांवर आलात तुम्ही!

भास्कर - आता परत असं काही बोललात तर सगळ्या भारतात मिळून ३० जागा मिळतील.

राघव - मी थोडं बोलू का?

भास्कर – हो, बोला की! त्यात विचारयाचं काय?

राघव - मला वाटतंय की, गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे.

नाना - तुम्ही काँग्रेसला काय धडा मिळाला आहे, हे बोला फक्त. संघाविषयी बोलू नका.

राघव - का?

नाना - संघाला धडे वगैरे काही शिकावे लागत नाहीत. संघाकडे सगळं शहाणपण आधीच साठवून ठेवलेलं असतं! 

राघव - असं नाही, समाजकारणात आणि राजकारणात सगळ्याच गोष्टी माहीत आहेत, असं म्हणून चालत नाही. परिस्थिती रोज बदलत असते.

नाना - संघाला चालतं! संघाकडं सगळं प्लॅनिंग तयार असतं.

अविनाश - संघाकडं येत्या दोनशे वर्षांचं प्लॅनिंग तयार आहे.

भास्कर - दोनशे वर्षांचं प्लॅनिंग कसं करणार? जग कसं बदलत जाणार आहे, हेच माहिती नसेल तर प्लॅनिंग कसं करणार?

नाना - देशावर प्रेम असेल तर सगळं करता येतं!

समर - हे बघा सन १८०० साली संघ प्लॅनिंग करायला बसला, असं आपण समजू. कसं करणार प्लॅनिंग संघ २०१८ सालाबद्दल?

भास्कर - भारत स्वतंत्र कधी होईल, हे माहिती नाही, लष्करी तंत्रज्ञान कुठे जाईल ते माहिती नाही, अणुबॉम्ब वगैरे शोध लागतील ते माहिती नाही, कॉम्प्युटर वगैरेचे शोध लागतील हे माहिती नाही - कसं करणार प्लॅनिंग?

अविनाश - देशप्रेम असेल तर सगळं करता येतं!

भास्कर - आपल्या लहानपणी सिनेमे बघून आल्यावर दोन तासांच्या सिनेमाची स्टोरी सहा-सहा तास सांगणारी मूर्ख पोरं होती बघ!

अविनाश - त्याचं काय इथं?

भास्कर - ती पोरं पुढं मोठी झाली की, दोनशे वर्षांच्या प्लॅनिंगच्या अशा ‘स्टोऱ्या’ सांगू लागतात.

अविनाश - (संतापत) वाटेल ते बोलू नकोस. मूर्ख माणूस!

समर - तुला आठवतंय का भास्कर, अविनाश डिंपल कापाडियाचा ‘सागर’ सिनेमा पाहून आला होता आणि त्याने आपल्याला सागरची स्टोरी सात सांगितली होती.

भास्कर - रोज संध्याकाळी शाळेतून आला की तासभर सागर! आठवडाभर धिंगाणा चालला होता!

समर - फार वैताग दिला होता तेव्हा अविनाशनं.

भास्कर - डिंपल कापाडियाचं नाव त्याला आठवत नव्हतं, तो तिला डिंपल फडकिया म्हणत होता.

(समर, भास्कर, राघव आणि अच्युत मोठ्याने हसतात. पांडेजी गालातल्या गालात हसतात.)

अविनाश - मी तेव्हा चुकून फडकिया म्हणालो होतो.

नाना – अरे, होतं असं कधी कधी. कापड आणि फडकं तसं बघायला गेलं तर एकच असतं.

भास्कर - त्याला तेव्हा सागर हा जगातला सगळ्यात भारी सिनेमा वाटला होता!

समर - आता त्याला मोदीकाका या जगातला सगळ्यात भारी नेता वाटतो आहे.

अविनाश - तू गप्प बस! सागर हा जगातला सगळ्यात भारी सिनेमा आहे आणि मोदीजी या जगातले सगळ्यात भारी नेते आहेत! नो डाऊट अबाऊट दॅट!

समर - असं कुणी म्हणायला लागलं तर काय बोलणार माणूस?

अविनाश - अजिबात बोलू नकोस. अक्कल उघडी पडतीय तुझी.

भास्कर - हे भक्त लोक त्यांच्या स्वतःच्या जगात मग्न असतात.

नाना - ते सागर वगैरे जाऊ देत, पण तुम्हाला हे मान्य करायलाच लागणार आहे की, संघ ही जगातली सगळ्यात भारी संस्था आहे.

भास्कर – चला, आपण मान्य करून टाकू ते. त्यावर चर्चा नको. महत्त्वाचं बोलू आपण. संघापुढे जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, त्याविषयी बोलूयात आपण?

नाना - संघापुढे कुठलाही प्रश्न उभा नाही राहू शकत. संघाला कुठलाही प्रश्न नाही. संघाकडं उत्तरं असतात फक्त.

अविनाश - संघापुढे प्रश्न नसतात… फक्त उत्तरं असतात. लक्षात घ्या तुम्ही लोक!

समर - प्रश्नच नसतील तर उत्तरं कशी असणार?

अविनाश - फालतूपणा करू नकोस.

भास्कर - संघाला सगळं कळत असतं, तर ८४ साली फक्त २ जागा मिळाल्या होत्या भाजपला त्याचं काय?

नाना - ती वेळच तशी होती. इंदिरा गांधी यांची अचानक हत्या झाली.

भास्कर - तेच म्हणतोय आम्ही! या जगात गोष्टी अचानक घडत असतात. परफेक्ट प्लॅनिंग करता येत नाही त्यामुळे!

नाना - तेव्हासुद्धा संघानं परफेक्ट प्लॅनिंग केलं होतं, पण भाजपने ऐकला नाही सल्ला!

भास्कर - म्हणजे भाजप आपलं ऐकणार नाही, हे तरी कळलं नाही संघाला हे मान्य करायला लागेल आपल्याला.

नाना - संघ शांत असतो अशा वेळी. संघाला पक्ष घडवायचा होता म्हणून त्यानं तेव्हा स्वातंत्र्य दिलं भाजपला. संघ म्हणाला करून बघा तुम्ही तुमचे प्रयोग! दोन जागा येतील तेव्हा कळेल तुम्हाला पक्ष कसा चालवतात ते!

अविनाश - दोन जागा आल्या, तेव्हा संघ गालातल्या गालात हसला!

नाना - बसा म्हणाला बोंबलत!

अविनाश - मग मोदीजींनी संघाचं ऐकलं तेव्हा १४ आणि १९ साली पूर्ण बहुतमत मिळालं! ही आहे संघाची कमाल!

समर - मग या वेळी काय झालं? २४०वर अडकली गाडी!

नाना - मोदीजींना वाटायला लागलं की, आपण मोठे नेते झालो आहोत. भाजपचे अध्यक्ष नड्डाजी म्हणाले की, आता भाजपला संघाची गरज नाही. संघ गप्प बसला.

नाना - संघ म्हणाला बसा बोंबलत!

अविनाश - गंमत बघ, संघाने बरोबर २४० जागा आणल्या भाजपाच्या! मेजॉरिटी नाही पण सरकार तर आलं!

नाना - मोदीजी पंतप्रधान तर झाले, पण पायात नीतीश आणि चंद्राबाबू यांच्या बेड्या पडल्या!

अविनाश - याला म्हणतात राजकारण!

भास्कर - (जोरात हसतो) मग आता परत पूर्ण बहुमत कधी मिळणार भाजपला?

नाना - ते ठरलेलं आहे सगळं. फक्त तुम्हाला आधी कळणार नाही ते. जेव्हा भाजप पुन्हा जिंकेल तेव्हाच तुम्हाला कळेल! (हु हु हु)

भास्कर - हे म्हणजे पुलंच्या ‘बटाट्याची चाळ’मधल्या अण्णा पावश्यांच्या भविष्यासारखं झालं. पुलंनी लिहिलंय की, अण्णा पावशे ‘होरारत्न’ होते. गांधीहत्येचं भविष्य त्यांनी १९२० सालीच लिहून ठेवलं होतं. पण त्यांनी ते भविष्य गांधीहत्या झाल्यानंतर दाखवलं, त्यामुळे लोकांना त्या भविष्याची किंमत कळली नाही.

(सगळे हसतात) 

अविनाश - तुम्ही हसा, पण संघाचा गुप्ततेवर भर असतो, ही गोष्ट खरी आहे!

राघव - (नाना आणि अविनाशला) तुम्ही संघाचं कौतुक करायला जाता आहात, पण त्या नादात तुमच्याकडून चेष्टा होतेय संघाची, असं नाही का वाटत तुम्हाला?

अविनाश - आम्ही प्रेमानं बोलतोय. तुम्हाला ती चेष्टा वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे.

राघव - आज तुम्ही संघाला चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, चेष्टा नाही करू शकत तुम्ही.

नाना - संघाला वाईट म्हणण्याचं कारणच काय?

भास्कर - संघाचं ‘व्हिजन’ आम्हाला मान्य नाही.

अविनाश – अरे, तुम्हाला दोघांना कोण विचारतो आहे या जगात?

समर – अरे, आम्हाला म्हणजे म्हणजे मला आणि भास्करला नाही. आम्हाला म्हणजे लिबरल लोकांना!

भास्कर - काँग्रेस आहे, रीजनल पार्टीज आहेत, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशमधले शेतकरी आहेत, दलित आहेत. एवढ्या सगळ्या लोकांकडे कसं दुर्लक्ष करणार तुम्ही?

राघव - आज लिबरल लोक संघाची ताकद नाकारू शकत नाहीत. आणि, संघ लिबरल लोकांची आणि लोकशाहीची ताकद नाकारू शकत नाहीत.

भास्कर - हे बरोबर बोललात तुम्ही! ही सत्यस्थिती दोन्ही बाजूच्या समर्थकांनी लक्षात घेतली, तर बरं होईल.

समर - खरी गोष्ट!

भास्कर – अहो, तुम्ही फार सेन्सिबल बोलत आहात. आपली ओळख?

पांडेजी - ये हमारे मित्र आहेत. राघव सालुंके! इन्होंने जेएनयू से पीएच.डी. की हैं ‘कास्ट पॉलिटिक्स इन इंडिया’ में.

भास्कर - वा वा वा!

समर - तुम्ही योग्य बोलताय.

राघव - तुम्ही मला ‘अरे-तुरे’च करा.

भास्कर - ते करूच! जरा एक-दोन दिवस जाऊ देत.

समर - (हसत) जेएनयूमधल्या पीएच.डी. माणसाला एकदम अरे-तुरे कसं करायचं?

भास्कर - तुमचं या ग्रूपमध्ये स्वागत आहे. तुमच्या मुळं या ग्रूपला जरा गांभीर्य प्राप्त होईल!

अविनाश - का हो साळुंखे, जेएनयूमध्ये सगळे देशद्रोही भरलेले आहेत ना!

राघव - (हसतो) तुम्हाला काय वाटतं?

अविनाश - असणारंच! अर्थात तुमच्यासारखे काही चांगले लोकसुद्धा असणारंच!

राघव - तुम्हाला काय माहिती ‘देशद्रोही’ नाहिये म्हणून?

भास्कर - त्याला तू सुद्धा देशद्रोही वाटत असणार! समोर आहेस म्हणून तुझ्याविषयी चांगलं बोलायचं.

अविनाश - मी कुणाच्याही तोंडावर फाडकन काहीही बोलू शकतो.

पांडेजी - राघव, जातीय जनगणना के बारे में आपकी क्या राय हैं!

राघव - करून टाकायला पाहिजे. १९३१पासून झालेली नाही तशी जनगणना.

नाना - काय गरज आहे? आरक्षण वाढवायचे धंदे!

राघव – अहो, आपण आरक्षण देतोय तर माहीत नको का कोणत्या जातीत किती लोक आहेत ते?

नाना - कशाला माहीत पाहिजे? जेवढं आरक्षण आहे तेवढं पुरे आहे.

भास्कर - संघ आधी नाही म्हणत होता जातीय जनगणनेला.

राघव - पण आता करा म्हणतोय संघ.

समर - राहुल गांधीच्या प्रेशर पुढे संघाला बदलावी लागली आपली भूमिका.

नाना - संघ कधीही कुणाच्याही प्रेशरखाली बदलत नाही आपली भूमिका.

भास्कर - राहुल म्हणायला लागला की, हे लोक आरक्षणविरोधी आहेत म्हणून यांना जातीय जनगणना नको आहे.

समर - मग बदलावी लागली भूमिका.

नाना - हे बघा, मला आधीच कळलं होतं संघातल्या उच्च पदस्थाकडून की, संघ आधी नाही म्हणणार आहे जातीय जनगणनेला आणि नंतर पाठिंबा देणार आहे. 

अविनाश - काय म्हणता?

भास्कर - (हसत) असं कशाला कोण ठरवेल?

नाना - तुम्हाला नाही कळायचं ते! गुप्त राजकारण असतं संघाचं! आधी मोदीजींना पाठिंबा द्यायचा, मग अचानक लिबरल लोकांना पाठिंबा द्यायचा!

समर - समोरच्या माणसालाही अक्लल असते हा धडा तुम्ही मोदीभक्त आणि संघभक्त कधी शिकणार आहात?

भास्कर - राहुलनं तुम्हाला पेचात पकडलं आहे, हे मान्य करा.

अविनाश - या जगात कोणीही माई का लाल असा नाहिये की, जो संघाला पेचात पकडू शकेल.

समर - राहुलनं ठरवलं आहे की, आता आपण ७५ टक्के जनतेची बाजू घ्यायची.

राघव - खरी गोष्ट! जातीय जनगणना, ‘अग्नीवीर’ विरोध आणि बेरोजगारी, यावर सगळं लक्ष केंद्रित केलंय त्यानं!

समर - भाजपकडे आणि संघाकडं उत्तर नाहिये याला काही.

राघव - भारतात पंचवीस टक्के मध्यम वर्ग आहे त्याला चांगली जीवनशैली हवी होती. मोदीजींनी ते ओळखलं आणि त्याला ती स्वप्न खरी करतो, असं सांगून पंतप्रधान पद मिळवलं! आता राहुल गांधी पंचाहत्तर टक्के लोकांच्या आर्थिक आकांक्षांवर फुंकर घालून तो अग्नी चेतवतायत. 

अविनाश - दुष्ट माणूस!

भास्कर - यात काय दुष्टपणा आहे?

अविनाश - मोदीजी इतकं चांगलं काम करतायत. गप बस म्हणाव त्याला! मूर्ख माणूस!

भास्कर - मोदीजी चांगलं काम करत असते तर २४०वर आले नसते भाजपवाले!

नाना - तसं तुम्ही म्हणा तुम्हाला म्हणायचं असेल तर! पण भाजपच्या ६३ जागा संघाने कमी केल्या आहेत. अगदी ठरवून केल्या आहेत! मला कळलं होतं तसं!

भास्कर - आता बोलून काय उपयोग आहे? आधी का नाही सांगितलं तुम्ही आम्हाला?

नाना - संघाचा गुप्ततेवर भर असतो सांगितलं नाही का तुम्हाला?

अविनाश - संघ भाजपच्या जागा कमी करणार आहे, हे तुम्ही मलासुद्धा सांगितलं नव्हतं नाना!

नाना - (गालातल्या गालात हसतात)

अविनाश - (नानांच्या स्मितहास्याकडं बघत राहतो. नंतर त्याला एक विचार सुचतो) तरीच तुम्ही अगदी शांत होता लोकसभेच्या निकालाच्या दिवशी! तुम्हाला माहीत असणार निकाल काय लागणार आहे ते!

नाना - (गालातल्या गालात हसतात)

(इथे शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिलेला उतारा देणे श्रेयस्कर होईल असं वाटतं आहे. शिरोजी लिहितो - ‘मोदीभक्त आणि संघभक्त मोदीजी आणि संघाबद्दल जे अकलेचे तारे पाजळत असतात ते मी प्रामाणिकपणे ‘जे ऐकले ते लिहिले’ या तत्त्वावर लिहितो आहे. परंतु वाचकांना मी मोदीभक्तांची बदनामी करण्याकरता विनोद करतो आहे, असे वाटते आहे. मी तरी काय करणार? इतिहासकार म्हणून मला जे दिसते आहे आणि ऐकू येते आहे ते मी लिहितो आहे. त्यासाठी वाचक मला इतिहासकाराच्या पदावरून हटवून माझी अवनती विनोदी लेखकाच्या पदावर करणार असले तरी बेहत्तर! मोदीभक्तांच्या बुद्धीची आणि भक्तीची मौक्तिके मी लिहिणार म्हणजे लिहिणारच!” - संपादक).

भास्कर - आता काय ठरलं आहे संघाचं हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडबद्दल.

नाना - (गालातल्या गालात हसत) कळेल ते तुम्हाला निकाल लागतील त्या दिवशी!

अविनाश - (गालातल्या गालात हसतो).

भास्कर - तुम्ही मार खाणार आहात इथून पुढच्या सगळ्या इलेक्शनमध्ये.

राघव - राहुलला पाठिंबा मिळत चालला आहे. जातीय जनगणना हा मुद्दा फक्त ५४ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटत होता लोकसभा निवडणुकी आधी. आता ७४ टक्के लोकांना महत्त्वाचा वाटायला लागला आहे.

भास्कर - बाप रे!

राघव - हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड सगळीकडे राहुलला पाठिंबा वाढतोय. हरयाणामध्ये मोदीजींचं पॉप्युलॅरिटी रेटिंग ३० टक्के असेल तर राहुलचंसुद्धा ३० टक्के झालंय.

अविनाश - राघव तू देशद्रोह शिकला आहेस जेएनयूमध्ये.

भास्कर - आता एक एक करून सगळ्या इलेक्शन हरायला लागेल भाजप!

समर - हरयाणा आणि महाराष्ट्रात तर सुपडा साफ होणार आहे.

अविनाश - बघू! निकाल लागल्यावर कळेलंच तुम्हाला!

भास्कर - ‘आयेगा तो मोदीही’ हे ऐकू येत नाही आजकाल!

समर - आता मी गालातल्या गालात हसतो आहे.

अविनाश - एक दिवस तुम्हा सगळ्यांना तुरुंगात टाकायला लागणार आहे.

राघव - मला नाही वाटत तसं काही तुम्ही करू शकाल. लोकशाहीचे जे काही बारा वाजवायचे आहेत ते लोकशाही मार्गानेच वाजवायचे असं संघाचं ठरलं आहे, असं मला वाटतं आहे!

भास्कर - का बरं?

राघव - भारतात आपण हुकूमशाही आणू शकत नाही, हे कळून चुकलंय संघाला!

समर - बरोबर आहे! दक्षिणेत पाठिंबा नाही, दलित तर  विरोधात आहेत यांच्या आणि आता किसानसुद्धा विरोधात गेला आहे! कोणाच्या जिवावर आणायची हुकूमशाही?

नाना - कळेल तुम्हाला!

राघव - अहो किसान दिल्ली बॉर्डरवर तळ ठोकून बसला तर माफी मागून कृषि-कायदे मागे घ्यावे लागले होते तुम्हाला. लोकशाहीची ताकद कमी समजू नका तुम्ही! पन्नास लाख लोक रस्त्यावर उतरले तर काय करणार तुम्ही?

अविनाश - सैन्य आहे.

राघव - सैन्यात सुद्धा रस्त्यावर उतरलेल्या लोकांचीच पोरंबाळं असतात. ती काय आपल्या बापजाद्यांवर हल्ला करणार आहेत का?

भास्कर - शिवाय सगळ्या जगाचं प्रेशर आहे आजकाल सगळ्या राजकारण्यांवर!

अविनाश - घंटा प्रेशर! संघ कुणाला मोजत नाहीत जगात. एक अकेला सब पर भारी!

भास्कर - मग गांधीजी आणि नेहरू यांच्या पुतळ्यांपुढे मान का झुकवावी लागते, तुम्हाला परदेशी लोकांसमोर?

नाना - ती एक पद्धत पडून गेली आहे. नॉट सिग्निफिकंट! संघाने मनात आणले तर गांधी आणि नेहरूंचे नामोनिशाण मिटवू शकतात या जगातून ते!

भास्कर - (हसत) नाना आणि अविनाश मध्ये एक फरक झाला आहे २४० जागा आल्यानंतर!

समर - कसला फरक?

भास्कर - आधी हे लोक मोदीजींनी मनात आणलं तर हे करून टाकतील, मोदीजींनी मनात आणलं तर ते करून टाकतील असं म्हणायचे. आता हे लोक संघानं मनात आणलं तर संघ हे करून टाकेल, संघानं मनात आणलं तर संघ ते करून टाकेल, असं म्हणायला लागले आहेत.

पांडेजी - मोदीजीकी साख गिर गई हैं!

अच्युत - साख म्हणजे?

नाना - साख म्हणजे फांदी!

राघव - नाही हो! साख म्हणजे धाक, रुबाब, रौब!

समर - मोदीजीका रुबाब गिर गया हैं!

नाना - मोदीजी अजूनही किती रुबाबात चालतात हात बाहेर काढून!

अविनाश - खरंतर, त्यांनी बाहेर काढलेले असतात त्यांचे हात, पण वाटत राहतं की, हे उडण्याच्या तयारीत असलेल्या पक्षाचे पंखच आहेत. 

समर - अविनाश, तू कौतुक करत असतोस मोदीजींचं तेव्हा त्यांची चेष्टा होणार नाही, याची काळजी घेत जा प्लीज! आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ते!

राघव - हरयाणामध्ये मोदीजींच्या सभा फ्लॉप होतायत. माझा हरयाणाचा मित्र सांगत होता. ९०पैकी ६० जागा काँग्रेसला मिळणार आहेत म्हणे!

अविनाश - घंटा!

भास्कर - महाराष्ट्रात तर भाजपला २८४पैकी ५०सुद्धा जागा मिळणार नाहीत म्हणे!

अविनाश - घंटा! घंटा! घण, घण, घण घंटा!

समर - कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा गट यांना १९५ ते २०० जागा मिळणार आहेत म्हणे!

अविनाश - (पॅनिकी होत) नाना काय म्हणतायत हे लोक बघा!

नाना - कळेल आपल्याला निकालाच्या दिवशी!

राघव - भाजपच्या लोकांना वाटतंय की लोकसभेला जो सेट बॅक मिळाला आहे, तो टेम्पररी होता. मोदी-मॅजिक काम करेल पुन्हा एकदा!

भास्कर - हवा पालटत चालली आहे! २०१४ साली राहुलची जी अवस्था झाली होती, ती आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे.

(देवेंद्र फडणवीस यांना आज कोणी ओळखत नाही, पण ‘मोदीकालीन भारता’त हे गृहस्थ भाजपचा मुखवटा होते. - संपादक).

समर - काय झाली होती राहुलची अवस्था २०१४ साली!

भास्कर - तो जे काही बोलेल किंवा करेल त्याला लोक हसायला लागले होते. राहुलची रोज खिल्ली उडवली जात होती! आज देवेंद्र फडणवीस यांची ती अवस्था झाली आहे. आणि ही घसरण अशीच चालू राहिली आणि चार-पाच निवडणुका भाजप हरला, तर हीच अवस्था २५ सालामध्ये मोदीजींचीसुद्धा होऊ शकते!

अविनाश - गप्प बस! मूर्ख कुठला!

भास्कर - राजकारण हे एक चक्र असतं! आज तुम्ही जे लोकांबाबत करता, उद्या तेच तुमच्या बाबतीतसुद्धा होतं.

समर - सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे हे राहुलची खोटी बदनामी करताना मोदीजी, फडणवीस आणि संघ यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं.

अविनाश - सगळ्या निवडणुका आम्हीच जिंकणार आहोत.

समर - (जोरात हसत) आयेगा तो राहुल गांधीही!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

तर असा हा सगळा प्रकार झाला. हवाबदलाचे संकेत येत आहेत काय, असे शिरोजीला वाटू लागले होते. ते त्याने स्पष्टपणे लिहून ठेवले आहे.

पुढचा काळ कसा जाईल, अशी चिंता शिरोजीला वाटत होती. हुकूमशाही वृत्तीचे लोक एकदा साध्य झालेले यश सहजासहजी सोडायला तयार होत नाहीत, हा जगभरचा अनुभव शिरोजीला माहीत होता. 

खरं तर, नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाला खरा विरोध आता सुरू झाला होता. मोदी यांचा करिश्मा विरत चालला होता. राजकीय निरीक्षक हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांकडे लक्ष देऊन बसले होते. इथल्या पराजयाचे अनेक अर्थ निघणार होते. मोदी यांच्यापुढे मोठे राजकीय आव्हान आकार घ्यायला लागले होते.

मोदीजींच्या हातात हुकमाचे पत्ते फार उरले नव्हते. ३७० कलम रद्द करून झालं होतं, राममंदिर झालं होतं, ट्रिपल तलाक हा विषय मागं पडला होता. आता वक्फ बोर्ड हा विषय आणि त्या अनुषंगाने ‘लॅंड-जिहाद’ हा विषय पुढे आणला गेला होता. पण, आपली घरं आणि आपल्या जमिनी मुस्लीम लोक बळकाऊ शकतील, यावर सामान्य हिंदूचा विश्वास बसत नव्हता.

मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण बुलडोझर चालवून फारसे राजकीय मायलेज मिळत नव्हते. ‘मुसलमान लोकांची घरे पाडत आहात; पण ज्या हिंदूंना घरे नाहीत, त्यांना स्वतःची घरे कधी मिळणार?’, असा प्रश्न हळूहळू विचारला जाऊ लागला होता.

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती.

या पार्श्वभूमीवर पुढच्या निवडणुका होणार होत्या! त्या निवडणुकींच्या मुशीमधून लोकशाही तत्त्वे तावून सलाखून निघणार होती. या सगळ्या चलनवलनामधून एक खरा जननायक आकार घेऊ पाहात होता. त्याचे नाव होते राहुल गांधी!

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......