अमेरिकेत भारतीय मातीतून आफ्रिकन गंध घेऊन अमेरिकेत जन्मलेले कमला हॅरिस नावाचे ‘डावे कमळ’ फुलत आहे, ही घटना महत्त्वाची आहे…
पडघम - विदेशनामा
डॉ. अभिजित वैद्य
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस
  • Sun , 29 September 2024
  • पडघम विदेशनामा डोनाल्ड ट्रम्प Donald Trump जो बायडेन Joe Biden कमला हॅरिस Kamala Harris

अमेरिका डोळ्यांत आशा, हृदयात उमेद आणि मनगटात कष्ट उपसण्याची ताकद घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या सर्वांना संधी देणारी भूमी, ‘लँड ऑफ अपॉर्च्युनिटी’! जगभरातील स्थलांतरितांचे हे ‘सालाद बाऊल’. त्यांच्या हिमतीवर, कल्पनाशक्तीवर आणि घामावर उभी राहिलेली एक जागतिक महासत्ता. लोकशाही, स्वातंत्र्य आणि मुक्त अर्थव्यवस्थेवर उभे राहिलेले साम्राज्य. या वाटचालीत कित्येक शतकांपूर्वी गुलाम म्हणून आणलेल्या कृष्णवर्णीयांनाही बऱ्यापैकी सामावून घेतले गेले.

अमेरिकेच्या घटनेनुसार व्यक्ती कोणत्याही वंशाची, वर्णाची, धर्माची असो; ती अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकते. अट एकच- तिचा जन्म अमेरिकेत झालेला असला पाहिजे. भले मग तिच्या आधीच्या सर्व पिढ्या दुसऱ्या देशांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या असल्या तरी प्रश्न येत नाही. अशीच पार्श्वभूमी असलेल्या कृष्णवर्णीय बराक ओबामांना अमेरिकन जनतेने प्रचंड बहुमताने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिले.

बराक ओबामांना निवडून देऊन इतिहास घडवणाऱ्या अमेरिकेने त्यानंतर डोनाल्ड ट्रम्पसारख्या वर्णश्रेष्ठत्व मानणाऱ्या, दुहीची भाषा पेरणाऱ्या नेत्याला निवडून दिले, आणि पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याची हिलरी क्लिंटन यांची संधी हुकवली. त्यामागे अनेक कारणे होती. पुतिन होते की नाही, हे इतिहास ठरवेल, पण स्वत: हिलरी होत्या. ट्रम्प दुही पेरणारे, तर हिलरी युद्ध पेरणाऱ्या. दोघेही तद्दन भांडवलशाही मनोवृत्तीचे.

अमेरिका खरी उभी राहिली, ती मूल निवासी रेड इंडियन्सचा वंशच्छेद, मुक्त अर्थव्यवस्था, अनिर्बंध स्पर्धा आणि साम्राज्यवादी मनोवृत्तीवर. अमेरिकन जनतेच्या नसानसांत भांडवलशाही मूल्ये इतकी पेरण्यात आली होती की, ‘कम्युनिस्ट’ ही अमेरिकेत एकेकाळी शिवी मानली जाई. कम्युनिस्ट, साम्यवादी आणि सोशॅलिस्ट, समाजवादी यांच्यातला फरक अमेरिकेत भल्याभल्यांना कळत नसे. डावा विचार म्हणजे साम्यवाद आणि हुकूमशाही. अमेरिकेत कम्युनिझम शिरला तर हुकूमशाही येईल, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येईल आणि मुख्य म्हणजे आपली सुबत्ता संपेल, ही भीती अमेरिकेत तळागाळातील जनतेला वाटत असे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अमेरिका हा देश जगातील श्रीमंत, प्रगत, भौतिक सुखांचा पाऊस पाडणारा असला, तरी अनिर्बंध भांडवलशाही संपत्तीचे समान वाटप तर सोडाच, न्याय्य वाटपही करत नसते. अशा व्यवस्थेत संपत्ती मूठभरांकडे केंद्रित होत जाते आणि प्रचंड विषमतेला जन्म देते. अमेरिकेत शेवटी हे घडणे अटळ होते. त्यातून ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ आणि ‘वी दी वन परसेंट’सारखी तरुणांची आंदोलने उभी राहिली. अमेरिकेतली मुक्त, अन्याय्यी भांडवलशाही आणि तिने जन्माला घातलेली आर्थिक विषमता यांच्याविरुद्ध प्रथमच आंदोलन उभे राहिले.

मुक्त भांडवलशाहीवर उभी राजकीय व्यवस्था ही भले लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा कितीही उदोउदो करत असली, तरी ती लोकशाही कल्याणकारी राज्य म्हणून मूलभूत सार्वजनिक सेवा जनतेला पुरवण्याची जबाबदारी स्वतःवर घेत नसते. जनतेला आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि निवारा देण्याची जबाबदारी सरकारची आहे, हे अशा व्यवस्थेला मान्य नसते. एवढेच नाही, तर देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे उभे केले पाहिजे, हेही या व्यवस्थेला मान्य नसते.

अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्राने कितीही उंच भरारी मारलेली असली, तरी अमेरिकेत वैद्यकीय सेवा जवळपास पूर्णपणे खाजगी क्षेत्राच्या हातात आहेत. त्या इतक्या महाग आहेत की, सर्वसामान्यांच्या हाताबाहेर आहेत. अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रावर बलाढ्य विमा कंपन्यांचीही पकड आहे. विमा घेणे आणि विम्याचे हप्ते भरणे ज्याला परवडते, त्यालाच अमेरिकेतली आरोग्य व्यवस्था उपलब्ध आहे.

अमेरिकेतले उच्चशिक्षणही अत्यंत महागडे आहे. त्यासाठी अमेरिकेतील बँका विद्यार्थ्यांना कर्जे देतात आणि शिक्षण संपवून नोकरी वा व्यवसाय सुरू केल्यावर तरुणांच्या आयुष्यातील उमेदीची वर्षे कर्जे फेडण्यात जातात. अमेरिकेतली अस्थिर कुटुंब व्यवस्था, घटस्फोटांचे प्रचंड प्रमाण यांत भर घालते. जागतिक महासत्ता बनण्याच्या हट्टात अमेरिका आपल्या अर्थसंकल्पाचा प्रचंड हिस्सा मूलभूत सेवांवर खर्च न करता शस्त्रास्त्रांवर करत राहिली. जगातील अनेक देशांतील आपल्या आदेशाच्या खाली न राहणाऱ्या सत्ता उलथवून टाकण्यासाठी कुटील कारस्थाने करून त्यासाठी अपरंपार पैसा खर्च करत राहिली. नेत्यान्याहू आणि झेलेन्स्की ही याची दोन उदाहरणे. या दोघांना गेल्या वर्षभरात अमेरिकेने दिलेल्या आर्थिक मदतीत अमेरिकन जनतेला किमान २५ वर्षे मोफत आरोग्य आणि शिक्षण देता आले असते!

अमेरिकेत नॉम चॉम्स्कीसारखे अनेक विचारवंत गेली अनेक दशके या व्यवस्थेच्या विरोधात बोलत आहेत. पण अमेरिकेच्या राजकारणात समाजवादाची भाषा प्रथमच जाहीरपणे बोलले ते बर्नी सँडर्स. ते अमेरिकेच्या राजकारणात अनेक दशके असले, तरी राष्ट्रीय पातळीवर नेते म्हणून उदयाला आले, ते वयाच्या सत्तरीनंतर. असे असूनही ते अमेरिकन तरुणांचे लाडके बनले. त्यांच्या उदयामुळे अमेरिकेच्या निर्दय भांडवलशाहीच्या आणि साम्राज्यशाहीच्या अभेद्य किल्ल्याला भगदाड पडेल, अशी आशा निर्माण झाली, पण शेवटी डेमोक्रेटिक पक्षाने ट्रम्प यांच्याशी टक्कर देण्यासाठी बर्नी यांच्याऐवजी हिलरी यांना निवडले.

...............................................................................................................................

अमेरिकेतले बहुसंख्य भारतीय हे नुसते ‘हिंदुत्ववादी’ नाहीत, तर ‘मनुवादी’ही आहेत. अमेरिकेत लोकशाही, स्वातंत्र्य आणि भौतिक सुखे उपभोगणारे हे ‘मनुवादी’ मोदी आणि अमित शहांसारख्या हुकूमशाही सत्ताधाऱ्यांची पाठराखण करत राहिले. अमेरिकेत जाऊन ते ना लोकशाहीवादी, ना उदारमतवादी, ना धर्मनिरपेक्ष बनले. अमेरिकेत विविध धार्मिक सणवार करणे, बुरसटलेल्या रूढी-परंपरांचे भारतीय संस्कृतीच्या नावाखाली उदात्तीकरण करणे, हे यांचे कर्तृत्व. अमेरिकेत विज्ञानाच्या मूलभूत संशोधनांत झोकून न देता ‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये ढोल वाजवणे, यांत धन्यता मानणारी ही मंडळी. स्वाभाविकपणे हे बहुसंख्य मनुवादी ट्रम्प यांचे समर्थक बनले. ही मंडळी कमला हॅरिस यांच्यामागे उभी राहणार का, हा प्रश्न आहे.

...............................................................................................................................

हिलरी यांच्याऐवजी ती बर्नी यांची झाली असती, तर ट्रम्प यांचा पराभव होण्याची अधिक शक्यता होती, असे आम्हाला आजही वाटते. काहीही असो, बर्नी यांनी ‘कॉमी’ म्हणून सर्व डाव्यांना हिणवणाऱ्या अमेरिकेत ‘समाजवादी विचार हा साम्यवादापेक्षा वेगळा कसा आहे, हा विचार आर्थिक समतेचा पुरस्कार करतो, पण लोकशाहीचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचाही आदर करतो’, या विचारांची पेरणी अमेरिकन जनतेच्या मनात करण्यात यश मिळवले.

डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक या अमेरिकेतल्या दोनही मुख्य राजकीय पक्षांचा खरा आत्मा भांडवलशाही आणि साम्राज्यवादी आहे. रिपब्लिकन पक्ष हा देशातील ‘गन लॉबी’च्या आणि जगातील शस्त्रास्त्र उत्पादकांच्या हातातील बाहुले आहे, असे मानले तरी डेमोक्रेटिक पक्षही त्यांच्या कचाट्यात अडकलेलाच नाही, असे म्हणणे कठीण आहे. एक थोडा डावा आणि दुसरा अधिक उजवा एवढाच फरक.

या पार्श्वभूमीवर ओबामा यांचे अध्यक्षपदी येणे हा सुखद धक्का होता. त्यांनी अमेरिकेच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला ‘ओबामा केअर’च्या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या काळात अमेरिकेची युद्धखोरी थैमान घालून गेली. याला युद्धखोर प्रवृत्तीच्या त्यांच्या परराष्ट्र सचिव हिलरी यांना जबाबदार मानले, तरी ओबामा यांना त्यातून हात झटकता येत नाहीत. ओसामाला मारण्याचे श्रेय त्यांच्या पदरी पडले, पण इसिससारखी अतिरेकी संघटना त्यांच्या सरकारने जोपासली. कदाचित अशा विविध कारणांमुळे ओबामा यांना दोनदा संधी दिल्यावर अमेरिकन जनतेने पुन्हा डेमोक्रेटिक पक्षाला संधी न देता ट्रम्प यांच्यासारख्या कोणतीही निश्चित राजकीय विचारधारा नसणाऱ्या, रेटून खोटे बोलणाऱ्या, वाचाळ व्यक्तीला संधी दिली.

ट्रम्प हे मुळात डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य पण विवाद्य उद्योगपती. त्यांनी एकूण तीन वेळा दिवाळे काढले आणि अनेकदा कोट्यवधी डॉलर्सचे कर चुकवले. या महाशयांनी थेट रिपब्लिकन पक्षात उडी घेऊन भल्या भल्या रिपब्लिकन दिग्गजांना मागे सारले आणि अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या काळात अमेरिकेच्या नावावर युद्धे नाहीत. त्यांनी पुतिन आणि उत्तर कोरियाचा खुंखार हुकूमशहा किम याँग यांच्याशी मैत्री केली. पण त्यांची भाषा आणि कृती अमेरिकेच्या विविधतेला धक्का देणारी होती. ही भाषा थेट यादवीला निमंत्रण देणारी होती.

अनेक मार्ग वापरून त्यांनी सत्तेवर कायम राहण्याचे नियोजन केले. पण आधी जागतिक हवामान बदलाबद्दल त्यांनी घेतलेली थट्टेची भूमिका, नंतर कोविड महासाथीच्या गांभीर्याला उडवून लावण्याची घेतलेली भूमिका आणि गर्भपात बंदी, अशा विविध कारणांनी जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी न देता आपले पारडे ओबामा यांच्या कालखंडात उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या, वृद्ध पण मुरब्बी अशा जो बायडेन यांच्या पदरात घातले. बायडेन यांनी उपाध्यक्ष म्हणून भारतीय-आफ्रिकन अशा मिश्र वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड करून बाजी मारली.

ट्रम्प यांची अनेक कृष्णकृत्ये बायडेन यांच्या सरकारने बाहेर काढली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक भानगडी बाहेर पडल्या. पण सर्वांत महत्त्वाचे प्रकरण होते, त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटल हिलवर केलेला सशस्त्र हल्ला. हे कृत्य लोकशाहीचा अभिमान बाळगणाऱ्या अमेरिकेच्या आत्म्यावर घाव घालणारे होते.

असे असूनही ट्रम्प आपल्या कडव्या समर्थकांचा एक कडवा पंथ – कल्ट - निर्माण करण्यात यशस्वी होत गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मध्य अमेरिकेतील कष्टकरी आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा झंझावात उभा केला. रिपब्लिकन पक्षाकडेही समर्थ पर्याय नव्हता. अध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ रिपब्लिकन पक्षाने अनिच्छेनेच पुन्हा ट्रम्प यांच्या गळ्यात घातली. गेल्या निवडणुकीत जाहीर वादविवादात ट्रम्प मूर्खासारखे बकल्यावर ‘यू शट अप’ आणि ‘यू पुतीन्स पपी’ असे म्हणून ट्रम्प यांचे तोंड बंद करणारे बायडेन त्यांच्या वृद्धत्वामुळे निष्प्रभ पडणार असे दिसू लागले. जाहीर वादविवादात बायडेन यांची अवस्था चिंता वाटावी अशी झाली.

...............................................................................................................................

कमला हॅरिस यांच्या कार्यकर्तृत्वाच्या या अत्यंत धावत्या आढाव्याकडे नजर टाकली, तर एक लक्षात येते की, तरुण वयापासून त्यांनी काही मूल्यांसाठी लढा दिला आहे. याचा अर्थ त्यांच्याबाबत काहीच विवाद नाहीत असे नाही. अमेरिकन राजकारणाच्या परंपरेनुसार त्यांच्याबाबत भूतकाळातील अनेक विवाद्य गोष्टी उकरून काढण्यात येतील किंवा खोटे आरोप करण्यात येतील. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चिरफाड करण्यात येईल. त्यांच्यावर मनसोक्त चिखलफेक करण्यात येईल. आयुष्यभर कोणत्याही मूल्यांची पाठराखण न करता, कोणत्याही मूल्यांसाठी न लढता, फक्त आणि फक्त वैध आणि अवैध मार्गांनी संपत्ती मिळवण्यात आयुष्य घालवणाऱ्या, अनैतिकतेच्या चिखलात लोळणाऱ्या, विरोधकांवर तोंडाची गटारगंगा सोडणाऱ्या ट्रम्प यांना यातील काहीही करण्याचा नैतिक अधिकार नाही.

...............................................................................................................................

ट्रम्प आता बाजी मारणार असे दिसू लागले आणि अचानक बायडेन यांनी माघार घेऊन कमला हॅरिस यांचे नाव अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून पुढे केले. अनेकांच्या मते बायडेन यांच्यावर त्यांच्या पक्षाने दडपण टाकून हा निर्णय घ्यायला लावला. आमच्या मते बायडेन यांनी ही नियोजनबद्ध अभूतपूर्व अशी खेळी केली. बघता बघता चित्र पालटू लागले. डेमोक्रेटिक पक्षाने कमला यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. अमेरिकेच्या अध्यक्षपदी कमला देवी हॅरिस या नावाची भारतीय-आफ्रिकन वंशाची महिला येण्याचा मार्ग खुला झाला. दिवसेंदिवस ट्रम्प त्यांच्यापुढे कालबाह्य होताना दिसू लागले.

कमला यांच्या आई श्यामला गोपालन या मूळच्या तमिळ, स्वातंत्र्यापूर्वी मद्रास येथे जन्मलेल्या. त्यांचे वडील गोपालन हे ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. सरकारी नोकरीमुळे त्यांना मद्रास, दिल्ली आणि मुंबई अशा शहरांमध्ये वास्तव्य करावे लागले. त्यांचे वडील गोपालन आणि आई राजम हे विचारांनी पुरोगामी होते. श्यामला यांचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीत झाले.

होम सायन्सची पदवी घेतल्यावर त्यांच्या वडिलांना वाटले की, या शिक्षणाचा श्यामलाला उपयोग घर सांभाळण्यासाठी होईल. पण त्यांच्या आईची इच्छा होती की, मुलीने उच्चशिक्षण घ्यावे. वयाच्या १९व्या वर्षी श्यामलाने बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात ‘न्यूट्रीशन आणि इंडोक्रायनोलॉजी’ या विषयाच्या अभ्यासासाठी अर्ज केला आणि त्यांनी १९५८ साली अमेरिकेच्या भूमीवर पाय ठेवला. आई-वडिलांनी पहिले वर्ष आपल्या निवृत्तीनंतरच्या पुंजीतून श्यामलाला आर्थिक पाठबळ दिले. आपले उच्चशिक्षण पूर्ण करून श्यामलाने त्याच विषयात पीएच.डी.ही मिळवली. त्यांनी पुढे स्तनाच्या कर्करोगावर मूलभूत संशोधन करण्यात आयुष्य घालवले. त्यांच्या संशोधनाने स्तनाच्या कर्करोगावर उपचार शोधण्याचे अनेक मार्ग खुले झाले. अमेरिकन अध्यक्ष्यांच्या स्तन कर्करोग आयोगाच्या त्या सदस्य बनल्या. त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडले.

अमेरिकेतील आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या चळवळीला बळ देण्यासाठी घेतलेल्या परिषदेत त्यांची जमैकामधील अर्थशास्त्राचे विद्यार्थी आणि चळवळीतील सक्रिय नेते डोनाल्ड हॅरिस यांची भेट झाली आणि कालांतराने दोघेही कोणतेही विधी वगैरे न करता १९६३मध्ये विवाहबद्ध झाले. श्यामला विवाहानंतर आई-वडिलांना भेटायला गेल्या, त्या थेट पाच वर्षांची कमला आणि दोन वर्षांची माया या मुलींना घेऊन. तेव्हा त्यांचे वडील झांबियामध्ये दूतावासात काम करत होते. १९७०मध्ये श्यामला आणि हॅरिस यांचा घटस्फोट झाला. श्यामला यांचे आई-वडील निवृत्तीनंतर चेन्नईला स्थायिक झाले. त्यानंतर आपल्या या दोन मुलींना घेऊन त्या अनेकदा चेन्नईला गेल्या. श्यामला यांनी आपल्या मुलींना त्यांच्या वडिलांची मायभूमी जमैकाची भेटही घडवली.

श्यामला यांचा २००९मध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाने मृत्यू झाला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांची पुंजी कर्करोग उपचार चळवळीला देणगी म्हणून देण्यात आली. श्यामला यांच्या अस्थी कमला यांनी भारतात येऊन चेन्नई येथील हिंदी महासागरात विसर्जित केल्या.

अशा पुरोगामी पार्श्वभूमीतून आलेल्या, स्वतः पुरोगामी असलेल्या थोर शास्त्रज्ञ श्यामला यांची ही ज्येष्ठ कन्या, कमला. आई दक्षिण भारतीय आणि वडील कृष्णवर्णीय. कमलाचे अधिकतर बालपण कृष्णवर्णीयांच्या वस्तीत गेले आणि शिक्षण कृष्णवर्णीयांच्या शाळेत झाले. लहानपणापासून तिने आणि तिची लहान बहीण माया यांनी वर्णद्वेषाच्या झळा अनुभवल्या. या अनुभवातून या दोघी बहिणींनी कृष्णवर्णीय स्त्री असल्याचा अभिमान बाळगण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण संपवून कमला महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेली, तीही वॉशिंग्टन डीसी येथील कृष्णवर्णीयांच्या ऐतिहासिक हॉवर्ड विद्यापीठात. या काळात कमलाने वादविवाद संघाचे नेतृत्व केले, अर्थशास्त्र मंडळाचे अध्यक्षपद भूषवले आणि कृष्णवर्णीयांच्या अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. १९८६मध्ये राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयांत पदवी घेऊन सॅन फ्रेंन्सिस्कोयेथील विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

या काळात तिने कृष्णवर्णीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषवले. कायद्याची पदवी घेतल्यावर १९९०मध्ये वकिली सुरू केली आणि अल्पावधीतच उत्तम कायदेतज्ज्ञ म्हणून नाव कमावले. काही काळात त्यांची नेमणूक साहाय्यक जिल्हा न्यायाधीश या पदावर झाली आणि त्या विविध पदांच्या पायऱ्या वेगाने चढत २०११मध्ये कॅलिफोर्निया राज्याच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवडून आल्या. या पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या एशियन-आफ्रिकन आणि पहिल्या महिला होत्या. २०१५ त्यांना सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’, तर २०१७मध्ये हॉवर्ड विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स’ या अत्युच्च पदव्यांनी सन्मानिले.

२०१७मध्ये कॅलिफोर्नियामधून डेमोक्रेटिक पक्षाच्या सिनेटर म्हणून निवडून आल्या. तेव्हाचे उपाध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांना खासदार म्हणून शपथ दिली. २०१९मध्ये त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी जो बायडेन यांच्याविरुद्ध लढण्याचे ठरवले. त्यांच्या पहिल्याच सभेला २० हजार पक्षसदस्य त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले. पहिल्या २४ तासांत त्यांनी बर्नी सँडर्स यांनी निवडणूक निधी जमवण्याचा जो विक्रम केला होता, तो मोडला. प्रचाराच्या काळात त्यांनी जो बायडेन यांच्यावर कठोर टीकेचे प्रहार केले. पहिल्या जाहीर वादविवादात त्यांनी बायडेन यांच्यावर कुरघोडी केली, पण दुसऱ्या वेळी मात्र अनेक मुद्द्यांवर बायडेन यांनी त्यांना अडचणीत आणले. त्यांची लोकप्रियता घसरली आणि शेवटी त्यांनी माघार घेऊन बायडेन यांना पाठिंबा जाहीर केला.

त्यानंतर आश्चर्यकारकरित्या बायडेन यांनी त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाची अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यावर कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपद म्हणून निवड केली. बायडेन ट्रम्प यांना पराभूत करून अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि कमला हॅरिस उपाध्यक्ष.

.................................................................................................................................................................

सर्वांत जुन्या ‘लोकशाही’चे मतदार डॉनल्ड ट्रम्प यांना कौल देणार की, कमला हॅरिस यांना जिंकवून ‘इतिहास घडव’णार, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे - आरती कुलकर्णी
अमेरिकेची निवडणूक ५ नोव्हेंबरला आहे. हे पाहता कमला हॅरिस यांच्याकडे वेळ कमी आहे. त्यातच जुलैमध्येच बायडेन आणि ट्रम्प यांच्यातलं पहिलं डिबेट होऊन गेलं आहे. ऑगस्ट महिन्यात शिकागोमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचं अधिवेशन आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या डिबेटमध्ये कमला हॅरिस यांची खरी परीक्षा आहे. या डिबेटमध्ये त्या आपलं वकिली कसब कसं पणाला लावतात ते पाहावं लागेल...

.................................................................................................................................................................

शाळेत शिकत असताना कमला यांच्या एका मैत्रिणीने तिचे सावत्र वडील तिच्यावर कसे लैंगिक अत्याचार करतात, हे सांगितले. या घटनेचा कमलाच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्या आयुष्यभर स्त्रियांवर विविध ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविरोधी आपले कायद्याचे ज्ञान घेऊन लढत राहिल्या. कायदेतज्ज्ञ म्हणून असलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कृष्णवर्णीय आणि स्थलांतरितांवर होणारे अन्याय, तृतीयपंथींचे हक्क, सामान्यांवर होणारे आर्थिक अन्याय, पर्यावरणाचे रक्षण यासाठी त्या लढत राहिल्या.

पर्यावरणाला धक्का पोहचवणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांना त्यांनी कायदेशीर लढाया देऊन वठणीवर आणले. अॅपल, अमेझॉन, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट अशा बड्या उद्योगांना लोकांची खाजगी माहिती न वापरण्याचा करार करण्यास भाग पाडले. कॅलिफोर्निया न्याय विभागाची जनुकीय तपासण्या करण्याची क्षमता त्यांनी आपल्या कार्यकाळात वाढवली. कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच अनेकदा नागरिकांवर अत्याचार करतात, त्यांना क्रूर वागणूक देतात. यावर निर्बंध म्हणून त्यांनी कॅलिफोर्नियामधील पोलीस अधिकाऱ्यांवर बॉडी कॅमेरा बसवण्याचे बंधन आणले.

बालकांची पॉर्नोग्राफी आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्यांना त्यांनी कायद्याचा बडगा दाखवला. अमली पदार्थ, हिंसक गुन्हेगारी, मानवी तस्करी आणि फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांवर बेधडक कारवाया केल्या. ‘गन लॉबी’च्या विरोधात सातत्याने ठाम भूमिका घेतली.

ट्रम्प यांनी अनेक मुस्लीम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत येण्याची जी बंदी घातली, त्याविरुद्ध आवाज उठवला. बेकायदेशीर स्थलांतरितांना अटक करून त्यांना त्यांच्या लहान मुलांपासून वेगळे करण्याच्या ट्रम्प सरकारच्या निर्णयाला विरोध केला. झुंड बळी हा गंभीर गुन्हा मानला जावा, असा आग्रह धरला. २०२३पर्यंत पूर्ण हरित ऊर्जा वापराकडे जाण्याच्या आराखड्याला पाठिंबा दिला. चीनमधील उघर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांची ट्रम्प सरकारने चौकशी करावी, असा आग्रह धरला. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याला पाठिंबा दिला.

कमला हॅरिस यांच्या कार्यकर्तृत्वाच्या या अत्यंत धावत्या आढाव्याकडे नजर टाकली, तर एक लक्षात येते की, तरुण वयापासून त्यांनी काही मूल्यांसाठी लढा दिला आहे. याचा अर्थ त्यांच्याबाबत काहीच विवाद नाहीत असे नाही. अमेरिकन राजकारणाच्या परंपरेनुसार त्यांच्याबाबत भूतकाळातील अनेक विवाद्य गोष्टी उकरून काढण्यात येतील किंवा खोटे आरोप करण्यात येतील. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चिरफाड करण्यात येईल. त्यांच्यावर मनसोक्त चिखलफेक करण्यात येईल.

आयुष्यभर कोणत्याही मूल्यांची पाठराखण न करता, कोणत्याही मूल्यांसाठी न लढता, फक्त आणि फक्त वैध आणि अवैध मार्गांनी संपत्ती मिळवण्यात आयुष्य घालवणाऱ्या, अनैतिकतेच्या चिखलात लोळणाऱ्या, विरोधकांवर तोंडाची गटारगंगा सोडणाऱ्या ट्रम्प यांना यातील काहीही करण्याचा नैतिक अधिकार नाही.

अमेरिकेतील रिपब्लिकन आणि त्यांचे नेते ट्रम्प हे भारतातील ‘हिंदुत्ववाद्यां’सारखे आहेत. कमला यांच्याबाबत ‘त्या मूर्ख, बिनडोक आणि अकार्यक्षम आहेत. अमेरिकेचे त्या वाटोळे करतील, अमेरिकेचे तुकडे करतील’ असे अनेक बाष्कळ आरोप ट्रम्प यांनी केले आहेत. त्यांच्या वांशिक पार्श्वभूमीची मनसोक्त थट्टा ते उडवत आहेत. पण त्यांनी कमला यांच्यावर केलेला सर्वांत महत्त्वाचा आरोप म्हणजे, त्या ‘वेड्या डाव्या आणि टोकाच्या उदारमतवादी आहेत’ हा. वास्तविक हा आरोप आहे का, ही पावती आहे, याचा विचार करावा लागेल.

कमला यांना पूर्ण डावे वा समाजवादी म्हणणे अवघड आहे. पण अमेरिकेतील टिपिकल डेमोक्रेटिक विचाराच्या थोड्या डावीकडे त्या झुकलेल्या आहेत हे निश्चित. त्या बुरसटलेल्या विचारांच्या नाहीत, हेही निश्चित. त्या स्वतःला ख्रिश्चन मानत असल्या, तरी अमेरिकेतील कर्मठ ख्रिश्चनांच्या दावणीला त्या बांधल्या जाणार नाहीत, हे पण निश्चित. अमेरिकेच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला त्या कोणताही मूलभूत धक्का देणार नाहीत. गाझा पट्टीत नरसंहार करणाऱ्या नेतान्याहूचा किंवा युक्रेनचा शस्त्र पुरवठा त्या थांबवण्याची शक्यताही धूसर आहे. तरीही त्यांच्या येण्याने जगात काहीतरी सकारात्मक घडेल, अशी खात्री बाळगण्यास हरकत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

अमेरिकेतले बहुसंख्य भारतीय हे नुसते ‘हिंदुत्ववादी’ नाहीत, तर ‘मनुवादी’ही आहेत. अमेरिकेत लोकशाही, स्वातंत्र्य आणि भौतिक सुखे उपभोगणारे हे ‘मनुवादी’ मोदी आणि अमित शहांसारख्या हुकूमशाही सत्ताधाऱ्यांची पाठराखण करत राहिले. अमेरिकेत जाऊन ते ना लोकशाहीवादी, ना उदारमतवादी, ना धर्मनिरपेक्ष बनले. अमेरिकेत विविध धार्मिक सणवार करणे, बुरसटलेल्या रूढी-परंपरांचे भारतीय संस्कृतीच्या नावाखाली उदात्तीकरण करणे, हे यांचे कर्तृत्व. अमेरिकेत विज्ञानाच्या मूलभूत संशोधनांत झोकून न देता ‘टाइम्स स्क्वेअर’मध्ये ढोल वाजवणे, यांत धन्यता मानणारी ही मंडळी. स्वाभाविकपणे हे बहुसंख्य मनुवादी ट्रम्प यांचे समर्थक बनले. ही मंडळी कमला हॅरिस यांच्यामागे उभी राहणार का, हा प्रश्न आहे.

भारतातील राजकारणात गेल्या दशकात उजव्या विचारसरणीचे कमळ जोमाने फुलले. कमळ चिखलातून उगवते, पण या कमळाने भारतीय राजकारणाचा चिखल केला. आता या कमळाच्या पाकळ्या सडून झडू लागल्या आहेत. हे घडत असताना भारतीय मातीतून आफ्रिकन गंध घेऊन अमेरिकेत जन्मलेले कमला हॅरिस नावाचे ‘डावे कमळ’ फुलत आहे, ही घटना महत्त्वाची आहे.

बघूया अमेरिकेच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आशियायी-आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष बनून त्या नवा इतिहास रचतात का! त्या निवडून आल्या, तर जगातील महासत्ता एक महिलेच्या हाती जाईल. अमेरिकेतील प्रस्थापित, सीआयए, पेंटागोन आणि मेन इन ब्लॅक यांना त्या किती ताब्यात ठेवू शकतील, हा प्रश्न आहे. अमेरिकेत अशी व्यक्ती निदान त्या स्पर्धेत उतरू शकते, हेही महत्त्वाचे आहे. भारतात असे घडणे कधी शक्य होईल का?

‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाच्या सप्टेंबर २०२४च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......

म. गांधी आणि डॉ. आंबेडकर हयात असते, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर त्यांचेही एकमत झाले असते, त्यांनी या निकालाचे स्वागतच केले असते...

‘अधिक मागे राहिलेल्यांना मागेच ठेवण्याचा (थोडे सक्षम झालेल्यांचा) हा डाव आहे का? आणि समजा, अजून ती वेळ आलेली नाही, तर अधिक पिछड्यांना पुढे कसे आणायचे? पाऊणशे वर्षे पुरेशी नसतील, तर आणखी किती वर्षे उपवर्गीकरण नको, की ते कधीच नको?’ या सर्व चर्चेत ‘आरक्षणाचे धोरण व मूळ उद्दिष्ट काय आणि कशासाठी’ याकडे दुर्लक्ष होते आहे. शिक्षण व सरकारी नोकऱ्या यांमध्ये मागास घटकांचे पुरेसे प्रतिनिधित्व झाले पाहिजे, हे आहे मूळ उद्दिष्ट.......

पसमंदा मुस्लिमांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे, हा केवळ विशिष्ट जमातीचा विकास नसून, भारताच्या वैविध्यपूर्ण समाजात सामावलेल्या क्षमतांना मान्यता आणि वाव देण्यासारखे आहे

विविध अभ्यासांत असे दिसून आले आहे की, एखाद्या समूहाला सामाजिक, आर्थिक विकासापासून वंचित ठेवण्यात आले, तर ते ‘जमातवादी’ किंवा ‘मूलतत्त्ववादी’ राजकारणाकडे ढकलले जातात. ‘मागासलेपणा’ आणि ‘धर्मवादी राजकारण’ यांच्यात नेहमी सहसंबंध दिसून येतो. तसे काहीसे पसमंदांचे होऊ नये, यासाठी विविध स्वरूपाच्या उपाययोजना करून सबलीकरण करून त्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्याची, सामाजिक व राजकीय प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे.......