अजूनकाही
१. शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात येणार नाही, असेदेखील राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ‘सत्ताधारी पक्षाला सहमताने उमेदवार द्यायचा असल्यास आम्ही विचार करू. याबद्दल सत्ताधारी पक्ष विरोधकांशी कशा प्रकारे संवाद साधतात, हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला अद्याप बराच कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे विविध पक्ष यावर विचार करू शकतात,’ असे पक्षाचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटले.
राष्ट्रवादी पक्षाची प्रेस कॉन्फरन्सही कशी शरद पवारांच्या नमुनेदार संभाषणपद्धतीप्रमाणे चालते, हे पाहण्यासारखं आहे... म्हणजे, नेमकं काय म्हणायचंय त्याचा ताकास तूर लागू द्यायचा नाही. एकीकडे राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही म्हणायचं, मग सर्वपक्षीय सहमतीचा उमेदवार असेल तर विचार करू म्हणायचं. मध्येच काँग्रेसचं पिल्लू सोडायचं. पवारांना ओळखणाऱ्यांना एवढंच कळलं की, ते राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत व्हेरी मच आहेत.
...................................................................................................................
२. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमामुळे यमुना नदीच्या पात्राचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई केंद्र सरकार, दिल्ली सरकार यांच्याबरोबरच राष्ट्रीय हरित लवादाकडून वसूल करण्यात यावी, असे विधान आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक रविशंकर यांनी केले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात आर्ट ऑफ लिव्हिंगने यमुनेच्या तीरावर जागतिक संस्कृती महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी यमुना नदीच्या पात्रात भराव टाकण्यात आला होता. यामुळे यमुना नदीच्या पात्राचे मोठे नुकसान झाले. हरित लवादानेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या जागतिक संस्कृती महोत्सवाला परवानगी दिली होती. यमुना नदी इतकी नाजूक आणि स्वच्छ होती, तर मग जागतिक संस्कृती महोत्सव रोखायला हवा होता,’ असे रविशंकर यांनी म्हटले आहे.
या सद्गृहस्थांनी ‘शोधलेल्या’ सुदर्शनक्रियेचे इतर बरेच फायदे आहेत म्हणे; पण, त्याने उर्मटपणा वाढीस लागतो, हा फायदा कुठे नोंदवलेला नसावा. अर्थात, हे वेगवेगळ्या सरकारांनी पोसून डोक्यावर चढवून ठेवलेले बुवाबापूमहाराज आणि डबलश्री, ट्रिपलश्री आहेत... ते वेळप्रसंगी सरकारवर कशी दुगाणी झाडतात, हेही सगळ्यांना दिसायलाच हवं.
...................................................................................................................
३. उत्तम व्यावसायिक होण्याची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या व्यक्तींनी आता राजस्थानात तरी फेअरनेस क्रीमचा वापर करायला हवा. कारण उत्तम व्यावसायिक होण्यासाठी सुंदर दिसणे आवश्यक आहे, अशी शिकवण राजस्थानच्या माध्यमिक शाळेतील पुस्तकातून विद्यार्थ्यांना देण्यात येते आहे. राजस्थान सरकारने दिलेल्या पाठ्यपुस्तकांत चांगला उद्योजक होण्यासाठी ‘सुंदर दिसणे’ आणि ‘चांगली उंची’ आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उत्तम स्वास्थ्य आणि शालीनता या गुणांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
स्त्रियांना समाजात काही स्थान प्राप्त करायचं असेल, तर नवऱ्यामागे सती जाण्याची तयारी असायला हवी, असंही या राज्यातल्या पाठ्यपुस्तकांमध्ये छापून आलं तर आश्चर्य वाटायला नको. सदरहू पुस्तकाचं नाव ‘समाजोपयोगी योजनाएँ’ असं आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांना राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली आहे, हे लक्षात आलं की, उद्योजकतेचे हे निकष कोणत्या विचारधारेत जन्माला आले आहेत, तेही कळून जातं.
...................................................................................................................
४. चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने अपंगांना सूट दिली आहे. यापूर्वी ३० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येक चित्रपटगृहात राष्ट्रगीत बंधनकारक करण्याचा आणि ते सुरू असताना प्रेक्षकांनी उठून उभे राहणेही बंधनकारक करण्याचा वादग्रस्त आदेश दिला होता.
राष्ट्रगीत सुरू असताना बसून राहिलेली व्यक्ती अपंग आहे, हे ठरवणार कोण? अपंगांनी अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेऊन फिरायचं का सगळीकडे? शिवाय, कोणी अपंग उभा राहिला नाही, तर कसलीही शहानिशा न करता लगेच झुंडीने मारहाण करून आपली उथळ देशभक्ती दाखवत फिरणाऱ्या मंदमती देशभक्तांना आवर कोण घालणार? त्यांच्यावर कोणत्या कलमाखाली खटला भरणार?
...................................................................................................................
५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल दिवा संस्कृतीला रामराम केला आहे. त्यामुळे मोदी सरकारसह देशभरातील राज्य सरकारांमधील मंत्र्यांनी वाहनांवरील लाल दिवे उतरवले आहेत. मोदी सरकारच्या या आदेशामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवेदेखील उतरणार आहेत. त्यामुळे यापुढे फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांवरच दिवे दिसतील.
लाल दिवा हा इतरांपेक्षा वेगळे आणि विशेष असण्याचं प्रतीक होता. त्याला रामराम करणं ही चांगली सुरुवात आहे. पण, ती केवळ सर्वसामान्यांना खुपणाऱ्या प्रतीकाला रामराम ठरण्याचीच शक्यता अधिक. कारण, सगळया मंत्र्यासंत्र्यांचा तामझाम काही दूर होणार नाही. त्यांच्याबरोबरचे पोलिस, सायरन वाजवत जाणाऱ्या गाड्या, यांच्यामुळे व्हीआयपींच्या व्हीआयपी मस्तीत काही फरक पडण्याची शक्यता नाही. उलट लाल दिव्यामुळे अडचणीचे ठरणारे काही व्यवहार सोयीचे होऊन जातील.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Girish
Fri , 21 April 2017
क्र 3 वरची तुमची कंमेंट हीन , आणि अक्कलशुन्य दर्जाची आहे