महाराष्ट्राच्या इतिहासातील निकराची लढाई!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले
  • Sat , 17 August 2024
  • पडघम राज्यकारण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले

महाराष्ट्राला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. बहुदा दिवाळीच्या आसपास होणाऱ्या निवडणुकीची खडाखडी जोरात सुरू झालेली आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत अटीतटीची, तसंच निकराची लढाई म्हणून बघावी लागणार आहे. लढाई म्हटलं की, नुसती खडाखडी करून भागत नाही, तर एकमेकाशी थेट भिडावं लागतं. त्यात कुणाला इजाही होऊ शकते. गेल्याच आठवड्यात घडलेल्या सुपारी, नारळ आणि शेणफेकीच्या घटनांतून ही निवडणूक कोणत्या स्तरावर जाऊन लढवली जाणार, याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत.

महायुती विरुद्ध महाआघाडी असं लोकसभा निवडणुकीतलं दुहेरी लढतीचं चित्र येत्या विधानसभा निवडणुकीत नसेल. या दोन आघाड्या आणि त्यातील सहा पक्ष वगळता, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’, प्रकाश आंबडेकरांची ‘वंचित आघाडी’, राजू शेट्टीची ‘तिसरी आघाडी’, बच्चू कडू, विनय कोरे, रामदास आठवले, जोगेन्द्र कवाडे, अपक्ष एमआयएम हेही काही ठिकाणी रिंगणात असतील.

ही लढत एवढीच नसेल, तर जरांगे पाटील हा एक कळीचा मुद्दा या निवडणुकीत असेल. त्यांच्या आंदोलनानं महाराष्ट्राचा काही भाग अक्षरश: ढवळून निघाला आहे. आरक्षणासाठी मराठे आता आक्रमक आणि जरांगे यांच्या नेतृत्वाखाली संघटितही झालेले आहेत. त्यांनी खरंच निवडणूक लढवली, तर महाराष्ट्राच्या जवळपास ७० मतदारसंघात या मराठा आंदोलनाचा प्रभाव नक्कीच जाणवेल. त्यातील जवळ जवळ ४० मतदारसंघकेवळ मराठवाड्यातील असतील.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आरक्षण मागण्याचा हक्क देशातील प्रत्येक जाती-जमातीला नक्कीच आहे. मराठ्यांच्याही आरक्षणाची मागणी गैर नाही, पण हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या आक्रमक आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या काही भागात आणि त्यातही विशेषत: मराठवाड्यात ‘मराठा विरुद्ध अन्य सर्व’ असं जे ध्रुवीकरण झालेलं आहे, ते अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे  महाराष्टाच्या सामाजिक सौहार्दाला तडा गेला आहे.

महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ‘ब्राह्मण विरुद्ध सर्व’ असं भयावह चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं होतं, त्या ज्या हकीकती माझ्या पिढीनं ऐकल्या आहेत, तशा काहीशा वळणाचं हे चित्र आहे. सनरेक गावात तर लोक एकमेकांकडे सद्भावनेनं नव्हे, तर शत्रुत्वाच्या नजरेतून बघू लागले आहेत. देशाचे ज्येष्ठतम नेते शरद पवार यांनीही या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे, मात्र सामाजिक सौहार्दाला तडा देणारं हे वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घ्यावा, असा चेंडू पवारांनी टोलावला आहे. खरं तर हे वातावरण निवळावं, याबद्दल राज्यातील कोणत्याच पक्षांचं नेतृत्व गंभीर नाही. प्रत्येकाला त्याची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे, हेच खरं.

जातीय सलोखा हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला, तरी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यामुळे विधानसभा निवडणूक सोपी होण्याऐवजी अवघडच झाली आहे, कारण एका लोकसभा मतदारसंघात म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघांत विजय आणि दावा, या हिशेबानं जागा वाटपाची मागणी सुरू झालेली आहे.

खरं तर, लोकसभा निवडणुकीचे निकाल विधानसभा निवडणुकीतही तंतोतंत उतरतात, असं कधी नसतं, पण मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे महाविकास आघाडीतले, विशेषत: काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सुसाट सुटलेले आहेत. म्हणूनच मविआतल्या तिन्ही पक्षांना हव्या असणाऱ्या जागांची बेरीज विधानसभेच्या २८८ जागांपैकी जास्त होत आहे, असे हे चित्र आहे. 

मूळ शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडल्यामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ मविआला लोकसभा निवडणुकीत नक्कीच झाला. सहानुभूतीची ती लाट विधानसभा निवडणुकीतही कायमच राहील, असं गृहीत धरून एकाच वेळी एकत्र आणि स्वबळावरही लढण्याची तयारी, अशी ‘डबल ढोलकी’ काँग्रेस आणि शिवसेना वाजवत आहे.

जागांचा हट्ट असाच कायम राहिला आणि ताणून धरलं गेलं, तर त्याचा परिणाम महाविकास आघाडी फुटण्यातही होऊ शकतो. महाविकास आघाडीत तुलनेनं शरद पवार जागा वाटपावर फारसं काही बोलत नाहीत, पण शेवटच्या क्षणी नेहमीप्रमाणे ते कोणती सोंगटी कुठे कशी फिरवतील याचा नेम नसतो.

पवार राजकीय तहाच्या काटाकाटीत शेवटपर्यंत चिकाटीने लढतात आणि यशस्वी होतात, असाच आजवरचा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेली सहानुभूती तसंच राहुल गांधी यांच्यावर जनतेनं दाखवलेला विश्वास कायम राहिला, तर विधानसभा निवडणुकीत आघाडीचं यश निश्चित आहे, पण कोणत्याही निवडणुकीत दोन अधिक दोन बरोबर चार असं कधी घडत नसतं.

भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मुळीच मिळवता आलं नाही, हे १०० टक्के खरं असलं तरी महायुतीला लोकसभेत मिळालेलं यश दुर्लक्ष करण्यासारखं आहे, असंही नाही.

लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभवानंतर केवळ नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतदार प्रतिसाद देणार नाहीत, हे लक्षात आल्यानं महायुतीतील पक्ष सावध झाले आहेत. शिवाय सहनुभूतीची लाट कमी करण्यासाठी, हाती सरकार असल्यामुळे मतदारांना मोहात पाडणाऱ्या अनेक योजना मंजूर करण्याचा धडाका महायुती सरकारनं लावला आहे.

याचा किती फायदा विधानसभा निवडणुकीत होईल, हे आता सांगता येणार नसले, तरी महायुती विरुद्ध असणारी जनतेतील नाराजी या योजनांमुळे कमी होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

महायुतीतही सगळ्यात कळीचा मुद्दा जागा वाटपाचाच असेल. भाजपला १५० ते १६० जागा जर (त्यातील काही जागा मित्र पक्षांना द्याव्या लागतील) मिळवता आल्या नाही, तर पक्षातंर्गत असंतोष वाढत जाईल. इतक्या जागा जर भाजपला द्यायच्या असतील, तर सुटणाऱ्या जागांवर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष समाधानी राहतील, असं वाटत नाही. म्हणजे जागा वाटपापासूनच महायुतीला ‘प्रथम ग्रासे मक्षिकापात’ होणार, हे दिसत आहे.

महायुतीच्या संभाव्य यशापयशातील कळीचा संभाव्य मुद्दा देवेंद्र फडणवीस आहेत. भाजपचे नेते कितीही दावे करोत, पण फडणवीसांचं नेतृत्व आता महाराष्ट्र भाजपमध्ये एकमुखी राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. खाजगीत बोलताना अनेक लोकप्रतिनिधी फडणवीस यांच्या एकाधिकारशाहीविषयी नाराजी व्यक्त करतात, हे आता महाराष्ट्रभर पसरलेलं आहे.

केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा असल्यामुळे केडरबेस नेते आणि कार्यकर्ते कदाचित निमूटपणे फडणवीस यांना साथ देतीलही, पण जे ३२ ते ३५ टक्के नेते बाहेरून आलेले आहेत, ते मात्र साथ सोडू शकतात. हे सर्व लक्षात घेत येत्या निवडणुकीत सर्वांत जास्त कस फडणवीस यांचाच लागणार आहे. 

महाविकास आघाडी आणि महायुटी यांच्यातील एक समान मुद्दा म्हणजे युती आणि आघाडीत असणारे मुख्यमंत्रीपदाचे पायलीभर उमेदवार. आघाडीत तर मुख्यमंत्रीपदावरून आत्ताच ‘बाजारात तुरी...’चा कलगीततुरा रंगला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेतून उमेदवार पाडापाडीचा नेहमीचा खेळ खेळला गेला, तर अंतिम निकाल त्रिशंकू विधानसभा असेल. मग घोडेबाजार तेजीत येईल आणि अनपेक्षित असं काही भलतंच घडलेलं दिसेल.

राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भूमिका कळीच्या ठरणार आहेत. या दोन्ही नेत्यांचा पक्ष म्हणजे हे नेतेच आहेत आणि त्यांचा शब्द सर्वच बाबतीत पक्षात प्रमाण असतो. त्यामुळे लोकशाही प्रक्रिया पाळून सर्व सहमतीने निर्णय घेण्याची प्रथा या दोन्ही नेत्यांच्या पक्षात उरलेलीच नाहीये.

आणखी एक मुद्दा म्हणजे हे दोन्ही नेते अनेकदा जे काही राजकीय निर्णय घेतात, नेमके त्याच्याविरुद्ध नंतर वागतात, असा अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला, तर आता विधानसभेत २२५ ते २४० जागा लढवणार, असं राज ठाकरे म्हणतात.

... तर प्रकाश आंबेडकरांनी अजून तरी त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची मतं नेमकी कुठे आणि कशी वळणार हेही बघणं उत्सुकतेचं आहे. निवडणूक जेव्हा चार किंवा त्यापेक्षा जास्त पक्षांमध्ये लढवली जाते, तेव्हा विजयाचं मताधिक्य फार मोठं नसतं. अगदी हजार-पाचशे मतांनाही फार मोठं मोल असतं. ३० ते ३२ टक्के मत मिळवणारा उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी होतो, असा अलीकडच्या चार-साडेचार दशकातील निवडणुकांचा अनुभव आहे.

राज्याचं राजकीय चित्र सध्या तरी खूपच अंधुक आहे. राजकारणातले नेते आणि स्वयंघोषित राजकीय विश्लेषक काहीही म्हणोत, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आज काही अंदाज बांधणं, हे ‘वाळूचा किल्ला’ उभारण्यासारखं आहे. जागा वाटप होऊन, मतदारसंघनिहाय कोण नेमकं कुणाच्या बाजूला आहे, याचं चित्र हे पत्ते उघड झाल्यावरच स्पष्ट होईल आणि येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा पारडं जड आहे किंवा नाही, याचा अंदाज बांधता येईल.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

येणारी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या बाबतीत आणखी कोणती खालची पातळी गाठणार आहे याची झलक सुपारी, नारळ आणि शेणफेक यातून दिसलेली आहे. एकापेक्षा एक ‘नामचीन वाचाळवीर’ आतापासूनच कामाला लागले आहेत. संजय राऊत यांचं एकट्याचं नाव घेण्याचं काही कारण नाही. सर्वच पक्षात बोलण्याच्या बाबतीत तोल सुटलेले एकापेक्षा एक नेते खच्चून भरलेले आहेत.

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, संजय सिरसाट, प्रवीण दरेकर, सुषमा अंधारे अशी ही बरीच मोठी यादी आहे. सध्या तर उद्धव ठाकरे यांची अनेक वक्तव्ये, संजय राऊत यांनाही लाजवणारी आहेत.

हे बोलण्यापर्यंत होतं, तोपर्यंत ठीक होतं, पण आता ही पातळी सुपाऱ्या, नारळ आणि शेण फेकण्यापर्यंत गेली आहे. उद्या शब्दांच्या जागी शस्त्र आली, तर फारसं आश्चर्य वाटायला नको. शस्त्र आली की, रक्तलांच्छितपणा आपसूकच येतो. म्हणूनच म्हटलं, केवळ खडाखडीवर लढाई थांबण्याची चिन्हे नाहीत. येती विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत अटीतटीची, तसंच निकराची लढाई ठरणार आहे...

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......