सर्वच जण संवादाच्या एकाच पातळीवर येणे, ही ‘समकालीनत्वाची जाणीव’ पक्व होण्याची अवस्था असेन
ग्रंथनामा - झलक
श्रीनिवास हेमाडे
  • ‘सांस्कृतिक राजकारण - काही पैलू, काही आविष्कार’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 03 August 2024
  • ग्रंथनामा झलक मा.रा. लामखडे M. R. Lamkhade सांस्कृतिक राजकारण Sanskrutik Rajkaran श्रीनिवास हेमाडे Shriniwas Hemade

संगमनेर महाविद्यालयातील माझे ज्येष्ठ सहकारी, मराठीचे निवृत्त प्राध्यापक आणि समाजवादी लेखक प्रा. मारोतीराव लामखडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सांस्कृतिक राजकारण- काही पैलू, काही आविष्कार, ‘चाकोरीपलीकडचा’ आणि ‘लोकवाटा’ ही तीन पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील पहिल्या, ‘सांस्कृतिक राजकारण - काही पैलू, काही आविष्कार’ या ग्रंथातील ‘समकालीनता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा लेख ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी…

.................................................................................................................................................................

या लेखात मी युग, समकालीन आणि ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या संकल्पनांचा परस्पर संबंध व उचितता स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन.

भारतीय काल कल्पना

भारतीय कालकल्पना दोन प्रकारची आहे. पहिली पौराणिक आणि दुसरी दार्शनिक. पुराणांचा प्रभाव जनमानसावर सर्वाधिक आहे. भारतीयांची-मुख्यत्वे हिंदूंची धार्मिक, सांस्कृतिक आणि दार्शनिक मुळे पुराणांमध्ये रुजलेली, त्यांच्यातून विकसित झालेली आहेत. त्यांचे अर्थ समजावून घेणे, हे आपले काम आहे. त्यांचे संवर्धन, पोषण-भरण, नवे आधुनिक विवरण अथवा ज्यास आपण ‘समकालीन’ संबोधत आहोत ते ‘समकालीन अर्थनिर्णयन’ करणे, हे आपलेच काम आहे. आजपर्यंत ऑक्सफर्ड, केंब्रिज्, प्रिन्स्टन, हार्वर्ड; विशेषतः जर्मनी येथील विद्वानांनीचं भारतीयांना भारतीयांची संस्कृती समजावून दिली आहे. त्यांच्यात काही भर घालून आपण सुशिक्षित आहोत, असे न मानता आपण आपले अर्थविवरण आपल्या परिभाषेत समजून घेणे व आपणच आपल्याला ते समजावून देणे, हा उपक्रम आपणच  राबववला पाहिजे. आता, बौद्धिकदृष्ट्या अधू व मिंधे राहणे टाळले पाहिजे.

भाग १

पहिली गोष्ट अशी की ‘काल’ ही धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञान अशा तीन क्षेत्रातील मातब्बर संकल्पना असून तिन्ही क्षेत्रे बहुतेक सर्व मानवी कल्पना, संकल्पना, श्रद्धा, विश्वास, संकेत, रूढी, चालीरिती शेअर करतात. या साऱ्यांचा परस्परांशी प्रचंड संघर्ष उडत जातोच.

दुसरी गोष्ट अशी की धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञान मिळून विद्यमान मानवी जीवनाकार (form of life) आकाराला येत असल्याने ‘काल’ संकल्पना सुद्धा तिन्हींमध्ये बेमालूम सरमिसळून जाऊन प्रत्यक्ष जीवनावर थेट प्रभाव गाजवते. हा प्रभाव भक्तांची स्थितीजडता आणि परिवर्तन यांच्या स्वरुपात जाणवतो. विशेषतः ‘धर्म’ संस्थेचा ‘समकालीन’ शी संकल्पनेशी अर्थात ‘समकालीनवाद्यां’शी संघर्ष होतो. धर्म आणि धर्मयुद्धे ‘कालबाह्य’ झाली आहेत, असा परिवर्तनवाद्यांचा समज असतो, पण धर्माचा व धार्मिकांचा तसा समज नसतोच’, उलट अजूनही धार्मिक काल चालूच असून सत्ययुगाचे पुनरावतरण होणार आहे, अशी त्यांची पक्की खात्री असते, नव्हे त्याचे ‘आधुनिक वाटेल असे विज्ञान’ ही त्यांनी निर्माण केलेले असते. ‘विज्ञान’ ही त्यांना नवे न वाटता ईश्वरप्रणित वाटत असते. उलट ‘परिवर्तनवाद्यांच्या मते ‘समकालीनता’ ही लोकशाहीशी निगडीत सामाजिक आणि जास्त वास्तव गोष्ट वाटते.

‘काला’चा सांस्कृतिक आविष्कार भाषा, ललित साहित्य, वैचारिक साहित्य, संगीत, नाट्य, कला इत्यादी माध्यमांमधून व्यक्त होत राहतो. ‘काल’ संकल्पनेची धार्मिक, तात्त्विक आणि वैज्ञानिक रूपे व आशयाचे जास्तीत जास्त अचूक आकलन होणे, ते आकलन ‘समकालीन’ असणे, ह्या गोष्टी ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही अन्य संकल्पना समजून घेणे, या गोष्टीला सहायक ठरू शकेल, असा विश्वास वाटतो. तथापि विस्तारभयास्तव त्यांच्या सविस्तर स्वरूपाचा वेध घेता येणे शक्य नाही.    

भाग २

‘समकालीन’ ही जाणिव ‘भारतीय’ म्हणजे ‘देशी’ नाही, ती ‘आयात’ आहे. तिला जागतिक विशेषतः पाश्चात्य- युरोपीय वैचारिक विश्वाच्या सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाचा संदर्भ आहे. विशेषतः आधुनिक काळाच्या-युरोपीय प्रबोधनकाळाच्या (renaissance) संदर्भातून ती विकसित झाली. अर्थातच व्यापक अर्थाने तिचे स्वरूप तत्त्वज्ञानात्मक आहे. एक ‘संकल्पना’ या अर्थाने ती ‘तत्त्वज्ञानात्मक’ (philosophical) आहेच, पण ‘उपयोजन’ (application) म्हणून ‘स्व-रूपा’नेदेखील  तत्त्वज्ञानात्मक आहे. ज्या ज्या संकल्पनांचे मूळ स्वरूप उमगण्यासाठी त्या प्रत्यक्ष उपयोगात आणल्या जात असताना अथवा त्यांचे उपयोजन कसे होते, यात रस घेणे परिवर्तनदृष्ट्‍या आज आवश्यक ठरले आहे, त्या संकल्पनांमध्ये ‘समकालीन’ या संकल्पनेचा समावेश यथार्थतेने होतो, असे म्हणता येते. 

भाग ३

व्युत्पत्ति : उगम आणि इतिहास

‘Contemporary’ हा शब्द सतराव्या शतकातील मध्ययुगीन लॅटीनमधील contemporariusपासून बनतो. ‘Con’ म्हणजे ‘एकत्र’ आणि ‘tempus’, ‘tempor’ म्हणजे ‘काळ’. यातील Tempus हा लॅटिन तर tempor हा इंग्लिश शब्द आहे. दोन्हीचा अर्थ (time) म्हणजे वेळ, काळ. म्हणून Contemporary म्हणजे एका काळात किंवा कालखंडात सर्वांनी ‘असणे’. त्याचा अर्थ एकत्र एकाच ठिकाणी एकाच स्थळी असले पाहिजे, असे नव्हे; तर समान कालखंडात ‘अस्तित्वात’ असणे. Contemporaryच्या अन्य व्युत्पत्तिनुसार लॅटिनमधील com म्हणजे with; त्याला temporarius जोडून contemporarius असा शब्द बनतो. एकूण अर्थ “ज्या काळात आपण आहोत त्या काळाशी सुसंगत असणे”.

समकालीन

मराठीतील ‘समकालीन’ हा शब्द ‘कालीन’ या विशेषणाला ‘सम’ हा उपसर्ग लावून बनतो. कालीन = काळात, वेळेत. सम = एकाच, एकत्र. एकाच कालखंडात अस्तित्वात असणे, इतर लोकही ज्या काळात राहात आहेत त्याच काळात जिवंत असणे = समकालीन असणे. ‘एकसमयावच्छेदेकरून’  (simultaneous) हा जुना आवडता शब्द. दाते शब्दकोशात ‘अक्रान’ हा फारसा वापरात नसलेला आणखी एक शब्द आढळतो. त्याचाही अर्थ समकालीन, सारख्या वयाचे, सारख्या योग्यतेचे. एककालिक, एककालीन हेही आणखी काही समानार्थी शब्द आहेत.

मराठी किंवा कोणत्याही भाषेच्या साहित्य आणि कला विश्वात ‘समकालीन’ हा शब्द ‘एकाच काळातील’  या अर्थाने ‘एक मूल्यवाचक’ संज्ञा म्हणून वापरला जातो. चित्रकला, गायन, नृत्य, नाट्य अशा विविध कला, त्यांचे साहित्य आणि त्यांच्याशी निगडीत संगीत इत्यादींचे रसग्रहण व समीक्षा समकालीन असण्यावर कटाक्ष असतो. त्यांचे रसग्रहण आणि समीक्षा कलेचे सौंदर्य, शिवत्व, नैतिकता, अस्तित्व, ज्ञान, तसेच कलांच्या-साहित्यांच्या विविध प्रकारांची तार्किक रचना या तात्त्विक संकल्पनांच्या आधारे केले जाते. उदाहरणार्थ, एखादे नाटक-कीचकवध, नटसम्राट  समकालीन आहे किंवा कसे? असा प्रश्न उपस्थित करता, येथे ‘समकालीन’ हे मूल्य बनते.

भाग ४

युग संकल्पना     

काल सूचक प्रसिद्ध संज्ञा म्हणजे युग (Cycle). ‘युग’ ही संकल्पना विश्वाचा व मानवाचा इतिहास, माणसाचे व्यक्तिगत जीवन या संदर्भात उपयोजनात आणली जाते. विशेषतः मानवी आयुष्य आणि विश्वाचे आयुष्य यांचे मोजमाप करण्यासाठी ‘युग’ संकल्पना महत्वाची ठरते.

‘अमरत्व वा दीर्घायुष्य, ईश्वरसान्निध्य, सुखातिशय, अधर्माचा व दुर्गुणांचा अभाव इत्यादींनी युक्त असलेले पूर्वीचे सुवर्णयुग आता उरले नाही’, अशा अर्थाच्या पुराणकथा भारतीय संस्कृतीसह जगातील इतर अनेक समाजांमध्येही आढळतात. चिनी, भारतीय- हिंदू, बौद्ध व जैन आणि बऱ्याच आदिवासी धर्मांत आणि ग्रीक यांच्यासह जगातील बहुतेक सर्व संस्कृती आणि धर्मात ती आढळतेच.

पौराणिक काल कल्पना

बहुतेक भारतीय पुराणांनी जगाची उत्पत्ति आणि लय यांच्या कथा कथन केल्या आहेत. त्यांचा मुख्य आधार सांख्य दर्शनातील पुरुष आणि प्रधान प्रकृति यांचा आहे. मूळ सांख्य दर्शन निरीश्वरवादी आहे, पण पुराणांच्या मताने दोनहि तत्त्वे मूळ परमेश्वराचीच दोन अंगे आहेत. परमेश्वरापासून दोन्हींना मूर्त रूप लाभते, आणि विश्वरूपी प्रकृति आणि जीवरुपी पुरुष ‘काल’बद्ध होतात, म्हणजेच त्यांना विश्वाच्या ‘स्थळा’ त जन्म व मृत्यू (किंवा मोक्ष) मिळत राहतो. जन्म मृत्यू मोजण्याचे साधन, अर्थात ‘काल’ म्हणजेच जन्म दिवस ते मृत्यू दिवस हा कालखंड असतो.            

पुराणांच्या मताने विश्व हे अनादि, अनंत असून  गंगेच्या ओघाप्रमाणे सतत वाहतें आहे. ते नित्य आहे आणि बदलणारेही आहे. म्हणून प्रकृति, पुरुष, व्यक्त जगत् आणि काळ ही त्या अनादि, अनंत परमेश्वराचीच रूपे आहेत, ही पुराणांची गृहीतके आहेत.    

पौराणिक कालकल्पना, म्हणजे पुराणांमध्ये स्पष्ट केलेली ‘काल’ संकल्पना. ती मुख्यतः ‘सूर्यसिद्धान्त’ या ग्रंथात दोन प्रकारे सांगितली आहे.

१) पहिला काल हा स्व-रूपाने ‘अखंड’ असणारा आणि प्राणिमात्रांना ‘दंड’ देणारा.  हा काल म्हणजे ‘काळ आता होता पण वेळ आली नव्हती’ मधला अमूर्त काल. दंड देणारा काल, ही देवता आहे, असे कुठे म्हंटलेले नाही, पण असा ‘दंडक काल’ मान्य केलेला आहे. 

२) दुसरा काल, कलनात्मक म्हणजे मोजता येणारा काल. मोजता येणारा काल युग, महायुग इत्यादी परिभाषेत मांडला जातो. मोजता येणारा काल प्राचीन भारतात दोन प्रकारे मांडला गेला. पौराणिक आणि चिंतनात्मक. तथापि पौराणिक ‘काला’ने जनमानसावर प्रचंड पकड मिळवली. त्यास बऱ्याच प्रमाणावर भारतीय वैदिकदर्शनांनी पूर्वमीमांसा दर्शनाने आणि वेदांत दर्शनाने अतिशय पक्के भक्कम तात्त्विक अधिष्ठान दिले. तेच आजही कायम चिरेबंदी राहिले आहे.

युग कल्पना 

स्मृति-पुराणांच्या मते, कृत (सत्य), त्रेता, द्वापर व कली अशी  चार युगे आहेत. सत्य युग १७,२८,००० वर्षे, त्रेता युग १२,९६,००० वर्षे, द्वापार युग ८,६४,००० वर्षे आणि कलियुग ४,३२,००० वर्षांचे मानले जाते. ही एकूण ४३ लक्ष २० हजार मानवी वर्षे होतात. युगे चक्राकार आहेत. एकानंतर दुसरे येते- असे नेहमीच घडते. पण चक्राचे पुनरावतरण होताना पहिल्यापेक्षा नंतरचे युग २५ टक्के कमी होते. म्हणजे सत्ययुगापेक्षा त्रेता युग २५ टक्के कमी होते, पुढचे आणखी २५ टक्के कमी. हे ४:३:२:१ प्रमाण आहे.

ह्या चार युगांचे मिळून एक महायुग बनते. अशी ७१ चतुर्युगे झाली की, त्यास ‘मन्वंतर’ म्हणतात. १४ मन्वंतरांचा मिळून एक ‘कल्प’ बनतो. (७१ x १४ = ९९४ चतुर्युगे). ०१ कल्प = ब्रह्मदेवाचा एक दिवस. तेवढीच त्याची एक रात्र असते. अशा ३६० अहोरात्रींचे त्याचे एक वर्ष होते. एका ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षांचे असे मानले  जाते. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आयुष्यभरात एकूण ०७ कोटी २० लाख चतुर्युगे होतात. एक ब्रह्मा गेला की दुसरा येतो, तो गेला की तिसरा, असे सतत चालू राहते...   

विद्यमान ‘ब्रह्मा’च्या आयुष्याची ५० वर्षे चालू कलियुगात पूर्ण झालेली आहेत. त्याचा अर्थ ०१ परार्ध म्हणजे १५,५५,२०,००,००,००,००० दिव्य वर्षे (१५ निखर्व  ५५ खर्व २० अब्ज दिव्य वर्षे) झाली आहेत.    

या सध्याच्या ब्रह्म्याच्या ५१व्या वर्षाचा सध्या पहिला दिवस चालू आहे. त्यास ‘श्वेतवाराह कल्प’ नाव आहे. या श्वेतवाराह कल्पाची ०६ मन्वंतरे पूर्ण झाली असून ०७वे ‘वैवस्वत’ नावाचे मन्वंतर चालू आहे. वैवस्वत मन्वंतर हे ७१ महायुगांचे आहे. त्यातील २७ महायुगे पूर्ण झाली आणि २८वे महायुग चालू आहे. पांडुरंग गेली २८ युगे जो उभा आहे, तो या २७ युगभर उभा आहे!!

एक मन्वंतर संपल्यानंतर दुसरे येईपर्यंत प्रत्येक वेळी जो संधिकाळ येतो, त्याची एकुण ६ महायुगे होतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनू, सप्तर्षी, देव, इंद्र व मनुपुत्र हे पाच अधिकारी असतात. मन्वंतर बदलले की, पहिले अधिकारी जाऊन त्याच नावाचे म्हणजे मनू वगैरे नावांचे दुसरे अधिकारी येतात.

सत्ययुगात सर्व देव, विष्णु-लक्ष्मी नांदत असल्याने तो खराखुरा स्वर्गच होता. त्रेतायुगात वामन, परशुराम आणि श्रीराम हे तीन अवतार होऊन गेले. प्रभु रामाच्या देहान्तानंतर त्रेतायुगाचा अंत झाला. द्वापारयुगात महाभारत घडले आणि श्रीकृष्णाने अवतार घेतला. श्रीकृष्णाच्या समाप्तीनंतर कलियुग सुरू झाले. या कलियुगाचा प्रारंभ इ. स. पूर्व ३१०२ मध्ये झाला, असे मानले जाते. त्या ०४ लाख ३२  हजार वर्षांपैकी आतापर्यंत ५१२३ वर्षे संपलेली आहेत (हुश्श!).

विष्णूचा दहावा अवतार कल्की हा पृथ्वीवर पाप वाढल्यानंतर अधर्माचा नाश करण्यासाठी जन्म घेईल, असेही विष्णू पुराण सांगते. हा अवतार एखाद्या शक्तिशाली राजकीय नेत्याच्या स्वरूपात भक्तांना दर्शन देऊ शकतो, काही जणांना ‘दर्शनाचा अलभ्य लाभ’ झाल्याचे कळते. 

‘समकालीन’ संकल्पनेच्या संदर्भात एवढी दमछाक पुरे. ही ‘अद्भुतरम्य’ (Romantic) युग कल्पना रामायण-महाभारत इत्यादी महाकाव्यांपासून आजच्या गल्लीबोळातील कीर्तनकार महाराजांपर्यंत प्रचलित आहे.

दार्शनिक काल – युग संकल्पना

प्राचीन भारतीय साहित्य वैदिक आणि अवैदिक अशा दोन प्रकारचे आहे. जे वेद मानतात, स्वीकारतात ते वैदिक आणि जे स्वीकारत नाहीत ते अवैदिक. ही अर्थातच वैदिकांनी केलेली वर्गवारी आहे. अवैदिकात बौद्ध, जैन आणि चार्वाक अशी तीन दर्शने आहेत. चार्वाक दर्शन वैदिक विरोधक आहेच पण बौद्ध व जैन दर्शनाचेही विरोधक आहे. म्हणून एका अर्थाने ते या वर्गवारीच्या बाहेरचे, स्वतंत्र दर्जा असणारे दर्शन आहे.

अ) वैदिक :

वैदिकात अद्वैत वेदान्त (उत्तर मीमांसा), पूर्वमीमांसा, सांख्य, योग, न्याय व वैशेषिक अशी सहा दर्शने आहेत. बहुतेक सर्व दर्शनांनी कालाचा विचार केला आहे. काही जणांनी तो स्वीकारला, काही जणांनी नाकारला. ज्यांनी स्वीकारला त्यांनी तो ‘ज्ञानाची वस्तू’ म्हणून मान्य केला. उदाहरणार्थ वैशेषिक दर्शनाने ‘काल’ ही ज्ञानाची वस्तू मानली. काही आस्तिक दर्शनांनी विश्वाचा व्यवहार चक्राकार आहे, हा सिद्धान्त स्वीकारला, जसे की  सांख्य आणि वैशेषिक ही दर्शने सृष्टी, स्थिती, प्रलय, सृष्टी असे विश्वचक्र मानतात. योग आणि न्याय ही दर्शनेही हेच मत व्यक्त करतात.

तथापि सर्वांत प्रभावी ‘पूर्वमीमांसा’ हे आस्तिक दर्शन ‘सर्ग व प्रलय’ दोन्हीही मानत नाही. ‘विश्व अनिर्मित, अनादी, अंतहीन आहे आणि आज जसे ते आहे, तसेच ते कितीही पूर्वीचा काळ घेतला, तर त्या काळी होते आणि कितीही दूरचा भविष्यकाळ घेतला, तरी त्या काळी ते राहील’, असा सिद्धान्त पूर्वमीमांसा दर्शन स्वीकारते.

ब) अवैदिक :

बौद्ध धर्मानुसार युगांचा क्रम कलियुग ते कृतयुग व पुन्हा कृतयुग ते कलियुग असा असल्यामुळे महायुगात आठ युगे असतात. जैन धर्मानुसार काल हे बारा आऱ्याचे म्हणजे युगांचे एक चक्र असून त्या चक्राच्या उतरत्या भागाला ‘अवसर्पिणी’ व चढत्या भागाला ‘उत्सर्पिणी’ म्हणतात. अवसर्पिणीत येणारी सहा युगेच उलट्या क्रमाने उत्सर्पिणीत येतात. वैदिकांच्या संसर्गामुळे बहुधा अशा अचाट कल्पनांचा शिरकाव या धर्मात झाला असावा, असा अंदाज करता येतो.

प्रस्तुत 'समकालीन' या संकल्पनेच्या संदर्भात या साऱ्या दार्शनिक खोलात जाऊन काहीच उपयोग नाही.

क) चार्वाक : ‘सद्यकाल’ हाच ‘समकाल’

चार्वाकांची काल कल्पना त्यातातल्या त्यात आपण ज्या समकालीनत्वाचा विचार करू पाहतो, त्याच्या जवळ जाणारी आहे. ते आत्ताचा क्षण महत्वाचा मानतात. काम आणि अर्थ हे दोनच पुरुषार्थ ते स्वीकारतात आणि धर्म आणि मोक्ष या कल्पना नाकारतात. जन्म, पुनर्जन्म, आत्मा, कर्मसिद्धान्त इत्यादींनी लादला जाणारा विस्तारीत काल, दंडक काल ते धिक्कारतात आणि ‘सद्यकाल’ हाच ‘समकाल’ अशी भूमिका मांडतात.   

चिकित्सा

भारतात युग ही संज्ञा घटनांच्या काळाचा बोध करून देण्यासाठी वापरली जात असली, तरी या (म्हणजे कालगणनेच्या) बाबतीत ती फारशी उपयुक्त ठरत नाही. कारण, पुराणकथात्मक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही प्रकारच्या घटनांचे वर्णन करताना युग ही एकच संज्ञा वापरण्यात आली आहे.  युग या संज्ञेने नेमका किती वर्षांचा कालावधी सूचित होतो, याविषयी अनिश्चितता आहे; काळाच्या ओघात या संज्ञेचा अर्थ बदलत गेला आहे; तसेच, पुराणांच्या अतिशयोक्ती करण्याच्या प्रवृत्तीमुळेही अर्थबोधात अडचण निर्माण झाली आहे, असे डॉ. आ. ह. साळुंखे नमूद करतात. के. ल. दप्तरींच्या मते पूर्वी चार वर्षांचेच युग चालू होते; परंतु चंद्रसूर्य गतींचा मेळ घालण्यासाठी वेदांगज्योतिषाने (इ. स. पू. सु. १४००) पाच वर्षांचे युग ही कल्पना केली होती.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे मत

नक्षत्र दर्श म्हणजे ज्योतिषी वेदांग. ज्योतिषाचे ग्रंथ बरेच लुप्त झाले असून त्यातील एकच लहानसा निबंध इ.स. पूर्व  १४०० (ज्यौतिषम्) उपलब्ध आहे, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी सांगतात. त्यानुसार  ३६६ दिवसांचे एक वर्ष आणि ५ वर्षांचे एक युग असे आहे, तर चतुर्युग २० वर्षांचा आहे. त्या जागी ४,३२,००० वर्षाचा एक चतुर्युग असे मांडले गेले आणि वेदांग ज्योतिष नष्ट झाले. इसवी सनानंतर पुराणांचा प्रसार झाला. माहितीला बेलगाम व अतिशयोक्त अद्भुत रूप देण्याची प्रवृत्ती वाढली. परिणामी वेदांग ज्योतिष नष्ट झाले, अशी खंत शास्त्रीजी व्यक्त करतात.

पां. वा. काणे यांचे मत

भारतरत्न म. म. पां. वा. काणे यांच्या मते, “प्राचीन वेदकाळात आणि उपनिषदांसारख्या वेदग्रंथांच्या रचनेच्या काळापर्यंतदेखील कृत, त्रेता, द्वापर व कली हे शब्द, सृष्टीच्या निरनिराळ्या कालखंडांना अनुलक्षून वापरण्यात येतच नव्हते. एकूणच ‘युग आणि कल्प’ या कल्पनांचा उद्भव ख्रिस्तपूर्व चौथ्या अथवा तिसऱ्या शतकात झाला असावा आणि त्या कल्पना (फक्त) ख्रिस्ती सनाच्या आरंभीच्या शतकांमध्ये पूर्णपणे प्रस्थापित होईपर्यंत त्यात अनेक फेरबदल होत गेले असले पाहिजेत. याचा अर्थ असा होतो की, या युगकल्पना वेदरचित्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या नसून त्या गोष्टीबहाद्दर स्मृतिपुराणकारांनी रचलेल्या कल्पना आहेत.”

‘युग’ संकल्पनेचे स्वरूप लक्षात घेतले, तर ‘समकालीन’ असे काही नसते. ‘समकालीन’ ही संकल्पना थेट मोडीत निघते.

म्हणून, हे सारे असो, म्हणजेच नसो!!   

आपल्याला उपयुक्त आहे, तो सामाजिक दृष्टीने मोजता येणारा काल. त्यास आपण ‘सामाजिक काल’ म्हणू.

भाग ६

सामाजिक काल

सामाजिक काल म्हणजे व्यक्ती व समाज ज्या काळात जगत असतात, तो वास्तव काल. हा कालखंड आणि देशात असणारी राजकीय व सामाजिक व्यवस्था ही व्यक्तीच्या जीवनाची चौकट असते. थोडक्यात, स्थलकाल ही व्यक्तीच्या आणि समाजाच्या जगण्याची चौकट असते. या कालात असणे, त्या कालानुरूप जीवनाची वैचारिक मांडणी करणे म्हणजे समकालीन असणे. म्हणून,

“ ‘समकालीन’ याचा अर्थ जो कुणी ज्या काळात आणि ज्या देशात जगत असतो, त्या प्रत्येकाने त्याच्या अस्तित्वात असण्याच्या कालखंडातील विचारविश्वाशी व आचारविश्वाशी वैचारिकदृष्ट्‍या, तात्त्विकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या  सुसंगत नाते राखून असणे.”

या नात्याचे स्वरूप काय असेल?

तर याचे काही टप्पे पुढीलप्रमाणे सांगता येतील :

१) आत्मभान : आपण आपल्याच काळात जगत आहोत, भूतकाळात नाही आणि दिलेल्या विद्यमान काळाच्या चौकटीत राहून भविष्याची आखणी करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत, याचे भान स्वतःमध्ये विकसित करणे, यास ‘समकालीनत्वाची जाणीव’ म्हणता येईल.

२)  माझा समकाल : आता, माझा समकाल कोणता? तर “मी विसाव्या शतकात जन्माला आलो  आणि पुढेही आजच्या एकविसाव्या शतकात विद्यमान आहे, म्हणून विसावे-एकविसावे शतक हा माझा समकाल आहे. या कालखंडातील ‘भारत देशात देशात राहातो आहे. या समाजव्यवस्थेची मूल्यव्यवस्था स्वातंत्र्य, समता, बंधुता, समृद्धी या मूल्यांनी बनलेली आहे; ती वर्ण-जाति-लिंगभेद न मानणारी, कोणत्याही प्रकारचे शोषण न करणारी आहे, ‘लोकशाही समाजवादी सर्वधर्मसमभाववादी इहवादी भारत’ हे तिचे स्वरूप असून मला ती कायदेशीररीत्या व नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहे.”

हे माझ्या काळाचे स्वरूप आहे. इथे माझी जन्मतारीख ते माझी मूल्यव्यवस्था घडवणारी समाजव्यवस्था यांच्या उगम मला गृहीत धरला पाहिजे. यात गतकालाचा, पण फार प्राचीन नव्हे तर नजीकच्या गतकालाचा समावेश होईल. म्हणजे माझा जन्मकाल ते मी अस्तित्वात असण्याचा काल. समकालीनांमध्ये सर्व काळांतील गोष्टींची सरमिसळ असते. त्यामुळे निखळ 'समकालीन' म्हणजे नव्यानं अवतरलेलं आणि रुळलेलं जे काही असेल ते! घटित जर समकालीन असेल, तर जाणीवही समकालीन असते.

३) कालभानाचे पुरावे देणे : माझ्यात ‘समकालीनत्वाची जाणीव’ आहे, मी ‘समकालीन’ आहे एवढे म्हणून चालणार नाही, तर मी ते सिद्धही केले पाहिजे. ती माझी सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी  त्या भानाचे स्वतःला शक्य असलेले सर्व पुरावे व्यावसायिक भूमिकेतून देणे. जसे की, “मी भारतीय लोकशाही मानतो, वर्ण-जाति-लिंगभेद मानीत नाही” हे प्रत्यक्ष वर्तनातून प्रकट करणे. 

४) समाज भानाच्या दिशेने : माझ्यातील हे समकाल भान मी  इतरांमध्ये जागविणे म्हणजे समाज भान जागविणे.  केवळ मीच माझ्या आत्मभानात मग्न राहणे पुरेसे नाही, तर माझ्याबरोबर माझे सांगाती म्हणून मला इतरांनाही मी सोबत घेतले पाहिजे. माझी ‘समकालीनत्वाची जाणीव’ मी त्यांच्यात पोहोचवली पाहिजे. ही माझी नैतिक भूमिका असेल.

५) संवाद : माझी ‘समकालीनत्वाची जाणीव’ इतरांमध्ये प्रवाही करण्यासाठी त्या सह-जनांना समजेल अशा भाषेत मी ती संवादी करणे. याचा अर्थ असा की, या इतरांना  त्यांच्या काळाचे भान येईल, असे सर्व प्रयत्न करणे. इथे ‘त्यांच्या काळाचे’ याचा अर्थ ‘मी आणि ते’ एकाच काळात आहोत, याची जाणीव त्यांच्यात निर्माण करणे. अर्थात  त्यांनाही समकालीन बनविण्याचा प्रयत्न करणे.

६) संवाद सातत्य : पुढे त्यांनाही इतरांसाठी संवादी व आशयसमृद्ध बनवणे, त्यांची तशी तयारी करवून घेणे. असे नेहमी करत राहणे. शक्य असेल तर ‘संवादाची रित’ प्रस्थापित करणे. मग हा समकालीनांचा प्रवाह गतिमान आणि सहनिवासी समकालीन होण्याचा मार्ग मुक्त होईल. अस्सल ज्ञानात्मक समता प्रस्थापित होईल. “मी, प्रथम पुरुषी जे काही निर्माण करेन, जी काही माझी अभिव्यक्ती असेल, माझे व्यक्त होण्याचे माध्यम असेल ते सारे लेखन, कला, संगीत, नाट्य इत्यादी इतर समकालीनांच्या आकलनाच्या कक्षेत येईल. असे अन्य अभिव्यक्तीच्याही बाबतीत घडेल. तिया अभिव्यक्ती सर्वांसाठी समकालीन असेल.”

७) जाणिवेची पक्वता : या काळाशी मी संवादी असणे, इतरांना संवादात सहभागी करून घेणे, सर्वच जण संवादाच्या एकाच पातळीवर येणे, ही ‘समकालीनत्वाची जाणीव’ पक्व होण्याची अवस्था असेन. ‘समकालीनत्वाची जाणीव’ ही सामाजिक घटना आहे.

समकालीनांपुढील आव्हान : मूल्याधिष्ठित जाणीव

प्राचीन काळापासून जनसामान्यामध्ये पुराणे आणि दर्शने प्रभावी ठरली. तथापि पुराणे आणि दर्शने यांच्यात आणि त्यांनी मांडलेल्या तात्त्विक संकल्पनांमध्ये सुव्यस्थित तार्कीकदृष्ट्या फरक करणे आणि त्यांना एकमेकांपासून अलग करणे, हे ज्ञानात्मक काम झाले नाही. सतत त्यांच्यात सरमिसळ होत राहिली. विशेषतः त्या त्या प्रदेशातील भक्ति संप्रदायांनी आणि संत मंडळींना फरक करणे त्यांच्या ‘स्थलकाल आणि परंपरेचे उग्र दडपण’ यामुळे शक्य झाले नाही. परिणामी पुराणातील भाकड संकल्पना कोणती आणि दर्शनातील तार्किक संकल्पना कोणती, हे नेमके न कळल्यामुळे पुराणेच दर्शने म्हणून पुढे आली. त्यात युग कल्पना ठाशीव झाली.      

जन्म, पुनर्जन्म, आत्मा, कर्मसिद्धान्त, पापपुण्य, स्वर्ग-नरक या पुराणांमधील संकल्पना दर्शन व्यवस्थेत आरोपित होऊन त्या बेमालूमपणे मिसळून तात्त्विक बनल्या, सामान्य लोकांच्या जीवनाचा, त्यांच्या मानसिकतेचा भाग बनल्या. गांधींपर्यंत अनेकांनी वेदान्त, गीता, इत्यादी संत वचने प्रमाण मानल्याने या साऱ्या संकल्पना म्हणजे ‘समकालीन’तेला मोठी बाधा ठरली आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारतीय माणूस एकाच कालखंडात वेगवेगळे युगजीवन जगत असतो.

वस्तुतः ‘समकालीन’ हे त्या त्या समाजाच्या भूगोलाबरोबर आणि त्या त्या समाजातल्या आर्थिक आणि सामाजिक विभागण्यांशी मेळ घालून बघायला पाहिजे. एका काळामध्ये जगत असणाऱ्या निरनिराळ्या सामाजिक आणि आर्थिक अवकाशांतल्या, निरनिराळ्या राजकीय अवकाशांतल्या लोकांच्या धारणा आणि समजुती या वेगवेगळ्या असणार. विशेषतः भारतासारख्या देशामध्ये ज्या ठिकाणी अनेक काळामध्ये समाज एकत्रित जगतो आहे- आदिवासींपासून ते आत्ता आधुनिकोत्तर काळापर्यंत; त्यात एकमेव अशी जाणीव आहे, असं म्हणण्याला काही अर्थच नाही. त्याप्रमाणे अमेरिका, भारत, इंग्लंड, जपान आणि सीरियामधले पोस्टमॉडर्न हेही काही समकालीन किंवा एका जाणीवेचे असं म्हणण्याला अर्थ नाही.”

माझी समकालीनता  

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ म्हणजे केवळ विचारवंत, तत्त्ववेत्ते अथवा कलावंत यांचे नव्हे, तर त्यांच्यासह ‘विचारक्षमता शाबूत असणाऱ्या सामान्य नागरिकाचे समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था इत्यादीवर मत व्यक्त करण्याचे आणि योग्य प्रसंगी त्या व्यवस्था सामाजिक सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने बदलण्याच्या अहिंसक कृती करण्याचे स्वातंत्र्य’ असा अर्थ आहे. हा अर्थ अधोरेखित करता इथे एक माझ्या मते, वेगळाच नैतिक पेच उद्भवतो.               

तो असा की, विद्यमान विषम स्थिती आणि त्यातील माणसे, घटना यांना लेखांचे, लेखनाचे आशयद्रव्य म्हणून वापरायचे की ती स्थिती बदलायची? हा नैतिक निवडीचा भाग आहे. म्हणजे असे की, मला जर इतरांना समकालीन बनवायचे असेल, त्यांना माझ्याशी सुसंवादी करावयाचे असेल, तर त्यांना त्यांच्या आहेत त्या ‘स्थितीशील’ वास्तवातून बाहेर काढले पाहिजे.

पण मग, माझे लेखनाचे आशयद्रव्य हरपेल. जर आशयद्रव्य टिकवायचे असेल, तर ते समकालीन होणार नाहीत, मी एकटाच समकालीन राहील. त्या वेळी मला रसिक, वाचक, परीक्षक लाभणार नाहीत. मी जर आशयद्रव्य आहे तसेच टिकवून मीच एकटा समकालीन बनलो, तर ते क्रूर होईल! मग ‘समकालीनतेचा प्रवाह’ गतिमान राहणार नाही. सामाजिक सुधारणा होणार नाही.

याचा अर्थ असा की, मी माझा समकालीन राहणार नाही. कारण मी समकालातील मूल्यव्यवस्था अमलात आणत नाही! ती आणायची तर ‘समकालीन असणे’ ही सर्वांचा सहभाग असणारी सामाजिक व्यवस्था मला प्रवाहित करणे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे.  

ही मांडणी कोणत्याही काळात लागू पडेल, ही तिची शक्ति आहे. तिचे ते स्वरूप आहे. या मांडणीत आणखी सुधारणा करता येतील, याची मला जाणीव आहे. ही मांडणी खुली आहे. मी ही केवळ प्रस्तावना करत आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘धर्म, राजकारण आणि अन्य प्रश्नांचा धांडोळा’ : आसपासच्या उलथापालथीने अस्वस्थ होणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आस्थेच्या प्रश्नांची चर्चा करणारे हे पुस्तक आहे...

गेल्या दहा वर्षांत याबाबत विरोधाभासाचे राजकारण होतेय, ते प्रतिमांच्या व्यक्तिकेंद्रित आभासात जनमानसाच्या लक्षातच येत नाही, ही चिंतेची बाब आहे. पोकळ घोषणांच्या झुल्यावर झळकणारे समाजमन भव्य दिव्य सूचित करण्याचा आभासीकेत अडकले आहे. बधीर झाले आहे. धार्मिक उन्मादात सामाजिक ताणतणाव वाढत आहेत. धार्मिक प्रदूषणाला नैतिकतेच्या आवरणाखाली धर्मभोळेपणाचा राजकीय मुलामा देऊन वाटचाल सुरू आहे.......