अजूनकाही
मराठीतले विद्यमान ज्येष्ठतम समीक्षक आणि वाङ्मय-संस्कृतीचे चिंतक डॉ. सुधीर रसाळ सर येत्या १० ऑगस्टला वयाची नव्वदी पार करत आहेत. निगर्वी आणि सालस विद्वत्ता हे रसाळ सरांच्या व्यक्तिमत्त्वाचं लेणं आहे. बेट मारून सांगतो, ‘डोकं ठेवावं असे पाय असणारी माणसं आता उरलेली नाहीत,’ असं सभेतलं हमखास टाळ्या घेणारं विधान करणाऱ्यानी एकदा रसाळ सरांना भेटावं. ते नक्कीच नकळतपणे रसाळ सरांसमोर नतमस्तक होतील.
.................................................................................................................................................................
नुकताच रसाळ सरांना भेटून आलो. (सोबतचं छायाचित्र याच भेटीत ‘शूट’लं आहे.) रसाळ सर म्हणजे डॉ. सुधीर नरहर रसाळ. मराठीतले विद्यमान ज्येष्ठतम समीक्षक. वाङ्मय-संस्कृतीचे चिंतक. निगर्वी आणि सालस विद्वत्ता हे रसाळ सरांच्या व्यक्तिमत्त्वाचं लेणं आहे. बेट मारून सांगतो, ‘डोकं ठेवावं असे पाय असणारी माणसं आता उरलेली नाहीत,’ असं सभेतलं हमखास टाळ्या घेणारं विधान करणाऱ्यानी एकदा रसाळ सरांना भेटावं. ते नक्कीच नकळतपणे रसाळ सरांसमोर नतमस्तक होतील. त्यांच्या भेटीनंतर आपल्या आकलनाच्या कक्षा उजळलेल्या असतात, हा अनुभव नेहमीचाच असतो.
तब्बल ३७ वर्षं मराठी साहित्य आणि भाषेचं अध्यापन केलेल्या रसाळ सरांचा मी विद्यार्थी नव्हतो; त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी संशोधनही केलेलं नाही. संशोधन करण्याचा मुद्दाच माझ्या पत्रकारिता या व्यवसायानं उपस्थित होऊ दिला नाही, कारण शास्त्रीय संशोधनाला लागणारी चिकाटी आणि गांभीर्य पत्रकारितेत नसतं; या निकषांवर पत्रकारिता ‘उठवळ’ या सदरात मोडणारी असते. थोडक्यात, त्यांचा विद्यार्थी किंवा संशोधक व्हावं, असा एकही गुण माझ्यात नव्हता. तरी मला सुमतीवहिनी आणि रसाळ सर या दाम्पत्याचा लोभ, ममत्व गेली चार दशकं मिळालं आहे.
माझ्या बेगमच्या मृत्यूनंतर त्या ममत्वात वाढच झाली आहे. त्यांच्या घरी गेलं की, अजूनही वाटीत काही तरी खाऊ आणि चहा दिल्याशिवाय सुमती वहिनी सोडत नाहीत. असे अनेक जण भेटल्यामुळेच ‘डोकं ठेवावं असे पाय असणारी माणसं आता उरलेली नाहीत’, अशी भ्रांत मला आजवर कधी पडलेली नाही. न बोलता आपल्या पाठीवर कायम हात ठेवत धीर देणारी एक थोरली पाती घरात असते, तशी रसाळ सरांबाबत माझी भावना आहे, अर्थात तशी भावना तर त्यांच्या सहवासात येणाऱ्या अनेकांची असणार.
आप्त आणि मित्रजन त्यांना ‘बापूसाहेब’ म्हणतात, पण मी मात्र ती सलगी कधीच साधू शकलो नाही, त्याचं कारण त्यांच्या विद्वत्ता निगर्वी तेज आणि त्यांच्या स्वभावातलं सालसपण असणार.
रसाळ सर सर्व वाचतात. खरं तर त्याला ‘वाचन-यज्ञ’ म्हणायला हवं. ‘वाचन-तुच्छता’ त्यांच्यात नाही. त्यांच्यात ‘वाचन-सहिष्णुता’ इतकी वैपुल्यानं आहे की, माझंही लेखन ते वाचतात. माझं प्रत्येक पुस्तक मी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी त्यावर पुढच्या भेटीत अभिप्रायही दिलेला आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, एखादा प्रज्ञावंत किती सोशीक, निगर्वी असतो, याचं माझ्या तरी पाहण्यातलं रसाळ सर हे एक उदाहरण आहे.
सरांचा जन्म वैजापूरचा, पण त्यांचं मूळ गाव औरंगाबादच्या आता कवेत आलेलं गांधेली. ‘गांधेलीला कांही असेल नं?’ (इथे ‘कांही’ मध्ये मला मालमत्ता अपेक्षित होतं) या प्रश्नाला उत्तर देताना रसाळ सर म्हणाले, ‘गांधेली मी सोडलं १९५२ साली. तेव्हा शेती, वाडा होता. गेलं ते सगळं तेव्हाच. आता हेच १९७९ साली बांधलेलं घर आमचं आहे.’ रसाळ सर येत्या १० ऑगस्टला वयाची नव्वदी पार करत आहेत, पण त्यांची स्मरणशक्ती एकदम ठणठणीत आहे. ते कुठलाही संदर्भ वर्ष, महिना, वार यासकट देतात.
रसाळांचे वडील नरहरराव रसाळ हे महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव असणारे शिक्षक. रसाळ सर म्हणाले, ‘घरी दोन चरखे होते. त्यापैकी एक पेटीवाला होता; प्रवासात तो त्यांच्या सोबत असे. आम्हाला सर्वांनाच दररोज सूत कातावं लागे.’ तोच गांधीवादी शिक्षकी वारसा रसाळ सरांकडे आला आणि अत्यंत निष्ठेनं त्यांनी तो ३७ वर्षं निभावला. खूप वर्ष ते औरंगपुऱ्यातील घरून सिटी बसनं विद्यापीठात जात आणि याही प्रवासात त्यांचं वाचन सुरू असे.
मध्यम आणि किंचित स्थूल शरीरयष्टी, पूर्ण बाह्याचा बुशशर्ट, पॅन्ट, पायात चपला आणि हातात पुस्तकं असं कुणी दिसलं, तर ते सुधीर रसाळ, असं समीकरण त्या काळात होतं. नंतर पुढच्या काळात स्कूटर आली, एवढंच काय तो बदल.
शिकवण्यासोबत रसाळ सर रमले, ते समीक्षा आणि साहित्य संस्थात्मक कामात. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय महामंडळ, साहित्य संमेलनात ते वावरले. अनंतराव भालेराव, भगवंतराव देशमुख, पाध्ये, नानासाहेब चपळगावकर यांच्यात रसाळ सर रमले. मराठी साहित्य प्रांतीचा १९६० नंतरच्या पडद्याआडही घडलेल्या घटनांचा बिनचूक संदर्भ म्हणजे सुधीर रसाळ आहेत. ‘हा किस्सा नाही, आठवण आहे’ किंवा ‘ही हकीकत आहे बरं का’ असं म्हणत रसाळ सर मग त्यात रमून जातात.
सुधीर रसाळ आणि नरेंद्र चपळगावकर यांच्या मैत्रीनं वयाची साठी पार कधीच केली आहे. ते दोघं साहित्य क्षेत्रात अनेकदा वावरलेलही जोडीनंच. एकदा का त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या की, खूप काही नवी माहिती मिळते, आठवणींचा पाऊस येतो. त्यात कधी गप्पांची खुमारी वाढवणारा खट्याळपणा असतो, एखादी वाङ्मयेतर रंगिली आठवण असते; आपल्यासाठी अज्ञात असणारे अनेक सामाजिक संदर्भ त्या बोलण्यात येतात, पण एक मात्र शंभर टक्के खरं, त्यात कुणाची बदनामी नसते आणि त्या वावड्या तर मुळीच नसतात. आपलं काम केवळ त्या मनमुराद गप्पात भिजून जाणं आणि आपल्याला पाहिजे तेवढं ‘मेमरी’त टाकत जाणं एवढंच उरतं.
.................................................................................................................................................................
“मराठी समीक्षा अजून बाल्यावस्थेतच आहे, असे मला वाटते. लहान मूल जसे मोठ्याचे बोट धरून चालते, तसे आपली समीक्षा पाश्चात्य समीक्षेचे बोट धरून चालते.” - सुधीर रसाळ, संवाद - प्रा. अविनाश सप्रे
https://www.aksharnama.com/client/article_detail/5068
“महाराष्ट्राची एकच वाङ्मयीन परंपरा आणि वाङ्मयाभिरुची असली पाहिजे. ती निर्माण करायची असेल तर ग्रामीण भागाचं १०० टक्के साक्षरीकरण आणि आधुनिकीकरण झालं पाहिजे.” - सुधीर रसाळ, संवाद - प्रा. अविनाश सप्रे
https://www.aksharnama.com/client/article_detail/5067
रसाळ सर एखाद्या कवीवर लिहिताना स्वच्छ कापूस पिंजावा, तसा तो कवी आपल्या समोर पिंजून ठेवतात. परिणामी तो कवी स्वच्छपणे कळत जातो... - इंद्रजित भालेराव
https://www.aksharnama.com/client/article_detail/5941
.................................................................................................................................................................
एकदा मी रसाळ सरांना विचारलं, ‘मराठी कवितेची तुम्ही इतकी मोठी मूलगामी समीक्षा लिहिली, पण आपण कविता लिहावी, कथा लिहावी असं कधी वाटलं नाही का?’ त्यावर शांतपणे रसाळ सर म्हणाले, ‘कविता नाही लिहिली. लिहावीशीही वाटली नाही कधीच. मात्र, फार पूर्वी चार-पाच कथा लिहिल्या आणि त्या तेव्हा प्रकाशितही झाल्या. मग समीक्षेच्या वाटेकडे वळलो आणि त्याच वाटेवर चालत राहिलो.’
रसाळ सर बोलताना आणि लिहिताना आक्रमक होत नाहीत, पण जे सांगायचं ते थेट आणि स्पष्टपणे सांगायला मुळीच कचरत नाहीत; त्याअर्थानं ते निर्भय आहेत. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या ‘या स्पष्ट समीक्षेमुळे कुणी कवी-लेखक नाराज नाही झाला का?’ या प्रश्नाला उत्तर देताना रसाळ म्हणाले, ‘नाराज झाले की काही कवी आणि लेखक. पण अपवाद म्हणूनही माझ्याकडे कुणी बोलले नाही. त्यांची नाराजी मात्र नक्कीच माझ्यापर्यंत आली. एक मोठे कवी समोर आल्यावर न बोलता मान वळवून चालते झाले पण हे चालणारच.’
‘समकालातील बहुसंख्य समीक्षा बरीच आत्मस्तुतीपर आणि अनेकदा तर उथळही भासते, असं मला वाटतं, ते बरोबर आहे का?’ या प्रश्नाला उत्तर देताना रसाळ सर म्हणाले, ‘गटबाजी जास्त आली आहे समीक्षेत. कुणाला तरी खूष करण्याकडे कल वाढला आहे.’
‘सर, तुम्हाला कधी औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) सोडून मुंबई-पुण्याला जावंसं वाटलं नाही का?’ या प्रश्नाच्या उत्तरात एक पॉज घेऊन रसाळ सर म्हणाले, ‘वाटलं होतं की! मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदासाठी मी अर्ज केला होता. मुलाखतीसाठी बोलावणंही आलं होतं. मुलाखतकर्त्यांनी माझी अर्धा तास वाट पाहिली, पण मी नाही गेलो.’
‘का नाही गेलात?’
रसाळ सर म्हणाले, ‘एक तर अनंतरावांनी (अनंतराव भालेराव) मोडता घातला. ते म्हणाले, ‘कशाला जातोस मुंबई-पुण्याला? हे गाव काय चांगलं नाही? दुसरं म्हणजे या शहराचा मला लळा लागला होता. मग नाही गेलो हे शहर सोडून.’
नव्वदीतही रसाळ सर व्यासंगमग्न आहेत. सकाळी साडेआठ ते साडेबारा, दुपारी दोन ते साडेचार आणि संध्याकाळी साडेसहा ते रात्री साडेआठ ही त्यांची साधारणपणे दररोजची लेखनाची वेळ असते. लेखन सर स्वत: ‘टाईप’तात. (त्यांचा की बोर्ड ‘मतनक’ आहे आणि ते श्रीलिपीत ‘टाईप’तात) त्यासाठी रसाळ सर संगणकावर लेखन करण्याची कला वयाच्या साठीत शिकले. त्यांची कॉपी एकदम नेटकी. मुद्रणासाठी अंतिम कॉपी कशी बिनचूक असावी, याचा आदर्श म्हणजे रसाळ सरांची कॉपी. लेखनासोबत वाचनही सुरू असतंच.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
वयाची, वयोमानपरत्वे आलेल्या व्याधींबद्दल कुरकुर करताना आजवर तरी सरांना मी कधी पहिलं नाही. एवढ्या लांब जगण्यात काही वाईट अनुभव आले असणार, काही खुज्या उंचीची आणि किरट्या वृत्तीची माणसं भेटली असणारच, पण कधी त्याविषयी उणा शब्द रसाळ सरांच्या तोंडून ऐकायला मिळालेला नाही.
वयाची नव्वदी पार करणाऱ्या रसाळ सरांना अजूनही खूप लिहायचं आहे. काही व्यक्तिचित्र त्यांच्या मनात आहेत. अध्यापनाच्या काळातील अनुभव सांगायचे आहेत. काही आठवणीही लिहायच्या आहेत. ‘बघू यात, वय कसं साथ देतं ते,’ असं रसाळ सर त्यावर म्हणतात.
सरांचं आयुष्य म्हणजे अविरत वाङ्मयाभ्यासाची एक सरळ, विस्तीर्ण न संपणारी वाट आहे. वाङ्मय संस्कृतीबद्दल चिंतन करत त्या वाटेवर व्रतस्थपणे सर चालत आहेत. ते चालणं डौलदार, ऐटबाज आहे आणि म्हणूनच आपल्याला स्तिमित करणारं आहे.
रसाळ सरांना मी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार? त्यांच्यापेक्षा वयानं तब्बल २१ वर्षांनी आणि कर्तृत्वानं, तर २१०० पट मी लहान आहे. आजवर त्यांचा राहिला तसा पाठीवरचा हात आणि आशीर्वाद यापुढेही कायम राखावा, हेच शतकी प्रवासाला निघालेल्या रसाळ सरांकडे मागणं आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment