‘मागे वळून पाहताना’ : एका अतिशय यशस्वी डॉक्टरांच्या तितक्याच समृद्ध जीवनाची रोचक आत्मकहाणी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अनंत देशमुख
  • ‘मागे वळून पाहताना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 27 July 2024
  • ग्रंथनामा शिफारस मागे वळून पाहताना Mage Valun Pahtana पांडुरंग सोनवणे Pandurang Sonwane

पुण्याला ‘पेबल्स २’मध्ये राहायला आल्यावर अनिल रणदिवे या माझ्या मेव्हण्यांनी माझा त्यांच्या मॉर्निंग वॉकमधील ज्येष्ठांशी परिचय करून दिला. त्यांच्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रांतील बुजुर्ग म्हणता येईल असे. त्यांच्यापैकी एक डॉ. पांडुरंग सोनवणे.

त्यांचा जन्म १९५० सालचा. माणदेशातील म्हसवड इथला. त्यांनी निवृत्तीनंतर अलीकडेच ‘मागे वळून पाहताना’ हे आत्मचरित्र लिहिले. एके दिवशी ते त्यांनी माझ्या हातावर ठेवले.

जुन्या काळातील आमदार नामदेव व्हटकर हे सासरे, तर ‘बहात्तर मैल’चे लेखक प्रभाकर व्हटकर हे आप्त. साधारण १९५०पासून २०२०पर्यंतच्या घटनांचे तपशीलवार चित्रण त्यात आढळते.‌ हे एका डॉक्टरांचे आत्मचरित्र असले तरी त्यांच्या व्यक्तित्त्वाला आणखी काही पैलू आहेत. मुळात त्यांना अध्यापन करणं, व्याख्यानं देणं, सूत्रसंचालन करणं, गाणी गाणं यात विलक्षण रस. पुढे सांस्कृतिक कार्यक्रमात पत्नी भारतीसोबत युगुलगीतं गाण्यात ते रममाण होतात. त्यांच्या कलाप्रेमाची परिणती त्यांची मुलगी दीप्ती ही कलावती होते आणि विविध सिरियल्समध्ये चमकते, यात होते.

डॉक्टरांना ज्या प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभली, तीही महत्त्वाची आहे. सर्वसामान्य घरात असते, तशी गरिबी वा दैन्य त्यांनी पाहिले नाही. याचे कारण म्हणजे त्यांचे आजोबा. ते काही फार शिकलेले नव्हते, पण जगण्याची दृष्टी स्वच्छ आणि स्पष्ट होती. जुन्या काळातील वाडा आणि माणसे त्यांनी सांभाळली होती. त्या काळात आपल्या नातवाने डॉक्टर व्हायला हवे, हे स्वप्न त्यांनी पाहिले. शिक्षणाचे मोल त्यांनी नेमके हेरले. म्हणून खांद्यावर एका बाजूला नातू आणि दुसऱ्या बाजूला त्याचे दप्तर असे ते शाळेपर्यंत वाहत. नातवाने शाळेत चांगली उत्तरे दिली तर बक्षीस म्हणून त्याच्या हातावर पैसे ठेवले, तर त्याला अभ्यास करायला हुरूप येईल, हे मानसशास्त्र त्यांनी ध्यानात घेतले आणि शिक्षकांकरवी ते करवून घेतले. त्यामुळे लहान पांडुरंगच्या मनावर त्याचा अनुकूल परिणाम झाला.

डॉ. सोनवणे यांना ते ज्या भूमीतून लहानाचे मोठे झाले, तिच्याबद्धलचे प्रेम. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर ते तिथे स्वत:ची शेती विकसित करतात, आपल्या गावात, गावाशेजारी दवाखाना काढून रुग्णसेवा सुरू करतात. आजोबांबरोबर वडील, मुलाणी गुरुजी, देशपांडे गुरुजी यांचेही त्यांच्या बालपणात फार मोठे संस्कार झाले आहेत. मुलाणी गुरुजींनी घेतलेल्या रात्रीच्या कंदिलाच्या प्रकाशातील वर्गाचा लाभ लहान पांडुरंगला झाला. ते सातवी पास होऊन आठवीला गेले, तेव्हा मुलाणी गुरुजींचं त्यांच्यावरील प्रेम आणि त्यानं शिकावं म्हणून घेतलेले परिश्रम कौतुकास्पद. तो सातवी पास होतो, तेव्हा त्यांनी पाठवलेले छोटेसे परंतु अत्यंत स्नेहार्द्र पत्र महत्त्वाचे आहे. मुलाणीगुरुजींइतकंच देशपांडे गुरुजी यांनीही पांडुरंगला संस्कृत पाठांतराचे धडे दिले.

आत्मचरित्राचा पूर्वार्ध हा पांडुरंग एमबीबीएस आणि वडीलही होतो इथे संपतो. तो अधिक संघर्षपूर्ण, अधिक रोचक झाला आहे. एका आजोबांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांचा नातू किती पराकाष्ठेचे प्रयत्न करतो, त्याला आई, वडील, शिक्षक आणि सहाध्यायांचे कसे सहकार्य मिळत जाते, याचे प्रत्ययकारक आणि उत्कंठावर्धक चित्रण तिथे आढळते.

‘पुस्तकातला कीडा’ म्हणून आपण कसा मन:पूर्वक अभ्यास केला याचे डॉ. सोनवणे जसे तपशीलवार वर्णन करतात, तसेच पुढे एमबीबीएसला प्रवेश घेतल्यापासून तो शेवटची परीक्षा पास होईपर्यंत कसा कसोटीचा काळ होता आणि एकेक पेपर उत्तीर्ण होताना कशी अडथळ्यांची शर्यत आपल्याला पार करावी लागली, हेही ते बारकाईने रंगवतात. कॉलेजमधली रॅगिंगची प्रथा, विद्यार्थ्यांनी लावलेली चित्तथरारक स्पर्धा, स्वत:चे आणि वडीलधाऱ्यांचे आजार, स्वत:चे अपघात, या विषयी त्यांनी उत्कटतेने लिहिले आहे.

केवळ आजोबांच्या इच्छेखातर एमबीबीएसचा अभ्यास चालू असतानाच मुली पाहायला डॉ. सुरुवात करतात. आणि या प्रयत्नात कोल्हापूरचे प्रसिद्ध समाजसुधारक, नेते आणि आमदार नामदेवराव व्हटकर यांची कन्या भारती त्यांना आवडते आणि तिच्याशी लग्न करण्याचे निश्चित होते. परंतु प्रत्यक्ष लग्नाला वेळ लागल्याने दरम्यानच्या काळात त्यांचे प्रेम फुलते. तिथेच एक छुपी प्रेमकहाणीही फुलताना आढळते.  त्या काळातल्या त्यांच्या आणि पत्नीच्या पत्रव्यवहाराची नोंद त्यांनी केली आहे. वस्तुत: त्यांच्या दैनंदिनी लेखनाच्या शिरस्त्यानुसार त्यांनी ती जतन करून  ठेवली असणार. तशी ती असतील, तर त्याचेच एक छोटेखानी पुस्तक करायला हरकत नाही.

त्यांचे सासरे नामदेवराव यांचे संबंधही दाट प्रेमाचे राहिले. तथापि सासरा आणि जावई यांच्यात अधूनमधून काही रुसव्या-फुगव्याचे प्रसंगही निर्माण होत. त्यांचेही चित्रण डॉ. सोनवणे यांनी केले आहे. त्यांनी वेळेत एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण करावी ही सासऱ्याची अपेक्षा ते काही कारणांनी पूर्ण करू शकत नसत. शिवाय ज्या मुलींची स्थळं त्यांनी नाकारली त्यांचे नातेवाईकही सासऱ्यांना काही ना काही सांगत. म्हणून सासरे रागावत. उलट ते परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे कळताच अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने ते मिठी मारतात.

डॉ. सोनवणे हे मूळचे म्हसवडचे. पण डॉक्टर म्हणून सुरुवातीलाच त्यांची नेमणूक सावंतवाडीला झाल्यावर सावंतवाडीसारख्या लांबवरच्या ठिकाणापेक्षा घरा-गावापासून जवळ असलेल्या साताऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये नेमणूक होण्यासाठी आपण का प्रयत्न केले नाहीत, असे त्यांनी आपल्या सासऱ्यांना विचारणे जितके स्वाभाविक, तितकेच ‘सावंतवाडी हा कोकणचा परिसर आहे. तिथली माणसंही प्रेमळ आहेत, म्हणून तिथे राहा’, असे सासऱ्यांनीही त्यांना दिलेले उत्तर समर्पक वाटते. पुढे काही वर्षे गेल्यावर ‘अन्यत्र तुम्हांला बदली हवी का?’ असे सासरे विचारत, तेव्हा त्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितल्याची नोंद त्यांनी केली आहे.

प्रारंभीच सावंतवाडी येथे त्यांची नेमणूक झाल्यावर ‘एक उत्तम डॉक्टर, मनमिळावू माणूस’, ‘उत्तम शिक्षक चांगला डॉक्टर’ म्हणून त्यांचा नावलौकिक झाला आणि ते ब्रीद त्यांनी सेवेत असेपर्यंत जपले. सावंतवाडीच्या महाराजांचा अणि तिथले आमदार सावंत यांचा त्यांना प्रेमळ सहवास मिळाला आणि सहकार्यही लाभले. कोकणातील निसर्ग, तिथली मासेमारी, तिथली माणसे यांनी त्यांना आपलेसे करून घेतले. इतकेच नव्हेतर कलंबिस्त या सावंतवाडीपासून तासभराच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी त्यांनी क्लिनिक काढून तिथल्याही रुग्णांची सेवा करण्याची संधी घेतली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पुण्याचे डॉ. संचेती हे डॉक्टरांचे गुरू. त्यांचे मार्गदर्शन आणि उत्तेजन डॉक्टरांना नेहमी मिळाले. आपल्या वडिलांना गरज पडली तेव्हा आणि त्यांना स्वत:लाही डॉ. संचेती यांच्याडून उपचार करवून घेण्याचे प्रसंग आले. एका अर्थाने डॉ. संचेती हे त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरकशक्ती राहिले. कॉटेज हॉस्पिटल, सिंधुदुर्ग, पोलीस हॉस्पिटल, सातारा, रेल्वे पोलीस रुग्णालय, खडकी, पोलीस रुग्णालय, शिवाजी नगर (पुणे), आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, औंध, ससून जनरल हॉस्पिटल, पुणे, कलंबिस्त (१८५) या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर आणि वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ते क्रियाशील राहिले. या शिवाय आदिवासी भागांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवणे, शासकीय सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सहाय्यकांना प्रशिक्षण देण्याचे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. विविध शिबिरे त्यांनी घेतली.

त्यांचे स्वत:चे लग्न, त्यांच्या बहिणींची लग्नं, वडिलधाऱ्यांचे आजार, काहींचे मृत्यू, मुलांचे, जन्म, शिक्षण, विवाह, नातवांचे जन्म, मुलांनी आपापल्या कर्तबगारीवर सिद्ध केलेले असाधारण कार्य, मिळवलेली प्रसिद्धी आणि मानसन्मान (डॉ. अभिजीत यांनी ‘डॉक्टर्स फॉर बेगर्स’ म्हणून केलेले जागतिक मान्यता मिळालेले असाधारण कार्य, सूनबाई डॉ. मनीषा यांचं ‘योग उपचार तज्ज्ञ’ म्हणून कार्य याविषयी त्यांनी भरभरून लिहिले आहे. मुलगी दीप्ती यांनी अभिनेत्री म्हणून सिद्ध केलेले कर्तृत्व आणि दुसरा मुलगा ॲड. अमित हे आंतरराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असणं, धाकट्या सूनबाई पूर्णिमा यांचं नर्सरी स्कूलमधील योगदान.)

त्यांना कला, कलावंतांविषयी अतीव प्रेम. मराठीतील लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर, निळू फुले, रमेश देव, रामदास फुटाणे, अलका कुबल, अमृता सुभाष, शर्वरी जमेनीस, माया जाधव, सुरेखा कुडी या कलावंतांच्या सहवासात ते रमतात. तर सुशीलकुमार शिंदे, डॉ. कोळवेकर यांची वेधक चित्रे त्यांनी काढली आहेत.

आपली जमीन परत मिळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, घरावर पडलेला दरोडा आणि झालेली चोरी, नातेवाईकाने फ्लॅट परस्पर विकणे, थकित दूधबील स्वत: भरणे, म्हसवडची यात्रा, गणपती उत्सव, सिंहगडावरील ट्रीप याविषयीही त्यांनी लिहिले आहे. सारांश, मागे वळून पाहताना हे एका अतिशय यशस्वी डॉक्टरांच्या तितक्याच समृद्ध जीवनाची रोचक आत्मकहाणी आहे.

‘मागे वळून पाहताना’ - डॉ. पी. डी. सोनवणे

शिवस्पर्श प्रकाशन, पुणे | पाने – ४०८ | मूल्य – ५०० रुपये.

.............................................................................................................................................

लेखक अनंत देशमुख समीक्षक, संपादक आहेत.

dranantdeshmukh@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......