अजूनकाही
आज म्हणजे, २७ जुलैला सकाळी नानासाहेबांना भेटायला गेलो. वयाच्या ८७व्या वर्षी त्यांच्यात असलेली ऊर्जा आणि लेखन-वाचनाची ऊर्जा अनुभवून स्तंभित होऊन बाहेर पडलो.
नानासाहेब म्हणजे लेखक, गोखले आणि आगरकर यांच्या विचारांच्या वाटेवर चालणारे विचारवंत, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, वर्ध्याला झालेल्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, लोकशाहीचे संवेदनक्षम चिंतक, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर निष्ठा असणारे राजकीय आणि सामाजिक भाष्यकार, चिकित्सक वाचक असलेले नरेंद्र चपळगावकर.
काही वैद्यकीय चाचण्या आटोपून नानासाहेब नुकतेच मुंबईहून औरंगाबाद-छत्रपती संभाजीनगरला परतले आहेत. त्यामुळे नानासाहेब थकलेले असतील, कदाचित त्यांच्या तोंडून निराशेचा एखादा का होईना स्वर उमटेल, असं वाटणं मनाला स्पर्शून गेलेलं होतं, पण प्रत्यक्षात मीच ‘चार्ज’ होऊन बाहेर पडलो.
नानासाहेब चपपळगावकर यांच्याशी माझी असलेली नाळ जुनी आहे. दूरवरून आम्ही नात्यात आहोत, असं आमच्या भावकीत म्हटलं जातं. बीड हा आमच्यातला समान दुवा आहे. नानांच्या अफाट परिवारातल्या अनेक जणांशी माझाही निकटचा संपर्क आलेला आहे. त्यात राजकारणी जसे आहेत, तसेच पत्रकार, संपादक, नामवंत लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.
आणखी एक नाळ ‘लोकसत्ता’ आहे. नानासाहेब ‘लोकसत्ता’चे वार्ताहर होते आणि पत्रकारिततेली माझी २९ वर्षांची कारकीर्द याच वृत्तपत्रातली आहे. आता सांगूनच टाकतो, संपादकीय लेखन सुरू केल्यावर सुरुवातीच्या काळात मला नानासाहेबांचं सक्रिय सहकार्य मिळालेलं आहे. ‘लोकसत्ता'तील माझा पहिला वृत्तवेध नानासाहेबांनी ‘डिक्टेट’ केलेला आहे!
स्मरणशक्ती ठणठणीत शाबूत असल्यानं नानासाहेबांशी गप्पा मारणं हा एक नेहेमीच आनंददायी आणि आपल्या आकलनाच्या कक्षा उजळवणारा अनुभव असतो. असंख्य आठवणी आणि हकीकती, किस्से एका पाठोपाठ अलगद उलगडत जातात. त्यात राजकारण असतं, समाजकारण, न्यायव्यवस्था, साहित्य आणि त्या क्षेत्रात वावरणारे नामवंत असतात. त्या कथनाच्या उजळलेल्या लक्षलक्ष दिव्यांच्या प्रकाशात आपण चिंब होतो. नानासाहेबांचं, वाचन आणि अनुभव विश्व किती ऐश्वर्यशाली, हे अनुभवून स्तिमित होणं एवढंच आपल्या हातात उरलेलं असतं.
नानांसाहेबांचा व्यासंग आपल्या आकलनाच्या कवेत येणारा नाही. मराठी, इंग्रजी, हिंदी असं त्यांचा संचार आहे, तसाच त्यांचा बहुपेडी संपर्कही आहे. गाठीशी इतकी विद्वत्ता असूनही त्यांच्यात ज्ञानताठा जराही नाही. त्यामुळे ते आपले कुणी वडीलधारी आहेत, ही जाणीव सुखावणारी असते. पुन्हा सांगतो, मोहरीएवढ्या ज्ञानाचा आभाळभर अहंकार असणारे/मिरवणारे पायलीला पन्नास भेटले; ताठा नसणारे नानासाहेबांसारखे ज्ञानी फारच दुर्मीळ असतात, हे साडेचार दशकं पत्रकारितेत घालवताना शेकडोंना भेटल्यावर चांगलं लक्षात आलेलं आहे.
नानासाहेबांना विचारलं, ‘हा प्लॉट केव्हा घेतला होता,’ तर त्यांनी घडघडा सर्व माहिती दिली- ‘१९७६ साली. १३ रुपये फूट दरानं. घर बांधायला सात लाख रुपये खर्च आला. त्यापैकी दोन लाख रुपये सारस्वत बँकेनं कर्ज दिलं. उरलेले इकडूनतिकडून उभे केले’, अशी स्मरणशक्ती लख्ख. या घराबद्दल माझं एक निरीक्षण असंही आहे- या घरात दर आठ-दहा महिन्यानंतर काही ना काही ‘डागडुजी’ सुरू असते आणि ती नानासाहेबांच्या कल्पनेतून साकारत असते!
पुस्तक किंवा एखाद्या वस्तूबद्दलही असंच असतं. पुस्तक कोणत्या कपाटाच्या कोणत्या कप्प्यात आणि बहुदा डावी किंवा उजवीकडून कितव्या स्थानी आहे, हे नानासाहेब नेमकं सांगणार. एखाद्या वस्तूबद्दलही नेमकेपणा हा असाच असतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
‘काय लिहिताय सध्या?’ या माझ्या विचारण्याला उत्तर देताना नानासाहेब म्हणाले, ‘लोकशाही आणि हुकुमशाही हे पुस्तक नुकतंच पूर्ण झालंय. छपाईला गेलंय. येईल आता दोन-तीन महिन्यांत हाती. राजहंस प्रकाशन प्रकाशित करतं आहे, हे पुस्तक.’
‘आता नवीन काय? डिक्टेशन देता का अजून?’ मी विचारलं तर नानासाहेब उत्तरले, ‘हो, देतो की. पण सध्या डिक्टेशन घेणारे गृहस्थ येत नाहीयेत काही वैयक्तिक अडचणींमुळे. ते आले की, सुरू करू पुन्हा लेखन.’
‘वाचन सुरू आहे का?’ हे विचारल्यावर नानासाहेबांनी पलंगाच्या उशाशी असलेल्या टेबल लॅम्पकडे बोट केलं आणि म्हणाले, ‘अशातच सुधीर रसाळ यांची दोन-तीन पुस्तकं पुन्हा वाचली. तुमचं (म्हणजे साक्षात अस्मादिकांचं!) पत्रकारितेच्या अनुभवावरचं पुस्तक – ‘लेखणीच्या अग्रावर’ - पुन्हा वाचलं. (इकडे अस्मादिकांची कॉलर मनातल्या मनात ताठ झाली नसती, तर तो दांभिकपणा होता.) वाचायचा काहीच त्रास नाही. वाचत असतो. वाचनाशिवाय दुसरं करणार तरी काय?’
‘टीव्ही नाही बघत?’ विचारल्यावर नानासाहेब म्हणाले, ‘काय बघणार?’
‘बातम्याही नाही वाचत किंवा बघत?’
नानासाहेब म्हणाले, ‘बातम्या म्हणजे नुसत्या उखाळ्यापाखाळ्याच असतात. भाषाही वाईट. म्हणून वाचत नाही आणि बघतही नाही. राजकारणही तसंच’ आणि एक पॉज घेऊन म्हणाले, ‘फारच कंटाळा आला, तर इंग्रजी चित्रपट बघतो अधूनमधून.’
काळजी आणि प्रेमापोटी गुरगुरणाऱ्या लेकी हा नानासाहेब, नंदिनीवहिनी आणि माझ्यातला जिव्हाळ्याचा विषय. तोही नेहमीप्रमाणं चर्चेत आला आम्हा तिघांच्या.
गप्पा बराच वेळ रंगल्या. महेश एलकुंचवार, सुधीर रसाळ, कुमार केतकर अशा अनेकांच्या आठवणींच्या सरी बरसल्या. तिथून निघालो, तेव्हा मनात विचार आला, नानासाहेबांसारखी ‘परीस माणसं’ जगण्यात आली म्हणून आपणही उजळून निघालो. ही ज्ञानी, निगर्वी, पारदर्शी माणसं जगण्यात भेटली नसती, तर आपण कुठे तरी चाचपडत विरून गेलो असतो...
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment