अजूनकाही
१ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या ग्रंथप्रेमाची, ग्रंथव्यासंगाची आणि ग्रंथउपासनेची ओळख करून देणारा हा विशेष लेख...
.................................................................................................................................................................
ब्रिटिश काळात पाश्चात्य शिक्षणाचे सुपरिणाम होऊन जी कर्तबगार माणसं भारतात होऊन गेली, त्यांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं स्थान अनन्यसाधारण आहे. डेक्कन कॉलेजमध्ये असताना टिळकांवर आणि गोपाळ गणेश आगरकरांवर समान बौद्धिक संस्कार घडून आले. व्यक्तिवाद, उदारमतवाद, उपयुक्ततावाद या पाश्चात्य विचारांचा, तसंच जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर आणि हेन्री सेजविक अशा तत्त्वज्ञांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वं, कायद्याचं राज्य जोपासणारी लोकशाही व्यवस्था, भावनिक ऐक्य व सांस्कृतिक ओळख जोपासणारा राष्ट्रवाद, बुद्धिवाद, खुल्या व्यापाराचा पुरस्कार करणारं अभिजात अर्थशास्त्र, धर्मनिरपेक्ष नीतिशास्त्र या सगळ्यांतून घडलेली आधुनिकतेची विचारचौकट टिळक-आगरकरांना परिचित झाली. या वाटेवरूनच टिळकांची पुढची वाटचाल झाली.
टिळकांनी आपल्या आयुष्यात जे नानाविध व्यापांचे आघात सोसले तेवढे समर्थपणे सांभाळून त्यांनी जो विद्याव्यासंग चालवला होता तो त्यांच्या व्यक्तित्वाला निराळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. टिळकांना रिकाम्या वेळात जे ग्रंथ लिहायचे होते, त्याची यादी उपलब्ध आहे. या यादीतले ग्रंथ टिळकांच्या पद्धतीनं संपूर्ण सांगोपांग लिहायचे, तर त्याला एक जन्मही पुरा पडणार नाही.
वेदकालाचं प्राचीनत्व ठरवण्यासाठी प्रचलित असलेली पाश्चात्य अभ्यासकांची संशोधनपद्धत एकांगी व सदोष असल्याचे टिळकांना दिसून आलं. त्यामुळे त्यांनी केवळ तर्कावर विसंबून न राहता वेद आणि वैदिक वाङ्मय यांच्यातून नक्षत्रांच्या गणितानं जे निष्पन्न झालं, ते मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. वेदरचनेचा काळ इसवी सन पूर्व चार हजार वर्षांइतका जुना असल्याची टिळकांची खात्री झाली होती. त्यांनी हे संशोधन विद्वानांसमोर ठेवताना, आपला पुरावा मांडताना जी काळजी घेतली होती, ती ज्ञानाच्या कुठल्याही शाखेत पारंगत व्हावं, अशी इच्छा असणाऱ्यांनी मुळातून ग्रहण करण्यासारखी आहे.
युरोपियन लेखकांची टिळकांच्या आधी जी शंभर वर्षांची अभ्यासाची परंपरा होती, त्या सर्वांची पुस्तकं टिळकांनी वाचून काढली होती. त्यांचं निदान कुठे आणि कोणत्या कारणांमुळे चुकलं याचा छडा लावला. वेद, संहिता, ब्राह्मणग्रंथ, उपनिषदे, गृह्य सूत्रे, स्मृती, दर्शने, यांच्यावरची भाष्यं व टीका, संस्कृत अमरकोश, पाणिनीचे व्याकरण, वैद्यकग्रंथ सूक्ष्म बुद्धीने तपासले; याशिवाय पारशी ग्रंथांचं तुलनात्मक परिशीलन केलं.
‘ओरायन’ हे पुस्तक लहान आकाराच्या जेमतेम अडीचशे पानांचं आहे. परंतु त्याकरता टिळकांना इतर ग्रंथांची अंदाजे कमीत कमी पंचवीस हजार पाने चाळावी किंवा अभ्यासावी लागली. आपल्या प्रतिपादनात कुठलीही त्रुटी राहू नये, यासाठी चौफेर दृष्टीने आपल्या ग्रंथरचनेत कोणताही दोष राहू न देण्याची टिळक खबरदारी घेत होते. प्राचीनत्वाच्या अवास्तव अभिमानाला बळी न पडता त्यांनी हा काळ ठरवला.
टिळकांचा दुसरा इंग्रजी ग्रंथ ‘आर्क्टिक होम इन दि वेदाज’. त्याची तयारी ‘ओरायन’ची रचना करत असतानाच चालू होती. या ग्रंथाच्या अभ्यासासाठी ते केवळ वेदसंहिता आणि वेदोत्तर साहित्य यांच्यावर अवलंबून राहिले नाहीत. भूस्तर, उत्खनन, ज्योतिष, भाषा, देशोदेशीच्या पुराणकथांची तुलना वगैरे अनेक शास्त्रं त्यांनी नजरेखालून घातली. आपल्याला जे उमगलं आहे, तेच खरं अशी मनाची सर्व प्रकारे खात्री पटल्यावरच १८९८ मध्ये तुरुंगात त्याविषयी ग्रंथ लिहिण्याचा निश्चय केला.
ज्या शास्त्रांची पुस्तकं तुरुंगात असताना आपल्याला वाचायला मिळाली नाहीत, ती वाचल्यावर आपलं मत कदाचित बदलेल, असे उद्गार टिळकांनी काढले होते. त्यावरून सगळ्या बाजूंनी निःशंक झाल्याशिवाय आपलं मत जगापुढे मांडायचं नाही, हा त्यांचा स्वभावगुण अनुकरण करण्यासारखा आहे. सुटकेनंतर आपल्या प्रतिपादनातील उणीवा विद्वानांशी विचारविनिमय करून त्यांनी भरून काढल्या आणि आपला ग्रंथ सिद्ध केला.
‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा टिळकांनी मराठीत लिहिलेला ग्रंथ १९१५ साली छापून प्रसिद्ध केला. या ग्रंथाचं बीजारोपण त्यांच्या बुद्धीत १८७२ साली वडील मृत्युशय्येवर असताना वयाच्या सोळाव्या वर्षीच झालं होतं. ‘गीते’चा विषय टिळकांच्या आवडीचा असल्यामुळे गीतेची पारायणे, त्यावरची भाष्ये, टीका, विवेचने वाचता वाचता त्यांना गीतेतला ‘योग’ हा शब्द ‘कर्मयोग’ या अर्थाचा असल्याचं ज्ञान त्यांना झालं. त्याला अनुसरून अधिक चिंतनमनन, समान व्यासंगी विद्वानांशी चर्चा, देशी-परदेशी ग्रंथांचा व्यासंग चालू ठेवला.
याविषयी काही व्याख्यानं दिल्यावर टिळक यावर स्वतंत्र ग्रंथ लिहित आहेत, असं घाईनं जाहीर झालं. मात्र, त्यांनी आपल्या तयारीच्या मर्यादा ओळखून ग्रंथलेखनाला हात घातला नाही. एकीकडे राजकीय चळवळ चालू असताना ते आपली तयारी वाढवत होते. प्रखर बुद्धी, प्रगाढ धारणा, अस्खलित स्मरणशक्ती आणि वाचलेल्या, स्फुरलेल्या विचारांची व्यवस्थितपणे वेळच्या वेळी टिपणं काढून ती जपून ठेवण्याची सवय, यांमुळे १९०८ साली तुरुंगात अडकण्यापूर्वीच त्यांची ग्रंथ लिहिण्याची तयारी झाली होती.
तुरुंगात असताना संदर्भ ग्रंथ जवळ बाळगण्याची परवानगी मिळताच त्यांनी लेखणी हाती घेतल्यापासून अवघ्या साडेतीन महिन्यांत प्रस्तावनेसह संपूर्ण ग्रंथ कागदावर लिहून काढला.
एरवी, टिळकांनी तोंडानं मजकूर सांगावा व तो दुसऱ्याने लिहून काढावा, असा प्रघात असायचा. ‘ओरायन’ व ‘आर्क्टिक होम इन दि वेदाज’ हे ग्रंथ याच रितीनं लिहिले होते. हा ग्रंथ मात्र त्यांनी लेखनिक व पुरेसे ग्रंथ हाताशी नसताना, स्वतःच्या हाताने तुरुंगात लिहून पूर्ण केला. हे त्यांच्या विस्मयकारक बुद्धीचं स्वरूप होतं. हा ग्रंथ छापून बाहेर आल्यावर याचं विद्वानांकडून, तसंच ज्यांना कर्मयोग शिकवण्याची टिळकांची प्रतिज्ञा होती त्या जनतेकडून या ग्रंथाचं अभूतपूर्व स्वागत झालं.
तुरुंगात असताना टिळकांनी युरोपियन भाषा शिकायला सुरुवात केली होती. १९०९ सालात जुलै ते नोव्हेंबर या काळात त्यांनी फ्रेंच भाषेचे धडे गिरवले. मग ते जर्मन भाषेकडे वळले. १९१०च्या महिन्यापर्यंत त्यांनी ती भाषा इतकी आत्मसात केली की, वेबरच्या एका पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर करण्याचं त्यांच्या मनात आलं. प्राचीन संस्कृत ग्रंथांसंबंधी सूक्ष्म संशोधनपर जे ग्रंथ फ्रेंच व जर्मन भाषांत आहेत, त्या सर्वांची इंग्रजी भाषांतरं उपलब्ध नसल्यामुळे तसे ग्रंथ मूळ भाषेतून वाचण्याची पात्रता टिळकांनी आपल्या ठिकाणी सिद्ध केली.
टिळकांचा स्वतःचा पुस्तकसंग्रह हा त्यांच्या काळजीचा एक स्वतंत्र विषय होता. विद्याव्यासंगी म्हणून त्यांनी जो ग्रंथसंग्रह जमवला होता त्यात अनेक विषयांची इंग्रजी, मराठी, संस्कृत, जर्मन आणि फ्रेंच भाषांतील पुस्तकं होती. ते मंडालेत असताना पुण्याहून तिकडे पुस्तकं मागवत असत.
एखादं पुस्तक अपेक्षित काळात हाती आलं नाही, तर ते पुस्तक कोणी लांबवलं की काय आणि लांबवलं असेल तर अशीच इतर पुस्तकं एक-एक करून गहाळ होत आहेत की काय, या शंकेनं ते व्याकूळ होत. पुस्तकांना जपा, ती केसरी-मराठा पत्रांशी संबंधित असलेल्यांशिवाय अन्य कोणालाही देऊ नका, अशी त्यांची सक्त ताकीद असे. मंडालेहून त्यांनी लिहिलेल्या पत्रांतले दोन नमुने अगदी पाहण्यासारखे आहेत. याच्यावरून टिळकांचं ग्रंथप्रेम आणि त्याबद्दलची स्मरणशक्ती किती तीव्र होती हे कळून येईल.
एका पत्रात टिळक लिहितात, “कौमुदीचं पुस्तक सापडत नाही म्हणता? मग ते काय सांडल? अशीच आणखीही पुस्तकं गहाळ झाली असतील अशी शंका वाटते. कोणीही येतो आणि पुस्तक घेऊन जातो असं दिसतंय. केळकर आणि सदाशिवराव भाव्यांना म्हणावं लायब्ररीची पुस्तकं तरी नीट सांभाळा. बाहेर कोणास होता होईतो पुस्तकं देऊ नये. मला व्याकरण पाहिजे ते पालीभाषेचं. हे पुस्तक सुमारे शंभर पानांचं, कातडी पुठ्ठा घातलेलं फ्रान्समध्ये छापलेलं पुस्तक आहे.”
दुसरं उदाहरणही याचं छापाचं आहे. टिळक लिहितात, “वेबरच्या नक्षत्राच्या दोन प्रती आपल्या संग्रही होत्या. पण तुम्हाला एकही प्रत सापडली नाही हे कसं? तरी मोठ्या दालनातल्या भिंतीशी पूर्वेकडच्या टेकून ठेवलेल्या तीनही कपाटांत आणि मधोमध ठेवलेल्या दोन शिसवी कपाटात नीट शोधा.”
टिळकांचा पुण्यातला पुस्तकसंग्रह तीन जणांचा मिळून होता. एक गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा, दुसरा जिनसीवाल्यांचा व तिसरा स्वतःचा. एखादं पुस्तक यांच्यापैकी कोणत्या संग्रहात असेल, हे ते सहजपणे सांगत असत.
याचसोबत, अमक्या दालनाच्या अमक्या दिशेकडच्या कपाटात तळाशी अमुक तऱ्हेच्या कापडात बांधून ठेवलेल्या गाठोड्यात मागवलेलं पुस्तक सापडेल. आणि ते अमुक आकाराचं, अमुक प्रकाशनाचं, इतक्या खंडांचं आहे वगैरे माहिती ते पत्रांत सांगत असत. त्यांची अफाट स्मरणशक्ती जणू पुण्यात घरच्या संग्रहातल्या पुस्तकांची नेमकी जागा त्यांच्या डोळ्यापुढे मंडालेत उभी करत असावी.
पुस्तक जपण्याच्या दक्ष स्वभावामुळे, टिळक एखाद्यावर परोपकार करण्याच्या निमित्तानं स्वतःचा जीवदेखील बेधडक धोक्यात घालतील, पण आपल्या पुस्तकासाठी एखाद्याचा जीवसुद्धा घेतील, अशी अतिशयोक्ती त्यांच्या आप्तमित्रांमध्ये प्रचलित होती. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत त्यांचे सहकारी पुस्तकांच्या बाबतीत आपल्यावर ठपका येऊ नये, म्हणून फार खबरदारीने वागत असत.
टिळकांचा अखंड व्यासंग व स्मरणशक्तीच्या अनेक गोष्टी प्रचलित आहेत. त्यांचं वाचन सूक्ष्म आणि सर्वंकष असायचं. याच्यासोबत कायद्याच्या ज्ञानातल्या त्यांच्या मर्मग्राही बुद्धिचापल्याच्या गोष्टीही प्रसिद्ध आहेत. टिळकांशी सल्लामसलत करण्यासाठी कायद्याप्रमाणे धर्म, इतिहास, तत्त्वज्ञान, ज्योतिष वगैरे विषयांच्या क्षेत्रांतले लोक त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी येत. एकदा काही विद्यार्थी एक गणित अडलं म्हणून भर दुपारी टिळकांकडे गेले व त्यांना अडचण सांगितली. टिळकांनी ते गणित तात्काळ सोडवून दिलं. त्यांचं गणितावर प्रेम होतं आणि मोकळीक मिळाल्यावर आपण ‘कॅलक्युलस’वर पुस्तक लिहिणार असल्याचं ते म्हणत. टिळकांचे संकल्पित ग्रंथ जर प्रत्यक्षात आले असते, तर त्यांच्या विद्याव्यासंगाचं दर्शन अधिक उजळून निघालं असतं.
लोकमान्यांचा व्यासंग अखंड चालू असे. एकेकाळी पैदा केलेल्या शिदोरीवर चालवून नेण्याची त्यांची पद्धत नव्हती. मोठमोठे विद्वानसुद्धा महाभारतासारखा ग्रंथ एकदा वाचताना मेटाकुटीला येतात. पण टिळकांनी तो तीन वेळा वाचला होता. आणि तो असा वाचला होता की, ‘भारताचार्य’ म्हणून सार्थ विख्यात असलेल्या चिंतामणराव वैद्यांशीही वाद करून त्यांना या विषयाबाबत नवीन दृष्टी टिळकांमुळे मिळाली. विरंगुळा म्हणून वाचायला एखादा ग्रंथ निवडायचा झाला, तर त्यांचा हात या अशा ग्रंथाकडे वळत असे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
मूळ विषयाचं विवेचन करायचं, मुलभूत सिद्धांत मांडायचा, तो तपासायचा आणि एकाच विषयाच्या अनेक बाजू उजेडात आणायच्या अशी टिळकांच्या बुद्धीची ठेवण होती. ते ज्ञानसंपादन करू लागले, तत्त्वचर्चा करायला लागले किंवा चिंतनात असले की, त्यांना आजूबाजूचं कसलंच भान राहायचं नाही. एकदा एका भाषणाच्या वेळी त्यांना ‘ब्युरोक्रसी’ या शब्दाला ‘नोकरशाही’ हा शब्द सुचला. तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. ज्याला त्याला ते तो शब्द सांगत सुटले.
टिळक जेव्हा इंग्लंडमध्ये तेरा-चौदा महिन्यांच्या काळात वास्तव्याला होते, तेव्हा तिथली प्रेक्षणीय स्थळं पाहण्याच्या फंदात ते पडले नाहीत. पण ‘इंडिया हाऊस’च्या ग्रंथालयात ते तासनतास जाऊन बसत आणि तिथे विद्वानांशी चर्चा, वादविवाद करत असत. अशाच एका वेळी एका असिरीयन भाषाकोविदाशी त्यांची ओळख झाली. ‘खाल्डियन संस्कृती’ हा टिळकांच्या अभ्यासाचा विषय. तेव्हा या असिरीयन अभ्यासकाच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्याच्या हेतूनं लोकमान्य त्याच्याकडे गेले.
या दोघांचं संभाषण सुरू झाल्यानंतर हे दोघेही बाहेरच्या जगाला विसरून गेले. या विद्वानाची पत्नीही मोठी हुशार होती. चर्चेत त्यांना जे काही ग्रंथ लागतील ते ग्रंथ ती ताबडतोब टेबलावर आणून हजर करत होती. या संभाषणाच्या नादात समोरच्या चहाचं भानही कुणाला राहिलं नाही. जेव्हा ही चर्चा थांबवणं भाग पडलं, तेव्हा जाताना या दोघांनी एकमेकांना भरगच्च आलिंगन देऊन निरोप घेतला.
लोकमान्य टिळकांच्या व्यक्तित्वाच्या लोकविलक्षण पैलूंवर त्यांच्या चरित्रांतून, त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेल्या आठवणींतून थोडाफार प्रकाश पडतो. त्यांची ज्ञानपिपासा, लोकसंग्राहक वृत्ती, गणिती तर्ककठोरता, जिज्ञासा, मर्मभेदी अकृत्रिम भाषाशैली यांचा विचार केला की, आपल्याला लोकमान्यांच्या श्रेष्ठत्वाचं रहस्य उलगडतं.
‘रत्नागिरी आकाशवाणी’साठी केलेल्या भाषणमालिकेतील एक भाग
..................................................................................................................................................................
लेखक पंकज घाटे रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.
pankajghate89@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment