‘चाकोरीपलीकडचा’ या पुस्तकाच्या नावाप्रमाणे लामखडे सर चाकोरी मोडीत जगले. सरांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!
ग्रंथनामा - आगामी
राजा कांदळकर
  • शिक्षक आणि समाजवादी कार्यकर्ते प्रा.मा.रा. लामखडे यांच्या आज प्रकाशित होत असलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Sat , 27 July 2024
  • ग्रंथनामा आगामी मा.रा. लामखडे M. R. Lamkhade

मराठीचे ख्यातनाम शिक्षक, प्रख्यात लेखक, संशोधक, पक्षीनिरिक्षक, समाजवादी कार्यकर्ते प्रा.मा.रा. लामखडे यांचा अमृतमहोत्सव आज, शनिवार, २७ जुलै २०२४ संगमनेरमध्ये साजरा होत आहे. निरागस, निर्मळ मनाचे, सदैव आनंदी असणारे लामखडे सर. त्यांच्या लेखनकार्यात, उपक्रमांत व्यस्त असतात. त्यांनी विविध विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ‘सांस्कृतिक राजकारण’, ‘चाकोरी पलीकडचा’, ‘लोकवाटा’ या लामखडे सरांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी होत आहे…

.................................................................................................................................................................

संगमनेर तालुक्यातील बोटा गावाजवळ केळेवाडी हे छोटेसे गाव. प्रा. मा.रा.लामखडे सरांचे हे गाव निसर्गाच्या कुशीत आहे. निसर्गप्रेमी लामखडे सरांचे वास्तव्यही सेवानिवृत्तीनंतर तेथेच शेतात आहे. प्राणी, पक्षी, झाडे, डोंगर, माती यामध्ये रमणारे प्रा.लामखडे सर लहानपणापासूनच निसर्गात घडत गेले. सरांचे वडील मेंढपाळ असल्याने लहानपणी मेंढ्यांची कोकरे सांभाळण्याचे काम त्यांना करावे लागले.

त्या कोकरांचे गुण सरांनी घेतले असावेत. लहान मुलासारखी मनाची निरागसता जपायची, सदा आनंदी राहायचं, दुसऱ्यांवर माया करायची, कुणाशी स्पर्धा करायची नाही, वैर धरायचे नाही, अखंड कुतूहलाने या जगाकडे बघायचं, हे गुण सरांनी आयुष्यभर जपले.

मुलाने शिकावे असे वडिलांना वाटत असल्याने शिक्षणासाठी त्यांना जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे आत्याकडे जावे लागले. आत्यांच्या घरी देव्हार्‍यात महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. सर त्या देव्हार्‍यातील देवांना आंघोळ घालत असताना गांधींच्या छायाचित्राचीही स्वच्छता करायचे. सरांना महात्म्याचा झालेला तो पहिला स्पर्श.

सर शिकत असलेल्या शाळेत मूलोद्योग हा विषय शिकवला जायचा. मूलोद्योग म्हणजे सुतकताई कापसापासून चरख्यावर सूत काढणे. त्याचे विणकाम करून कापड बनवणे, असा स्वावलंबी संस्कार करणारा हा विषय म्हणजे गांधीजींची शिकवण होती. सहावीचे वर्गात असतांना सरांनी स्वत: सूत काढून टॉवेल बनविला. सरांना गांधी इथे भेटले. हा आनंद म्हणजे गांधी विचारांचा थेट स्पर्श होता. पुढील काळात शिक्षण घेताना, शिकवताना, वाचन करताना महात्मा गांधींचा एवढा प्रभाव वाढला की, आजही लामखडे सर ‘गांधीमय’च राहतात.

प्रा.लामखडे सरांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण राजुरी, ओतुर येथे झाले. राजुरीतील अतिशय प्रसिद्ध समाजवादी विचारांचे शाहीर होते. त्यांच्या शेजारी सरांचे वास्तव्य असल्याने प्रबोधन गीते व विचारांचा प्रभाव सरांवर निर्माण झाला. स्वातंत्र्य चळवळीचा काळ असल्याने चळवळीतील नेत्यांची भाषणे ऐकणे, पर्वणी असायची. १९७१ साली यशवंतराव चव्हाणांची सभा ऐकण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण व देशात जवाहरलाल नेहरू यांचे विचारांचा प्रभाव होता. तो लामखडे सरांच्या मनामध्ये आजतागायत राहिला आहे.

क्रांतीसिंह नाना पाटील स्वातंत्र्यसंग्रमात अग्रणी होते, तसेच तरुण पिढीचे आवडते पुढारी होते. त्यांची भाषणे ऐकणे ही पर्वणी असायची. क्रांतीसिंहाचे जुन्नरमधील भाषण ऐकण्यासाठी राजुरीहून तीस मित्रांसह सर सायकलवर जुन्नरला गेले. १९६२ साली जुन्नरचे माजी आमदार व समाजवादी पक्षाचे नेते वि.म. आवटे काँग्रेस पक्षात गेले. त्यांचा निषेध करणारी सभा डॉ. बाबा आढव यांनी राजुरीत घेतली, तेव्हा त्यांचे भाषण ऐकूण लामखडे सर त्यांच्या प्रेमात पडले.

बाबा आढाव यांच्या चळवळीत सर आजही काम करत आहेत. बाबा आमटे, ग. प्र. प्रधान, अशोक मेहता यांच्यासह अनेक तत्कालीन विचारवंतांच्या कार्याने लामखडे भारावून गेले. अगदी कमी वयात त्यांना अनेक वक्त्यांच्या विचारांचा लाभ झाला. लेखनाची स्फूर्ती निर्माण झाली. डॉ. बाबा आढावांच्या कार्यास समर्थन देणारा पहिला लेख त्यांनी आचार्य अत्रेंच्या ‘मराठा’ दैनिकात लिहिला. त्यानंतर सामाहिक ‘साधना’चे संपादक यदुनाथ थत्ते संगमनेरला आले. लामखडे सरांकडून त्यांनी लेख लिहून घेतला व ‘साधना’त प्रसिद्ध केला. त्यांच्यातील वैचारिकता लेखन स्वरूपात शब्दबद्ध होऊ लागली.

समाजवादी विचाराने प्रभावीत झालेले प्रा. लामखडे सर राष्ट्रसेवा दलात उशिरा आले. त्याआधी संगमनेर कॉलेजमध्ये बी.ए.चे शिक्षण घेत असताना त्यांनी ‘कमवा व शिका’ योजनेत काम केले. कॉलेजचे तेव्हाचे प्राचार्य मधुसुदन कौंडीण्य यांचा फार मोठा सहवास, मार्गदर्शन सरांना लाभले. पदवीचे शिक्षण संपल्यानंतर एम.ए.चे शिक्षण घेण्यासाठी ते पुणे विद्यापीठात गेले. खर्चाचा प्रश्‍न कठीण होता. त्यांना समाजवादी पक्षाचे तत्कालीन सरचिटणीस पन्नालाल सुराणा यांनी पक्ष कार्यालयात सेक्रेटरीचे काम दिले. मिळणार्‍या आर्थिक रकमेपेक्षा तेथे विचारवंतांचा संपर्क, ज्ञान, मार्गदर्शनाने त्यांचे पुढील आयुष्य अधिक विचार संपन्न झाले.

याच काळात त्यांचा भाई वैद्य, यदुनाथ थत्ते यांच्याशी संपर्क आला. याच काळात ते सत्यशोधक चळवळीशी जोडले गेले. महात्मा फुलेंचे सहकारी शाहीर भीमराव महामुनी यांच्या प्रभावाने ते ‘सत्यशोधक चळवळी’त काम करत राहिले. महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार त्यांनी अंगीकारून पुढेही अनुकरण केले. शाहीर भीमराव महामुनींचे कोल्हापूर विद्यापीठात अध्यासन असल्याचे प्रा.लामखडे सरांनी नमूद केले आहे. दोन वर्षे पुण्यात शिक्षण घेताना लामखडे सरांना खूप शिकायला अनुभवयाला मिळाले. एम.ए. झाल्यानंतर प्राचार्य कौंडीण्य यांच्या शिफारसीने ते जुन्नर कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक झाले. अगदी काही वर्षांतच कौडींण्य सरांनी लामखडे सरांना संगमनेर कॉलेजला नोकरीची संधी दिली. संगमनेर महाविद्यालयात सेवानिवृत्तीपर्यंतचे लामखडे सरांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य म्हणजे खर्‍या अर्थाने कृतीशील व आनंदी जीवनाचा समृद्ध प्रवास आहे.

समाजवादी, सत्यशोधक, राष्ट्र सेवादल कार्य विचारातून घडलेले लामखडे सर विद्यार्थ्यांना शिकवताना स्वतःला विसरून कृतीशिल शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह कॉलेजबाहेर पडायचे. निसर्ग, प्रकाश, प्राणी, पक्षी, समाजजीवन यामध्ये विद्यार्थ्यांना कृतीशिल शिक्षण द्यायचे. ‘नवा प्रयोग’ ही साने गुरुजींची कादंबरी सरांच्या वाचनात आली आणि सरांनी संपूर्ण साने गुरुजी वाचले. त्यांच्या विचारांशी एकरुप झाले. वर्ध्याच्या आश्रमात जाऊन त्यांनी ‘गिताई’चे वाचन केले आणि विनोबा यांच्या विचारांशी एकरूप झाले. आनंदवन, हेमलकसा येथे सर अनेक वेळा बाबा आमटेंना भेटले आणि त्यांच्या कार्याशी एकरूप झाले.

सरांच्या जीवनाची जडणघडण करणारे दोन गुरू आहेत. एक प्राचार्य कौंडीण्य आणि दुसरे साथी दुर्वे नाना. बी.ए.च्या शिक्षणापासून कौंडीण्य सरांचे मार्गदर्शन मिळाल्यापासून ते कौंडीण्य सरांच्या निधनापर्यंत आणि साथी भास्करराव दुर्वेंच्या पहिल्या परिचयापासून ते त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाची वास्तू संगमनेरमध्ये उभारण्यापर्यंत लामखडे सर या गुरूंच्या अखंड सेवेत, विचारात कार्यरत राहिले.

प्राचार्य कौंडीण्य म्हणजे अभिनव व लोकउपयुक्त कृती कार्याची गंगोत्री होते. शेकडो उपक्रम त्यांनी विद्यार्थी व स्थानिक समाज विकासासाठी केले. कौंडीण्य सरांनी सहकारी प्राध्यापकांना विविध उपक्रमांसाठी सतत प्रोत्साहित केले. त्यांच्या कलागुण वृद्धीसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि म्हणूनच संगमनेर महाविद्यालय संपूर्ण देशात नावाजले. राज्यस्तरीय लेखक व विचारवंत निर्माण झाले. लामखडे सर त्यांच्यातीलच एक अतिशय समृद्ध निसर्ग अभ्यासक व पर्यटन लेखक म्हणून सुपरिचित झाले. हजारो विद्यार्थ्यांच्या आदरस्थानी असलेले लामखडे सर आजही वयाच्या ७५व्या वर्षी नव्या उमेदीने आपल्या शेतामध्ये लेखन कार्य करत आहेत.

साथी भास्करराव दुर्वे नाना यांनी लामखडे सरांमधील कार्यकर्ता घडवला. बी.ए.ला असताना ते नानांच्या शेजारीच रहायला होते. त्यामुळे अनेक वेळी, अनेक कारणांसाठी नानांचा त्यांचा संपर्क व्हायचा. नानांचे विचार सामाजिक कार्य आणि व्यक्तिमत्त्व म्हणून लामखडे सर नानांचे कार्यकर्ते म्हणून समाजवादी पक्ष, राष्ट्र सेवादल आणि समविचारी संस्थांच्या कार्यासाठी समर्पित राहिले. दुर्वेनानांच्या कार्याचा वारसा वृद्धींगत होण्यासाठी त्यांनी संगमनेर-अकोले परिसरातील सर्व जुने नवे कार्यकर्ते एकत्र करून अनेक उपक्रम राबवले. साने गुरुजी अभ्यासिका, चर्चक मंडळ, परिसर भेटी, साथी दुर्वेनाना प्रतिष्ठान, साथी दुर्वे नाना पतसंस्था घुलेवाडी यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फार मोठे योगदान लामखडे सरांनी दिले आहे.

वयाची ७५ वर्षे पूर्ण करताना लामखडे सरांचे मन थकले नाही, लेखणी थकली नाही, विचार थकले नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरील तेज निरागसपणा आणि आनंद आजही स्फूर्तीदायी आहे. त्यांना अजूनही फार लिहायचे आहे. निसर्गात रहायचे आहे. बाबा आढाव, बाबा आमटे, ग.प्र.प्रधान, भाई वैद्य, महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे. त्या विचारांचे वारसदार घडवायचे आहेत. सरांनी केळेवाडीच्या घराला नाव दिलंय- ‘गाथा’. संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचं हे अभिनव स्मारक. आणि संगमनेरच्या आपल्या घराला ‘एसेम’ असं नाव दिलं आहे. समाजवादी विचारांना प्रसारित करत असताना ते संतांचे विचारही अनुसरतात. कर्मकांड नाकारून सत्यशोधनाचे वारकरी होतात.

वर्षातला एक पगार समाजकार्यावर, वर्गातल्या, कॉलेजातील मुलांवर खर्च करणारा हा शिक्षक आहे. यावर कुणाचा आज विश्वास बसणार नाही. सरांनी आयुषभर चाकोरी मोडीत जगणं पसंत केलं. तसे जगले. आज प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘चाकोरीपलीकडचा’ या पुस्तकाच्या नावाप्रमाणे लामखडे सर चाकोरी मोडीत जगले. सरांना पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!

.................................................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......