अजूनकाही
१. काँग्रेस पक्षाकडून सोमवारी पक्षातंर्गत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाचा नवा अध्यक्षही निवडला जाईल. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यास उत्सुक असून प्रक्रियेनुसारच ते अध्यक्ष होतील, असे एका वरिष्ठ काँग्रेसनेत्याने एका प्रमुख वर्तमानपत्राला सांगितले होते.
तोंडदेखली लोकशाही कशाला म्हणतात, ते काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकांमधून दिसून येतं. आता संपूर्ण लोकशाही प्रक्रियेतूनच पक्षप्रमुख निवडणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, अण्णा द्रमुक यांच्यासारखे पक्ष आहेत, म्हणून देशात लोकशाहीची धुगधुगी शिल्लक आहे म्हणायची.
..............................................................................
२. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया यापुढे विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना जबर दंड ठोठावू शकते. एअर इंडिया प्रशासनाचा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास गोंधळी प्रवाशांना १५ लाखांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यामुळे आता एअर इंडिया भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. या प्रस्तावानुसार प्रवाशांच्या कोणत्याही कृत्यामुळे विमान सुटायला तासभर उशीर झाल्यास कमीतकमी ५ लाख रूपये, दोन तास उशीर झाल्यास १० लाख आणि त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास १५ लाख रूपये इतका दंड आकारला जाऊ शकतो.
एअर इंडियाने हे करायलाच हवं. मात्र, त्याबरोबरच आपले पायलट वेळेवर आले नाहीत, क्रू विश्रांतीची वेळ पूर्ण केल्याशिवाय येणार नाही, कोणीतरी मंत्रीसंत्री यायचा आहे, असल्या कारणांसाठी जेव्हा प्रवाशांची तासन्तास रखडपट्टी केली जाते, त्यावेळी त्याची जबाबदारी घेऊन प्रवाशांना त्यांच्या तिकिटांची रक्कम परत करून वर दंडही भरायला हवा प्रत्येक एअरलाइन्सने. काही लोकांसाठी निव्वळ विमानप्रवास हे उदरनिर्वाहाचं साधन बनू शकेल त्यातून.
..............................................................................
३. ‘टाइम’ मॅगझिनच्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक टक्क्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. गेल्या तीन वर्षांतील नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियता पाहता, हे आकडे काहीसे आश्चर्यजनक म्हणावे लागतील. त्यामुळे आता नरेंद्र मोदी यांना यादीत आघाडीचे स्थान नव्हे तर किमान १०० जणांमध्ये तरी स्थान मिळेल का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचकांची फारशी मते मिळवू शकलेले नाहीत. त्यांना मिळालेली मते ही शून्य टक्क्यांमध्ये आहेत.
अरे देवा, तिकडेही ईव्हीएम वापरतात की काय मतदानासाठी? हे असं झालंच कसं? देशोदेशीची भक्तमंडळी काय करतायत काय? ‘टाइम’चा टाइम भरत आलाय म्हणावं भारतात. सुषमा स्वराज, त्यांना कडक वॉर्निंग द्या. आपले पर्रीकर असते, तर एव्हाना आपण ‘टाइम’वर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून धडा शिकवला असता.
..............................................................................
४. दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांची कन्या आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवुडपासून लांब का आहे, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला होता. या प्रश्नाचे उत्तर स्वतः ट्विंकलने ट्विटरवरून दिले. 'माझ्या वडिलांना (राजेश खन्ना) नेहमी वाटायचे की, मी अभिनेत्रीपेक्षा लेखिका बनावे', म्हणूनच मी अभिनय सोडून लेखनाकडे वळले, अशी कबुली तिने दिली.
पाहा, बापाचं काळीज कसं असतं... किती माया ही लेकीवरची... कोणताही बाप तू सिनेमात सुंदर माठ दिसतेस, असं आपल्या मुलीला कसा म्हणू धजेल... तू लेखन छान करतेस, असंच म्हणेल. वडील नेमकं काय सांगू पाहतायत, याचा अर्थ ट्विंकललाही समजला, हे विशेष.
..............................................................................
५. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केलं आहे. जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं भारताने मान्य केलं असून त्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. “पाकिस्तानी नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या गुप्तहेराला वाचवलं जाऊ नये, सरकारने त्याला फाशी द्यावी,'' अशी मागणी सईद यांनी केली.
या अशा बातम्या फारच दुविधेत टाकतात सर्वसामान्य माणसांना. ही बातमी वाचली की आपल्याला आपण अजमल कसाबच्या बाबतीत कशी हीच मागणी केली होती, ते आठवतं. जाधव हे काही कसाब नाहीत, असं आपण म्हणतो. मात्र, ते पाकिस्तानात हेरगिरी करायला गेले होते, ‘अमन की आशा’चे दूत म्हणून गेले नव्हते, याचा विसर पडावा, अशीच आपली इच्छा असते. न्याय ही संकल्पना किती तोकडी आहे, हे अशा वेळेला लक्षात येतं.
editor@aksharnama.com
……………………………………………………………………………………………
Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment