अजूनकाही
एकोणिसाव्या शतकातले महान फ्रेंच कादंबरीकार अॅलेक्झांडर द्यूमास आणि व्हिक्टर ह्युगो यांच्याबद्दल एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. ‘द काऊन्ट ऑफ माँटे क्रिस्टो’ आणि ‘द थ्री मस्कटीअर्स’ यांसारख्या साहसी कथानकांच्या तुफान लोकप्रिय कादंबऱ्यांचे लेखक द्यूमास प्रसिद्धीच्या शिखरावर होते आणि त्यांनी अमाप पैसा कमावला होता. त्यांचे कधी प्रतिस्पर्धी, तर कधी मित्र असलेल्या आणि 'ला मिझराब', 'द हंच बॅक ऑफ नोत्र देम' या सामाजिक टिप्पणी करणाऱ्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांचे लेखक असलेल्या ह्युगो यांना राजकीय आणि साहित्यिक वर्तुळात नावाजलं गेलं होतं. असं सांगतात की, एका मेजवानीच्या प्रसंगी ते एकमेकांच्या समोर आले आणि एकमेकांची सौजन्याने विचारपूस करून पुढे निघून गेले. थोडं पुढं गेल्यावर द्यूमासनी मागे वळून पाहिलं आणि त्यांच्याबरोबरच्या माणसाला ते म्हणाले, " छे !... जर मला याच्यासारखं लिहिता आल असतं तर!" इकडे ह्युगोंनीही मागे वळून पाहिलं आणि स्वतःच्या सोबत्याला म्हणाले, "छे!...जर मी याच्याएवढा लोकप्रिय असतो तर!"
ही सत्य घटना नाही; केवळ एक आख्यायिका आहे, पण ज्या प्रकारे, ज्या संदर्भात हा किस्सा सांगितला जातो, त्यातून सांगणाऱ्याला एकच गोष्ट सूचित करायची असते. ती म्हणजे, लेखक एकतर ‘खपाऊ’ किंवा ‘जानर्’ लेखक असतो किंवा मग तो ‘अस्सल साहित्यिक’ किंवा ‘विचारवंत’ लेखक असतो. पहिल्या वर्गातला लेखक कितीही वाचकप्रिय असला, तरी त्याचं लिखाण जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नसते.
अमेरिकी लेखनविश्वात अशी वर्गव्यवस्था नेहमीच दिसून आली आहे. एकीकडे अर्नेस्ट हेमिंग्वे, सॉल बेलो, फिलीप रॉथ, टोनी मॉरीसन यांच्यासारखे ‘गंभीर साहित्यिक’, तर दुसरीकडे आयझॅक आसिमोव्ह, फिलीप के डिक, स्टीफन किंग, जॉन ग्रिशम यांसारखे ‘बेस्टसेलिंग’ लेखक किंवा ‘जानर्’ लेखक. पहिल्या गटातल्या लेखकांच्या वाट्याला मान-सन्मान, पुरस्कार, समीक्षकांची वाहवा येते, तर दुसऱ्या गटातल्या लेखकांना वाचकप्रियता मिळते, पण साहित्याच्या मुख्य धारेकडून वाट्याला येणारी अवहेलना सहन करावी लागते. रहस्य कथा, विज्ञान कथा, भय कथा इ.सारख्या जानर् चं लिखाण करणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांची दखल अपवाद वगळता घेतली जात नाही. महत्त्वाची साहित्यिक नियतकालिकं अशा पुस्तकांची समीक्षा, परीक्षणं सहसा छापत नाहीत.
पण गेल्या काही दशकांपासून काही जानर् लेखकांनी ही सीमा ओलांडण्यात यश मिळवलं आहे. अनेक विज्ञान कथा-लेखकांच्या पुस्तकांचं महत्त्व आता पूर्वलक्षीपणे मान्य करण्यात आलं आहे. ‘फॅरेनहाईट 451’, ‘डू अॅन्ड्रॉइडस ड्रीम ऑफ इलेक्ट्रिक शिप’, ‘द फौन्डेशन’ यांसारख्या प्रभावी कादंबऱ्यांमधून विज्ञान-लेखकांनी तंत्रज्ञानयुगात मानव जातीला तोंड द्याव्या लागणाऱ्या गुंतागुंतीच्या आणि अभूतपूर्व ठरू शकणार्या नैतिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांची भविष्यवेधी मांडणी केली आहे. अमेरिकी ग्रामीणवर्ग आणि कामगारवर्गाच्या इच्छा-आकांक्षा, समस्या आणि चिंता यांचं एक रूपक म्हणून स्टीफन किंगसारख्या लेखकाच्या भय कथांकडे आता पाहिलं जातं. या वर्गाची बोली भाषा, त्या भाषेचा लहेजा स्वतःच्या लेखनात अस्सलपणे उतरवण्यातल्या त्याच्या यशाला आता मोठ्या प्रमाणात मान्यता प्राप्त झाली आहे.
अशाच प्रकारे साहित्यिक आणि जानर् लेखकांमधली सीमा ओलांडणारा लेखक म्हणजे ‘एल्मोर लेनर्ड’. त्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९२५ रोजी अमेरिकेतल्या न्यू ऑर्लिन्स या शहरात झाला. वडलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे लहानपणी त्याच्या कुटुंबाला वरचेवर वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम हलवावा लागायचा, पण एल्मोर १० वर्षाचा असताना हे कुटुंब अखेरीस डेट्रोइट शहरात येऊन कायमचं स्थायिक झालं. पुढे एल्मोरने डेट्रोइट विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि दुसऱ्या युद्धात भाग घेण्यासाठी तो अमेरिकी नौदलात भरती झाला. युद्धानंतर काही वर्षं त्याने जाहिरात क्षेत्रात काम केलं. १९५०च्या दशकात लेनर्डने लेखनाला सुरुवात केली. पुढच्या साठ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ४०हून अधिक कादंबऱ्या, तीस-एक लघुकथा आणि पटकथा असं भरघोस लिखाण केलं.
स्वतःच्या लेखनाची सुरुवात त्याने ‘काऊबॉय-वेस्टर्न’ प्रकारच्या कथा-कादंबऱ्यांनी केली. या लेखनपर्वातली त्याची सर्वांत उल्लेखनीय कादंबरी म्हणजे ‘हाम्ब्रे’. ‘अपाची’ या अमेरीकेतल्या मूळ निवासी जमातीत वाढलेल्या, पण जन्माने श्वेतवर्णीय असलेल्या जॉन रसेलभोवती हे कथानक घडतं. एक कारकून, एक डॉक्टर, त्याची पत्नी, अपाची लोकांच्या तावडीतून सुटून आलेली एक तरुणी आणि आणखी एक अनोळखी, धटिंगण माणूस अशा सहप्रवाशांबरोबर रसेल घोडागाडीतून रात्रीचा प्रवास करत असतो. या लोकांबरोबर त्या घोडागाडीच्या वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा मॅनेजरदेखील असतो. रंगरूपाने गोरा दिसणारा रसेल अपाची असल्याचं इतरांना कळतं, तेव्हा एका ‘हीन’ अपाचीबरोबर प्रवास करायला लावल्याबद्दल हे सहप्रवासी मॅनेजरकडे आक्षेप नोंदवतात, पण जेव्हा त्यांच्या गाडीवर दरोडेखोर हल्ला करतात, तेव्हा त्यांना जिवानिशी सुखरूप सोडवण्यासाठी रसेलच एकमेव आशा ठरतो.
ज्या रसेलला त्यांनी माणसाचाही दर्जा दिलेला नसतो, त्या रसेलकडून आता त्यांना मदतीची अपेक्षा असते. काही तासांपूर्वीच अपाचींच्या तथाकथित रानटीपणाबद्दल तुच्छतेने बोलाणाऱ्यांचा जीव संकटात सापडल्यावर त्यांच्यातल्या जगण्याच्या नैसर्गिक अंतःप्रेरणा जाग्या होतात आणि त्यांच्या सुसंस्कृतपणातला दुटप्पीपणा, उथळपणा उघडा पडतो; त्यांच्यातली हिंसा जागी होते. कदाचित श्वेतवर्णीयांनी अपाची लोकांना इतकं देशोधडीला लावलं नसतं, तर त्यांनाही टिकाव धरण्यासाठी हिंसेचा मार्ग पत्करावा लागला नसता.
लेनर्डची ही कादंबरी काऊबॉय-वेस्टर्न ‘जानर्’च्या नमुनेदार चौकटीत रचलेली आहे. त्यात बंदूकबाजी आहे, घोडेस्वारांचा पाठलाग आहे, अटीतटीचे प्रसंग आहेत, तसंच आख्यायिका बनलेल्या अमेरिकी साउथ-वेस्टच्या शुष्क, कठोर प्रदेशाची पार्श्वभूमी या कादंबरीच्या पटाला लाभलेली आहे. तरीही लेनर्ड स्वतःच्या लेखनशैलीने या जानर् कादंबरीला जानर् च्या मर्यादा ओलांडून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. हे त्याला शक्य होतं, कारण त्याची कादंबरी नेहमी संवादातून पुढे जाते. तेच त्याच्या शैलीचं शक्तिस्थान आहे. त्याची पात्रं बोलकी असतात. त्यांच्या ठसकेदार संवादातूनच वाचकाची या पात्रांशी ओळख होते. एखाद्या पात्राच्या केवळ बोलण्याच्या पद्धतीवरून त्या पात्राचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व वाचकाच्या मनात निर्माण करण्याचं लेनर्डचं कसब अफलातून आहे. अमेरिकी बोलीही अस्सलपणे पुस्तकात उतरवण्यात लेनर्डला कमालीचं यश मिळालं आहे.
लेनर्डच्या या खुबीचे केवळ वाचकच नाहीत, तर इतर नावाजलेले लेखकही चाहते आहेत. ब्रिटिश कादंबरीकार मार्टिन एमिस एकदा नोबेल विजेते थोर अमेरिकी साहित्यिक सॉल बेलो यांना भेटायला त्यांच्या शिकागो इथल्या घरी गेले असताना बेलो यांच्या पुस्तकाच्या कपाटात एमिसना एल्मोर लेनर्डच्या अनेक कादंबऱ्या दिसल्या; आणि संवाद टिपण्यात लेनर्डचा हात कुणीही पकडू शकत नसल्यावर आणि त्याच्या लिखाणात कुठल्याही कमअस्सल गोष्टी भिंग घेऊन शोधल्या तरी सापडत नसल्यावर त्या दोघांचं एकमत झालं.
एका मुलाखतीत लेनर्डच्या या खुबीबद्दल त्याला विचारलं असता तो म्हणाला की, थोर लेखकांप्रमाणे आलंकारिक भाषेत आणि क्लिष्ट वाक्यरचना करून लिहिण्याएवढी प्रतिभा त्याच्यापाशी नव्हती. त्यामुळे या मर्यादेला वळसा घालून त्याने संवादांवर केंद्रित असणारी लेखनशैली विकसित केली. तसंच लेनर्डच्या कथा-कादंबर्यांना दृश्यात्मकतेचं परिमाण लाभलेलं असल्याने त्याच्या अनेक कथा-कादंबऱ्यांवर चित्रपटही बनले आहेत. ‘हाम्ब्रे’ आणि '३:१० टू युमा' हे त्याच्या काऊबॉय-वेस्टर्न कादंबऱ्यांवर बनलेले चित्रपट आता ‘हॉलीवूड क्लासिक’ मानले जातात.
काऊबॉय-वेस्टर्न कादंबऱ्यांची लोकप्रियता ओसरायला लागल्यावर लेनर्डने गुन्हेगारी विश्वावर आधारित क्राईम नॉव्हेल्स लिहायला सुरुवात केली, पण त्याला नेहमीच्या पठडीतल्या खुनाच्या रहस्यावर आधारित कदंबर्यांच्या किंवा गुप्तहेर विश्वावर आधारित कादंबर्यांच्या लेखनामध्ये जास्त रस नव्हता. तसंच त्याने अति गुंतागुंतीची कथानकं असलेल्या किंवा हिंसक गुन्हेगारांवर आधारित असलेल्या कादंबऱ्याही लिहिल्या नाहीत. लेनर्डच्या क्राईम नॉव्हेल्समध्ये आपल्याला बँक-दरोडेखोर, जबरी व्याजाने छोटं-मोठं कर्ज देणारे गुंड सावकार, तस्कर, ड्रगचा धंदा करणारे भुरटे भेटतात. त्यांचं जग आतून-बाहेरून लेनर्डच्या चांगल्याच परिचयाचं आहे. अमेरिकी तुरुंगात एक निश्चित उतरंड असल्याचं लेनर्ड सांगतो. इथे तळात लैंगिक अत्याचारी आणि व्यसनापायी ड्रगचा धंदा करणारे गर्दुल्ले (हेच पोलिसांचे खबरे बनतात) असतात, तर सर्वांत वरच्या थरात बँक-दरोडेखोर असतात. तुरुंगात सर्वांत जास्त मान त्यांनाच असतो. हे दरोडेखोर इतर गुन्हेगारांना तुच्छ लेखतात, कारण या दरोडेखोरांच्या मते इतर गुन्हेगार अस्सल गुन्हेगार नसतात. उलट बॅंक-दरोडेखोर मात्र स्वतःला ‘प्रोफेशनल’ गुन्हेगार समजतात. कारण हे गुन्हेगार परिस्थितीवश झालेले गुन्हेगार नसून इतरांप्रमाणे नोकऱ्या, काम करून पैसे कमावणं त्यांना कमीपणाचं वाटत असल्याने ते आपखुशीने गुन्हेगार झालेले असतात. त्यामुळे ते व्यवस्थेला चकवून स्वस्तात पैसे कमवण्याच्या सतत प्रयत्नात असतात. ते स्वतःला नेहमीच इतरांपेक्षा जास्त हुशार समजत असतात, पण ते कितीही चलाख असले, त्यांचं प्रसंगावधान चांगलं असलं, तरीही त्यांच्यात एक मूलभूत मूर्खपणा ठासून भरलेला असतो. नेमकी हीच विसंगती लेनर्ड अत्यंत खुबीने वाचकांसमोर आणतो. लेनर्डच्या कादंबर्यांमधली ही पात्रं स्वतःच्या चलाख्यांबद्दल अगदी गंभीरपणे बोलत असतात, पण त्यांच्या विचारांमध्ये आणि वागणुकीमध्ये असलेल्या मुळातल्या मूर्खपणामुळे अनेकदा त्यांचं बोलणं सामान्य वाचकाला विनोदी वाटतं. अशा प्रकारे बेतलेल्या ‘आउट ऑफ साईट’, ‘गेट शॉर्टी’, ‘सिटी प्राईमिव्हल’, ‘रम पंच’, ‘बी कुल’, ‘फ्रिकी डिकी’... इ. अनेक भन्नाट कादंबऱ्या लेनर्डने लिहिल्या आहेत.
हॉलीवूड तर लेनर्डच्या प्रेमातच आहे. लेनर्डच्या कथा-कादंबऱ्यांवर वीसहून अधिक चित्रपट निघाले आहेत. अर्थात, या सगळ्याच चित्रपटांना लेनर्डच्या कादंबरीचा ठेका आणि लय पकडता आलेली नाही, पण बॅरी सॉननफिल्ड (गेट शॉर्टी, १९९५), स्टीव्हन सोडरबर्ग (आउट ऑफ साईट, १९९८) आणि क्वेन्टिन टॅरन्टिनो (जॅकी ब्राऊन, १९९७) यांच्यासारख्या प्रतिभावंत दिग्दर्शकांनी लेनर्डच्या कादंबऱ्यांवर दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. विशेषतः टॅरन्टिनो स्वतःवर एल्मोर लेनर्डचा मोठा प्रभाव असल्याचं सांगतात. ‘रेझर्व्हायर डॉग्स’ आणि ‘पल्प फिक्शन’ हे टॅरन्टिनोचे गाजलेले चित्रपट जणू लेनर्डने न लिहिलेले, पण लेनर्ड-शैलीतले चित्रपट आहेत; पण तरीही टॅरन्टिनोच्या चित्रपटांमध्ये अनेकदा हिंसा अधोरेखित केलेली असते. याउलट लेनर्डची कादंबरी हिंसक प्रसंगांमध्ये कधीच अडकत नाही.
स्वतःच्या हयातीत अॅलेक्झांडर द्यूमासना लोकप्रियता मिळाली, पण समीक्षकांनी, विचारवंतानी त्यांच्या लिखाणाची कधी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर दीडएकशे वर्षांनी फ्रान्सला त्यांची नव्याने दखल घ्यावी लागली. राजकीय, सामाजिक, कला इ. क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचं ‘पॅन्थियॉन ऑफ पॅरीस’ या वास्तूत दफन करण्याची फ्रान्समध्ये परंपरा आहे. व्होल्तेर, रुसो, व्हिक्टर ह्युगो, झोला यांसारख्या विचारवंतांना आणि साहित्यिकांना मृत्यूनंतर हा बहुमान मिळाला. हा बहुमान मिळण्यासाठी द्यूमासना १३२ वर्षं वाट पाहावी लागली. द्यूमासच्या २००व्या जन्मशताब्दीला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष शिराक यांनी द्यूमासच्या अस्थींचं ‘पॅन्थियॉन ऑफ पॅरीसमध्ये’ सन्मानाने दफन केलं.
लेनर्ड यापेक्षा बराच भाग्यशाली ठरला. स्वतःच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याने ‘बेस्टसेलर लेखक’ म्हणून हक्काचे असंख्य वाचक कमावले आणि साहित्यात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवून समीक्षकांची वाहवाही मिळवली. तसंच २०१२ साली लेनर्डला अमेरीकेतल्या नॅशनल बुक फाऊन्डेशनचा ‘मेडल फॉर डिस्टींग्वीश्ड कॉन्ट्रिब्युशन टू अमेरिकन लेटर्स’ हा प्रतिष्ठेचा सन्मानही प्राप्त झाला.
वयाच्या ऐंशीत पदार्पण केल्यानंतरही लेनर्डचा लिखाणाचा जोम संपला नव्हता, पण २०१३ साली त्याला पक्षाघाताचा झटका आला आणि त्यातून उद्भवलेल्या आजारामुळे २० ऑगस्ट २०१३ रोजी त्याचं निधन झालं.
लेखक डायंमड पब्लिकेशन्स (पुणे)चे संचालक आहेत.
nilesh.pashte@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment