हा लेख ‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या मे २०२४च्या अंकात प्रकाशित झालेला आहे. तेव्हा नुकताच जॉर्ज गॅलवे यांचा विजय झाला होता. परंतु त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत गॅलवे यांचा पराभव झाला. त्यामुळे या लेखात लेखकाने म्हटल्याप्रमाणे ‘नव्या युगाची नांदी’ संपुष्टात आलेली आहे. ही घडामोड ‘अक्षरनामा’च्या काही वाचकांनी आमच्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. वाचकांनी हा लेख वाचताना हा संदर्भ लक्षात घ्यावा, ही नम्र विनंती. गॅलवे यांचा आता पराभव झालेला असला, तरी त्यांनी एक आशा अल्पकाळ का होईना निर्माण केली होती, हेही कमी महत्त्वाचे नाही.
- संपादक, १४ जुलै २०२४
.................................................................................................................................................................
या वर्षीच्या २९ फेब्रुवारीमध्ये ब्रिटनमधल्या राजकारणाला भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. रॉचडेल या खासदार मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवाराच्या भाषेतच सांगायचं म्हणजे, भूसांरचनिक तबकं (tectononic plates) थरथरली!
ब्रिटनमधल्या दोन प्रमुख, हुजूर आणि मजूर पक्षांची किंबहुना ते पक्ष अधिक त्यांचा ऐतिहासिक शत्रू उदारमतवादी पक्ष (Liberal Party) आणि अलीकडे उदयास आलेल्या सुधारणावादी पक्ष (Reform Party) यांची मतं एकत्र केली, तरी त्यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवून निवडून आलेल्या या विजयी उमेदवाराचं नाव आहे, जॉर्ज गॅलवे.
त्याने ‘ब्रिटिश कामगार पक्ष’ या नावाच्या पक्षाची स्थापना नुकतीच केली आहे. जॉर्ज गॅलवे हे नाव भारतात कुणाला ठाऊक नसेल. किंबहुना, ब्रिटनच्या बाहेरही फारसं कुणास ठाऊक नसेल. खुद्द ब्रिटनमध्येसुद्धा ही व्यक्ती कुप्रसिद्ध असण्याचीच शक्यता अधिक. जॉर्ज गॅलवेची माहिती कुणी ‘विकीपीडिया’वर काढायला गेला, तर तिथे त्याला गॅलवेची खंडीभर निंदाच वाचायला मिळेल. त्याच क्षणी तो प्रस्थापितांच्या ‘झारीतील शुक्राचार्य’ असला पाहिजे, अशी दाट शंकाही येऊ लागेल.
हा एके काळचा मजूर पक्षाचा (Labour Party) तीन दशकांचा खासदार. अनेक वेळा वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडून आलेला. हल्ली त्याला मजूर पक्ष आवडत नाही आणि मजूर पक्षाला तो! अमेरिकेत जसे ‘रिपब्लिकन’ आणि ‘डेमोक्रॅटिक’ पक्ष आहेत, तसे ब्रिटनमध्ये हे ‘हुजूर’ (Conservatives किंवा Tories) आणि ‘मजूर’.
थॅचर-रेगनच्या काळानंतर अमेरिका आणि विशेषत: ब्रिटन या देशांमधल्या अर्थकारणाचा आणि म्हणून राजकारणाचा, रंग बदलायला सुरुवात झाली. ब्रिटनमधल्या मजूर पक्षाने आणि अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाने आपली कष्टकरी जनतेला अनुकूल भूमिका सोडून उजवीकडे सरकायला सुरुवात केली. इतकी की हुजूर आणि मजूर या दोन्ही पक्षांच्या आंतरराष्ट्रीय आणि अर्थकारणी राजकारणात बोटभरही अंतर राहिलं नाही. जॉर्ज गॅलवे थोड्याशा अश्लील भाषेत त्यांना एका ढुंगणाचे दोन कुल्ले म्हणतो! या निवडणुकीत दोन्ही कुल्ल्यांवर मी एकेक सणसणीत झापड मारली, हे वरती भाष्य!
गॅलवेचा हादरा
मजूर पक्षाचा जो उमेदवार गॅलवेविरुद्ध उभा होता, त्याने कुठे तरी पॅलेस्तिनी लोकांना न्याय मिळाला पाहिजे, असं वक्तव्य केलं म्हणून मजूर पक्षाने त्याचा पाठिंबा काही काळ काढून घेतला होता. मजूर पक्षाच्या अनुपस्थितीमुळे गॅलवे जिंकला, अशी मल्लिनाथ हुजूर पक्षाने केली, यांतच दोन्ही पक्षांचे आपसातील प्रेमभाव कळून चुकतात. आज सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षाला केवळ सात टक्केच मतं मिळावीत, याची तरी कमीत कमी लाज त्या पक्षाने बाळगायला पाहिजे होती. विजयानंतर गॅलवेने मजूर पक्षाचा नेता कीर स्टार्मर याला उद्देशून सांगितलं, ‘स्टार्मर, हा विजय पॅलिस्तिनी लोकांचा आहे.’
गॅलवेच्या निवडून येण्याने प्रस्थापितांना एवढा हादरा बसला की, ब्रिटनच्या पंतप्रधानांना घराबाहेरील पायऱ्यांवर उभं राहून निषेधाचं दणदणीत भाषण ठोकावं लागलं. अशी पंतप्रधानांची भाषणं फक्त युद्धासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी होतात. ब्रिटनच्या उदारमतवादी आणि लोकशाही परंपरेला या निवडणुकीने काळिमा लावला. अशा अतिरेकी आणि वंशवादाने बरबटलेल्या दहशतवादी राजकारणाने सर्व सुविचारी लोकांना धक्का बसला आहे, हा त्या भाषणाचा मथितार्थ.
पोटनिवडणुकीत निवडून येणाऱ्या खासदाराला दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हात धरून लोकसभेत घेऊन यायचं, ही तिथली परंपरा. पण दोन्ही पक्ष गॅलवेवर इतके रागावले होते की, त्यांनी त्याला लोकसभेत घेऊन यायला नकार दिला. अशा परिस्थितीत ती जबाबदारी लोकसभेच्या सर्वांत बुजुर्ग नेत्यावर पडते. त्याप्रमाणे तो नेता गॅलवेला घेऊन लोकसभेत आला. पण निषेध म्हणून त्याने आपल्या गळ्याला युक्रेनचा झेंडा गुंडाळला होता. ब्रिटनने लुडबूड करून युक्रेनचं वाटोळं केलं, या मताचा गॅलवे आहे. तेव्हा हा सारा प्रपंच गॅलवेला डिवचण्याकरता होता.
गॅलवेचा उदय
गॅलवेचा जन्म १९५४मध्ये स्कॉटलंडमधील डंडी नावाच्या गावात एका गरीब, मूळच्या कॅथलिक आयरिश कामगाराच्या कुटुंबात झाला. त्याचे वडील कारखान्यात काम करत असत, तर आई झाडलोटीची कामं करी. गॅलवेनं तरुणपणीच मजूर पक्षाचं काम करायला सुरुवात केली. वयाच्या १३व्या वर्षी तो मजूर पक्षाचा सभासद झाला आणि १७व्या वर्षी स्कॉटलंडच्या मजूर पक्षाचा अध्यक्ष झाला. तरुण वयातच त्याने समाजकारणात आपलं कर्तृत्व दाखवलं.
१९व्या वर्षी ‘दारिद्र्य निर्मूलन’ संघटनेचा तो सचिव झाला. एडिनबरो विद्यापीठातून त्याला इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयांत पदवी मिळाली. विद्यार्थिदशेत त्याने व्हिएटनामयुद्धविरोधी चळवळीत भाग घेतला. २२व्या वर्षी तो डंडी शहरातून नगरसेवक म्हणून निवडून आला. तेव्हाचा मजूर पक्ष कामगारांशी निष्ठा असलेला ‘जुना मजूर’ पक्ष होता. १९८७ साली तो प्रथम मजूर पक्षाचा खासदार झाला.
१९८०च्या दशकात इंग्लंड-अमेरिकेचं अर्थकारण बदलायला सुरुवात झाली होती. उत्पादनक्षेत्रातून बाहेर पडून अर्थकारणाने सेवाक्षेत्राचं महात्म्य गायला सुरुवात केली होती. (त्याचे दुष्परिणाम आता जाणवताहेत. चीनच्या नावानं बोटं मोडण्यापलीकडे मात्र आता काही करता येत नाहीये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या म्हणण्याप्रमाणे, चीननं तुमचं जेवण पळवलं!)
थॅचर-रेगन यांनी कामगार संघटनांवर हल्ला करायला सुरुवात केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन यांनी १९८२मध्ये हवाई वाहतूक नियंत्रकांचा संप तोडला. थॅचरबाई त्याच्याही पुढे गेल्या. त्यांनी १९८५मध्ये कोळशाच्या खाणींतील कामगारांचा संप तर निर्दयपणे चिरडून काढलाच आणि शिवाय इंग्लंडमधल्या बऱ्याचशा खाणी बंद केल्या. त्याउपर उरलेल्यांचं खाजगीकरण करून टाकलं. असल्या धोरणांचे दूरगामी परिणाम कालांतराने भोगावे लागतात. एके काळी पोलाद उत्पादनात सर्व जगात अग्रक्रमांकावर असलेला ब्रिटन आज २५व्या स्थानी गडगडला आहे!
मजूर पक्ष भरकटला
१९९५च्या सुमारास माजी पंतप्रधान टोनी ब्लेअरने मजूर पक्षाचं नूतनीकरण सुरू केलं. मजूर पक्षाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर कामगार वर्गाची कास सोडून व्यावसायिक मध्यमवर्गाची कास धरली पाहिजे, असा निर्णय टोनी ब्लेअर प्रभृतींनी घेतला. ब्रिटनमधला कामगारवर्ग नाही, तरी नष्टच व्हायला आला होता. आपलं हुजूर पक्षापासून वेगळेपण दाखवण्याकरता मजूर पक्षाने मूळचे पोटापाण्याचे विषय सोडून सांस्कृतिक आणि लैंगिक विषयांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श होता, अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष.
डेमोक्रॅटिक पक्ष हा मजूर पक्षासारखा कामगार केंद्रित केव्हाच नव्हता. त्या पक्षाचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या काळात अमेरिकेतलं उत्पादनक्षेत्र पोखरून निघालं. गावच्या गावं ओसाड पडली. अमेरिकेत पूर्वी ज्या भौगेलिक भागाला औद्योगिक पट्टा म्हणत त्याला आता लोक गंजलेला पट्टा म्हणू लागले. चीनसारख्या पूर्व अशिया खंडातील देशांत वस्तूंचं उत्पादन सुरू झाल्याने पाश्चिमात्य देशांतील मध्यमवर्गाला त्या स्वस्तात मिळू लागल्या. कंपन्यांचे फायदे वाढले. स्टॉक मार्केट तेजीत आले. उच्च मध्यमवर्ग जसा बहरला, तसा कनिष्ठ वर्ग कंगाल झाला.
एका कामगाराचं मत गेलं, तरी त्याऐवजी आम्हाला तीन उच्च मध्यमवर्गाची मतं मिळतील, २०१६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळेस हिलरी क्लिंटनच्या प्रवक्त्याने काढलेले हे उद्गार आहेत. यातील पहिला भाग खरा ठरला, पण दुसरा नाही. याचा परिणाम काय झाला, हे जग जाणतं. हिलरी क्लिंटनसारख्या मुरब्बी राजकारण्याला ट्रॅपसारख्या नवशिक्या आणि वाचाळ उमेदवाराने हरवलं.
मजूर पक्षाची जी हुजुरी आणि गॅलवेचा दांडपट्टा
मजूर पक्षाच्या या नवीन रूपामुळे मध्यमवर्गातील एक मोठा गट हुजूर पक्षाऐवजी त्या पक्षात आला. त्याच्या जोरावर टोनी ब्लेअरने लोकसभेच्या सलग तीन निवडणुका चांगल्या बहुमताने जिंकल्या. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारणात पूर्वीसारखी स्वतंत्र भूमिका न घेता संपूर्णपणे अमेरिकाधार्जिणी भूमिका घ्यायची, असं नवीन मजूर पक्षानं ठरवलं.
ज्या ब्रिटनने व्हिएटनाम युद्धाच्या वेळेस अमेरिकेला साथ द्यायचं नाकारलं त्या ब्रिटनने इराक युद्धात सुरुवातीस बिल क्लिंटनला आणि नंतर बुश चेनी या आता बदनाम झालेल्या अमेरिकन जोडगोळीला उत्साहानं गळ्याशी धरलं. गॅलवेने लोकसभेमध्ये दोन्ही इराक युद्धांविरुद्ध सतत भाषणं ठोकली. १९९४मध्ये तो सद्दाम हुसेनला भेटायला गेला. त्याबद्दल प्रस्थापितांनी त्याची भरपूर नालस्ती केली. क्लिंटन यांनी इराकवर इतकी बंधनं घातली की, इराकमधील पाच लाख बालकं औषधपाण्यावाचून मृत्युमुखी पडली. (क्लिंटन यांच्या परराष्ट्रमंत्री मॅडलिन ऑलब्राइट यांना त्याबद्दल अनेक वर्षांनी विचारलं, तेव्हा त्यांनी इराकला जी किंमत मोजावी लागली ती यथायोग्यच होती, असं उत्तर दिलं!)
याउलट गॅलवेने या बंधनांविरुद्ध लोक्सभेत टीका केली. ‘मरियम अपील’ नावाची इराकी कॅन्सर रुग्णाच्या नावाने मुलांच्या मदतीसाठी संस्था त्याने सुरु केली. त्यामुळे चिडून जाऊन अमेरिकेतल्या सेनेटरनी त्याच्यावर ‘तेलाच्या बदल्यात अन्न’ या यूनोच्या उपक्रमात पैसे खायचा आरोप केला आणि त्याला सुनावणीस बोलवलं. गॅलवेने सुनावणीच्या वेळी सेनेटरना जे काही सुनावलं, अमेरिकेच्या खोटारडेपणाचा जो काही पाढा वाचला, ते ऐकून सेनेटर लोकांची ‘भीक नको, पण कुत्रा आवर’, अशी परिस्थिती निर्माण झाली.
गॅलवेच्या तिखट जिभेचे भरपूर नमुने लोकप्रिय आहेत. अमेरिकेच्या सेनेटरनी जेव्हा गॅलवेला ‘तू किती वेळा सद्दाम हुसेनला भेटलास?’ हा प्रश्न विचारला, तेव्हा त्याने उत्तर दिले, ‘तुमचा डॉनल्ड रम्सफेल्ड सद्दाम हुसेनला जितके वेळा भेटला, तितकेच वेळा मी भेटलो. फरक येवढाच की रम्सफेल्ड त्याला इराणविरुद्ध लढायला शस्त्रं विकायला गेला होता, तर मी त्याला यूनोच्या निरीक्षकांशी सहकार्य कर, हे सांगायला गेलो होतो.’
ब्रिटिश सैन्य इराकी सैन्यावर लांडग्यांसारखं तुटून पडतं, असं गॅलवे म्हणाला असा त्याच्याविरुद्ध अपप्रचार सुरू झाला, तेव्हा तो म्हणाला, ‘ब्रिटिश सैन्याला मी ‘लांडगे’ केव्हाच म्हणालो नाही. ते वाघ आहेत. त्यांचे नेते मात्र गधडे आहेत. मला गद्दार म्हणताहेत. मी गद्दार नाही. आपले नेते गद्दार आहेत. परक्या सत्तेचे बूट चाटून देशाचं वाटोळं करताहेत.’
पाश्चात्य देशांची अशी ही बदमाषी
टोनी ब्लेअरने ब्रिटनच्या लोकसभेत सद्दाम हुसेन ४५ मिनिटात अणुबॉम्ब टाकणार आहे, अशी आपल्या गुप्तहेर खात्याची माहिती आहे, असं भाषण ठोकलं. सद्दामचं ओसामा बिन लादनशी साटंलोटं आहे. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारती पाडण्यात सद्दामचा हात होता, वगैरे, वगैरे. ही सर्व युद्धाची नांदी होती. या भाषणाचा आधार घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष बुश यांनी इराकवरील युद्धाची घोषणा केली. (हे सर्व पूर्वनियोजितच होतं.) गॅलवेसारख्या जुन्या मजूर पक्षातील कार्यकर्त्यांनी इराकयुद्धाला जोरदार विरोध केला. गॅलवेने तर टोनी ब्लेअरवर खोटारडा असल्याचा आरोप केला. इथे त्याचं आणि अनेक जुन्या कार्यकर्त्यांचं नव्या मजूर पक्षाशी फाटलं. त्यांना २००३ साली पक्षातून काढलं गेलं.
इराकबरोबर आलं अफगाणिस्तान येथील युद्ध. ते मंदाग्नीवर वीस वर्ष उकळत होतं. ते सुरू असतानाच आली लिबियाविरुद्ध अमेरिका आणि युरोपची कारवाई. लिबिया हा सौदी अरेबियासारखा खनिज तेलाने संपन्न असलेला देश. अफ्रिका खंडातील सर्वात श्रीमंत. (तो लोकशाही देश नव्हता, हे खरं आहे. पण तसा विचार केला तर सौदी अरेबिया, कतारसारखे देशही लोकशाही नव्हते.)
वाळवंटातील जमिनीखालील पाण्याचा उपयोग करून वाळवंट सुजलाम सुफलाम करण्याच्या तेथील देशप्रमुख महंमद गदाफी याच्या योजना होत्या. त्याचप्रमाणे अफ्रिका खंडात डॉलरऐवजी सुवर्णाधारित नवीन चलन चालू करायचा त्याचा इरादा होता. पाश्चिमात्य राष्ट्रांना, विशेषत: फ्रान्सला, ते काही फारसं आवडलं नाही. (पश्चिम अफ्रिका फ्रान्सच्या सीएफए. या चलनाच्या अमलाखाली होती.) त्यांनी लिबियावर हल्ला केला आणि गदाफीला निर्घृणपणे ठार मारलं. आज त्या देशाचं रांडबाजार, गुलामबाजार आणि दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानात रूपांतर झालं आहे.
त्यानंतर पाळी आली सीरियाची. तिथे तिथला अध्यक्ष बशार असाद आपल्याच लोकांना विषारी वायूने ठार मारतो, असा त्याच्यावर आरोप लावला गेला. (जणू काही त्यांना मारण्याचा अधिकार फक्त पाश्चात्य देशांचाच आहे!) नेटो या लष्करी संघटनेने लिबियाप्रमाणेच सीरियामध्ये धर्मांध मुसलमानांना हाताशी धरलं. लिबियाचीच पुनरावृत्ती यशस्वीपणे होत असतानाच रशिया दोघांच्या मध्ये पडला आणि त्याने असादला वाचवलं. याचा सूड म्हणून नेटोने युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध बंड घडवून आणलं. त्यानंतर रशिया विरुद्ध नेटोपुरस्कृत युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं आणि चिघळलं. ते अजूनही शमलेलं नाही. शमण्याची चिन्हंही नाहीत. गॅलवेने या सर्व कांडात उघडपणे असाद आणि रशिया यांची बाजू घेतली.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
‘स्वाभिमानी’ गॅलवेचा प्रभाव
२००५मध्ये गॅलवेने ‘स्वाभिमान’ नावाचा पक्ष स्थापन केला. स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. काही जिंकल्या, काही हरल्या. मग नशिबी आला राजकीय विजनवास. या विजनवासात गॅलवेने लिखाण, मुलाखती घेणं, अशी नवी पत्रकारी कारकीर्द सुरू केली. ‘आरटी’ या वाहिनी वृत्तपत्रावर त्याचं लिखाण प्रामुख्याने प्रसिद्ध होऊ लागलं. पुढे त्यांच्यावर बंदी आली. तेव्हा त्याने स्वतः एक वाहिनी चालू केली.
युक्रेन युद्धास दोन वर्षांहून अधिक काळ होऊन गेला. ब्रिटनसह अनेक युरोपीय देशांची अब्रू निघाली. रशियावर घातलेली बंधनं त्यांच्यावरच उलटली. ब्रिटनची तीन वर्षांत चार सरकारं आली. विद्यमान हुजूर पक्षाचा आणि ‘भारताचा लाडका जावईबापू’ पंतप्रधानही जायच्या मार्गावर आहे. आपला हा सदा हसतमुख जावईबापू गेला, तर तीन वर्षांत ब्रिटनची पाच सरकारं होतील. इकडे मजूर पक्षाचीही लोकप्रियता ओसरायला लागली आहे. विशेषत: गाझामध्ये चाललेली मनुष्यहत्या पाहून सर्वसामान्य ब्रिटिश जनता नवीन पक्षाच्या शोधात आहे.
अशा पार्श्वभूमीवर गॅलवेचा विजय अनेकांना नव्या युगाची नांदीसमान भासतो आहे. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत त्याचा पक्ष कमीत कमी ५० उमेदवार उभे करणार आहे. जुन्या स्थितीवादी राजकारणाला विटलेल्या आणि आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या जनतेला तोच एक आशेचा किरण दिसतोय...
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. मोहन द्रविड फिजिक्समधील पीएच.डी. असून यांचे राजकारण, विज्ञान, इतिहास या विषयांवरील लिखाण वेगवेगळ्या मासिकांतून प्रसिद्ध होते. त्यांचे वास्तव्य अमेरिकेत असून त्यांचे ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक 'रोहन प्रकाशन'ने प्रसिद्ध केले आहे.
mohan.drawid@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment