ज्युलियन असांज : स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी सत्य लपवणाऱ्या व्यवस्थांचे खरे सत्य स्वतःच्या आयुष्याची मोठी किंमत मोजून जगापुढे आणणारा पत्रकार
पडघम - विदेशनामा
अभिजित वैद्य
  • ज्युलियन असांज
  • Sat , 13 July 2024
  • पडघम विदेशनामा ज्युलियन असांज Julian Assange विकीलिंक्स WikiLinks

नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच तत्त्वज्ञ अल्बर्ट कामूने पत्रकारितेबद्दल म्हटले आहे की, ‘स्वतंत्र पत्रकारिता चांगली किंवा वाईट असू शकते, पण एक गोष्ट मात्र निश्चित की, स्वातंत्र्याविना पत्रकारिता चांगली असूच शकत नाही.’ याचा अर्थ असा की, पत्रकारितेला अनिर्बंध स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यातून चांगले निष्पन्न होईलच असे नाही, पण पत्रकारितेचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यावर मात्र त्यातून चांगले निष्पन्न मात्र कधीच होणार नाही, हे निश्चित.

आपल्या शोधपत्रकारितेने अनेक पत्रकारांनी सत्तेची सिंहासने हालवून टाकली. आपल्या सिंहासनाला धक्का बसेल, या भीतीने अनेक सत्ताधाऱ्यांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली. पण एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान क्रांतीने जगातील व्यवस्थांपुढे जशी अनेक आव्हाने उभी केली, तशी पत्रकारितेपुढेही अनेक आव्हाने उभी केली. गोपनीय मानल्या जाणाऱ्या गोष्टी जर जनहितविरोधी असतील, तर त्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून बाहेर काढणे, हे अनैतिक मानायचे का?

एखाद्या देशातील सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधकांविरुद्ध वा एखाद्या समाजाविरुद्ध वा दुसऱ्या देशाविरुद्ध मानवतेला काळिमा फासणारी कृत्ये केली असतील, तर ती जगापुढे आणणे, हा गुन्हा आहे का? हे करणाऱ्या पत्रकाराचे स्वातंत्र्य मान्य करायचे की नाही? का या स्वातंत्र्यावर बंधने घालायची? जगापुढे हे प्रश्न नव्याने उभे राहिले, ते एकविसाव्या शतकातील ‘हॅकिंग’ नावाच्या गोष्टीमुळे.

यामुळे नैतिक आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता यांच्या नव्या व्याख्या करण्याची वेळ आली. ‘सत्ताधारी किंवा धनिकांची गुपिते फोडणे’ हा गुन्हा मानून ‘सत्य दडपले तरी चालेल’ अशी भूमिका नैतिक मानायची का ‘सत्य समोर आणणे’ हे कर्तव्य मानून, निर्भयपणे ते जगापुढे आणायचे, हा प्रश्न नव्याने निर्माण झाला.

एकविसाव्या शतकातील पत्रकारितेपुढे पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्या कृतीने दिले, ते ‘विकिलिंक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजने.

ज्युलियन असांज हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक असे व्यक्तिमत्त्व आहे की, ज्याने पत्रकारितेच्या पारंपरिक व्याख्याच बदलून टाकल्या. बदलत्या काळानुसार हे घडणे अपरिहार्य होते. विसाव्या शतकाचा अंत झाला तो संगणकाला जन्म देऊन. एकविसावे शतक आले ते माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची क्रांती घेऊन. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच संगणक परिपक्व होऊ लागले. अगणित कागदांवर अनंत अक्षरांच्या रूपात छापून, साठवले जाणारे ज्ञान आणि माहिती, संगणकाच्या छोट्या मेंदूत डिजिटल रूपात जाऊन बसायला लागली.

याबरोबरच जगातील सरकारांची धोरणे आणि गुपिते फायलींच्याऐवजी संगणकात बंदिस्त होऊ लागली. गोपनीयतेच्या नावाखाली सरकारी फायली कडेकोट बंदोबस्तात कुलूपबंद ठेवल्या जात. आता त्या सांकेतिक प्रणालींच्या कुलुपांमध्ये सुरक्षित राहू लागल्या.

संगणकानंतर पुढची क्रांती होती, इंटरनेटच्या वैश्विक महाजालाची. या महाजालाने जगातील संगणकांना एकमेकांशी जोडले. जग जवळ आले. ज्ञान आणि माहिती ही कोणाचीही मक्तेदारी राहिली नाही. पण माहितीचे खासगी किंवा गोपनीय स्वरूप राखणे गरजेचे होते. यासाठी सुरक्षेच्या असंख्य प्रणाली निर्माण झाल्या.

पूर्वीच्या काळी निरनिराळ्या कारणांसाठी गोपनीय सरकारी माहिती बाहेर काढण्याचे काम पत्रकार करत होतेच. सत्ताधीश, धनाधीश वा समाजातील विविध बलवान घटक यांची जनहितविरोधी कृष्णकृत्ये बाहेर काढण्यासाठी अनेक शोध पत्रकार जिवाची बाजी लावत आणि आजही लावत आहेत. संगणक आणि इंटरनेट युगात माहिती गुप्त ठेवणाऱ्या सांकेतिक डिजिटल प्रणाली भेदणारे तज्ज्ञ निर्माण झाले, ज्यांना ‘हॅकर्स’ म्हटले जाऊ लागले! आधुनिक तंत्रज्ञान कोळून प्यायलेली ही माणसे. हॅकिंग या तंत्राचा वापर अनेक लोक चोऱ्या करण्यासाठी करू लागले. दरोडेखोरांची एक आधुनिक जमात निर्माण झाली.

त्याचबरोबर लोकांची माहिती, डेटा, लोकांना फेसबुकसारख्या सुविधा विनामूल्य देण्याच्या जाळ्यात ओढून त्यांच्या अपरोक्ष जगातील कॉर्पोरेट वा सत्ताधाऱ्यांना विकणारे मार्क झुकरबर्गसारखे नवे धंदेवाईकही निर्माण झाले. हेच आधुनिक तंत्रज्ञान घेऊन एक नवी पत्रकारिताही उभी राहिली. शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकारासारखा वेष वगैरे पालटून कुठेही न जाता आपल्या घरातून, आपल्या संगणकामार्फत, जगातील कोणत्याही, अगदी अभेद्य अशा संगणकांना भेटून, हवी ती माहिती काढणारे आधुनिक संगणकीय ‘शोधपत्रकार’ निर्माण झाले. एक नवी पत्रकारिताच जन्माला आली. या ‘हॅकिंग पत्रकारिते’ला जन्म देणाऱ्या पत्रकारांमध्ये ज्युलियन असांज याचे नाव अग्रणी घ्यावे लागेल.

ऑस्ट्रेलियात जन्माला आलेल्या, अत्यंत अस्थिर बालपण जगलेल्या ज्युलियन नावाच्या या मुलाला हे जगावेगळे करण्याची प्रेरणा कशी मिळाली, हे सांगणे कठीण आहे. कोणी त्याच्या या बंडखोर आणि व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा वृत्तीची पाळेमुळे त्याच्या आईचा घटस्फोट, दुसरा विवाह, जगण्यासाठी बदललेली ३०पेक्षा अधिक गावे, त्यामुळे वयाच्या १४ वर्षांपर्यंत ज्युलियनला बदलाव्या लागलेल्या तेवढ्याच शाळा आणि यांत जळून गेलेले त्याचे बालपण, या अस्थिरतेत शोधू शकतील.

आयुष्यातील अस्थिरता, विशेषतः बालपणातील माणसाला बंडखोर आणि बेदरकार बनवते, त्याचबरोबर स्वतंत्र मनोवृत्तीचीही बनवते. यातूनच त्याला हॅकिंगची आवड खूप लहान वयात लागली असावी. ‘हॅकिंग’ हा कोणत्याही व्यवस्थेवरचा हल्ला असतो. सेंट्रल क्विन्सलँड आणि मेलबर्न विद्यापीठात त्याने गणित, भौतिकशास्त्र आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षण घेतले खरे, पण पदवी काही पूर्ण केली नाही. वयाच्या १६व्या वर्षीच ‘मॅडेक्स’ या टोपणनावाने त्याने हॅकिंग सुरू केले आणि अल्पावधीतच तो एका कुशल हॅकर म्हणून प्रसिद्ध झाला. जी यंत्रणा हॅक करू, तिला कोणतीही इजा करायची नाही, हे बंधन त्याने स्वतःवर घालून घेतले. यानंतर त्याने जगभरातील अनेक संगणकीय प्रणाली हॅक करायची सुरुवात केली. अगदी अमेरिकेन लष्कराचे मुख्यालय पेंटॅगोन'च्या यंत्रणाही त्याने तरुण वयातच हॅक केल्या.

ज्युलियनने त्याच्या दोन मित्रांबरोबर ‘इंटरनॅशनल सबवरसिव्हज’ नावाचा एक हॅकिंग ग्रुप स्थापन केला. नासाच्या संगणकावर ऑस्ट्रेलियामधून १९८९मध्ये झालेल्या ‘बँक वर्म’ या सुप्रसिद्ध हल्ल्यामागे असांज असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला, जो कधीही सिद्ध झाला नाही. नासाचे स्पेस शटल ‘गॅलिलिओ’ या अवकाश यानाला अवकाशात घेऊन उडण्याच्या आदल्या दिवशी हा वर्म नासाच्या संगणकांमध्ये घुसवण्यात आला. या गॅलिलिओमध्ये इंधन म्हणून प्लुटोनियमचा वापर करण्यात आला होता.

नासाच्या ‘चॅलेंजर’ नावाच्या अवकाश यानाचा तीन वर्षांपूर्वी अवकाशात स्फोट झाला होता. गॅलिलिओला अवकाशात नेणाऱ्या या यानाचा असाच स्फोट झाला, तर किरणोत्सर्गी प्लुटोनियमचा फ्लोरिडा राज्यावर सडा पडून लाखो लोक मरण्याची शक्यता होती. अणुऊर्जाविरोधी गटांचा याला विरोध होता. नासाच्या संगणकात घुसवलेल्या या ‘वैंक वर्म’ला एक संदेश जोडलेला होता, ‘तुम्ही नेहमी शांततेच्या गप्पा करता आणि मग युद्धाची तयारी सुरू करता.’

अणुऊर्जा आणि अण्वस्त्रे यांना विरोध करणाऱ्या ‘मिडनाईट ऑइल’ या ऑस्ट्रेलियन रॉक बँडच्या ‘ब्लॉसम्स अँड ब्लड’ या सुप्रसिद्ध गाण्यातून हे वाक्य उचलण्यात आले होते. १९९१मध्ये असांजच्या ग्रूपने अमेरिकन लष्कराच्या ‘मिलनेट’ या संगणकांवर हल्लेच्या हल्ले केले. तेही सिद्ध झाले नाहीत.

ऑस्ट्रेलियाच्या टेलिकम्युनिकेशन यंत्रणेवर हल्ले केले म्हणून ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी १९९६मध्ये त्याच्यावर खटले भरले. यंत्रणा बिघडवून टाकण्याचा आरोप ठेवण्यात आला, जो त्याला मान्य नव्हता. त्याला २९० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. असांजने आपले गुन्हे कबूल करून शेवटी दंडावर सुटका करून घेतली. १९९३मध्ये त्याने ऑस्ट्रेलियन पोलिसांना चाईल्ड पॉर्नोग्राफीची साखळी शोधण्यात केलेली मदत आणि ‘बॉम्ब कसा तयार करायचा’ हे कोणीतरी इंटरनेटवर टाकलेले पुस्तक काढून घेण्यासाठी केलेली मदत कामी आली.

ऑस्ट्रेलियातील पहिली सार्वजनिक इंटरनेट सेवा देणारी कंपनी त्याने सुरू केली. या काळात त्याने इंटरनेटमधील माहिती सुरक्षित ठेवण्याच्या अनेक प्रणाल्या तयार केल्या. १९९८मध्ये त्याने ‘अर्थमेन टेकनॉलॉजी’ ही कंपनी काढून ‘लिनक्सकेर्नेल’ हे हॅकिंग आयुध निर्माण केले. स्थानिक भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी त्याने सबर्बिया पब्लिक नेटवर्कला मदत केली. २००६मध्ये त्याने काही समविचारी सहकाऱ्यांबरोबर ‘विकिलिंक्स’ या कंपनीची स्थापना केली. कॉर्पोरेट जगाचा वा राजकीय व्यवस्थांचा अप्रामाणिकपणा, दडपशाही, करचुकवेगिरी वा भ्रष्टाचार बाहेर काढणे, हे विकिलिंक्सचे उद्दिष्ट.

ही कंपनी राजकीय आणि कॉर्पोरेट जगतासाठी खलनायक बनली हे सांगण्याची गरज नाही. येमेनमधील ड्रोन हल्ले, अरब जगातील भ्रष्टाचार, केनियन पोलिसांनी कायदा धाब्यावर बसवून केलेल्या हत्या, राजकीय हत्या, तेथील मलेरियामुळे होणारे बालमृत्यू, चीनमधील तिबेट बद्दलचा असंतोष, पेरूमधील पेट्रोगेट तेल घोटाळा, असे एकामागून एक ‘लिक्स’ बाहेर पडू लागले.

केनियातील स्टोरीबद्दल त्याला २००९मध्ये ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल न्यू मिडिया’ पारितोषिक मिळाले. २००८मध्ये त्याने स्वीस बँकेच्या कृत्यांचा पर्दाफाश केला. त्याच्या मते आर्थिक संस्था या कायद्याबाहेर काम करतात. त्याचा हा अहवाल न्यायालयाच्या मदतीने दाबण्याचे प्रयत्न अपयशी ठरले, तो बाहेर आला आणि ‘विकिलिंक्स’ हे नाव जगभर गाजले. २०१०मध्ये विकिलिंक्सने अमेरिकेने २००७मध्ये बगदादवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या चित्रफिती ‘कोलॅटरल मर्डर’ या शीर्षकाखाली जाहीर केल्या. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांबरोबर दोन पत्रकारही मारले गेले होते. अमेरिकेची युद्धगुन्हेगारी जगापुढे आली.

२०१०मध्ये ‘विकिलिंक्स’ने ‘अफगाण युद्ध रोजनिशी’ प्रसिद्ध केली. २०१०मध्ये ‘केबलगेट’ फायली या नावाखाली अमेरिकेच्या राजनैतिक फायली उघड केल्या. यांत अमेरिका ही युनो आणि अनेक जागतिक नेत्यांवर करत असलेली हेरगिरी, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांमधील तणाव, जगातील भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराचा सहारा घेत अमेरिकेने घडवलेली ‘अरब स्प्रिंग’ ही क्रांती, या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.

भडकलेल्या अमेरिकेने ‘विकिलिंक्स’ची पाळेमुळे खणून काढायची सुरुवात केली. २०११च्या इजिप्त क्रांतीच्या वेळी मुबारकने मोबाईल यंत्रणा बंद केल्यावर असांजने हे थांबवण्याचा प्रयत्न केला. पुढील काही वर्षांमध्ये विकिलिंक्सने ‘गौतेन्यामोबे फाईल्स’, ‘सीरिया फाईल्स’, ‘किसिंजर केबल्स’, ‘सौदी केबल्स’ अशा अनेक फाईल्स प्रसिद्ध केल्या. जुलै २०१५पर्यंत ‘विकिलिंक्स’ने एकूण १० कोटीपेक्षा अधिक कागदपत्रे प्रसिद्ध केली.

या साऱ्यांवरून हे सहज लक्षात येईल की, एक माणूस जेव्हा जगभरातील सत्तांपुढे आव्हान उभे करतो, तेव्हा त्या व्यक्तीला चिरडण्यासाठी जगभरातील सत्ता एक होत असतात. असांजच्या बाबतीत हेच घडले.

असांजवर पहिला हल्ला झाला तो त्याने स्वीडनमध्ये अनेकदा विनयभंग केले, असा आरोप करण्यात येऊन.

२७ सप्टेंबर २०१० रोजी तो स्वतः इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर त्याला स्वीडनमध्ये त्याच्या अनुपस्थितीत अटक करण्यात आली. हे आरोप न्यायालयांत टिकले नाहीत. ३० नोव्हेंबर २०१० रोजी इंटरपोलने असांजला ‘मोस्ट वाँटेड’ म्हणून जाहीर केले. शेवटी असांज लंडन पोलिसांपुढे स्वत: हजर झाला. त्याची जामिनावर सुटका झाली. पण स्वीडिश पोलीस त्याचे प्रत्यर्पण मागत होते. दरम्यान अमेरिकेने ‘विकिलक्स’ची चौकशी सुरू केली. २०११मध्ये ‘विकिलिंक्स’चा एक कर्मचारी फोडण्यात अमेरिकेने यश मिळवले. असांजने रशियाशी हात मिळवणी केल्याचे आरोपही ठेवण्यात आले. पण अमेरिकेने त्याच्यावर ठेवलेला सर्वांत महत्त्वाचा आरोप म्हणजे त्याने चेल्सी मॅर्निंग या तरुणीकडून तिने अमेरिकेच्या संरक्षण खात्याशी संबंधीत हॅक केलेली कागदपत्रे ‘विकिलिंक्स’कडे घेऊन ती प्रसिद्ध केली.

असांजपासून प्रेरणा घेऊन अमेरिकेच्या नासामधील प्रोग्रामर एडवर्ड स्नोडेनने जगभर अमेरिका करत असणाऱ्या जासूशीबद्दलची माहिती प्रसिद्ध केली. हे योग्य का अनैतिक का, हा ‘देशद्रोह’ या मुद्द्यांवरील चर्चेने जग घुसळून निघाले. स्नोडेनच्या मते जगातील महासत्तेला वा कोणत्याही राष्ट्राला दुसऱ्यांवर जासूसी करण्याचा अधिकार असू शकत नाही. हे कृत्यच मुळात अनैतिक आणि जनतेच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. त्याचा पर्दाफाश करण्यात काहीही गैर नाही. स्नोडेनला पुढे रशियाने नागरिकत्व देऊन आश्रय दिला.

या सर्व घडामोडींमुळे शेवटी अमेरिका त्याचे यशस्वी प्रत्यर्पण करून त्याला अमेरिकेतली तुरुंगात सडवेल, हे लक्षात आल्यावर असांजने २०१२मध्ये लंडनमधील इक्वाडोर देशाच्या दूतावासात आश्रय घेतला. इक्वाडोरचे अध्यक्ष राफेल कोरिया यांनी त्याला मंजुरी दिली. असे असले तरी हा एक प्रकारचा बंदीवासच होता. २०१३मध्ये त्याने या बंदीवासातूनच ‘विकिलिंक्स पार्टी’ची स्थापना करून मायदेशातील विक्टोरिया मतदारसंघातून लोकसभेची अयशस्वी निवडणूक लढवली. अंतर्गत वादातून हा पक्ष शेवटी फुटला आणि अस्तंगत झाला. असे असूनही त्याला पाठिंबा देण्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गज त्याला त्याच्या या विजनवासांत भेट देत राहिले.

२०१६मध्ये हिलरी क्लिंटन या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार बनल्यावर असांजने त्या ‘अमेरिकेला सतत युद्धांत ढकलतील’ असे म्हणून त्यांना प्रखर विरोध केला. त्याचबरोबर अध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीच्या वेळी डेमोक्रेटिक पक्षाने क्लिंटन यांच्याबाबत पक्षपात करून बर्नी सँडर्स यांचा पत्ता कापल्याचे पुरावेही ‘विकिलिंक्स’ने जाहीर केले. पण पुढे हिलरी यांच्या विरोधांत उभे असणाऱ्या ट्रम्प यांना रशियाने मदत केली आणि हिलरी यांच्या विरुद्ध माहिती रशियाने ‘विकिलिंक्स’ला पुरवली, असा आरोप ठेवण्यात आला.

जुलै २०१६मध्ये डच टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत असांजने डेमोक्रेटिक पक्षाचे इ-मेल त्यांचाच कर्मचारी सेठ रिचने फोडले आणि त्यामुळेच त्याचा खून झाला असे सांगितले. मार्च २०१७मध्ये ‘विकिलिंक्स’ने सीआयएची कागदपत्रे ‘व्हॉल्ट ७’ या नावाखाली प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. यांत अनेक माहितींबरोबर असांजचे अपहरण वा हत्या करण्याची चर्चा होती. ऑगस्ट २०१७मध्ये असांज कॅटेलोनिया स्वतंत्रता चळवळीत सामील झाला. त्यामुळे स्वाभाविकपणे स्पेनच्या सरकारचा तो शत्रू बनला.

डिसेंबर २०१७मध्ये इक्वाडोर सरकारने असांजला नागरिकत्व बहाल केले. मार्च २०१८मध्ये असांजने घेतलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय भूमिकांमुळे इक्वाडोर सरकारने त्याचे इंटरनेट बंद केले, त्याला कोणालाही भेटण्यास मनाई केली. असांजने त्याच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली असल्याचा आरोप करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, पण न्यायालयाने ते अमान्य केले. प्रत्यक्षात असांजला आश्रय दिल्यावर इक्वाडोर सरकारने त्याच्या खोलीमध्ये एका एजन्सीमार्फत कॅमेरे बसवले होते. या एजन्सीने या सर्व चित्रफितींचे चित्रीकरण गुपचूप अमेरिकेला पुरवले होते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

११ एप्रिल २०१९ रोजी इक्वाडोर सरकारने त्याचा आश्रय रद्द केला. जुलै २०१९मध्ये त्याचे नागरिकत्वही रद्द करण्यात आले. त्याच दिवशी लंडन पोलिसांनी त्याला अटक केली. आता मात्र त्याला हालअपेष्टा आणि छळ यांना सामोरे जावे लागणार, हे उघड होते. ते घडलेच आणि त्याची तब्येतही ढासळू लागली. ऑस्ट्रेलियातील काही खासदारांनी तुरुंगात त्याला भेट देऊन त्याच्या सुटकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असा आग्रह धरला. पंतप्रधान अंथनी अल्बानीज यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडे शब्द टाकला. शेवटी असांजने पण अमेरिकन सरकारशी तह केला, आणि जुलै २०२४मध्ये त्याची सुटका झाली.

ज्युलियन असांज हा बलिदान करणारा क्रांतिकारक नाही. तो सत्याग्रही पण नाही, पण तरीही स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी सत्य लपवणाऱ्या व्यवस्थांचे खरे सत्य स्वतःच्या आयुष्याची मोठी किंमत मोजून जगापुढे आणणारा पत्रकार म्हणून त्याच्याकडे पाहावे लागेल. ही पत्रकारिता महात्मा गांधी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता नाही. तिची जातकुळी वेगळी आहे. पण तरीही ज्युलियन असांज या माणसाच्या लढवय्येपणाची दखल इतिहासाला कायमची घ्यावी लागेल. त्याने राजकीय व्यवस्थांच्या आणि बड्या कंपन्यांच्या भ्रष्टाचाराला जगापुढे आणले. त्याने मानवी अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या देशांना जगापुढे उघडे केले.

अशा व्यक्तीला व्यवस्था माफ करत नसतात. यामुळेच असांजचे आयुष्य यापुढेही धोक्यातच राहील आणि हे माहीत असूनही तो ‘लिक्स’ करतच राहील. त्याने केलेल्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा व्यक्तिगत स्वार्थ निश्चितच नव्हता. उलट धोके होते आणि तो ते घेत राहिला. जग अधिक चांगले करण्यासाठी जे वाईट आहे, ते कोणीतरी जगापुढे आणावे लागते. ज्युलियन असांज कोणताही तात्त्विक आव न आणता, हे करत राहिला. किमान त्यासाठी तरी जगाने त्याचे ऋण मानायला हरकत नाही.

‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाच्या जुलै २०२४च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

लेखक डॉ. अभिजित वैद्य ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकाचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.

puja.monthly@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......