अजूनकाही
भाई जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. त्यांचा पराभव फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नाही, तर डाव्या विचाराचा पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे आता भवितव्य काय, याचा गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. जयंत पाटील फार काही डावे राजकारण, चळवळ पुढे नेत होते असं नाही, पण त्यांच्यामुळे मोठा इतिहास असलेल्या पक्षाचे संसदीय राजकारणात एक प्रतिनिधित्व दिसत होते. आता पहिल्यांदाच विधिमंडळात शेकापचा एकही सदस्य नाही.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत गणपतराव देशमुख यांच्यासारखे पक्षाचे वरिष्ठ नेते सभागृहात होते. पण गेल्या दोन दशकांत पक्षाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. याची कारणं अनेक असतील, पण या काळात जयंत पाटील पक्षाचे सरचिटणीस असल्याने त्यांच्या नेतृत्वाबाबत चर्चा होणं क्रमप्राप्त आहे. आता जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला, कोणाची मतं फुटली वगैरे बाबी हा तांत्रिक भाग झाला प्रश्न असा आहे की, स्वातंत्र्य आंदोलनात आणि नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाचं योगदान असलेल्या पक्षाची आज अशी अवस्था का झाली?
जगभर एकूणच डाव्या चळवळीची पिछेहाट होत असताना शेकापचे काय वेगळं होणार, हे ठीक आहे, पण जयंत पाटील यांना संधी असताना त्यांनी डाव्या चळवळीचं नेतृत्व केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी आणि काही पत्रकार मित्रांनी त्यांना एकदा सुचवलं होतं की, ‘भाई, राज्यात एक पोकळी आहे. प्रस्थापित पक्षाच्या विरोधात आपण उभं राहू शकता.’ पण आमच्या दीडशहाणेपणाला भाई का म्हणून भाव देतील?
शेकापची स्थापना १३ जून १९४८ रोजी झाली. केशवराव जेधे, भाई माधवराव बागल, नाना पाटील, यांच्या सारख्या मोठ्या नेत्यांनी काँग्रेससोबत मतभेद झाल्यावर हा पक्ष स्थापन केला होता. काँग्रेस पक्षात राहून मार्क्सवादी विचारानं प्रभावित असलेल्या या नेत्यांनी शेकापला जन्म दिला.
देशाची पहिली लोकसभा निवडणूक जेधे पुणे मतदारसंघात लढले होते, पण त्यांचा पराभव झाला. नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि बारामती मतदारसंघात निवडून आले. हा इतिहास एवढ्यासाठी सांगितला की, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात डाव्या, पुरोगामी, आंबेडकरवादी पक्षांना कवेत घेण्याचा प्रयत्न तेव्हापासूनच केला होता. त्यात त्यांना यश आलं.
हा झाला एक भाग, पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि नंतरच्या संसदीय राजकारणात शेकापचे फार मोठे योगदान आहे. शेतकरी, कामगार वर्गाचे प्रश्न या पक्षाने धसास लावण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळात या पक्षाचे महत्त्वाचे स्थान होते. कधी काळी प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका शेकापने पार पाडलेली आहे. तसेच लोकसभेतही शेकापचा आवाज असायचा. विधिमंडळात अतिशय प्रभावी नेते या शेकापने दिले आहेत.
आणीबाणीनंतर शंकरराव चव्हाण सारख्यांना शेकापच्या केशवराव धोंडगे यांनी धूळ चाललेली आहे. शेकापचे एकापेक्षा एक नेते विधिमंडळात असल्याचे, पण एन. डी. पाटील आणि नंतर जयंत पाटील यांना हा दबदबा राखता आला नाही. राज्याच्या अनेक विभागात मोठी ताकद असलेला पक्ष रायगडपुरता, नंतर अलिबाग आणि आता शून्यावर आला आहे. जनतेचे प्रश्न अतिशय तीव्र होत असताना आणि आजही पुरोगामी पक्षांना वाव असताना जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप फार काही कामगिरी करू शकला नाही.
याची कारणं जशी सामाजिक, राजकीय परिस्थितीत आहेत, तसेच जयंत पाटील यांच्या स्वभावात आणि नेतृत्व क्षमतेत आहेत. खरं तर जयंत पाटील यांना मोठा वारसा लाभलेला आहे. त्यांचे आजोबा ना. ना. पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. राज्याच्या पहिल्या विधिमंडळाचे ते सदस्य होते. देशात पहिला शेतकरी संप डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ना.ना. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेजारी येथील जयंत पाटील यांच्या घरी अनेकदा भेट दिलेली आहे. घटना समितीबाबत या घरात बसून बाबासाहेबांनी चर्चा केलेली आहे. (हे मूळ घर जयंत पाटील यांच्या कुटुंबीयांनी जतन केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या घरी यायचे, याचा दिवंगत मीनाक्षी पाटील यांना भारी अभिमान वाटायचा.) तर जयंत पाटील यांच्या घराण्याचं महाराष्ट्राच्या सामाजिक राजकिय क्षेत्रात मोठं योगदान आहे.
…तर जयंत पाटील हे एन .डी. पाटील यांच्या नंतर शेकापचे सरचिटणीस झाले. सरचिटणीस हे पद डाव्या विचाराच्या पक्षात सर्वोच्च असतं. शेकापची रचना कम्युनिस्ट पक्षासारखी आहे. केंद्रीय समितीत निर्णय होत असतात. तर जयंत पाटील यांच्याकडे नेतेपद आल्यानंतर राजाच्या राजकारणात एक मोठी घटना घडली होती.
अलिबागच्या जिल्हा परिषदेच्या सत्तेत त्या वेळी राज्यमंत्री असलेल्या सुनील तटकरे यांनी शब्द पाळला नाही. तटकरे यांच्या राष्ट्रवादीची मतं फुटल्यानं शेकापच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे शेकापने विलासराव देशमुख सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आणि शरद पवार यांना ही मागणी मान्य करावी लागली होती.
त्यानंतर पुन्हा एकदा जयंत पाटील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले, जेव्हा विरोधी पक्षनेते असलेल्या नारायण राणे यांनी विलासरावांचे सरकार पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही शेकापचे पाच आमदार होते. यापैकी तीन आमदार रायगड जिल्ह्यातील होते. अशा काही प्रसंगी जयंत पाटील यांनी आपला आगरीबाणा दाखवला होता, पण तो पक्ष वाढीसाठी नाही, तर स्वतःच्या फायद्यासाठी वापरला.
जयंत पाटील हे राज्यातील, देशातील एक प्रमुख उद्योगपती आहेत. पीएनपी ही त्यांची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. तर उद्योग आणि राजकारण सांभाळण्याची मोठी कसरत जयंत पाटील यांना करावी लागायची. गेल्या काही वर्षांत राजकारणासाठी उद्योग आणि उद्योगासाठी राजकारण अशी अवस्था जयंत पाटील यांची झाली होती. मधल्या काळात ते पक्षाच्या जुन्या नेत्यांना बाजूला करून नव्यानं पक्षात आलेल्या बिनबुडाच्या लोकांचा सल्लागार म्हणून जयंत पाटील यांनी जवळ केले.
आजच्या जयंत पाटील यांच्या अवस्थेला हेही एक कारण आहे. पक्षाचं जुनं मुखपत्र असलेलं ‘संग्राम’ हे पाक्षिक जयंत पाटील यांच्या काळात बंद पडलं. त्यांचा स्वभाव ‘मीपणा’कडे झुकला होता, त्यामुळे ते स्वतःशिवाय इतर कशाचाच विचार करत नाहीत. पक्षात केंद्रीय समितीचे महत्त्व आणि विचारविनिमय करण्याची परंपरा जयंत पाटील यांच्या काळात जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे पक्ष वाढायला मर्यादा आल्या.
तसेच पक्षाचं धोरण या काळात धरसोडीचं राहिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदावर असताना जयंत पाटील आघाडीत होते. मध्येच त्यांनी शिवसेनेशी जवळीक केली होती आणि काही काळ त्यांना राज ठाकरेसोबत भविष्य दिसत होते. त्यामुळे निश्चित असा कार्यक्रम नाही, कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण नाही कोणतं मोठे आंदोलन नाही, अशी जयंत पाटील यांची सरचिटणीस म्हणून कामगिरी आहे.
२४ वर्षांपूर्वी ते विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले. सलग तीन वेळा त्यांना संधी मिळाली. या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्या त्या काळातील राजकीय परिस्थितीत त्यांना संधी मिळत गेली. अर्थात या निवडणुकीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ किवा क्षमता त्याच्याकडे आहेच. या वेळी त्यांचं गणितच चुकलं.
‘इंडिया’ आघाडीची प्रक्रिया सुरू असताना राज्यात डाव्या आणि पुरोगामी पक्षांनी पुरोगामी लोकशाही आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यात हितेंद्र ठाकूर यांचा पक्षही होता. पण ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी जयंत पाटील यांना विधानपरिषदचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी या नवीन आघाडीतून लक्ष काढून घेतलं. त्यामुळे यावेळी त्यांना पुरोगामी पक्षांच्या आमदाराने मतदान केलं नाही.
आता जयंत पाटील महाविकास आघाडी सोबतच राहणार आहेत, तसा फारसा वेगळा पर्याय नाही त्यांच्याकडे. पण शेकाप पुन्हा उभारी घेईल का, याचं उत्तर काळच देईन.
मी जयंत पाटील यांच्या मालकीच्या ‘कृषीवल’ दैनिकात तीन वर्षं होतो. त्या वेळी आम्ही राज्यात गाजलेला सिंचन घोटाळा बाहेर काढला होता. सुनील तटकरे या खात्याचे मंत्री होते. मी तटकरे यांच्या गावी रोहा आणि सुतारवाडीला गेलो होतो. तटकरेंच्या संपत्तीची खूप माहिती जमवली होती. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर केली. तटकरे यांच्या चौकशीसाठी त्यांनी विधानपरिषदेत आवाज उठवला.
आता जयंत पाटील महाराष्ट्रात भ्रष्टाचारविरोधी मोठं आंदोलन उभारतील अशी अशा वाटत होती. पण त्यांनी हा प्रश्न केवळ तटकरेंपुरताच मर्यादित केला. नंतर या प्रश्नात ‘भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ’ किरीट सोमय्या उतरले. अलिबाग किरीटची सासुरवाडी. किरीट सोमय्याने थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तर देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांनीही ढीगभर पुरावे सादर केले.
नंतर जयंत पाटील यांनी हे प्रकरण सोडून दिलं आणि अलिबाग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तटकरेंसोबत समझोता केला. आदिती तटकरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या आणि जयंत पाटील यांना त्या वेळी राष्ट्रवादीने विधानपरिषद निवडणुकीत सहकार्य केले. जयंत पाटील यांचं राजकारण समजून घेण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसं ठरावं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
त्याचदरम्यान पेण अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी ‘कृषीवल’मधील माझ्या ‘कारण राजकारण’ या साप्ताहिक सदरात ‘तटकरे हाजीर हो’ असा लेख लिहिला होता. अर्थात या बँक घोटाळ्यात तटकरे यांचा काहीच संबध नाही, हे नंतर माझ्या लक्षात आलं. तेव्हा तटकरे यांनी मला फोन केला आणि आमच्या जिल्ह्यात तुम्ही आलात, याचा मला आनंद झाला होता, पण तुम्ही फक्त नोकरी करा, जयंत पाटील आणि माझ्या राजकीय भांडणात येऊ नका, आणि जयंताला तुम्ही जास्त ओळखता की, मी असा प्रश्न तटकरे यांनी केला होता़.
मला त्यांच्या ‘सागर’ या सरकारी बंगल्यावरून चहासाठी मला त्यांनी बोलावलं. आमची भेट झाली, तेव्हा तटकरे म्हणाले की, ‘बंधुराज, जयंत पाटील आणि मी कधी एकत्र येऊ हे तुम्हाला कळणारही नाही. त्यामुळे तुम्ही कशाला आमच्या राजकारणात येताय? सिंचन प्रकरणात तुम्ही अनेक बातम्या दिल्या, तेव्हा मी तुम्हाला काही बोललो नाही, पण पेण बँक प्रमाणात माझा, राष्ट्रवादीचा काहीच संबंध नाही.’
या नंतर काही महिन्यात जयंत पाटील आणि तटकरे यांची युती झाली. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन झालेच नाही, किरीट सोमय्या का शांत झाले, ते सर्वांना माहीत आहे, सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचं नाव होतं. त्यामुळे जयंत पाटील फार तारणार नाहीत, ही अटकळ खरी ठरली.
आज तटकरे पुढे निघून गेले आणि ‘तडजोडी’चं राजकारण करणारे जयंत पाटील शून्यावर आले!
..................................................................................................................................................................
लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत.
bandhulone@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment