केवळ साक्षीभावाने पाहावे लागण्याचे धबधब्याचे विधिलिखित याही वर्षी चुकलेले नाही…
संकीर्ण - ललित
मंदार काळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 06 July 2024
  • संकीर्ण ललित धबधबा Waterfall वीकेंड Weekend

स्थळ : कुण्या एका घाटातील एक अनामिक पण नयनरम्य धबधबा

काळ : ऐन पावसाळ्याचा

 

प्रसंग १ :

दिवस : आठवड्याअखेरचा

वेळ : ऐन दुपारची

ऐन धुवांधार पावसात धबधब्याची मजा लुटण्यासाठी आलेले उत्साही पर्यटक. दोन-चार मिनी बसेस, पाच-सहा ‘स्कॉर्पिओ’ आणि आठ-दहा मध्यमवर्गीय गाड्या घाटरस्ता अडेल, वाहनांना, वाहतुकीला अडथळा होईल, याची फिकीर न करता उभ्या केलेल्या. एका स्कॉर्पिओवर थोरल्या आबासाहेबांचा फोटो/स्टिकर, मध्यमवर्गीय गाड्यांवर मागच्या काचेतून डोकावणार्‍या मांजरीचे, कुत्र्याचे किंवा वाघाचे चित्र... आणि हो, गाडी पार्क करताना ऐकू येणारा ‘सारे जहाँ से अच्छा’ ही रिव्हर्स इन्डिकेटर ट्यून. आसपास चहा, वडापाव, मक्याची भाजलेली कणसे यापासून थेट ‘टू मिनिट नूडल्स’ तयार करून देणारी टपरीवजा दुकाने नि हातगाड्या.

एक रोमँटिक जोडी धबधब्याखाली छायाचित्र काढण्यासाठी अधिकाधिक वर जाण्याचा प्रयत्न करते आहे. एक-दोन सुज्ञ पर्यटक त्यांना तसे करू नये म्हणून सावध करतात. रोमँटिक जोडी आपल्याच धुंदीत. स्कॉर्पिओवर बसलेल्या नि गळ्यात सोन्याचे चेन असलेल्याने तेवढ्यात काही शेरा मारून शेजारच्या शेंगा खाणार्‍या दोस्ताला टाळी दिली नि ते दोघे फिदीफिदी हसतात. त्या हसण्याने सार्‍यांचे लक्ष तिकडे जाते. इतक्यात रोमँटिक जोडीपैकी स्त्रीची किंकाळी ऐकू येते. तिचा जोडीदार पाय घसरून पडलेला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत चाललेला. पर्यटकांपैकी एक-दोघे भानावर येऊन काही करेतो प्रवाहाबरोबर कड्यावरून अदृश्य होतो.

अपघाताचा दुसरा दिवस :

घाटावरचे (किंवा खालचे) वृत्तपत्र ठळक हेडलाईन देते : शासनाचे दुर्लक्ष, पोलिसांचा हलगर्जीपणा. बातमीमध्ये अपघाताचे वेळी उपस्थित पर्यटकांपैकी दोन मध्यमवर्गीय गाड्या ‘संभाव्य अपघाताच्या ठिकाणी पोलीस असायला हवेत’, अशी जबानी देतात. त्या तथाकथित वृत्तपत्राच्या तथाकथित पत्रकाराने ती वदवूनच घेतलेली असते. चॅनेल्सचे तथाकथित पत्रकार नळकांडी घेऊन धावतात. त्यांची चॅनेल्स तासभर तीच तीच दृश्ये दाखवून पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत आगपाखड करत राहते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रसंग २ :

स्थळ : तेच

दिवस : पहिल्या प्रसंगानंतर दोन-चार दिवसांनंतरचा

वेळ : कुठलीही का असेना, जोरदार पावसाची इतके सांगितले की पुरे

गाड्यांची नेमकी संख्या तीच नसली तरी साधारण तीच परिस्थिती. पण आता तिथे एक हवालदार उपस्थित आहे. वरून दट्ट्या आल्याने जवळच्या पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांपैकी एकाची ड्यूटी इथं लावण्यात आली आहे. तो पर्यटकांना अधूनमधून धबधब्यात फार वर जाऊ नये म्हणून दटावतो आहे. मध्यमवर्गीय गाड्या दबक्या आवाजात त्यांची नाराजी व्यक्त करतात नि त्याची नजर चुकवून धबधब्यात धोकादायक दरडीवर चढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. तास-दोन तास अशा रितीने लोकांना त्यांच्याच हितासाठी ओरडून सांगत असलेला हवालदार थकतो. घोटभर चहा घशाखाली उतरवावा यासाठी एका टपरीवर जातो.

इतक्यात एक मध्यमवर्गीय गाडी चटकन त्याचं छायाचित्र काढते नि ‘जिथे डोळ्यात तेल घालून ड्यूटी करावी, तिथे कायद्याचे रक्षक कसे कामचुकारपणा करतात ते पहा’, असं शीर्षक टाकून फेसबुकवर अपलोड करते. पाच-दहा मिनिटांत त्याला शंभरेक लाइक्स आणि पोलिसांवर शिव्यांचा भडिमार करणार्‍या पंचवीसेक कॉमेंट्स पडतात.

थोड्या वेळाने हवालदार पुन्हा आपल्या कामावर परततो. इतक्यात दोन स्कॉर्पिओ नि एक बोलेरो येऊन तिथं आदळते. त्यातून आठ-दहा सोन्याच्या चेन्स आणि काळे-हिरवे गॉगल्स उतरतात. पावसाबरोबर अन्य कशाची तरी धुंदी त्यांच्या तनमनावर चढली आहे. आसपासच्या माणसांची फिकीर न करता कमरेचे अंतर्वस्त्र वगळता बाकीचे कपडे उतरवून त्यातील एक दोघे धबधब्यात शिरतात, त्यांच्या मित्रांनी फोटो काढावेत म्हणून एखाद्या स्ट्रगलिंग मॉडेलला लाजवतील, अशा पोज देऊ लागतात.

धबधब्यात छायाचित्र काढणं, हे भलतंच मोठं अ‍ॅडव्हेंचर आहे, असा आविर्भात त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो. छायाचित्र काढणारे मित्रही ‘भाऊ तिकडे त्या दगडावर, भाऊ अजून वर, भाऊ धारांच्या आत उभे राहून फक्त सोन्याचे ब्रेसलेट असलेला हात आशीर्वाद देण्याच्या पोजमधे बाहेर काढा’, वगैरे तज्ज्ञ फोटोग्राफरच्या आविर्भावात सूचना देत आहेत.

हा सारा प्रकार पाहून धोक्याची जाणीव झालेला हवालदार धावत येतो. भाऊंना ओरडून खाली येण्यास सांगतो. भाऊंवर ओरडल्याने त्यांचा अपमान झाल्याने त्यांचे फोटोग्राफर मित्र हवालदारावर गुरकावतात, ‘भाऊंना ओळखत नाहीस का तू?’ म्हणून सराईतपणे नेहेमीच्या धमक्या देतात. हवालदार काकुळतीला येऊन सांगतो, ‘अहो, तो खडक फार निसरडा आहे, चार दिवसांपूर्वी एक पोरगं मेलंय.’

फोटोग्राफर्स हवालदाराची टर उडवतात, ‘आमचे भाऊ काय येडे खुळे आहेत का, असे सहजासहजी वाहून जायला?’ म्हणतात. या सार्‍या गोंधळात खडकावरून घसरून थेट डोक्यावर पडलेले भाऊ रक्ताची धार धबधब्याच्या पाण्यात मिसळत राहतात.

अपघाताचा दुसरा दिवस :

तथाकथित वृत्तपत्र हवालदाराच्या हलगर्जीपणाचे वृत्तपत्र ठळपणे छापते. सोबत मध्यमवर्गीय गाडीने काढलेला फोटो असतो. भाऊ घाटावरच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूची गाठ घेण्याच्या स्थितीत. भाऊंच्या डोक्यावर वरदहस्त असलेल्या कुण्या अण्णांनी किंवा साहेबांनी चाव्या फिरवून पोलीस कमिशनरला दमात घेतलेला. तो हवालदाराला निलंबित करतो, एकाऐवजी दोन हवालदार धबधब्यावर नेमून देतो नि हात झटकतो. आधीच जेमतेम एक एक हवालदार सोबत घेऊन काम करणारे त्यांच्या चौक्यांमधले सब-इन्स्पेक्टर्स ऐन वारीच्या काळात बंदोबस्ताची जबाबदारी असताना हा प्रकार केल्याबद्दल साहेबाला मनातल्या मनात खच्चून शिव्या घालतात.

प्रसंग ३ :

स्थळ : तेच

दिवस : दुसर्‍या प्रसंगानंतर पंधरा दिवसानंतरचा

वेळ : ऐन पर्यटकांची गर्दी होण्याची

दरम्यानच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने धबधब्याच्या आसपास नेत्रदीपक हिरवाई दिसून येते आहे. पण त्याच बरोबर सार्‍या खडकांवर भरपूर शेवाळेही साचले आहे. छोट्या गाड्या, मोठ्या गाड्या येताहेत. पर्यटक धबधबा नि भुरुभुरू पावसाबरोबरच हिरवाईचा आनंद लुटताहेत. दुपार होईतो आभाळ गच्च भरून आले आहे. पाहतापाहता धुवांधार पावसाला सुरुवात होते. अशा पावसात पर्यटकांनी शेवाळ्याने निसरड्या झालेल्या खडकांवर, धबधब्यात जाऊ नये, म्हणून दोनही हवालदार पर्यटकांना तिथून जाण्यास सांगताहेत. दोन अपघातांच्या अनुभवाने त्यांनी धबधब्याजवळ थांबण्यास मनाई करणारा हा तात्पुरता उपाय योजला आहे.

पर्यटक चरफडत गाड्या काढून पुढे जाताहेत. इतक्यात तिथे तात्पुरता व्यवसाय करणारे लोक येऊन हवालदारांशी हुज्जत घालू लागतात. पर्यटकांना थांबू न दिल्याने आमचा धंदा बुडतो आहे, अशी तक्रार करू लागतात. पण ‘पुन्हा अपघात झाला तर तुमची खैर नाही’, अशी तंबी साहेबाकडून मिळालेले हवालदार धोका न पत्करता, त्यांच्या निषेधाला न जुमानता, पर्यटकांना हाकलून लावत आहेत. अजिबात उसंत न घेता चार-पाच तास सार्‍या घाटाला झोडपून पाऊस थोडी विश्रांती घेईतो संध्याकाळ होते.

बिन-अपघाताच्या दिवसांनतरचा दुसरा दिवस :

तथाकथित वृत्तपत्र हवालदारांच्या मुजोरीने अनेक गरीब, हातावरचे पोट असलेल्यांचा रोजगार बुडतो आहे, गेले काही दिवस हवालदारांची ही अरेरावी चालू आहे, अशी बातमी ठळकपणे छापते. एक दोन गल्ली सेना, ब्रिगेड, संघटना यांचे प्रतिनिधी घाटाखाली पाच पंचवीस लोकांना घेऊन निदर्शनं करतात, नि त्याचे फोटो तथाकथित वृत्तपत्रांत आणि फेसबुकवर छापून आणतात. काही मध्यमवर्गीय गाड्या आणि काही स्कॉर्पिओ-बोलेरो घरबसल्या ती बातमी नि छायाचित्र दणादण शेअर करतात. पार्ट्या पाडून दोन बाजूंनी जोरदार वादविवाद करतात. उरलेला वाद संध्याकाळच्या बैठकीत रंगवतात. पुन्हा एकवार चक्रे फिरून असे काही न करण्याची तंबी हवालदारांना मिळते.

प्रसंग ४ :

स्थळ : तेच

दिवस : तिसर्‍या प्रसंगानंतर आठ दिवस उलटल्यानंतरचा

वेळ : अवेळ

एकाहून अधिक मध्यमवर्गीय गाड्या, काही स्कॉर्पिओ-बोलेरो, काही बुलेट आणि थोड्याफार हाय-एन्ड बाईक्स. धबधबा किडामुंगीसारख्या संख्येने आलेल्या माणसांनी वेढलेला. दोन हवालदार नावापुरते पहारा देणारे. अधूनमधून उपचार म्हणून एक दोघांना धबधब्याच्या फार जवळ वा फार वर चढून जाऊ नये म्हणून सूचना देणारे. डीजे न लावताही तितक्या डेसिबलचा आवाज निर्माण करत ‘सेल्फी विथ धबधबा’ कार्यक्रम जोरात चालू.

इतक्यात दोन सेल्फीकुमारांमधे भर खडकावर काहीतरी बाचाबाची होते. एकमेकांच्या ‘कुटुंबियांची विचारपूस करणे’ पुरेसे न वाटून, परस्परांच्या शरीराच्या कणखरपणाची परीक्षा घेणे सुरू होते. पाहता पाहता दोन गटात ‘काया-वाचा-मने’ वादविवाद सुरू होतो. हवालदार प्रथम दुर्लक्ष करतात. इतक्यात एक सेल्फीकुमार घसरून पाण्यात पडतो नि त्याला मार लागतो. ते पाहून त्याचे सेल्फीमित्र धावतात. परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे, हे पाहून हवालदार प्रथम दोन शेलक्या शिव्या हासडून धावतात. सेल्फीकुमारांच्या दोन गटांना दूर करू पाहतात.

इतक्यात एक बेभान सेल्फीकुमार झटापटीत नकळत एका हवालदाराला ढकलून देतो. दगडावर आदळून वेदनेने कळवळून उठलेला हवालदार नि त्याचा जोडीदार चवताळतात नि दोघे मिळून हातातील काठीने सेल्फीकुमारांचा समाचार घेतात. एकमेकांशी भांडणारे दोन्ही गट इतस्ततः धावण्याच्या प्रयत्नात धडपडतात, आदळतात, जखमी होतात. पैकी एक जण वाहून जाऊ लागतो. पण भानावर आलेला एक हवालदार आपले सुटले पोट सांभाळूनही त्याला आपली काठी देऊन वाचवतो.

लाठीमाराच्या घटनेनंतरचा दुसरा दिवस :

तथाकथित वृत्तपत्राने लाठीमाराची बातमी हेडलाईन केली आहे. ज्याचा जीव हवालदाराने वाचवला, त्याच्यासकट सार्‍यांनी पोलिसांच्या क्रौर्याच्या कहाण्या रसभरीत वर्णन करून सांगितल्या आहेत. दोनही भांडणार्‍या गटांनी आपल्या जखमा या पोलिस लाठीमारातच झाल्याचा दावा केला आहे. पुन्हा एकदा गल्लीतल्या सेना, ब्रिगेड नि संघटना आंदोलने उरकून घेतात, दादा-भाऊ-अण्णा वरून दबाव आणतात. दोन्ही हवालदार सस्पेन्ड होतात. आणखी एक चौकशी समिती नेमून पोलिस कमिशनर पावसाळी सुटीसाठी निघून जातात.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

प्रसंग ५/६/७... :

स्थळ : तेच

दिवस : लाठीमारानंतरचा कुठलाही

वेळ : कुठलीही

मध्यमवर्गीय गाड्या, स्कॉर्पिओ, बोलेरो, मिनी बसेस भरून सेल्फीकुमार नि कुमारी, स्त्री नि पुरुष तसंच भाऊ, दादा अण्णा अजूनही धबधब्यात वर्षाविहारासाठी येतात. त्यातले काही अपघातात सापडतात, एक-दोघांचा मृत्यूही झाला.

पण तथाकथित वृत्तपत्राचा आणि सेना, ब्रिगेड, संघटना यांचा घाटातल्या धबधब्यातला इन्ट्रेस्ट आता संपला आहे. मध्यवर्ती सरकारने घेतलेल्या कुठल्याशा महत्त्वाच्या, दूरगामी, कदाचित आत्मघाती निर्णयावर देशभर चालू झालेल्या चर्चा, निदर्शने, निषेध, आंदोलने इ. मध्ये आता त्यांनी उडी घेतली आहे. तीन हवालदार अजूनही निलंबित आहेत, चौकशीचा फेरा अजून थांबलेला नाही. पावसाळा संपल्यामुळे आता धबधब्याची तब्येतही खालावली आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघही आता थांबला आहे. त्यांच्या पाठोपाठच तिथे तात्पुरती खाद्यपदार्थांची दुकाने लावणार्‍या लोकांनीही आपला बाडबिस्तरा गुंडाळला आहे. अखेरचा उपाय म्हणून लावलेला ‘धबधब्याच्या फार जवळ जाऊ नये, निसरड्या खडकांमुळे अपघात होतात नि मृत्यू संभवतो’, अशी सूचना देणारा बोर्ड एकाकी धबधब्याला सोबत करत उभा आहे.

हे सारे केवळ साक्षीभावाने पाहावे लागण्याचे धबधब्याचे विधिलिखित याही वर्षी चुकलेले नाही.

(कथा, प्रसंग पात्रे काल्पनिक असली तरी तिचा वास्तवाशी अगदी घट्ट संबंध आहे!)

..................................................................................................................................................................

लेखक मंदार काळे राजकीय अभ्यासक, ब्लॉगर आहेत.

ramataram@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......