सभागृहात आक्रमक व्हा की!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनात सभागृहाबाहेर धरणं धरून बसलेले विरोधी पक्षनेते
  • Sat , 06 July 2024
  • पडघम राज्यकारण अंबादास दानवे Ambadas Danve प्रसाद लाड Prasad Lad

विधिमंडळाचं अधिवेशन हा आता एक सोपस्कार उरला आहे. सत्ताधारी असो की, विरोधक, अधिवेशनातील कामकाज कुणीही गंभीरपणे घेत नाही. सर्वपक्षीय विरोधक सभागृहाबाहेर धरणे धरतात, घोषणाबाजी करतात, पण सभागृहात गप्प राहतात. ही न समजणारी बाब आहे. संसदीय आयुधांचा वापर करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहात धारेवर धरण्याचे दिवस जणू आता कायमचे मावळले आहेत. याचं एक कारण संसदीय कामकाजाबद्दल सदस्यच आता पुरेसे गंभीर उरले नाहीत, हे असावं.

म्हणूनच अलीकडच्या काही वर्षांत अधिवेशनातून भरीव असं हाती काहीच लागत नाही. दोन-चार शासकीय विधेयकं मंजूर होणं, आर्थिक मागण्या संमत करवून घेणं आणि एखाद-दुसरी चर्चा यासाठीच केवळ विधिमंडळाचं अधिवेशन गेली अनेक वर्षं होतंय. ‘नागपूर करारा’त ठरल्याप्रमाणं गेल्या किमान साडेतीन तरी दशकांत हे अधिवेशन कधीच सहा आठवड्यांचं झालेलं नाही. म्हणजेच, सलग सहा आठवडे सरकार नागपुरात तळ ठोकून बसलेलं नाही आणि मुंबईत भरणाऱ्या अधिवेशनात राज्याचे मूलभूत, कळीचे, ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. ‘घेणं न देणं, नुसतंच कंदील लावणं’ या म्हणीसारखी विधिमंडळ अधिवेशनाची अवस्था झालेली आहे.

सभागृहात एखादा प्रश्न सोडवून घेण्यापेक्षा ‘आम्ही न्यायालयात जाऊ’, अशी भाषा आजकाल फारच परवलीची झालेली आहे. प्रश्न आरक्षणाचा असो की समान निधी वाटपाचा, की जनतेच्या जीवन-मरणाचा, असे अनेक प्रश्न सोडवून घेण्यासाठीच तर विधिमंडळ आहे. सभागृहात जनतेच्या समस्या सोडवून घेण्यासाठीच लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिलं आहे, पण त्याचा साफ विसर त्यांना पडलेला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

विरोधी पक्षांच्या विधिमंडळ सदस्यांना सभागृहाबाहेर पायऱ्यांवर बसून प्रसिद्धी मिळवणारी आंदोलनं करण्यासाठी वेळ आहे, कॅमेऱ्यासमोर जाऊन ‘बाईट’ द्यायला आणि तो देताना एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या करण्यासाठी वेळ आहे, पण सभागृहात ठिय्या देऊन सरकारला धारेवर धरण्यात, लोकांचे आणि स्वत:च्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी वेळ मिळत नाही... ही आपल्या संसदीय लोकशाहीची शोकांतिका की अवमूल्यन की अपयश म्हणायचं?

कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारला सभागृहातच काय बाहेरही विरोधकांच्या तसंच लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात मुळीच रस नसतो. कारण ते अडचणीचं असतं. म्हणून अशा वेळी सरकारला उत्तर देण्यास सभागृहात बाध्य करणं, ही विरोधी पक्षांची जबाबदारी असते. मात्र, अलीकडच्या काही दशकांत ‘सभागृह चालू देणार नाही’, अशी सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेण्याची वृत्ती विरोधी पक्षांत बळावली आहे.

महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘पुलोद आणि १९९५तल्या सेना-भाजप युतीच्या सरकारांचा अपवाद वगळता बहुसंख्य कालावधी काँग्रेसचं आणि तेही बहुमतातील सरकार असायचं; कधी कधी हे बहुमत २००च्या पार गेल्याचंही आठवतं, पण संख्येनं कमी असलेल्या विरोधी पक्षांच्या सदस्यांना हे सरकार टरकून असायचं, कारण सर्व प्रकारच्या संसदीय आयुधांचा वापर करून हे विरोधी सदस्य सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडत असत.

सत्ताधारी पक्षात एकापेक्षा एक जसे दिग्गज होते, तसे विरोधी पक्षांत होते. आणि ते थेट जनतेशी संपर्क ठेवणारे होते; जमिनीवर वावरणारे होते. महत्त्वाचं म्हणजे अभ्यासू व संवेदनशील होते. संसदीय खाचाखोचा त्यांना चांगल्या ठाऊक होत्या. संसदीय कामकाजाची ‘गीता’ (की ‘बायबल’ की ‘कुराण’ की, ‘कौल-शकधर’) त्यांना मुखोद्गत होती. त्यामुळेच अनेक संसदीय युक्त्या वापरून ते सरकारला जेरीस आणत असत. तारांकित आणि अ-तारांकित प्रश्नोत्तरे, शून्य प्रहर, लक्षवेधी, अल्पकालीन चर्चा, हरकतीचे मुद्दे, स्थगन प्रस्ताव, कपात सूचना अशी एक ना अनेक आयुधं केव्हा वापरावीत आणि सरकारला धारेवर धरावं, याचं पक्क भान त्या विरोधी सदस्यांना होतं.

तेव्हा अर्थसंकल्प आणि पुरवणी-मागण्या चर्चा न होता मंजूर होत नसतं. एकेका खात्याच्या आर्थिक तरतुदीत केवळ एक रुपयांची कपात करण्याची सूचना मांडून त्यावर चर्चा करताना त्या खात्यातल्या भ्रष्टाचाराची, कामचुकारपणाची लक्तरं सभागृहात टांगली जात. अनेकदा तर ‘गिलोटीन’ लावण्याची वेळ विरोधक आणत. केवळ सरकारच नव्हे, तर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही या चर्चा ऐकत, कारण त्यातून खातं कसं चाललं आहे, याचा त्यांना बोध होतं असे.

एक पत्रकार म्हणून मी वर उल्लेख केलेल्या आयुधांच्या मार्गानं सभागृहात अनेकदा वादळी चर्चा घडवून आणत, अनेक प्रश्न सुटताना पाहिलं आहे. प्रश्नोत्तराच्या तासाची तयारी राज्यमंत्री दोन दिवस आधी करत. (सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तेव्हा राज्यमंत्री देत आणि सदस्यांचं समाधान झालं नाही किंवा सदस्यांनी राज्यमंत्र्याला कोंडीत पकडलं किंवा काही धोरणात्मक अडचण आली, तर कॅबिनेट मंत्री आणि क्वचित मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप करण्याची प्रथा तेव्हा होती; आता माहिती नाही.)

मंत्री खात्याच्या आर्थिक तरतुदींचा अभ्यास करुन सभागृहात येत (आता तर मंत्र्याला तरी त्याच्या खात्यासाठी किती ‘बजेटरी’ व ‘नॉन-बजेटरी’ आर्थिक तरतूद आहे, हे माहिती असेल का, याविषयी शंका आहे!) सरकारनं बहुमताच्या जोरावर एखादं विधेयक किंवा आर्थिक तरतूद मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला तर वारंवार कोरम आणि मतदानाची (डिव्हिजन) मागणी करून सत्ताधारी पक्षाला विरोधी सदस्य सळो की पळो करून सोडत. कित्येकदा तर रात्री १२-१ पर्यंत कामकाज चालत असे. भ्रष्टाचार, निधी पळवला जाणं, हा फारच मोठा गुन्हा असे आणि त्यासाठी सरकारला अक्षरश: ‘उभं पिसं, नांदू कसं?’ केलं जात असे.

थोडक्यात, सरकारच्या बारीकसारिक कृतीवर  विरोधी पक्षांचा अंकुश असल्याचं, विरोधी पक्ष जागरूक असल्याचं तेव्हाचं वातावरण होतं. मतदानात पराभव म्हणजे सरकारवर अविश्वास असल्यानं आणि विरोधी पक्ष केव्हाही मतदानाची मागणी करेल, या भीतीनं सत्ताधारी पक्षांचेही सदस्य मोठ्या संख्येनं उशिरापर्यंत सभागृहात हजर असत. खुद्द मुख्यमंत्रीच सभागृहाचं कामकाज मोठ्या गंभीरपणे घेत असल्यानं बाकी सदस्यांनाही तेवढंच गंभीर आणि जागरूक राहावं लागत असे.

हे का घडत असे, तर विधिमंडळ सदस्यांचा जनतेशी थेट संपर्क असायचा. ते आमदार निवासात मुक्कामाला असायचे आणि मतदारसंघात असलेले व नसलेलेही लोक गाऱ्हाणं कानी घालण्यासाठी त्यांना सहज भेटू शकत. आमदार आणि खासदारही एसटीनं प्रवास करत. एसटीनं नसेल, तर नॉन एसी गाडीने आणि गाडीच्या काचा उघड्या ठेऊन प्रवास करत. त्यामुळे लोकप्रतिनिधी जमिनीवर राहणाऱ्या जनतेच्या थेट संपर्कात असत. असं वागणाऱ्या सर्व पक्षांतील किती सदस्यांची नावं घ्यावी? विरोधी पक्षात असेच नेते बहुसंख्य होते आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून ‘बलदंड’, बुलंद होते.

सर्वसामान्य जनतेला रोजगार हमीचा पगार वेळेवर आणि योग्य मिळाला की नाही, रेशन वेळेवर मिळालं की नाही, अशा छोट्या पण कळीच्या गोष्टी लोकप्रतिनिधींना थेट कळत. ‘असं’ वागणारा एखादा तरी विधिमंडळ किंवा संसदेचा सदस्य आज आहे की नाही, माहीत नाही. बहुसंख्य लोकप्रतिनिधी आता हवाई, पंचतारांकित आणि ‘बाईट’बाज झाले आहेत आणि हीच लागण त्यांच्या कार्यकर्त्यांना झालेली आहे. रयतेशी फटकून वागत, शेतकरी, शेतमजूर, वंचिताच्या डोळ्यात आसवं का आली आहेत, हे आमच्या लोकप्रतिनिधींना समजणार तरी कसं?

प्रकाश वृत्तवाहिनीला बाईट देणं, ई-मेलवर निवेदन देणं आणि समाजमाध्यमांवर व्यक्त होणं म्हणजे जमिनीवर राहणाऱ्या माणसाशी ‘रिलेट’ होणं नव्हे, हे त्यांनी समजून घ्यायला हवं. सभागृहाबाहेर घोषणाबाजी करण्यापेक्षा सरकार नीट काम करते आहे की नाही, यावर विरोधकांनी सभागृहात आक्रमकपणे सक्रिय राहून अंकुश ठेवण्याची जास्त गरज आहे.  

या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादस दानवे यांचं निलंबन क्लेशदायक आहे. अंबादास दानवे जसं वागले आणि जी भाषा त्यांनी उच्चारली ती मुळीच समर्थनीय नाही. त्या उक्ती आणि कृतीचं त्यांनी नंतर केलेलं समर्थन, तर लोकशाहीसाठी जास्तच चिंताजनक आहे. आचार्य अत्रे, जांबुवंतराव धोटे, बबनराव ढाकणे, केशवराव धोंडगे, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ असे अनेक महाआक्रमक लोकप्रतिनिधी या विधिमंडळानं पाहिले, पण त्यापैकी एकानेही अंबादास दानवे यांच्यासारखी भाषा उच्चारली नाही. त्या उक्ती आणि कृतीचं अंबादास दानवे यांनी केलेलं मग्रूर समर्थन आपल्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या सभ्यतेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं आहे.

उद्धव ठाकरे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्यावर अंबादास दानवे जरा नरमले, तरी त्या पदावर डाग पडला तो पडलाच. ज्येष्ठ सदस्यांपैकी कुणी तरी ‘तुमचं चुकलं, पुन्हा असं वागू नका’ असं दानवे यांना ठणकावून सांगायला हवं होतं. दानवे त्यांच्याकडून विरोधी पक्ष नेतेपद काढून घेण्याचा खमकेपणा उद्धव ठाकरे यांनी दाखवला असता, तर बरं झालं असतं. त्यामुळे त्यांची लोकशाहीवर असणारी श्रद्धा अधिक उजळून निघाली असती.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

याचा अर्थ प्रसाद लाड यांचं काहीच चुकलं नाही असं नव्हे, तेही चुकलेच. दानवे आणि लाड यांच्यासारखे अनेक गणंग नेते (?) सध्या राजकारणात आहेत. अशा सर्व पक्षीय गणंग नेत्यांचं पीक केवळ राज्याच्या नव्हे, तर देशाच्याही राजकारणात फोफावलं आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांचा उल्लेख नाव न घेता बालबुद्धीचा असा वापर करणारा सभागृहाचा नेता, हे त्याचं उदाहरण आहे. राजकारणातले असे हे बहुसंख्य गणंग, हे या लोकशाहीचं दुर्दैव म्हणायला हवं.

लोकशाहीचा आब राखून, सभागृहात आक्रमकपणे वागत सरकारला धारेवर धरून लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त जनताभिमुख व्हावं, हीच अपेक्षा विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून आहे आणि ती पूर्ण करण्यात विरोधी पक्ष मुळीच यशस्वी ठरत नाहीये, म्हणूनच विधिमंडळ अधिवेशन हा एक सोपस्कार उरला आहे...

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......