शिरोजीची बखर : प्रकरण एकोणिसावे - ‘बाकी जे काही असेल ते असो, आपण प्रधानसेवक आहात, सेवकासारखे वागा’, असा स्पष्ट संकेत चार तारखेला भारतीय जनतेने नरेंद्र मोदींना दिला
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 06 July 2024
  • संकीर्ण शिरोजीची बखर Shirojichi Bakhar नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

एक जूनला लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीमधील मतदानाची शेवटची फेरी होती. वातावरण तापले होते. यूट्यूबवरील पत्रकार आणिविचारवंत म्हणत होते की, भाजपचे अवघड आहे. निवडणुकीच्या आधी ‘गोदी मीडिया’वरचे ‘ओपिनियन पोल्स’ म्हणत होते की, भाजप प्रचंड बहुमताने निवडून येणार. नंतर जसजशी निवडणूक पुढे जात राहिली, तसतसे सगळे सेफॉलॉजिस्ट म्हणू लागले की, निवडणुकीमध्ये देशभर ‘कड़ी टक्कर’ आहे. कोण जिंकेल ते सांगता येणार नाही.

एक जूनला संध्याकाळी ६ वाजता मतदानाची शेवटची फेरी संपली. गोदी मीडियाच्या विविध चॅनेलवर ‘एक्झिट पोल’ जाहीर झाले. सर्वांनी भाजपला अतिप्रचंड बहुमत मिळत आहे, असे अंदाज वर्तवले. ५४४ सीट्सपैकी ३५० ते ४११ या दरम्यान भाजपला जागा मिळतील, असे अंदाज होते.

अविनाश आणि नाना प्रचंड खुश झाले. अच्युत सैरभैर झाला. भास्कर आणि समर डिप्रेशनमध्ये गेले.

यूट्यूबवर ‘भाजपला निवडणूक अवघड जाणार आहे’, असा अंदाज वर्तवणारे पत्रकार आणि विचारवंत थोडे हिरमुसलेले दिसले. रात्र होईपर्यंत भारतभरच्या मोदी भक्तांमध्ये उन्मादाच्या लाटा उसळल्या! भक्त तर आपण निवडणूक जिंकली आहे, या थाटामध्ये एकमेकांचे अभिनंदन करू लागले.

हे सगळे एक्झिट पोल्स खोटे आहेत, अशी शंका शिरोजीला आली. त्याने तसे आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवले आहे. ‘मोदीकालीन भारता’त राजकरण आणि समाजकारणाशी संलग्न असलेल्या सगळ्याच संस्था तणावाखाली आल्या होत्या. जेथे वर्तमानपत्रे आणि टीव्ही वार्ताप्रसार केंद्रे भ्रष्ट झाली, जेथे विश्वविद्यालये ताणाखाली आली, जेथे साक्षात न्यायसंस्था तणावाखाली आली तेथे पोल घेणाऱ्या कंपन्यांचा काय पाड लागणार होता? या तर बोलून-चालून पैशावर चालणाऱ्या कंपन्या. पैशासाठी काम करणाऱ्या कंपन्या!

निवडणुकीपूर्वी ‘ओपिनियन पोल्स’ आले होते. त्यात भाजप प्रचंड विजय प्राप्त करणार, असेच सगळे पोल्स आले होते. ते  अर्थातच भाजपची हवा तयार व्हावी म्हणून केले गेले होते. हवा तयार झाली की, त्याचा ‘फ्लोटिंग’ मतदारांवर परिणाम होतो. जो पक्ष जिंकणार आहे, त्यालाच हे मतदानाविषयी निर्णय न झालेले मतदार मत द्यायची शक्यता तयार होते. ज्या पक्षाची हवा तयार होते, त्याला अजून एक फायदा होतो. विरोधी पक्षाच्या मतदारांचा उत्साह कमी होतो. अनेक लोक मतदानाला बाहेर पडत नाहीत.

संपूर्ण निवडणूकभर अशी हवा तयार करण्याचा प्रयत्न झाला. या काळात भाजपशी कोण कोण ‘पोलस्टर्स’ निगडित आहेत, याचीही खूप चर्चा झाली. अनेक पोल कंपन्यांचे मालक आणि चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असल्याच्या चर्चा झाल्या. या लोकांना आपल्या व्यवसायाशी प्रतारणा करायला काही वाटत नव्हते. नाहीतरी अंदाज चुकला, तर या कंपन्यांना कोणी जबाबदार धरणार नव्हते. ‘मोदीकालीन भारत’ या अर्थाने अतिशय बेजबाबदार काळ होता.

आपले ‘ओपिनियन पोल्स’ वाचून कुणी सामान्य लोक शेअर मार्केटमध्ये पैसा लावत असतील, आपण मुद्दामून चुकीचे पोल्स जाहीर केले, तर त्यांच्या कष्टाच्या पैशाचे अतोनात नुकसान होऊ शकते, याची कसलीही जाणीव या लोकांना नव्हती. सगळाच प्रकार अत्यंत घृणा वाटावी, असा होता.

अमेरिकेमध्ये त्या काळी असे पोल्स आणि सर्व्हे केले जात. परंतु या सर्व्हेमधील ‘सॅम्पल साईझ’ काय? यात कोणती मेथडॉलॉजी वापरली आहे, याची संपूर्ण माहिती सर्व्हे करणाऱ्या कंपनीला जाहीर करावी लागत असे. ही माहिती जाहीर केली नाही, तर त्या सर्व्हेकडे कोणी लक्ष देत नसे. ‘मोदीकालीन भारता’तील कोणताही सर्व्हे अशी माहिती जाहीर करत नसे. तरीही या लोकांना फार मोठा सन्मान आणि प्रतिष्ठा दिली जात होती.

आज बाविसाव्या शतकातील वाचकाला याची मोठी गंमत वाटत असेल. ‘मोदीकालीन भारता’त एवढी अंदाधुंदी माजली होती, यावर आजच्या वाचकाचा अजिबात विश्वास बसणार नाही. पण दुर्दैवाने हे खरे होते, असे आज म्हणावे लागते.

सगळा मीडिया मोदीजी जिंकून कसे येणार, याविषयी रोज प्रचंड उत्साहात बोलत होता. मोदीजी चारशे पार कसे जाणार, याची छाती पिटून खात्री देत होता. थोडक्यात, मीडिया मोदींचा प्रचार करण्यासाठी आपले तन आणि मन अर्पण करत होता. ते धनासाठी अर्पण केले जात होते, असा आज अंदाज करता येतो. अन्यथा आपल्या व्यवसायाचा प्राण असलेल्या मूल्यांशी कोण कशाला एवढी धडधडीत प्रतारणा करेल? तीसुद्धा सगळ्या देशाच्या समोर आणि तीसुद्धा सगळा देश बघत असताना प्राईम टाईम वर!

कुठल्याही समाजात आपली तत्त्वे विकायला बसलेले लोक असतात, आपला आत्मा विकायला बसलेले लोक असतात, त्याचप्रमाणे प्रामाणिक लोकसुद्धा असतात. ‘मोदीकालीन भारता’त यू-ट्यूबवर असे अनेक लोक ‘गोदी मीडिया’च्या आणि ‘ओपिनियन पोल्स’च्या प्रचाराला विरोध करत होते. यात हिंदी भाषक पत्रकारांनी फार मोठी भूमिका बजावली. तसे सगळ्याच भाषांमधले पत्रकार आणि विचारवंत हे आपली आपली भूमिका निभावत होते, परंतु हिंदी भाषेतले यू-ट्यूब चॅनेल भारतभर बघितले जात असल्यामुळे, हिंदी भाषेतील पत्रकारांना मोदी-विरोधी चळवळीच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाचे स्थान द्यावे लागेल, असे शिरोजीचे मत होते. तसे त्याने आपल्या रोजनिशीमध्ये लिहूनही ठेवले आहे.

हिंदीमधील श्रवण गर्ग, शीतल ओ. पी. सिंह, अशोक वानखेडे, अनिल शर्मा, राजेन्द्र तिवारी, आशुतोष, के. पी. मलिक, सईद नक्वी, राजेन्द्र शुक्ला, साबा नक्वी, आरफा खानम शेरवानी, नीलू व्यास अशा अनेक झुंजार पत्रकार आणि विचारवंतांची नावे शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवलेली आहेत. भारतातील लोकशाही या लोकांची आभारी राहील, असेही शिरोजीने लिहून ठेवले आहे. यात सगळ्यात महत्त्वाचे नाव योगेंद्र यादव हे होते.

यादव स्वतः राजकीय विचारवंत होते. दहा वर्षेपूर्वीपर्यंत ते पोलस्टरसुद्धा होते. ते काम एक व्यवसाय म्हणून त्यांनी बंद केले होते. परंतु एक आवड म्हणून ते स्वतः समाजात फिरून राजकीय हवा कुठल्या दिशेने वाहते आहे, याचा अंदाज घेत होते. गोदी मीडियाप्रणित एक्झिट पोल्सनी भाजप एकतर्फा जिंकणार, असे सांगितल्यावर योगेंद्र यादव यू-ट्यूबवर आले आणि त्यांनी सांगितले की, हे एक्झिट पोल्स ‘सरासर झूठे हैं’. भाजपला फक्त २४० ते २५० जागा मिळतील.

ही फार मोठी घटना होती. योगेंद्र यादव स्वतः उत्तर प्रदेशमध्ये फिरले होते. भारतभरातील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलस्टरशी आणि पत्रकारांशी त्यांची चर्चा होत होती. त्यावरून त्यांनी हा अंदाज बांधला होता.

हे खोटे पोल्स स्टॉक मार्केटमध्ये गोंधळ उडवून पैसे मिळवण्यासाठी आणि विरोधी पक्षांचे जे कार्यकर्ते मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी जे कार्यकर्ते असतात, त्यांचा हतोत्साहित करण्यासाठी केले गेले आहेत, अशी चर्चा यू-ट्यूबवर सुरू झाली.

इकडे शिरोजीने गोदी मीडियाच्या ओपिनियन पोल्सचा बखरीमधील पात्रांवर काय परिणाम झाला, हे सांगून आपल्या एकोणीसाव्या बखरीची सुरुवात केली. ही अतिशय महत्त्वाची बखर आम्ही अत्यंत आनंदाने बाविसाव्या शतकातील वाचकाच्या हाती ठेवत आहोत.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

एक जून २०२४ रोजी शनिवार होता. त्या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची शेवटची फेरी संपल्यावर गोदी मीडियाप्रणित एक्झिट पोल्स जाहीर झाले. एकजात सगळ्यांनी भाजपप्रणित एनडीए आघाडीला तीनशे साठ ते चारशे जागा दिल्या होत्या. भारतभरच्या भक्तांमध्ये उत्साहाची सुनामी आली. भक्त निवडणूक जिंकल्यासारखे आनंद व्यक्त करू लागले. भारतभरच्या मोदीभक्त जमातीमध्ये उन्माद तयार झाला. काही भक्त पेढे आणि लाडू वाटू लागले.

मोदीविरोधक डिप्रेशनमध्ये गेले. भास्कर आणि समरच्या तोंडाची तर चवच गेली. त्यांनी पांडेजींना फोन केला. पांडेजी शांत होते. ते म्हणाले -

पांडेजी - आप दोनो तुरंत यहाँ चले आइए. आपके लिए कुछ बढ़िया बनाकर रखता हूँ.

भास्कर आणि समर पडलेल्या तोंडाने आले, तेव्हा पांडेजींनी त्यांना सुंदर पुरी-भाजी खाऊ घातली. फर्मास चहा पाजला.

पांडेजी - अब बताईए क्या बात हैं आपकी जहन में?

भास्कर - च्यायला दरवेळी होतं तसं होणार बहुतेक या वेळी.

समर - तसं झालं तर फार उन्माद करतील.

पांडेजी - मैंने बहुत सोच लिया हैं इस बारे में. आप दोनों एक चीज बताइए -  महाराष्ट्र  में सीटें कम हो रहीं हैं या नही?

समर - हो रहीं हैं.

भास्कर - आपण अनेक पत्रकार, विचारवंत, कार्यकर्ते, यू-ट्यूब चॅनेल रिपोर्ट बघितले आहेत. महाराष्ट्रात निश्चितपणे विरोधाची लहर आहे.

पांडेजी - कर्नाटक में भाजप की सीटें कम हो रहीं हैं नं?

समर - नक्की.

पांडेजी - जितना हमने देखा हैं यू-ट्यूब पर सब का सब गलत नहीं हो सकता हैं. यूपी, राजस्थान, बिहार, हरयाणा सब जगह भाजप की, चार चार पाँच पाँच सीटे कम हो रहीं हैं.

भास्कर - हो.

पांडेजी - तो इसका एकही मतलब हो सकता हैं की, ये गोदी मीडियावाले सर्व्हे झूठे हैं. इन लोगों का कोई दुसरा मतलब हैं. दुसरी साजिश हैं कोई! मैं गारंटी के साथ कह रहां हूँ की, भाजपा को इतनी सीटें नहीं मिल रहीं हैं. .

इतक्यात समरला अविनाशचा फोन आला.

अविनाश - पाहिलास ना धमाका? मोदी हैं तो मुमकिन हैं!

समर - लागले का निकाल?

अविनाश – अरे, लागले नाहीत. लागल्यात जमा आहेत.

समर -  बघुया!

अविनाश - हार मान्य करायला शिका रे!

समर - हरल्यावर करू की!

अविनाश - सगळे पोल्स भाजपला ‘मॅसिव्ह मँडेट’ मिळणार आहे, असं दाखवतायत. (हूहूहू)

समर - बघू आपण.

अविनाश - इतक्या पोल्सचे अंदाज कसे चुकतील? इस बार चारसौ पार!

समर - (फोन ठेवतो)

भास्कर - लागले वाटतं यांचे रिझल्ट.

पांडेजी - इन लोगों पर पागलपन सवार कर दिया हैं मोदीजीने.

भास्कर - मलाही वाटायला लागलं आहे की, इतके पोल्स कसे चुकतील?

पांडेजी - जरूर चुकेंगे ये पोल्स, क्यों की वो सब बकवास पोल्स हैं.

भास्कर – या वेळी जर भाजपला २५०च्या वर सीट्स मिळाल्या, तर मी राजकारणावर बोलणं बंद करणार आहे. आपल्याला काही कळत नाही म्हणायचं आणि गप्प बसायचं.

समर - पागल करून ठेवलं गेलं आहे, या देशातल्या सामान्य जनतेला.

(मोदी राजवटीमध्ये प्रचार तंत्राचा इतका नृशंस वापर केला होता की, भारतातील सगळ्या जनतेचे संपूर्ण ‘ब्रेन-वॉशिंग’ झाले आहे, असे विचार करणाऱ्या अनेक लोकांना वाटू लागले होते. खरं सांगायचं तर लिबरल विचारवंत या अपप्रचाराच्या झपाट्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले होते. भास्कर आणि समर यांच्या प्रतिक्रिया त्या डिप्रेशनमधून आल्या होत्या. पांडेजींसारखे अगदी थोडे शांतचित्त लोक फक्त शांतपणे विचार करू शकत होते.)

पांडेजी - इतना आसान नहीं हैं जनता को पागल बनाना! ये भारत की जनता हैं.

भास्कर - हूं!

पांडेजी - सच कहूँ तो भाजप की सीटें तो १९ में ही घटनेवाली थी! पुलवामा और बालाकोट हुआ इसलिए पचास-साठ सीटें बढ़ गई.

भास्कर - हे खरं आहे.

पांडेजी - मैं लिख के देने के लिए तैयार हूँ - भाजप की सीटें कम हो रहीं हैं इसबार!

यावर ती बैठक संपली. रविवारी यू-ट्यूबवर काय चर्चा होते आहे, ते ऐकून त्याविषयी बोलयला भेटायचे ठरले. रविवारी चर्चा करण्यासारखे खूप होते. योगेंद्र यादव यांनी अनेक मुलाखती दिल्या. ते सांगत राहिले की, ‘मेरे हिसाबसे भाजप की सीटें कम हो रहीं हैं’. काही यू-ट्यूब चॅनेल म्हणत राहिले की, स्टॉक मार्केट वर नेऊन खाली आदळवायचं असा प्लॅन आहे. काही विचारवंत म्हणत होते की, मतमोजणीच्या दिवशी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाब निर्माण करण्यासाठी हे सगळे केले जात आहे.

गंमत अशी होती की, गोदी मीडियाच्या सगळ्या पोल्सच्या आकड्यांमध्ये गोंधळ होते. हरयाणामध्ये भाजपला १० पैकी १८, हिमाचल प्रदेशात भाजपला चारपैकी सहा अशा जागा दाखवल्या गेल्या होत्या. कुठून तरी वरून आदेश आले आणि मग दोन-तीन तासांत गडबडीने पोल्स बदलले गेल्याची लक्षणे जागोजागी दिसत होती. यावर पांडेजी, समर आणि भास्कर यांची फोनवरच चर्चा झाली. भास्कर आणि समरला थोडी आशा वाटू लागली. भास्करला रात्रभर झोप लागली नव्हती. त्याला बाहेर पडावेसे वाटत नव्हते. त्याने पांडेजींच्या ठेल्यावर यायला नकार दिला. मग समरसुद्धा आला नाही. दोघांचेही मूड ‘एक्झिट पोल्स’मुळे गेले होते. ते समजण्यासारखेही होते. भारतातील लोकशाही आपल्या पुढच्या प्रवासाबद्दलचे एक मोठे ‘स्टेटमेंट’ करणार होती. सतत आक्रमक आणि खोटा प्रचार करून लोकांना सातत्याने फसवता येते की नाही, हे या निवडणुकीमध्ये ठरणार होते.

एक तारखेला प्रचार संपल्यावर मोदीजी कन्याकुमारी येथे ध्यानाला गेले. विवेकानंद स्मारकात भगवी वस्त्रे परिधान करून ध्यान करत आहेत, अशी चित्रे भारतभर लोकांना कंटाळा येईपर्यंत दाखवली गेली. भास्कर त्यामुळे अस्वस्थ झाला होता. कॅमेरे लावून ध्यान करणे, हे त्याला विचित्र वाटत होते. या सगळ्याला भारत देश फसणार किंवा कसे हे विचार त्याच्या मनात येत राहिले.

त्या दिवशी रात्री अविनाशसुद्धा रात्रभर जागा होता. मोदीजींचे ध्यान त्याला हलवून गेले. अशा संत व्यक्तीच्या हातात भारताची सूत्रे राहिली पाहिजेत, असे त्याला वाटत राहिले. अशा व्यक्तीला आज निवडणूक लढवावी लागत आहे, याचे त्याला मनापासून वाईट वाटत राहिले.

सोमवारी स्टॉक मार्केटने फार मोठी रॅली केली. खरं तर पंतप्रधानाने स्टॉक मार्केटमध्ये काय होणार आहे, याबाबत बोलू नये, असा संकेत त्या काळीसुद्धा होता. परंतु आमच्या विजयामुळे ‘स्टॉक मार्केट’वर जाणार आहे, त्यामुळे शेअर्स खरेदी करा, असे मोदीजी निवडणुकांच्या सभांमधून सांगत राहिले होते. आजच्या वाचकाला या विषयी फार आश्चर्य वाटेल. परंतु ‘मोदीकालीन भारता’त याचे कुणाला काही वाटले नाही. नैतिक कंपास हरवलेला समाज होता तो. ज्यांनी मोदीजींवर आणि गोदी मीडियाच्या पोल्सवर विश्वास ठेवून शेअर्स खरेदी केले होते, ते आनंदाने नाचू लागले.

भास्कर आणि समर अजून डिप्रेशनमध्ये गेले.

संध्याकाळी न राहवून दोघेही पांडेजींच्या ठेल्यावर गेले. तिथे अच्युतसुद्धा आला होता. तोही अस्वस्थ होता. अच्युतने मोदीजींचा पक्ष सोडून काँग्रेसला मत दिले होते. आपण चूक केले की बरोबर, या विचारात तो होता. तिघेही बसले. पांडेजीसुद्धा त्यांच्या जवळ येऊन बसले. पांडेजींचा प्रसन्न चेहरा बघून सगळ्यांनाच बरे वाटले.

पांडेजी - आप लोग बौखला गए हो. आपका मन प्रसन्न करनेवाली एक चीज मेरे पास हैं. वो में शेअर कर रहां हूँ.

(असे म्हणून त्यांनी एक मेसेज तिघांनाही फॉरवर्ड केला).

भास्कर - काय आहे हे?

पांडेजी - दैनिक ‘भास्कर’ने भारतभर के सट्टा बाजारों के अंदाज दिए हैं. फलौदी, कानपुर, सूरत, अहमदाबाद, कर्नाल, मुंबई, इंदौर और बेलगाँव ऐसे सारे सट्टा बाजारों के अंदाज दिए हैं. एक भी सट्टा बाजार भाजप को बहुमत मिलेगा ऐसा नहीं कह रहाँ हैं.

भास्कर - (एक्साईट होत) काय म्हणता?

(सगळ्यांनी घाईघाईने तो मेसेज उघडून पाहिला).

समर - बाप रे! हे भयानक आहे.

पांडेजी - सट्टा बाजार में लोगों का खुदका पैसा लगता हैं दाव पर! वो गोदी मीडिया के पोल्स जैसे थोडेही गलत बोल थोडेही बोल सकता हैं आसानी से? मीडिया के पोल्स को तो झूट बोलने के भी पैसे मिल सकते हैं. 

भास्कर त्या मेसेजकडे डोळे विस्फारून पाहत राहिला.

समर - भयानक आहे हे.

अच्युत - काय भयानक आहे?

समर - गोदी मीडियाचे पोल्स बघून स्टॉक मार्केट प्रचंड वर गेले आहे आणि स्वतःचे पैसे लावणारा सट्टा बाजार म्हणतो आहे की, मोदीजी बहुमताने निवडून येणार नाहियेत.

भास्कर - फारच भयंकर! उद्या कुणाचे तरी हजारो कोटी रुपये बुडणार आहेत. स्टॉक मार्केटचे की सट्टा बाजाराचे एवढाच प्रश्न आहे.

पांडेजी - मैं बता दूँ किसका पैसा डूबने वाला हैं?

अच्युत - कुणाचा?

पांडेजी - स्टॉक मार्केट कल गिरने वाला हैं!

अच्युत - कशावरून?

पांडेजी - सट्टा बाजार ये खुद एक पोल होता हैं… खुद के पैसे लगानेवालों का ओपिनियन पोल. उनका अंदाज इतना ज्यादा चुकेगा नहीं.

भास्कर - आणि स्टॉक मार्केट?

पांडेजी - वो बहुत बडे लोग होतें हैं. सट्टा मार्केट चलाने वालों से कई गुना बड़े. हजारों करोड़ दांव पे लगाने वाले. वो मीडिया के पोल्स खरीद सकते हैं, लेकिन वो इलेक्शन का रिझल्ट चेंज नहीं कर सकते हैं.

अच्युत - सगळं डोकं फिरवून टाकणारं आहे.

पांडेजी - आप थोड़ा गौर करिए! एक्झिट पोल्स शनिवार को थे. स्टॉक मार्केट बंद रहता हैं शनिवार को. जिन लोगों को एक्झिट पोल्स शुक्रवारको ही मालूम थे, उनको ये भी मालूम था की सोमवार को स्टॉक मार्केट बहुत ऊपर खुलनेवाला हैं. वो उसी दिन माल खरीदकर बैठे थे. उनका पैसा आज बीस बीस गुना बढ गया. आज मार्केट उपर खुला. फिर आम आदमी आज खरीददारी में लग गया.

अच्युत - आणि उद्या मोदीजींना पूर्ण बहुमत नाही मिळालं तर?

पांडेजी - कल खुला हैं मार्केट दिनभर. जैसे जैसे रिझल्ट आएंगे बिकवाली तेज होती जाएगी. आम आदमी कुछ समझ सकें ये बड़े लोग सब माल बेच देंगे. आम आदमी के समझ में कुछ आने से पहले पैसे का धुआँ हो जाएगा कल!

अच्युत - काय बोलताय पांडेजी? असं असेल तर भयानक आहे हे!

पांडेजी - देखिए कल क्या होता हैं! माथा सन्न हो जाएगा!

भास्कर - पण का हे? कशाला इतका पैसा मिळवायचा चुकीच्या गोष्टी करून?

पांडेजी - क्या करें? बड़ी बड़ी चीजे करनी हो, तो पैसे के बिना कैसे चलेगा? इन लोगों को सत्ता पानी हैं, निरंकुश सत्ता पानी हैं.

समर - लेकिन इतना पैसा?

पांडेजी - क्या करें? हमारा तो भजिया बेच कर चल जाता हैं. इन लोगों को तो देश, जमीर और ईमान बेच कर भी पैसा कम पड़ता हैं!

समर - भयानक आहे सगळं!

अच्युत - जमीर म्हणजे काय?

पांडेजी - रूह

अच्युत - रूह म्हणजे?

भास्कर - आत्मा!

(इतक्यात अविनाशचा फोन येतो)

समर - (फोन स्पीकर फोन मोड वर टाकून) बोल अविनाश!

अविनाश - आज स्टॉक मार्केट पाहिलंस का? मोदी हैं तो मुमकिन हैं! (हु हु हु)

समर - उद्या निकाल उलटे लागले तर?

अविनाश - शक्य नाही. स्टॉक मार्केटमध्ये स्वतःचे पैसे लावणारे लोक असतात. तुमच्यासारखे फुकटे ‘लिब्रांडू’ नसतात. अभ्यास करून लावतात ते पैसे.

भास्कर - तू खरेदी केली की नाही काही?

अविनाश - मी पाच लाख टाकले मार्केटमध्ये. मोदीजीसुद्धा म्हणाले होते मार्केट वर जाणार आहे, शेअर्स खरेदी करा म्हणून.

भास्कर – अरे, निकाल लागेपर्यंत थांबायचं अविनाश.

अविनाश - मोदींसारखा प्रामाणिक पंतप्रधान परत मिळणार, भारत ‘महासत्ता’ बनणार म्हणून स्टॉक मार्केट वर गेलंय. भारत महासत्ता बनणार २०४७पर्यंत! (हुहुहु)

भास्कर - (उपहासानं) हो, अदानी आणि अंबानीसारखे लोक असल्यावर होणारच भारत ‘महासत्ता’!

अविनाश - तू बोल उपहासानं, पण खरे देशभक्त आहेत ते!

समर - उद्या मार्केट पडणार आहे, अविनाश सावध राहा!

अविनाश - (हुहुहु) भारतातली जनता मूर्ख आहे, असं म्हणणार आहात पुन्हा उद्या तुम्ही. पण खरं सांगू का? भारतातली जनता खरी रत्नपारखी आहे. उद्या मार्केट वर जाणार आहे.

अच्युत - उद्या सगळे माझ्या घरी या, आपण एकत्र बसून निकाल बघू.

अविनाश - मी आणि नाना नक्की येतो. पण हे ‘लिब्रांडू’ येणार नाहीत नक्की!

पांडेजी - (गालातल्या गालात हसत) आ जाएंगे हम तीनों! सुबह आठ बजे पहुंच जातें हैं, अच्युतजी के घर!

दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पांडेजी, भास्कर आणि समर अच्युतकडे पोहोचले, तेव्हा नाना आणि अविनाश येऊन बसले होते. अच्युत आत चहा करत होता. या गोंधळात बसायला नको म्हणून त्याची बायको मुलांना घेऊन माहेरी गेली होती.

(एकविसाव्या शतकातील स्त्रियासुद्धा आजच्या स्त्रियांसारख्याच आपल्या नवऱ्यांच्या राजकारणावरील अर्वाच्य चर्चांना वैतागत असत, हे बघून आजच्या बाविसाव्या शतकातील वाचकांना निश्चितच मौज वाटेल. संपादक)

पाचच मिनिटात अविनाश आणि नाना आले. अविनाशने आपल्या मोबाईलवर ट्रेडिंग अॅप उघडून ठेवले होते. आता मोदीजी जिंकणार आणि प्रचंड प्रॉफिट होणार, असा सगळा भाव होता. अविनाशने पेढेसुद्धा बरोबर आणले होते. तासाभरात चित्र स्पष्ट होईल आणि आपण त्या उन्मादात भास्कर, समर, पांडेजी आणि अच्युत यांना पेढे खायला लावायचे, असा त्याचा बेत होता.

निकाल यायला लागले. सुरुवातीला पोस्टाने आलेली मते मोजली जातात आणि मुख्यतः शहर भागातील ट्रेंड यायला लागतात. हा सगळा भाजपचा मतदार असल्याने भाजपने शंभरची बढ़त घेतली. अविनाश उसळायला लागला. पांडेजींनी त्याला आपल्या ट्रेडिंग अॅपवर बघून सांगितले की, शेअर मार्केट पडायला लागले आहे. अविनाश घाबरला.

थोड्याच वेळात विरोधक आणि भाजप यांच्यात फारसा फरक राहिला नाही. भाजपला क्लिअर बहुमत मिळणार नाही, हे साधारण दहा वाजेपर्यंत स्पष्ट झाले. कुणाला काही कळायच्या आत निफ्टी निर्देशांक १५०० पॉइंट्सने पडला. अविनाशच्या पाच लाखांचे तीन लाख झाले. अविनाशचे हात थरथरायला लागले.

अविनाश - (भयंकर पडलेल्या चेहऱ्याने) नाना मी विकून टाकू का शेअर्स?

नाना – हो, विकून टाक लगेच. मोदींजींची किंमत नसेल या भारतीय जनतेला तर भारतात ‘इन्व्हेस्टमेंट’ करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना आवडणार नाही ते. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही शून्य होतील. बसा बोंबलत! शून्य रुपये!

पांडेजी - जरा रुकिए अविनाशबाबू. स्टॉक मार्केट किसी आदमी के नाम पर नहीं चलता हैं. उन्हें सिर्फ स्टेबल सरकार चाहिए होती हैं. आप शांती रखिए.

समर – अरे, बाप रे वाराणसीमधून मोदीजी पांच हजार मतों से पिछड़ रहें हैं!

अविनाश - (किंचाळत) काय? वेड लागलं आहे का या भारतीय जनतेला? मूर्ख मूर्ख मूर्ख! मी विकून टाकतो सगळे शेअर्स. आता दोन लाखांत सुटतो आहे, मोदीजी पडले तर शून्य होईल हे स्टॉक मार्केट.

पांडेजी – अरे, ऐसा कुछ नहीं होता हैं. आप शांती रखे अविनाशजी. मार्केट को लग रहां हैं की, हंग पार्लमेंट हो रहीं हैं. उसको जितना गिरना था वो गिर चुका हैं. मोदीजी या राहुलजी जिसकी भी सरकार आती हैं, वो स्टेबल हैं इतनाही मार्केट देखेगी और जिस स्पीड से गिरी हैं उसी स्पीड से ऊपर जाएगी.

अविनाश - राहुल की सरकार और मार्केट वर जाणार? कसं शक्य आहे? अविनाशने एका झटक्यात सगळे शेअर्स विकून टाकले. दोन लाख तेरा हजाराचे नुकसान झाले.

अच्युत - (अविनाशला चहा देत) अविनाश चहा घे. शांत हो.

अविनाश – अरे, कसं व्हायचं शांत? अरे साक्षात मोदीजींवर एक टुकार काँग्रेसवाला आघाडी घेतो.

या गोंधळात भास्कर थोडावेळ बाहेर जाऊन आला.

भास्कर - अविनाश, मोदीजी जिंकल्यावर पेढे खायला लावणार होतास आम्हाला. ते पेढे विकत देतोस का मला?

अविनाश - का?

भास्कर - तेच पेढे आता आम्हाला तुला आणि नानांना खायला लावायचे आहेत.

अविनाश – नाही, विकणार मी ते पेढे.

नाना – नको, अविनाश नको विकूस ते पेढे, आठशे रुपये किलोचे आहेत.

भास्कर - आपल्या हॅवरसॅकमधून पेढे काढत मग हे खा. बाराशे रुपये किलोवाले आहेत.

अविनाश - एका ‘अवतारपुरुषा’चा अपमान होतो आहे भारत देशात आणि मी पेढे खाऊ?

भास्कर - (नानांना पेढा देत) नाना तुम्ही तरी घ्या.

नाना – हो, मला चालेल. शत्रूचे नुकसान होत असेल, तर आपण ते केलेच पाहिजे अविनाश!

भास्कर - (बॉक्स पुढे करत) अविनाश?

अविनाश - मला नाही करायचे शत्रूचे नुकसान!

नाना - (पेढे खात) मोदीजी जिंकणार आहेत शेवटी. तेव्हा आपण आपले पेढे त्यांना देऊ आणि आपणही खाऊ.

अविनाश - मी नाही देणार त्यांना पेढे.

नाना - बरं बाबा! आपण दोघंच खाऊ ते पेढे. तुझ्याशी मैत्री म्हणजे फारच त्याग करायला लागतो मला.

अविनाश - आता मोदीजी पडले तर काय?

नाना - मोदीजी प्रतीकरूप आहेत. हिंदुत्व कायमचे आहे. मोदी पडले, तर त्यांच्या जागी उभा राहील कुणीतरी शिलेदार. योगीजी आहेत.

पांडेजी - मोदीजी पडणार नाहीत. थोडेबहुत मार्जिनसे जीत जाएंगे.

(पांडेजी गेली पाच-दहा मिनिटे आपल्या मोबाईलवर काहीतरी उद्योग करत होते.)

भास्कर - काय करताय पांडेजी?

पांडेजी - शेअर्स की खरीद!

समर - इस गिरते हुए मार्केट में.

पांडेजी - कल मार्केट ऊपर गया था, तब बेच दिए थे. आज आज पहलीवाली कीमत पर आ गए तो खरीद लिए.

भास्कर - कल कितना मुनाफा हुआ?

पांडेजी - (हसत) जाने भी दीजिए! गरीब का पैसा काहे गिनते हो?

भास्कर - (अविनाशकडे अर्थपूर्ण बघत) सांगा ना पांडेजी!

पांडेजी - ज्यादा नहीं तीन मिले थे.

समर - और आज फिर ले लिए?

पांडेजी - हां!

भास्कर - आणि मार्केट असंच पडत गेलं तर?

पांडेजी - तीन का मुनाफा हुआ हैं उससे अॅव्हरेज कर लूंगा!

समर - कमाल आहे.

अविनाश - बुडणार आहात तुम्ही. आता राहुल जर पंतप्रधान झाला ना, तर चिंध्या उडणार आहेत मार्केटच्या.

पांडेजी - (हसत) देखेंगे.

भास्कर - राहुल गांधी रायबरेलीमधून अडीच लाखांनी पुढे. वाराणसीमधून मोदीजी साठ हजारांनी पुढे.

समर - उत्तर प्रदेशात भाजपचा सूपडा साफ!

अविनाश - (दात ओठ खात) माझं घर असतं तर काहीतरी फोडलं असतं मी!

अच्युत - इथं काही फोडू नकोस प्लीज. बायको मला तुझ्या घरी राहायला पाठवेल कायमचं.

अविनाश - मी जातो घरी! काहीतरी फोडल्याशिवाय मन शांत नाही होणार माझं. चला नाना!

नाना – नको, मी बोलवतो माझ्या ड्रायव्हरला!

अविनाश - ठीक आहे, जातो मी!

(अविनाश जातो)

भास्कर - भाजपचा फुगा फुटला!

नाना - भाजपचा नाही मोदींचा फुगा फुटला! हिंदुत्व आबाधित आहे.

(पण नानांचे स्मितहास्य विलोप पावले होते).

भास्कर - बरं पेढे तर घ्या. मोदीजी दोन राऊंड का होईना पिछाडीवर होते.

समर - आणि राहुल मोदीजींपेक्षा खूप जास्त मार्जिननी निवडून येतो आहे.

नाना - (पेढा खात, चेहरा आंबट) छान आहे! कुठे मिळतात रे!

भास्कर - मथुरा पेढा आहे. मी दाखवेन दुकान तुम्हाला.

(एकंदर सगळा अंदाज आल्यामुळे नानासुद्धा निघण्यासाठी उठतात).

नाना - मी अविनाश बरोबर मुद्दाम गेलो नाही. फार हॉट हेडेड आहे पोरगा! ठीक आहे येतो मी!

नाना गेल्यावर थोडा वेळ सगळे गालातल्या गालात हसत राहिले. विरोधकांना २४०च्या आसपास जागा मिळणार, हे आता स्पष्ट झाले होते. मोदीजींना आपल्या आघाडीमधील नीतीश आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर बहुमतासाठी अवलंबून राहावे लागणार होते.

भास्कर - यांना साधं बहुमत मिळवता आलं नाही आणि म्हणत होते - “अब की बार चारसौ पार”!

समर - अगावपणा सगळा.

भास्कर - माझा एक मित्र आहे. जात सांगत नाही त्याची. म्हणत होता मोदी विरोधक ‘मिनिस्क्यूल मायनॉरिटी’मध्ये आहेत.

समर - घे म्हणावे ‘मिनिस्क्यूल मायनॉरिटी’!

भास्कर - काय चेहरे पडले होते दोघांचे.

पांडेजी - यूपी में देखीए ३५ सीट्स आएगी उनकी सिर्फ.

भास्कर - वाटलं नव्हतं की, इतका मोठा झटका देईल यूपी.

पांडेजी - अब यूपी भाजप के हाथ से निकल गया, बीस साल कर लिए.

भास्कर - म्हणजे आता पूर्ण बहुमत नाही भाजपला येती वीस वर्षे. (जोरात हसतो).

भास्कर, समर आणि पांडेजी यांना खरा आनंद झाला होता. नरेंद्र मोदी या गृहस्थाचा फुगा फुटल्याचा. गेल्या दहा वर्षांचा विरोध होता त्यांचा! अवतार काय, विश्वगुरू काय, योगी काय, तपस्वी काय, फकीर काय, युगपुरुष काय… जिभेला हाड नसल्यासारखे भक्तलोग बोलत होते. निवडणुकीच्या दरम्यान तर हा वाह्याततपणा तर पराकोटीला पोहोचला होता. भगवान जगन्नाथ हे मोदीजींचे भक्त आहेत, असे सांगितले जाऊ लागले होते.

पांडेजी - भास्कर आज हस रहें हो, लेकिन कल-परसो में तुम बहुत निराश हुए थे.

भास्कर – हो, मी म्हणालोच होतो की, भाजपला २५०च्या वर सीट्स मिळाल्या तर मी राजकारणावर परत बोलणार नाही.

समर - भारतीय जनतेने लाज राखली लोकशाहीची.

थोड्याच वेळात बातमी आली की, साक्षात अयोध्येत भाजपचा उमेदवार पडला. भास्कर आणि समर भयंकर एक्साईट झाले.

पांडेजी - (गालातल्या गालात हसत) हमारा यू पी हैं!

थोड्या वेळाने कळले की, अयोध्या, चित्रकूट, नाशिक आणि रामेश्वरम अशा रामायणामधल्या सगळ्या महत्त्वाच्या जागी भाजपचे उमेदवार पडले होते.

भास्करने ही बातमी अविनाश आणि नानांना फॉरवर्ड केली. खाली लिहिले - मतं मिळवण्यासाठी आपलं नाव वापरलेलं रामलल्ला यांना आवडलेलं दिसत नाही.

थोड्याच वेळात सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. प्रभू श्रीराम भाजपला प्रत्येक ठिकाणाहून हाकलून देत आहेत, अशा कार्टून्सनी धमाल उडवून दिली. छोट्या प्रभू रामचंद्रांच्या बोटाला धरून प्रभू रामचंद्रांपेक्षा दुप्पट उंचीचे मोदीजी राममंदिरात घेऊन चालले आहेत, असे कार्टून मोदीभक्त दहा वर्षे फॉरवर्ड करत होते. आज मोदीजींपेक्षा दुप्पट उंचीचे रामचंद्र मोदीजींना राममंदिराबाहेर हाकलून देत आहेत, असे कार्टून सोशल मीडियावर व्हायरल झाले.

भास्कर एकामागून एक मेसेज अविनाश आणि नानांना फॉरवर्ड करत राहिला. थोड्या वेळाने अविनाशच्या बायकोचा फोन आला. ती म्हणाली की, प्लीज कुठलाही मेसेज फॉरवर्ड करू नकोस. अविनाशने आतापर्यंत आठ कपबशा फोडल्या आहेत.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

अशी फार मोठी धमाल एक जून ते ४ जूनच्या संध्याकाळपर्यंत झाली.

दहा एक वर्षं जगातील कुठल्याही सरकारला होत आली की, जनमत त्या सरकारविरुद्ध जाऊ लागते. ही प्रक्रिया अतिशय नैसर्गिक मानली जाते. बेफाम आणि बेलगाम प्रचारतंत्र वापरून ही प्रक्रिया थांबवता येईल, असा हिशोब करून मोदी सरकारने प्रचार आणि अपप्रचाराची राळ उडवून दिली. जोपर्यंत सोशल मीडिया आहे तोपर्यंत आता भाजपला हरवणे अशक्य आहे, असं भक्तलोक म्हणत होते. आता हजार वर्षं आमचंच राज्य, अशी बेताल वक्तव्यं केली जात होती. भक्तलोकांचा त्यावर विश्वासही होता.

थापा ऐकून लोकांची पोटं भरत नाहीत. लोकांनी भाजपला एक ‘करारा तमाचा’ मारला. भाजपला बहुमत मिळाले नाही, परंतु भाजपप्रणित आघाडीला मात्र बहुमताचा आकडा पार करता आला होता. चार तारखेला संध्याकाळी भाजपने विजय सभा घेतली. मोदीजींचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. विजयाची कसली सभा, मातम होता सगळा! ‘चारशे पार’ म्हणणाऱ्या लोकांना नीतीशकुमार आणि चंद्राबाबू यांसारख्या संधीसाधू लोकांच्या कुबड्या घेऊन सरकार स्थापन करावे लागत होते. भारतातील जनता ती विजयाची सभा बघून गालातल्या गालात हसत राहिली.

पाच तारखेपासून - “आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो” असा घोष भक्तांनी सुरू केला.

शिरोजी शांत होता. ‘आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो’ असं भक्त कितीही ओरडत असले, तरी मोदीप्रणित एकाधिकारशाहीचा रथ आता उतरणीला लागला आहे, हे त्याला स्पष्टपणे दिसत होते. मोदीकाल हा एक युगप्रवर्तक काल नसून; भारताच्या राजकीय इतिहासाच्या आवर्तनामधील मोदीप्रणित एकाधिकारशाही हे एक अगदी छोटेसे असे आवर्तन आहे, हे त्याला पूर्णपणे माहीत होते. आधीच्या बखरींमध्ये त्याने आपले हे मत अनेक वेळा लिहूनही ठेवले होते.

भारत हा महाप्रचंड देश आहे. येथे सगळ्यांना सामोपचारानेच बरोबर घेऊन जावे लागते, हा धडा मोदीजी विसरले होते. कुणाच्याही टाचेखाली यावा, इतका ‘अनाडी भारत’ आता राहिला नव्हता! ‘मी प्रधानसेवक आहे’, असं म्हणणाऱ्या माणसाची मजल ‘ईश्वरीय ऊर्जा माझ्यामधून काम करते’, असं म्हणण्यापर्यंत गेली होती. परंतु भारतीय जनता फसली नाही. ‘बाकी जे काही असेल ते असो, आपण प्रधानसेवक आहात, सेवकासारखे वागा’, असा स्पष्ट संकेत चार तारखेला भारतीय जनतेने नरेंद्र मोदींना दिला. सगळ्या जगात हसे झाले.

शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले - “जनतेने भाजपला धडा तर दिला होता, परंतु त्यातून योग्य ते बोध घेण्याचे शहाणपण ‘मोदीकालीन भारता’तील उजव्या नेतृत्वाकडे नव्हते. तेवढी वैचारिक कुवतच तत्कालीन उजव्या नेतृत्वाकडे नव्हती. हिंदुत्ववादी राजकीय विचाराची भारताला गरज होती, हे स्पष्ट होते. जनतेने भाजपला मते देऊन ते दाखवूनही दिले होते. परंतु लोकांना हिंदूंच्या हितांचे रक्षण कारणारा ताकदवान दबाबगट हवा होता, हिंदुत्वाच्या नावाखाली एकाधिकारशाही स्थापन करण्याचे लायसन्स भारतीय जनता कुणालाही देणार नव्हती. जशी मिळेल तशी सत्ता स्थापन करून पूर्वीच्या एकाधिकारशाहीच्या मार्गावर लवकरात लवकर जाण्याचा मोह मोदीजींना लवकरच होणार होता. आणि अगदी त्याचमुळे भारतीय हिंदुत्ववादी विचाराचे फार मोठे नुकसान होणार होते. भारतीय हिंदुत्ववादी विचार समावेशक व्हावा, ही काळाची गरज होती, परंतु भारतीय हिंदुत्ववादी विचार जास्त जास्त संकुचित करता आला, तर सत्ताप्राप्तीचे मार्ग सुकर होत जातील, असा होरा मनाशी बांधून ‘मोदीकालीन भारता’तील उजवे नेतृत्व पावले टाकत होते. या सगळ्यातून हिंदुत्ववादाचे फक्त नुकसान आणि नुकसानच होत राहणार होते.”  

गेल्या शंभर वर्षांचा इतिहास बघितला, तर शिरोजीचा होरा तंतोतंत खरा ठरला, असेच म्हणावे लागते.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......